जाफर आणि मी

जाफरच्या घरी रमजानचं शरबत प्यालो
त्याच्या निकाहला शाही बिर्याणी
त्याची आई माझ्याच आईसारखी
घरासाठी खपताना चेहऱ्यावरचे छिलके निघालेली
त्याच्या घराच्या भिंती माझ्याच घराच्या भिंताडासारख्या
कुठे कुठे पोपडे निघालेल्या
त्याचे बाबा हळहळतात माझ्याच बाबांसारखं
फाळणीच्या दिवसांबद्दल बोलताना
त्याच्या भाजणीतलं मीठ
माझ्याच घरातल्या डब्यातल्या मिठासारखं
त्याच्या आमटीतलं पाणी एकाच जमिनीतून आलेलं
माझ्या तुळशीवर पडलेला सूर्यप्रकाश
त्याच्या मशिदीच्या आवारातल्या
नीमच्या सळसळीतून मावळलेला
तोहि तिरुपतीला एकदोनदा व देहूला जाऊन आलेला
मीही कितीतरी वेळा खजूर व चादर ओढून आलेलो
पिराच्या दर्ग्यावर बायकोबरोबर
त्याला मला समकालीन वाटत आलेला
गालिब व तुकाराम
आपल्याच जगण्यातलं वाटत राह्यलं
मंटो व भाऊ पाध्येच्या कथेतलं विश्व
दारूच्या नशेतही वंटास बोललो नाही
कि एकमेकांच्या कौमबद्दल कधी अपशब्द

कितीतरी दिवस आतड्यातल्या अल्सरसारखी-
छळत राहिली मला
त्याच्या आईला कॅन्सर झाल्याची बातमी
आम्ही अफवा नव्हतो
आम्ही संप्रदायाची लेबलं नव्हतो
आम्ही होतो दोनवेळच्या दाल चावलची
सोय लावताना चालवलेली तंगडतोड
एकवेळची शांत झोप मिळवण्यासाठी चालवलेला
दिवसभरातला आकांत
काय माहीत मात्र काही दिवसांपासून
कोणीतरी फिरवतंय गल्लीमोहोल्ल्यांतून
जाफर व माझ्यातल्या वेगळेपणाची पत्रकं

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.