साक्षात्कारांमागील वैज्ञानिक सत्य (भाग १)

कोट्यावधी माणसे शेकडो वर्षांपासून देवाची उपासना, तसेच विविध प्रकारची आध्यात्मिक साधना करीत आले आहेत व त्यातून त्यांना ‘बरे वाटते’ असा दावा करीत आली आहेत. ही अनुभूती, तसेच साक्षात्कार ह्या संकल्पनेमागील वैज्ञानिक सत्य प्रतिपादन करणारा हा लेख तुमच्या विचारांना चालना देईल.
——————————————————————————–
मी स्वतःवर केलेल्या प्रयोगातून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ती म्हणजे, एखाद्या कल्पनेवर, किंवा विचारावर आपण सातत्याने, मनापासून, गंभीरपणे दिवसेंदिवस लक्ष केंद्रित केले, त्याचेच ध्यान केले, तर ज्याला आध्यात्मिक भाषेत साक्षात्कार म्हणतात तसा अनुभव काही व्यक्तींना येऊ शकतो. हा साक्षात्कार कोणता आणि कसा असावा हे त्या व्यक्तीची जडणघडण, तिच्यावर झालेले संस्कार, संगोपन, अध्यापन आणि प्रामुख्याने त्यावेळची सामाजिक परिस्थिती, अशा अनेक बाबींवर अवलंबून असते. आपल्या ऋषिमुनींना आणि जगातील अनेक प्रेषितांना, धर्मसंस्थापकांना आणि प्रामाणिक संतमहात्म्यांना, स्वामी महाराजांना असा साक्षात्कार – ज्ञानप्राप्ती – झाली असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यांतील अनेकांनी त्यानंतर त्यांचे विचार आणि शिकवणूक जगाला देऊन जगाच्या कल्याणाकरता आपले सर्व जीवन समर्पित केले आहे हेही सत्य आहे. हे सर्वच सदासर्वकाळ आदरणीय आणि वंदनीय आहेत आणि भविष्यातही तसेच राहतील याची मला शंका नाही.

दैवी साक्षात्कार की मानवी अंतर्मनाची हाक?
अशा साक्षात्कारांचे, प्रकटीकरणाचे सुंदर विवेचन गुरुदेव डॉ. आर. डी. रानडे यांनी त्यांच्या ‘A Constructive Survey of Upanishadic Philosophy‘या ग्रंथात केले आहे. त्यांच्याच शब्दांत (मूळ इंग्रजीचा मराठी माझा अनुवाद) सांगायचे झाल्यास ते खालीलप्रमाणे ः-
साक्षात्काराचा अर्थ (Meaning of Revelation) :
सर्व वेद, ब्राह्मणे, उपनिषदे यांना अनंत काळापासून श्रुती म्हणतात. एवढेच काय, जगातील सर्वच धर्मांचे मूळ ग्रंथ हे ईश्वरानेच त्यांच्या मूळ संस्थापकांना सांगितले असे मानले जाते. कोणाला ते विजेच्या कडकडाटातून मिळाले, तर कोणाला ध्वनीच्या, शब्दाच्या माध्यमांतून मिळाले, कोणाला ते बाहेरून मिळाले, तर कोणाला अंतर्मनातून. वेद-उपनिषदांप्रमाणेच बायबल आणि कुराण ही ईश्वराचीच देणगी आहे असे मानले जाते. प्रस्तुत लेखकाच्या मते (गुरुदेव रानडे) हे ज्ञान कोणत्याही बाह्य गोष्टींकडून आलेले नसून, त्या त्या व्यक्तींना देवाच्या विचारांचा कैफ चढल्यामुळे किंवा त्या विचारांनी आलेली उन्मादावस्था, झिंग (God Intoxication) या अवस्थेत स्वतःच्याच अंतर्मनातून आलेले जे विचार असतात त्यांनाच या सर्व व्यक्ती साक्षात्कार किंवा दैवी संदेश म्हणतात. याचमुळे सेंट पॉल (येशू ख्रिस्ताचा संदेश देणारा सुरुवातीचा धर्मगुरू) म्हणाला, की तो स्वतः बोलत नसून त्याच्या मुखातून प्रत्यक्ष देवच बोलतो आहे.
ख्रिस्तपूर्व 400 वर्षांपूर्वी झालेला ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो म्हणतो, “ही सर्व महाकाव्ये, स्तवने त्या-त्या व्यक्तींना झपाटलेल्या अवस्थेत, अक्षरशः ईश्वर कल्पनेने वेडावलेल्या अवस्थेत (Divine Insanity) सुचलेली काव्ये आहेत.”
गुरुदेव रानडे शेवटी असा निष्कर्ष काढतात, की वेद आणि उपनिषदे ही पौरुषेय आहेत की अपौरुषेय या वादात न पडता इतर सर्व धर्मांच्या प्रमाणेच ही स्तवने ईश्वरकल्पनेच्या उन्मादावस्थेतच (God Intoxication) पूर्वीच्या ऋषिमुनींनी म्हणजे माणसांनीच रचलेली काव्ये आहेत. (यांत देवाचा काही संबंध नाही.) या सर्व गोष्टी का व कशा होतात हे आधुनिक विज्ञानाद्वारे आता सिद्ध करता येते. संशोधक अँड्र्यु न्यूबर्ग आणि ओअॅक्किली यांनी 2001 साली लिहिलेल्या ‘Why God won’t go away’ या पुस्तकात त्यांनी खालील सत्य प्रयोगाने सिद्ध करून दाखविले आहे.
साक्षात्काराचे वैज्ञानिक स्पष्टीकरण
बौद्ध भिक्खू ध्यानधारणा करत असताना त्यांच्या आणि रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये येशूची मनोभावे तल्लीन होऊन प्रार्थना करत असताना तेथील नन्सच्या मेंदूंचे स्कॅन केले असता असे आढळून आले, की त्यांच्या मेंदूतील Posterior Superior Parietal Lobe या भागाची विद्युत कंपने (Electrical Activity) अगदी खालच्या पातळीवर सुरू होती. मेंदूच्या या भागाला त्यांनी Orientation Association Area (OAA) असे संबोधले. या मेंदूच्या भागाचे काम असे असते, की त्यामुळे आपल्याला (डोळे मिटून घेतले तरी) अवकाशातील आपली स्थिती काय आहे हे कळते. उदाहरणार्थ आपण बसलो आहोत, उभे आहोत, झोपलेले आहोत, तेही कोणत्या कुशीवर, की डोके खाली करून पाय वर करून शीर्षासन करत आहोत याची जाणीव होते. या भागाची क्रिया जेव्हा व्यवस्थित सुरू असते तेव्हा आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीराच्या स्थितीची आणि बाह्यजगताची वेगवेगळी जाणीव पूर्णपणे होत असते. परंतु आपण जेव्हा गाढ झोपेत असतो किंवा ध्यानधारणा करत असतो किंवा वर सांगितल्याप्रमाणे प्रार्थनेत मग्न असतो, तेव्हा मेंदूची ‘स्व’ आणि इतर जग यांच्या भेदभावाची जाणीव बोथट होते किंवा जवळजवळ नष्ट होते आणि यामुळे शरीराची प्रत्यक्ष वस्तुस्थिती (reality) आणि काल्पनिक विलक्षण संवेदना (fantasy) अशी होते, की आपण स्वतः या शरीरात आहोत की शरीराबाहेर भरकटतो आहोत हेच समजेनासे होते. कदाचित मेंदूच्या या भागाच्या अशा वागण्यामुळेच ध्यानस्थ ऋषिमुनी, सर्व प्रेषित, बौद्ध भिक्खू आणि साधुसंतांनी आपल्या “स्व’त आणि या सर्व विश्वात काहीही फरक नाही, हे सर्व एकच आहे – ‘अहं ब्रह्मास्मि’ आणि ‘सर्वम् खलु इदं ब्रह्म’ अशी जाणीव होत असते किंवा नन्सना ईश्वराचे अस्तित्व असल्यासारखा भास होतो. असाच भास – ज्या व्यक्ती आपण परग्रहावरून आलेल्या यानात जाऊन त्या परग्रहवासियांना प्रत्यक्ष भेटून आलो आहोत असा दावा करतात, त्यांना होतो. आणि या सर्वांना हे अनुभव खरेच आहेत असे कायम वाटत राहते. मेंदूच्या त्या भागास जेव्हा इजा होते, तेव्हा त्या व्यक्तींनाही असे अनुभव येतात. अशा व्यक्तींना तर घरात फिरतानाही रोज अडथळ्यांच्या शर्यतीतून गेल्यासारखे वाटते.
प्रत्यक्षात हेसर्व भास असून मेंदूतील रसायनांचा परिणाम असतो. हे आजच्या प्रगत मेंदूशास्त्रामुळे आणिFunctional Magentic Resonance Imaging (FMRI)आणि पेट स्कॅन (PET Scan – Positron Emission Tomography)अशा अत्याधुनिक (पण महागड्या) उपकरणांमुळे सिद्ध करता आले आहे.
मेंदूच्या या (Orientation Association Area – (OAA) भागांत ध्यानधारणा, प्रार्थना, इजा किंवा अन्य काही कारणांमुळे होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होणारे आभास हे सार्वत्रिक आणि साधारणपणे एकसारखे असल्यामुळेच जगातील यच्चयावत ऋषिमुनी, धर्मसंस्थापक, प्रेषित, साधुसंत आणि तत्त्वज्ञ ह्यांनी हे सर्व जग एकच आहे, एकाच देवाची आपण लेकरे आहोत, कोणत्या तरी एकाच अज्ञात शक्तीने (Consicousness – चैतन्यब्रह्म, चित्शक्ती) हे निर्माण केलेले आहे, असे प्रतिपादले आहे. कारण थोड्याफार फरकाने सर्वांना झालेले ‘साक्षात्कार’ (Revelation)हे सारखेच होते; आणि ही क्रिया गेली चार-पाच हजार वर्षांपासून , माणूस विचार करू लागला तेव्हापासून, सतत सुरू आहे. आता अशा उन्मादावस्थेत निर्माण झालेल्या तत्त्वज्ञानावर ते सनातन, पुरातन, शतकानुशतके चालत आले आहे; आपल्या ज्ञानी पूर्वजांनी ते सांगितल्यामुळे ‘तेच अंतिम सत्य आहे’ असा भाबडा विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागावे, की हे सर्व ज्ञान, हा ईश्वर या सर्व भ्रांत कल्पना आहेत असे आपल्या विवेकबुद्धीला पटल्यामुळे त्याप्रमाणे विवेकाने वागावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे.
हे जरी खरे असले, तरी जगातील सर्वच धर्मपंथीय, त्यांचे मूळ ग्रंथ हे देवाकडूनच आले आहेत असे मानतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध बोलणे, त्यांच्यावर कोणीही शंका घेणे हे पापी कृत्य आहे असे समजतात. त्यामुळे वेद, उपनिषदांविरुद्ध; बायबल, कुराणाविरुद्ध बोलणे हे धर्मनिष्ठांनी – सनातन्यांनी कधीही खपवून घेतले नाही; आणि असे कृत्य कोणी केल्यास त्याला शिक्षा देण्याचे कामही हे धर्ममार्तंड करत असतात.
आधुनिक ऋषिमुनी आणि त्यांचे साक्षात्कार
असे म्हटले जाते, की वेद, उपनिषदे रचणारे ऋषिमुनी आणि आधुनिक शास्त्रज्ञ यांचे एकच लक्ष्य होते आणि आहे. ते म्हणजे, या चराचर विश्वाचे, सजीव-निर्जीवांबद्दलचे गूढ उकलून काढणे आणि अंतिम सत्याचा सोध घेणे; आणि हे करत असताना प्राचीन ऋषिमुनींप्रमाणेच आजचे शास्त्रज्ञही उन्मादावस्थेत जातात, त्यांनाही त्यांच्या शोधांच्या विचारांची झिंग चढते आणि त्या अवस्थेत साक्षात्कार प्रकटीकरण होते.
आर्किमिडीजला राजाच्या मुकुटात खरे सोने किती आणि भेसळ किती हे शोधण्याचा वस्तुमानाचा फॉर्मुला , तो आंघोळीच्या टबमध्ये बसला असताना सापडला आणि तसाच ‘सापडले, सापडले’ (युरेका, युरेका) करत तो नग्नावस्थेतच पळायला लागला, अशी वंदता आहे; तर केकुले (इ.स.1890) या शास्त्रज्ञाला सात वर्षांच्या अथक परिश्रमानंतर बेंझिन या द्रव्याचे रिंगसारखे असलेले सूत्र (Benzene Ring), त्याच्या दिवास्पप्नात, साप आपल्या स्वतःच्या तोंडात आपलीच शेपटी धरून गोल-गोल फिरत आहे असे दिसल्यामुळे सापडले.
इ.स.1666 साली न्यूटनला झाडावरून जमिनीवर पडलेल्या सफरचंदाकडे पाहून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, तर 1905 साली महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइऩ्स्टाइनच्या डोक्यात सापेक्षतावादाचा सिद्धान्त (Theory of General Relativity) हा विषय आला. खरे तर या सर्व शास्त्रज्ञांना, अंतिम सत्याच्या शोधात असलेल्या आजच्या ऋषिमुनींना, वेदकालीन ऋषिमुनींप्रमाणेच किंवा येशू ख्रिस्त किंवा मोहम्मद पैगंबराप्रमाणे साक्षात्कार झाले होते. पण त्यांनी ‘हे ईश्वरीय ज्ञान असून ते खरेच आहे त्याविरुद्ध कोणी बोलणे किंवा त्याच्यावर आक्षेप घेणे खपवून घेतले जाणार नाही’ असे न करता अनेक वर्षे त्या विषयावर सतत अभ्यास आणि प्रयोग करून त्यांचे म्हणणे, त्यांचे तत्त्वज्ञान सर्व जगाला खरे करून दाखवले. आइन्स्टाइनने 1905 साली स्फुरलेली आपली थिअरी दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर 1915 साली सिद्ध करून दाखवली. न्यूटनला सफरचंदाचे फळ पडल्यानंतर सुचलेली थिअरी जगाला सांगणारे पुस्तक Philosophiae Naturalis Principia Mathematica (Mathematical Principles of Natural Philosophy)लिहिण्यास 21 वर्षे अभ्यास करावा लागला. 1687 साली त्याचे या विषयावरील पुस्तक प्रसिद्ध झाले. न्यूटनचे बरेच सिद्धान्त आजही जरी खरी असले, तरी दोनशे वर्षांनंतर आइनस्टाइनने त्यातील काही चुकीचे ठरवले आहेत, तर आइनस्टाइनच्या थिअरीवरही आता आक्षेप घेतले जात आहेत.
याउलट वेद, उपिनषदे, बायबल, कुराण यांत दिलेल्या तत्त्वज्ञानाबद्दल कोणीही पुढे संशोधन केले नाही आणि ते सर्व खरेच आहे, ते ईश्वराने सांगितले आहे हे सिद्ध करून दाखवण्याचा किंवा त्यांचा खरेपणा सिद्ध करण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. उलट, या तत्त्वज्ञानाविरुध्द बोलणे, वागणे खपवून न घेता अनेक धर्मयुद्धे करून लाखो लोकांचे प्राण घेतले गेले आहेत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.