‘हाजी अली सर्वांसाठी’: एक अनावृत्त पत्र

स्त्रीहक्क, हाजी अली, सुफी पंथ

दि. १३ मे २०१६
प्रति,
विश्वस्त,
हाजी अली दर्गा विश्वस्त मंडळ,
वरळी, मुंबई

हाजी अली दर्ग्याच्या विश्वस्तांनी ह्या प्रश्नांना उत्तरे दिलीच पाहिजेत.

महोदय,
सर्वांना आमचा सलाम व शुभेच्छा.
‘हाजी अली सब के लिये’ ह्या आमच्या गटाच्या प्रतिनिधींनी विश्वस्तमंडळ सदस्यांना भेटून हाजी अली साहेबांच्या दर्ग्यात प्रवेश करून त्यांना मजार पर्यंत जाण्याचा स्त्रियांनाही पुरुषांइतकाच हक्क असला पाहिजे ह्या मुद्द्यावर चर्चा करून त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्याचा खूप प्रयत्न केला आहे. आमच्या गटाचे सदस्य नसलेले काही शुभेच्छुक मुस्लिमही विश्वस्तांच्या संपर्कात असून त्यांच्याबरोबर बैठक घेण्याची आमची विनंती त्यांनाही मान्य आहे. परंतु दुर्दैवाने गेल्या काही आठवड्यांपासून विश्वस्तांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरेच मिळत आहेत. त्यामुळे हे खुले पत्र लिहिणे आम्हाला भाग पडले आहे. आम्ही वे वारंवार सांगत आलो आहोत की एखाद्या संताच्या मजारपर्यंत स्त्रियांनी जाण्याचा प्रश्न हा धार्मिक मुद्दा नसून केवळ परंपरेचा, रूढीचा भाग आहे आणि तो भारतीय संविधानातील समानतेच्या व लिंगसमन्यायाच्या तत्त्वांवर कुरघोडी करू शकत नाही. (स्त्रियांशी भेदभाव करण्याच्या उद्देशाने अल्पसंख्यकांच्या हक्कांसाठी संविधानात नमूद केलेल्या अनुच्छेद २५ व २६ च्या मागे लपणे म्हणजे त्याच संविधानाच्या अनुच्छेद १५ ची टर उडवणे होय.)

असे असूनही गेल्या काही आठवड्यांपासून विश्वस्तांकडून करण्यात आलेली अनेक विधाने व मुद्रित व इलेक्ट्रॉनी माध्यमांमध्ये आलेल्या त्यांच्या मुलाखती ह्यांच्यामधून त्यांनी हा मुद्दा शरिया किंवा इस्लामी कायद्याचा असल्याचे वारंवार प्रतिपादन केले आहे. ह्या पार्श्वभूमीवर, आमच्या मंचातील (हे एक आंतर-सांप्रदायिक व्यासपीठ आहे) मुस्लिम सदस्य हाजी अली दर्ग्याच्या विश्वस्तांबरोबर महिलांना समान हक्क नाकारण्यात कोणत्या इस्लामी कायद्याचा आधार घेण्यात आला आहे, ह्या प्रश्नावर खुला वादविवाद करू इच्छितात.

विश्वस्तांनी त्यांच्या बाजूने बोलायला येणाऱ्य़ा कोणत्याही दोन मौलानांची किंवा अलीमांची नावे द्यावीत, आम्ही त्यावर आमच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या दोघांची नावे देऊ.

हे सर्व प्रस्ताव सदिच्छेने मांडत असतानाच, मागील अनुभव लक्षात घेता, आम्हालाट्रस्टींकडून सकारात्मक प्रतिसादाची फारशी आशा नाही, हेदेखील आम्ही खेदाने नमूद करीत आहोत. वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत कसलेच स्पष्टीकरण न देता त्यांचा निर्णय ‘इस्लामिक कायद्यानुसार’ आहे, एवढेच वारंवार सांगितले आहे.म्हणून आम्ही ह्या पत्रातून आपल्यासमोर काही प्रश्न ठेवत आहोत ज्याद्वारे ह्या प्रश्नांवर अधिक स्पष्टता येऊ शकेल. आम्हाला वाटते, ह्यावरील आपली उत्तरे प्रसिद्ध करण्यात प्रसारमाध्यमांनाही स्वारस्य असेल.

प्रश्न १. पुरुषांनी किंवा स्त्रियांनी कोण संताच्या मजारचे दर्शन घेण्याबाबत कुराण काहीच म्हणत नाही. हो की नाही?
प्रश्न २. स्त्री व पुरुष ह्यांचा समान आध्यात्मिक अधिकार आणि व्यक्तिगत उत्तरदायित्व ह्याबद्दल कुराणाने वारंवार सांगितले आहे, हो की नाही?

कुराण म्हणते –
(१) मुस्लिम स्त्री पुरुषांसाठी, विश्वास ठेवणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी, धीर धरणाऱ्या आणि सातत्य असणाऱ्या स्त्री- पुरुषांसाठी, नम्रतेचा अंगीकार केलेल्या स्त्री- पुरुषांसाठी, दानधर्म करणाऱ्या स्त्री-पुरुषांनो, उपवास करणाऱ्या स्त्री- पुरुषांसाठी, अव्यभिचारी आणि परमेश्वराची स्तुती करणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी –त्या दोघांसाठी — परमेश्वराने क्षमा आणि थोर पुरस्कार निर्माण केला आहे. (३३.३५)

(२) हे मानवजाती, आपल्या पोशिंद्याची जाणीव ठेव. एका सजीवातून (नफ) ज्याने तुमची उत्पत्ती केली आणि त्यातूनच त्याचा जोडीदार निर्माण केला आणि ज्यातून अनेकविध मनुष्ये निर्माण होऊन सर्वदूर पसरली (४.१) (येथे किंवा कुराणात अन्यत्र कोठेही हव्वा ही आदमच्या बरगडीपासून निघाली असल्याचा उल्लेख नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.)

(३) जे कष्ट करतात, जे माझ्यासाठी कष्ट करतात अशा कोणाकडेही मी दुर्लक्ष करीत नाही, मग ती स्त्री असो वा पुरुष. ते दोघेही एकमेकांना समान आहेत.

प्रश्न ३. इस्लामच्या सुरुवातीच्या काळात पैगंबरसाहेबांनी स्त्रिया व पुरुष ह्या दोघांनाही कबरींना भेट देण्यास प्रतिबंध केला असला, तरी नंतरच्या काळात त्यांनी त्या दोघांनाही तसे करण्यास उत्तेजन दिले. हो की नाही?
हादित
(१) हजरत आयेशा नेहमीच त्यांच्या भावाच्या कबरीला भेट देत असत . एकदा अब्दुल्ला इब्न अबी मुलैका ह्याने त्यांच्याकडे अशी विचारणा केली की, पैगंबरांनी कबरींना भेट देण्यास मनाई केली होती का? तेव्हा त्या म्हणाल्या, “ होय. सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांनी तशी मनाई केली होती. परंतु नंतर त्यांनी आम्हाला तसे करण्याचा आदेश दिला.” पैगंबरांच्या अनेक परंपरांमधून ह्या गोष्टीला पुष्टी मिळते. “मी तुम्हाला कबरींना भेट देण्यास मनाई केली होती, परंतु आता मी तुम्हाला त्यांना भेट देण्यास उत्तेजन देत आहे.” (साहिह मुस्लिम, सुनान अबू दाऊद आणि मुसनाद आहमद, नसाई).

(२) पैगंबर –“पूर्वी मी तुम्हाला कबरींना भेट देण्यास मनाई केली होती. परंतु आतापासून तुम्ही त्यांना भेट देऊ शकता.” (मुस्लिम जनैझ, १०६; अदाही३७; अबू दाऊद, जनैझ , ७७; ,…)

प्रश्न४. पैगंबरसाहेबांनी कबरींना भेट देण्यास त्यांच्या अनुयायांना दिलेले उत्तेजन हे इबरतसाठी (भूतकाळावरून धडा शिकणे), तेही एक दिवस मृत्युमुखी पडतील आणि त्यांच्या कर्मासाठी त्यांना व्यक्तिशः जबाबदार धरले जाईल ह्याची आठवण म्हणून नव्हते काय?हो की नाही?इबरत हे फक्त पुरुषांसाठी आहे, स्त्रियांसाठी नाही असे विश्वस्तांचे म्हणणे आहे काय?हो की नाही?

ह्याचे उत्तर जर होय असेल, तर विश्वस्तांचे असे मत आहे काय की हजरत आयेशा ह्यांचे त्यांच्या भावाच्या कबरीला भेट देणे इस्लामी कायद्याच्या विरुद्ध होते?

प्रश्न ५. हे खरे नाही काय की पैगंबरसाहेबांचे दफन, त्यांची पत्नी हजरत आयेशा जेथे राहात होती त्या घरातील एका खोलीतच करण्यात आले होते आणि त्यानंतर तिचे वडील हजरत अबू बकर (पहिले खलीफा) आणि हजरत उमर (दुसरे खलीफा) ह्या दोघांनाही पैगंबरसाहेबांच्या शेजारीच चिरविश्रांती देण्यात आली. हो की नाही?

हे जर खरे असेल तर ही गोष्ट तथाकथित इस्लामी कायद्यानुसार मुस्लिम स्त्रियांनी सत्पुरुष वा संताच्या कबरस्थानाला किंवा मजारला भेट देण्याविषयी किंवा न देण्याविषयी काय सांगते?

प्रश्न ६. हे खरे नाही काय की दर वर्षी मक्केला किंवा मदिनेला जाणारे लाखो स्त्रीपुरुष एकाच दर्ग्यात एकमेकांशेजारी बसून प्रार्थना करतात. हो की नाही?

जर उत्तर होय असेल तर ते काय इस्लामिक कायद्याचे उल्लंघन म्हणायचे काय?

प्रश्न ७. हे खरे नाही काय, की ज्या स्त्रिया मदिना येथील पैगंबरसाहेबांच्या, नज्फमधील हजरत आली (चौथे खलिफा) ह्यांच्या, करबला येथील इमाम हुसैन (पैगंबरसाहेबांचे शहीद झालेले नातू ) ह्यांच्या, सय्यद अब्द अल कादिर अल-जिलानी (घौस –ए-पाक) ह्यांच्या कबरींना भेट देतात (ह्यातील शेवटच्या तीन इराकमध्ये आहेत), त्यांच्यावर पुरुषांइतकीच बंधने किंवा त्यांच्याइतकेच स्वातंत्र्य आहे? ह्याचा अर्थ असा होतो कीमुस्लीमांच्या सर्वांत पवित्र स्थळांचे व्यवस्थापन करण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्या व्यक्ती मुस्लीम कायद्यांचे उल्लंघन करीत आहेत; हो की नाही?

प्रश्न ८. हे खरे नाही काय, की संपूर्ण भारतीय उपखंडातील नसला तरी भारतातील सर्वात श्रद्धेय सूफी संत, ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती (गरीब नवाज) ह्यांच्या अजमेर येथील दर्ग्यात लिंगाधारित भेदभाव नाही आणि तेथे स्त्रिया थेट मजारीपर्यंत जाऊ शकतात. हो की नाही?

प्रश्न ९. स्त्रियांनी हाजी अली दर्ग्यामध्ये का येऊ नये याबाबत विश्वस्तांनी दिलेल्या कारणांमध्ये त्यांच्याच सुरक्षा व सुरक्षिततेसाठी, असे म्हटले आहे. हे खरे नाही काय की मक्का, मदिना, नज्फ, करबला व अजमेर येथील लाखो भाविकांच्या गर्दीच्या तुलनेत हाजी अलीला भेट देणारी गर्दी काहीच नाही.

हे जर खरे असेल तर त्याचा अर्थ असा नव्हे काय की त्याचा इस्लामी कायद्याशी काहीच संबंध नाही? त्यातून जर काही अर्थ निघत असेल तर एवढाच, की हाजी अली दर्ग्यातील गर्दीची व्यवस्था पाहण्यासाठी अधिक कार्यक्षम लोकांची नियुक्ती करण्यासाठी सध्याच्या विश्वस्तांनी तेथून बाहेर पडावे.

प्रश्न १०. स्त्रियांनी दर्ग्यात येऊ नये ह्यासाठी विश्वस्तांनी दिलेले आणखी एक कारण असे आहे की स्त्रिया मोठ्या गळ्याची पोलकी घालून येतात व मजारवर झुकल्यावर त्यांची छाती दिसते. ‘उनको उनके पल्लूका होश नहीं रहता है.’ आता हा शेरा प्रत्यक्ष स्त्रियांपेक्षा, दर्ग्याच्या आतल्या बाजूला भाविकांची व्यवस्था लावण्यास जबाबदार व्यक्तींच्या चंचल नजरेवरच अधिक नाही काय? की त्यांना असे सुचवायचे आहे, की स्त्रिया तेथे येतात त्या त्यांच्या अतीव श्रद्धेय अशा हाजी अली बाबाच्या प्रति असलेल्या भक्तिभावाने येत नसून आपली शरीरे दाखवण्यासाठी येतात?

प्रश्न ११. स्त्रियांना त्यांची जागा दाखवून देण्याच्या बाजूचे असलेले काही मुस्लिम लोक हलक्या आवाजात त्या अशुद्ध असताना मजारवर न जाण्याविषयीची चर्चा करीत आहेत. ह्यावर हजरत आयेशा ह्यांचाच एक हादित पाहा – मासिक पाळी सुरू असताना पैगंबरसाहेब माझ्या मांडीवर डोके टेकून कुराणाचे पठण करीत असत. (बुखारी, खंड १, पुस्तक ६ क्र. २९६) ह्यावरून काय ते स्पष्ट होत नाही का? हो की नाही ?

बरे, पुरुष जेव्हा दर्ग्यात जातात तेव्हा त्यांच्या शुद्धाशुद्धतेची पारखकोण करते? स्त्रियांनी दर्ग्यात केव्हा जाणे उचित आहे याबाबत त्यांनी पुरुषांकडून धडे घ्यायला हवे आहेत काय?

प्रश्न १२. हाजी अली दर्ग्याच्या ७ विश्वस्तांपैकी एकही स्त्री नाही. अशा रीतीने स्त्रियांना तुमच्या विश्वस्तमंडळाचा भाग बनण्यास प्रतिबंध करणाराही काही इस्लामिक कायदा आहे काय? की हे फक्त सरळसरळ कायम चालत आलेल्या पुरुषप्रधानतेचेच द्योतक आहे? हो किंवा नाही ते सांगा.

प्रश्न १३. असेही असू शकते की हे विश्वस्त इस्लामच्या अंतर्गत असलेल्या दोन अगदीच परस्परविरोधी परंपरांची सांगड घालण्यात गुंतले आहेत. एक आहे – सर्वांना सामावून घेणारी, सहिष्णु अशी सूफी परंपरा आणि दुसरी आहे ताठर, अपवर्जक (exclusive), असहिष्णु अशी वहाबी परंपरा. हो की नाही?

प्रश्न १४. सैयद लियाकत हुसैन मोइनी हे अजमेरशरीफ येथील दर्ग्याच्या खादिम (कब्जेदार) कुटुंबातील आहेत. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियातील एका मुलाखतीत असे म्हटले आहे की “अजमेर येथे भक्तांच्या कोणत्याही गटाच्या विरोधात भेदभाव केला जात नाही कारण सूफी संतांच्या थडग्यांमध्ये नेहमीच सहकारिता, समन्वय व समावेशकता ह्यांना स्थान दिले जाते. म्हणून पवित्र अशा हाजी अली दर्ग्यात जाण्यापासून महिलांना रोकणे योग्य नाही.” म्हणजे दर्ग्यात महिलांना प्रवेश रोकणे सूफीवादाच्या विरुद्ध जाण्यासारखेच आहे. हो की नाही?

आता सूफी परंपरेबद्दल बोलायचे तर आम्ही काही नाही तर माजी पाकिस्तानी नोकरशहा अकबर अहमद ह्यांच्या Journey into Islam ह्या पुस्तकातील एक अनुभव सांगू शकतो. अमेरिकेतून एक बहुधर्मीय संशोधन गट अजमेर शरीफला भेट देण्यास आला तेव्हाचा हा अनुभव आहे.

“आम्ही सर्वांनी आमची डोकी कापडांनी झाकली. फ्रॅंकीला आणि मला डोक्याभोवती गुंडाळायला पागोट्याप्रमाणे भडक गुलाबी रुमाल देण्यात आले होते. हादियाने हिजाब घातल्यामुळे ती आधीच योग्य पेहरावात होती. हेलेनेही पारंपरिक इस्लामी पोशाख करून डोकीस रुमाल बांधला होता. आमचा भारतातील गाइड त्रिविदेश सिंग तर नेहमीच पागोटे घालायचा.

दर्ग्याचा प्रतिपालक आणि ख्वाजा मोइनुद्दीन ह्यांचा थेट वारस मुकद्दस मोइनी आमच्याबरोबर होता. त्याने, लाल गुलाब आणि पांढरी फुले ह्यांची वर्तुळाकार रचना केलेली एक पसरट परडी आणून ती हेलेच्या डोक्यावर ठेवण्यास सांगितले. म्हणजे आता ती संताच्या समाधीवर पुष्पाभिषेकाचा विधि करू शकणार होती. हा मोठा मान असल्याचे मला माझ्या मागील भेटीतच मला कळले होते. फारच स्मरणीय क्षण होता तो. एका तरुण ख्रिस्ती स्त्रीला एका मुसलमान संताला मान देण्यासाठी निवडण्यात आले. हे खरे अजमेर मॉडेल!

हेलेच्या मागून आम्ही सर्व एका रांगेत दर्ग्याच्या गाभाऱ्यात गेलो. धक्के देत आत जाणाऱ्या गर्दीचाच एक भाग बनलो होतो आम्ही. रांग मोडल्यावरही आम्ही तेथेच प्रार्थना करण्यासाठी शांतपणे बसलो. तेव्हाही मुस्लिम, शीख व ख्रिस्ती असलो, तरी आम्ही तेथील भारावलेल्या आसमंताशी एकरूप होऊन गेलो होतो. तसे पाहिले तर निव्वळ यात्रेकरू होतो आम्ही. परंतु अजमेरच्या त्या दैवी अवकाशाने आम्हाला आपल्यात सामावून घेतले.

हेलेसाठी तर डोक्यावर ती परडी धरणे हा अगदी भारावून टाकणाराच अनुभव होता. “मला तिथल्या प्रत्येकाची ऊर्जा व स्पंदने जाणवत होती. माझी ऊर्जा जणू काही अखिल मानवजातीशी जोडली गेली, समाधीवर अभिषेकाच्या लाल गुलाबाच्या पाकळ्यांनी जणू मी आकाशातील तारे आणि समुद्राची पुळण ह्यांच्याशी जोडली गेले. ते थडगे, माझे शरीर, आकाशातील सर्व रंग आणि समुद्राकाठची सारी वाळू तदाकार होऊन एका पोकळीत सामावले. मी वेगळी राहिलेच नाही. मी माझ्या, त्या एकमेव परमेश्वराच्या सान्निध्यात होते.” ती म्हणाली.

तेव्हा, स्त्रिया आणि त्यांचा श्रद्धेय हाजी अली बाबा ह्यांच्यात दरी निर्माण करण्यापेक्षा, स्त्रिया शरीरप्रदर्शन करतात असा कांगावा करण्यापेक्षा, हे विश्वस्तांनो, तुम्ही मजारजवळ असे वातावरण तयार करा, जेथे धर्म आणि संस्कृतीचा संकर होऊन मुमताज, मीरा व मेरी ह्या सर्वांनाच हेलेसारखाच गूढ, भारावलेला अनुभव येईल. हो की नाही?

आपले नम्र,
मुमताज शेख, शबाना अन्सारी, मरियम ढवळे, नसरीन कॉन्ट्रॅक्टर, जावेद आनंद, फिरोज मिठीबोरवाला, हसन कमाल, रामदास अब्बास, शहनाज खान, कादेर काझी.
‘हाजी अली सगळ्यांसाठी’ मंचाच्या सदस्यांच्या वतीने
जावेद आनंद फिरोज मिठीबोरवाला
९८७०४०२५५६ ९८२९२७७७५१
(अनुवाद: अनुराधा मोहनी )

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.