हिटलरसंबंधी दोन चित्रपट

हिटलर, एकाधिकारशाही, फॅसिझम

आधुनिक मानवी इतिहासातील काळाकुट्ट पट्टा म्हणून दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंची वंशहत्या या घटनेकडे बघितले जाते. त्यासाठीचा खलनायक म्हणून आणि प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच्या आणि युद्धाच्या काळातील जर्मनीचा हुकूमशहा म्हणून हिटलर आपल्याला ज्ञात आहे. हिटलरसंबंधी दोन चित्रपटांची ओळख करुन देणे हा या लेखाचा हेतू आहे. यातील पहिला चित्रपट आहे ’डाऊनफॉल’; ज्याची मांडणी हिटलरच्या आयुष्यातील शेवटच्या दहा दिवसांतील घटनांवरती आधारलेली आहे. दुसरा चित्रपट आहे ’हिटलर : द राईज ऑफ इव्हिल’; ज्यात हिटलरच्या राजकारणातील प्रवेशापासून तो हुकुमशहा बनण्यापर्यंतच्या कालावधीतील राजकीय घटनांवर आधारलेले चित्रण आहे.

आधुनिक मानवी इतिहासातील काळाकुट्ट अध्याय म्हणून दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंच्या वंशहत्येकडे बघितले जाते. त्याचा खलनायक आणि प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धाच्या आणि त्याआधीच्या काळातील जर्मनीचा हुकूमशहा म्हणून हिटलर आपल्याला ज्ञात आहे. हिटलरसंबंधीच्या दोन चित्रपटांची ओळख करून देणे हा या लेखाचा हेतू आहे. यांतील पहिला चित्रपट आहे ’डाऊनफॉल’; ज्यामध्ये त्याच्या आयुष्यातील शेवटच्या दहा दिवसांतील घटनांची मांडणी केली आहे. दुसरा चित्रपट आहे ’हिटलर : द राईज ऑफ इव्हिल’; जो हिटलरच्या राजकारण प्रवेशापासून तो हुकुमशहा बनण्यापर्यंतच्या राजकीय घटनांवर आधारलेला आहे.

डाऊनफॉल
“मी हिटलरची चाहती नव्हते पण कुतूहलापोटी मी त्याच्यामागे गेले. या गोष्टीचा आता मला खेद वाटतो आणि त्या कृत्याबद्दल स्वत:चाच राग येतो” ट्राऊडल युंग (Traudel Jung) यांच्या मुलाखतीतील छोट्याश्या तुकड्याने चित्रपटाची सुरुवात होते. ट्राऊडल युंग ही मुलगी वयाच्या बाविसाव्या वर्षी हिटलरची वैयक्तिक सेक्रेटरी म्हणून रुजू झाली. ती युद्धातून सहीसलामत वाचली. तिच्या आठवणीरूप निवेदनावर हा चित्रपट बेतलेला आहे. हा चित्रपट जर्मन आहे आणि इंग्लिश सबटायटल्ससह बघता येतो.
हिटलरचा आणि जर्मनीचा पाडाव होणार याचा बहुतेक सर्वांना अंदाज येऊ लागलेला आहे. स्वत: हिटलरने आपले वास्तव्य युद्धकाळात आसरा घेण्य़ासाठी बांधलेल्या फ्युरर-बंकरमध्ये हलवलेले आहे. यानंतर एक-एक पराभवाच्या बातम्या येत जातात आणि तणाव वाढत जातो. या दहा दिवसांतील ताणतणाव अतिशय प्रभावी पद्धतीने चित्रपट दाखवतो. ताणतणावाच्या आणि अनिश्चित वातावरणाला हिटलर, त्याची मिस्ट्रेस-पत्नी एव्हा ब्राऊन, ट्राऊडल युंग आणि इतर सहकारी कशी प्रतिक्रिया देतात हे चित्रपट दाखवतो.
हिटलर काही वेळेस वस्तुस्थितीचे भान हरपून बसतो. त्यामुळे तो अशक्य असणाऱ्या सैनिकी कृती गृहीत धरतो आणि त्या पूर्ण होत नाहीत म्हणून सहकाऱ्यांवर भडकतो. त्याचे लष्करी सहकारी हे प्रसंग कसे हाताळतात हे बघणेही महत्त्वाचे ठरते. काही सहकारी पहिल्या महायुद्धाच्या अनुभवावरून ’पुन्हा शरणागती नाही’ अशी भूमिका घेतात तर काही परिस्थितीची अगतिकता जाणवून शरणागती किंवा फितुरी या पर्यांयाचा विचार करू लागतात.
एव्हा ब्राऊन पूर्णपणे वस्तुस्थिती नाकारूनच जगत असते. प्रत्यक्ष पराभव समोर दिसत असतानाही मौजमजेच्या पार्ट्या आयोजित करणे, स्वत:चे वैयक्तिक सौंदर्यप्रसाधन नीटनेटकेपणे वापरणे इ. करताना ती दिसते. चित्रपटातले एक दृश्य हा अस्वीकार, अनिश्चितता आणि विरोधाभास खूप चांगल्या प्रकारे मांडते. एव्हा, ट्राऊडल आणि हिटलरची आणखी एक सेक्रेटरी—गेर्डा—खुली हवा खाण्यासाठी बंकरमधून बाहेर येतात. शांत वातावरण आणि निवांतपणा पाहून त्या सिग्रेटी शिलगावतात. तेथे असलेल्या एका सुंदर पुतळ्याकडे त्यांचे लक्ष जाते आणि तेवढ्यात बॉम्ब-अलार्म वाजतो. सिग्रेटसह मोकळा श्वास घेताघेताच वस्तुस्थितीची कर्कश जाणीव तो करून देतो. तो ऐकताच त्या तिघी घाईघाईने परत फिरतात. चित्रपट माध्यमाची ताकद अशा निःशब्द दृश्यांमधून अनुभवास येते.
ट्राऊडल आणि गेर्डा सुरुवातीला हिटलरच्या भ्रामक शब्दांवर विश्वास ठेवून जर्मनीची माघार तात्पुरती असेल असे धरून चालतात. इतर सहकारी पराभवाची कल्पना देत असतानाही त्यांना ती हिटलरशी विद्रोह करणारी वाटते. वस्तुस्थितीची जाणीव होते तेव्हा त्यांचा बांध फुटतो पण त्या दोघीही शेवटपर्यंत हिटलर आणि एव्हासोबतच राहण्याचे ठरवतात.
हिटलरचा ज्यूविरोधाचा भाग त्याज्य आहेच. त्याच्या विकासाच्या, जर्मनीच्या प्रगतीबद्दलच्या कल्पनांविषयीही मतमतांतरे शक्य आहेत. पण दहा-बारा वर्षे तो जर्मनीचा हुकूमशहा आणि नेताही राहिलेला होता. त्या भूमिकांचे मूल्यमापन कसे करणार? विजय मिळवणारा प्रत्येक नेता श्रेष्ठ मानला जातो कारण विजय हाच त्याच्या श्रेष्ठतेचा निकष असतो. कठीण काळात हा मात्र नेत्यांची खरी ओळख पटवणारा काळ आणि कठीण म्हणजे फक्त युद्धातील तात्पुरत्या माघारीचा काळ नव्हे. आपले स्वत:चे पार्थिव अस्तित्व आणि आपल्या विचारसरणीचे अस्तित्वच दोलायमान दिसते त्यावेळी नेता कसा वागतो? कुठले आदेश देतो? तो आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि जनतेसोबत उभा राहतो की नाही? पराभवाची योग्य जबाबदारी स्वीकारतो की नाही? हे सर्व हिटलरच्या ’नेते’पणावर प्रकाश टाकण्यासाठीही हेच सर्व जाणून घ्यावे लागते.
’रेडआर्मी’ने जर्मनीत प्रवेश केला त्यावेळी, आपला पराभव होईल ह्याची कल्पना असतानाही हिटलरने स्वत:च्या सैन्याला माघार घेताना दग्धभू धोरणाच्या (scorched earth policy) सूचना दिल्या होत्या. दग्धभू धोरण म्हणजे एखाद्या प्रदेशातून माघार घेताना तिथल्या पायाभूत सुविधा, जीवनावश्यक संसाधनांचा नाश करत मागे हटणे. परंतु अल्बर्ट स्पीअर या युद्धमंत्र्याने हे आदेश गुप्तपणे धुडकावले आणि त्यामुळे जर्मन नागरिकांचे जीवन आणि युद्धोत्तर जर्मनीची पुन: उभारणी थोडी तरी सोपी झाली.
एका प्रसंगात मोन्के (Mohnke) हा जनरल येऊन सांगतो की आघाडीवरील सामान्य नागरिकांना महिला व मुलांसह सुरक्षित स्थळी हलवायला हवे. त्यावेळी हिटलर त्याला उत्तर देतो की अशा युद्धात कोणीही ’सामान्य नागरिक’ नसतात. त्यामुळे हे ’सामान्य नागरिक’ बळी पडले तरी त्याने फार विचलित होऊ नये. पुढे तो असेही म्हणतो की लोकच त्याच्याशी पूर्णपणे प्रामाणिक राहिले नाहीत म्हणून हा पराभव ओढवला. लोकांनी त्यांच्या हालअपेष्टा आणि मरण स्वत:च ओढवून घेतलेले आहे आणि सामान्य लोकांच्या जगण्याच्या मूलभूत गरजा या क्षणी महत्त्वाच्या नाहीत.
आणखी एका प्रसंगात एक अधिकारी हिटलरला सांगतो की युद्धामध्ये आपले अतिशय चांगले असे वीस हजार लष्करी अधिकारी कामी आले आहेत. त्यावर हिटलरचे उत्तर आहे — “तरुण अधिकारी त्यासाठीच तर असतात”. “आपला दारूगोळा संपत आला आहे, लवकरच तो पूर्णपणे संपेल. मग काय करायचे?” या प्रश्नावर हिटलर “मी कधीही शरणागती स्वीकारणार नाही.” असे उत्तर देतो आणि बाकीच्यांनाही समर्पणास किंवा शरणागतीस मनाई करतो.
हिटलरच्या नेतृत्वासंबंधी माझ्या मनात बरेच प्रश्न उभे राहिले. आपल्यावर पूर्ण विश्वास टाकणाऱ्यांना वाऱ्यावर सोडून देणे, आपल्या शूर अधिकाऱ्यांच्या मृत्यूवर “ते मरण्य़ासाठीच असतात” अशी बेफिकिरीची प्रतिक्रिया देणे, “मला विजय मिळाला नाही ना, मग तुम्ही सर्वजणही माझ्यासोबतच संपून गेलात तरी चालेल पण मी शरणागती पत्करणार नाही” ही भूमिका आणि आपल्याच लोकांवर विनाकारण सूड ह्या गोष्टी नेतेपणाच्या कुठल्या व्याख्येत बसतात?
सुरुवातीप्रमाणेच चित्रपटाच्या शेवटीही खऱ्याखुऱ्या ट्राऊडल युंगच्या निवेदनातील भाग दिसतो – “आपण त्या मानाने तरुण आहोत आणि आपल्याला हिटलरच्या कृष्णकृत्यांची जाणीव नव्हती म्हणून आपण भारावले गेलो अशी मी बरीच वर्षे स्वत:ची समजूत करून घेत होते. पण एकदा मला माझ्याच वयाच्या एका मुलीचे थडगे दिसले ज्यावरील शिलालेखावरून मला कळले की तिला ज्यू लोकांना मदत केल्याबद्दल अटक करून नंतर मृत्युदंड देण्यात आला. त्यावेळी मला जाणवले की तरुण वय हे केलेल्या चुकीवर पांघरूण घालण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही.”

हिटलर : द राईज ऑफ इव्हिल
दुसरा चित्रपट राजकीय पक्षाचा सर्वसाधारण नेत्यापासून ते हुकूमशहापर्यंतचा हिटलरचा प्रवास मुख्य घटनांच्या आधारे सांगतो. हा तांत्रिक अर्थाने चित्रपट नाही. ब्रिटिश ब्रॉडकास्ट (बीबीसी) या संस्थेने स्वत:च्या टेलिव्हिजन चॅनेलसाठी तयार केलेला टेलिव्हिजन-पट आहे. तो प्रत्येकी दीड तासांच्या दोन भागांचा बनलेला आहे. बीबीसीचा आणि पर्यायाने ब्रिटिश असल्यामुळे ह्या चित्रपटात सर्व घटना एकाच चष्म्यातून पाहिल्यासारख्या वाटतात हा आक्षेप आधीच नोंदवून ठेवतो. कलेच्या दृष्टीने तो “डाउनफॉल” या चित्रपटाएवढा किंवा एकूणच उत्कृष्ट नाही, तर थोडाफार सरधोपट आणि एकांगी आहे. तरीही हिटलरच्या 1923 ते 1933 या कालावधीतील राजकीय प्रवासाचा तो चांगला आढावा आहे.
हिटलरसंबंधी तरुण पिढीला आकर्षण असते असा माझा अनुभव आहे. शस्त्रसज्जता, सैनिकी शिस्त आणि तुलनेने छोट्याशा काळातील प्रचंड लष्करी यश याचेच हे आकर्षण असावे. हिटलरचे आत्मवृत्त ’माईनकाम्फ’ च्या प्रती आजही मोठ्या संख्येने खपताना दिसतात. माझा एक चुलतभाऊ वर उल्लेखलेल्या गोष्टींमुळे हिटलरचा मोठा फॅन आहे. तो ऑफिसच्या काही कामानिमित्त जर्मनीला जाऊन आला आणि आल्यानंतर प्रचंड आश्चर्य व्यक्त करत म्हणाला “जर्मनीत कुठेही हिटलरचा एक पुतळाही नाही!” शिवसेनेचे नेते बाळासाहेब ठाकरे यांनीही आपल्याला शिस्तीमुळे हिटलर आवडत असल्याचा उल्लेख जाहीरपणे केला होता.
ज्या तुलनेत ’माईनकाम्फ’च्या प्रती खपतात त्या तुलनेत विल्यम शिररच्या ’The rise and fall of Third Reich’ सारखी इतिहासाचा प्रामाणिक आढावा घेणारी (किमान दुसरी बाजू दाखवणारी पुस्तके) खपत नसावीत असा माझा अंदाज आहे. शिररच्या (किंवा त्यासारख्या) पुस्तकांचा असलाच तर दोष एवढाच आहे की ती पुस्तके वाचायला किंचित किचकट असतात, प्रचंड माहितीने भरलेली असतात. ती पुस्तके वाचून विचार करून त्यातून तथ्ये शोधून काढावी लागतात. आजच्या Whats app आणि Twitter च्या जमान्यात नाही म्हटले तरी हा तरुणपिढी वर (आणि सगळ्यांवरच) थोडासा अन्याय आहे.
अशा वेळी चित्रपटाचे माध्यम प्रभावी तर आहेच कारण नाट्यमय घटनांच्या रूपात ते इतिहास आपल्यापुढे मांडू शकते. चित्रपट किंवा त्याचा आशय आवडल्यास तांत्रिक/ऐतिहासिक माहिती समजावून देण्यासाठी योग्य ते प्रोत्साहनही देऊ शकते. यादॄष्टीने ’Hitler : The rise of evil’ या चित्रपटाकडे पाहावे असे मला वाटते. जाडजूड पुस्तक वाचणे आणि थोडेसे सुलभीकरण केलेला तीन तासांचा चित्रपट पाहणे यात नंतरचा पर्याय नक्कीच सोपा आणि हवाहवासा आहे (कारण मी स्वत:ही शिरर यांचे पुस्तक वाचलेले नाही).
चित्रपट सुरुवातीला हिटलरच्या बालपणातील, तारुण्यातील आणि पहिल्या महायुद्धाच्या काळातील अगदी निवडक घटना दाखवतो. मात्र मुख्य आशयपूर्ण भागास 1923 च्या सुमारास हिटलरच्या राजकारणातील प्रवेशाने सुरुवात होते. हिटलर 1923 साली कामगार पक्षाशी संलग्न झाला. भावना भडकवणारी अभिनिवेशपूर्ण भाषणे, ज्यूंविषयीचा प्रखर द्वेष हा अगदी सुरुवातीपासूनच हिटलरच्या राजकारणातील महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्यामुळे त्याने केवळ शेवटची काही वर्षे ज्यूंचा अमानुष छळ केला, बाकीची त्याची कारकीर्द ज्यू-विद्वेषाच्या राजकारणाशिवाय बघितली पाहिजे या दाव्यात काही तथ्य नाही.
हिटलरशिवायची जी तीन मुख्य पात्रे चित्रपटात आहेत ती म्हणजे अर्न्स्ट व हेलेन हान्सफस्टाईंगेल (Ernst and Helene Hansfstaengl) हे जोडपे आणि फ्रिट्झ गेर्लिक (Fritz Gerlich) हा पत्रकार. अर्न्स्ट आणि हेलेन अगदी सुरुवातीच्या काळापासून हिटलरचे मित्र असतात आणि त्याच्यासोबत काम करतात. हिटलर सुरुवातीच्या काळात प्रभाव टाकण्यासाठी धडपडत असताना अर्न्स्ट त्याला काही मोलाचे सल्ले देतो. लेनिनच्या दाढीचे आणि कम्युनिस्टपक्षाच्या झेंड्याचे उदाहरण देऊन अर्न्स्ट हिटलरला स्वत:ची ट्रेडमार्क बनेल अशी काहीतरी वैयक्तिक ठेवण आणि लक्षात रहाण्यास सोपा पण ठळक असा झेंडा तयार करण्यास सुचवतो. तेथून हिटलरच्या मिशीचा आणि नाझी पक्षाच्या स्वस्तिक चिन्ह असलेल्या झेंड्याचा जन्म होतो. हेलेन हिटलरच्या नाझी पक्षासाठी निधी-उभारणीचे कळीचे काम करताना दिसते.
तिसरी महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे फ्रिट्झची. फ्रिट्झ अगदी सुरुवातीपासून हिटलरच्या आततायी मतांना विरोध करताना दिसतो. सर्वसाधारण जनमत हिटलरच्या प्रचाराबद्दल आणि प्रचारतंत्राबद्दल फारसे आक्षेप नोंदवत नसताना फ्रिट्झला मात्र हिटलरच्या मांडणीतील तर्कदोष आणि विखार पहिल्यापासून जाणवतो असे दाखवले आहे. तो ती गोष्ट वेळोवेळी आपल्या वृतपत्रात मांडायचा प्रयत्न करतो. हिटलरच्या वृत्तांकनावरून संपादक/चालकांशी मतभेद झाल्यावर तो स्वत:चे वेगळे वृत्तपत्र सुरू करून आपला विरोध नोंदवत राहतो. बहुतांश लोक हिटलरच्या प्रगतीच्या आणि ’विकासा’च्या स्वप्नांमध्ये भुलून गेलेले असताना फ्रिट्झचे वेगळेपण उठून दिसते.
हिटलरला यश मिळवण्यासाठी काहीही निषिद्ध नाही हे दाखवणाऱ्या अनेक घटना चित्रपटात आहेत. त्यांमध्ये स्वत:च्या भाचीचा छळ करणे आणि तिने त्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर (हिटलर पार्टीचा प्रभावी नेता असल्यामुळे) ते प्रकरण पद्धतशीरपणे दाबले जाणे, धूर्तपणा दाखवून पक्षधोरण बदलणे आणि नको असलेल्यांचा काटा काढणे, भावनिक मुद्दे मांडून स्वत:ला अनुकूल असे जनमत घडवणे, राजकीय अस्थिरता भासवणे आणि त्या अस्थिरतेचा फायदा घेऊन एकाधिकारशाही लादणे, विरोधाचा आवाजच नाहीसा करणे, व्यक्तिकेंद्रित राजकारण घडवणे यांचा समावेश होतो.
माझे अनेक मित्र मला, यातील सुट्यासुट्या किंवा एकत्र मुद्द्यांसाठी “यात चूक काय? राजकारणात कमी-जास्त फरकाने हे घडतच असते” असे विचारताना दिसत आहेत. राजकारणात कमी-जास्त फरकाने या गोष्टी घडत असतात हे मला मान्य आहे पण अशा गोष्टी ठळकपणे, खूप जास्त वेळा आणि एखाद्याच्या राजवटीत घडत असतील तर आपण जागरुक होणे गरजेचे नाही का? नागरिकांनी कायमच सतर्क राहून कुठल्याही नेत्याच्या किंवा पक्षाच्या राजवटीतील चुकीच्या गोष्टींना आपला विरोध नोंदवत राहायला नको का? सगळ्यात महत्त्वाचे, विरोधाचा आवाज कायमचा बंद तर केला जात नाही ना याकडेही लक्ष दिले पाहिजे.
हिटलर आणि त्या काळच्या जर्मन समाजातच काहीतरी गडबड होती असे म्हणून हिटलरच्या एकाधिकारशाहीकडे दुर्लक्ष करता येईल किंवा कुठली सामाजिक सूत्रे आणि घटना एकाधिकारशाही घडवून आणतात याचे एक उदाहरण म्हणूनही हिटलरकडे बघता येईल. दुसऱ्या पर्यायातूनही सूत्रे/ घटना कशा टाळता येतील यावर काही विचार/कृती शक्य होईल. बाबरी मस्जिद प्रकरणाच्या वेळी भाजपच्या प्रचारामुळे प्रत्यक्षात बाबरी पाडली जाईल असे आम्हाला वाटले नव्हते असे म्हणणारे पुरोगामी विचारांचे स्नेही माझ्या परिचयाचे आहेत. अशी पाळी पुन्हा येऊ न देण्यासाठी नागरिक म्हणून आपण कुठल्याही राजवटीच्या काळात सतर्क राहून अयोग्य वाटणाऱ्या गोष्टींना विरोध नोंदवणे याची काळजी घेतली पाहिजे.
dhananjaymuli@gmail.com
●●●

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.