देवाचे मन जाणताना

विश्वनिर्मिती, ईश्वर संकल्पना, विवेकवाद

विज्ञानाच्या मदतीने मानवाने अतिशय थोड्या कालावधीत विश्वनिर्मितीचा कूटप्रश्न सोडविण्याच्या दिशेने दमदार वाटचाल केली आहे.जागतिक तापमानवाढ व वाढती शस्त्रास्त्रस्पर्धा यांतून मानवजात अजून 500 वर्षे तग धरून राहिली तर ह्या प्रश्नाच्या उत्तराच्या खूप जवळ आपण पोहचू शकू. पण हे कोडे त्याला पूर्णपणे उलगडले तरी ईश्वर ह्या संकल्पनेला फारसा धक्का बसणार नाही. ती संकल्पना व विवेकवाद ह्यांत अंतर्विरोध निर्माण होऊ न देणे हे विवेकवादी व्यक्तींसमोरील महत्त्वाचे आह्वान आहे.

“जर आपल्याला सृष्टीचा स्वयंपूर्ण सिद्धान्त शोधता आला तर, कालांतराने तो फक्त काही निवडक शास्त्रज्ञच नव्हे तर तत्त्वज्ञ आणि सर्वसामान्य माणसांनाही विश्वाच्या व मनुष्यप्राण्याच्या उत्पत्तीबद्दल मार्गदर्शक ठरेल. आणि हे आपल्याला जमलेच तर हा मनुष्याच्या विवेकबुद्धीचा परमोच्च बिंदू ठरेल — एकार्थाने जणू देवाचे मनच आपल्याला जाणता येईल.”
— स्टिफन हॉकिंग, ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम पुस्तकामधून

जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांच्या अत्यंत गाजलेल्या ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम पुस्तकातील वर नमूद केलेली शेवटची ओळ ही दोन-अडीच हजार वर्षांच्या, आपले विश्व समजून घेण्याच्या प्रवासाचे सार आहे.
ह्या प्रवासाचा आरंभ केला होता प्राचीन कवी आणि तत्त्वज्ञ यांनी. त्यांच्या तरल कल्पनाविश्वातून विलक्षण अश्या सृष्टिनिर्माणकथा रचल्या गेल्या आणि त्या विविध धर्मांच्या पुराणांमध्ये लिहिल्या गेल्या. त्या काळातील तत्त्वज्ञांनी प्रयोग किंवा गणिती भाषा ह्यांचा उपयोग करायच्या ऐवजी त्यांच्या अंतर्मनाला जे पटेल तसे विश्व समजण्याचा प्रयत्न केला. ‘विश्व कसे आहे’ ह्याऐवजी ‘विश्व कसे असायला हवे’ ह्यावर काहीसा त्यांचा भर होता. साहजिकच अरिस्टॉटल, प्लेटो आणि टोलेमी या ग्रीक तत्त्वज्ञांच्या कल्पनाविश्वात पृथ्वी हा विश्वाचा मध्यबिंदू असून सूर्य, चंद्र आणि अन्य तारे ही पृथ्वीभोवती फिरायचे.
बदलत्या काळानुसार आपल्या विश्वाबद्दलच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावत गेल्या आणि तत्वज्ञानाची जागा गणिती सिद्धान्त आणि प्रयोगातून काढलेल्या निष्कर्षांनी घेतली.
अंदाजे 500 वर्षांआधीपर्यंत अनेक लोकांना पृथ्वी ही विश्वाचा केंद्रबिंदू आहे तसेच माणूस हा देवाने घडविला आहे असे वाटायचे. पुढील काळात माणूस हा वानरापासून उत्क्रांत झाला आहे तसेच पृथ्वी ही विश्वाचा केंद्रबिंदू नसून सूर्याभोवती फिरणारा एक ग्रह आहे हे आपल्याला समजले. आपला सूर्य हा एक सामान्य आकाराचा तारा असून आपल्या आकाशगंगेत असे 10,000 ते 40,000 कोटी तारे आहेत; आपली आकाशगंगा ही एक सामान्य आकाशगंगा (galaxy) असून अश्या हजारो कोटी आकाशगंगा आपल्या विश्वात आहेत आणि हे सगळे दृश्य विश्वाचे घटक मिळून विश्वाच्या एकूण द्रव्याच्या केवळ 5% भाग आहे. विश्वाचा अंदाजे 25% भाग हा अदीप्त द्रव्याचा (dark matter), तसेच 70% भाग हा अदीप्त ऊर्जेचा आहे. (dark energy) हेही आपल्याला समजले.
ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम या पुस्तकाच्या अखेरच्या आशयात स्टिफन हॉकिंग यांनी अशी खंत व्यक्त केली होती की अलीकडच्या काळात तत्त्वज्ञानाच्या कक्षा फारच संकुचित झाल्या आहेत आणि विज्ञान फारच गणिती आणि क्लिष्ट झाले असल्यामुळे विज्ञानाचे प्रश्न तत्त्वज्ञांच्या आकलनापलीकडे गेले आहेत. दि ग्रांड डिजाइन (The Grand Design) ह्या ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम पुस्तकाच्या अंदाजे दोन दशकानंतर लिहिलेल्या पुस्तकात स्टिफन हॉकिंग यांनी असे परखड मत मांडले की तत्त्वज्ञान हे (भौतिकशास्त्रीय) ज्ञानाची कक्षा म्हणून मृत झाले आहे आणि भौतिकशास्त्रीय ज्ञानाचे भविष्य हे पूर्णपणे गणितावर अवलंबून आहे. तत्त्वज्ञान हे आधुनिक विज्ञानाच्या अभ्यासात तोकडे पडायचे आणखी एक महत्त्वाचे कारण असे की आधुनिक विज्ञान हे अन्तःप्रेरणेच्या अगदी विरुद्ध आहे. पुंजायामिकी (quantum mechanics) किंवा रज्जुसिद्धान्त (string theory) ह्या विषयांना समजून घ्यायचे असेल तर फक्त गणिताद्वारेच समजून घेता येते. आपले दैनंदिन आयुष्यातील अनुभव हे विषय शिकताना काहीही उपयोगाचे नसतात.
अलीकडच्या काळात शास्त्रज्ञ हे बहुविश्व ह्या संकल्पनेवर काम करीत आहेत. काही महिन्यांपूर्वी मी या विषयावर वाचलेल्या ब्रायन ग्रीन ह्या शास्त्रज्ञाच्या पुस्तकात अंदाजे 9 प्रकारच्या विविध बहुविश्वसमूहांची संकल्पना मांडली होती. तीमध्ये असे म्हटले होते की आपले विश्व हे एकमेव नसून वास्तव त्यापेक्षाही प्रचंड आणि विलक्षण असण्याची शक्यता आहे. बहुविश्वसंकल्पना खरी ठरली तर त्यानुसार आपले विश्व जणू एका विशाल महासागरातील छोटासा बुडबुडा असेल.
एकुणात वास्तव हे आपल्या अलौकिक कल्पनेच्या पलीकडचे आहे तर.

ह्या वास्तवात देवाचे स्थान काय?
आपल्या ऐहिक अनुभवानुसार प्रत्येक गोष्टीला प्रारंभ आणि अंत असतो तसाच सृष्टीलाही असावा असे आपल्याला वाटते. आपण देवाला सृष्टीचा निर्माता समजतो. वेगवेगळ्या धर्मांतील पुराणांमध्ये सृष्टिनिर्मितीच्या कथा दिल्या आहेत. काही तत्त्वज्ञ मात्र ह्या निर्माण कथांशी सहमत नव्हते. जर देवाने सृष्टीला निर्माण केले असेल तर देव कसे अस्तित्वात आले? असा त्यांचा प्रश्न होता. ऋग्वेदातील नासदीय सूक्तात हे प्रश्न अत्यंत सुंदरपणे मांडले आहेत. त्यातील अखेरच्या २ कडव्यांचा स्वैर अनुवाद खालीलप्रमाणे –
हे कोडे कोणाला उलगडले आहे?
कोण खात्रीपूर्वक सांगू शकेल?
कधी याचा प्रारंभ झाला?
कधी ही निर्मिती झाली?
जर देवही सृष्टिनिर्मितीनंतर आले,
तर हे सारे कसे घडले हे कोणाला सांगता येईल?
ही निर्मिती कदाचित स्वयंसिद्ध असेल, तर कदाचित नसेलही.
कोण सांगू शकेल?
सर्वोच्च गगनातून सृष्टीकडे पाहणारा तो,
त्यालाच कदाचित हे कोडे उलगडले असेल,
किंवा कदाचित तोपण इथे निरुत्तर झाला असेल.
पुराणांतील इतर सर्व काव्ये निर्मितीच्या कपोलकल्पित संकल्पनांनी भरलेली असताना असे विवेकनिष्ठ प्रश्न विचारणारे नासदीय सूक्त हे एकमेवाद्वितीय आहे. ज्या महान ऋषीने हे काव्य लिहिले त्याला हे समजले होते की निर्मितीची संकल्पना ही पुराणांतील निर्मितिकथांच्या पलीकडली आहे. दुसरे म्हणजे इथे देव हे सृष्टिनिर्मितीनंतर आले असावेत असा युक्तिवाद केला आहे. हेही आगळेच असावे. एक मात्र खरे की काव्य लिहिल्या गेल्याच्या 2500-3000 वर्षांनंतरही निर्मितीचा प्रश्न हा अजूनही तेवढाच अचंबित करणारा आहे. बरे, देवाचे पूर्वअस्तित्व जर आपण मानले तरी एक वेगळाच प्रश्न पुढे येतो, तो असा— ‘देवाने सृष्टीची निर्मिती का केली असावी? आणि देवाच्या अस्तित्वाचे तरी प्रयोजन काय असावे?’
ज्या देवाने अनंत बहुविश्वे, त्यात प्रत्येक हजारो करोड आकाशगंगा आणि त्या प्रत्येक आकाशगंगेत हजारो करोडो तारे व त्यापेक्षा अनेक पटींत ग्रह निर्माण केले, त्यांतील फक्त एका ग्रहावर जीवन उदयाला येईल आणि 3-3.5 करोड वर्षांच्या उत्क्रांतीच्या प्रवासानंतर ही प्रजाती सृष्टिविलयाच्या फक्त काही हजार वर्षांआधी इतकी बुद्धिमत्ता प्राप्त करील की तिला निर्मितीचे प्रश्न पडतील आणि त्या निर्मितीचे श्रेय ती देवाला देईल तसेच पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांतील लोकांना आपापल्या जाति-धर्मानुसार वेगवेगळ्या देवांची उपासना करता यावी व आपापल्या वेगवेगळ्या श्रद्धांवरून एकमेकांशी भांडताही यावे हे ह्या निर्मितीचे प्रयोजन असावे असे मला तरी वाटत नाही.

निर्मितीच्या प्रश्नाबद्दल विज्ञान काय सांगते –
विज्ञान हे हळूहळू निर्मितीच्या प्रश्नाचा गुंता सोडवण्याजवळ पोहोचत आहे. महास्फोट कशामुळे झाला आणि महास्फोटानंतरच्या घटना कश्या घडल्या याचे उत्तर भौतिकशास्त्राला मिळाले आहे. परंतु विश्वाच्या उत्पत्तीच्या क्षणाला भौतिकशास्त्रीय नियम लावणे अत्यंत अवघड आहे. ते करण्यासाठी भौतिकशास्त्रातील मूलभूत सिद्धांतांची सांगड घालावी लागेल. रज्जुसिद्धांतावरील अलिकडच्या प्रगतीमुळे तशी शक्यता तरी निर्माण झाली आहे. भौतिकशास्त्रीय नियम आणि गणितीय अचलांची संख्या ही आहे तशीच का आहे असा एक प्रश्न विचारला जातो. भौतिकशास्त्रीय अचलांची संख्या ही वेगळी असती तर कदाचित जीवसृष्टीची उत्पत्ती शक्य झाली नसती. अश्या परिस्थितीत भौतिकशास्त्रीय अचलांची संख्या देवाने जीवसृष्टीच्या उत्पत्तीला साजेशी अशी केली आहे का असा प्रश्न पडू शकतो. परंतु बहु-विश्वसिद्धान्त या समजुतीला फोल ठरवतो.
बहुविश्वसंकल्पनेनुसार वेगवेगळ्या विश्वांतील भौतिकशास्त्रीय नियम आणि गणितीय अचलांची संख्या वेगवेगळी असू शकते. तेव्हा आपल्या विश्वातील अचलांची संख्या ही अनंत शक्यतांतील एक आहे असे म्हटले पाहिजे. त्यांतल्या काही संख्या ह्या स्थिर विश्वाच्या निर्मितीस अनुकूल होत्या. ह्याच विश्वांमध्ये कालांतराने जीवसृष्टीची निर्मिती झाली असावी आणि कदाचित मानवासारखा बुद्धिमान प्राणी उत्क्रांत झाला असावा जो निर्मितीच्या प्रश्नावर विचार करेल. ज्या विश्वांमध्ये अचलांची संख्या ही स्थिर विश्वाच्या उत्पत्तीला अनुकूल नव्हती तिथे जीवसृष्टीय उत्पत्ती न झाल्यामुळे ‘का’ हा प्रश्न उद्भवलाच नाही.
एकच विश्व आहे असे मानले तर ‘का’ हा प्रश्न उग्र स्वरूपात पुढे येतो. पण आपले विश्व हे एकमेव नाही हे उमजले तर निर्मितीच्या प्रश्नाचा गुंता हळूहळू सुटत जातो.
विज्ञानाला अजूनही अनेक प्रश्न सुटले नाहीत. परंतु इतिहासाकडे पाहता असे लक्षात येते की केवळ 500 वर्षांआधी अनेक लोकांना पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू आहे असे वाटत होते आणि आज आपण बहुविश्व संकल्पनेबद्दल बोलत आहोत. मनुष्यप्राणी हा जागतिक तापमानवाढ व वाढती शस्त्रास्त्रस्पर्धा यांतून आणखी 500 वर्ष जगलाच तर कोण जाणे अजून किती कोडी उलगडतील!
माझ्या वैयक्तिक मतानुसार देव ही संकल्पना निर्मितीला समजण्यासाठी आवश्यक नाही. परंतु देव मानणारे अनेक सामान्य लोक हे त्याला केवळ निर्मितीची कारणमीमांसा करण्यासाठी नाही, तर जगण्याची आशा, बळ आणि प्रेरणा देणारा म्हणून पाहतात. ह्या स्वरूपातील देवाचे अस्तित्व हे त्यांच्या कल्पनांत टिकून राहील. अशी ही देवाची संकल्पना विवेकबुद्धीला मारक होत नाही असा समतोल टिकवता आला तरी पुरेसे आहे.

sukalp.karanjekar@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.