पुस्तक परिचय : क्रिएटिव्ह पास्ट्स (२)

सर्जक भूतकाळ , मराठी इतिहासलेखन

इतिहास हा विषय असा आहे के जो कधी बदलत नाही, असे (नेमाडेंच्या कादंबरीतील इतिहासाच्या प्राध्यापकाला) वाटण्याचे दिवस केव्हाच संपले. मराठीतले इतिहासलेखन म्हणजे तर विविध अस्मितांनी भारलेल्या इतिहासकारांचा आविष्कार. महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वीच्या २६० वर्षांच्या इतिहासलेखनाचे जातीय-राजकीय ताणेबाणे उलगडण्याचे महत्त्वपूर्ण  कार्य  केलेल्या महत्त्वाकांक्षी पुस्तकाचा नंदा खरेंनी करून दिलेल्या परिचयाचा उत्तरार्ध.

एक इतिहासकार मात्र सरकारी नोकरीत असूनही राजवाडेपंथी होते. हे होते त्र्यं.शं. शेजवलकर. ते भाइसंमंच्या चिपळूणकरी वळणाच्या राष्ट्रवादी इतिहासाला विरोध करत; आणि सरदेसायांच्या नानासाहेब पेशव्याच्या चरित्रालाही विरोधी प्रस्तावना लिहीत. त्यांचा देशाभिमान मात्र ‘पानिपत 1761’ सारख्या ग्रंथांमधून स्पष्ट आणि सिद्ध होता. शेजवलकर सातत्याने शिवाजीच्या स्वातंत्र्याच्या प्रेरणेला पेशवाईने त्यागले अशी मांडणी करत. आणि हे सप्रमाण दाखवूनही देत.

स्वातंत्र्यानंतर भाइसंमं विरुद्ध सरदेसाई नमुन्याचे वाद संपले. पण सोबतच अकादमीय किंवा तथ्याधारित इतिहास आणि भावना जागवणारा लोकप्रिय इतिहास असे तट पडू लागले. दोन्ही पक्षांवर पुणेरी ब्राह्मणांचा पगडा होता आणि पश्चिम महाराष्ट्राबाहेरील मराठी राज्ये ‘उपविभाग’ या वर्गात ढकलली जात. उदाहरणार्थ, विदर्भातील इतिहाससंशोधन महानुभाव साहित्यावर केंद्रित होऊन त्याला धर्मपंथीय व साहित्यिकच मूल्य प्राप्त झाले, ऐतिहासिक लेखन म्हणून नव्हे.

महाराष्ट्रधर्म, हिंदुधर्म की भारतधर्म?

आधी प्रश्न होता, ‘महाराष्ट्रधर्म भक्तिपरंपरेतून आला का?’ बहुतेकांना याचे उत्तर होकारार्थी आहे हे पटत होते. मग प्रश्न उपजला ‘भक्तिपरंपरा नेमका कसा समाज इच्छित होती?’ हा. यावर मात्र दोन पूर्णपणे वेगळी उत्तरे दिली गेली. म.गो.रानडे आणि राजारामशास्त्री भागवत यांचा भर होता भक्तिचळवळ जातिनिरपेक्ष असण्यावर. त्यांना, विशेषतः भागवतांना ‘महाराष्ट्रीय’ हे वर्गीकरण जाती तोडूनच गाठता येते असे वाटत होते. अर्थातच त्यांच्या नजरेला महाराष्ट्रधर्म जात्यंतापासून सुरू होताना दिसतो. त्यांना राजकारणात शिवाजी आणि अध्यात्मक्षेत्रात रामदास या एका नाण्याच्या दोन बाजू वाटतात. विठोबाऐवजी राम पुजणारा रामदासही इतर संतांसारखाच, पण जास्त व्यवहारी, जास्त संघटनशील वाटतो.

राजवाड्यांनी रामदासाला इतर (टाळकुट्या!) संतांपेक्षा मूलतःच वेगळे मानले. त्यांनी तो मुस्लिमविरोधी, हिंदुत्ववादी असा त्या ‘काळाचा हुंकार’ होता असे मानले. आजचे अभ्यासक मानतात की राजवाड्यांनी रामदासाच्या कवनांतून वेगवेगळे तुकडे उचलून त्याची राजकीय भूमिका ‘रचली’. अगदी त्या कवनांत स्वतःच्या ओळी घुसवण्यापर्यंत ही कामगिरी गेली!

रानडे-भागवत विचार विनोबा भाव्यांनी आणिकच पुढे नेला. त्यांचा शिवाजी मक्केच्या यात्रेकरूंना त्रास देऊ नका असे सांगत एक विस्तारित, वैश्विक महाराष्ट्रधर्म पाळतो. परंतु राजवाडे, भट इत्यादींनी हा शिवाजी नाकारला. त्यांचा महाराष्ट्रधर्म हा ब्राह्मण नेतृत्वाखाली महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला मुस्लिम जोखडापासून सोडवण्याच्या हेतूनेच घडलेला आहे. रानडे-भागवत पंथालाही महाराष्ट्र संपूर्ण भारताचे नेतृत्व करेल हे पटले होते, पण त्यांचा महाराष्ट्रधर्म सर्वसमावेशक होता; काहीसा सामाजिक समतावादीही होता. याला काही आधार पुढे मार्क्सवादी लालजी पेंडसे यांनी पुरवला. त्यांच्या मते शेतकरी-कुणबी यांच्या हिंदू व मुस्लिम जमीनदारांविरुद्ध लढ्याला शिवाजीने नेतृत्व पुरवले. म्हणजे ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्रधर्म जागवावा’ ही शिवाजी-रामदास भूमिका थेट समतावादी होती!

हा सारा समतावाद टाळून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवानंतर (1893) शिवजयंतीचा उत्सव (1895) सुरू केला. आगरकरांना मराठा वीराचा राष्ट्रवाद जागवण्यास उपयोग करणे रुचत नव्हते. त्यांनी ‘सुधारका’तून प्रश्न उभा केला, “शिवाजी या प्रतीकाकडे मुसलमान, बंगाली व राजपूत कसे पाहतील?” राष्ट्र सोडा, हिंदूंनाही हे प्रतीक सर्वमान्य होणार नाही, असे आगरकरांचे मत होते.

झालेही तसेच. शिवजयंती महाराष्ट्राच्या मुंबई इलाख्यातही सर्वत्र साजरी केली गेली नाही. गुजरातेत विरोध झाला. बंगालमध्ये काही मराठी लोकांच्या उत्सवाच्या प्रयत्नाला मिळमिळीतच यश मिळाले. इतर भारतात हा ‘राष्ट्रीय’ सण कधीच पोचला नाही. [ आजही मराठवाडा व विदर्भ या महाराष्ट्राच्या क्षेत्रात शिवजयंतीला फारसा प्रतिसाद मिळत नाही. – खरे ]. देशप्रेम म्हणजे महाराष्ट्राचे प्रेम की भारताचे प्रेम? शिवाजी या प्रतीकाने उभा केलेला हा प्रश्न अजूनही महाराष्ट्राला गोंधळवत आहे.

कादंबरीनाटकांतला मर्द मराठा

शतपत्रे आणि निबंधमाला, रानडे व राजवाडे, टिळक व आगरकर, असे वेगवेगळे दृष्टिकोण मराठी मध्यमवर्गाच्या जगाच्या आकलनावर आपापली छाप पाडायला झगडत होते. इतिहासाची मांडणी कशी करावी, कशी करू नये, यावर वाद झडत होते. ही सगळी खळबळ मुख्यतः उच्चवर्णीय होती कारण इतर वर्णांमधील खळबळ अनुल्लेखाने मारली जात होती. आणि यातच इतिहासलेखनाने चिपळूणकरी नमुन्याचेच एक वेगळे वळण घेतले.

कोरडा इतिहास आता रसाळ होऊ लागला. लोकांना आपण इतिहास जगतो आहोत असे भासवणारे कादंबरीलेखन सुरू झाले. हा साहित्यप्रकार मराठीला नवीन होता, पण साहित्यिकांनी त्याचे तंत्र सहजगत्या शिकून घेतले. ‘मोचनगड’ (गुंजीकर) ही पहिली ऐतिहासिक कादंबरी लिहिली गेली. ह.ना.आपटे, नाथमाधव (पितळे), वि.वा.हडप आदी अनेकानेक लेखक अशा कादंबऱ्या लिहू लागले. शाळकरी मुलांना इतिहास शिकवायला थोर व्यक्तींची चरित्रे वाचायला देणे इष्ट आहे या भूमिकेतून चरित्रेही भरपूर प्रमाणात लिहिली जाऊ लागली व तसे करणे हा देशसेवेचा प्रकार मानला जाऊ लागला. इथेही वाचनीयता वाढवायला काल्पनिकतेचा आधार महत्त्वाचा झाला. ऐतिहासिक चरित्रे, ऐतिहासिक कादंबऱ्या, ऐतिहासिक चरित्रात्मक कादंबऱ्या असा एक प्रचंड मोठा रंगपट अस्तित्वात येऊ लागला. काही जण तळटीपा व परिशिष्टांमधून आपण खरा इतिहास लिहीत असल्याचे ठसवत, तर बहुतेक लोक कल्पनाशक्तीला बेलगाम उधळू देत.

काटेकोर इतिहास आणि कादंबऱ्या-नाटके या दोघांनाही एकमेकांची गरज होती. कादंबऱ्यांना इतिहास वैधता देत असे आणि कादंबऱ्या इतिहासाला रसाळ व राष्ट्रवादी बनवत असत. भावंडांसारखी या दोन प्रकारच्या लेखनांना एकमेकांची गरज असेच!

[सध्याच्या ‘पिंग्या’ची कथा अशीच आहे. काशीबाई पेशवे ‘खरंच’ नाचल्या असत्या का, यावर चर्चा खुंटली आहे. पण काशीबाईची, वा मस्तानीची आणि खुद्द पेशव्यांची एकूण कथा आपल्याला किती प्रमाण स्रोतांमधून उपलब्ध आहे वा ‘काल्पनिक’ आहे, यात चर्चा फार खोलात जात नाही. आपल्याला इतिहासही पाहिजे आणि कल्पनारम्य भूतकाळही. हीच आपली अत्याधुनिक स्थिती!! – प्राची देशपांडे.

देशपांड्यांना लोकसत्ता (21 नोव्हेंबर 15) मधील ‘करमणुकीचा पिंगा’ हा अग्रलेख पाठवल्यावर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. – खरे ]

पण कादंबऱ्या वाचायला काही श्रम पडतात, तर नाटके सहज पाहता येतात. 1860 ते 1960 या शतकात तीनशे तीस (तरी) ऐतिहासिक नाटके लिहिली गेली, व तीही वाढत्या वेगाने (1860 ते 1900 मध्ये 60; 1900 ते 1930 मध्ये 100 आणि 1930 ते 1960 मध्ये 170!). आणि नाटके करायला दर खेळासोबत मेहेनत करावी लागते, तर चित्रपटांत एकदाच. 1932 ते 1960 या काळात चोवीस ऐतिहासिक चित्रपटही घडले.

या सर्व कलाकृतींमध्ये काही ठरीव नमुने वारंवार भेटतात. मुसलमान नेहेमीच बायका व गायी यांच्या हव्यासातून अत्याचार करतात. कथानायक ‘एक तरुण’ असतो (बरेचदा तो निनावीही असतो!) आणि तो शिवाजी व अन्य कोणा हिंदू नरवीराने प्रेरित होऊन कथानायिका व गाई यांना लंपट, बुभुक्षित मुसलमानांच्या तावडीतून सोडवतो.

स्त्रीपात्रे महत्त्वाची असतात. आई, बहीण, प्रेयसी, पत्नी आपापल्या मुलांना, भावांना, प्रियकरांना, नवऱ्यांना देशप्रेमाकडे वळवतात. पण सोबतच स्त्रियांची वर्णने मात्र त्या काळच्या आयटेम गर्ल नमुन्याची, सौम्यशी पॉर्नोग्राफिक असत.

एका अर्थी हा ढाचा-सांचा पुस्तके, नाटके, चित्रपट यांच्या खपाऊ अर्थशास्त्राचा भाग होता. या संदर्भात 1898 च्या ‘कांचनगडची मोहना’ (कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर!) या नाटकाची जाहिरात सचोटीची आहे. ह्या नाटकाच्या वर्णनात ‘शुद्ध करमणूक’ आहे (बहुधा सुखवस्तू गृहस्थांसाठी), ‘ऐतिहासिक माहिती व नीतीचे धडे’ आहेत (बहुधा पालकांनी तरुण मुलांना नाटक पाहू द्यावे यासाठी), ‘बीभत्स प्रेमदृश्यांऐवजी पत्नीव्रत व शौर्य’ आहे (मुलींनाही परवानग्या मिळण्यासाठी), आंबटशौकिनांसाठी ‘दुर्वर्तनाचे परिणाम’ व सुधारणेची गरज आहे, आणि नोकरांसाठी देशप्रेमाचे पाठ आहेत.

या साचेबंद, ठोकळेबाज नमुन्यावर टीकाही होत असे. कोणी ‘सर्वच मुसलमानांना वाईट कसे म्हणता?’ असा प्रश्न करी. कोणी आजकाल नाटके लिहायला नाट्यगुणाची ओळख आवश्यक नसते असे म्हणत. कोणी स्वराज्य व देशप्रेम हे शब्द फारदा येतात याकडे लक्ष वेधत असे. पण या टीका होत असतानाच महाराष्ट्राचा मुख्यतः उच्चवर्णी मध्यमवर्ग मात्र आपल्या मनांत मराठ्यांच्या इतिहासाचे ठोकळेबाज चित्र कवटाळू लागला होता.

या इतिहासाने साहित्याला खाद्य पुरवण्यात एक मोठा असमतोल होता. लेखकांमध्ये, साहित्यविषयांमध्ये, स्त्रियांचे प्रमाण नगण्य होते. एक ‘अहिल्याबाई होळकरीण’ नावाचे चरित्र आणि एक ‘ऐतिहासिक स्त्रीरत्ने’ हा चरित्रसंच वगळता स्त्रियांना स्थान नव्हते. इतिहासाबरोबरच्या वर्तमानात मात्र स्त्रीच्या स्थानावर मोठाले वाद झडत होते. विधवा पुनर्विवाहावर आणि संमतिवयावर रणकंदन माजत होते. ऐतिहासिक साहित्यात मात्र स्त्री ही अबला, पुरुषांनी रक्षण करण्याची एक वस्तू येवढेच तिचे स्थान होते. अहिल्याबाई होळकर व इतर स्त्रीरत्नांच्या विश्लेषणांतही मर्यादेत राहणे, कुळाचा विचार स्वतःच्या इच्छाआकांक्षांपेक्षा महत्त्वाचा मानणे वगैरे गुणांवरच भर दिसतो.

बंगाल व तामिळनाडूतील साहित्यात ते ते प्रांत/प्रदेश भारतमातेसारख्याच स्त्रीरूपांत कल्पिले जातात. महाराष्ट्रात मात्र सर्व महाराष्ट्रधर्म अखेर स्त्रियांच्या रक्षणावर, भारतमातेच्या रक्षणावर भर देत ‘मर्द मराठा’ हे महत्त्वाचे प्रतीक घडले. [ पुढेही ‘हिमालयाच्या मदतीस सह्याद्री धावून गेला’ (1962) किंवा ‘मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले’ (संयुक्त महाराष्ट्राची चळवळ) वगैरे प्रसंगी आपले स्वराज्य कमावून नंतर मराठे सर्व भारताला मुस्लिम सत्तेपासून स्वतंत्र करायला धडपडत होते, अशीच भूमिका मराठी समाज घेत राहिला. – खरे]

या सगळ्यांत देशप्रेमाच्या संकल्पनेत ‘देश’ या संज्ञेने महाराष्ट्राचा विचार होत होता, की भारताचा? एकूणच महाराष्ट्रावरची निष्ठा भारताच्या निष्ठेशी कोणते नाते राखत होती? उत्तर आहे : मर्द मराठा व भारतमातेचे रक्षण! एकूण मराठी साहित्याने इतिहास व कल्पनाशक्ती यांच्यातीलल धूसर क्षेत्रांतून मुसलमानांना हरवणाऱ्या ओजस्वी देशप्रेमाची स्मृती मराठी मनांत रुजवली.

ब्राह्मणब्राह्मणेतर: वाद आणि एकीकरण

मराठी इतिहासलेखन आणि एकूणच सांस्कृतिक क्षेत्र बहुतेककरून ब्राह्मणांच्या हातात होते. आता मात्र ब्राह्मणेतर जाती ओजस्वी मराठी इतिहासातला आपला वाटा मागू लागल्या. सुरुवातीचे इतिहासलेखन ब्राह्मणांनी केले हे खरेच. पण चिपळूणकर-राजवाडेच नव्हे तर उदारमतवादी रानडे-भागवत, ह.ना.आपटे साऱ्यांच्या मांडण्यांमध्ये ब्राह्मणांनाच केंद्रस्थान दिले जात असे. ब्राह्मणांचे योगदान हे कळीचे मानले जात असे. विसाव्या शतकात मात्र ब्राह्मणेतर इतिहासलेखक इतर जातींचे योगदानही ठसवू लागले. भाषेचे, प्रांताचे, देशाचे, स्वाभिमानाचे पुनरुत्थान सर्वांनाच हवे होते. प्रश्न होता चिपळूणकर-राजवाडे पद्धतीने ब्राह्मणांनाच श्रेय देण्याचा.

पहिला मोठा झगडा झाला रामदासांच्या योगदानाभोवती. शिवाजी आणि रामदास यांची पहिली भेट केव्हा झाली या इतिहासावरून दोन तट पडले. ब्राह्मण वर्चस्वाचे पुरस्कर्ते सांगू पाहत की शिवाजीचे सर्वच कार्य रामदासांच्या थेट वा आडूनच्या सल्ल्यांमधून घडले. इतरांना मात्र रामदासांची राजकीय मते शिवाजीच्या ध्येयधोरणांच्या निरीक्षणांमधून घडली, असे वाटे. साधार मत असे की रामदास-शिवाजी भेट 1675 साली, शिवाजीच्या मृत्यूच्या जराशीच आधी झाली.

या वादाला एक वेगळाही आयाम आहे; मर्दानगीचा. ब्रिटिशांनी भारतातल्या जातिजमातींचे एक वर्गीकरण केले, लढवय्या जाती व इतर असे. महार, मराठा, या महाराष्ट्रीय जाती लढवय्या मानून त्यांच्या खास रेजिमेंट्स उभारल्या गेल्या. ब्राह्मणांना मात्र यातून वगळले गेले, कारण इंग्रजांचा शेवटचा मोठा झगडा पेशव्यांशी झाला होता आणि इंग्रजी आमदनीतही ब्राह्मणांमधून बरेचसे सरकारचे विरोधक येत असत. ब्राह्मणेतर ब्राह्मणांना “तुम्ही कुठे लढवय्ये आहात?” असे डिवचत असत. यावर उतारा म्हणून तालमी आणि आखाड्यांचा पुरस्कार करणारा एकुलता एक संत ब्राह्मण होता हे ठसवणे ब्राह्मणांना सोईचे वाटे. याचे एक विक्षिप्त रूप 1905 च्या रुसो-जपानी युद्धानंतर पाहायला मिळाले. जपानची शारीरिक शौर्य व नैतिक काटेकोरपणावर भर देणारी ‘बुशिदो’ (bushido) तत्त्वप्रणाली, आणि रामदासप्रणीत ‘महाराष्ट्रधर्म’ यांचे साम्य ठसवणारे लेखन केले गेले. तसाही रुसो-जपानी युद्धातला जपानचा विजय हा आशियाई देशाचा युरोपीय देशावरील पहिला विजय असल्याने सर्व वसाहती जोखडाखालील समाजांना तो प्रेरणादायी वाटत असेच.

नंतर महाराष्ट्रात उद्भवलेल्या अभिनव भारत, हिंदु महासभा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थाही काही प्रमाणात तरी रामदासी वळणाच्या होत्या. त्या ब्राह्मण-बहुलही होत्या व आहेत.

ब्राह्मण-ब्राह्मणेतरांमधील इतिहासावरचे वाद इतरही क्षेत्रांत पसरले. शिवजयंतीचे उत्सव टिळकपंथी लोकांच्या नेतृत्वात होते, पण त्यांत छत्रपती मेळे व त्या नमुन्याचे ब्राह्मणेतर मेळेही सामील झाले. यांच्यातली स्पर्धा इतकी तीव्र झाली की अधूनमधून ब्राह्मणी व ब्राह्मणेतर मेळे थेट मारामाऱ्यांपर्यंत एकमेकांशी भिडत. दोन्ही पक्ष मावळ्यांसारखे वेष करत, भगवे फेटे बांधत, भगवे झेंडे व भाले नाचवत. पण हेतू काही प्रमाणात तरी इतिहासावर हक्क सांगण्याचा असे. यातही सर्व ब्राह्मणेतर एक होते असे नव्हे. उलट स्वतःला ब्राह्मणेतर म्हणवणारेही सांगत, की आम्ही ‘त्या’ शूद्र जातींपैकी नाही. महार, मांग, रामोशी आदींशी तुलना केल्याचाच राग ब्राह्मणेतर करत असेही नाही तर कुणबी-मराठा जातसमूहापैकी श्रीमंत वर्गाचेच प्रतिनिधित्व ते करत. होता होता ब्राह्मण आणि उच्चवर्णी ब्राह्मणेतर अभिजन यांचे महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दलचे एक एकत्रित आकलन घडले. त्या आकलनात शिवाजीचे शौर्य, कर्तृत्व व मुसलमान-विरोध हे केंद्रस्थानी होते. त्यात प्रमुख कोण, दुय्यम कोण यावर मतभेद होते. मूळ कहाणी मात्र एकच होती.

मूकनायक

आणि या कहाणीत शेतकरी मराठा जाती, महार, मांग, रामोशी, भटके-विमुक्त वगैरेंना स्थान नव्हते. या जातींचे इतिहास, एकूण महाराष्ट्राच्या इतिहासातील त्यांचे स्थान वगैरेंची दखल ना औपचारिक इतिहासलेखन घेत असे, ना ऐतिहासिक साहित्य.

या मूकनायकांची मौखिक परंपरा, तोंडी इतिहास, यांतले संशोधनही मराठी माणसांनी केलेले नाही; तर गुंथर सोंथायमर या जर्मन मराठी माणसाने केले. त्याला तोंडी इतिहासात खंडोबा, म्हसोबा, बिरोबा यांचा महाराष्ट्रधर्म सापडला. शिवाजी, रामदास यांचे या देवांशी, त्यांच्या पूजकांशी असलेले संबंध कथा-कहाण्यांमधून दिसले. पण हा इतिहास मायभूमी या संकल्पनेपर्यंत गेला नाही. भाषिक-सांस्कृतिक ऐक्य, राजाश्रय, समान शत्रू, या तीन्ही निकषांवर खंडोबा-रामोशी यांना महाराष्ट्राच्या इतिहासात स्थान मिळाले नाही.

यामुळेच जातिव्यवस्थेचे सर्वांत कठोर टीकाकार बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादांपासून दूर राहिले. ऐतिहासिक प्रतीके, त्यांची राजकारणासाठीची उपयुक्तता, या साऱ्यांची जाण असल्यानेच आंबेडकरांनी समतावादी, अहिंसावादी, संघटनावर भर देणारा बौद्ध धर्म निवडला!

काही थोडे प्रश्न

प्राची देशपांड्यांच्या पुस्तकाचा परिचय संपला. त्यात वर्णन केलेल्या प्रक्रिया मात्र संपत नाहीत. आणि त्यांतून अनेक प्रश्न आपल्यापुढे उभे ठाकतात. जसे, परतंत्र समाजात स्वाभिमान जागवण्याचा चिपळूणकरी प्रयत्न शेजवलकरांना दुरभिमान वाटावा इतका य़शस्वी कसा झाला? चिपळूणकर, राजवाडे आणि  एकूणच उच्चवर्णी मराठी लोक, यांना संपूर्ण मराठी समाज का दिसला नाही? त्यांच्या आजच्या वारसांना संपूर्ण मराठी समाज का दिसत नाही?

टिळकांचा शिवजयंती उत्सव मुळात ब्राह्मणी नसणार, कारण टिळक हे तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी मानण्याचा ब्राह्मणी प्रघात होता. मग तो ब्राह्मणी ठरून त्यात ब्राह्मणेतरांचे वेगळे, विरोधी वृत्तीचे मेळे घडून नव्या-जुन्यांमध्ये रस्सीखेच होऊ लागली. आज पुण्यात शिवजयंतीला दरेक रस्त्यावर, दरेक गल्लीबोळात शिवाजीसारखे कपडे केलेले तरुण प्लास्टिक-प्लास्टर ऑफ पॅरिसच्या सिंहासनावर बसतात. पार्श्वभूमीला कोणातरी ‘शिवशाहिरा’च्या टेप्स-सीडीज वाजत असतात. शिवाजी हे प्रतीक असे हास्यास्पद करणाऱ्यांना ही विकृती का जाणवत नाही? या शिवजयंती उत्सवांत कोणत्या अर्थी लोकसहभाग असतो?

खऱ्या अर्थी लोकसहभाग आज कुठे दिसतो?

हे प्रश्न महत्त्वाचे वाटावेत यासाठी काय करावे?

नाहीतर बिल्डरांशी ‘लढायला’ शिवाजीराजे भोसले ‘बोलत’ राहील  आणि ‘अजिंक्य योद्धा’ असलेल्या थोरल्या बाजीरावांपुढे ‘पिंगा’ घातला जातच राहील! अखेर बहुतांश मराठी माणसांची इतिहासाची ‘आठवण’ आणि स्वतःची ओळख कितपत खरी? जर ती फारशी सच्ची नसेल, तर त्याचे दुष्परिणाम कोणते व किती?

601, ट्यूलिप, 187, मश्रुवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर-440010.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.