सुरांचा धर्म (२)

भारतीय संगीतपरंपरा, सूफी, हिंदू-मुस्लीम संबंध
—————————————————————————–
धार्मिक उन्मादाच्या आजच्या वातावरणात भारताची ‘गंगा-जमनी’ संस्कृती, सर्व धर्मीयांचा सामायिक वारसा म्हणजे काय हे नीट उलगडून दाखविणाऱ्या, मुस्लीम संगीतकारांनी व राज्यकर्त्यांनी भारतीय संगीताला नेमके काय योगदान दिले हे साधार नमूद करणाऱ्या करणाऱ्या लेखाचा हा उत्तरार्ध –
—————————————————————————–

इब्राहिम आदिलशाह अकबर बादशहाचा समकालीन होता. अकबर शेख सलीम चिश्तीचा भक्त होता. पुढे तो सूर्यपूजक झाला. फक्त वीस वर्षांचे असताना अकबराने रीवा संस्थानचे राजे रामचंद्रांच्या पदरी असलेल्या तानसेनाला मोगल-दरबारात आणले. तानसेनाला त्याने `कण्ठाभरणवाणीविलास’ ही उपाधी देऊन त्याचा सन्मान केला. त्याच्या दरबारात `रामसागर’ ग्रंथाची रचना झाली. अकबर हा अत्यंत सुसंस्कृत राजा होता. बुद्धिमान होता. आपल्या जाणिवेचा विकास पंडितांच्या सहवासाने करण्याबरोबरच, अनेक कलावंतांना रागाबाबत नवे प्रयोग करण्याची त्याने प्रेरणा दिली. तानसेनाची `मियां की तोडी’, `मिया मल्हार’, रामदासचा `रामदासी मल्हार’सूरदासाचे सूरदासी मल्हार (मलार) धोंडू नायकाच्या धोंडूजी की मलार इत्यादी रागांची निर्मिती त्याच्या दरबारात झाली असावी. बृहस्पतींच्या मते मशहद व इराणी कलावंत अकबराच्या दरबारात होते. त्यांचाही सहवास भारतीय रागनिर्मितीस सहायक झाला असावा. संगीत-रत्नाकर सार्ङ्गदेवाच्या `संगीत-रत्नाकरावर’ बरीच चर्चा दरबारात होत असे. अकबराने पुढे सर्व धर्मांतील उत्तम तत्त्वांचा दीन-ए-इलाही धर्म स्थापन केला. मात्र त्याचे फारसे प्रचलन झाले नाही. मुद्दा असा की हा माणूस आपल्या कट्टरपंथीय समधर्मीपेक्षा वेगळा होता व भारतीय होता.
तसे बाबरापासून सवर्च मुघल-खानदान रसिक व साहित्य-कलागुणांची कदर करणारे होते. ज्या बाबराच्या नावाने `तेल लगाओ डाबर का, नाम मिटाओ बाबर का’यासारख्या स्तरावरून घोषणा देण्यात येतात, तो बाबर हा सतत संघर्षात असून आत्मपरीक्षण करणारा लेखक-कवी होता. त्याच्या `बाबरनामा’मध्ये तपशिलापेक्षा स्वतःला प्रश्न विचारणाऱ्या, स्वतःबद्दल शंका असणाऱ्या मनाची आंदोलने दिसतात. त्या काळात हस्तलिखित नकललेली पुस्तके सोन्याच्या भावात मिळत. बाबर आपल्या सगळ्या स्वाऱ्यांमध्ये कुठून कुठून अशी हस्तलिखिते जमा करीत असे. समरकंद, काबूल, दिल्ली या ठिकाणी बाबराने पुस्तकालये उभी केली. त्याचे अनेक सरदार-साथीदार लूटमार करून संपत्ती जमवल्यावर समरकंद, काबूलला परत गेले. मात्र बाबर म्हणत असे की मी हिंदुस्थान ओरबाडून घ्यायला आलो नाही. मी इथेच राहणार. म्हणून अनेक प्रियजनांचा विरह सहन करून तो दिल्ली, फतेपूर-सिक्री इत्यादी ठिकाणी राहिला. राजपुतांविषयी, हिंदू-धर्माविषयी निरीक्षणे नोंदवत त्याने राजपुतांशी मैत्री वाढवली व हिंदू धर्मीयांचा आदर केला. बाबराने हुमायूनला ताकीद दिली की हिंदू मंदिरांना हात लावू नये, उलट त्यांना मदतच करावी. आपल्या या मुलखात, या देशात, येथलेच होऊन रहायचे हा बाबराचा आग्रह अनेक पत्रांतून, बाबरनाम्यातून दिसून येतो.

सामाईक संस्कृतीची निर्मिती
या मुघल-परंपरेत अकबरानंतर जहांगीर (सलीम), शहाजहान यांनी संगीताला उत्तेजन दिले. जहांगीर हा संगीताच्या प्रत्येक अंगात निपुण होता व भारताच्या, मतंगाच्या मतांची चिकित्सा करणारा होता, असे एका धृपदात म्हटले आहे. शहाजहानच्या दरबारात बिलासखान, गुनसमन्तरखान, बिसरामखान, रंगखान, किशनखान असे गायक होते. औरंगजेबचा मोठा भाऊ दारा-शिकोह हा भारतीय दर्शनांचा अभ्यासक होता. काही उपनिषदांचे फारसीत अनुवाद करणे किंवा स्वतःच `अल्लोपनिषद्’ सारख्या रचना त्याने केल्या. दाराला ठार करून गादीवर आलेला औरंगजेबदेखील संगीताचा चाहता होता. बादशहा झाल्यावर पहिली आठ-नऊ वर्षे तो संगीतात रस घेत होता. त्याने रचलेली काही धृपदे ही डागर गायकी परंपरेत गातात. औरंगजेबाचा सेवक मिर्जा रोशनजमीरने 1666 मध्ये अहोबलाच्या`संगीत पारिजाता’चा अनुवाद केला. फकीरउल्लाने मानसिंग तोमरने संगृहीत केलेल्या `मानकुतूहल’ ग्रंथाचा`रागदर्पण’ हा अनुवाद केला. पुढे औरंगजेबाने 1667-68 मध्ये गायकांनी दरबारात यावे पण गाऊ नये असा हुकूम दला, तो सर्वस्वी राजकीय कारणांसाठी.
या सर्व काळात मुस्लिम म्हणून या शासकांनी भेदभाव, दुय्यमता, अत्याचार यांचा आश्रय घेतला होताही. मात्र आधीच्या लुटारू सुलतानांप्रमाणे इथल्या बहुसंख्य असलेल्या हिंदुधर्मीयांशी टोकाचा वैरभाव त्यांनी घेण्याचे टाळले – कारण बाबराच्या भाषेत, त्यांना याच देशात राहायचे होते. त्यांचा दुसरा मुलूख नव्हता. बादशहा-सुल्तानांच्या जुलमाचा फटका हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही नागरिकांना बसत होता. याच काळात मुस्लिम राज्ये मुस्लिम सुल्तानांच्या विरोधातही लढली;कट कारस्थाने केली. हा सवर्च काळ राजकीय-सामाजिक खळबळीचाही होता. या सर्वांत अनेक जुने बंध ढिले पडत होते, नवी रूपे तयार होत होती. मुस्लिम व हिंदू जग यांची रूपेही बदलली होती. वेगवेगळ्या गडद-धूसर सीमारेषा असल्या तरी सामाईक संस्कृती (सांझी संस्कृती)चे क्षेत्रही तयार होत होते. शास्त्रीय संगीत हे त्या सामायिक वारशातील एक महत्त्वाचा भाग बनत होते. या मध्ययुगीन व उत्तर-मध्ययुगीन संस्कृतीचा कोणतेही चष्मे न चढवता शोध घेणे हे या संस्कृतीचा प्रवास समजण्यास मदत करणारे आहे.
नंतरच्या मुघल बादशहांमध्ये मुहम्मदशाह (1719-46) हा संगीताच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या काळात धृपद गायकी अधिक विकसित झाली. तो मुहम्मदशाह `रंगीले’ म्हणून प्रसिद्ध झाला व अनेक बंदिशी – चीजा त्याच्या काळात बांधल्या गेल्या. तबला-सतार ही वाद्ये मुहम्मदशाह रंगीलेच्या काळात खुसरो खानने (अमीर खुसरो नव्हे) प्रथम तयार केली. त्यापूर्वी या वाद्यांचा उल्लेख आढळत नाही. सदारंग व अदारंग हे ख्यालीये होते. तेथूनच ग्वाल्हेर घराण्याची गायकी सुरू झाली असे मानतात.

मोगलांनंतर
मोगलसत्ता उताराला लागल्यावर लखनौ, बनारस, गुजरात इत्यादी ठिकाणी कलावंत गेले किंवा तेथील सुलतान-राजांनी त्यांना आश्रय दिला. अवधचा नवाब वाजिद अली शाह, रीवाचा राजा विश्वनाथसिंह, काशीचा राजा उदितनारायण, चरखारीचा राजा रतनसिंह, रामपूरचा नवाब महमदअलीखान हे सवर्च गुणग्राही शासक होते. वाजिद अली शाह कवी व गायक होता. लय-तालावर त्याची हुकूमत असल्याचे अनेक किस्से आहेत. शायरी-गाण्यापायी राज्य गमावल्याचेही त्याला दुःख झाले नाही. तो स्वतः उत्तम गायक होता. पखवाजवादक कुदोसिंह, जोतसिंह त्याच्या दरबारी होते. रोहिलखंडच्या (रामपूर) नवाबांकडे तर कित्येक गायक-वादक-नर्तक आश्रयास होते. नवाब हामीद अलीखान (1889-1930) हा धृपद, पखवाज, तबला, नृत्य यांत निष्णात होता व मुश्ताक हुसेन खान, अच्छनमहाराज, पं. भातखंडे, बीनकार वजीरखान, पखवाजवादक गयाप्रसाद, अयोध्याप्रसाद त्याच्या दरबारी होते. त्याच वंशातील छम्मनसाहेब यांनी पं. भातखंड्यांशी चर्चा केली. फलसफ-ऐ-मौसिकी (संगीताचे तत्त्वज्ञान) हा ग्रंथ त्यांनी लिहिला. विसाव्या शतकात रामपूर दरबारने बाबा अल्लाउद्दीन खां व हाफिज अली खां (अमजद अली खां यांचे वडील) यांसारख्या विलक्षण प्रतिभावंतांची देणगी दिली.
या काळापर्यंत ख्यालगायकी शास्त्रीय संगीताचा गाभ्याचा भाग बनली. ठुमरी, दादरा, चैती, कजरी, टप्पा, होरी यांसारख्या संगीतप्रकारांची निर्मिती झाली. सूफींच्या प्रारंभाच्या काळापासून कव्वाली लोकप्रिय झाली. या प्रत्येक प्रकारातली सांगीतिक मूल्यांची व अलंकारांची परस्पर देवघेव, संगीत अलंकारांची निर्मिती होत होती. हा सांगीतिक इतिहासही तेवढाच उपयोगी आहे.
धृपदगायन हा इथल्या संगीतातील अत्यंत परिष्कृत आविष्कार आहे. आलाप, जोड, आभोग, संचारी अशा स्वरांच्या उत्कट व विभिन्न आविष्कारा/शोधानंतर गत येते. इथे पखवाज (मृदंग)च्या साथीवर कविता (धृपद) असते. त्यात लय-तालाच्या सूक्ष्म-बृहत् अशा गुंतागुंतीच्या, नाजुक व बुद्धिमान प्रक्रिया असतात. धृपद परंपरेत डागर, खंडाहार, नोहार, गोहर अशा चार वाणी (घराणी) प्रसिद्ध आहेत. यांपैकी सर्वांत लोकप्रिय म्हणजे हरिदास स्वामींच्या परंपरेतील डागरवाणी. स्वामी हरिदास डागर हे 1505 पासून वृंदावनला विरक्तवृत्तीने विद्यादानात रममाण होते. डागरवाणीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात स्वरांच्या अत्यंत तरल पोतांचा व बिंदूंचा शोध असतो. पुढे डागरांचे वंशज जयपूरच्या नवाबाकडे होते व त्याच्या सेवेत होते. आख्ययिका अशी की त्या वेळी डागरांनी मुस्लिम नवाबाच्या हातचे खाल्ले म्हणून ब्राह्मणांनी त्यांना बहिष्कृत केले. त्यानंतर डागर घराणे `मुस्लिम’ झाले.
मात्र या डागरांची परंपरा ही स्वरसाधनेला परब्रह्माची व परमेश्वराची उपासना मानणारी आहे. धृपदातील नोम-तोम ही ओंकारयुक्त आराधना असते. सरस्वती, गणेश, शंकराची प्रतिष्ठा असते. मोहर्रममध्ये डागरांचे गाणे बंद असते. सामगायनापासून ते धृपदापर्यंतचा प्रवास डागरांनी (सध्याच्या पिढीपर्यंत तरी) जपून ठेवला आहे. स्व. झिया मोहियुद्दीन डागर हे भरतनाट्यशास्त्रातल्या किंवा संगीतातल्या सिद्धान्ताबद्दल चर्चा करीत. रहीम फईमुद्दीन डागर (दिल्ली) हे संगीताच्या विविधता, उदारतेबद्दल व त्याच्या विलक्षण स्वरूपाबद्दल भरभरून बोलताना या लेखकाने अनुभवले आहे. इराणमधल्या सूफी कवी रूमच्या मजनूच्या कैफियतीपासून तुलसीदासाच्या दोह्यापर्यंत संगीत कसे एकच आहे हे ते आपल्या मुलायम आवाजात दाखवत. अथर्वशीर्षातल्या उदात्त, अनुदात्त स्वरित सुरांपासून त्याचे सांगीतिक रूपांतर करत ते थेट रागसंगीतापर्यंतचा प्रवास सहज दाखवून जात. `सूर इतनी हसीन चीज है कि तू उसे छूना चाहता है, लेकिन वह तो देखने से मैली हो जाती है।’ असा संगीतातल्या सुराबद्दल डागर बांधवांचा दृष्टिकोण राहत आला.
डागरांच्या घरात भारतीय संस्कृतीचा असा विलक्षण आविष्कार पाहायला मिळतो. गेल्या पिढीतले एक डागर, निजामुद्दीन डागर आपल्या दुसऱ्या नावाने – मकरंद पांडे या नावाने देखील ओळखले जात. धृपदगायकीतील इतर परंपरादेखील लुप्त पावत असल्याचे दिसत असताना डागरांची नवी पिढी आता धृपद सादर करीत आहे. मात्र पिढीला तेवढीच तपश्चर्या, मेहनत व सखोलता आहे की नाही याबद्दल शंका आहे.
ख्यालगायकीची परंपरा तर विलक्षण आहे. ख्यालातील घराणी, उस्ताद-गुरू व शिष्य यांचा इतिहास आपल्या एकसाची व घट्ट कल्पनांना छेद देतो. मात्र त्याची संगीताची व जीवनाच्या मूल्यांची संस्कृती मात्र कोणत्याही धर्माच्या शुद्ध स्वरूपासारखीच आहे.
महाराष्ट्रातील स्वरपरंपरा
महाराष्ट्रात उत्तर हिंद्स्तानी घरंदाज संगीताची सुरुवात बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, भास्करबुवा बखले, रामकृष्णबुवा वझे यांच्याच जोडीने नंतर पं.विष्णु दिगंबर पलुस्कर यांच्यासारख्यांनी केली. भास्करबुवांचे पहिले गुरु फैझ महंमदखाँ होते. ग्वाल्हेरात भास्करबुवांनी या गुरूची मनोभावे सेवा केली व गुरूनेही त्याला पुत्रवत वागवले. हद्दूखां-हस्सूखां यांच्यापासून चाललेली स्वच्छ व स्पष्ट गायकीची परंपरा आहे. यात भूगंधर्व रहिमतखां हे एक विलक्षण प्रकरण होते. गोविंदराव टेंब्यांनी तर त्या आवाजाचे वर्णन करताना म्हटले, “त्या आवाजाचे, गायनाच्या सहजसौंदर्याचे, सहज-बाळबोध परंतु भारदस्तपणाचे, निर्मळ रसभरित तयार तानेचे – कशाकशाचे म्हणून वर्णन करायचे. खालपासून वरपर्यंत कृत्रिमतेचा लवलेश नाही. अत्यंत बाळसेदार, गुटगुटीत, गोंडस लहान मूल कसेही पडले, बसले, बागडले तरी त्याचे निर्व्याज मनोहारित्व कसलेल्या नर्तकीला व नटाला येऊ शकत नाही, त्याप्रमाणे खाँसाहेबांच्या गाण्याचे मनोहारित्व होते.’’ कोल्हापुरातील त्यांच्या एका बैठकीतील तानेचे वर्णन गोविंदराव करतात, “मधात बुडवून काढलेली बिनबियांच्या द्राक्षाची लडीच जणू. त्यात बीचा वा सालीचा पापुद्रादेखील नाही. लुसलुशीत व रसाने ओथंबलेली.’’
हे रहिमतखाँ हद्दूखां या ग्वाल्हेर गायकीच्या प्रमुख गायकांचे चिरंजीव. जात्याच गोड गळा. मात्र नंतर भ्रमिष्ट झाले. बनारसला मिठाईवाल्याच्या दुकानी बसून चार-दोन चीजा गाऊन चार-आठ आणे घ्यायचे व अफूची तल्लफ भागवायची. त्या काळात महाराष्ट्रातले सर्कसवाले विष्णुपंत छत्रे बनारसला गेले. ते संगीताचे जाणकार होते. रहितखाँना व्यसनाधीन अवस्थेत भटकताना त्यांनी आपल्याकडे आणले. चुचकारून, गोंजारून शेवटपर्यंत त्यांना ताब्यात ठेवले. भावासारखे वागवले. अफूचे व्यसन मर्यादित केले., त्यांना दररोज नियिमत गायनास बसवले. अशा अतुलनीय गायकाला माणसात आणून त्याची गायनकला प्रकाशात आणली. जिथे सर्कस जाई तिथे त्यांचे गाणे ठेवत;अशा रीतीने ते कोल्हापूरला आले. कोल्हापूरला विष्णुपंत व नंतर काशीनाथपंथ छत्रे व अखेरपर्यंत कुरुंदवाडकर संस्थानिकांच्या छत्राखाली हा गंधर्वलोकाऐवजी भूलोकात आलेला माणूस राहिला.
कोल्हापूरच्या शाहूमहाराजांच्या गुणग्राही व रसिक छत्राखाली अनेक गायकवादकांना आश्रय मिळाला; त्यांची संख्या खूप आहे. कोल्हापुरात गाण्या-बजावण्याचे प्रस्थही होते. देवल क्लब हे त्याचे दृश्य स्वरूप. मात्र संगीतातील गौरीशंकर म्हणून ज्यांचा टेंब्यांनी व अन्य तज्ज्ञांनी गौरव केला ते अंत्रौली – जयपुर घराण्याचे अल्लादिया खांसाहेब व त्यांचे दोन्ही पुत्र मंजीखां, भूर्जीखां. यांची गायकी या 1910 ते 1935-40 पर्यंत बहरली. अल्लादियाखांसाहेबांच्या गायकीचे वर्णन गोविंदराव व नंतर वामनराव देशपांड्यांनी केले आहे. त्यांच्या मते स्वर व लयीचा सुरेख व सूक्ष्म मेळ असलेले, भारदस्त, भरदार, सततप्रवाही व शुद्ध, सात्त्विक गाणे. असे गायन हे आपल्या घरंदाज गायकीतील शिखर ठरावे. अर्थात इतर घराण्यांच्या अभिमानींचा त्याला विरोध आहेच.
मात्र शाहू छत्रपतींनी या गायनमहर्षीला महाराष्ट्रातच थांबवले. ते त्यांना अत्यंत प्रेमळपणे व आदरभावाने वागवत. अल्लादियाखां यांचे तीनशे वर्षांपूर्वीचे पूर्वज मूळचे शांडिल्य गोत्रज ब्राह्मण. दिल्लीपती बादशहाच्या कारकिर्दीत त्यांचे जबरीने धर्मांतर झाले. मात्र खांसाहेबांची राहणी, वागणे-बोलणे हे सोवळ्या ब्राह्मणाला लाजवेल इतके निर्मळ होते. “गंभीर व भारदस्त प्रतिष्ठितपणा, ओतप्रोत विद्या असून वल्गना नाही. इतरांच्या कर्तबगारीला प्रोत्साहन देण्याची वृत्ती, निंदा, व्यसन नाही.’’ ही त्यांची वैशिष्ट्ये गोविंदराव सांगतात.
“भैय्या अल्लादियाखां, तुम्हारा जहाँ गला जाता है, वहाँ हमारी नजर भी नहीं जा सकती.’’ही समकालीन गवय्यांची प्रशस्ती जरी मिळाली, तरी मत्सर, असूया यांमुळे मुंबईच्या नझीरखाँ वगैरे वतनदार मंडळींना प्रकरण डोईजड वाटत होते. पुढे ते पुण्याला गेल्यावर बापूसाहेब कागलकरांनी त्यांचे गाणे ऐकून त्यांना शाहूमहाराजांकडे आणले. कोल्हापुरात अल्लादियाखांसाहेबांना अनेक शिष्य मिळाले. धोंडूताई कुलकर्णी, मुंबईला मोगुबाई कुर्डीकर आणि केसरबाई केरकर, नारायणराव बालगंधर्व ही काही नावे. मंजीखां व भूर्जीखां यांच्या अनेक शिष्यांपैकी मल्लिकार्जुन मन्सूर यांना कोण विसरेल!
कोल्हापूर, मिरज, धारवाड, कुंदगोळ, हुबळी हा परिसर त्या काळात जणू गाणारा मुलूख झाला होता. भारतातील अनेक गायकी परंपरा, महान गायक या पट्ट्यात येऊन राहिले किंवा निर्माण झाले. मुंबई हे आणखी एक प्रमुख केंद्र. बडोद्याला सयाजीराव गायकवाड हे अत्यंत गुणग्राही, पुरोगामी व रसिक वृत्तीचे शासक होते. बडोदा संस्थान व आपली प्रजा सुसंस्कृत, सुंदर व्हावी म्हणून या माणसाने कितीतरी दूरदर्शी उपक्रम राबवले. त्यांत `कलाभुवन’ ही संस्था होती. त्यात अनेक कलाकार होते. श्रीमंतांनी अनेकांना आश्रय दिला. किराणा घराण्याचे प्रवर्तक अब्दुल करीमखां व त्यांचे भाऊ वहीद खां तरुणपणी बडोदा दरबारात होते. अत्यंत सुसंस्कृत, अदबशीर व तयारीचे गवई म्हणून त्यांची ख्याती पसरत होती. महाराजांना गाण्याची जाणकारी होती. तयांच्या महाराणीसाहेब चिमणाबाई व राजमाता जमनाबाई यांनाही त्यांचे गाणे आवडायचे, म्हणून त्यांना देवासमोर गायला बोलावले. अब्दुल करीम खांसाहेबांची भजने इतकी उत्कट असत की त्यामुळे भजनांचा बाजही अधिक शास्त्रीय झाला. `अब की टेक हमारी – लाज राखो गिरधारी’ या भजनापासून `घालिन लोटांगण – वंदीन चरण’, `तुम मेरी लाज राखो हरी। तुम जानत सब अंतयार्मी’, `तूही जग जननी, तू ही दुःखहरिणी – तूही ज्वालामुखी, तूही माता सरस्वती’ अशा काव्यांना-भजनांना खांसाहेबांनी लोकप्रिय बनविले.
करीमखांसाहेब शास्त्राचे विद्वान होते. संगीताचे जग हे एक स्वतंत्र विश्व आहे, त्यात त्याचे नेम-धर्म असतात, त्याची परंपरा असते हे सहजपणे त्यांच्या बोलण्यात येई. 1890 च्या शेवटच्या वर्षांमध्ये आपली भूमिका सांगताना ते म्हणतात, “हिंदू और मुसलमान धर्म में मंत्र में भी सूर व लय है। हमारे `ला इलाह इल्लिला’ व आपका `ओम नमः शिवाय’ यह मंत्र में भी सूर व लय है। सूर के बिना ईश्वर-अल्ला खूष होता ही नहीं। हमारे गायन-वादन की कला वेदों से चली आ रही है.. मेरे बुजुर्गों ने ईश्वर माना है… हमारे कुलपुरुष नायक धोंडू व नायक मन्नू थे। दोनों भी ग्वालियर के राजा के पास थे। दोनों ही मथुरा जाकर श्रीकृष्ण के द्वारपर भक्तिगीत गाते थे। इन जाति-धर्म के झगडे में हम पडते नहीं… गाने के बारे में आप कहे तो धमार, धृपद, होरी, टप्पा, ठुमरी सब आपको सुना सकते हैं। कहे तो काठियावाड का गरबा सुनायेंगे।’’
बडोद्याच्या सरदार माने यांच्या उपपत्नी हिराबाईंना संगीत शिकवताना त्यांची मुलगी ताराबाई यादेखील करीमखांच्या शिष्या झाल्या. पुढे गायकबंधू प्लेगमुळे बडोद्यातून मिरज-कोल्हापूर, औंधकडे आल्यावर त्याही त्यांच्याबरोबर आल्या. पुढे त्यांनी रीतसर त्यांच्याशी निकाह लावला – ताराच्या ताहेराबी झाल्या – 1902 नंतर या जोडप्याला झालेली अपत्ये संगीताचे समर्थ वाहक ठरली. अब्दुल रहमान (ऊर्फ सुरेशबाबू माने), चंपाकली ऊर्फ हिराबाई बडोदेकर, गुलाब (कमलबाई), सकीना ऊर्फ सरस्वतीबाई राणे यांनी भारतीय संगीताचा वारसा अधिक समृद्ध केला. खांसाहेबांचे संपूर्ण चरित्र याच संगीताच्या व भक्तीच्या आयामात होते. म्हणून इतर धर्म, जात हे आयाम फारच गौण होते. त्यांच्या गायकीने हिंदुस्थानी संगीतात सुरांच्या उत्कटतेचे नवे विश्व तयार केले. रामभाऊ कुंदगोळकर (सवाई गंधर्व) व त्यानंतर भीमसेन जोशी, गंगुबाई हनगळ, बसवराज राजगुरु व अन्य अनेक वारसांनी किराणा गायकीचा वारसा कायम राखला. `गोपाला मेरी करुणा क्यूं नहीं आवे’ हे फजन अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणते. त्याचबरोबर विष्णु नारायण भातखंड्यांबरोबर संगीतातील श्रुती`दाखवण्याचे’ जाहीर कार्यक्रमही ते करीत होते. मिरजेच्या खाजा शमन्नापीरांच्या दर्ग्यात त्यांची नियमित हजेरी असे. योगी अरविंदांवरही त्यांची श्रद्धा होती.
या संगीताच्या धर्माच्या परीक्षेची एकदा वेळ आली व त्याला खांसाहेबांनी कसे उत्तर दिले ते फार उद्बोधक आहे. पं. विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी 1908 मध्ये गांधर्व महाविद्यालय लाहौरला सुरू केले होते. गाण्यापेक्षा जास्त गाण्याच्या संघटनावर त्यांचा भर होता. मुस्लिम गवयांनी गायनाचा बाज बदलून तो बाजारू केला असा त्यांचा आरोप होता. सोलापूरला गांधर्व महाविद्यालयाच्या प्रचारार्थ त्यांचा जलसा होता. ते गाताना खूप भाषण देत. सोलापूरच्या भाषणात ते म्हणाले, “आपली प्राचीन विद्या या मुसलमान गवयांनी बाटवली आहे. ती यांच्या मगरिमठीतून सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे.’’ इत्यादी.
या भाषणावर खांसाहेबांच्या बरोबरीचे गायक-वादक चिडले. अब्दुल हक, राजण्णा वगैरे विरोधासाठी उठले. खांसाहेब शांतपणे आपल्या लोकांना म्हणाले, “नहीं ऐसा नहीं करना चाहिए। नहीं तो वे कहते है वैसे ही सब लोग समझेंगे। उनको प्रत्यक्ष क्रिया से ही जवाब देंगे।’’ मग आपल्या चाहत्यांशी विचारविनिमय करून खांसाहेबांनी बेळगांवात 10 मे 1910 मध्ये `आर्य संगीत विद्यालया’ची स्थापना केली. या वेळी बेळगावमधील गंगाधरराव देशपांडेंसहित अनेक चाहत्यांनी गर्दी केली. आपली दोन मुले – अब्दुल रहमान व चंपाकली (सुरेशबाबु-हिराबाई) यांच्या मुलांनी शारदास्तवन केले. विष्णु दिगंबरांच्या आरोपाची दखल घेऊन यावेळी करीम खांसाहेब यांनी गायकांतील व्यसनीपणा, दुर्गुणावर टीका केली. ते म्हणाले, “गवईलोक प्रायः व्यसनी, आळशी, अशिक्षित व तबियतखोर आणि शिकवण्यास नालायक ठरल्याने सुशिक्षित वर्गाचे तिकडे दुर्लक्ष होत आहे. या कलेचा सशास्त्र अभ्यास व व्यावहारिक शिक्षण नसेल व सुशिक्षितांची अभिरुची नसेल तर या ऋषिप्रणीत गायनकलेचा अस्त होईल.’’
आग्रेवाले फैयाजखां हे प्रेमपिया नावाने बंदिशी बांधत. पतियाळा पद्धतीचे ज्येष्ठ गायक बडे गुलामअलीखां यांनी `वंदे नंदकुमारम्’, `हरिः ओम तत्सत्’सारख्या रचना लोकप्रिय केल्या. असंख्य हिंदू गायकगायिकांना मुस्लिमांचे शागीर्द होण्यास कमीपणा वाटत नसे. अमान अली भेंडीबाजारवाले यांच्याकडून वसंतराव देशपांडे. जितेंद्र अभिषेकींनी अनेक अलंकार, तानांचे प्रकार घेतले. नझीरखां भेंडीबाजारवाल्यांकडे अंजनीबाई मालपेकर शिकल्या. अंजनीबाईंना सर्व कलावंत मानत. बालगंधर्व, कुमार गंधर्वांपासून गुलामअली व अमानअली त्यांचा आदर करीत व त्यांच्याकडून काही घेत.
याच परंपरेत रामपूरचे मैंहर घराण्याचे बाबा अल्लाउद्दीन खान हे विलक्षण प्रतिभावंत व्यक्तित्व होते. बाबांवर काही पुस्तके व काही माहितीपटही निघाले. त्यांची म्हैसूरच्या देवीवर श्रद्धा होती. संगीत व अध्यात्माचा संबध लावणाऱ्या अल्लाउद्दीन खान यांच्याकडे अन्नपूर्णा, मोरमा व सरस्वती. पैकी अन्नपूर्णादेवींनी रविशंकरांशी विवाह केला. नंतर ते वेगळे झाले. आज अली अकबर खां यांचे अमिरकेत कॅलिफोर्निया येथे संगीतविद्यालय आहे. त्यात सरस्वती, गणपती, लक्ष्मी, ब्रह्मा यांच्या तसिबरी आहेत. खांसाहेब तर संगीताची उत्पत्ती ब्रह्मा व सरस्वतीपासून मानतात.
हे सर्व विश्लेषण, वर्णन तंतोतंत बरोबर आहे की नाही हा मुद्दा वेगळा आहे. या सर्वच उदाहरणांचे तात्पर्य आहे की माणसाच्या दैनंदिन किंवा निर्मितिक्षम आयुष्यात तुमचा धर्म, जात किंवा इतर उपाधी निरर्थक ठरतात. त्या नसाव्यातच असे नाही. सर्वच संगीतकारांची व गायकांची आपल्या धर्मावर, गुरूंवर अपंरपार श्रद्धा आहे. ही श्रद्धाच त्यांना अधिक जाणते, डोळस बनवते. आपला ईश्वर हाच दुसऱ्याचा ईश्वर आहे व दुसऱ्यांचा तो आपलाही असतो, हा आध्यात्मिक भाव या निर्मितिक्षमतेत राहत आला आहे. संगीत ही त्या परमतत्त्वाची उपासना आहे हे सर्वच जाणतात. म्हणून मुस्लिम गवई कृष्ण-गोपींच्या होरी-ठुमऱ्या गातात, बड़े गुलाम अली खां `ओम् तत्सत्’ गातात;जसराज `मेरो अल्ला मेहरबां’चा अहिरेभैरव गातात. `अब मेरी नैया पार करो’– हजरत निजामुद्दीन औलिया ही तोडीतील बंदिश किंवा`पार करो अरज सुनो – हिंद के पीर ख्वाजा मोईनुद्दीन’ मध्ये पूरिया धनश्रीचे सूर वाहत जातात.
याहून मोठी बाब म्हणजे कोणतीही लोकांची – देशाची संस्कृती एका काळामध्ये – गटामध्ये सीमित राहत नसते. कोणतीही एक संस्कृती त्याच्या विचारांबाबतीत व व्यवहारांबाबत सतत देवाण-घेवाण करत असते. `मुस्लिम धर्म अरब-इराणचा राहत नाही; भारतीय मुस्लिम वेगळे होतात – इथल्या भूगोल – वस्तुस्थितीमुळे व हिंदूंसह इतर समाजांच्या संपर्क-प्रभावातून विचार व्यवहारात बदल होतात. तोच प्रकार हिंदूंचा आहे. एका विशिष्ट गटाचा एका विशिष्ट काळातला आचार-विचार म्हणजे हिंदुत्व वा भारतीयत्व आहे असे मानणे अनैतिहासिक व अवास्तव आहे. अशी सांझी संस्कृती ही समकालीन व वास्तव संस्कृती असते. स्वतःची मूल्ये कायम ठेवून नव्या, `इतर’ गोष्टी सामावून घेऊन संस्कृती वाढत, समृद्ध होत जाते. हेच भारतातला सुरांचा प्रवास सांगतो.

संदर्भ :-माझा संगीत व्यासंग – गोविंदराव टेंबे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, 1984. – मुसलमानी आमदानीतील भारतीय संगीत – आचार्य कैलासचंद्र देव `बृहस्पती’, अनुवाद – मा.कृ.पारधी, म.रा.सा.सं.मं., मुंबई 1985. – घरंदाज गायकी – वामनराव देशपांडे, मौज प्रकाशन, मुंबई, 1985. – अब्दुल करीम खां यांचे जीवनचरित्र – बाळकृष्ण कपिलेश्वरी, सरस्वती संगीत विद्यालय, मुंबई, 1972

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.