प्रतिसाद

तलवार दाम्पत्त्य,आरुषी व हेमराज, चित्रपट
—————————————————————————–
फेब्रुवारी महिन्याच्या ‘आ सु’ च्या अंकात धनंजय मुळी ह्यांचा ‘तलवारच्या निमित्ताने’ हा लेख वाचला. त्यामध्ये त्यांनी गतेतिहासपरिणाम ह्या संकल्पनेचे मानसशास्त्रीय विवेचन करून एका वेगळ्या दृष्टिकोनातून सिनेमाकडे पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आज काही काळ गेल्यानंतर, काही गोष्टी घडून गेल्यावर आपल्याला वाटते की हेच तर आपण आधी म्हटले होते. परंतु वास्तविक तेव्हा आपल्याला तसे वाटलेले नसते. एवढेच नव्हे तर तेव्हा तसे वाटले नव्हते हे आपण आज विसरूनही गेलेलो असतो.
हे तथ्य ‘तलवार’ सिनेमा ज्यावर आधारित आहे त्या घटनेला लागू करून ते म्हणतात की–आरुषी व हेमराज ह्यांचे हत्याकांड घडल्यानंतर पोलिसांनी अगदीच शून्यापासून सुरुवात केली होती. म्हणून त्यांची तपासाची दिशाच चुकीची होती असे म्हणता येणार नाही. तलवार सिनेमामध्ये पोलिसांची पात्रे व्यंग्यात्मक पद्धतीने मांडून त्यांची टर उडवण्यात आली आहे याबद्दल ते सिनेमाला दोष देतात. आरुषी खटल्याची कथाही त्यांनी लेखाच्या सुरुवातीलाच नमूद केली आहे. त्याचे शेवटचे वाक्य आहे, न्यायालयाने तलवार दांपत्याला शिक्षा ठोठावली. मला वाटते त्यापुढे ‘तलवार दांपत्य आजही जन्मठेपेची सजा भोगत आहे.’ हे वाक्य असायला हवे होते. कारण शिक्षा ठोठावणे, ती प्रत्यक्ष भोगणे, ती अनेक वर्षे भोगत राहणे, त्यातून कोणतीही सूट न मिळणे हे वेगवेगळे टप्पे आहेत आणि त्यातून कोणत्याही टप्प्यावर सूट मिळण्याने जो काही दिलासा मिळतो, तो त्यांना मिळालेला नाही.
मुळी ह्यांनी ‘तलवार’ची तुलना अकीर कुरोसावा ह्यांच्या ‘राशोमान’ चित्रपटाशी केली आहे.“खटल्याच्यादोनबाजूदाखवतानाअकीरकुरोसावायाप्रसिद्धदिग्दर्शकाच्या ‘राशोमान’ चित्रपटाचीस्टाईलदिग्दर्शकवापरतात. यास्टाईलमधेतीतीबाजूमांडतानाव्यक्तिरेखांनात्याप्रसंगांमध्येत्यात्या दृष्टिकोनातून चित्रितकेलेजाते. ….राशोमानमधील निरीक्षकाचा नि:पक्षपातीपणा दुर्दैवाने ‘तलवार’ दाखवत नाही. ‘तलवार’मध्ये निवेदनातील तोल तलवार दांपत्याकडे झुकला आहे… नि:पक्षपाती म्हणवून घ्यायचे आणि हलकेच एका बाजूला झुकते माप द्यायचे, ह्यामुळे चित्रपटाचा दर्जा खालावला आहे.
परंतु ही अशी तुलना करण्याचे कारण काय? चित्रपट म्हणून ते दोघे वेगळ्याच जातकुळीचे आहेत. ‘राशोमान’चा विषय एका घटनेकडे पाहण्याचे दृष्टिकोन कसे वेगवेगळे असू शकतात व त्यांना तेच कसे खरे वाटतात हे सांगण्याचा आहे, तर ‘तलवार’ हा एका सत्यघटनेवर आधारलेला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्या टिप्पणीमध्ये तशी स्पष्ट नोंद आहे. सत्यघटनेवर चित्रपट वा नाटक काढणे हे एक वेगळे तंत्र आहे. अलिकडे तर त्याचा एक वेगळा प्रवर्ग बनू पाहात आहे एवढे जास्त हिंदी सिनेमे ह्या प्रकारचे आले. उदा. नीरजा भानोतच्या शौर्यगाथेवरील ‘नीरजा’, जेसिका लाल खून खटल्यावर आधारित ‘No one killed Jessica’, गुजरात दंगलीवरचा ‘फिराक’. नीरजा भानोतची जी कथा आज आपल्याला माहीत आहे, ती तशीच चित्रपटात दर्शविली आहे. तेथेही तीधैर्यशील नायिकाच आहे.No one killed Jessica मध्येही प्रसारमाध्यमांनी पुढे आणलेले (म्हणजेच जनमानसात रुजलेले) तथ्य आणि चित्रपटातील आशय हे मिळतेजुळतेच आहेत. ‘तलवार’ चित्रपटाचे कार्य मात्र याहून अधिक कठीण आहे. “त्या आरुषी खून खटल्याचे काय झाले हो?” म्हणून कोणी विचारले, तर त्याला “तिचे नोकराशी असलेले प्रेमसंबंध तिच्या वडिलांना दिसले म्हणून त्यांनी रागाच्या भरात दोघांचा खून केला” हेच उत्तर ऐकावे लागते, म्हणजे निदान हा चित्रपटयेण्यापूर्वीपर्यंत तरी ऐकावे लागत होते. त्या तेरा चौदा वर्षाच्या मुलीच्या चारित्र्याची विटंबना तिच्या अकाली मृत्यूनंतरही संपलेली नाही. आरुषीच्या ८४ वर्षांच्या आजोबांनी अलीकडेच फेसबुकवर लिहिले,“माझ्या घरात, माझ्या अंगाखांद्यावर मोठी झालेली माझी अत्यंत लाडकी नात एक दिवस सकाळी तिच्याच बिछान्यात मृतावस्थेत आढळली तेव्हा आम्हाला केवढा धक्का बसला! ह्या दुःखावर कुरघोडी करायला, तिच्यावर जिवापाड प्रेम करणारे तिचे आईवडील – माझी कन्या नूपुर व जावई राजेश ह्यांना त्या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली….. मी हयात असेपर्यंत त्यांना ह्या कैदेतून मुक्त झालेले पाहू शकणार नाही. फक्त न्यायासाठीची लढाई पुढे सुरू राहील एवढीच आशा व अपेक्षा आहे.” तलवार सिनेमा निघाल्यावर त्यांना हे लिहिण्याचे धैर्य झाले हे उघड आहे.
खटल्यासंबंधीचाएकप्रमुखमुद्दाअसाकीपोलिसांच्याअगदीपहिल्याटीमकडूनपुरावेगोळाकरण्यातखूपजास्तत्रुटीराहूनगेल्याहोत्या. जरहेन्यायवैद्यकीय (forensic) पुरावेव्यवस्थितजपलेगेलेअसते,तरतपाससोपाहोऊनगेलाअसता (आणिहाचित्रपटहीबनलानसता).
खरे आहे. पण ते तसे झाले नाही. तलवार दांपत्याला तडकाफडकी अटक करण्यात येते आणि त्यांचा आक्रोश लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून चित्रपट काढावा लागतो, हे भारतीय समाजाचे व तेथील पोलीस-न्यायव्यवस्थेचे दुर्भाग्य नव्हे काय? हा चित्रपट काढण्याची वेळ यायला नको होती असेच मलाही वाटते, पण काय करणार!
ह्या प्रकरणातील तपास जेव्हा सीबीआयकडे हस्तांतरित केला तेव्हा वेगळ्या प्रकारचे काही निष्कर्ष त्यांच्या हाती लागले. त्यानंतर तो दुसऱ्या एका टीमकडे सोपवण्यात आला. तेव्हा मात्र, तोपर्यंत सापडलेले निष्कर्ष अमान्य करून पुन्हा एकवार तलवार दांपत्याच्या विरोधात फिरविण्यात आले. आता प्रश्न असा आहे की ह्याला गत अवलोकन परिणाम कसा लागू करणार? ‘तलवार’ पाहताना अकीर कुरोसावाच्या दिग्दर्शनाचा प्रभाव कोणाला जाणवूही शकतो, पण तो व्यक्तिसापेक्ष आहे. ज्यांना राशोमान माहीत नाही, अशा सर्वसामान्य हिंदी प्रेक्षकांसाठी, तो एका घटनेची लपलेली बाजू प्रकाशित करण्यासाठी तयार केलेला सिनेमा आहे.
शंभर गुन्हेगार सुटले तरी चालेल, परंतु एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये हे ब्रीद असणाऱ्या आपल्या न्यायव्यवस्थेने पुराव्याअभावी इतरांना सोडले असताना, पुरावे नसतानाही तलवार पतिपत्नींना का दोषी ठरविले ह्या प्रश्नाचे एक उत्तर चित्रपटाने दिले आहे. उच्च व उदात्त तत्त्वे मिरवणारी आपली न्यायव्यवस्था अनेक खुज्या लोकांनी व त्यांच्या खुज्या कृतींनी पोखरलेली तर आहेच, पण त्याशिवायही ती कायदे, नियम ह्यांच्या बंधनांत अडकलेली आहे. ह्या व्यवस्थेला तथ्ये समजतात, पण सत्यापर्यंत पोहोचता येते काय? पुराव्याने शाबित करता येते, पण पीडिताला न्याय मिळवून देता येतो काय? हे खरे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न पडणे हे चांगल्या कलाकारांचे लक्षण आहे. आरुषी प्रकरणातील खरा गुन्हेगार कोण हे आज अस्पष्ट असले, तरी येणारा काळ ह्याचे उत्तर देईल. आणि ते जर हेच (चित्रपटाने दिलेले) असले, तर “२०१६ साली निघालेला तलवार हा चांगल्या दर्जाचा चित्रपट होता” अशी नोंद इतिहासाला घ्यावी लागेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.