ऱ्होड्सचे पतन होताना

ऱ्होड्स, इतिहासाचे पुनर्लेखन, द. आफ्रिका , वर्णद्वेष
—————————————————————————–

राष्ट्रवाद ही सतत प्रगमनशील संकल्पना आहे. प्रत्येक राष्ट्राच्या, राष्ट्रवादाचे कल्पनाविश्व वेगवेगळे असते व प्रत्येक राष्ट्रामध्ये यासंदर्भात स्थित्यंतरेही  होत असतात. इतिहासाच्या पुनर्लेखनाच्या काळात एकेकाळी आदरस्थानी असणाऱ्या पण आता व्यापक समुदायाच्या रागद्वेषाचे लक्ष्य बनलेल्या प्रतीकांचे काय करायचे? ह्या प्रश्नाकडे डोळसपणे बघायला शिकविणारा हा लेख ..

—————————————————————————–

अद्भुतरम्य इतिहास

19 वे आणि 20 वे शतक राजकीय नेत्यांच्या आणि महापुरुषांच्या (Heroes) पुतळ्यांच्या उभारणीचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. विशेषत: 19 व्या शतकात उदयास आलेल्या अद्भुतरम्य (Romanticist)  इतिहासलेखन-परंपरेमुळे या प्रक्रियेला गती मिळाली. अद्भुतरम्य इतिहासलेखन हे 17 व्या नि 18 व्या शतकात प्रभावी असलेल्या बुद्धिप्रामाण्यवादी (Enlightened) इतिहासलेखनाला एक प्रतिक्रिया म्हणून पुढे आले. बुद्धिवादी इतिहास हा अत्यंत विवेकवादी दृष्टिकोनातून लिहिला गेला होता. परंतु अद्भुतरम्य काळात बुद्धिप्रामाण्याऐवजी कल्पनाशक्तीला महत्त्व दिले गेले. इतिहासकार शेखअली यांच्या मते कलात्मकतापूर्ण, चमत्कारिक, नयनरम्य, काव्यात्मक, भावनात्मक, आदर्शवादी आणि बेताल संकल्पनांना यावेळी इतिहासलेखनात स्थान मिळाले. बुद्धिवादाऐवजी आता भावनात्मकता हा इतिहासलेखनाचा पाया झाला. अद्भुतरम्य इतिहासाच्या क्षेत्रात कार्लाईल मैकॅाले, फ्रॉऊड आणि कार्ल मार्क्स ही प्रमुख नावे. त्यांपैकी कार्लाईल हा या परंपरेतील सर्वांत प्रसिद्ध इतिहासकार.  त्यांचा The French Revolution हा ग्रंथ अद्भुतरम्य इतिहासाचे उत्तम उदाहरण आहे. त्याने लिहिलेल्या On Heroes and Hero Worship या ग्रंथाने आधुनिक काळात व्यक्तिपूजेचा पाया घातली. या ग्रंथात तो लिहितो. “इतिहास म्हणजे दुसरे तिसरे काही नसून केवळ महापुरुषांचे चरित्र असते.” त्यांच्या मते महापुरुषच इतिहास घडवत असतात.

अद्भुतरम्य इतिहास हा मध्ययुगीन मानसिकतेतून लिहिला गेला. 18व्या शतकाच्या शेवटी सुरू झालेला राष्ट्रवादांचा कालखंड आणि अद्भुतरम्य इतिहासलेखन, परंपरा यांचा अन्योन्यसंबंध आहे. या इतिहासलेखनाने राष्ट्राराष्ट्रांमधील स्पर्धेला आणि आक्रमक राष्ट्रवादाला चालना दिली. या परंपरेतूनच रुड्यर्ड किपलिंग याने ‘श्वेत माणसावरील ओझे’ (Write Man’s Burden) हा सिद्धान्त मांडला. त्याने लिहिले की, अश्वेत लोकांवर राज्य करणे हे विधिलिखित आहे. नाझीपक्षाने आपल्या वांशिक श्रेष्ठत्वाचा सिद्धान्त या विचार-प्रवाहातूनच मांडला.

18 व्या शतकाच्या शेवटी अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धापासून सुरू झालेल्या राष्ट्रवादाच्या कालखंडात राजकीय नेत्यांच्या आणि महापुरुषांच्या सार्वजनिक पुतळ्यांच्या उभारणीला वेग आला. युरोपीय सत्तांनी त्यांच्या वसाहतींमध्ये-देखील स्वत:चे श्रेष्ठत्व वसाहतींमधील जित लेाकांच्या मनावर बिंबवण्यासाठी सार्वजनिक पुतळ्यांची उभारणी केली. अलीकडे वादात सापडलेल्या सेसिल ऱ्होड्स यांच्या केपटाऊन विद्यापीठ, साऊथ अफ्रिका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ, इंग्लंड येथील पुतळ्यांची उभारणी याच कालखंडात करण्यात आली.

सेसिल ऱ्होड्स

सेसिल जॅान हेड्स 1853-1902 हे अफ्रिकेच्या वसाहतवादी इतिहासातील महत्त्वाचे नाव. ब्रिटिश उद्योजक, खाणसम्राट आणि राजकारणी असलेले ऱ्होड्स, उत्तर व्हिक्टोरियन कालखंडातील ब्रिटनचे एक महापुरुष म्हणून गणले जात कारण त्यांनी सर्वसामान्य मनुष्याप्रमाणे विवाह करून संसार न थाटता देशसेवेसाठी आपले आयुष्य वाहिले. आपल्या अलौकिक बुद्धिचातुर्यातून व उद्यमशीलतेतून त्यांनी अफ्रिकाखंडातील हिश्श्यासाठी, युरोपियन राष्ट्रामध्ये चाललेल्या लांडगेतोडीमध्ये इतर स्पर्धकांना मागे टाकले व ब्रिटनचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांच्या ब्रिटिश साउथ अफ्रिकन कंपनीने अफ्रिकेतील ऱ्होडेशिया (आजचे झिम्बाब्बे आणि झांबिया) या भूभागावर अधिकार स्थापन केला. ऱ्होड्सने स्थापन केलेली एक कंपनी आजही हिऱ्याच्या खननात व व्यापारात जगात अग्रगण्य आहे. ब्रिटिश साम्राज्याचे कट्टर समर्थक ऱ्होड्स, ब्रिटिशवंशीय लोकांना सर्वश्रेष्ठ समजत आणि जगातील जितका जास्त भाग ब्रिटिश साम्राज्याखाली येईल, तितका तो मनुष्यजातीसाठी कल्याणकारक होईल, असे त्यांचे ठाम मत होते. अफ्रिकेतील मूळ अश्वेत लोकांना ते रानटी समजत. 1890 ते 1896 दरम्यान ऱ्होड्स आताच्या साउथ अफ्रिकेतील केप टाऊन वसाहतीचे पंतप्रधान होते.

शिक्षणाचे व ज्ञानाचे चाहते असलेल्या ऱ्होड्सने आपले महाविद्यालयीन शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठातील ओरीअल महाविद्यालयात पूर्ण केले. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शैक्षणिक परंपरेचा त्यांना अभिमान होता. ऱ्होड्सचे 42 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्युपत्रानुसार संपत्तीतील काही भाग शैक्षणिक कार्यासाठी देण्यात आला. त्यातूनच ऱ्होड्स ट्रस्ट या शैक्षणिक धर्मादायसंस्थेची स्थापना करण्यांत आली. मृत्युपत्रातील तरतुदींनुसार ऑक्सफर्ड विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गैरब्रिटिश विद्यार्थ्यांसाठी पहिली आंतरराष्ट्रीय आणि प्रतिष्ठेची ऱ्होड्स शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली. जगभरातील 14 विभागांमधून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येते. 1977 नंतर महिलांनाही ही शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात झाली. 1991 नंतर अफ्रिकेतील अश्वेत विद्यार्थ्यांना देखील यांचा लाभ मिळू लागला. आज ऱ्होड्स ट्रस्टच्या ट्रस्टींमध्ये इन्फोसिसचे के. नारायणमूर्ती आणि बोत्स्वावानाचे माजी राष्ट्राध्यक्ष फेस्टस मोगै यांचाही समावेश होतो. ऱ्होड्स यांच्या वांशिक श्रेष्ठत्वाच्या विचारसरणीच्या अगदी विरुद्ध मूल्यांवर आज ऱ्होड्स ट्रस्ट कार्यरत आहे.

ऱ्होड्सचे पतन

सध्या चर्चेत असलेल्या  “Rhodes Must Fall” (RMF) आंदोलनाची सुरुवात साउथ अफ्रिकेतील केपटाऊन विद्यापीठात झाली. आंदोलनकर्त्यांनी विद्यापीठ परिसरातील ऱ्होड्सचा ब्रॅाझ पुतळा हटविण्याची मागणी केली. 9 मार्च 2015 रोजी आंदोलनकर्त्यांनी या पुतळ्यावर मानवी विष्ठेचा अभिषेक केला. 9 एप्रिल 2015 रोजी विद्यापीठ-परिषदेने हा पुतळा हटविण्याचा निर्णय बहुमताने घेतला. या बैठकी दरम्यान आंदोलनकर्त्यांनी “One Settler One Bullet” अशा हिंसक घोषणा दिल्या. शेवटी हा पुतळा हटविण्यात आला. या घटनेचे महत्त्व फक्त पुतळा हटविण्यापुरते मर्यादित नाही. ज्या पद्धतीने तो हटविण्यात आला. त्यातून आजच्या दक्षिण अफ्रिकेतील राष्ट्रवादाच्या संकल्पनेत होत असलेल्या स्थित्यंतराची जाणीव होते.

राष्ट्रवादाचे कल्पनाविश्व

राष्ट्रवाद ही सतत प्रगमनशील संकल्पना आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये यासंदर्भात स्थित्यंतरे होत असतात. बेनेडिक्ट अँडरसन यांच्या मते, “राष्ट्र म्हणजे मर्यादित, सार्वभौम आणि राजकीय असा एक काल्पनिक समूह”. प्रत्येक राष्ट्राच्या राष्ट्रवादाचे कल्पनाविश्व वेगवेगळे असते. ज्या द्वेषाच्या, संतापाच्या भावनेतून ऱ्होड्सचा पुतळा हटविला गेला, त्यातून आजच्या साऊथ अफ्रिकन राष्ट्रवादाच्या कल्पनाविश्वात पूर्वी शासक असलेल्या परंतु आता सर्वसामान्य व अल्पसंख्यक नागरिक असलेल्या श्वेत नागरिकांचे व त्यांच्या ऐतिहासिक वारश्याचे स्थान काय या संदर्भात काही प्रश्न निर्माण होतात. याठिकाणी भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान उद्भवलेल्या दोन विवादांचा उल्लेख करावासा वाटतो. पहिला विवाद लॅार्ड जॅान लॅारेन्स, जे 1864 ते 1869 दरम्यान भारताचे व्हाईसरॅाय होते, त्यांच्या लाहोर येथील सार्वजनिक पुतळ्यासंबधी होता. एका हातात पेन आणि एका हातात तलवार असलेला लॅारेन्स यांचा पूर्णाकृती पुतळा, त्यांच्या चेहऱ्यावरील मगरूर भावासकट लाहोरच्या प्रसिद्ध चौकात उभा होता. या पुतळ्याच्या खाली एक प्रश्नात्मक वाक्य लिहिले होते, “Will you have the pen or the sword?” म्हणजे जनतेला असा प्रश्न विचारण्यात आला होता की त्यांना लेखणीचे शासन हवे आहे की तलवारीचे? लाहोरवासीयांच्या मनात निर्माण झालेल्या राष्ट्रवादाच्या भावनेमुळे हा पुतळा त्यांच्या डोळ्यात सलू लागला. 1921 साली लाहोर म्युनिसिपालटीने हा पुतळा हटविण्याचा ठराव पारित केला. परंतु ब्रिटिश नोकरशाहीच्या विरोधामुळे, त्यावेळी तो हटवता आला नाही. दुसरा विवाद कर्नल जेम्स नील याच्या चेन्नईमधील आताच्या अन्नासल्लाई भागातील पूर्णाकृती पुतळ्यासंबधी होता. “Butcher of Allahabad” म्हणून भारतीय इतिहासात कुप्रसिद्ध असलेला कर्नल नील त्यावेळी ब्रिटिशांसाठी एक महापुरुष होता. 1857 चा उठाव दडपण्यामध्ये त्याने महत्त्वाचे योगदान दिले आणि आपल्या प्राणांची आहुती दिली. उठावाच्या वेळी कानपूरकडे कूच करताना वाटेत गावेच्या गावे जाळून गावकऱ्यांना फासावर लटकवण्याचे क्रौर्य त्याच्या नावावर जमा आहे. 1927 साली मद्रास लेजिस्लेटिव्ह काउंसिलमध्ये नीलचा पुतळा हटवण्याचा ठराव मांडण्यात आला. या दोन्ही विवादांच्या वेळी गांधींनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. गांधींच्या मते हे दोन्ही पुतळे गुलामगिरीचे व दहशतवादाचे प्रतीक होते. जरी मागील पिढीने या पुतळ्यांसंबधी आक्षेप घेतला नव्हता, तरी गांधीच्या नेतृत्वाखाली विकसित होत गेलेल्या राष्ट्रवादाच्या कल्पनाविश्वात ह्या दोन्ही पुतळ्यांचे अस्तित्व राष्ट्रीय आत्मसन्मानाच्या विरुद्ध होते. या दोन्ही प्रकरणांत गांधीनी अहिंसात्मक आंदोलन चालवून विरोधकांचे मन:परिवर्तन करण्यास सांगितले.

आज कर्नल नीलचा तो पुतळा चेन्नईतील मद्रास म्युझिअमच्या तळघरात उभा आहे, तर लॅारेन्सचा पुतळा इंग्लंडला नेण्यात आला. आज तो फॉयल अँड लंडनडेरी महाविद्यालयाच्या प्रांगणात उभा आहे. लॅारेन्सच्या पुतळ्याला लाहोरवासीयांचा विरोध हा ब्रिटिशसाम्राज्यवादविरोधी लढ्याचा एक भाग होता. परंतु लाहोरमधीलच दुसऱ्या एका पुतळ्याचे प्रकरण जरा वेगळे आहे. हा पुतळा एकेकाळी लाहोरवासीयांना आदरणीय असलेल्या लाला लाजपत राय यांचा होता. हा पुतळादेखील लाहोरच्या त्याच सुप्रसिद्ध चौकात उभारण्यात आला होता. लाहोरमध्ये सायमन कमिशनविरोधी मोर्चाचे नेतृत्व करताना ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात जखमी होऊन लालाजींचा मृत्यू झाला होता. परंतु 1947 साली झालेल्या फाळणीमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन नवनिर्मित राष्ट्रांच्या राष्ट्रवादाच्या कल्पनाविश्वाचीही फाळणी झाली. नवनिर्मित पाकिस्तानमध्ये लालाजींच्या पुतळ्याला स्थान नव्हते. लाहोरमधील तो पुतळा हटवण्यात आला.

राष्ट्रवादाच्या कल्पनाविश्वातील स्थित्यंतराचे एक अत्यंत समर्पक उदाहरण म्हणजे आतापर्यंत वर्णद्वेषविरोधी आंतरराष्ट्रीय लढ्याचे एक प्रेरणास्थान असलेल्या गांधींच्या जोहान्सबर्ग येथील एक पुतळ्याचे. 13 एप्रिल 2015 रोजी जेव्हा पंतप्रधान मोदी जर्मनीमध्ये गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करत होते, त्याच दिवशी साऊथ अफ्रिकेतील जोहन्सबर्गमध्ये एका समूहाने गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली. याप्रसंगी “वर्णद्वेषी गांधींचे पतन झालेच पाहिजे’‘  अशी घोषणा देण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी गांधींच्या विचारांमध्ये आलेल्या स्थित्यंतरांकडे लक्ष न देता, त्यांनी साऊथ अफ्रिकेत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात मूळ अफ्रिकन अश्वेतांबद्दल व्यक्त केलेल्या काही मतांबद्दल, त्यांना सरळ वर्णद्वेषी ठरविले.

साऊथ अफ्रिकेतील यशस्वी आंदोलनानंतर आता Rhodes Must Fall आंदोलनाचे लोण ऑक्सफर्ड विद्यापीठात पोहोचले आहे. मागे उल्लेख केल्याप्रमाणे ऑक्सफर्ड येथील ओरीअल महाविद्यालयात ऱ्होड्सचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले होते. येथील, विशेषत: अफ्रिकन विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील ऱ्होड्सचा पुतळा हटवण्याची मागणी केली आहे. आंदोलनाचे नेतृत्व नटोकोझो क्वाबे हा अफ्रिकन अभ्यासक  करत आहे. विशेष म्हणजे त्याला ऱ्होड्स शिष्यवृत्ती मिळाली आहे. ओरीअल महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची योग्य दखल घेतली आहे. अफ्रिकन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाप्रती संवेदनशीलता दाखवत त्यांनी महाविद्यालयपरिसरातील ऱ्होड्सचा गौरव करणारी कोनशिला काढून टाकली आहे. तसेच, ऱ्होड्सच्या पुतळ्याखाली स्पष्टीकरणासाठी एक सूचना लावली आहे. त्यात लिहिले आहे की, “ऱ्होड्सने शैक्षणिक क्षेत्रासाठी दिलेल्या आर्थिक देणगीच्या ऐतिहासिक सत्याची दखल घेऊनदेखील, महाविद्यालय कोणत्याही प्रकारे त्यांच्या विवादास्पद  मतांकडे आणि कृत्यांकडे दुर्लक्ष करीत नाही किंवा त्यांचा गौरव करीत नाही.” परंतु महाविद्यालय अधिकाऱ्यांनी तो पुतळा हटवण्यास नकार दिला आहे. तरीदेखील RMF आंदोलन चालूच आहे आणि जगाचे लक्ष वेधून घेत आहे.

उपसंहार

प्रश्न हा आहे की ऱ्होड्सचा पुतळा हटवल्याने इतिहास कसा पुसला जाणार? तेव्हा खरी समस्या निर्माण होते, जेव्हा ऐतिहासिक व्यक्तींचे आजच्या मानकांवर मूल्यमापन केले जाते. ऱ्होड्स हे उत्तरव्हिक्टोरियन काळाचे अपत्य होते. फक्त ऱ्होड्स नव्हे तर ब्रिटेनमधील एक संपूर्ण पिढी या काळात साम्राज्यवादी प्रचारतंत्रामुळे संमोहित झाली होती. अफ्रिकेवर वसाहतवाद लादून अफ्रिकन जनतेचे शोषण करणारे ऱ्होड्स हे जसे एक वास्तव आहे, तसेच, आपल्या मृत्युपत्राद्वारे शिक्षणासाठी मोठी रक्कम देणगी देणारे ऱ्होड्स हेदेखील एक वास्तव आहे. साऊथ अफ्रिकेच्या आधुनिकीकरणातील त्यांच्या बऱ्यावाईट परिणामांसह ऱ्होड्सचा वाटा नाकारता येत नाही. त्यांचे ऑक्सफर्ड विद्यापीठातील शैक्षणिक क्षेत्रातील योगदानदेखील नाकारता येत नाही. ऱ्होड्सला सरसकट एक खलनायक म्हणून रद्दबातल ठरविता येईल काय? तसे करणे म्हणजे ऐतिहसिक वास्तव नाकारण्यासारखे होईल. आपल्याला इतिहास त्यातील तथाकथित नायक आणि खलनायकांसह स्वीकारावा लागेल. कारण एका समूहासाठी नायक असलेली एक ऐतिहासिक व्यक्ती दुसऱ्या समूहासाठी खलनायक ठरते. इतिहासाचे विश्लेषण आणि ऐतिहासिक व्यक्तीचे मूल्यमापन स्थलकालपरत्वे बदलत राहणार. हा बदल आपण डोळसपणे स्वीकारला पाहिजे. त्यासाठी इतिहासाची पाने जपली पाहिजे. संतापाच्या व द्वेषाच्या भरात ती फाडून टाकल्याने  प्रश्न सुटणार नाही. ऱ्होड्सचा पुतळा हटवल्याने, एक वेळेस ऱ्होड्स संपल्याचा भ्रम होऊ शकतो. परंतु आजही युरोप, अमेरिकेतील बऱ्याच श्वेत नागरिकांच्या मनात वंशश्रेष्ठत्वाच्या स्वरूपात राहणाऱ्या ऱ्होड्सचे काय करणार? ई.एच. कार यांनी म्हटल्याप्रमाणे इतिहास म्हणजे वर्तमानकाळ आणि भूतकाळामधील कधीही न संपणारा संवाद. आपल्याला ऱ्होड्सशी संवाद साधायला हवा, त्याला जाणून घ्यायला हवे. या संवादातून आजही वंशवर्णजाति-श्रेष्ठत्वाच्या भावनेने  मनात लपलेल्या ऱ्होड्सला संपवता येईल.  कदाचित ऱ्होड्सचा पुतळा हटवला जाईल, परंतु इतिहासाच्या पानांतील ऱ्होड्सला जपावे लागेल.

ईमेल : shyam.pakhare111@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.