गोष्ट विचारांच्या प्रवासाची

माहिती जनुके, सेल्फिश जीन , रिचर्ड डॉकिन्स, इन्टरनेट
—————————————————————————–
सामाजिक माध्यमांद्वारे कसलाही आधार नसलेले समाजविघातक विचार कसे वेगाने पसरविले जात आहेत, हे आपण अनुभवीत आहोत. त्यामागील शास्त्रीय कारणपरंपरा उलगडून दाखविणारा हा उद्बोधक लेख
—————————————————————————–

अलिकडच्या काळात लोक इंटरनेटचा वापर  प्रामुख्याने आपले राजकीय अथवा धार्मिक विचार पसरविण्यासाठी करतात असे दिसून येते आहे. अशा विचारांची बीजे memes या नावाने ओळखली जातात. त्याला मराठीत माहिती जनुके असे म्हणूया. हे विचार कसे पसरतात ती प्रक्रिया समजावून देण्याचा प्रयत्न मी ह्या लेखातून केला आहे.

माहिती जनुकांची संकल्पना ही सर्वप्रथम प्रसिद्ध उत्क्रांतिवादी जीवशास्त्रज्ञ रिचर्ड डॉकिन्स ह्यांनी त्यांच्या सेल्फिश जी  ह्या प्रसिद्ध पुस्तकातील शेवटच्या प्रकरणात मांडलीविज्ञानविश्वात प्रभावी ठरलेल्या पुस्तकांच्या यादीत त्याचा अनेकदा उल्लेख होतो. या पुस्तकाचे वैशिष्ट्य हे की  जनुकांच्या दृष्टिकोनातून  उत्क्रांतीची गोष्ट अतिशय स्पष्ट व सुबोध पद्धतीने ह्या पुस्तकात मांडलेली आहे. माहितीजनुकांची संकल्पना पाहण्याआधी आपण जनुकांची संकल्पना समजून घेऊया.

उत्क्रांतीच्या प्रक्रियेत विश्वात टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेली वैशिष्ट्ये कोणत्याही प्रजातीत  जनुकांच्या माध्यमातून नियंत्रित केली जातात. ती आपल्या डी. एन. ए. (D. N. A.) मध्ये श्रेणीबद्ध केलेली असतात. जनुके स्वयंप्रतिकृतीद्वारे प्रसारित होतात व माणसाचे (अथवा इतर जिवांचे) शरीर हे जनुकांचे तात्पुरते साधन किंवा वाहन असते. उच्च दर्जाची जनुके ही त्या विशिष्ट प्रजातीला  जिवंत राहण्यास तसेच तिचे पुनरुत्पादन करण्यात मदत करतात. पुनरुत्पादनाद्वारे ही जनुके एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. प्राण्याचे शरीर नष्ट झाले तरीही त्याची जनुके ही पुढील पिढीच्या रूपात अखंड प्रवास करतात. प्राणी जन्माला येतात, पुनरुत्पादन करतात आणि मरतात, पण जनुके मात्र अमर असतात. जनुकांची जगात टिकून राहण्यासाठी इतर समांतर जनुकांबरोबर सतत स्पर्धा सुरू असते. ह्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जनुकांना स्वार्थी प्रवृत्ती ठेवावी लागते. जी जनुके टिकून राहण्यासाठी तसेच पुढील पिढीमध्ये संक्रमित होण्यासाठी आवश्यक ते बदल प्राण्याच्या शरीरामध्ये घडवून आणतात, ती स्वतःचा स्वार्थ तर साधतातच,  पण त्याबरोबर त्या प्राण्याला लाभही पोहचवतात. कारण जनुकांचे अस्तित्व हे प्राण्याच्या अस्तित्वावर आधारित असते. एका प्रजातीच्या वेगवेगळ्या सदस्यांच्या शरीरांत काही समान तर काही वेगळी अशी जनुके असतात. अशा प्रकारे एका प्रजातीच्या जनुकांचा संग्रह बनतो. ती एखाद्या प्राण्याच्या शरीरात एकत्र आल्यास त्यांना त्या प्राण्याच्या जिवंत राहण्यासाठी आणि त्याचे प्रजोत्पादन होण्यासाठी एकमेकांशी साहाय्य करावे लागते. वेगळ्या प्रजातीतील जनुके मात्र एकमेकांना साहाय्य करीत नाहीत. त्यामुळे वेगळ्या प्रजातीतील प्राण्यांचे संकर केल्यास त्यांचे अपत्य हे जन्मजात वंध्य असते.

एका प्रजातिसंग्रहातील एखादे जनुक हे संग्रहातील दुसऱ्या जनुकाला साहाय्य करीत नसेल तर त्याचा प्राण्याच्या जिवंत राहण्याच्या संघर्षावर विपरीत परिणाम होतो आणि प्राणी जगण्यास असमर्थ ठरल्यास त्याच्या शरीरातील जनुके पुढील पिढीत प्रसारित होत नाहीत. चांगली जनुके ही ( इतर जनुकांना सहकार्य  करणारी)  इतर प्राण्यांच्या माध्यमातून जिवंत राहतात. परंतु वाईट जनुके ( इतर जनुकांना सहकार्य न करणारी) मात्र हळूहळू जनुकांच्या संग्रहातून नष्ट होतात.

काही जनुके मात्र प्रसारित होण्यासाठी वेगळ्या मार्गाचा वापर करतात. ती प्राण्याच्या पुनरुत्पादनाद्वारे प्रसारित न होता परजीवींद्वारे प्रसारित होतात. जनुकांची  पुनरुत्पादनाद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होण्याची प्रक्रिया आनुवांशिक असते तर परजीवींच्या एका प्राण्याच्या शरीरातून दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात प्रसारित होण्याची प्रक्रिया ही समांतर असते.  जीवाणू (व्हायरस)ची जनुके ही अश्या समांतर प्रक्रियेने प्रसारित होतात.

व्हायरसची जनुके ही एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करीत असली तरी त्यांचा हेतू हा ज्या शरीरात प्रवेश केला त्या शरीरारातील इतर जनुकांशी साहाय्य करण्याचा नसतो. व्हायरस शरीरात पसरलेला प्राणी मरण पावला तर व्हायरसचे विषाणुदेखील मरण पावतात परंतु त्यापूर्वीच आपल्या प्रतिकृती दुसऱ्या शरीरात पोचविण्यात त्यांना यश आलेले असते. त्यामुळे त्यांचा समांतर प्रसार झालेलाच असतो. ही व्हायरसची जनुके ज्या शरीरात शिरतात त्या व्यक्तीच्या खोकला, शिंक, विष्ठा अशा अनेक मार्गाने ते समांतर प्रवास करतात. अशा प्रकारे व्हायरस हे आपल्या समांतर प्रवासासाठी प्राण्याच्या वागणुकीत बदल घडवून आणतात. जसे की व्हायरसबाधित  व्यक्तीला सततचा खोकला होणे किंवा शिंका येणे इत्यादी. व्हायरस ज्या शरीरात शिरतील त्या शरीराच्या जिवंत राहण्यास अथवा प्रजनन होण्यास व्हायरसला स्वारस्य नसते. फक्त वेगाने जास्तीत जास्त प्राण्यांपर्यंत पोचण्याचे कार्य व्हायरसची जनुके करतात.

थोडक्यात, दोन्ही प्रकारच्या जनुकांचा हेतू त्यांच्या जास्तीत जास्त प्रतिकृती तयार करणे असा असतो. मात्र प्राण्याच्या जनुकांना संक्रमित होण्यासाठी प्राण्याचे जिवंत राहणे आणि पुनरुत्पादन होणे आवश्यक असते तर व्हायरसच्या जनुकांना मात्र प्राण्याच्या हिताची पर्वा नसते, कारण ती समांतर पातळीवर प्रसारित होतात. अर्थातच इथे हेतू शब्दाचा अर्थ असा मात्र नाही की जनुके ही विचारपूर्वक विशिष्ट पद्धतींचा वापर करून त्यांच्या प्रतिकृतींचा प्रसार करतात. त्यांच्या कृतींच्या परिणामातून विशिष्ट  फलित  मात्र निश्चित जाणवते. यावरून जनुकांची व व्हायरसची कार्यपद्धती, त्यांचे वर्तन व हेतू आपल्या लक्षात आले असेल. आता माहितीजनुकांकडे वळूया.

रिचर्ड डॉकिन्स ह्यांनी माहिती जनुकाची व्याख्या ‘सांस्कृतिक प्रेषण एकक’ किंवा ‘अनुकरणाचे एकक’ अशी केली आहे. तो पुढे म्हणतो की संगीतातील सूर, नवनवीन कल्पना, काही वाक्यांश, कपड्यांची फॅशन, मातीची भांडी बनविण्याची पद्धत किंवा एखादी बांधकामातील कमान अशी अनेक उदाहरणे माहिती जनुकांसाठी देता येतील. माहिती जनुकांची संकल्पना स्पष्ट करणारा ‘सेल्फिश जीन’ मधील हा उतारा —

‘जनुके ही शुक्राणूच्या अथवा स्त्रीबीजाच्या माध्यमातून एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रसार करतात. तद्वतच माहितीजनुके ही एका मेंदूतून दुसऱ्या मेंदूत प्रवेश करतात. तो प्रसार अनुकरणाच्या माध्यमातून होत असतो. एखादा शास्त्रज्ञ ज्यावेळी एखादी चांगली कल्पना ऐकतो अथवा वाचतो आणि ती कल्पना आपल्या सहकाऱ्यांकडे किंवा विद्यार्थ्यांकडे पोचवतो, तसेच ती कल्पना तो कधी लेख लिहून तर कधी व्याख्यानांच्या द्वारे लोकांपर्यंत पोचवतो. ती कल्पना लोकांना आवडली, त्यांनी ती स्वीकारली तर ती त्या लोकांमार्फत अधिक लोकांपर्यंत पोचण्याची प्रक्रिया सुरू होते. अशा प्रकारे कल्पना जणु स्वतःच्या अधिकाधिक प्रतिकृती तयार करतात.’

ह्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की या माहिती जनुकांचे प्रेषण हे व्हायरसप्रमाणे समांतर पातळीवर होत असते. रिचर्ड डॉकिन्सचे सहकारी एन. के. हम्फ्रे यांनी या माहितीजनुकांच्या व्हायरससदृश वर्तनाचे खालीलप्रमाणे तपशिलात वर्णन केले आहे. ते म्हणतात —

‘माहिती जनुकांकडे जिवंत संरचना म्हणून पाहावे लागेल — केवळ रूपकात्मक नव्हे तर तांत्रिकदृष्ट्या सुद्धा. ज्यावेळी तुम्ही एखादी सुपीक कल्पना माझ्या मनात पेरता, त्याक्षणी अक्षरशः माझ्या मनात परजीवी संक्रमित करता आणि माझा मेंदू माहितीजनुकाचे प्रेषण करणारे वाहन बनतो आणि प्रसाराचे माध्यम म्हणून मेंदूचे कार्य सुरू होते. माहितीजनुकांचे व्हायरसबरोबरचे साम्य हे वरवरचे नसून माहिती जनुकांचा माणसाच्या वर्तणुकीवरील परिणाम हा व्हायरसच्या परिणामासारखाच असतो. ‘मरणानंतरचे अस्तित्व’ ह्या कल्पनेवर जेव्हा जगभरातील कोट्यवधी लोक विश्वास ठेवतात तेव्हा त्या कल्पनेचे स्वतःचे असे अस्तित्व दिसून येते.’

एका अत्यंत प्रभावी आणि चिवट अशा माहिती जनुकाचे उदाहरण म्हणजे आपल्या धार्मिक श्रद्धा व समजुती. धार्मिक श्रद्धा ह्या काही माणसाच्या D. N. A. मध्ये श्रेणीबद्ध झालेल्या नसतात. तर त्या मुलांना लहानपणापासून शिकविल्या जातात. प्रत्येक बालकाला आपापल्या धर्माचे रीतीरिवाज कुटुंबात  शिकविले जातात. ही मुले लहानाची मोठी झाल्यावर व त्यांना स्वतःची मुले-बाळे झाल्यावर त्यांनाही धार्मिक श्रद्धांची ही पुरचुंडी देण्याची प्रक्रिया गिरविली जाते. ही प्रक्रिया आनुवांशिक प्रक्रियेहून वेगळी आहे. कारण धार्मिक श्रद्धा ह्या पूर्णपणे कौटुंबिक पार्श्वभूमीवर आधारित असतात. तसेच जी माणसे कट्टर धार्मिक असतात ती अधिकाधिक लोकांपर्यंत आपल्या श्रद्धा पोचवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे धर्माचा प्रसार हा समांतर पातळीवर होत असतो. धर्मासारख्या दुसऱ्या प्रभावी माहिती जनुकांचे उदाहरण म्हणजे राजकीय मतप्रणाली. इतिहासात हुकुमशाही विचारांचा प्रचार ज्या जोरकसपणे होत गेला तो कट्टर धर्मभावनेच्या  प्रचाराइतकाच प्रभावी होता.

माहिती जनुके ही माणसांचा त्यांच्या प्रचाराचे साधन म्हणून वापर करतात. परंतु अशावेळी असा प्रश्न पडतो की काही माणसे ही माहिती जनुकांची वाहक बनण्यास बळी का पडतात? ज्या पद्धतीने माणसाचा मेंदू उत्क्रांतीद्वारे विकसित झाला आहे ती प्रक्रिया ह्याला कारणीभूत आहे. मानवी मनाची रचनाच अशी आहे की त्यात कल्पना, विचार टिपून घेण्याची, शोषून घेण्याची उच्च दर्जाची क्षमता आहे. त्यामुळेच बालवयात मूल आपल्या पालकांची भाषा शिकू शकते, शालेयशिक्षण आत्मसात करते तसेच धार्मिक श्रद्धा व सभोवतालच्या अनेकविध कल्पना शिकते. मात्र लहान मुलांना चांगले-वाईट, खरे-खोटे यातील फरक कळेल इतकी वैचारिक प्रगल्भता त्यांच्यात नसते. त्यामुळे मुलांवर स्वतःच्या श्रद्धा आंधळेपणे न लादणे ही विवेकवादी पालकांची जवाबदारी असते.

मी जनुकांबद्दल बोलताना जसा जनुकांच्या संग्रहाचा उल्लेख केला तसाच माहितीजनुकांचा देखील संग्रह असतो. ह्यातील काही माहितीजनुके ही इतर माहितीजनुकांना सहाय्य करतात तर काही माहिती जनुके इतर माहितीजनुकांचा विरोध करतात. तसेच माहितीजनुके ही त्यांच्या भल्यासाठी त्यांच्या वाहकाच्या वर्तनात बदल घडवून आणतात.

एखादी वैज्ञानिक कल्पना सिद्ध करण्यासाठी समर्थ असे पुरावे असावे लागतात. सापेक्षता सिद्धान्त, पुंजयामिकी सिद्धान्त किंवा उत्क्रान्तिवाद हे सर्वमान्य आहेत कारण त्यांच्या मागे जबरदस्त, ठोस पुराव्यांचे पाठबळ आहे. कोणताही वैज्ञानिक सिद्धान्त किंवा विचार व्यापक परीक्षणांतून, विविध उलट तपासण्यांतून, समकालीन अभ्यासकांच्या चिकित्सेतून, सातत्यपूर्ण केलेल्या प्रयोगातून तावून सुलाखून निघतो तेव्हाच तो लोकप्रिय आणि लोकमान्य होतो. या उलट धार्मिक श्रद्धांच्या संदर्भात ह्यातील काहीही घडत नाही. किंबहुना स्वर्ग-नरक, पुनर्जन्म, ईश्वर या संदर्भात कोणत्याही पुराव्याशिवाय, प्रश्नांशिवाय विश्वास ठेवला जातो. आणि कित्येकदा धार्मिक लोक सर्वमान्य वैज्ञानिक सिद्धान्ताला (उदा. उत्क्रान्तीचा सिद्धान्त) विरोध करतात, कारण तो  सिद्धान्त त्यांच्या धार्मिक कल्पनांना तडा देतो. इथे धार्मिक माहितीजनुके ही वैज्ञानिक माहितीजनुकांना पूरक नाहीत हे लक्षात येते.  व्हायरस आपल्या वाहक प्राण्याच्या वर्तनात बदल करतात आणि स्वतःचा प्रसार करतच राहतात त्याप्रमाणेच हे घडते.

जी कल्पना ही माणसाच्या मनात बीज धरते ती माणसालाच स्वतःच्या प्रतिकृती करण्याचे साधन म्हणून वापरते हे विलक्षण आहे. जेव्हा लोक इंटरनेटचा वापर आपल्या धार्मिक किंवा राजकीय कल्पना पसरवण्यासाठी करतात तेव्हा ते माहिती जनुकांच्या प्रभावाखाली वावरत असतात. माहिती जनुकांचा अनिर्बंध प्रसार रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आपले विचार पसरवण्याआधी विचारांना पाठबळ देणारे पुरावे आहेत का हे पडताळून पाहणे. चुकीचे माहिती जनुके ही समाजाला घातक ठरतात व त्यांच्या अनिर्बंध प्रसाराची परिणीती सामाजिक अस्थिरता व रक्तपातात होऊ शकते. आजवर धर्माच्या नावाखाली अथवा विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या नावाखाली जी युद्धे, दंगली व रक्तपात घडला त्याला अशाच माहितीजनुकांचा प्रभाव कारणीभूत आहे.

परंतु सगळे चित्र काही निराशावादी मात्र नाही आणि सगळीच माहितीजनुके हानिकारक नसतात. उत्तम संगीत, साहित्य, चित्रकला व अन्य सर्जनशील कलांचा प्रसारही माहिती जनुकांच्या माध्यमातूनच होत असतो. चांगल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार हिंसेला थांबवू शकेल व जगात शांतता वाढण्यास मदत करेल अशी मला आशा आहे.

कारण विसाव्या शतकात एकीकडे जेव्हा नाझी व हिटलरच्या हुकुमशाही व वंशविद्वेषी विचारांचे विष पसरत होते, तेव्हाच दुसरीकडे महात्मा गांधी करुणेचा व अहिंसेचा संदेशही जगभर तितक्याच प्रभावीपणे पोचवत होते.

ईमेल: sukalp.karanjekar@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.