अनुभव: मुलगी दत्तक घेताना

दत्तक, स्त्री-पुरुष भेदभाव
—————————————————————————
एकविसाव्या शतकात मुलगी दत्तक घेण्याच्या एका जोडप्याच्या निर्णयावर सुशिक्षित समाजाकडून मिळालेला प्रतिसाद, आपल्याला अंतर्मुख करणारा
—————————————————————————
गाथा तिच्या घरी आली त्याला आता पुढच्या महिन्यात (ऑगस्टला) तीन वर्ष होतील. तेव्हा ती एक वर्षाची होती. या तीन वर्षांत आनंदाच्या अगणित क्षणांनी आमची ओंजळ भरलीये तिनं ! मूल दत्तक घ्यायचा निर्णय मी लग्नाआधीच – व्या वर्षी घेतला होता चतुरंगमधल्या एका लेखामुळे. लग्न ठरवताना मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला, अनिलला सांगितलं तेव्हा त्यालाही हा निर्णय आवडला. लग्न झाल्यावर आम्हाला जे मूल होईल त्याच्या अपोझीट सेक्सचं मूल दत्तक घ्यावं असं मला वाटलं. मात्र पत्रकारितेच्या सगळ्या हेक्टिक शेड्यूलमुळे नंतर माझी तीन अबोर्शन्स झाली. मूल व्हावं म्हणून कुठलीही ट्रीटमेंट घ्यायची नाही अशा विचारानंतर दत्तकप्रक्रियेला आम्ही सुरुवात केली. कागदपत्रांची पूर्तता करता करता जीव रडकुंडीला आला होता नुसता! त्यानंतर वेटिंग पिरीयड तब्बल अडीच वर्षे होता. दर वेळेस फोनाफोनी आणि निराशा. मला होणारा त्रास नवऱ्याला पाहवेना म्हणून त्याने दुसरीकडे चौकशी सुरू केली असताना त्याला एकानी सांगितलं की दोन – तीन लाख रु. देणार असाल तर बाळ लगेच मिळेल. आम्हाला अजबच वाटलं. हे म्हणजे रेशनिंग दुकानासारखं झालं. दुकानात धान्य नाही आणि काळ्या बाजारात भरपूर. आम्हाला आमचं बाळ कायद्याच्या चौकटीत राहूनच पाहिजे होतं, विकत घ्यायचं नव्हतं. त्यामुळे मी म्हटलं की कितीही त्रास झाला तरी चालेल पण असे पैसे देणार नाही. शेवटी एके दिवशी शांतपणे विचार केला की आता नाद सोडून देऊयात आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करूया. आणि आश्चर्य म्हणजे अगदी त्याच दिवशी दुपारी संस्थेतून फोन आला की बाळ बघायला या. सगळ्या प्रक्रिया पूर्ण होऊन ऑगस्टला गाथा घरी आली. सहा महिन्यानंतर बरेचसे रिपोर्ट चालत नसल्यामुळे पुन्हा काही टेस्ट्स, आणि आर्थिक कागदपत्रांची पूर्तता करावी लागली. या सगळ्या प्रक्रियेतून जात असताना आणि आत्ताही वाटतं की दत्तक घेणं ही इतकी वेळखाऊ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे की बरेचजण अर्ध्या वाटेतूनच परत फिरतात. एकतर अजूनही दत्तक मूल ही कल्पनाच बऱ्याचजणांना पचत नाही. जे पुढे जातात त्यांना या सगळ्याला तोंड द्यावं लागतं. मात्र मुलांना जन्म देणं ही आपल्याकडे किती सहजपणानं होणारी घटना आहे! ना फारसा विचार, ना कोणती प्रक्रिया. जाणीवपूर्वक विचार करून मूल जन्माला घालणारे अजूनही खूप कमी लोक आहेत.
दत्तक घेण्याचा निर्णय ते प्रत्यक्ष गाथा घरी आल्यानंतरचा काळ यात अनेक बरेवाईट अनुभव आले. मूल नसणे हा जणू काही अपराधच असे समजून लोक जे काही बोलतात आणि त्या बाईला मानसिक त्रास देतात हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यात आत्ता नाही जात. काही अनुभव मात्र शेअर करावेसे वाटतात.
1) दत्तकप्रक्रिया सुरू असताना एका मुलींच्या शाळेच्या मुख्याध्यापिका कम प्राचार्य असे म्हणाल्या की, “अग, मुलांची एवढीच हौस असेल तर एखाद्या अनाथाश्रमात जाऊन मुलांशी खेळत जा. घरी मात्र आणू नकोस बाई. दत्तक मुले फार वाईट असतात. आपली मुले ती आपलीच मुले ना शेवटी!”
2) गाथाला घेऊन येण्यासाठी आम्ही सोलापूरला निघण्याच्या आदल्या दिवशी पुण्यातल्या काही पत्रकार मैत्रिणींची मीटिंग होती. मी जातेय हे ऐकल्यावर एकजण म्हणाली, “ए अजिबात घेऊ नकोस बरं दत्तक. आमच्या ओळखीच्या एकांना खूप त्रास दिलाय दत्तक मुलाने.”उद्या बाळ घरी येतंय हे कळूनही ती असं बोलत होती.
3) माझ्या ओळखीच्या एका डॉक्टर बाईंनी तर दत्तक मूल कसे वाईटच असते याचं एक भयंकर चित्रच उभं केलं.
4) गाथा घरी आल्यावर भेटण्यासाठी खूप जण येत होते, त्यांपैकी आयटीत काम करणारं एक प्रेग्नंट जोडपं आलं. त्यातली ती म्हणाली, “वहिनी, असं उचलून आणलेल्या मुलाला माया लागते का हो?”हे खरंच तिच्या तोंडचं वाक्य आहे, एक शब्दही मनाचा नाही. मी अक्षरशः अवाक !
5) एक इंजिनियर मित्र म्हणाला, “आम्हाला बऱ्याच प्रयत्नांनी मूल झालं. एकदा दत्तक घेण्याचा विचार मनात आला होता पण सुदैवाने (?) ती वेळ आली नाही. आणि मुलगी का घेतलीस? मुलगा तरी घ्यायचा. (घ्यायचा? बाजार आहे का हा?) बरं, मुलगी तुझ्यासारखी आहे का अनिलसारखी?”अनिल गोरा आहे आणि मी सावळी. मी सांगितलं, माझ्याहून सावळी आहे, तर लगेच तो म्हणाला, “घिऊन घ्यायची मुलगी तर गोरी तरी घ्यायची ना किमान!”मी मनात म्हटलं, बर झालं, याने दत्तक घ्यायचा जास्त विचार नाही केला ते! एक मूल सुटलं अशा विचारसरणीच्या लोकांमधून.
6) एक ओळखीचे काका भेटले रस्त्यात. तेही असेच म्हणाले, “मुलगी कशाला, मुलगा तरी घ्यायचा दत्तक!”
7) माझी एक नातेवाईक व तिच्या नवरा ह्यांना तर हा निर्णय अजिबात आवडला नाही.त्यांच्या मते असे मूल आणण्यापेक्षा नातेवाईकांमधले मूल दत्तक घ्यायचे. ती भेटायला आली बऱ्याच दिवसांनी तेव्हा एकूण सगळे चांगले चित्र बघितल्यावर तिने घरी जाऊन मला फोन केला आणि मला आवडले नव्हते ते चुकीचे होते असे मोकळेपणाने कबूल केलं.
8) एका जवळच्या आजोबांनी एक वर्षभर गाथाला जवळ घेतलं नव्हतं.
9) एका ग्रुपमध्ये गाथाला स्वावलंबी करण्याच्या हेतूने मी काही बोलले होते तर एकजण पटकन म्हणाली, “तू असं वागू शकतेस कारण ती दत्तक आहे ना, तू जन्म दिला नाहीस तिला.”
10) पालक अभ्यासमंडळ सुरू झाल्यानंतर जे पालक – पुष्कळदा आले होते पण नंतर आले नाहीत त्यांना फोन करत होते तेव्हा एक दत्तक बाबा मला म्हणाले, “हे बघा आम्हाला नाही वाटत अशा अभ्यास मंडळाला यावं, आम्ही त्याला आमचं आडनाव दिलंय हेच आमच्या दृष्टीनं खूप मोठं काम केलंय.”
11) एक पत्रकार मैत्रीण म्हणाली, “मुलगी घेतलीस ते छानच ग, पण तिची जात वगैरेचं काय ग आणि तिची हिस्ट्री?”“आम्ही जात-धर्म मानत नाही आणि ती आता आमच्याच जातकुळीची झाली ना ग, तिची हिस्ट्री आता आमच्यापासूनच सुरू”, असं मी म्हटल्यावर सुद्धा तिनं तिचा जात-पातीचा हेका सोडला नाही.
हे सगळं ऐकताना माझ्यातल्या आईला खूप वाईट वाटायचं, वाटतं. किती असंवेदनशीलता! मधल्या काळात स्त्रीभ्रूणहत्येच्या इतक्या केसेस उघडकीस आल्या तेव्हाच आम्ही मुलगीच घरी येणार असं जाणीवपूर्वक ठरवलं आणि संस्थेला तसं सांगितलं. दत्तक मुलं वाईट असतात तर मग जे जे वाईट कामे करतात ती सगळीच दत्तक मुलंच असतात का? आणि अशी किती दत्तक मुलं या लोकांनी पाहिलीत? मुलांवर असं लेबलिंग करणं किती अमानुष आहे! आणि मुलांना जन्म देऊनच आई होता येतं का? मुलगा- मुलगी, काळी – गोरी, जात -धर्म अशा मनातल्या भिंती तर अजून भक्कमच आहेत.
गाथाला घरी घेऊन येण्याआधी आठ दिवस आम्ही दोघे संस्थेत रोज दिवसभरासाठी जायचो. तिच्याशी खेळायचो. त्यावेळी इतर मुलं हात पसरून मला पण घ्या म्हणून मागे लागायची, रडायची. गाथाला घरी घेऊन येताना एकीकडे आनंद आणि दुसरीकडे या सगळ्या मुलांना मी नाही न्याय देऊ शकत या जाणिवेनं इतकी रडलेय मी! आजही अनेकदा जेव्हा संस्थेत जाते तेव्हा सगळी मुलं आपल्याला स्पर्श करायला धडपडत असतात, आपल्याकडे झेपावत असतात, तेव्हाही गलबलून येतं. घरी आल्यानंतर ती बराच काळ माझ्या कुशीत झोपायची नाही, बेडच्या जवळच्या खिडकीच्या गजांना धरून झोपायची. कारण संस्थेत पाळण्यात अशीच झोपतात ना मुलं. तेव्हाही खूप वाईट वाटायचं पण तिला तिचा वेळ घेऊ दिला. आता ती मस्त कुशीत झोपते.
ती दोन वर्षांची असताना ढगांच्या गडगडाटानं घाबरायची तेव्हा तिला तिच्या काकूने सांगितलं होतं की, अजिबात घाबरायचं नाही, ढग आनंदानं टाळ्या वाजवत असतात. एकदा मी आजारी होते. आम्ही दोघी शेजारी शेजारी पडलो होतो. जोरात गडगडत होतं. मला माहीत होतं की गाथा जागी आहे ते, पण मग ती मला झोपू देणार नाही म्हणून मी तशीच पडून राहिले. अर्ध्या तासानं मी तिच्याकडे पहायला आणि तिने माझ्याकडे पहायला गाठ पडली. तेव्हा इतक्या केविलवाण्या आवाजात ती म्हणाली, “आई, धग आपल्याला काइ नाई कलत, ते ताल्या वाजवत अशतात.”माझं बाळ किती घाबरून गेलं होतं, तरीही तिनं मला उठवलं नाही, तशीच पडून राहिली आणि मी मात्र झोपण्याचं नाटक करत होते. संस्थेतही छोटी छोटी बाळ असतात, किती प्रकारचे वेगळे वेगळे आवाज त्यांच्या कानावर आदळत असतील, त्यांना भीती वाटत असेल पण त्यांना त्यावेळेस घट्ट जवळ घेणारं कोणीच नसतं, या विचारांनी आजही मला खूप गलबलून येतं. संस्थेतल्या आया, मावशा इतक्या मुलांना कशा पुऱ्या पडणार? घरात एक मूल आणि त्याच्या भोवती बरीच माणसं आणि याउलट स्थिती संस्थेत. मला वाटतं, ज्या वयात सर्वात जास्त स्पर्शाची ऊब हवी असते मुलांना त्याच वयात ती याला मुकतात. त्यामुळे स्पर्शाची खूप जास्त गरज असते दत्तक मुलांना. त्यामुळे ज्यांना काही काम करायचे असेल, वेळ असेल त्यांना मी सांगत असते की संस्थेत जाऊन मुलांशी खेळा, त्यांना जवळ घ्या, ती जास्त गरज आहे.
दत्तक मुलांमध्ये इनसिक्युरिटीचं प्रमाण जास्त असतं. एकतर गर्भावस्थे-पासूनच अस्वीकार, नाकारलेपणाची भावना. त्यात आईचा ओळखीचा आवाजच ऐकू येणं बंद होतं त्यामुळे जास्त असुरक्षित वाटतं. हे सांगताही येत नाही. ही मुलं लवकर जुळवून घ्यायला शिकतात खरं पण मनातून घाबरलेली असतात. मी हे खूप अनुभवलंय गाथाच्या बाबतीत. काही वेळा त्यामुळे थोडे वेगळे वागावे लागते या मुलांशी. अर्थात प्रत्येक मुलाचे अनुभव वेगळे.
गाथा घरी आल्याच्या दिवसापासून मी तिला गोष्टींच्या माध्यमातून ती दत्तक असल्याचं सांगतेय. एक नवरा-बायको असतात, त्यांना एके दिवशी आई-बाबा अशी कुठूनतरी हाक ऐकू येते, मग ते सगळीकडे शोधतात. शोधताना त्यांना पाखर (गाथाचं आजोळ) दिसलं. तिथं राणीआजी होती, ती त्यांना एका बाळाजवळ घेऊन गेली, ते बाळच त्यांना आई-बाबा अशी हाक मारत होतं. मग बाळ तिच्या घरी आलं. आणि सगळं घर आनंदानं भरून गेलं. ते बाळ म्हणजे गाथा! एक कोकीळ आई खूप आजारी असते, तिला तिच्या गोड बाळाला सांभाळणे शक्य नसते म्हणून ती छान आई बाबा शोधत असते तेव्हा तिला कावळा कावळी दिसतात. मग त्यांच्या घरट्यात ती तिच्या पिल्लाला ठेवते. कृष्ण यशोदा अशा काही गोष्टींच्या माध्यमातून तिला आम्ही कल्पना देतो. मधून मधून पाखरमध्ये घेऊन जातो, तिचा पाळणा दाखवतो. कधी कधी आमची परीक्षा घेणारे नाजूक प्रश्न ती विचारते तेव्हा कठोर होऊन योग्य ती उत्तरे द्यावी लागतात कारण आत्ता भावनेच्या भरात खोटे बोलणे म्हणजे तिचे भले नाही हे उमजते. गाथा ही सर्वस्वी आमचा निर्णय आणि जबाबदारी आहेच, पण जवळची सारी माणसं पण तिच्यावर खूप प्रेम करतात, तिला वेळ देतात याचा आनंद खूप मोठा आहे. अनेक चांगल्या अनुभवांची शिदोरीही सोबत आहे आमच्या या तीन वर्षांत. गर्भसंस्कार वगैरे बाबत मी संभ्रमात आहे. बाकी संवेदनशीलता तर तुमच्या रोजच्या वागण्यातून रुजते मनात मुलांच्या. त्यामुळे अनेक बाबतीत मला भरून येतं. असं संवेदनशील बाळ माझं आहे याचा माझा मलाच हेवा वाटतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.