संघ बदलला की दलित विचारवंत?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांना राज्यातील काही दलित साहित्यिकांनी उपस्थिती लावली. अशा कार्यक्रमांमुळे, भाजप-संघ परिवाराची हिंदू राष्ट्रनिर्मितीची संकल्पना स्पष्ट असताना, तेथे जाऊन दलित विचारवंत कुणाचे नि कसले प्रबोधन करतात? दलित लेखक, विचारवंत, वा कवी सांगत असलेला आंबेडकरवाद संघ परिवार स्वीकारतो काय? असे प्रश्न उपस्थित होतात.
केंद्रात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारे सत्तारूढ झाल्यानंतर संघ आणि संघ परिवाराशी संलग्न असणाऱ्या संघटनांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेमाचा पान्हा फुटलेला पाहावयास मिळतो आहे. उदाहरणार्थ संघ परिवाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची साजरी केलेली जयंती, संघाचे मुखपत्र असलेल्या ‘पांचजन्य’ व ‘ऑर्गनायझर’ने आंबेडकर जयंतीनिमित्त प्रसिद्ध केलेले विशेषांक, ‘ऑर्गनायझर’ व ‘पांचजन्य’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमास; तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या व्याख्यानमालेस दलित समाजातील एक विचारवंत डॉ. नरेंद्र जाधव यांनी लावलेली हजेरी.
केंद्राच्या साहित्य अकादमीला पुढे करून निवडक दलित साहित्यिकांचे दिल्लीत सांस्कृतिक विभागाने घडवून आणलेले चर्चासत्र, राज्य सरकारच्या वतीने गेट वे ऑफ इंडिया येथे साजरी करण्यात आलेली आंबेडकर जयंती वगैरे बाबासाहेबांची जयंती संघ परिवाराने साजरी केली असेल, तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. कारण बाबासाहेब ही काही कुणाची खासगी मालमत्ता नव्हे. काँग्रेसने आजवर दलितांची मते मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा राजकीय वापर केला. भाजप आता काँग्रेसचाच कित्ता गिरवत असेल, तर नवल नव्हे. मात्र, काँग्रेसपेक्षा संघ परिवाराची खरी अडचण अशी की, त्यांच्याकडे कोणता राष्ट्रीय नायकच नसल्यामुळे त्यांना नाइलाजाने गांधी, डॉ. आंबेडकरांचे नाव घ्यावे लागत आहे. आता मुद्दा असा की, संघ परिवाराने राजकीय सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तनाच्या संदर्भात गांधी, डॉ. आंबेडकरांचे विचार कितपत स्वीकारले आहेत? राष्ट्रीय नेत्यांच्या विचारांशी प्रामाणिक मतभेद असणे समजू शकते, पण जिथे परिवर्तनाच्या संदर्भात टोकाचे परस्परविरोधी सैद्धांतिक मतभेद असतात, तिथे भाजप संघ परिवाराने आंबेडकर वा गांधीजींचे नाव घेणे म्हणजे दलित बहुजन समाजाची दिशाभूल करणेच नव्हे काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 1980मध्ये आम्ही गांधीवाद स्वीकारला, असे म्हटले होते. पुढे एका वर्षानंतर आम्ही गांधीवाद स्वीकारला नाही, असे संघानेच घोषित केले. आता संघ आयोजित कार्यक्रमातून सांगण्यात येते, की आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्वीकार केला आहे. प्रश्न असा की, संघाने आंबेडकरवाद स्वीकारला म्हणजे नेमके काय केले? संघास बाबासाहेबांचा जातिअंताचा लढा मान्य आहे काय? या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित होतात ते असे.
बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेच्या इतिहासाची नव्याने मांडणी करताना म्हटले, ‘भारतात समता स्वातंत्र्य, बंधूभावाचा विचार देणाऱ्या बौद्ध धर्माचा उदय ही एक क्रांती होती व बौद्घ धर्माचा पाडाव ही प्रतिक्रांती होती. बौद्ध धर्माला पराभूत करण्यासाठीच रामायण, महाभारत, भगवद्गीता, मनुस्मृती व पुराणे रचली गेली. या प्रतिक्रांतीने वर्ण आणि जातीव्यवस्था जन्मास घतली.’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘जातीव्यवस्था नष्ट करावयाची, तर जाती व्यवस्थेचा आधार असलेल्या धर्मग्रंथाचे पावित्र्य नाहीसे करावे लागेल.’ आता भाजपच्या राज्यात रामायण, महाभारत, गीतेचाच अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, अशी भाषा जेथे हिंदुत्ववादी परिवाराकडून उच्चारली जाते. तेथे संघ परिवाराने बाबाबसाहेबांचा स्वीकार केला, अशी लोणकढी थाप मारणे म्हणजे शुद्ध लबाडीचे नव्हे काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातिअंताच्या बाबत म्हटले, ‘जो हिंदू धर्म माणसाच्या माणुसकीला किंमत देत नाहीत, अस्पृश्यता शिक्षण घेऊ देत नाही, देवळात जाऊ देत नाही, पाणी पिऊ देत नाही, असा हिंदू धर्म नाकारून समता, स्वातंत्र्य बंधुभावाचा पुरस्कार करणारा बौद्ध धर्म स्वीकारल्याशिवाय भारतीय समाजाची जातीव्यवस्थेतून मुक्तता होणार नाही.’ बाबासाहेब आंबेडकरांची ही हिंदू धर्म मिमांसा संघ परिवारास मान्य आहे काय?
संघ परिवाराच्या विश्व हिंदू परिषदेकडून असे सांगण्यात येते की, हिंदू समाजात कोणतीही अस्पृश्यता नाही. आता प्रश्न असा की अस्पृश्यता ही जर हिंदू धर्म संमत नसेल, तर मग एखाद्या हिंदू दलिताची नेमणूक शंकराचार्यांच्या पदावर का केली गेली नाही? बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, ‘शंकराचार्यांच्या गादीवर एखादा संस्कृत भाषेत तज्ज्ञ असलेला दलित बसविण्याची हिंदू धर्मियांची तयारी असेल, तर मी धर्मांतराचा विचार सोडून देईन.’ धर्मांतर टाळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार संघ परिवार अजूनही कृतीत का आणत नाही?
अस्पृश्यांना सक्षम करण्याची भाषा जेव्हा हिंदूत्वववादी परिवाराकडून होते तेव्हा प्रश्न असा की, आजही जेथे खेडोपाडी दलित समाजावर क्रूर, अमानवी अत्याचार होतात, त्यावेळी संघ परिवार स्वकीयांविरुद्ध का लढत नाही? अमेरिकेत कृष्णवर्णियांना मानवी हक्क मिळावेत, म्हणून गौर वर्णीयही लढले. काळ्यांच्या बाजूने गोऱ्यांनी उभा केलेला लढा हा केवळ शब्दिक बुडबुडा नव्हता, तर काळ्यांच्या मानवी हक्कांसाठी गोऱ्यांनी गोऱ्यांविरुद्ध यादवी युद्ध पुकारले होते. दलितांवरील अत्याचाराबाबत अशी कुठलीही विद्रोही मानवतावादी भूमिका न घेणाऱ्या संघ परिवाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणे म्हणजे दलितांच्या डोळ्यात धूळफेक करणेच नव्हे काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे धर्मनिरपेक्षतेचे पुरस्कर्ते होते; पण भाजपच्या राज्यात आज धर्मांध उन्मादी वातावरण निर्माण करण्याचे उपद्व्याप हिंदुत्ववादी परिवाराकडून केले जात आहेत. हिंदू धर्म संकटात असल्यामुळे हिंदूंनी भरमसाठ मुले जन्माला घालावीत. भारत हे हिंदू राष्ट्र आहे. मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, मुसलमानांचा लव्ह जिहाद थोपवावा, मोदींना विरोध असणाऱ्यांनी पाकिस्तानात जावे, अल्पसंख्याकांनी दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून राहावे, साईबाबा हे मुस्लिम असल्यामुळे त्यांची पूजा करू नये, नथुराम गोडसे हा देशभक्त होता, अभ्यासक्रमात हिंदू धर्मग्रंथांचा समावेश करावा, शाळेत सरस्वतीपूजन व्हावे, सूर्यनमस्कार सक्तीचे करावेत, अशी बेछूट धर्मांध भाषा वापरतानाच दुसरीकडे घरवापसीसारखे समाजात दुही पेरणारे कार्यक्रम घेण्यात येऊ लागले आहेत. चर्चवर हल्ले होत आहेत. हिंदुत्ववाद्यांचे हे प्रकार आंबेडकरवादात बसतात, असे संघ परिवारास वाटते काय?
आता थोडेसे दलित साहित्यिक-विचारवंतांविषयी. संघ परिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमास डॉ. नरेंद्र जाधव उपस्थित राहतात. इतकेच नव्हे तर संघात आणि दलित समाजात सेतू म्हणून भूमिका बजावण्याची आपली तयारी आहे, असेही सांगतात. दुसरीकडे केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या दलित साहित्यिकांच्या चर्चासत्रास महाराष्ट्रातून काही दलित साहित्यिक उपस्थित राहतात, याचा अर्थ काय?
भारतीय राज्यघटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे काही दलित विचारवंत, लेखक जर केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या चर्चासत्रास वा संघ पुरस्कृत संघटनांच्या कार्यक्रमांना हजर राहिले, तर त्यांचे ते स्वातंत्र्य मान्य केले पाहिजे. मात्र, भाजप-संघ परिवाराची हिंदू राष्ट्रनिर्मितीची संकल्पना स्पष्ट असताना, तेथे जाऊन दलित विचारवंत कुणाचे नि कसले प्रबोधन करतात? दलित लेखक, विचारवंत, वा कवी सांगत असलेला आंबेडकरवाद संघ परिवार स्वीकारतो काय? नाही. मग काही दलित लेखक-विचारवंतांचे संघ पुरस्कृत कार्यक्रमास जाण्याचे प्रयोजन ते काय? त्यांचे जाणे निर्हेतूक असते की, सहेतूक असते? पण संघप्रेमी दलित विचारवंत, लेखकांनाच तरी दोष का द्यावा? सर्वांना आज सत्तेची आणि पदांची घाई झाली आहे. दलित नेते म्हणूनच आजवर काँग्रेसच्या नादी होते, आता ते भाजप-सेनेकडे आहेत. काही दलित विचारवंत-लेखकांचेही असेच होत आहे. आंबेडकरी चळवळीची ही पिछेहाटच आहे, दुसरे काय?

महाराष्ट्र टाइम्सच्या सौजन्याने

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.