ठाम आणि निश्चित भूमिका असणारे लेखन

इंग्रजी राजवटीच्या आगमनानंतर भारतीय समाजजीवन क्रमाक्रमाने बदलू लागले. पऱ्यायाने एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून महाराष्ट्रातही बदल सुरू झाले. यातील महत्वाचा बदल म्हणजे भारतीय माणूस मध्ययुगीन सरंजामी मानसिकतेकडून आधुनिकतेकडे येऊ लागला. त्याचे कारणही यंत्रयुगाचे आगमन आणि अर्थव्यवस्थेने घेतलेले भांडवलदारी वळण हे होते. परिणामी आतापर्यंत मूक असणारे समाजघटक जाती घटक मुखर होऊ लागले. ते व्यवस्थेला प्रश्न विचारू लागले. संतांनी जातीमुळे होणाऱ्या कुचंबनेचा निर्देश केला होता. परमेश्वराच्या दृष्टीने कोणी श्रेष्ठ नाही की कोणी कनिष्ठ नाही हे ठासून सांगितले होते. परंतु वास्तव जीवनामध्ये मात्र श्रेष्ठ कनिष्ठ भाव होताच. भगवतभक्त अस्पृश्यांना मंदिरामध्येप्रवेश नव्हताच, ही वस्तुस्थिती होती. साने गुरूजींच्या उपोषणापर्यंत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. याचा अर्थ संतांच्या कार्याचे काहीच महत्व नाही, असे मात्र नाही.
इंग्रजी राजवटीबरोबर आधुनिकतेचा प्रारंभ झाला आणि भारतीय माणसाचे मध्ययुगीन मानसिकतेतून हळूहळू सुटका होऊ लागली. ते शिकू लागले. विचार करू लागले. मुख्य म्हणजे प्रश्न विचारू लागले. आतापर्यंत कधीही न विचारले गेलेले प्रश्न ते विचारू लागले. विशेषत: जातीच्या उतरंडीबद्दल प्रश्न विचारू लागले आणि ही उतरंड उद्धवस्त केली पाहिजे असे बोलू लागले. असे मध्ययुगात फारसे झाले नव्हते. म.बसवेश्वर यांचा मात्र अपवाद आहे. त्यांनी जी भूमिका तात्विक पातळीवर घेतली ती त्यांनी प्रत्यक्षातही राबविली. या जातींच्या उतरंडीला संरक्षण देणाऱ्या धर्मसंस्थेला प्रश्न विचारू लागले. प्राचीन काळात अवैदिक परंपरेने हे केले होते. हे प्रथमत: घडत होते.
मध्ययुगामध्ये शूद्रातिशूद्र जाती दारिद्र्यामुळे आणि सरंजामी धर्मव्यवस्थेने इतके पिचून गेले होते, की ते धर्मालाच काय, कोणालाच प्रश्न विचारू शकत नव्हते. आता इंग्रजी सत्तेमध्ये ते प्रश्न विचारले जाऊ लागले. म्हणूनच सनातऩ्यांचा आणि देशवासीयांचा सर्वाधिक राग इंग्रजांवर आणि आधुनिकतेवर आहे. म्हणजे आधुनिकतेचे सर्व फायदे आयुष्यात उपभोगायचे आणि मध्ययुगीन मानसिकतेचा देशीवाद सांगायचा अशी ही देशीवाद्यांची रीत आहे. तर मानव मुक्तीचा विचार मांडणारा प्रत्येक माणून आपला शत्रू आहे, असे सनातनी मानतात. सनातनी आणि देशीवादी परस्परांना पूरकच आहेत, कारण सनातन्यांना तात्विक बळ देशीवादी पुरवतात, सनातनी कृती करतात. म.गांधींच्या खुनापासून या कृतीला प्रारंभ झाला.
एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर महाराष्ट्रात सनातनी वृत्तीला आव्हान देणे सुरू झाले. बंगालमध्ये थोडे पूर्वी राजा राममोहन रॉय यांच्या रूपात हे झाले होते. लोकहितवादींच्या पाठोपाठ म.फुले यांनी जाती व्यवस्थेतील कठोर शोषण फार तीव्र शब्दात व्यक्त केले. आणि महाराष्ट्रात एक विचार मंथन सुरू झाले. किंबहुना असे विचार मंथन प्रथमत:च होत होते. या विचार मंथनातून सारा देश ढवळून निघाला. महाराष्ट्र ढवळून निघाला. या विचार मंथनाचा आविष्कार जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात दिसायला लागला. शूद्रातिशूद्रांचे आणि स्त्रियांचे शिक्षण सुरू झाले. त्यांच्या गुलामीविरूद्ध हुंकार उमटायला लागला. साहित्याचे क्षेत्र बदलायला लागले. साहित्यक्षेत्रातील पहिला सशक्त बदल अविष्कृत झाला तो निबंध या गद्य लेखनप्रकारातून. किंबहुना 19व्या शतकातील गद्य लेखन-निबंध लेखन हे मराठी साहित्याचे मोठेच वैभव आहे. या निबंध लेखनाचा परिणाम पुढे क्रमाने साहित्याच्या इतर प्रकारांवर होऊ लागला. किंवा असेही म्हणता येईल की परिवर्तनाचा पहिला वहिला आविष्कार निबंधातून झाला आणि नंतरच इतर साहित्य प्रकार बदलू लागले.
एकंदरीत काय की मराठी गद्याची एक समर्थ परंपरा सुरू झाली. अत्यंत बुद्धिमान आणि मूलगामी विचार करणारी मंडळी लेखनाच्या क्षेत्रात आली. अर्थशास्त्र, समाजशास्त्रांपासून धर्मशास्त्रांतील विसंगतीपर्यंत आपापली मते व्यक्त करू लागली. कडी निकडीचे वाद झडू लागले. मत मतांतरे व्यक्त होऊ लागली. त्यातून महाराष्ट्राची वाटचाल मानवतेच्या दिशेने होऊ लागली. ही प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. ही प्रक्रिया जेव्हा पूर्ण होईल त्या दिवशी महाराष्ट्र आणि आपला देशही सामंती मध्ययुगीन मानसिकतेतून मुक्त होईल. हे घडू नये म्हणून सनातनी आणि देशीवादी देशाचे तोंड पुन्हा एकदा विषमतेच्या दिशेने वळवू पाहात आहेत. असे सगळे घडत असताना त्यांना प्रतिवाद फारसा केला जात नाही. परिणामत: मराठी निबंध क्रमाने निस्तेज होत गेला. मराठी वैचारिक साहित्याची धार बोथट होत गेली. भारतीय स्वातंत्र्यांनंतर तर ते वेगाने घडत गेले. म्हणजे लोकहितवादी-म.फुले यांच्यापासून सुरू झालेले धारदार निबंध लेखन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत येऊन थांबले. यानंतर काही लेखक आहेत, नाही असे नाही. विनोबा भावे, पु.ग.सहस्त्रबुद्धे, श्री.म.माटे, जावडेकर, शरद पाटील, रा.ना.चव्हाण असे काही विचारवंत आणि कृतीशील लेखक आहेत. आणखी काही लेखकांचा निर्देश करता येईल. पण ही यादी फारशी वाढणार नाही. म्हणूनच 1960 नंतर महाराष्ट्राच्या विचारविश्वाला ग्रहण लागले अशी चर्चा सुरू झाली. वाद विवाद थांबले. आज तर महाराष्ट्राच्या विचारविश्वात केवळ बोटावर मोजता येतील एवढेच लोक उरले आहेत. जे निर्भिडपणे आणि ठामपणे जीवनमूल्यांच्या बाजूने बोलणारे आहेत.
स्वातंत्र्यानंतर खरे म्हणजे शिक्षणाचे प्रमाण वाढले. इतर भौतिक सुधारणाही होऊ लागल्या. एका नव्या देशाची घडण व्हावी या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. हे सगळे होताना मात्र विचार विश्वाला वाळवी लागली. खरा प्रश्न असा की, असे का झाले असावे? या प्रश्नाचे नेमके आणि एकच एक उत्तर देणे कठीण आहे. तरीही काही घटनांचा निर्देश करता येईल. स्वातंत्र्य मिळाले आणि म.गांधी यांचा खून झाला. त्यातून देश थोडा सावरतो न सावरतो तोच आणीबाणीसारखी घटना घडली. आणीबाणीमध्ये कार्यकर्ते आणि स्वतंत्र विचार करणाऱ्यांना कैदेत टाकण्यात आले. दमनसत्र सुरू झाले. याचा फायदा घेऊन म.गांधींना मारणाऱ्या शक्ती अधिक उजळ माथ्याने वावरू लागल्या. जनसामर्थ्य धार्मिक भावनेला फुंकर घालून स्थान मिळवू लागल्या. बाबरी मशिदीच्या उद्ध्वस्तीकरणानंतर उसळलेल्या प्रचंड दंगली देशाच्या उरात धडकी भरवून गेल्या. हा प्रवास चालूच आहे, याची खूण म्हणजे दाभोलकर, पानसरे यांचा खून. दरम्यानच्या काळात समदूर हाशमी, शंकर नियोगी, कृष्णा देसाई यासारखे असंख्य कार्यकर्ते संपविण्यात आले. ही यादी आणखीही वाढेल.
असा सगळा भोवतीच्या सामाजिक, राजकीय दहशतवाद असताना या परिस्थितीला येथील बेछूट भांडवलदारी आणि चंगळवादी व्यवस्थेने हातभारच लावला. या व्यवस्थेचा परिणाम असा झाला की, मूठभर लोक संपत्तीधारक झाले, वाटेल तशी चंगळ करू लागले आणि सत्तेपासून शिक्षण, प्रसिद्धी माध्यमांपर्यंत सारेच आपल्या ताब्यातच आले पाहिजे यासाठी धोरणे आखू लागले. मोर्चे बांधणी करू लागले. परिणामत: भारतातील सत्तर टक्के लोकांचे रोजचे उत्पन्न केवळ रू.वीस एवढेच झाले. त्यांना जगण्यासाठी असंख्य कसरती कराव्या लागतात. ग्रामीण भाग तर उद्ध्वस्तच झाला आहे. म्हणजे स्वातंत्र्य प्राप्त झाले तेव्हा सामाजिक आणि आर्थिक विषमता होतीच. ती क्रमाने वाढत गेली. विशेषत: 1990 नंतर तर ती कमालीच वाढली. दलित, शोषितांवरील हल्ले वाढले. त्याची बाजू घेऊन बोलणारे कोणी फारसे उरले नाहीत. कारण साधारणत: ज्यांना आपण मध्यमवर्गीय म्हणतो, ते तीव्र स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आपले करिअर आणि अंतिमत: अमेरिकेत स्थायिक होणे अशी त्यांची स्वप्ने उरली. त्यांचे समाजाशी काही देणेघेणे उरले नाही. समाजाबद्दल विचार का करायचा असे त्यांना वाटू लागले. शिवाय भोवतीचा सारा माहोल चंगळ करण्यात रमलेला. प्रसिद्धी माध्यमे-कुणाची तरी म्हणजे भांडवलदारांची अगर सत्ताधाऱ्यांच्या मालकीची झालेली. यातून समाजामध्ये एकीकडे तीव्र नैराश्य तर दुसरीकडे स्वयंकेंद्रितता तसेच तुच्छताही विकसित झाली. विचार करणे, विशेषत: समाजाबद्दल विचार करणे वेडेपणाचे लक्षण वाटू लागले. अशा सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये विचार करणारे आणि समाजासाठी विचार करणारे फार थोडे लोक उरले. शरद पाटलांसारखे काही लोक कालवश झाले.
तेव्हा एक प्रश्न उपस्थित होतो की, समाजासाठी व्यापक विचार करणाऱ्या व्यक्तींना कुठलेच संरक्षण उरले नाही. तसेच सहानुभूतीदारही फारसे उरले नाहीत. ते जगण्याच्या स्पर्धेत उतरले. अशा परिस्थितीत व्यापक समाज हिताचा विचार करणारे लेखन कसे विकसित होईल? अर्थात समाजासाठी व्यापक विचार करणाऱ्यांना तसे कधीच संरक्षण नव्हते. म.फुले आणि आगरकर यांना कुठले संरक्षण होते? पण सहानुभुतीदार मात्र होते. अर्थात या दोघांनाही किती यातना सहन कराव्या लागल्या ते पुन्हा सांगण्याची गरज नाही. आज प्रतिकूल परिस्थिती अधिकच वाढलेली दिसते. अशा परिस्थितीत व्यापक सामाजिक हिताचा विचार करण्यासाठी ठाम भूमिका लागते. जातीपुरता विचार करणाण्यांसाठी याची गरज नसते. उलट देशीवादी म्हणून प्रतिष्ठा मिळते. ते निर्भयपणे मांडण्याची हिंमत लागते. वाट्याला विपरितच येणार आहे, याची तयारी ठेवावी लागते. या सगळ्या गोष्टी तर हव्यातच पण निश्चित अशी भूमिका असणे आवश्यक असते. भूमिका नसणारी माणसे केवळ वर्णनाच्या किंवा वृत्तांकनाच्या पातळीवरच थांबत असतात. भूमिका असणारी माणसे त्यापुढे जातात. तर्काधिष्ठित अशी कारणमीमांसा देऊ शकतात. त्यासाठी अर्थातच बौद्धिक सामर्थ्यही हवे असते. याचा अर्थ असा की, कुठल्या तरी विचारांची किंवा तत्वज्ञानाची बैठक तुमच्या व्यक्तिमत्वाला असणे गरजेचे असते. म्हणजे तुम्ही नेमके कोण आहात ते स्पष्टपणे पुढे आले पाहिजे. आणि येथेच लोक घाबरतात. कारण त्यांना काही लाभांपासून त्यांना वंचित व्हावे लागते. किंवा काही धोके पत्करावे लागतात. म्हणजे समर्थ वैचारिक लेखनासाठी ठाम अशी भूमिका हवी असते. ती जाहीर करण्याची तयारीही पाहिजे असते.
मराठी साहित्यातील बहुसंख्य लेखक आणि साहित्यिक आपल्याला अशा भूमिकेची गरजच नाही, असे घोषित करण्यात धन्यता मानतात. याचा अर्थ असा की, अशी निश्चित दृष्टी असणे, भूमिका असणे म्हणजेच ‘अन्वेषण दृष्टी’ असणे गरजेचे असते. आणि त्या आधारे समोरच्या घटितांचा अर्थ लावण्याची तयारी असणेही आवश्यक असते. किंबहुना त्यामुळेच तुमचे लेखन वृत्तांकनाच्या पुढे जात असते. प्रश्नाच्या गाभ्यापर्यंत जात असते. जशी अन्वेषण दृष्टी महत्वाची त्याप्रमाणेच हेतुची स्पष्टताही महत्वाची असते. म्हणजे आपण कशासाठी लिहित आहोत त्याची स्पष्टता निदान वैचारिक लेखन करणाऱ्या लेखकाकडे तरी असलीच पाहिजे. म्हणजे स्वत:साठी लिहितो आहोत की केवळ आपल्या धर्मापुरते लिहितो आहोत की जातीपुरते इत्यादी. असा मर्यादित हेतू वैचारिक स्वरूपाच्या लेखनाला विकसित होऊ देत नाही. त्यासाठी एकूण मानव जात जर लेखकाच्या दृष्टीसमोर असेल तर ते खऱ्या अर्थाने वैचारिक स्वरूपाचे लेखन असते. म्हणूनच म.फुले असोत की, डॉ.आंबेडकर असोत, त्यांनी कधीही कुठल्या जातीच्या विरोधात लिहिले नाही. त्यांनी व्यवस्थेचे विच्छेदन केले, आणि म्हणूनच ते व्यापक झाले. मूलगामी झाले. एकूण मानव जातीचा विचार करणारे झाले.
याचा अर्थ असा की, ज्याच्याजवळ व्यापक समाजहितैषी दृष्टी, भूमिकेचा ठामपणा, त्यानुसारची अन्वेषण दृष्टी असते, त्यालाच वैचारिक स्वरूपाचे लेखन करता येते. शिवाय प्रतिकूल परिस्थितीतही विचार व्यक्त करण्याची निर्भिडताही त्याच्याकडे असली पाहिजे. अर्थात कुठल्याही काळात असे लोक फार थोडेच असतात. चंगळवादी उन्मत भांडवलदारी व्यवस्थेमध्ये त्यांची संख्या खूपच कमी होते.
अतिशय आक्रमक चंगळवादी अर्थव्यवस्थेमुळे समाजातील संघर्ष तीव्र झाले आहेत. त्यामुळे जाती जातींमधील संघर्ष वाढले आहेत. परिणामी सर्वसामान्य लोकांना आपल्या संरक्षणासाठी पुन्हा जातीची कवचे धारण करणे गरजेचे वाटू लागले आहे. म्हणजे आपल्याला जाती नष्ट केल्या पाहिजेत असे वाटते, परंतु व्यवहारात मात्र जाती अधिक घट्ट होत आहेत. कधी काळी जाती आणि व्यवसाय यांचे एक नाते होते. त्यातून शोषणही होत असे. आज यांत्रिकीकरणामुळे आणि समाजात झालेल्या इतर बदलांमुळे हे नाते शिल्लक राहिलेले नाही. तरीही लोक जातींच्या आश्रयाला जात आहेत. आर्थिक अस्थैर्य हे त्याचे कारण आहे. त्यातून जातींच्या संघटनांचा उदय होत आहे. त्यातून जातींचा अभिमानही निर्माण होतो आहे. या अभिमानापोटी अर्थहीन प्रथा परंपरांचेही रक्षण करावे, असे लोकांना वाटत आहे. मौंजी बंधन, जानवे घालणे इ. प्रथांचे समर्थन त्यातूनच होत आहे. बुद्धिवादी दृष्टिकोन आणि परंपरा असा संघर्ष निर्माण झाला आहे. परंतु पारंपरिक मनोवृत्तीचे लोक बुद्धिवादी दृष्टिकोन न स्वीकारता कसे हास्यास्पद वर्तन करीत आहेत.
शोषित जाती शोषणमुक्तीचा एक मार्ग म्हणून जातीच्या छत्राखाली संघटीत होत आहेत, तर उच्चभ्रू जाती आपले वरचे स्थान टिकविण्यासाठी आणि पुन्हा शोषण करण्यासाठी जातींच्या संघटना काढत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. खरा प्रश्न जाती कशा घालवायच्या हाच आहे. त्या दृष्टीने उत्पादन साधनांवरील मालकी बदलणे हा एक महत्वाचा मार्ग सांगितला आहे. आणकी एक मार्ग डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला आहे. आणि तो म्हणजे आंतरजातीय विवाहांचा. हा मार्ग निश्चितच महत्वाचा असला तरी अंतिम मार्ग मात्र नाही.
आज आपल्या देशात आणखी एक प्रयत्न सुरू आहे. आणि तो म्हणजे हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा. त्यासाठी वेगळी राष्ट्रवादाची संकल्पना तयार करावी लागते आणि तीही प्रक्रिया प्रकट-अप्रकटपणे सुरू आहे. परंपराभिमानी काही म्हणत असले तरी आपला देश स्वातंत्र्यापूर्वी महाराष्ट्र नव्हता ही वस्तुस्थिती आहे. राष्ट्रवादाची जाणीव आपल्या लोकांना एकोणिसाव्या शतकात होऊ लागली. त्यासाठी आधार शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यात प्रामुख्याने दोन प्रकारच्या विचारधारा पुढे आल्या. त्यापैकी एक म्हणजे धर्माधिष्ठित राष्ट्रवादी विचारधारा आणि दुसरी म्हणजे ‘एकमय लोक’ होणे. म.जोतिबा फुले त्यांनी ‘एकमय लोक’ ही अवस्था निर्माण झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने राष्ट्र निर्माण होणार नाही असे म्हटले होते. भारतीय राज्यघटनेनेही स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्ङ्माय या बाबी केंद्रस्थानी ठेवल्या आहेत. म्हणजे एका अर्थाने ‘एकमय लोक’ व्हावेत अशीच त्यामागे धारणा आहे. परंतु शतकानुशतके धर्माधारे जे शोषण करीत होते, त्यांचा या राष्ट्रवादाला विरोध हवा आहे.
ज्यांना सामाजिक स्थिती गतीचा आणि संघर्षांचा अन्वयार्थ लावायचा असतो, चिंतन करावयाचे असते आणि त्यातून काही मार्ग निघावा असे वाटत असते, त्यांना दोन बाबी कराव्या लागतात. त्यापैकी एक म्हणजे पूर्वपरंपरेतील आपले पूर्वसुरी शोधणे आणि दुसरे म्हणजे परंपरांमधील उदार प्रतिकांचा शोध घेणे. त्यादृष्टीने पंढरपूरचा विठ्ठल हा सर्व जातीजमातींचा देव आहे. वारीच्या निमित्ताने जातीवर मात करण्याची प्रक्रिया घडू शकते, घडते हे त्यांचे म्हणणे मान्य करावेच लागते. शिवाय वारकरी संप्रदायाचे उदारमतवादी तत्वज्ञान प्रकट करणारे विपुल साहित्य आहेच.
परंपरेमध्ये परिवर्तनासाठी उपयुक्त ठरणारी जशी प्रतिके सापडतात, त्याप्रमाणेच पूर्वसुरींपैकी काही महनियांना परिवर्तनवादी आवश्यक असणारी कृती केलेली असते. तसेच काही चिंतनही केलेले असते. म्हणजे त्यांनी काही पाऊलवाटही आखलेली असते. या दृष्टीने म.फुले, रा.शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी केलेले कार्य आणि चिंतन अतिशय मूलगामी आहे. किंबहुना परिवर्तनाच्या चळवळींची बैठकच तयार झालेली आहे,
समता प्रस्थापन आणि त्यासाठीचा संघर्ष केंद्रवर्ती सूत्र आहे. जात, धर्म, धर्माधिष्ठीत राष्ट्रवाद, जातीयवादी संघटना इ.साऱ्याच गोष्टी समता निर्माण होऊ देत नाहीत. बंधुतेच्या त्या अडसर होत. म्हणूनच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त झाले असे होत नाही. अंधश्रद्धाही समता निर्मितीच्या आड होणारीच गोष्ट आहे. कारण पुष्कळदा अंधश्रद्धांच्या आडून शोषण केले जाते. शिवाय माणसाला अंधश्रद्धा दुबळ्या बनवतात. बुद्धीचा वापर करू देत नाहीत. तसेच अंधश्रद्धांचा संबंध धर्माशी जोडून त्यांना संरक्षण मिळविले जाते आणि प्रश्न अधिकच गुंतागुंतीचे बनत जातात. या सगळ्यांमधून मार्ग काढण्यासाठी अंधश्रद्धा दूर करणे एवढाच उपाय शिल्लक राहतो. त्यासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी आयुष्य वाहिले. शेवटी सनातन्यांनी त्यांना संपविलेच.

साभारः सुभाष थोरात यांच्या ‘वर्तमानाची बखर’
या आगामी पुस्तकासाठीच्या प्रस्तावनेचा संपादित भाग