‘सैराट’च्या निमित्ताने

‘सैराट’ चित्रपटाने इतिहास घडविला. त्याच्या लोकप्रियतेचे व वेगळेपणाचे विश्लेषण अनेकांनी अनेक दृष्टिकोनातून केले. त्या निमित्ताने एका तरुण कार्यकर्त्याने व्यक्ती किंवा समूहाला एखादी गोष्ट का आवडते ह्या प्रश्नाचा घेतलेला हा वेध.
————————————————————————————

देख रे शिंदे,

     उपर चाँद का टुकडा

     गालिब की गज़ल सताती है

     बेकार जिंदगी ने इसल्या को निकम्मा कर दिया,

     वरना इसल्या भी आदमी था,

     इश्कके काम आता!

– नारायण सुर्वे

* * * *

“सैराट पाहिला का रे?”

“हो, कधीच!”

“कसा वाटला?”

“म्हणजे, माहीत नाही यार! टिपिकल बॉलीवूड स्टाईल वाटला.”

“अरे, पण लोकांना तर खूप आवडतोय. कसला धडाक्यात चाललाय थेटरात.”

“तुला सांगू का, सिनेमा कसा आहे आणि तो किती चालला ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खूप चांगले सिनेमे कधी कधी अजिबात चालत नाहीत आणि हलकेफुलके, टुकार सिनेमे मात्र भरपूर कमाई करतात. मला वाटतं, लोकांना झेपेल इतकं काहीतरी हवं असतं, म्हणून बऱ्याचदा डोक्याला फार ताण न देणारे सिनेमे धडाक्यात चालतात. पण असेच असते असेही नाही. काहींना हा सिनेमा आवडला नाही. पण त्यामागची त्यांची करणेही वेगळीच असतील.”

“अरे, पण फिल्म क्रिटीक्सना पण आवडल्याचं दिसतंय ना हा सिनेमा. सगळीकडेच खूप चांगले रिव्ह्यूज आलेत.”

“एक प्रश्न विचारू?”

“हं..”

“जेम्स बाँडला विचारलं की तुझा सी.जी.पी.ए. (थोडक्यात, पदव्युत्तर शिक्षणात मिळालेले गुण, जे सामान्यपणे १० पैकी किती ते दर्शविले जातात) किती आहे, तर तो कसं सांगेल?”

“कसं?”

“नाईन…….

…..फोर पॉईंट नाईन!”

“हा..हा..हा… इतका ढ नसेल रे बिचारा!”

“हा.. अरे, द पॉईंट इज दॅट तुला हा जोक भारी वाटला, हसू आलं कारण तुला जेम्स बाँड माहीत आहे, त्याची ती, “माय नेम इज बाँड… जेम्स बाँड!” स्टाईल माहीत आहे, आणि सी.जी.पी.ए. काय भानगड आहे ते माहीत आहे. मी जर दहा लोकांना हा जोक सांगितला तर त्यातले आठजण, “हा काय जोक झाला?” अशा नजरेनं माझ्याकडे बघतील. त्यात त्यांना मजा वाटणं दूरच.”

“म्हणजे तुला असं म्हणायचंय की ज्यांना आवडला नाही, त्याचं कारण त्यांना तो कळला नाही?”

“नाही रे. आय मीन, ते एक कारण असू शकतं. दुसरं कारण, बऱ्याच वेळा ते आवडणं किंवा न आवडण्याला आपले वैयक्तिक संदर्भही असतात. सैराटमध्ये बघ, एकदा एक मुलगा आवडल्यावर तो कोणत्या जातीचा आहे, त्याच्यासोबत आपलं जमेल की नाही, लोक काय म्हणतील या प्रश्नांचा विचार करत असताना मुलीच्या पात्राला एकदाही दाखवलेलं नाही. ती फक्त बिनधास्तपणे वर्गात त्याच्याकडे बघत असलेली, त्याच्या घरी गेलेली, वेळ पडल्यास घरदार सोडून त्याच्यासोबत निघालेली दिसते. आता, समोर थेटरात बसलेल्या दोन माणसांचा विचार कर. एक, प्रेम ही भावना खूप सुंदर मानणारा, आयुष्यात कधीतरी प्रेमात पडलेला, जात-पात या किती कृत्रिम गोष्टी आहेत आणि त्या आयुष्यातल्या नितांतसुंदर गोष्टींना कसं हिडीस रूप देतात याची समज असलेला आहे. पण कुठेतरी थोडा गतानुगतिक आहे. आपल्याला वाटतं ते बरोबर आहे, पण म्हणून आपल्या सभोवतालचं वास्तव बदलत नाही; त्याच्याशी थोडीफार तडजोड करून जगलं पाहिजे, अशा विचाराने वाढलेला माणूस आहे. अशा माणसाला ही दृश्ये पाहताना कदाचित असा विचार येईल, की एस्स्स, हे माझ्या आयुष्यातून सुटून गेलं राव. असं काही तरी जगायला पाहिजे. हे.. हे भारी आहे! आणि त्यामुळे त्याला तो सिनेमा आवडेल. पण तिथेच दुसरा एक माणूस आहे, जो प्रेम-बीम म्हणजे बिनकामाचे चाळे मानतो. शिकावं, मग कामाला लागावं, कमवावं आणि मग आयुष्यात स्थिर झालं की लग्न, प्रेम करावं हेच सुज्ञ आणि संस्कारक्षम वागणं मानतो. अशा माणसाचा मात्र पहिला विचार असेल की, शाळा-बिळा सोडून प्रेम कसले करताय रे? आणि अशा प्रकारच्या वागण्यामुळे आई-वडीलांवर काय वेळ येईल याचा विचार केला आहे का? त्यामुळे या माणसाला त्या प्रसंगांमधील रोमांचकता, गम्मत, सौंदर्याची अनुभूती नाही येणार, ही विल मिस ऑन इट! इथे काय घडतंय हे दोघाही बघणाऱ्यांना कळतं, कळलं की नाही हा प्रश्न नाही. पण, त्यातल्या एकालाच, “एस्स्स, मला हे असं वाटतं,” हा अनुभव येतो, म्हणून तो सिनेमा भावतो. तिसरं कारण, ‘एम्पथी.” आपण सिनेमा पाहत असतो तेव्हा अभावितपणे त्यातलं पात्र होऊन जगत असतो. त्यामुळे सिनेमातला हिरो चार-पाच गुंडांना एकाच वेळी धोपटून काढतोय, हिरोईनला पटविण्यासाठी आपल्याला कधी न सुचलेल्या खोड्या काढतोय, हे सुखावणारा अनुभव देतं, म्हणून ते आवडतं. किंवा कोणाला केवळ त्यातलं सुंदर चित्रीकरण, भव्य दृश्य पाहून तो आवडेल.”

“सो, यू मीन, एखादा सिनेमा किंवा इतर कुठलीही गोष्ट चांगली वाटणं, आवडणं हा बऱ्यापैकी सब्जेक्टीव एक्सपिरियन्स आहे; आणि तो सिनेमा त्या व्यक्तिसाठी चांगला किंवा वाईट ‘असण्याचं‘ मुख्य परिमाण म्हणजे बघताना तो काहीतरी सुंदर, भारी, आनंददायी असण्याची अनुभूती येणं?”

“राईट!”

“मग मला सांग, एखादा सिनेमा बघताना जर कोणाला केवळ त्यातल्या हिरोची मारामारी बघून, हिरो हिरॉईनच्या बापासमोर बिनधास्त डायलॉगबाजी करत आहे हे पाहून जर भारी वाटत असेल, मज्जा येत असेल तर काय प्रॉब्लेम आहे?”

“कमॉन! तुला माहितीय, आपल्याला दहावी, अकरावीत असताना गोविंदा, अक्षयकुमारच्या सिनेमातले गाणे आवडायचे. नदीम-श्रवण, कुमार सानु, अलका याज्ञिक आपले फेवरेट होते. आपल्याला तीच गाणी आता किती टुकार वाटतात! आपलं एक्स्प्लोरेशन वाढलं, चांगलं म्हणजे काय हे पाहिलं की आपली टेस्ट बदलते, ती अधिक समृद्ध होते, तिला खोली येते. हे एक्स्प्लोरेशन न मिळाल्यामुळे, एज्युकेशन नसल्यामुळे कितीतरी लोक खूप सामान्य गोष्टी जगतात, असं तुला नाही का वाटत?”

“मी एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यात माझ्या एका मामाकडे गेलो होतो. अहमदाबादला. त्यांचा एक मुलगा आहे, साधारण माझ्या वयाचा. बेसिकली त्याची मला असलेली ओळख म्हणजे, आईबाबांना वैताग आणलेला. सतत मार खाणारा. शाळेची बिलकूल आवड नसलेला. आणि सर्व नातेवाईकांमध्ये चिंतेचा विषय असलेला. मी त्याच्याकडे गेल्यावर तो मला गल्लीत क्रिकेट खेळायला घेऊन गेला. इथे या क्रिकेटच्या मैदानावर मात्र मी त्याला एकदम वेगळ्या रूपात पाहिलं. काहीच वेळात जाणवलं की तो या इथल्या, या गल्लीतल्या क्रिकेटचा हिरो होता. सगळ्यांना तो आपल्या टीममध्ये, आपल्या बाजूने पाहिजे होता. ज्या पद्धतीने तो मैदानावर वावरत होता आणि ज्या अफलातून पद्धतीने फील्डिंग करत होता, ते बघणं म्हणजे तू म्हणतोस तसली ‘समृद्ध अनुभूती’ होती. आणि मी तिथे, त्यावेळी नेमका उलट अवस्थेत होतो. कॅच सोडल्याबद्दल चार वेळा शिव्या खाल्ल्या आणि एक वेळेला कसा माहीत माझ्याकडून बॉल अडला तर काय आनंद झाला मला. तू म्हणतोस तसा, ‘अक्षकुमारछाप आनंद.”

“व्हॉट इज युवर पॉईट?”

“माय पॉईंट इज, आपल्या सुख आणि समृद्ध जगण्याच्या कल्पनाच निमुळत्या आणि बाजारकेंद्री होत चालल्यात; घर, गाडी, पार्ट्या, पुस्तकं, गाणी, सिनेमे. मला वाटतं, माझ्या त्या भावाला क्रिकेटच्या मैदानावर हिरो असण्यातून जी अनुभूती मिळते त्यापेक्षा अजून वेगळी समृद्धी, आनंदाची वेगळी परिसीमा काहीही असू शकत नाही. ती त्याला तिथे क्रिकेटच्या मैदानावर मिळत असेल तर ठीक आहे ना.”

“ओह् यस, आय अॅग्री. मी ते नोटीस नाही केलं, पण पटतं तू सांगितल्यावर. पण तू म्हणतोस तसं ते आयुष्य त्याच्यासाठी पुरेसं असेल तर ठीक आहे ना. नो प्रॉब्लेम. तू ते नोटीस न करणं हाच गुन्हा असल्यासारखं का सांगत आहेस?”

“यस, देयर इज अ प्रॉब्लेम. यू नो व्हाय? माझं ते मैदानावरचं अवघडलेपण, त्याची ती आ वासून पाहावी अशी प्रतिमा माझ्या आठवणीत शेवटची. आता त्याला क्रिकेट खेळायला वेळ नाही मिळत. किंवा तो किती भारी क्रिकेट खेळतो, म्हणून त्याला कोणी पोसू नाही शकत. कोणी पोसायचं सोड, तो आज काम करत असलेल्या गॅरेजमध्ये त्याला पुरेसे पैसे मिळाले असते, तर तो त्यावर आपलं पोट भागवून पैशाच्या विवंचनेत न राहता, मजेत म्हातारा होईपर्यंत क्रिकेट खेळत राहिला असता. पण तुला प्रॉब्लेम काय आहे सांगू? त्याच्या गॅरेजवर आपली स्प्लेंडर घेऊन जाणारा आमचा अमीरभाई ‘रिलायन्स’मध्ये काम करतो. रिलायन्सने २०१४-१५ मध्ये २३ हजार कोटींचा निव्वळ नफा नोंदवला. कंपनीत सुमारे २५,००० कर्मचारी काम करतात. म्हणजे ढोबळमानाने कंपनी अमीरभाईसारख्या एका कर्मचाऱ्याच्या मागे सुमारे १२ लाख रुपये दर महिना इतका नफा कमावते. आणि अमीरभाई? २० हजार रुपये महिना. त्यामुळे अमीरभाई, “आज पंचरका सौ रुपये ले लो मेरी ओरसे,” म्हणेल हे! दूरचं सोड, तो बहुतेक वेळा, “पिछले साल तो पांच रुपया था, ये दस कबसे हुआ,” अशी हूज्जत घालतानाच दिसेल. आणि त्या बाकीच्या कोट्यवधी रुपयांचं कंपनी काय करते माहितीय? २०१६ च्या आय.पी.एल. सिझनमध्ये खेळण्यासाठी रिलायन्सच्या ‘मुंबई इंडियन्स’ ने रोहित शर्माला तब्बल १२ कोटी रुपये दिले, संघाकडून दोन महिने खेळण्यासाठी.

तुम्हाला क्रिकेट खेळायची हौस आहे ना, मग अजून लाख लोकांशी स्पर्धा करत नॅशनल, आय.पी.एल., किंवा किमान रणजीमध्ये जागा मिळवा. नाहीतर मग ‘क्रिकेट’ वगैरे खूळ डोक्यातून काढा. ऊर फुटेस्तोवर रट्टा मारून रिलायन्सला महिना १२ लाख रुपये कमावून देणारी नोकरी मिळवा. इ.एम.आय. वर घेतलेल्या आपल्या ४२ इंच स्क्रिनवर क्रिकेट बघा आणि मग ऑफिसमध्ये जाऊन सचिन कव्हर ड्राइव्ह कसला भारी मारतो वगैरे यथेच्छ चघळा. पण डोंट यू डेयर टू थिंक की, गॅरेजवरची नोकरी करून आणि क्रिकेट खेळून मला माझं आयुष्य मजेत घालवता येईल.अॅंड धिस इस व्हॉट इज राँग विथ नॉट नोटिसिंग दॅट देअर इजलाईफअॅंडफनबियाँडजॉब‘, ‘पार्टीज‘, अॅंडकार.”

“व्हॉट इज सो राँग अबाऊट इट?”

“वेल. टु बिगिन विथ, माझ्या भावाला केवळ इतर लोक, नातेवाईक नालायक समजत नाहीत; तो स्वतःदेखील स्वतःला नालायक समजतो. तो जे काम आज करतो त्याचा इतका मोबदला कधीच मिळणार नाही की त्याला त्या कामातलं सौंदर्य पहायची उसंत मिळेल. मातीचा गोळा मडक्याचा आकार घेताना पाहणं किती जादुई असतं, एका चांगल्या पिकाच्या मागे पावसाचा अंदाज, किडींची ओळख, व्यवस्थापन, आणि काय काय असतं आणि मेंदूचा किती वापर करायला मिळू शकतो, दुपारच्या उन्हात नुसतं अर्धाएक तास विहिरीत पडून राहणं म्हणजे काय सुख असू शकतं, ह्या गोष्टी आपल्याला करियर निवडताना कधीही आकर्षित नाहीत करणार, किंबहुना त्या खिजगणतीतही नसतात. कारण? कारण त्या आपल्या बाजारकेंद्री जगण्याच्या संकल्पनेत कुठेच बसत नाहीत. धिस इज ‘होमोजिनायजेशन’ ऑफ अवर लाईफ! धिस इज ‘मोनोपलायझेशन’ ऑफ अवर लाईफ! आज केवळ आपलं अन्न, उद्योग, बाजारपेठांचं एकाधिकारशाहीकरण होत नाहीए, तर आपल्या आयुष्य, आनंद, सौंदर्य, जीवनहेतू याविषयींच्यासमजांचं एकाधिकारशाहीकरणहोत आहे.

आणि मग आपण शंभरातली शंभर माणसं पाच-दहा माणसांचं आयुष्य जगायला लागतो. फरक इतकाच की, ती पाच-दहा माणसं ते आयुष्य प्रत्यक्षात जगतात, आणि बाकीचे नव्वद-पंच्याण्णव स्वप्नात. तुला माहितेय, सांगवी, तळेगाव, हिंजवडी, भोसरी, चिंचवड, हडपसरमधली बहुतेक पोरं टी.व्ही. मध्ये भव्य-दिव्य बिल्डिंगा, चकचकीत गाड्या बघून पुण्याला आलेली असतात. काहीजण गणित, विज्ञान, भूगोलाच्या रटाळ पेपरांचे धक्के खाऊन, तर काही ऊर फुटेस्तोवर अभ्यास करून. मग पुण्यात आले की, पहिल्या इ.एम.आय. वर टी.व्ही. घ्यायचा. मग गाडी. मग ती पुन्हा घ्यायला परवडणार नाही म्हणून अगदी ती वापरण्यावरून घरात भांडणं करायची. मग घर घ्यायचं आणि त्याचं कर्ज फेडता-फेडता प्रॉव्हिडंट फंडाची चिंता करत म्हातारं व्हायचं. शहरात पोहोचले त्यांच्यासाठी हा ‘विकास’. जे नाही पोहोचले त्यांच्यासाठी टी.व्ही.! घराघरात पोहोचलेला! यू नो द बिगेस्ट प्रॉब्लेम विथ टी.व्ही.? आपल्याला वरळीला बांधलेला सी-लिंक थेट आपल्या घरात दिसतो. त्यामुळे मला, माझ्याशी देणंघेणं असलेली गोष्ट आणि नसलेली गोष्ट यातला फरकच कळत नाहीए. सोबत कोणीतरी प्रस्तावना करत असतं, ‘अपने’ देश की गौरवशाली उडान, दुनिया का सबसे लंबा धिस, सबसे उंचा दॅट. त्यामुळे माझ्या आजूबाजूचे खड्डे मी विसरून जातो, त्याच भव्य-दिव्य गोष्टींसाठी माझं शेत, माझं गाव, माझ्या प्रदेशाला किती ओरबाडलं गेलं असेल हे मी विसरतो. त्यामुळे कोणीतरी उठून मोनोरेल, मेट्रोरेल, विमानं, आणि भव्यदिव्य बिल्डिंगांची चित्र दाखवून, “मैंने आपका विकास किया,” म्हणतं तेव्हा आपल्याला त्याची चीड येण्याऐवजी अभिमान वाटतोय.

हळूहळू आपण विसरायलाच लागतो की, हे आपलं आयुष्यही सुंदर, महत्त्वाचं आहे. हळूहळू मग त्याचं अस्तित्वही विसरायला लागतो. यू नो, यावर्षीच्या बजेटमध्ये फक्त एक प्रॉब्लेम होता, इ.पी.एफ. (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी) वर कर आकारण्याची घोषणा (जी पुन्हा लगेच मागेही घेतली गेली). केवळ याच एका मुद्द्यावर प्रत्येक पेपरमध्ये पानं भरून आलेली होती. केवळ आकडेमोडीचे खेळ करून शेतीचं बजेट वाढविल्याचं दाखवण्यात आलं याबाबत मात्र याच पेपरांमध्ये असा गदारोळ नाही झाला.

यावर्षी लातूरात भीषण दुष्काळ पडला. प्रचंड बोलबाला झाला. पण लोक बोलत काय होते? ‘लातूर शहरा’च्या ५ लाख लोकसंख्येला पाण्याची झळ. त्यासाठी प्रचंड गाजावाजा करून ट्रेनने पाणी. त्यावरून जल्लोष. पण लातूर म्हणजे केवळ लातूर शहर नव्हे हे किती जणांना जाणवलं? ट्रेनने गेलेलं पाणी कोणापर्यंत पोहोचलं हा प्रश्न किती जणांनी विचारला? आमची इथपर्यंत मजल जाते की, १५ एप्रिलच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये लिहलेलं आहे, “जिल्हाधिकारी पांडुरंग पोळे म्हणाले, आम्ही सध्या लातूर ‘शहरा’वर लक्ष केंद्रित करत आहोत.”

धिस इज व्हाय इट मॅटर्स टू सेलेब्रेट, टॉक अबाऊट अॅंड फाईट फॉर एव्हरी स्मॉल लाईफ, एव्हरी स्मॉल प्लेजर. आपण जे काम करतो त्याचा अभिमान बाळगणं, त्यातलं सौंदर्य शोधणं, त्याचा उत्सव करणं ही केवळ आनंद मिळविण्याची बाब राहत नाही, ती आपली गरज असते. द व्हेरी ‘सर्व्हावल नीड’! म्हणून नागराज मंजुळे अट्टाहास धरतो की माझ्या सिनेमाचं शूटिंग बीटरगावमध्येच झालं पाहिजे. म्हणून नागराज मंजुळे म्हणतो की, “माझ्या सैराटच्या गोष्टीचे छोटे-छोटे नायक आहेत, पण ती त्यांची गोष्ट आहे, आणि त्यांची गोष्ट असल्यामुळे तुम्हाला त्यांच्या गोष्टीचा आदर करायला लागेल. फॅंड्रीचा आदर याच्यासाठी करावा लागेल की, ती फॅंड्रीची गोष्ट आहे आणि झब्या त्याचा नायक आहे. तो काळा आहे. तो येडावाकडा आहे. तुम्ही त्याला कॅटेगराइज करून नावं ठेवा. पण तुम्हाला आदर करायला लागेल, बघायला लागेल की, हाच हिरो आहे आणि झक मारत आम्हाला आता दीड तास हे बघायचंय. बघा कधीतरी.” म्हणून नागराज मंजुळे विचारू पाहतो की, “माझ्या गावातल्या मुलाची प्रेमकथा का नाही असू शकत बॉलीवूडसारखी? तो का नाही चितारला जाऊ शकत शाहरुख खान सारखा?”

“हम्म्! चल आज बरिस्तासमोरच्या टपरीवर चहा घेऊ!”

“चल!”

ईमेल: ganesh.birajdar@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.