थोड्याशांचे स्वातंत्र्य

मला स्वातंत्र्यावर लिहायला सांगणे हे काहीसे व्यंगरूप आहे, कारण मी गेली सहा वर्षे एका तुरंगातल्या ‘ बाले ’-तुरूंगात (तिहार जेलच्या अति धोकादायक कैदी विभागात) कोंडलेला आहे. इथे मुख्य तुरूंगात जाण्याचे किंवा आजारी पडल्यास इस्पितळात जाण्याचेही स्वातंत्र्य नाही.
अराजकापासून लोकशाही केंद्रीकृत सत्तेपर्यंतच्या पटात स्वातंत्र्य कुठेतरी बसवले जाते ती तशी ही एक सापेक्ष संकल्पना आहे. पण जी कोणती व्यवस्था असेल तिच्यात काही जणांना इतरांपेक्षा जास्त स्वातंत्र्य असते. भारतात ‘सितारे’ – सिनेक्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील, उद्योगधंद्यातील वा राजकारणातील – पूर्ण स्वातंत्र्य उपभोगत असतात; अगदी खून करण्याचेही. उपासमारी भोगणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आपल्या मुला-बांळाना दोन वेळचे जेवण वा आजारपणात उपचार करण्याचेही स्वातंत्र्य नाही. मला तुरूंगवास हा कोंडून घालण्यासारखा आणि स्वातंत्र्य हिरावून घेण्यासारखा वाटतो, तर सराईत भुरट्या गुन्हेगाराला तसे वाटत नाही. त्याला तुरूंगात स्वातंत्र्य नसल्याचे जाणवत नाही, व तो सुटकेनंतर पुन्हा येथे येण्याचे प्रयत्नही करू शकतो.
स्वातंत्र्य हा शब्द अनेकदा विकृत अर्थानेही वापरला जातो पाश्चात्य देशांतील माध्यमांमधून केले जाणारे तरल बुध्दिभेदही स्वातंत्र्य म्हणून वर्णन केले जातात; चीन सारख्या देशांतील नियंत्रित माध्यमे स्वातंत्र्य या वर्णनात बसत नाहीत. अमेरीका आणि भारत हे दोन देश लोकशाहीवादी व सर्वाधिक स्वातंत्र्य देणारे मानले जातात. पण अमेरीकेतील काळ्यांना किंवा भारतातील दलितांना तसे वाटते का, हेही विचारून पाहावे. दलितांना ब्राम्हणी शासकांपेक्षा ब्रिटीश बरे होते असे वाटते; कारण ब्रिटिशांचे जात्याधारित दमन उघड नव्हते, तर आजच्या अवर्णीयांचे वागणे बटबटीत, अमानुष व घृणास्पद आहे.
जीवनाच्या इतरही क्षेत्रांत अशी स्वातंत्र्याच्या संकल्पनेची विकृती दिसते, भलेही ती इतकी उघड नसेल. उदाहरण म्हणून पोलीस आमच्याशी कसे वागतात ते पाहा. कोर्टात जाताना मला एका गाडीतल्या तीन फूट औरस-चौरस पिज-याच कोंडणे, त्यांना चालते- त्या पिजं-यात उन्हाळ्यात श्वासही धड घेता येत नाही. कैद्याचे वय, तब्बेत इ. काहीही या कोंडणुकीच्या आड येत नाही. कोर्टात पोचताच आमची मानहानीकारक शारीरिक ‘तपासणी’ केली जाते, जिच्या दरम्यान पेन ही संशयास्पद मानले जाते; एकदा तर चष्माही. आम्हाला नातलग, वकील, कोणाशीही संवाद साधू दिला जात नाही. तुरूंगातल्या ‘डॉन्स’ ना मात्र असे काहीही भोगवे लागत नाही. या सर्व व्यवहारांत पोलीस भारतातील स्वातंत्र्य व लोकशाहीवर बढायाच्या गप्पाही मारतात. ज्यांवर गुन्हे सिध्द झाले आहेत अशांनाही मानाने वागवावे, असे नियमावली व अनेकानेक कोर्टाचे निर्णय सांगतात; आरोप सिध्द होण्यापूर्वी तर हे घडायलाच हवे पण हे नियम पुस्तकांमध्येच राहते. एकूण गुन्हेगारी खटल्यांची न्याय व्यवस्था कैद्याचा आत्मसन्मान चिरडण्याचेच काम करते; अर्थातच, शेठ लोक चित्रतारे-तारका व डॉन्सना हे लागू नसते.
न्यायसंस्थाही इतर संस्थांपेक्षा, क्षेत्रांपेक्षा न्याय वागत असली तरी, काही ताजे निवाडे शंकास्पद आहेत, व यांत सर्वोच्च न्यायालयही येते. माझ्याच केसेस पाहा: त्यांचा पाया आहे एक खोटा कबूलीजबाब, जो म्हणे मी तेलगंणातील पोलिसांना दिला. त्यावर माझी सही नाही. तो तेलगू भाषेत आहे, जी मला ना लिहिता-वाजता येते, ना समजते. कोर्टातही मी असा कबुलीजबाब दिल्याचे नाकारले आहे. त्या आधाराने माझ्यावर दहा-पंधरा खटले भरले गेले आहेत. आज फक्त दोन खटल्यांत आरोपपत्र ठेवले गेले आहे व या खटल्यात उच्च न्यायालयाने मला जामीन दिला आहे. इतर खटले मात्र प्रलंबित आहेत. दिल्लीच्या नायब राज्यापालाने दिल्लीतील खटल्यांचा निकाल लागेपर्यंत मला दिल्लीबाहेर जाण्याची मनाई केली आहे. म्हणजे कायद्यांत (de jure) नसला तरी प्रत्यक्षात (de facto) दिल्लीचा नायब राज्यपाल आंध्र व तेलंगण कोर्टाच्या वर आहे.
याचा अर्थ हाच, की स्वतंत्र्याची संकल्पना व्यक्तिसापेक्ष आहे. ती असणारही आहे. वास्तवात माणुसकी व न्याय यांच्या आधाराशिवाय स्वातंत्र्य निरर्थक आहे. ते फक्त पाश्चात्य शब्दकोशातच केवल रूपात भेटते. खरे तर त्या मुक्त जगातही (free world) स्वतःला मुक्त समजणारे बहुतेक जण गंड, स्वतःबद्दलच्या शंका, असुरक्षितता इत्यादींच्या जंजाळात अडकलेलेच असतात. आणि जर मी अशा (मानसिक) तुरुंगात असेन, तर त्याचा माझ्या भोवतालावरही परिणाम होतो. खुलेपणाचा सार्वत्रिक अभाव सर्वच वातावरणाला कृत्रिम बनवते, आणि यातून व्यक्तीव्यक्तींमध्ये मुक्त संबंध अशक्य होतात. त्यांच्या जागी डावपेच, कुरघोडी करण्याचे प्रयत्न, नाटकी व कपटी वागणूक, अशा बाबी घेतात. आणि जे या वातावरणातून सुटून पळू पाहतात, ते तसे करू शकत नाहीत, कारण ते अडकलेलेच असतात.
आपण स्वातंत्र्याची चर्चा कमी करून माणुसकी व न्याय यांची चर्चा करायला हवी. जर माणुसकी व न्यायभावना वाढल्या तर स्वातंत्र्य आपोआपच सोबत येईल. माणुसकी व न्याय यांचे वजन वाढेल, त्या प्रमाणातच स्वातंत्र्यही वाढेल.
कोणास मुक्त माणसांचा खरा भाव पाहायचा झाला तर केवळ आसपासच्या मुलांकडे पाहावे. त्यांच्या वागण्यात उत्स्फूर्तपणा असतो. मनांतले सर्व भाव; आनंद, राग, दुःख, खिन्नता, सारे थेटपणे मुलांच्या चेहऱ्यावर दिसतात. प्रौढांमध्ये असा नैसर्गिकपणा आल्यास आजच्या कुढ्या समाजजीवनात ताज्या वाऱ्याचा झोत आल्यासारखे होईल.
प्रौढ व्यक्तित असा मुक्त, निरागस भाव मला माझी दिवंगत पत्नी अनुराधा हिच्यात दिसत असे. पदव्युत्तर वर्गासाठीची प्राध्यापक असूनही तिच्यात लहान मुलाची निरागसता होती, हातातल्या कामाविषयी उत्कट बाव होता व न्यायाबाबतचा प्रचंड हळवेपणा होता. फेनिक्स ग्रीनच्या शब्दांत ती ‘माणूस होण्यासाठी मुक्त’ (free to be human) होती.
(कोबाड गांधी ‘बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली दिल्लीच्या तिहार जेलमध्ये न्याय मिळण्याची वाट पाहत आहेत. वरील लेख हा इंडियन एक्सप्रेसच्या 15 ऑगस्ट 2015 तील ‘Only Some Are Free’ या लेखाचे भाषांतर आहे.)

अनुवादः नंदा खरे

टीप: कोबाड गांधींचा वरील लेख वाचून पुण्यातील ‘अक्षर नंदन’ शाळेच्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला गेलो. शालेय स्वातंत्र्यदिनाचे इतर उपचार आटोपल्यानंतर काही माजी विद्यार्थ्यांनी एक जाहीर विनंती केली. ती मुले नर्मदा बचाव आंदोलनाची पाहणी करण्यास गेली होती, व या वर्षात वाढणाऱ्या सरदार सरोवराच्या धरणाच्या उंचीने किती गावे पाण्यात जातील याची माहिती त्यांनी उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षक, इत्यादींपुढे मांडली. सोबतच या गांवातील लोकांसोबत सहवेदना व्यक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.
असे कळते की, आजच्या सरकारच्या काही समर्थकांनी शाळेतल्या शिक्षकांना असले 18-20 वर्षाच्या मुलांनी केलेल्या तीनेक मिनिटाच्या भाषणाला परवानगी दिल्याबद्दल जाब विचारला!
मला तरी स्वातंत्र्य भावनेचा या वागणुकीने अवमान झाला असे वाटते. विरोधी मताची हलकिशीही अभिव्यक्ती आजच्या सत्ताधाऱ्यांना मनोमन घाबरवते असे दिसते.

नंदा खरे

vidya_nand@hotmail.com,

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.