मुली

आता आणखी वाट नाही पाहणार मुली
त्या घरातून बाहेर पडतील
बिनधास्त रस्त्यांवरून धावतील
उसळतील, कुदतील, खेळतील, उडतील
मैदानांतून निनादतील त्यांचे आवाज
आणि हास्यध्वनी   

मुली थकल्याहेत
रांधावाढाउष्टीकाढा करून व रडून   
त्या आता नाही खाणार मार
नाही ऐकून घेणार कोणाचेही टोमणे
आणि रागावणे

ते  दिवस, जेव्हा मुली
चुलीसारख्या जळायच्या
भातासारख्या रटरटायच्या 
गाठोड्यासारख्या कोपऱ्यात पडून राहायच्या
केव्हाच संपले 

आता नाही ऐकू येणार दारांमागचे त्यांचे हुंदके
अर्धस्फुट उद्गार किंवा भुणभुण
आणि आता भिजणार नाहीत उश्यादेखील

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.