शंका समाधान @शाखा

गेली अनेक वर्षे जो युक्तिवाद ऐकू येई, तो आताही ऐकू यावा याचा अर्थ कोणी काहीच बदललेले नाही काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी कोणी काही विधान केले की, संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून ठरावीक उत्तर येते; ते म्हणजे टीकाकारांनी प्रत्यक्ष संघशाखेवर जावे आणि आपल्या शंकांचे निरसन करवून घ्यावे! गेल्या महिन्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी संघावर टीका करताच केंद्रीय मंत्री पी. राधाकृष्णन यांनी त्यांना असाच सल्ला दिला. एक तर असा सल्ला राहुल गांधीच काय, अन्य कोणताही टीकाकार पाळणार नाही हे जितके खरे, तितकेच खरोखर कोणी टीकाकार शाखेवर येऊन गेले आणि त्याने/तिने आपले मत बदलले असेही झाल्याचे आढळून आले नाही. दुसरे, एखाद्याने टीका केली रे केली की त्या वैचारिक, तात्त्विक, तार्किक प्रत्युत्तर न देता शाखेवर या, सारे समजेल असेच देणे संघावर उलटू शकते. कारण संघ आता केंद्रात व राज्यांत भाजपच्या रूपाने सत्तेत आहे. अगदी किरकोळ उदाहरण द्यायचे झाल्यास मांसाहाराचे देता येईल. मांस खाणे मना करणाऱ्या संघाला तुम्ही खाऊन तर बघा अन मग बोला असे सुनावल्यास पटेल का ते? हिंदू स्त्रियांनी चार मुले जन्मास घालावीत असे जेव्हा संघाचा एक कार्यकर्ता म्हणतो, तेव्हा त्याला आधी अनुभव घ्यायला सांगितले तर संघ ऐकेल काय? कोणी कशीही टीका केली तरी त्याला प्रत्यक्षानुभवाचा प्रसाद घ्यायला सांगायचे ही एक पळवाट झाली. इस्लाम अमुक तमुक आहे असे जेव्हा एखादा हिंदू म्हणतो, तेव्हा एखाद्या मुसलमानाने त्याला इस्लाममध्ये या, सारे मत पालटेल असे सुनावणे जितके चुकीचे आहे, तितकेच संघ या शाखेवर आणि आपले डोळे उघडून घ्या असे म्हणणे गैर आहे.
संघ असे सतत सांगत राहतो तेव्हा तो सर्वसामान्यांच्या समजुतीचा व जगरहाटीच्या एकाच बाजूचा लाभ घेत राहतो. ती बाजू म्हणजे व्यक्तीविषयी, जातीविषयी, संस्थेविषयी, पुस्तकाविषयी वा कोणत्याही वस्तूविषयी ज्ञान नसताना मत व्यक्त करू नये. बहुतेक सामान्य माणूस माहीत नाही वा सांगता येत नाही असे उत्तर देऊन त्याच्यासमोर झालेल्या काही वादग्रस्त आणि टीकास्पद विधानांविषयी आपली बाजू स्पष्ट करतो. त्याला खरोखर काही माहीत नसते हे जसे खरे असते तसे त्याला त्याविषयी काही ठोस सांगायचे नसते हेही खरे असते. काही माहीत नसताना बोलणे हा आगाऊपणा झाला. खेरीज फजितीही होऊ शकते. अनुभव हाच खरा शिक्षक हे प्रत्येक जाणतो. संघ असे गृहीत धरतो की त्याच्यावर टीका करणारे अज्ञानातून व गैरसमजातून टीका करतात. त्यांनी असे माहीत नसताना बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष शाखेवर जावे आणि गैरसमज दूर करावेत. संघ येथे भारतीय (हिंदू?) माणसाच्या एका व्यंगाचा गैरफायदा घेतो. भारतीय (हिंदू?) माणूस कशावरही पटकन विश्वास ठेवणारा, श्रद्धा बाळगणारा आणि मत बनवणाराही आहे. एखाद्या देवतेचा आशीर्वाद पाळावा यासाठी नवस बोलणे येथपासून जवळपास असाध्य असलेल्या रोगावर अवैज्ञानिक इलाज करून पाहणे असे असंख्य प्रयोग भारतीय (हिंदू?) माणूस रोज करीत असतो. तो कोणाचे तरी ऐकतो आणि करून पाहावे असे ठरवून ते करूनही टाकतो. अनुभव अथवा ठोस निष्कर्ष याकडे तो कधीही पाहत नाही. सांगणाऱ्या व्यक्तीची प्रतिष्ठा, पोच, नाते, अनुभव, सत्ता, वय, जात, पैसा हतबलता याकडे पाहून तो निर्णय करतो. विवेक, शिक्षण, विज्ञान, तर्क याकडे त्याचे दुर्लक्ष होते. म्हणूनच रोज आपण फसवणुकीच्या, शोषणाच्या, अन्यायाच्या, पिळवणुकीच्या, छळाच्या, गांजणुकीच्या बातम्या वाचतो, ऐकतो. कोणीतरी कोणावर विश्वास ठेवला म्हणून हे प्रकार घडले हे आपण त्या बातम्या वाचताना, ऐकताना, स्वत:ला सांगत राहतो. तरीही विश्वास, श्रद्धा, समजूत यांच्या आहारी माणूस जातो आणि बऱ्याचदा फटका खातो. अघोरी उपचार, जीर्ण कर्मकांडे, टाकाऊ परंपरा, खोट्या समजुती यांचा पुनरुद्भव पुन:पुन्हा होत राहण्याचे कारण जवळच्यापैकी कोणीतरी त्याविषयी जोर लावलेला असतो. स्वत:विषयी वा भविष्याविषयी वा सुरक्षिततेविषयी साशंक मन मग शरण जाते आणि सांगितल्याप्रमाणे पालन करते. सांगणाऱ्याच्या चांगुलपणाचा संशय न घेता भारतीय (हिंदू?) माणूस बऱ्याच गोष्टी स्वीकारत जातो आणि केवळ सांगोवांगी, बोलवा, अफवा, गावगप्पा, ऐकीव ज्ञान यावर भरवसा ठेवत राहतो. जाहीरनामे दुर्लक्षित केले जाऊन भारतीय राजकारणात साऱ्याच राजकीय पक्षांचे राजकारण भाषणांवर व आश्वासनांवर का चालते याचे कारण या भारतीय (हिंदू?) माणसाच्या अशा स्वभावात आहे. स्मृती व श्रुती यांतच पुष्कळ ज्ञान टिकवून ठेवणाऱ्या आपल्या देशात मनुष्याच्या शब्दावर विश्वास ठेवला जाणारच ना? लिखापढीवर अजूनही भारतीय माणूस अडून राहत नाही. त्याला पटवले, समजावले अथवा वळवले की भागते. पडताळणीचा किंवा खातरजमा करण्याचा ना त्याला सोस असतो ना त्याला तसे करू दिले जाते. आपल्यावर विश्वास नाही का? लिहून देऊ का? असे कोणी कळकळीने सांगू लागले की भारतीय (हिंदू?) माणसाचे काळीज द्रवते व तो गठला जातो. साक्षरता वाढली, कायदे झाले तरीही असंख्य व्यवहार अजूनही तोंडी होतात. शब्द दिला, जबान दिली, वचन दिले, प्रतिज्ञा केली, शपथ घेतली, आणाभाका घेतल्या, हवाला सांगितला हे शब्दप्रयोग अद्याप भारतामधून नाहीसे झालेले नाहीत.
संघ या स्थितीचा लाभ कसा घेतो ते पाहूया. संघाविषयी जे टीका करतात, संघाचे वाभाडे काढतात त्यातील सारेच जण अभ्यासाशिवाय, निरीक्षणाशिवाय वा अनुभवावाचून बोलत नाहीत. अशांना प्रत्यक्षानुभूतीचा प्रत्यय घ्यायला सांगायचे आणि स्वत:विषयी मात्र वाटेल ती अफाट, अतिशयोक्त व अवास्तव प्रसिद्धी करण्याला मज्जाव करायचा नाही अशी दुहेरी चाल संघ खेळतो. संघाची म्हणून अनुभूती दोनदाच येते. एक, संचलन करतेवेळी आणि दोन, एखाद्या दुर्घटनेत मदतकार्य करताना. दोन्ही प्रसंगी संघ गणवेशात असतो हे लक्षात ठेवावे. म्हणजे गणवेश नसलेला स्वयंसेवक काय करतो हे कधी लक्षात घ्यायचे नाही असे यांचे सांगणे असते. शाखेवर शिस्त असते, एकी असते. बळ असते. तेवढेच पाहून व अनुभवून टीकाकारांनी मत पालटावे असे कसे होईल? टीकेचा विषय आणि शाखेतील भारलेले वातावरण यांचा मेळ कसा काय घालता येतो? जातीविषयक टीका केल्यावर दाखवायचे की बघा, शाखेवर कोण कोणत्या जातीचा याचा पत्ताच नसतो. विषमतेची टीका केल्यावर सांगायचे की बघा, हा स्वयंसेवक लक्षाधीश आहे तर हा दरिद्री आहे. येथे उपाशी कोणी नसतो, प्रत्येकाच्या जेवणाची काळजी घेतली जाते इत्यादी. आता शाखेवर स्त्री का नसते? तिरंग्याचे अस्तित्व का नाही? शस्त्रपूजन कशासाठी करायचे? गुरुदक्षिणा म्हणून दिला जाणारा पैसा काळा की पांढरा हे पाहिले जाते का? अहिंसा व सत्यवचन यांची शिकवण का नाही दिली जात? असे प्रश्न उपस्थित करायचे नाहीत. स्वयंसेवकाने नीतिवान असले पाहिजे याबाबतीत शाखेवर बौद्धिक दिले जाते का? याउलट परिस्थितीनुसार वागावे, तत्त्वे बदलावीत, खऱ्याखोट्याच्या भानगडीत पडू नये, राष्ट्रहितासाठी काहीही करावे असे संदेश देणाऱ्या कथा शाखेवर सांगितल्या जातात. म्हणजे सांगणाऱ्या व्यक्तीचे ज्येष्ठत्व, पद आणि कथनाचे कसब एवढ्यावर भरवसा ठेवा याचेच प्रात्यक्षिक शाखेवर असते. हे पुस्तक वाचा, तो संदर्भ पाहा, स्वतः प्रयोग करा, तज्ज्ञांचा सल्ला घ्या असे काहीही शाखेत कधी सांगितले जात नाही. तरीही शाखेत या, स्वतः पाहा आणि मग संघाविषयी मत ठरवा असे बिनदिक्कत म्हटले जाते. अभ्यासाचे संघाला फार वावडे आहे. संशोधनाची संघाला प्रचंड नावड आहे. विशेषज्ञाचा संघाला फार राग आहे. नवज्ञानाविषयी संघाला फार चीड आहे. तर्क लढवण्यास संघ उत्तेजन देत नाही. युक्तिवादाला संघ त्याज्य ठरवतो. प्रयोगामधून काढलेला तटस्थ निष्कर्ष संघाला साफ नामंजूर आहे. संघ प्रश्न विचारायला कधीही उत्तेजन देत नाही. शंकेखोरांना संघ सदैव धुडकावत आलेला आहे. जिज्ञासेला संघाच्या शाखेवर प्रवेश नाही. विचारस्वातंत्र्याला शाखेवर येऊच दिले जात नाही.
याचा अर्थ कसा लावायचा? संघाची माणसे टीकाकारांना, शंकेखोरांना शाखेवर यायला का सांगतात? याचे मूळ भारतामध्ये बाहेरून जे लोक, टोळ्या, राजे आले त्यांच्या आक्रमणात आहे. संघ आपल्याला खरे हिंदुराष्ट्र समजतो, म्हणून संघावर टीका करणारा तो बाहेरचा आणि आक्रमक! एकदा का संघावर टीका करणारा बाहेरच्यांपैकी ठरवून टाकला की खरा हिंदुस्थान कसा आहे हे यांना ठाऊकच नाही असा कांगावा करणे सोपे जाते. ते टीकाखोर म्हणजे एका अर्थाने हल्लेखोर व परके! त्यांना हिंदू कसा समजणार? म्हणून त्यांना खरा हिंदू समजावून घ्यायचा असेल तर शाखेत यावे लागेल.
टीकाकारांचे, शंकेखोरांचे मुद्दे कितीही योग्य असोत, संघ त्यांची नेहमी थट्टा करतो किंवा त्यांचा उपहास करत राहतो. तुमच्यासारख्या लोकांच्या टीका आम्हावर काहीही परिणाम करू शकत नाहीत हे दाखवण्याचाही एक खटाटोप संघाचा असतो. म्हणजे नवे विचार, नवज्ञान, अथवा परिवर्तने आमच्या शाखेवर निष्प्रभ ठरतात हेही दाखवायचा संघाचा इरादा असतो. आमचा इतिहास, आमचे पूर्वज, आमच्या परंपरा व व्यवस्था इतक्या योग्य आहेत की त्यांत बदल वा सुधारणांची अजिबात गरज नाही हेच संघ सुचवत असतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चार भिंतीत बसून संघ काय करतो याचा अनुभव कधीही बाहेरच्यांना येत नाही. उघड्यावर, आकाशाखाली जेवढे दाखवता येईल तेवढेच संघ खुले ठेवतो. म्हणजे संघ आरपार पारदर्शक असतो. प्रामाणिक असतो का? मोकळेपणाचा आव आणून संघ आपली कावेबाज आणि कुटिलवृत्ती दडवून ठेवतो. यावर संघ म्हणेल की खुल्या अधिवेशनात सर्वच राजकीय पक्ष आगंतुकांना, अनाहूतांना बसायची परवानगी देतात. कार्यकारिणीचे ठराव जगाला सांगितले जातात. संघाचे सारे कामकाज गोपनीय असते. संघ भारतीय नागरिकांना जबाबदार नसतो. संघ ब्राह्मणी श्रेष्ठत्वाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. तो इतरांचे जीवन संचालित करणार, त्यांचे नियमन करणार. स्वतः मात्र कोणाचेही बंधन पाळणार नाही. अगदी राज्यघटनेचेसुद्धा बचावात्मक पवित्रा म्हणून संघ आपल्या शाखेवर टीकाकारांना बोलावतो. तुम्ही म्हणता तसे आक्षेपार्ह येथे काही नाही असे दाखवून आपल्यावरील हल्ले चुकवायचाही संघाचा डाव असतो. चाणक्यनीतीचे पालन करताना शत्रूंना चकवा देणे, त्यांचे लक्ष दुसरीकडे गुंतवणे, त्यांना नरमाईने पेश होणे असे डावपेच संघ करीत असतो. एकदा का शत्रूचे शंकासमाधान झाले की आपण आपल्या मूलकार्याला लागायचे हे त्याचे पक्के गणित असते. म्हणून संघात या व खात्री करून घ्या अशी आमंत्रणे देत असतो.

( परिवर्तनाचा वाटसरू च्या सौजन्याने.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.