असलेपण – नसलेपण

रा. स्व. संघ, डावा विचार, गांधी
——————————————————————————–
अलिकडे डावे-उजवे ह्यांच्यातील वैचारिक संघर्ष हातघाईवर आला आहे. अशा वेळी स्वतःला ‘डावा’ समजणाऱ्या एका तरुण कार्यकर्त्याने स्वतःशी व विरोधी विचारांशी संवाद करून आपली जडणघडण तसेच भारतीय समाजाची मानसिकता ह्यांचा शोध घेण्याचा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न––
——————————————————————————–

मी अलीकडे पुष्कळच विचार करतो. म्हणजे मी नक्की कसा आहे? माझ्याशी मतभेद असणारा नक्की कसा आहे? मी जे आग्रह धरतो ते आग्रह धरणं योग्य आहे का? ‘मला हे पटतं’ म्हणजे काय? ‘पटत नाही’ म्हणजे काय? मुळात योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे या ‘डेंजर’ प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलं आहे का?
मी सर्वोदयी वडिलांचा मुलगा. आई ‘मोमीन गर्ल्स हायस्कूल’ या शाळेत शिक्षिका. लहानपणी वडिलांनी विनोबांची गीताई पाठ करून घेतली होती. त्यातलं फारसं काही न कळता ती पाठ केली होती. पुढे यथावकाश विसरलो. गांधीजी, विनोबा, जयप्रकाश, एसेम जोशी, तुकडोजी महाराज ही नावं कायम ऐकलेली. बाबांकडे जो चरखा होता त्यावर एकदा जवाहरलाल नेहरूंनी सूत कातलं होतं. त्यामुळे आमच्या घरी नेहरूंनी सूत कातलेला चरखा आहे ही मित्रांमध्ये मिरवण्याची गोष्ट होती. आईची शाळा मुस्लिम. तिच्या सगळ्या सहकारी शिक्षिका मुस्लिम. त्यांची मुलं-मुली आमचे मित्र-मैत्रिणी. इफत आपा, रजिया आपा, नजमा मावशी असा सगळा मावशी वर्ग अजून आठवतो. रोजे सोडण्याच्या दिवशी आम्हाला निमंत्रण असायचं. रंगीबेरंगी बिछायत आणि वर रसनेला चेतवणाऱ्या पदार्थांची मैफल. अस्सल मुसलमान बघत नसेल इतकी आम्ही इफ्तारची वाट बघायचो ! पुण्यात, सदाशिव पेठेत वाढलेली आई नोकरीनिमित्त भिवंडीला गेली आणि तिथे तिने जो मुस्लिम गोतावळा जमवला तो रिटायरमेंटनंतर ती पुण्यात स्थायिक होऊन पंधरा वर्षं झाली तरी टिकला. अजून त्यांचे फोन होतात. काही वर्षांपूर्वी, निवृत्तीनंतर आईचं एक ऑपरेशन झालं तेव्हा झाडून सगळ्याजणी भेटायला आल्या होत्या. आईच्या सोसायटीने इतक्या बुरखेवाल्या बायका प्रथमच पाहिल्या असतील. आईच्या शाळेची इमारत, मुख्याध्यापक बाईंचं प्रशस्त केबिन, तिथले वर्ग हे सगळं नीट आठवतं. मी शाळेत जायचो ते ‘परशुराम रामनारायण विद्यालय’ होतं. ‘ब्राह्मण आळी’ असं स्पष्ट नाव असलेल्या भागात वसलेलं. (तिथून जवळच वाणी आळी होती. एकूणात नावं ठेवताना मोकळेपणानी ठेवली होती.) १९८४ सालच्या दंगलीत मी सात वर्षांचा होतो. तेव्हाचं फारसं काही आठवत नाही. वडील दंगलग्रस्त भागाला भेट द्यायला गेले होते आणि त्यांना उशीर झाला म्हणून चाळीतले सगळे काळजीत होते हे आठवतं. पुढे १९९२ साली दहावी होऊन पुण्याला आलो. पण दंगलीनंतरही आमच्या रुटीनमध्ये काही फरक पडला नव्हता. सगळ्या मुसलमान मित्रांशी मैत्री कायम होती. ज्या मारामाऱ्या व्हायच्या त्या सायकलची राइड, अमुक मुलीशी ओळख करून देत नाहीस वगैरे निष्पाप कारणांमुळे.
पुण्याला आल्यावर जाणवलेली पहिली गोष्ट म्हणजे इथे लोकांना हिंदी (नीट) बोलता येत नाही. भिवंडीसारखी अस्वच्छता, यंत्रमागांचा आवाज नाही, ऐसपैस रस्ते आहेत आणि स्वच्छता आहे हे जाणवलंच, पण हिंदीची कमतरताही जाणवायची. हिंदी न येणारे लोकही असतात असा साक्षात्कार पुण्यात आल्यावर झाला. अर्थात त्याचीही सवय झाली. पुण्याचं पुणेरीपणही हळूहळू आत्मसात होतं. (ते न व्हायची शक्यता नव्हतीच. ‘हे बघ, बाहेरचे कुणी आले ना, तर या लहान ग्लासात सरबत द्यावं. काही बिघडत नाही’ अशा आयडियॉलॉजीच्या आजीबरोबर राहत होतो.)
हिंदू-मुस्लिम ही काय भानगड आहे, जातींची लफडी काय असतात हे खरं तर कधी लक्षातच आलं नव्हतं. अर्थात ते नसणार अशातला भाग नाही. पण ते आमच्यापर्यंत पोचत नव्हतं हे खरं. मुळात सर्वोदयी घरातला असलो तरी चळवळीशी संबंध उशीरा आला. म्हणजे मेनस्ट्रीम शिक्षण घेऊन, एमबीए वगैरे करून, काही वर्षं नोकरी करून मग जाणवलं की आपल्याला जे सारखं बोअर होतंय त्याचं कारण आपल्या गुणसूत्रांमध्येसुद्धा आहे. नोकरी वगैरे कामं आपली नव्हेत. पण या शिक्षण, नोकरीमुळे जात-धर्म वगैरेशी संबंध आला नाही. पुढे ‘मिळून साऱ्याजणी’त दाखल झाल्यावर हे सगळे विषय समोर आले. पुण्याबद्दल जाणवलेली दुसरी गोष्ट म्हणजे इथले बरेचसे लोक गांधींचा मनापासून द्वेष करतात ही. भिवंडीतही थोडासा गांधीद्वेष अनुभवला होता. आमचे समाजशास्त्राचे शिक्षकच गांधीद्वेष्टे होते. ‘गांधी तसेही म्हातारे झाले होते, त्यांना मारून खरं तर चूकच केली नथुराम गोडसेनं’ असं ते म्हणायचे. पुण्यात आल्यावर अनेक अनोळखी गोष्टींचा परिचय झाला तसाच याही गोष्टीचा झाला. गेल्या एक-दोन वर्षात हे प्रमाण जास्त वाढलं. गांधींचा राग करणारे बरेचजण दिसले.

प्रतिवाद नव्हे, संवाद
मला गांधींच्या बरोबरीने ज्या इतर तिघांनी प्रभावित केलं ते म्हणजे आंबेडकर, मार्क्स आणि डार्विन. आणि हे तिघेच असं नाही, तर यांनी जी मांडणी केली ती पुढं नेणाऱ्या, त्याची चिकित्सा करणाऱ्या अशा अनेकांनी. न्यूटन, आईन्स्टाइन आणि मंडळींपुढेदेखील अवाक व्हायला झालं. म्हणजे ही माणसं काय प्रतीचा विचार करू शकतात! शास्त्रज्ञ, डॉक्टर, महाकाय कल्पनांना मूर्त रूप देणारे तंत्रज्ञ यांच्याविषयी मला कमाल आदर आहे. शस्त्रक्रिया करणारे सर्जन वगैरे तर मला बॅटमॅनच वाटतात. गांधींची चिकित्सा आंबेडकरांनी करणं पटत होतं, पण चहा पिता पिता गांधींवर हल्ला करण्याची क्षमता असलेले लोक भेटले की मौज वाटायची. अजूनही वाटते. आधी गडबडून जायला व्हायचं. पण तरी मी एक ठरवलं होतं की आपण प्रतिवाद करायचा नाही. प्रत्येक वेळी शांत राहणं जरा कठीणच गेलं, पण आता मी ते कौशल्य साध्य केलं आहे. गांधींची कितीही मानहानी केली किंवा कितीही उजवेपणाने कुणी बोललं तरी मी प्रतिक्रिया देत नाही. कारण मला एक जाणवतं की ही सगळीच माणसं माणूस म्हणून काही वाईट नाहीत. दुसरं महत्त्वाचं असं की त्यांचं वाचन, स्वतःचं चिंतन असं काही नसतं. अशा वेळी त्यांच्याशी वाद तो काय घालणार? शिवाय गांधीजींना नावं ठेवून गांधीजींचं मोठेपण कमी होत नाही ही अनेक वेळा सिद्ध झालेली गोष्ट आहे. आणि असे वैचारिक मतभेद सोडले तर आपण सगळेच दिवसभराच्या ओझ्याचे बैल आहोत हेही जाणवतं. बँकेचे हप्ते भरायला या मित्रांच्या मदतीला जानवं, यज्ञयाग यातलं काहीही येत नाही आणि माझ्या मदतीला मार्क्सची विद्वत्ता येत नाही. डावे असा की उजवे, तुम्ही या जगात फक्त पॅनकार्ड धारक असता हे उमगलं होतं ! गोविंद पानसरेंचा खून झाल्यावर आमच्या एका परिचितांनी कम्युनिस्टांनी केलेल्या कत्तलीचं काय असा प्रश्न उपस्थित केला होता. तेव्हाही मी काही बोललो नाही. कारण वर म्हटलं तसं एक पक्कं ठरवलं होतं, आणि आहे, की आपण सर्व विरोध शांतपणे ऐकायचा. कारण आपल्याशी सहमत होणाऱ्या लोकांपेक्षा आपल्यावर टीका करणारे आपल्याला पुनर्विचार करायची संधी देत असतात. दुसरं असं की विरोधाचा तो जो क्षण असतो तो नाजूक असतो. त्याक्षणी बोलून काही उपयोग होत नाही. तुम्हाला तुमचं म्हणणं शांत राहून, सौहार्द न तोडता सांगण्याशिवाय पर्याय नसतो. कारण परस्पर सामंजस्याचा तोच एक मार्ग आहे. तुम्हाला तुमची मांडणी करण्याचे वेगळे प्रभावी पर्याय शोधावे लागतात.
‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटकदेखील मी पाहिलं होतं. त्यातली एक चांगली गोष्ट म्हणजे त्यात गांधींचं सादरीकरण ‘कॅरिकॅचर’ म्हणून केलेलं नव्हतं. मतभेद आहेत ते आहेतच, राहतीलच, पण नाटकावर बंदी घालावी असं मला वाटत नव्हतं. पुलंच्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकात एक प्रसंग आहे. सामाजिक कार्यकर्ता असलेली उषा, गीता आणि सतीश या दोघांबरोबर सिनेमाला जाते तेव्हा एका वृत्तपत्रात ही बातमी ‘शिबिरात स्वयंसेविका आणि थेटरात संचालिका’ अशा मथळ्याने छापून येते. शिबीरसंचालक बाई शिबिरात कित्येक दिवस गेलेल्याच नाहीत आणि सिनेमागृहात दिसल्या यावर हा रोख असतो. काकाजी त्यावर म्हणतात, ठीक आहे. तुम्ही लोकांना सारखं काहीतरी पढवत असता ना, तसं एक दिवस या संपादकाने तुम्हाला पढवलं तर काय हरकत आहे? मला उद्या कुणी म्हटलं की तू नेहमी दूधभात, भेंडीची भाजी खा तर मी त्यांना म्हणेन तू मटन पॅटिस आणि बिर्याणी खा. क्विट्स ! दोघांचंही बरोबर !! मला टीका ऐकताना हे उदाहरण नेहमी आठवतं. गांधी जसे मला प्रिय आहेत तसे कुणालातरी गोळवलकर प्रिय आहेत हे आधी मला स्वतःशी नीट मान्य करावं लागतं. मी अशी एक समतानता स्वीकारली की मग पुढचं थोडं सोपं होतं. (अर्थात ‘पढवणं’ याचा अर्थ मारून टाकणं असा नव्हे. पण ज्यांचा हिंसेवर विश्वास आहे अशांशी अहिंसक वगैरे होऊन संवाद करायचा विचार मी करतोय खरा.)

‘मार्क्सवादाची तोंडओळख’ या पुस्तकात गोविंद पानसरे यांनी दृष्टिकोनातील तात्त्विक फरकाविषयी चांगली मांडणी केली आहे. आपल्याला असं लक्षात येईल की आपण जेव्हा डावे असतो, उजवे असतो, सेंटरला असतो किंवा सेंटरच्या डावीकडे अथवा उजवीकडे असतो आणि दुसऱ्याशी वाद करत असतो तेव्हा त्याच्या मुळाशी तात्त्विक संघर्ष असतो. आपल्या मुद्द्यांवरील सगळी आवरणं दूर केली की मुळाशी तात्त्विक मतभेद दिसतो. तत्त्वज्ञान ही गोष्ट रटाळ वाटली तरी आपल्या विचारामागे, कृतीमागे तत्त्वज्ञान अदृश्य रूपात कार्यरत असतंच. डाव्या आणि उजव्या विचारांचा विचार करताना मला हे प्रकर्षानं जाणवतं.

‘डावा’ असणे म्हणजे काय?
‘डाव्या विचारांचा आहे’ म्हणजे मी कसा आहे? मला जाणवतं ते हे की मला किंवा समविचारी इतरांना मुख्य प्रवाहातील बहुतेक गोष्टींचा कंटाळा असतो. मला तर अलीकडे ‘अ‍ॅनी हॉल’ मधल्या वुडी अ‍ॅलनसारखं ‘इनकॅपेबल टू एन्जॉय एनीथिंग’ असं आपलं झालंय का असं वाटतं. कारण तळाशी डावा विचार जागा आहे. मग लग्न-मुंजीचं आमंत्रण आलं की पोटात गोळा येतो. नातलगांमध्ये मन रमत नाही. कधीकधी घरातही मन रमत नाही. गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी, होळी, रक्षाबंधन, संक्रांत, आंबेडकर जयंती, शिवजयंती यातलं काहीही आलं की ते लवकर जातं कधी याचीच मी वाट बघतो. कुठल्याही प्रतीकात्मक गोष्टींमध्ये मला रस उरत नाही. पण दुसरीकडे हे सगळं साजरं करणाऱ्या समाजातच मी राहात असतो. हे साजरं करणारे लोकच समाजाचा गाडा ओढत असतात. त्यांच्या सेवांचा लाभ मी घेत असतो. पैसे देऊन घेत असतो, पण घेत असतो. ‘तो माझ्यासारखा नाही’ म्हणून त्याची सर्व्हिस मी नाकारत नाही.
पण मग मला आवडतं काय? मला उलटसुलट विचार करायला आणि प्रश्न विचारायला आवडतं. आणि यातून आसपास जे सुरू आहे त्याचा किंवा जे सौंदर्य मला दिसतं आहे त्याचा आस्वाद घ्यायची माझी कुवत कमी होते. ती संपते असं नाही, पण मला आनंद देणाऱ्या गोष्टींपेक्षा मला बोअर होणाऱ्या गोष्टी नेहमीच जास्त असतात. यातून एक धोका उद्भवतो. ‘मला काहीतरी समजलंय’ किंवा ‘मला जास्त कळतं’ या जाणिवेतून माझ्यात एक सूक्ष्मसा अहंकार येतो. मी माझ्या भवतालापासून डिसकनेक्ट होतो.
दुसऱ्या बाजूला, म्हणजे ‘उजवीकडे’ एक समर्पण अपेक्षित आहे. तिथे विचारकलहाला फारसं स्थान नाही. परंपरा, श्रद्धा, यांना स्थान आहे. शक्यता अनेक असू शकतात आणि प्रत्येक शक्यतेची स्वतंत्र चिकित्सा होऊ शकते हा विचार तिथे फारसा नसतो. तिथे कृतीचं महत्त्व आहे. म्हणजे सत्यनारायणाची पूजा का करायची किंवा देवापुढे आरती म्हणण्याचं प्रयोजन काय या प्रश्नांना तिथे स्थान नाही. ‘संघातले दिवस आणि इतर लेख’ या पुस्तकातील ‘संघातले दिवस’ या लेखात स. ह. देशपांडे यांनी गंगाधर गाडगीळ यांची एक आठवण सांगितली आहे. गाडगीळ अमेरिकेत गेले असताना त्यांनी योगसाधनेविषयी एक भाषण दिलं आणि मनःशांती, मोक्ष, निर्वाण ही योगसाधनेची उद्दिष्टे असतात असं सांगितलं. भाषण संपल्यावर एका अमेरिकन स्त्रीने विचारलं, “किती दिवस साधना केल्यावर निर्वाणप्राप्ती होते?” हा अनुभव पुढे एका व्याख्यानात सांगताना गाडगीळ म्हणाले, “हा प्रश्न भारतीय व अमेरिकन मनोवृत्तीतील फरक स्पष्ट करणारा आहे. भारतीयांना हा प्रश्न हास्यास्पद वाटतो. कारण योगसाधनेचं आकर्षण आपल्या दृष्टीनं तिच्या धूसर उद्दिष्टातच असतं.” स. ह. देशपांडे पुढे लिहितात, “उद्दिष्टांपासून सर्वस्वी तोडलेल्या आचारांची आपल्याला सवय आहे. कार्यापेक्षा कार्याभास आपल्याला प्रिय आहे.”

संघ समजून घेताना
‘संघातले दिवस’ हा लेख फार वाचनीय आहे. वयाच्या चौदा ते बावीस वर्षांपर्यंत स. ह. देशपांडे संघात होते. या दिवसांचं प्रांजळ चित्रण त्यांनी या लेखात केलं आहे. संघाची संघटनात्मक बाजू जमेची आहे हे सांगताना ‘संघानं नुसतं बौद्धिक दारिद्र्यच नव्हे तर वैचारिक असहिष्णुताही पत्करली’ असंही ते नमूद करतात. (पृ. ३६) त्यांच्या संघातील काळात त्यांनी एकदाही जात किंवा ब्राह्मण हा शब्द ऐकला नाही असं त्यांनी म्हटलं आहे. संघाने ब्राह्मणेतरांना हेतुपूर्वक अव्हेरलं असं त्यांना वाटत नसल्याचं ते लिहितात. यासंदर्भात त्यांचा पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे – ‘जातिप्रथेच्या दुष्परिणामांचे व्यापक सामाजिक आकलन करून घेण्याचा संघाने प्रयत्न केला नाही आणि संघशाखेबाहेर कसलीही हालचाल केली नाही. म्हणजे एका अर्थाने त्याने हिंदुसंघटनही केले नाही.’ (पृ. ४५)
मी तटस्थपणे दोन्ही बाजू पाहिल्या की एक गोष्ट मला निःसंदिग्धपणे लक्षात येते ती ही की ‘केवळ डावा आहे म्हणून बरोबर आहे’ हे साफ चूक आहे, पण ‘आशा आहे ती डावीकडेच आहे’ हेही खरं आहे. कारण हा चिकित्सक विचार आहे. म्हणजे अगदी कट्टर उजवादेखील जेव्हा चिकित्सा करतो, प्रश्न विचारतो तेव्हा तो डावाच असतो. डावा विचार हा मोठ्या, व्यापक पटलावरचा विचार आहे. धर्म, राष्ट्र, संस्कृती या सीमांनी तो बांधलेला नाही. जगभराचा मानवी इतिहास काय आहे, जगातील सामाजिक-राजकीय-आर्थिक व्यवस्थांचा विकास कसा झाला आहे, माणसाच्या दुःखाचं ऐहिक मूळ काय आहे, माणसापुढे नैतिक स्वरूपाच्या समस्या कोणत्या आहेत याचा सखोल विचार इथे झाला आहे, होत असतो. सामाजिक घटकांचा परस्परसंबंध कसा आहे, तो कसा असायला हवा याची संकल्पनात्मक मांडणी या विचाराने केली आहे. मी माझ्यापुरता तरी डावा विचार म्हणजे सगळाच आधुनिक विचार, ‘शोधकेंद्री’ विचार धरतो. मग यात लोकायत विचार, बौद्ध-जैन विचार आले, फुले, गांधी, मार्क्स, आंबेडकर, आगरकर, राममोहन रॉय, र. धों. कर्वे, मानवेंद्रनाथ रॉय, विनोबा, जयप्रकाश नारायण, सिमों द बुवा, रिचर्ड डॉकिन्स – असे सगळेच आले. जे जे मुळाशी भिडू शकतं ते मी डावं आणि म्हणूनच आश्वासक समजतो. त्यामुळे डावे स्वप्नरंजनात रमतात हे जरी खरं असलं तरी विश्लेषणाची उत्तम पद्धत कुठली असेल तर ती डावी पद्धत!
स. ह. देशपांडे यांनी संघावर केलेल्या अचूक मांडणीसोबत भारतीय मानसिकतेवरही प्रकाश टाकला आहे. ते म्हणतात:
“शेकडो कार्यकर्त्यांनी संघासाठी आपली उमेदीची वर्षं दिली. कित्येकांनी आपलं सर्वस्व दिलं. काहीतरी करावं अशी ज्यांची तडफड होती त्यांचा भ्रमनिरास झाला, १९४६ साली अप्पा पेंडसे, वसंत गीत, मधु देवल, दि. वि. गोखले, राजा वाकणकर इत्यादी दहाबारा अस्वस्थ आत्मे एकत्र आले आणि संघात कधीही न घडलेली एक गोष्ट त्यांनी केली. ते गुरुजींना जाऊन भेटले व त्यांनी नवीन विधायक दिशेचा आग्रह धरला. गुरुजींनी नकारघंटा वाजवली.
पण संघाच्या निष्क्रियतेवरही ज्यांची निष्ठा होती असे अनेक स्वयंसेवक संघात होते हे विसरता येत नाही. खरोखरच आपल्याला राजकारणात भाग घ्यायचा नाही, आपलं कार्य अधिक मूलभूत आहे, ते राष्ट्रीय चरित्र निर्माण करण्याचं आहे किंवा संस्कृतिसंवर्धनाचं आहे याची बालंबाल खात्री असलेले अनेक स्वयंसेवक संघात होते. आणि या आभासाखातर आपल्या सर्वस्वाचा होम करणारे कार्यकर्तेही होते. अजूनही आहेत.
याचं स्पष्टीकरण काय? पारंपरिक भारतीय मनोवृत्तीचं प्रतिबिंबच या घटनेत पडलेलं असावं का? भारतीय मनाला ‘वास्तवाची अभिरुची’ नाही असं डॉक्टर सहस्रबुद्धे म्हणत असत. त्याचाच हा एक परिपाक आहे काय? हे म्हणणं खरं असावं. धर्म हा ‘अदृष्टफल’ असतो अश्या परंपरेचे आपण पाईक. किंवा ‘फलाशारहित’ कर्म करण्याच्या. जे उद्दिष्ट मूर्त स्वरूपात दिसत नाही त्याची गूढता, रहस्यमयता आपल्याला आकृष्ट करते. ते मूर्त होऊ लागलं की त्याच्या भोवतालचं मोहक आवरण गळून पडतं. म्हणून प्रत्यक्ष वस्तुगत प्रश्नांशी झुंज घेणं हा आपला स्वभाव नाही. आपण ‘प्रॉब्लेम सॉल्व्हर्स ‘ नाही. “(पृ. ४२-४३)
हे वाचत असताना ‘संघात असलेल्या माणसानेच हे लिहिलं ते बरं झालं’ असं तर न राहवून वाटलंच, पण तिसऱ्या परिच्छेदातलं भाष्य उजव्यांइतकंच डाव्यांनाही वेगळ्या संदर्भात लागू आहे का असंही वाटलं. मात्र मी आधी म्हटलं तसं आशा असेल तर ती डावीकडे आहे हे खरं आहे. आपण ‘प्रॉब्लेम सॉल्व्हर्स’ नाही हे अगदी विनातक्रार मान्य करण्यासारखं असलं तरी जो काही प्रयत्न झाला आहे, होतो आहे तो डावीकडूनच होतो आहे हे मान्य करावं लागेल. मुळात ‘प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन’च डावीकडून होतं. म्हणून तर ‘हिंदू राष्ट्र झालं की सगळे प्रश्न संपतील’ हा भाबडेपणा डाव्यांमध्ये नाही. आपला प्रॉब्लेम काय आहे हे उजव्यांना कळलं आहे असं मला वाटत नाही. आणि तरी ते सोल्यूशन मात्र देत आहेत.
संघाचं नियोजन, संघटना बांधणी, संस्थात्मक उभारणी हे सगळं समाजवाद्यांनी धडे घ्यावेत असं आहे. संघाचं सेवाकार्य अतिशय स्पृहणीय आहे. पण व्यवस्थेतील दोषांचं काय? ‘मी गरिबांना अन्न दिलं की मी संत होतो, पण मी जेव्हा गरीब गरीब का आहेत असं विचारतो तेव्हा ते मला कम्युनिस्ट म्हणतात’ असं एक प्रसिद्ध वचन आहे. मी डावीकडे झुकतो कारण माझ्या मनात प्रश्नांची साखळी निर्माण करण्याची क्षमता या विचारात आहे. मला ही विचारसरणी हताशही करेल, माझी गुंतागुंत वाढवेलसुद्धा – पण तेच तर अपेक्षित आहे. ‘जो तो आपलं नशीब घेऊन येतो’ या सुतासारख्या सरळ उत्तरापेक्षा अनेक धाग्यांचा गुंता समोर ठेवणं मला योग्य वाटतं. कारण आपलं जगणं, आपली व्यवस्था हे सगळं गुंतागुंतीचंच असतं. उजवा विचार किंवा कोणताही स्थितिवादी विचार जेव्हा सगळं झटकन सोपं करून टाकतो तेव्हा मला गंमत वाटते.
रावसाहेब कसबे यांनी त्यांच्या ‘झोत’मध्ये एक आठवण सांगितली आहे. ‘झोत’ हे त्यांचं संघाची चिकित्सा करणारं गाजलेलं पुस्तक. पुस्तक प्रकाशित झाल्यावर अपेक्षेप्रमाणे त्यावर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. मधुसूदन रामचंद्र जोशी या चिंचवडच्या तीस वर्षे संघात असलेल्या स्वयंसेवकाचं त्यांना पत्र आलं. ‘झोत’ समजायला कठीण आहे असं म्हणून त्यांनी लिहिलं होतं, “एवढा का हो समाजवाद अवघड आहे? हा भारतात कसा यायचा? संघ समजायला सोपा. राखी बांधा, मैत्री वाढवा…”.
हे उदाहरण बोलकं आहे. ज्यांना खोलात जायचं नाही आहे त्यांच्यासाठी संघ ठीकच आहे, पण ज्यांना खोलात बुडी मारायची आहे त्यांना संघात रमता येईल का याची मला शंका आहे. आर्थिक संरचना, उत्पादन-वितरणाची साखळी याला धक्का न लावता, माणसाच्या मूलभूत स्वार्थी प्रवृत्तीला व्यापक उद्दिष्टांसाठी ‘मोल्ड’ करायचा प्रयत्न न करता, आहे तीच व्यवस्था मान्य करून, या व्यवस्थेतील लोकांना राष्ट्रवाद आणि धर्माच्या आधारे एकत्र आणण्याचं काम संघाने केलं. यात त्यांनी मजबूत संघटना उभारली. डावी चळवळ इथे कमी पडली हे खरं आहे. संघाची स्थापना १९२५ सालची आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापनाही १९२५ सालचीच. पण संघाने जी संस्थात्मक उभारणी केली ती डाव्यांना करता आली नाही. म्हणजे ट्रेड युनियनच्या माध्यमातून खूपच प्रयत्न झाले, पण ज्यांच्याकरता संघर्ष करायचा त्यांना दुसरी पर्यायी व्यवस्था दिसली नाही की त्यांचा धीर सुटतो. ‘कारखाना कम्युनिस्टानेच काढावा’ असं म्हणतात, पण कम्युनिस्टांनी कारखाना काढल्याचं ऐकिवात नाही!
संघ या देशात मजबूत झाला याची जबाबदारी डाव्या समाजवाद्यांवर येऊन पडते कारण त्यांना पर्यायी विचार प्रभावीपणे पोचवता आलेला नाही, तसं प्रत्यक्ष कार्य करता आलेलं नाही असं कसबे यांनी ‘झोत’मध्ये म्हटलं आहे. हे अगदी बरोबर आहे. पण मला पुढे जाऊन असंही वाटतं की धर्म, जात, श्रद्धा, परंपरा या गोष्टी या देशाच्या डीएनएमध्येच आहेत. मुळात ‘प्रॉब्लेम आहे, बदल हवा आहे’ हे डावं मत आहे. आम जनतेला बदल नकोच आहे. सर्व प्रॉब्लेम्ससकट, श्रद्धायुक्त अंतःकरणाने जगणे हे जनतेचं साधारण सूत्र आहे. जनतेला मार्क्स काय म्हणतो यात रस नाही, जनतेला आकाशातल्या बापाचं वेड आहे. जनतेला आंबेडकर काय म्हणतात यातही रस नाही, त्यांना आंबेडकरांची पूजा बांधण्यात रस आहे. मंदिर बांधण्याची कल्पना त्यांना एकत्र आणू शकते, एकत्र चळवळ उभारायची कल्पना नाही. व्यक्तिस्वातंत्र्य, विज्ञान, तर्क या गोष्टी जनतेला कंटाळवाण्या वाटतात. त्यांना झी मराठीवरील मालिकाच बघायची असते. अमेरिकेतला पंचीविशीच्या आतला युवक फेसबुक निर्माण करतो आणि भारतात त्यातून ‘इंस्टंट ऑनलाइन दहशतवादी’ तयार होतात, जातींचे ऑनलाइन गट निर्माण होतात. धर्माधारित राष्ट्राचा विचार लोकांना आवडतो, पण विज्ञानाधारित जीवन ही कल्पना त्यांना समजू शकत नाही. इथे भावना ‘प्रधान’ आहे, विचार अधूनमधून ललकारी देण्यापुरते आहेत.
मी निराश होऊन बोलत नाही आहे. मला जी वस्तुस्थिती दिसते आहे ती साधारण अशी आहे. परिवर्तनाचा विचार इथे का रुजत नाही याचा विचार करताना मनात येणाऱ्या या गोष्टी आहेत. हा इथला जुनाच पेच आहे. याचा अर्थ या समाजात काहीच बदल घडले नाहीत असं अजिबात नाही. पण आपली नाळ इथे का जुळत नाही हे कळत नाही. त्यामुळे या समाजाचं काय करायचं याहीपेक्षा या समाजात आपण कुठे आहोत आणि आपण आपलं काय करायचं असा प्रश्न पडतो आहे!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.