दस्तावेज: स्वामी विवेकानंद ह्यांचे मित्रास पत्र

विवेकानंद, हिंदूधर्म, इस्लाम
—————————————————————————

माझ्या प्रिय मित्रा,

मला तुम्ही पाठवलेले पत्र अतिशय भावले आणि आपल्या मातृभूमीसाठी ईश्वर शांतपणे किती अद्भुत गोष्टी रचतो आहे हे कळल्यामुळे मला अत्यंत आनंद झाला. आपण त्याला वेदान्त म्हणा किंवा अन्य कोणतेही नाव द्या, पण सत्य हे आहे की धर्म आणि चिंतनाच्या क्षेत्रातील अखेरचा शब्द आणि ज्या स्थानावरून आपणास सर्व धर्म व पंथांचे प्रेमाने अवलोकन करता येईल  त्याचे नाव आहे अद्वैतवाद. मला विश्वास आहे की भविष्यातील प्रबुद्ध मानवतेचा धर्म हाच असेल. हिब्रू आणि अरबांच्या पूर्वीचा वंश असल्यामुळे हिंदूंना ह्या मुक्कामावर इतरांपूर्वी पोहचण्याचे श्रेय घेता येऊ शकेल; परंतु वास्तवातील अद्वैतवाद, जो सर्व मानवजातीला स्वतःच्या आत्म्याप्रमाणे बघतो व तसा आचारही करतो, सर्व हिंदूंमध्ये कधीही प्रस्थापित झाला नाही.

त्याउलट, माझ्या अनुभवानुसार जर कोणा धर्माला ह्या समतेच्या दिशेने लक्षणीय वाटचाल करता आली असेल, तर तो इस्लाम व केवळ इस्लाम  हाच आहे. म्हणून माझा हा दृढ विश्वास आहे की वेदान्तातील तत्त्वे कितीही सूक्ष्म व अद्भुत असली तरी व्यवहारातील इस्लामची जोड मिळाल्याखेरीज ह्या व्यापक मनुष्यजातीच्या दृष्टीने ती पूर्णपणे बिनमोलाची ठरतील. आम्हाला सर्व मानवजातीला अशा मुक्कामावर न्यायचे आहे, जिथे वेद, कुराण, बायबल काहीएक नसेल; पण हे सर्व आम्हाला वेद, कुराण व बायबल ह्यांच्या एकतानतेतून सिद्ध करायचे आहे. मानवजातीला हे शिकवावे लागेल की सर्व धर्म हे अखेरीस त्या ‘धर्मा’चे, एकत्त्वाचे विभिन्न आविष्कार आहेत, ज्यांमधून प्रत्येकाला योग्य वाटेल तो मार्ग निवडता येईल.

आपल्या मातृभूसाठी ह्या दोन महान परंपरांचा संगम – वेदान्ताचे मस्तिष्क व इस्लामचे शरीर – हीच एकमेव आशा आहे.

सध्याचा गोंधळ व संघर्ष ह्यांवर मात करून वेदान्ताचे शिर व इस्लामची काया ल्यालेला  भविष्यातील तेजस्वी व अजिंक्य भारत माझ्या मनात आकार घेत आहे

परमेश्वर तुम्हाला मानवजातीच्या मदतीचे, विशेषतः आपल्या दीन मातृभूमीच्या मदतीचे एक साधन म्हणून घडवो, ह्या प्रार्थनेसह,

सप्रेम तुमचा, विवेकानंद

[Ref : The Complete Works of Swami Vivekananda/ Volume 6/Epistles-IInd Series/CXLII Friend]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.