अनुभव: कलमा

आंतरधर्मीय विवाह, मानवी नातेसंबंध, कलमा
________________________________________________________
मुस्लीम मुलगा व ख्रिश्चन मुलगी ह्यांचा विवाह, तोही आजच्या ३५ वर्षांपूर्वी.सुनबाई तर हवीशी आहे, पण तिचा धर्म न बदलता तिला स्वीकारले, तर लोक काय म्हणतील ह्या पेचात सापडलेले सासरे व प्रेमाने माने जिंकण्यावर विश्वास असणारी सून ह्यांच्या नात्याची हृद्य कहाणी, मुलाच्या दृष्टीकोनातून —
________________________________________________________
आमच्या लग्नाला कोणाचा विरोध नव्हता. आशाबद्दल तक्रार नव्हती. आमचे वडील तिच्या गुणांचे कौतुक करायचे. परंतु तिने मुसलमान व्हावे एवढीच त्यांची अट होती. आम्ही एकमेकाला व्यक्ती म्हणून पसंत केले होते. धर्मांतराचा विषयच नव्हता. लग्न करण्यापासून ते मला परावृत्त करू शकत नव्हते. परंतु आशाला सून म्हणून स्वीकारायचे की नाही हे शेवटी त्यांच्याच हातात होते. धर्मांतराशिवाय स्वीकारणार नाही असे त्यांनी निर्वाणीचे सांगून टाकले. एका ख्रिश्चन मुलीला धर्मांतर करवून न घेता स्वीकारले तर लोक दूषणे देतील ही भीती होतीच. परंतु त्याहीपेक्षा त्यांच्या मनात खोलवर रुजलेले संस्कार त्यांना स्वीकारू देत नव्हते. आशाने चांगुलपणाची चिकाटी सोडली नाही. काळासोबत सगळे बदलत गेले. शेवटी संस्काराचा उपचार करून वडिलांनी स्वतःची समजूत काढून घेतली व एका सामान्य माणसाने चांगुलपणा आणि संस्कार ह्यांची अपूर्व सांगड घातली.
मग़रिबची नमाज होऊन गेली होती. दिवस मावळतीला गेलेला. सुधाकरने दिलेला मिठाईचा पुडा घेऊन मी आणि आशा आमच्या घरी गेलो. सदर बाजार भागात आमचे जुने घर आहे. वडील अंबाजोगाईला पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी याच मोहल्ल्यात घर भाड्याने घेतले होते. कालांतराने भाडे आणखीन कमी होते म्हणून आमचे बिऱ्हाड फालोवर्स क्वार्टर्समध्ये हलले. ही सरकारी घरांची चाळ. आमचे बालपण याच चाळीत गेले. तेथे असतानाच आणीबाणीत मला अटक झाली. त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांनी नोटीस बजावून वडिलांना घर रिकामे करायला भाग पाडले. एव्हाना ‘सदर बाजारा’त आमचे पत्र्याचे घर बांधून तयार झाले होते. आणीबाणीचा तुरुंगवास संपवून परत आलो तेव्हा पहिल्यांदा आशाची भेट याच घरात झाली होती.
आज लग्नाचे रजिस्ट्रेशन करून आम्ही परतलो होतो. मी पाटण्याहून परस्पर बीडला पोचलो. मित्राच्या खोलीवर कपडे बदलून लग्नाला हजर झालो. आशा अंबाजोगाईहून आली. तिने खास ख्रिश्चन पद्धतीची पांढरी साडी नेसली होती. तिच्या सोबत तिची बहीण व धाकटा भाऊ आणि माझी बहीण व भाऊजी होते. हे चौघे नातेवाईक सोडले तर बाकी सगळे मित्र. मी कोणालाही निमंत्रण पाठविले नव्हते. सुधाकर, बापू काळदाते आणि डॉक्टर लोहिया या तिघांना तेवढे साक्षीदार म्हणून येण्याची विनंती केली होती. या तिघांनी आंतरजातीय विवाह केलेला व आयुष्याच्या तीन टप्प्यांवर भेटलेले. कानोकानी कळत गेले आणि संघर्षवाहिनीतील कार्यकर्त्यांची व माझ्या मित्रांची गर्दी झाली. लग्नाच्या नोंदणीचा सोहळा(?) पार पडला. कोणीतरी खानसाहेब अधिकारी होते. त्यांनी माथ्यावरचीरेषा हलू न देता सह्या करून घेतल्या; गुरांच्या बाजारात पंचनाम्यावर अधिकारी सह्या करतो तश्या. एकमेकाला हार घालण्याचा उपचार झाला. फोटो काढले. बापूंनी खिशातील साडेचारशे रुपये मला भेट म्हणून दिले. ते व डॉक्टर औरंगाबादला निघून गेले. आम्ही हॉटेलात राईस प्लेट जेवलो. हेच आमच्यालग्नाचे जेवण. बसमध्ये प्रचंड गर्दी होती. उभे राहूनच अख्खा प्रवास करावा लागला. लग्नाची अशी वरात. उतरताना सुधाकरने मिठाईचा डबा दिला. म्हणाला, ‘आई-वडिलांना भेटून घ्या.’
मी घरात सर्वांत धाकटा. आई-वडिलांचा लाडका. घरात घुसलो. आईचा हात धरला, माझ्या डोक्यावर ठेवला, तसाच आशाच्या डोक्यावरही ठेवला. आईला कळलेच नाही की मी काय करतोय. मी म्हणालो, ‘झाले, तुझे आशीर्वाद आम्हाला मिळाले.’ ती काहीच बोलली नाही. नुसती आम्हा दोघांकडे बघत राहिली. आशा चांगली मुलगी आहे. ती सून म्हणून घरात घ्यायला तिची हरकत नव्हती. पण… तेवढ्यात वडील आले. आम्हाला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर कठोर भाव उमटले. मी त्यांचा असा चेहरा पूर्वी कधी पाहिला नव्हता. आम्ही दोघांनी उभे राहून त्यांना सलाम केला. वडील एकच वाक्य बोलले.‘जब तक यह मुसलमान नहीं होती, यह तेरी बिवी नहीं कहेलाएगी.’ एवढे एक वाक्य बोलून ते निघून गेले. वीज कडाडली आणि आपल्यावरच पडली असे वाटले. या एका वाक्यात भयानक अर्थ होता. आशा रडायला लागली. तिच्या डोळ्यांतल्या अश्रूंच्या धारा काही केल्या थांबेनात. मी खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तिच्या मनात काय चालले होते कुणास ठाऊक. ती माझेही ऐकत नव्हती. आईने पाणी आणून दिले. ते प्याली अन् बराचवेळ हुमसत राहिली.
आशा ख्रिश्चन घरातून आलेली. लहानपणी तिची आई गेली. घरातील मोठी मुलगी म्हणून तिने लहान भावंडांचा सांभाळ केला. तिचे वडील पोस्टात नोकरीला होते. मुलींच्या शिक्षणाबद्दल त्यांचा कटाक्ष होता. घरखर्चात ओढाताण सहन करून त्यांनी मुलींना शिकविले. आशाला त्यांनी नर्सिंग कोर्स करायला औरंगाबादला पाठविले. तेथे माझी बहीणही शिकत होती. या दोघींची मैत्री झाली. मी आणीबाणीच्या काळात तुरुंगात होतो. बहिणीशी माझा पत्रव्यवहार होता. माझी पत्रे आशादेखील वाचायची. एका ख्रिस्मसला तिने ग्रीटिंग पाठविले. मी आभाराचे पत्र. पुढे सिलसिला सुरू झाला. भेट होण्यापूर्वी आमची ओळख झाली होती. तिने नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण केले. लगेच तिला नोकरी लागली. माझ्या बहिणीच्या लग्नात ती आली होती. एखाद्या कारभारणीला शोभेल अशा पद्धतीने तिने लग्नाची सगळी कामे हाताळली होती. आमच्या कुटुंबियांमध्ये तिचे कौतुक होते. तिचा स्वभाव सगळ्यांना आवडला होता. आम्ही लग्न करणार हेही सगळ्यांना माहीत होते. अडचण एकच होती. तिने इस्लाम धर्म स्वीकारावा अशी आमच्या घरच्यांची इच्छा होती.
एकदा विषय निघाला. तेव्हा तिने मला विचारले. मी म्हणालो, “मी तुला व्यक्ती म्हणून पाहिले, तेवढे माझ्यासाठी पुरेसे आहे.’‘ माझ्यासाठी तिचा धर्म कोणता हा मुद्दाच नव्हता. तिने आमच्या बहिणीला सांगितले की, “तो म्हणत असेल तर मी काहीही करायला तयार आहे. तो कोरड्या विहिरीत उडी टाक म्हणाला तरी मी टाकेन. तुम्ही त्याच्याशीच बोला.’‘ बरेच दिवस कोणीच विषय काढला नाही. एकदा आडून विषय निघाला. तेव्हा मी परत माझी भूमिका स्पष्ट केली. मी लग्न करण्याचा निर्णय करताना तिचा धर्म पाहिला नाही. ती व्यक्ती म्हणून मला आवडली आहे. तेवढे मला पुरेसे आहे.
वडील कर्मठ वगैरे काही नव्हते. जातीयवादी तर अजिबात नाही. आशाबद्दल त्यांना कोणतीच तक्रार नव्हती. उलट तिचे कौतुक करायचे. अडचण फक्त धर्मांतराची होती. दुसऱ्या धर्माची सून स्वीकारली तर लोक काय म्हणतील? नातेवाईक काय म्हणतील?“वतन से दूर राहून मुलांना हेच शिकवले का?’‘लोक असे प्रश्न विचारून भंडावून सोडतील अशी भीती वाटत होती. एका सामान्य माणसाला अस्वस्थ करायला एवढे प्रश्न पुष्कळ झाले. आंतरधर्मीय विवाह ही कल्पनाच नवी, धक्कादायक. आपल्या घराण्यात पिढ्यान् पिढ्या कोणी असे पाऊल उचलले नाही. ते चांगले की वाईट याची चर्चा नको. आज ते आपल्या घरात पडता कामा नये. वडिलांचा सरळसोट आणि सरधोपट विचार. ‘मुलीच्या पसंतीबद्दलआम्ही हरकत घेतली नाही. आता धर्मांतराबद्दल आमचे ऐकावे’ असा त्यांचा हेका होता.
मला नातेवाईक अथवा लोकांशी काही देणेघेणे नव्हते. ते काय म्हणतात याची मला चिंता नव्हती. मी लग्न करणार आहे. आम्ही दोघे सोबत आयुष्य काढणार आहोत. आमचे आम्ही ठरवू. आमच्या लग्नाशी लोकांना काय देणेघेणे? आम्ही कोणाला विचारले का की, ते असे का करतात? मग आम्हाला विचारण्याचा त्यांना काय अधिकार? आम्ही लोकांना अडविले नाही. लोकांनी आम्हाला अडवू नये. मी असा सगळा विचार करू शकत होतो. वडिलांना ते शक्य नव्हते. त्यांचे बालपणापासूनचे संस्कार कसोटीला लागले होते.
लग्नाचा आशीर्वाद मागण्यासाठी आलेल्या लाडक्यामुलाच्या आणि सुस्वभावी सुनेच्या डोक्यावर हात ठेवण्याऐवजी त्यांनी एक भयानक वाक्य वापरून आम्हाला ठोकरून लावले. ते वाक्य माझ्या जिव्हारी लागले. थोडेबहुत सामाजिक आकलन झाल्यामुळे ते मी पचवू शकलो. मात्र आशाच्या चिमुकल्या भावविश्वाच्या चिंधड्या-चिंधड्या झाल्या.

दोन –
आशाला मेडिकल कॉलेज परिसरात क्वार्टर मिळाले होते. आमचा नवा संसार याच घरात सुरू झाला. त्या काळी मी सतत फिरतीवर असायचो. आशा इथेच राहायची. त्यात तिचा स्वभाव कुटुंबवत्सल. तिला सासू, सासरे, नणंदा, भावजया, भाऊ, बहिणी असा गोतावळा हवासा वाटायचा. आपले घरदार सोडून ती आलेली. तिला वाटले येथे नवा गोतावळा मिळेल. परंतु येथे वेगळेच. नवऱ्याशिवाय दुसरा नातेवाईक नाही. तोही वाऱ्यावर. कधी येथे, कधी तेथे. आधाराला म्हणून माझे मित्र, माझी बहीण, तिच्या नव्याने झालेल्या मैत्रिणी. परंतु तोही हवा असलेला गोतावळा मिळत नव्हता. कारण साधे होते. तिने धर्मांतर केले नव्हते.
ड्यूटी संपली की आशा ‘सदर बाजारा’तील आमच्या घरी येऊन बसायची. बसून राहायची. आमच्या घरचे लोक तिला हाकलून लावण्याएवढे उद्धट नव्हते. ती तासन् तास बसून राहायची. तिच्याशी कोणी बोलत नसे. जो-तो आपापल्या कामात. ते एकमेकांशी बोलायचे. पण हिच्याशी कोणीच नाही. चार-चार तास ती बसून राहायची. दिवस मावळताना क्वार्टरला परतायची. काही महिन्यांत अबोला तुटला. हळूहळू आई बोलू लागली. ही तिच्या कामात मदत करू लागली. घरात जागा मिळाली. पण मनाची दारे बंदच होती.
आशाची आई लहानपणीच गेलेली. वडील पोस्टात नोकरी करीत होते. ते धार्मिक कार्यक्रमात उत्साहाने भाग घ्यायचे. नगर जिल्ह्यात ख्रिश्चनांची सं”या बऱ्यापैकी आहे. तिच्या माहेरीदेखील लग्नाचे कौतुक झाले नाही. एका मुसलमानाशी तिने लग्न केल्याची अढी होतीच. त्यात मी नोकरी करीत नाही. कार्यकर्ता आहे. आशा वेडी आहे. भोळी आहे. ती बिचारी फसली. अशी भावना. एक गोष्ट खरी की, आशाच्या माहेरच्या लोकांनी माझे कौतुक केले नसले तरी, मला अपमानितही केले नाही. माझ्या दृष्टीने एवढे पुरेसे होते. परंतु आशाला तेवढे पुरेसे वाटत नसे.
आपल्याकडे पहिल्या बाळंतपणाला मुलगी माहेरी जाते. आशा कोठे जाणार? आई नाही. जे कोणी माहेरचे लोक आहेत त्यांची परिस्थिती बाळंतपण पेलणारी नाही. शेवटी अंबाजोगाईलाच बाळंतपण करायचे ठरले. मी माझे पंख दुमडून घेतले. आशासोबत राहायेच ठरविले. घरात आम्ही दोघे. दोघे नवखे. बाळंतपणाची तयारी दोघांनी मिळून केली. या काळात मी जेवढे शिकलो तेवढे कोणत्याही पुस्तकातून मला शिकता आले नाही.
आशाला दवाखान्यात नेण्यात आले. तिच्याजवळ माझी बहीण आणि तिची एक मैत्रीण होती. मी वॉर्डाच्या बाहेर अस्वस्थ उभा. उत्तररात्री मुलगी झाल्याचे मला सांगण्यात आले. पळत जाऊन शिरा करून घेऊन आलो. तासभरानंतर आशाची माझी भेट झाली.
दोन-तीन दिवसांनंतर आशा घरी आली. एके दिवशी मी बाहेरून घरी आलो. तेव्हा आशाने मला सांगितले, “आज अब्बाजान (माझे वडील) इथे आले होते. त्यांनी मुलीच्या कानात ‘अज़ान’ म्हटली. थांबले नाहीत. लगेच निघून गेले.’‘ आशाने धर्मांतर केले नाही म्हणून वडिलांनी तिला सून म्हणून स्वीकारले नाही. परंतु तिच्या लेकराच्या कानात ‘अज़ान’ मात्र म्हटली. हा काय प्रकार आहे? वडिलांशी चर्चा करण्याचीसोय नव्हती. माझा मीच उलगडा करून म्हणालो. ‘’ही मुलगी आपल्या मुलाची आहे. आजोबा म्हणून तिच्या कानात ‘अज़ान’ म्हणणे आपले धर्मकर्तव्य आहे असे त्यांना वाटले असावे.’’ वडील निःसंकोचपणे आमच्या घरी आले. अज़ान म्हणून निघून गेले. आपण हे केल्याचे माझ्या आईलादेखील त्यांनी सांगितले नसावे. हा दिखाव्याचा भाग नव्हता. एका सामान्य माणसाच्या धार्मिक आस्थांची ती अभिव्यक्ती होती. चांगुलपणा आणि आस्थांची सरमिसळ.

तीन –
त्यांचे वय झाले होते. पूर्वीसारखे काम करता येत नव्हते. जो माणूस सायकलीवर तीस-तीस किलोमीटर रोज प्रवास करायचा, या गावाहून त्या गावाला पायी जाण्यात ज्याने कधीच कुचराई केली नाही, तो माणूस आता हिंडू-फिरू शकत नव्हता. आपले गाव सोडले, आपला प्रदेश सोडला. जिथली भाषा आपल्याला बोलता येत नाही, कळतही नाही, अशा प्रदेशात येऊन ज्याने आपली मुले वाढविली, शिकवली. मोठी केली, तो माणूस आज पलंगावर पडून होता. भाऊ पैसे पाठवायचा. त्यावर घर चालायचे. वडिलांना ही स्थिती मान्य होणारी नव्हती. वयाबरोबर अनेक रोगांनी त्यांना घेरले. एक-दोनदा ऑपरेशन झाले. यंदा मात्र मोठी बिकट स्थिती होती.
वडिलांना वॉर्डात दाखल केले होते. मोठे ऑपरेशन झाले. डॉक्टर निर्वाणीचं बोलत होते. परंतु प्रयत्नांची शिकस्तही करीत होते. बावीस दिवस झाले. वडील मृत्यूशी झुंज देत होते. माझी बहीण आणि आशा साईडरूममध्ये एका पलंगावर पडून असलेल्या माझ्या वडिलांची अव्याहत सेवा करीत होत्या. आमच्या आईला दिसत नव्हते म्हणून ती तगमग करीत घरीच थांबली होती. माझे भाऊजी माझ्यासोबत असायचे. मी खडा पहारा देत होतो. बाहेरची धावपळ करीत होतो. वडिलांची स्थिती मला पाहवत नव्हती. साईडरूमच्या आत जाऊन त्यांची स्थिती पाहण्याचे धाडस माझ्यात उरले नव्हते. आशा मात्र निरागसपणे सेवाशुश्रूषा करीत होती. वडील आज जाणार की उद्या अशी अवस्था होती. आशाशिवाय त्यांना सेवेला कोणी चालत नव्हते.“आशा, पाय उचलून तिकडे ठेव. आशा, ह्या हाताला मुंग्या आल्या. आशा हे कर. आशा ते कर.’‘ ती पलंगाच्या बाजूला बसून जेवत असली तरी तिलाच हाक मारायचे. घास बाजूला ठेवून ती तशीच उठायची. शेवटी तीन दिवस तर आशाला झोप कशी ते माहीत नव्हते.
मला राहवले नाही म्हणून मी तिला विचारले, “काय होणार आहे हे तुला चांगले समजत असताना तू त्यांची एवढी सेवा का करते आहेस?”
याला एवढे साधे कसे समजत नाही असा कटाक्ष तिने माझ्यावर टाकला. ती म्हणाली, “ईश्वराने हे सुंदर विश्व निर्माण केले. त्यात एक माणूस आणखीन काही काळ राहावा. यासाठी आपण धडपड केली पाहिजे.’‘ तिचे ख्रिश्चन संस्कार बोलले की तिच्या परिचर्येची प्रेरणा की सहज माणूसपण? मी तिच्याकडे नुसता पाहत राहिलो.
वडील गेले त्याच्या तीन दिवस आधीची घटना आहे. वडिलांनी आशाला हाक मारली. आशा पुढे आली. वडील म्हणाले, “मी म्हणतो तसे माझ्या मागे म्हण‘‘, आशाने मानेने होकार दिला.
वडील म्हणाले, “लाइलाहा‘‘
आशा म्हणाली, “लाइलाहा‘‘
वडील म्हणाले, “इल्ल लाहु‘‘
आशा म्हणाली, “इल्ल लाहु‘‘
वडील म्हणाले, “मुहम्मदन रसुलल्हा‘‘
आशा म्हणाली, “मुहम्मदन रसुलल्हा‘‘
एवढे होताच वडिलांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. छातीवर ठेवलेला भला मोठा दगड बाजूला व्हावा असे त्यांना वाटले. वर्षानुवर्षे तुंबलेला पाण्याचा प्रवाह खळखळा वाहू लागाला. त्यांच्या डोळ्यांत एक विलक्षण चमक उमटली. ते एवढेच म्हणाले, “अब मैं इत्मेनान के साथ मर सकता हूँ.’‘ आणि त्यांनी डोळे मिटून घेतले.
आशाने मला हा सगळा प्रकार सांगितला. “असे म्हटल्याने काय होते रे?’‘ तिने विचारले. “हा कलमा आहे. इस्लामची मूळ श्रद्धा. ईश्वर एक आहे. त्याशिवाय दुसरा कोणी पूजनीय नाही आणि महंमद हा ईश्वराने पाठविलेला पैगंबर आहे. ‘कलमा’ पढवून मुसलमान केले जाते. ही मुसलमान करण्याची पद्धत आहे. हा एक उपचार आहे.’‘
मी गमतीने म्हणालो, “तू‘कलमा’ पढलास. आता तू मुसलमान झालीस.’‘ त्यावर ती पटकन म्हणाली, “इतकेच होते तर आपण आधीच का मुसलमान झालो नाही?’‘
तीन दिवसानंतर वडिलांनी कायमचे डोळे मिटले. लग्नानंतर आशीर्वाद मागायला गेलो होतो तेव्हाच्या कठोर भावांचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. खूप काम करून थकलेल्या माणसाला गाढ झोप लागल्यावर जसा दिसतो तसा त्यांचा चेहरा दिसत होता.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.