चित्रपट-परीक्षण/ ॲज अग्ली ॲज इट गेट्स

अग्ली, अनुराग कश्यप

—————————————————————————
अनुराग कश्यप ह्या प्रयोगशील दिग्दर्शकाच्या ‘निओ-न्वार’ शैलीतील नव्या ‘सायकॉलॉजिकल थ्रिलर’चे सौंदर्य उलगडून दाखविणारा नव्या पिढीतील एका सिनेरसिकाचा दृष्टीकोन
—————————————————————————

माणूस जितका क्लिष्ट त्याहून महानगरातील माणूस थोडा अधिक क्लिष्ट. जगणं पैशाशी बांधलेलं आणि पैशानेच सुटणारं. वाट, आडवाट, पळवाट यांतला फरक इथे धूसर होत जातो आणि नाहीसाही होऊ शकतो. ‘अग्ली’या खरोखरीच ‘अग्ली’[चित्रपटाची कथा ही कुठल्याही माणसांची कथा असू शकली तरी ती महानगरातील माणसांची कथा आहे हे जाणवत राहतं.

‘अनुराग कश्यपचा चित्रपट’ ही काही चित्रपटांची विशेष ओळख आहे. ‘अग्ली’हा त्याच यादीतला चित्रपट. डार्क शेड्स उजळपणे दाखवणारा. एका लहान मुलीच्या अपहरणाने कथा सुरू होते आणि ती गुन्हेगाराच्या शोधाच्या दिशेने सरकताना शोध घेणाऱ्यांमधला ‘गुन्हेगार’समोर आणते. मुंबईत अभिनेता म्हणून जम बसवण्यासाठी स्ट्रगल करणारा राहुल (राहुल भट) त्याच्या मुलीला – कलीला – गाडीत बसवून त्याचा मित्र आणि कास्टिंग एजंट चैतन्य (विनीत कुमार सिंग) च्या घरी जातो आणि थोड्याच वेळात कली गाडीतून नाहीशी होते. इथून पुढे तिचा शोध वेगळीच रहस्ये उलगडतो,विविध पातळ्यांवर धक्के बसत जातात आणि चित्रपटाची अखेरदेखील सहसा होते तशी सुखावह होत नाही.

कली जिच्याकडे राहते आहे ती राहुलची घटस्फोटित बायको शालिनी (तेजस्विनी कोल्हापुरे), पोलीसप्रमुख असणारा तिचा मग्रूर नवरा शौमिक बोस (रोनित रॉय) आणि शौमिक व राहुलचे ताणलेले संबंध हा या तपासातील एक महत्त्वाचा कोन. दुसरीकडे अपहरणानंतर चैतन्य आणि राहुल यांचंही बिनसतं. अपहरण ही एक ‘संधी’समजून जेव्हा ही पात्रं आपापले स्वार्थ साधायला लागतात किंवा जुने हिशेब चुकते करायला लागतात तेव्हा त्यांच्या बदलत्या रूपाकडे बघताना आपण अवाक् होतो.

‘निओ-न्वार’शैलीतील हा ‘सायकॉलॉजिकल थ्रिलर’डार्क आणि ‘अग्ली’आहेच आणि तो वेगवान, खिळवून ठेवणाराही आहे. सर्व मुख्य पात्रांसोबतच भरपूर भाव खाऊन जाणारी एक भूमिका गिरीश कुलकर्णीच्या वाट्याला आली आहे. इन्स्पेक्टर जाधवच्या भूमिकेत गिरीश कुलकर्णीने कमाल केली आहे. कली हरवल्याची तक्रार घेऊन राहुल आणि चैतन्य दोघे पोलीस स्टेशनमध्ये येतात त्या दीर्घ प्रसंगात गिरीश कुलकर्णी लाजवाब काम करून जातो. हा प्रसंग चित्रपटातील एक हायलाईट आहे. आणि तो बघत असताना क्वेंटिन टारांटिनोची आठवण आल्याशिवाय राहात नाही. विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप यांच्या प्रसंग चित्रिकरणाच्या शैलीवर बरेचदा टारांटिनोचा प्रभाव आहे की काय असं वाटतं. दीर्घ संवादातून बांधलेले रेंगाळणारे सीन्स, तीव्र भावनिक उद्रेक ही टारांटिनोची खासियत. (पल्प फिक्शन, इनग्लोरियस बास्टर्ड्स या त्याच्या चित्रपटांमधून अशी बरीच उदाहरणं सापडतात.) हाच परिणाम वरील प्रसंगात साधला गेला आहे. अशा प्रकारच्या प्रसंग-चित्रीकरणाचं वैशिष्ट्य हे की भाषिक अभिव्यक्तीला आणि तपशिलात जायला पुरेपूर मोकळीक मिळते. अर्थात चित्रपटाच्या कथेशी या तपशिलाचं घेणंदेणं असेलच असं नाही, पण अशा दीर्घ संवादातून जे भाष्य ऐकायला मिळतं त्याची रंगत काही और आहे.

अर्थपूर्ण चित्रपटाची, चांगल्या कथेची आवड असणारा प्रेक्षक अशा डार्क चित्रपटाकडे कसा बघत असेल? मला वाटतं की असा एखादा डार्क चित्रपट विजय तेंडुलकरांच्या ‘गिधाडे’सारखा असतो. त्यातील उग्रपणा अंगावर येणारा असला तरी तुम्ही तिकडे बघणं टाळू शकत नाही. दुसरं म्हणजे अनुराग कश्यपने या चित्रपटातला डार्कनेस तसा सुसह्य केला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे ‘गँग्ज ऑफ वासेपूर’सारखं ‘रक्तरंजन’इथे नाही. इथे माणसांमधील स्वार्थीपणाचं, संधीसाधूपणाचं दर्शन आहे. थेट हिंसा कमी आहे.

पात्रांची निवड आणि त्यांचा अभिनय हे चित्रपटाचं मुख्य बलस्थान. तेजस्विनी कोल्हापुरेची ‘डिप्रेस्ड’शालिनी आणि रोनित रॉयचा कठोर शौमिक दोघेही उत्तम. रोनित रॉयची ही भूमिका त्याच्याच ‘उडान’मधल्या भूमिकेची आठवण करून देणारी आहे. गिरीश कुलकर्णीबरोबरच चैतन्यची भूमिका करणारा विनीतकुमार सिंगदेखील लक्षात राहतो. राहुल भटबरोबरच्या एका प्रसंगात त्याने त्याचा भावनिक उद्रेक फारच प्रभावीपणे अभिनीत केला आहे. राहुल भटनेदेखील चांगलं काम केलं आहे. अनुराग कश्यपच्या सर्वच चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका करणारे कलाकारदेखील कसून काम करतात. ‘अग्ली’देखील त्याला अपवाद नाही. विशेषतः पोलिसांच्या टीममधील चेहरे लक्षात राहतात.

सस्पेन्स थ्रिलरमध्ये ‘हू डन इट?’हा कळीचा प्रश्न. पण ‘जॉनी गद्दार’सारखा थ्रिलर चित्रपट प्रेक्षकांना माहीत असलेलं रहस्य चित्रपटातल्या व्यक्तींसमोर उलगडत जातो आणि त्या प्रोसेसमध्ये प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावतो. ‘अग्ली’मध्ये ‘हू डन इट?’चं उत्तर शेवटी मिळतं, मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो आणि मुख्य म्हणजे जे उत्तर मिळतं ते ‘थ्रिलर’चा अपेक्षाभंग करणारं असतं. पण ‘अग्ली’चं वेगळेपण यातच आहे. खरा गुन्हेगार जो असेल तो असेल, पण समोर जे काही चाललंय तेच थ्रिलरमधल्या आणखी एका थ्रिलरसारखं वाटत राहतं आणि आपण त्याच्यातच गुंतत जातो!

अनुराग कश्यपच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणून ‘अग्ली’ची गणना करता येईल. आणि हिंदीतील एक सर्वोत्तम थ्रिलर म्हणूनही!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.