धर्म आणि मैत्री…

धर्म, मैत्री

तिच्या वडिलांबरोबर ती प्रथमच माझ्या बँकेच्या शाखेत आली होती. तिचे वडील नेहमीच माझ्याकडे येत, त्यांना मी एक एकाकी वृद्ध प्रोफेसर म्हणून ओळखत होते. या सधन वस्तीतील एका श्रीमंत स्टायलिश मुलांनी गजबजलेल्या कॉलेजमध्ये ते उर्दू शिकवत तेव्हापासून मी त्यांना पाहात होते.
प्रोफेसर मुस्लिम होते. अत्यंत देखणे रूप, गोरापान रंग, खानदानी वावर, देहबोली. या वार्धक्यात अधिकच गहिरलेली डोळ्यातली निळाई. सर उर्दूतले प्रसिद्ध शायर-साहित्यकारही होते.
आणि जिभेवर उर्दू शेरोशायरीबरोबरच फर्मास इंग्लिश भाषेची साखरपेरणी. त्यातच रंगतदार आठवणी. कधी कॉलेजचे किस्से, कधी फिल्म इंडस्ट्रीतल्या खमंग कहाण्या, सरांची दिलीपकुमार वगैरे फिल्मी दिग्गजांशी अंतरंग मैत्री होती. हे सर्व रंग ल्याललेले सरांचे बोलणे कधी संपूच नये असे वाटायचे. शायरीची अनेक रूपे….
“आज हमारा दिल तडपे है कोई उधरसे आवेगा
या के नवीश्ता उन हाथों का कासीद हम तक लावेगा’
अशी इंतजारची भाषा, (मग त्यातच नवीश्ता म्हणजे पत्र, कासीद म्हणजे निरोप्या या टिप्पण्याही मला कळावे म्हणून) तर कधी…
“दिल गया रौनक-ए-हयात गयी, गम गया सारी कायनात गयी’ –
असे थरारून टाकणारे सत्य जे उर्दू गझलच्या दोन ओळींतच मावू शकते, असे काहीबाही.
माझ्याकडे इतर कामांबरोबरच पेन्शन खाती होती आणि वृद्ध पेन्शनर लोकांची कामे मी आपुलकीने करायची, त्यामुळे आमची ओळख दाट होत गेली. मी मराठी भाषेतील एक कवयित्री असल्याचं त्यांना सांगून त्यांच्याकडून उर्दू कविता ऐकण्याचा आनंद त्यांच्याशी बोलताना घेऊ लागले होते.
झकास विनोदबुद्धी असलेल्या सरांच्या डोळ्यांत मात्र एक खोल वेदना होती. एकाकी जीवनाची. त्यांच्याबरोबर एखादा नोकर किंवा नोकराणी असे मदतीसाठी. दिवसेंदिवस त्यांना वावरणे, व्यवहार करणे जड चालले होते. मी माझ्या अधिकारात त्यांना जमेल तो आधार देत होते. माझी सिनियर आणि ज्युनियर – दोघीही मला यात सहकार्य करत होत्या. सर आमच्यावर खूष होते. दिवस जात राहिले.
आणि आज सरांबरोबर ती आली होती. सितारा. त्यांची विवाहित, अमेरिकेत राहणारी मुलगी. एखाद्या व्यक्तीला पाहताच आपण तिच्या प्रेमात पडतो, सिताराच्या बाबतीत माझे तसेच झाले. गोरीपान उंचीपुरी सितारा वडिलांइतकी देखणी नव्हती, पण खूप आकर्षक आणि आनंदी होती. अत्याधुनिक पेहरावावर मोठमोठे कानातले, गळ्यातले अलंकारही आधुनिकतेचाच घोष करत होते. ती मोठमोठ्या डोळ्यांनी मला निरखून बघत होती. वडिलांनी माझ्याबद्दल काही चांगले शब्द उच्चारले असावे. त्या नजरेत मृदुभाव होता.
सिताराच्या अनेक अडचणी होत्या. ती अमेरिकेतून आली होती. तिला खाते उघडायचे होते. वडिलांचे व्यवहार मार्गी लावायचे होते. त्यांच्या वार्धक्याला सुख देणाऱ्या सिस्टिम्स घरीदारी सुरू करून देऊन मग परत जायचे होते. कठीण होते काम. एक विवाहित परदेशस्थ मुलगी, आपल्या विधुर, एकाकी, वृद्ध, आजारी पित्यासाठी जीव टाकत होती.
यात धर्माचा काहीच प्रश्न नव्हता. एका स्त्रीला समजू शकणारे हे स्त्रीचे दुःख.. विवाहानंतर दुभंग जगत राहण्याचे. मीही अनेक आघातांनी ग्रस्त आजारी वडिलांना वेळ देत होते. मी सिताराकडे आत्मीयतेच्या भावनेने ओढली गेले.
तिला बँकेबाहेरही भेटू लागले.. एका विसंगत मैत्रीचं उदाहरण होते. ते. मी, अत्यंत मराठमोळी, संघपरिवाराच्या छायेतले बालपण. एकूण मुस्लिम जगापासून चार हात दूर राहणे पसंत करणारे. उर्दू कवितेच्या आवडीमुळे केवळ सरांकडे आकृष्ट झालेली आणि आता ही जिवंत कविता. ही वयाने माझ्यापेक्षा लहान खानदानी मुस्लिम मुलगी. आणि किती समृद्ध व्यक्तिमत्त्व. बोलताना मला चक्क परमहंस योगानंदांच्या शब्दांचे दाखले देऊन सिताराने मला जिंकून घेतले. पडदा, बुरखा, कर्मकांडवादाचा लवलेशही नसलेली आणि तरीही स्वतःच्या परंपरेचा सार्थ अभिमान असलेली सितारा मुक्त मुस्लिम स्त्रीचे एक मनोहारी रूप होते. त्या संस्कृतीचे खरे सौंदर्य होते. सितारा मला माझ्या नसलेल्या सख्ख्या धाकट्यशा बहिणीसारखी वाटू लागली.
सरांच्या घरी माझे येणेजाणे सुरू झाले. भिंतीवर गतकाळाची सुंदर छायाचित्रे, काचेवर सिताराने स्वहस्ते केलेले रंगीत नक्षीकाम… सर्वत्र संपन्न अभिरुचीच्या खुणा. सरांसह सिताराही माझ्या घरी येऊन गेले. माझ्या आईशी खूप आत्मीयतेने बोलले. काही वेळा आम्ही तिघे बाहेरही भेटलो, जेवलो.
पण सर झपाट्याने खंगू लागले होते. स्मृती जात होती. अंथरूण पकडले गेले होते. जेवताना ठसके लागत होते. अन्न शरीरात उतरत, पचत नव्हते. विझत चाललेली गहिरी निळी नजर फक्त शायरीच्या आठवणीने थोडीशी धुगधुगे. सरांची एक जुनी सुंदर दीर्घ कविता होती जिच्यात नमाज पढणाऱ्या त्यांच्या धाकट्या बहिणीचे वर्णन होते. माथा झुकवून प्रार्थना करणारी ती जणू कोणी हूर (अप्सरा) असावी अशा अर्थाची. तिच्या ओळीच्या ओळी सर याही अवस्थेत उत्साहाने उद्धृत करत तेव्हा जगावर रुसून सर्व बोलणे चालणे सोडलेल्या माझ्या वडिलांना संघाच्या प्रार्थनांनी फक्त चेतना येत होती त्याची मला आठवण यायची. किती विभिन्नतेत एकरूप असतात माणसे!
सिताराच्या भारतातील फेऱ्या वाढत चालल्या. काळजीने तिची घालमेल होत होती. काहीही केल्या ती वडिलांच्या वार्धक्याला पुरी पडत नव्हती. नोकरचाकर उद्दाम होत चालले होते. घर त्यांच्या हातात असे. सितारा आली की दोन-तीन महिने नाटके चालत. तिची पाठ वळल्यावर सर त्यांच्याच ताब्यात असत. त्यांचे अर्थव्यवहार, आरोग्यचाचण्या ती शक्य तितके रांगेला लावायचा प्रयत्न करत होती. एकाकी लढा एका तरुण स्त्रीचा.. एका लाडक्या लेकीचा, म्हातारपणी मूल झालेल्या बापासाठी. हे सगळे बघताना मला गलबलत होतं.
यावेळी सरांची अवस्था अशी होती की सिताराची रजा संपून गेली तरी तिचा पाय निघेना. तिने नोकरी सोडून दिली! वेबसाईट्स वगैरे बनवण्याचं तिचं काम होते. शक्य तितके तिने घरून काम करून ते रेटले होते. आता ती उलघाल तिने संपवली.
स्वतःच्या घराच्या आघाडीवर ती कशीबशी सांभाळत होती! नवरा, सासू-सासरे परदेशी. समजून घेत होते. पण अशा परिस्थितीत सर्वांच्याच सहनशीलतेचा अंत पाहिला जातो. सितारा जणू तारेवरची कसरत करत होती. सर अत्यवस्थ झाले. एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. ते कोमातच होते. सितारा त्यांच्या उशापायथ्याशी. चिंता अनेक. हॉस्पिटलची बिले, नसलेले मनुष्यबळ, जिवापाड प्रेम करणाऱ्या पित्याचे ते असहाय रूप. मग अकाली सोडून गेलेल्या आईची आठवण.
मी जमेल तसे घरी, हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला जात होते. त्या रात्री ती अगदी थकलेली होती. तरीही कोमात असलेल्या वडिलांशी प्रेमाने बोलत होती. त्यांना काही ना काही सांगत होती. ते ऐकत असतील अशी तिची श्रद्धा होती. भेटायला आलेली एक वडीलधारी स्त्री कुराणातले उतारे म्हणत होती.
मला म्हणाली, “”माझ्या वडिलांसाठी प्रार्थना कर.” उशिरापर्यंत मी तिच्याबरोबर बसून राहिले. कुणी नातेवाईक वगैरे भेटून जात होते. सरांचे कॉलेजमधील सहकारी, विद्यार्थी फोनवर चौकशी करत होते.
मी कुठेच मंदिरात वगैरे जात नाही. कुठे जायचे असते! कुठेही जाणे प्रतीकात्मकच असते. ही आपलीच आंतरयात्रा. पण त्या रात्री कुठेतरी जावंसे वाटले. त्या रात्री घरी न जाता माझ्याच इमारतीतील एका शेजाऱ्यांकडे एका संत-अवलियाची पूजा वगैरे चालते. तिथे जाऊन हात जोडले. सरांना या सर्वांतून सोडवण्यासाठी प्रार्थना केली. योगायोग असेल किंवा त्या महात्म्याने ती प्रार्थना खरेच ऐकली असेल, सकाळीच सिताराचा फोन आला. तिचे वडील तिच्या आईच्या भेटीला हे जग सोडून निघून गेले होते.
“”आता मला मृत्यू परका कसा वाटेल? जिथे माझे आई-वडील आहेत ती जागा वाईट कशी असेल?” सिताराचा प्रश्न.
किती खरे होते ते! एका उदास प्रसन्नतेने सिताराने माझा निरोप घेतला. तिचे कर्तव्य पूर्ण करून घेतले होते अल्लाहने तिच्याकडून. गेली दोन-तीन वर्षे चाललेली मनाची कुरतड शांत झाली होती. पण माहेर संपले होते!
भारत हे तिचे माहेर होते. तिला भारताचा अत्यंत अभिमान होता. इतक्या वर्षांत तिने भारतीय नागरिकत्व सोडलं नव्हतं.
माझ्या अनेक संकल्पना-समजुतींना धक्का देत सिताराने मलाही मुक्त केले होते माझ्या पूर्वग्रहांपासून. माझा निरोप घेण्याआधी…
bharati.diggikar@gmail.com
●●●

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.