पैशाने श्रीमंती येत नाही (१)

श्रम, संपत्तिनिर्माण, तंत्रज्ञान
—————————————————————————
आपण बहुतेक वेळी संपत्तीचा संबंध पैशाशी लावतो.  पण त्याचा संबंध तंत्रज्ञानाच्या वापरातून माणसाला मिळणाऱ्या फुरसतीशी आहे, अशी अभिनव मांडणी करणारा; भारतात  तंत्रज्ञानातील नवसर्जन का घडत नाही, उत्पादन, चलनवाढ व उपभोग ह्यांचा परस्परसंबंध कसा असावा अशा महत्त्वाच्या प्रश्नांचा वेध घेणारा लेख
—————————————————————————

श्रीमंती पैशाने येत नाही. ती श्रम वाचवल्याने येते. येथे श्रम म्हणजे शरीरश्रम, बौद्धिक श्रम नव्हे. आपल्या सर्व गरजा भागवून ज्याला काही फुरसतीचा काळ मिळतो तो श्रीमंत. ज्याला आपल्या गरजा भागवण्यासाठी दिवसभर हातापायांचे श्रम करावे लागतात तो गरीब. एक गोष्ट सांगतो —

“एक शहरी माणूस एका खेड्यात गेला. ते खेडे एका नदीच्या काठावर वसले होते आणि त्यापासून थोड्याच अंतरावर सुंदर वनराई होती. हा शहरी एकदा त्या वनराईकडे फिरायला गेला असता त्याला तिथे एक गडीमाणूस एका झाडाखाली निवांत पहुडलेला दिसला. तो शहरी माणूस त्याला म्हणाला.
“अरे! हे तू हे काय काय करत बसलास, कुठे काम कर, कुठे नोकरी कर, माझ्याकडे येशील तर मी तुला नोकरी देववतो, अन् तू छान आनंदात राहशील, तुला इतके पैसे मिळतील की त्यातले काही तू साठवू शकशील.” हे सारे ऐकून तो खेडवळ म्हणाला – “पण पैसे साठवून मी काय करू?” त्याला शहरी माणसाने उत्तर दिले – “तू चांगला आराम करू शकशील!” त्यावर तो खेडवळ म्हणाला – “मला हे सर्व नको, मी तिकडे शहरात येत नाही. मी सध्या काय करतो आहे? आरामच तर करतो आहे.” मला याप्रकारचा आराम अभिप्रेत नाही. कारण ह्या तऱ्हेचा आराम ज्याला मिळतो त्याची कामे दुसऱ्याला करावी लागतात. या गोष्टीतल्या खेडवळ माणसाने आपल्या गरजा कमी केल्या आहेत. ज्याने गरजा कमी केल्या आहेत, त्यापेक्षा ज्याच्या गरजा पुष्कळ आहेत व त्या भागवून त्याला फुरसत मिळते तो खरा श्रीमंत असे मला म्हणावयाचे आहे.

शेतकरी शेतात मेहनत करीत असतानाच, गवंडी, सुतार, लोहार यांनी त्याचे घर बांधून दिले तर ती श्रमविभागणीच होय. माणसाच्या वाढत्या गरजा पूर्ण करून त्याला फुरसत होऊ लागली, ती दोन कारणांनी – त्याने श्रमविभागणी केली आणि दुसरे म्हणजे त्याने स्नायुबाह्य ऊर्जेचा वापर केला. स्नायुबाह्य ऊर्जेचा वापर केला तर रोजगारनिर्मिती थांबते, बेकारी वाढते असा सार्वत्रिक समज आहे. आणि या समजामुळे अशी ऊर्जा वापरायला नेहमी विरोध होत आला आहे. आपला असा समज आहे की याला रोजगार नाही अशा माणसाला उत्पन्न नसल्याने त्याच्या ठिकाणी क्रयशक्ती नसते व क्रयशक्ती नसल्यामुळे त्याच्या गरजा पूर्ण होत नाहीत; त्याच्या पदरी लाचारी येते. मला मात्र असे वाटत नाही. आमच्या लहानपणी नोकरी करणाऱ्यांची संख्या मुळातच कमी होती. आणि स्त्रिया तर क्वचितच कोणी नोकरी करणाऱ्या असत. असे असूनदेखील सर्वांचाच निर्वाह होत होता. आजसुद्धा कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांस वर्षातून जेमतेम सव्वाशे किंवा फारतर दीडशे दिवस काम असते. वर्षाच्या तीनशेपासष्ट दिवसांपैकी दोनशे दिवस तो मोकळाच असतो. याशिवाय अलिकडे अश्या पुष्कळ नोकऱ्या निर्माण झालेल्या आहेत की त्या नोकऱ्या करणारे लोक कामच करीत नाहीत. अशी अनेक महाविद्यालये आहेत जेथे मुले वर्गात बसत नाहीत. तेथे प्राध्यापक केवळ टिवल्या-बावल्या करतात  आणि महिनाअखेर रग्गड पगार घरी नेतात. काही सरकारी कचेऱ्यांतूनही असेच दृश्य आहे. त्यामुळे असा अर्थ निघतो की, काम केले नाही तरी सामान्य माणसाच्या गरजा भागतात.

हे सारे शक्य होते याचे कारण – माणसाच्या गरजा भागवण्यासाठी ज्या वस्तू लागतात त्यातल्या पुष्कळश्या, अन्न सोडून बाकी सगळ्या यंत्रांनी निर्माण होतात. आणखी एक गोष्ट ती अशी की, एकाच कामाचा मोबदला निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळा मिळतो. खाजगी नोकरीत कारकुनाला जितके पैसे मिळतात तितकेच किंवा त्यापेक्षा कमी काम करणाऱ्या कारकुनाला सरकारी नोकरीत पुष्कळ जास्त मिळतात. याशिवाय आरोग्यसेवा आणि निवृत्तिवेतन ह्याही बाबतींत फरक असतो. सरकारी नोकरीतही, राज्यसरकारची, केंद्रसरकारची आणि संरक्षणखात्याची असा फरक आहे आणि त्या-त्या ठिकाणचे वेतनही वेगवेगळे आहे.

ज्या देशात जास्त सुबत्ता आहे तेथे त्याच प्रकारचे काम करणाऱ्याला आपल्यापेक्षा कितीतरी जास्त लाभ मिळतात. या सगळ्याचा अर्थ असा की, श्रमाचा आणि त्या श्रमापासून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा काही संबंध नाही. जास्त श्रम केल्याने जास्त उत्पन्न आणि कमी श्रमाने कमी उत्पन्न असा भाग आता राहिलेला नाही.

जेथे उत्पन्न खूप पण उपभोग्य वस्तूंची वानवा तेथे त्या उत्पन्नाचा काहीही उपयोग नाही. जेथे ग्राहकाजवळ पैसा पुष्कळ आणि विकत घेण्यासाठी वस्तू कमी, तेथे वस्तू अतिशय महाग. अशा ठिकाणी जर वस्तूंच्या किंमतीवर निर्बंध घातले तर काळाबाजार फोफावेल. म्हणजे स्वस्ताई आणि महागाई जशी असेल त्याप्रमाणे ग्राहकाचा उपभोग कमी जास्त होतो. ही सारी आर्थिक व्यवहाराची एक बाजू झाली. आता दुसरी बाजू बघू या — ती पाहताना आपण पैशाकडे दुर्लक्ष करू या. आणि मानवाच्या श्रमांचा मोबदला पैशात नव्हे तर वस्तूंमध्ये कसा मिळतो ते पाहू या! औद्योगिक क्रांतीनंतर यंत्रापासून निर्मिलेल्या वस्तू पैशाने नव्हे तर श्रमाच्या मोबदल्यात स्वस्त मिळतात. एखाद्या वस्तूच्या निर्मितीसाठी मानवी श्रम जितके कमी तितकी ती वस्तू स्वस्त. तिची पैशांत किंमत कितीही असली तरी. पुढे-पुढे अशी वस्तू फुकटच मिळते असे म्हणायला हरकत नाही. ज्यावेळी माणसाचे श्रम पूर्वीइतके, पण त्याचा उपभोग वाढलेला अशी स्थिती असते त्यावेळी आपण त्याचे राहणीमान वाढले असे म्हणतो. आपले राहणीमान वाढवत नेणे ही माणसाची सहजप्रवृत्ती असल्यामुळे तो दुसऱ्या माणसाकडून कामे करवून घेतो किंवा यंत्राकडून करवून घेतो. यंत्राकडून कामे करवून घेतल्याने सगळ्या मानवसमाजाचेच श्रम कमी होत असतात आणि ज्यावेळी सार्वजनिक संपत्ती वाढते त्यावेळीही सगळ्यांचे श्रम कमी होतात. एक-दोन उदाहरणे देतो –

रेल्वे ही सार्वजनिक संपत्ती आहे. रेल्वेच्या वापरामुळे किती लोकांची पायपीट वाचली आहे याचा हिशोब करा! रेल्वेला जो नफा होतो तो सार्वजनिक कामासाठीच वापरला जातो. पायपीट वाचवणारी सगळी साधने मग ती पैशाने कितीही महाग असोत, ती समाजाचे श्रम कमी करतात. म्हणजेच श्रीमंती वाढवीत असतात. वीज निर्माण करणारी साधने सार्वजनिक मालकीची असली तर ती माणसाचे वेगवेगळ्या कामाचे श्रम कमी करतात, इतकेच नव्हे तर त्याची श्रीमंती भरमसाठ वाढवतात. वीज आज कोणते काम करीत नाही? ती आज गाड्या चालवते – म्हणजे पायपीट वाचवते. पाणी उपसते, वारा घालते, पाणी तापवते, थंड करते. हवा तापवते, थंड करते, उद्वाहनासारख्या साधनांनी चढण्या-उतरण्याचे श्रम वाचवते, हे सारे सार्वजनिक मालकीचे झाले तर नफा-तोट्याकडे न पाहता ती सर्वांच्या उपयोगी पडेल इतकेच नव्हे तर त्यायोगे सर्व जनतेत समानता येईल. या सेवा खाजगी मालकीच्या असतात तेव्हा त्यांच्यापासून नफ्याची अपेक्षा असते. आणि जोपर्यंत नफा मिळत राहावा यासाठी त्या सेवा वापरल्या जातात तोपर्यंत त्या सर्वांपर्यंत पोहचू शकत नाहीत आणि वंचितांची संख्या वाढत राहते. सार्वजनिक मालकीच्या बसगाड्या झाल्या म्हणून त्या खेड्यापाड्यापर्यंत पोहचू शकल्या. तसेच शाळांचे व पाठ्यपुस्तकांचेही आहे. शिक्षणावर सगळ्यांचा हक्क आहे असे सर्व समाजाला वाटले तेव्हा शाळेतील मुलांना गणवेश, पुस्तके, दुपारचे जेवण हे विनामूल्य मिळू लागले आणि शिक्षण खेड्यापाड्यापर्यंत पोहचू शकले. जोपर्यंत शाळा खाजगी होत्या तोपर्यंत केवळ धनिकांचीच मुले शिकू शकत होती. आता ज्यांच्याजवळ पैसा नाही त्यांचीही मुले शाळेत शिकू शकतात. याचा अर्थ असा होतो की, ह्याबाबतीत गरिबांचे राहणीमान पैशाशिवाय सुधारले आहे. सध्याचे जे खाजगीकरणाचे धोरण आहे त्यामुळे आपण विषमतेत भर घालत आहोत.

वरच्या सगळ्या विवेचनावरून हे लक्षात येईल की, आपले राहणीमान सुधारण्यासाठी पैशाचा फारसा उपयोग होत नाही. पैशाने विकत घेण्याजोग्या वस्तू बाजारात असल्याशिवाय पैशाचा काहीही उपयोग नाही. तुमच्याजवळ पुष्कळ धनसंपत्ती आहे पण बाजारात धान्यच नाही अशी स्थिती असेल तर त्या धनसंपत्तीचा काही उपयोग नाही. तुमच्या खिशात पुष्कळ पैसा आहे आणि तुम्हाला नदी ओलांडायची आहे अशावेळी तिथे नाव आणि नावाडी नसेल तर त्या पैशाचा कणमात्र उपयोग नाही. बाळंतीण अडली आहे अन् वाहन नाही, प्राण कंठाशी आले आहेत पण दुकानात औषध नाही अशी पुष्कळ उदाहरणे देता येतील. थोडक्यात काय तर पैशाने सगळे प्रश्न सुटतात हा भ्रम आहे.

उपभोग महत्त्वाचा आहे, पैसा नाही. असे असताना आपल्या देशात सर्वत्र धनाचा संचय करण्याचा आणि वाममार्गाने पैसा मिळवण्याचा प्रघात पडला आहे. आज खरोखरी वाममार्गाने मिळवलेला पैसा, दडवलेला पैसा घरोघर दिसून येतो. पैसा दडवल्यामुळे बाजारात नाणेटंचाई होते आणि व्यापारव्यवहाराला अडचण येते. व्यवहार सुरळीत चालावा यासाठी सरकारला नवीन चलन बाजारात आणावे लागते. पैसा दडवणे आणि नवीन चलन आणणे हे चक्र सुरू झाले की ते थांबवणे फार अवघड होते. परिणाम असा होतो की, बाजारातल्या वस्तू तेवढ्याच राहतात आणि पैसा वाढत जातो. रस्त्यांवर खड्डे असतात ते दुरुस्त होत नाहीत, बसगाड्यांमध्ये अतोनात गर्दी होते, पैसा असूनही गैरसोयीला सामोरे जावे लागते. वाममार्गाने खिशात आलेला पैसा उजागरीने खर्चही करता येत नाही. त्यामुळे काळ्या पैशातले व्यवहार वाढत जातात आणि उपभोग जिथल्या-तिथेच राहतो.

आज आपल्या देशात सर्वत्र हेच चित्र दिसत आहे. आज आमचे बहुसंख्य नागिरक पैसा खायचा प्रयत्न करतात. हा त्यांच्याजवळचा पैसा फार क्वचित उत्पादनात वापरला जातो. कारण तो दडवलेला असतो. या पैशाने उत्पादन वाढत नाही, केवळ चलन वाढते.

काही लोक कोट्यवधी रुपये खातात किंवा अफरातफर करतात. हे आकडे ऐकून आपल्याला अचंबित व्हायला होते. आणि मनात त्यांचा हेवाही वाटतो. पण लक्षात घ्या की त्यांच्याजवळच्या पैशाने त्यांच्या उपभोगात रत्तीमात्र फरक पडत नाही. त्यांच्याजवळचा पैसा बहुधा पैसाच राहतो. त्या पैशाचे रूपांतर वस्तूत होत नाही. पैसा लपवण्याचे स्थान कोणते असे विचाराल तर स्वित्झरलँडमधील बँका हे त्याचे उत्तर आहे. अशा काळ्या पैशाचे रूपांतर होण्यासाठी एकतर तितक्या वस्तू बाजारात हव्या, नाहीतर फार मोठे धैर्य हवे. कोट्यवधी रुपयांच्या मोटारी कोण्या एकाने अलिकडेच विकत घेतल्याची बातमी ऐकायला मिळाली. त्याला सगळ्या गाड्या आपल्या नावावर घेता आल्या नाहीत ही एक गोष्ट आणि त्याने केलेल्या पैशाचा अपहार लोकांच्या लक्षात आल्याबरोबर इतक्या गाड्या स्वतः घेणाऱ्या व्यक्तीला फरार व्हावे लागले! येथे अशा भ्रष्टाचार करून घेतलेल्या वस्तू त्याला वापरता आल्या नाहीत हे लक्षात आणून द्यावयाचे आहे. सगळ्या गाड्यांचा उपभोग काही त्याच्या वाट्याला येत नाही. जरी सगळ्या गाड्या त्याच्याजवळ असल्या तरी तो एका वेळी एकाच गाडीचा उपभोग घेऊ शकेल, सगळ्या नाही. लक्षात घ्या, गेल्या काही वर्षांत घरोघर टी.व्ही.झाले आहेत. मोबाइल ज्याला सेलफोन म्हणतात तोही सगळ्यांच्या जवळ जाऊन पोहोचला आहे. घरात वापरण्याची विजेवर चालणारी उपकरणे सगळ्या मध्यमवर्गीयांच्या घरात पोहोचली आहेत. काही मध्यमवर्गीयांच्या जवळ दोन-दोन घरे आहेत. एक मुंबईला, दुसरे पुण्याला. मुंबईला राहणारे मध्यमवर्गीय सेवानिवृत्त होण्याच्या सुमारास पुण्याला घर घेतात. काही दिवस तिथे, काही दिवस इथे असे राहतात. ही सुबत्ता पन्नास वर्षांपूर्वी त्यांच्या स्वप्नातही आली नव्हती. ही जी सार्वत्रिक सुबत्ता आज दिसते ती प्राप्त करण्यासाठी कोणीही अंगाबाहेर मेहनत केली असेल असे दिसत नाही. मग हे कसे घडले हे आता पाहू.

समजा एक शाळेतला शिक्षक आहे. तो त्याचे काम करतो. दुसरीकडे यंत्रज्ञ किंवा कामगार वेगवेगळ्या कारखान्यात काम करतात. कोणी मोटारगाड्यांच्या कारखान्यात काम करतो तर कोणी सिमेंट बनवण्याच्या. दोघेही दिवसाचे आठ तास काम करतात. त्यांच्या श्रमातून एकीकडे विद्यार्थी घडत असतात आणि दुसरीकडे मोटारगाड्या. मोटारी घडवणारे जे कारखाने असतात त्यांची रचना अशी असते की, वर्षाला एक पाच-दहा हजार गाड्या त्यांच्या कारखान्यातून बाहेर पडल्याशिवाय तो कारखाना स्वयंपूर्ण होऊ शकणार नाही. आणि असे शेकडो कारखाने आपल्या देशात आहेत. ते दुचाकी, तीनचाकी, आणि चारचाकी गाड्या भराभर तयार करीत आहेत. ही वाहने इतकी तयार होतात की ठेवायलाही जागा नसते. त्यांना ती देश-विदेशात विकावीच लागतात; आणि ती वापरणाऱ्यांची संख्या त्यामुळे भराभर वाढली आहे. याचा अर्थ असा होतो की, एखाद्या वस्तूचे उत्पादन सतत होत राहिले तर उपभोक्त्यांच्या संख्येत त्याच प्रमाणात वाढ होते. उपभोक्त्याला कोणतीही अधिक मेहनत न करता अशा वस्तूंचा लाभ होतो. वरील उदाहरण फक्त मोटारगाड्यांनाच किंवा स्कूटरलाच लागू नाही तर सगळ्याच उपभोग्य वस्तूंना लागू आहे. आज आपल्या देशात कपडा इतका तयार होतो की, त्यासाठी दुकानातील जागा अपुरी पडते. चौका-चौकात कपड्यांचे ढीग विक्रीसाठी उपलब्ध असतात.
(क्रमशः)

श्रीमोहिनीराज, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर 440010.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.