अनुभव: एच आय व्ही पॉझिटिव्ह

एच आय व्ही
———————————————————————————–
तशी कुणाची काहीच चूक नसता अचानक छोटासा अपघात होतो आणि त्याची शिक्षा एवढी मोठी! आयुष्यभर दुसऱ्यांच्या आरोग्यासाठी धडपडणाऱ्या ‘ति’ला एच आय व्ही ची लागण होते आणि आयुष्य पार बदलून जातं. ही गोष्ट आहे तिच्या झुंजीची, तिच्या जिवलग मैत्रिणीने सांगितलेली…
————————————————————————————

‘क्ष’ गेल्याची बातमी आठवडाभरापूर्वी आली तेव्हा मी डेडलाईनमध्ये होते. गोव्याहून आलेला फोन म्हणून पटकन उचलला, वाटलं आजी पलीकडून म्हणेल, “पाऊस झडोमडोन् लागलाय…मंम्बय्यचं काय?”… कान ठार गेले आहेत म्हणते, तरीही हिच्या कानात पावसाची सर कशी वाजते,कुणास ठाऊक..मनात हे पावसाचं असलं असताना ती बातमी मिळाली. तू गेल्याची… जाणारच होतीस कधीतरी… गेल्या बारा वर्षांत कधीही तो दिवस आलाच असता की… मनाने, जिद्दीनं तू तो परतवून लावलास. गोव्यातलं माझं अन् तुझं जन्मगाव आणि व्यावसायिक आयुष्यातला आरोग्य हा अभ्यासाचा विषय इतक्याच काय त्या आपल्याला घट्ट बांधणाऱ्या त्रिज्या..
शबानामुळे ही ओळख पक्की होत गेली. डॉक्टरांच्या गराड्यामधून बातम्या देत असताना तू त्या दिवशी संध्याकाळी मला ती धक्कादायक बातमी दिलीस…कुणी पेशंट आला होता कॅज्युअल्टीला… फुटला होता पार, पायातून रक्त वाहत होतं. त्याला रिलीफ दिलास तू… संध्याकाळी तो सेटल झाला, अन् घराच्या ओढीनं निघालीस तू. डॉक्टरांनी त्या तिथेच ठेवलेली इंजेक्शनची ती सुई, भस्सकन हातात घुसली तुझ्या. तेवढ्यानं काय होतंय म्हणत तूही दुर्लक्ष केलंस, दोन महिन्यांत ताप आला अन् मलेरियाची चाचणी केली… रिपोर्ट आला तेव्हा तुला कळलं. रिपोर्ट पॉझिटिव्ह होता… एचआयव्ही पॉझिटिव्ह! हादरलीस तू…धाय मोकलून रडत राहिलीस. अशाच एका पावसात सायन हॉस्पिटलच्या त्या कुंद आवारात आपण भेटलो होतो, मागे पाऊस कोसळत होता, अन् इथे तू..मी तरी काय सांगणार होते तुला… माझं रुटीन सुरू झालं, अधनंमधनं फोन. घरच्यांनी अव्हरेलं. ज्या डॉक्टरी पेशासाठी तू जिवाचं रान केलं होतं, वजनदार व्यक्तिमत्त्व असूनही सुई न बोचणारा तुझा तो मृदू हात. रात्री अपरात्री वेड्यासारखी कुणासाठीही धावून जायचीस तू… एकदा त्या लेबर पेनमधल्या बाईला मोकळं करण्यासाठी पियक्कड ड्रायव्हरला हाकलून तू अॅम्ब्युलन्स हाकत नेली होती. डॉक्टर संध्यासोबत अशा अनेक बातम्या सांगत तू हे रंगवून रंगवून सांगायची… तुझी त्यातली आस मला समजायची. तुझं तीक्ष्ण लालसर नाक, पेशंटचे होणारे हाल, हॉस्पिटलमधील अस्वच्छता, गोळ्यांच्या टेंडरमध्ये होत असलेला भ्रष्ट्राचार, गोळ्यांचा उतारा न पडण्याची कारण सांगताना लालेलाल होऊन जायचीस, वेगळीच भासायचीस तू मला… जिन्याच्या शेवटच्या पायरीसारखी. असूनही नसल्यासारखी.
सायन हॉस्पिटलच्या त्या गटबाजीत, युनियनच्या कामात कणभर नसूनही तू किती वेगळी होतीस. सोर्स होतीस माझी. कोकणी भाषेतल्या त्या गोडव्यानं माझ्याशी जोडली गेलीस, पुढं कामाचं स्वरूप बदललं अन् कुणालाही हक्कानं अॅडमिट करायचं असेल तर तुझा रेफरन्स देऊन मोकळी व्हायचे मी…पुढे मला माहीत असायचं तू जागा करून देणार, त्या पेशंटचं हवं नको बघणार. तो बरा होऊन घरी गेला की तुझा तो ठरलेला मेसेज. देवाक काळजी, चेडवा, तो बरा हुऊन घरी गेल्यो…पुढं पुढं तर इतकं गृहीतच धरलं मी तुला..की त्या मेसेजला उत्तर देण्याची कर्टसीही मी अनेकदा दाखवली नाही. त्यादिवशी संध्याकाळी रामामध्ये भेटलो तेव्हा तुझा निर्णय झाला होता, गोव्याला परतण्याचा. वर्षानुवर्षे बंद असलेलं ते घर, झाडूनपुसून लख्ख करून तिथंच राहण्याचानिर्णय तू घेतला होतास. एआरटी लाईन ट्रिटमेंट, गोळ्यांनी आयुष्य प्रतिकारशक्ती वाढवता येते वगैरे असं खूपसं मी आशेने तुला सांगत राहिले… तुला का ते माहीत नव्हतं ? काय करू जगून… माझ्याच माणसांचा माझ्यावर संशय आहे, मुलं जवळ यायला घाबरतात. घरात आता कपबशी वेगळी कोपऱ्ऱ्र्यात ठेवलीय, यांना रोग लागला तर म्हणून भीती वाटते… काय सांगणार होते मी तरी… पूर्वीसारखी निघताना तिला घट्ट बिलगून मिठी मारायची, आता मात्र तीच मध्यमवर्गीय भीती माझ्याही मनात घर करून होतीच की ? उगाचच नजर भिरभिरत नखांचा आकार, शरीरावरची जखम असा अंदाज घेत राहायचीच की.. रक्तसंक्रमण. छूनेसे प्यार फैलता है… सगळं जाहिरातीमध्ये… बाकी संशयाची गोचीड मनात वळवळत होतीच की कुठंतरी …
तू गेल्यावर शबाना आणि मी भेटलो..थोडंबहुत तुझ्याबद्दल बोललोही. त्यानं समाधान झालं नाहीच माझं… तुझ्या नवऱ्याबद्दल, मुलांबद्दल तुझ्या मनात काय काय उमटत होत त्या दिवसांत,त्यांनी आडून, थेट तुला भेटण्याचा प्रयत्न केला कधी… एकत्र राहिलेल्या, जगलेल्या त्या क्षणांनी पुन्हा बांधून आणलं नाहीच की काय तुला… मला ते काहीच ठाऊक नव्हतं. एकदाच तू म्हणालीस, त्यांनी संशय घेतला तेव्हाच विषय संपलाय…
तिथं गेलीस तरीही तुझा फोन येत राहायचा अधनंमधनं… तिथं आले की तुझी भेट घेतली नाही, असं व्हायचं नाही. नाराज, नाउमेद होऊन गेली होतीस तू… तग धरशील की नाही, अशी भीती वाटत होती मला… जाता जाता म्हणाली होतीस तेव्हाही असंच काहीसं वाटलं मला.भरून राहिलेल्या संध्याकाळसारखी भासलीस तेव्हा तू मला ! सहा महिन्यांतच तू रुळलीस तिथं… आजूबाजूच्या मुलींचा अभ्यास घेत, गावातल्या अशिक्षित – आरोग्याची जाण नसलेल्या बायांची बाळंतपणं, तब्येतीच्या तक्रारी दूर करत तू तिथंही आरोग्यसेवा देत राहिलीस. शांतादुर्गेचं एक छोटंसं मंदिर बांधलंस, आश्चर्यच वाटलं मला तेव्हा, देवदेवाला न मानणारी तू… अशी आस्तिक कधीपासून झालीस, तुझ्या मनालालागेल म्हणून गपगुमान राहिले,विचारलं नाही तसं तुला स्पष्टपणे… असो, पुढं कधीतरी तूच म्हणालीस त्यानिमित्तानं चार मुली एकत्र येतात, पेटीत पडलेला पैसा गावातल्या मुलांच्या शिक्षणासाठी कामी येतो… कुणाकुणाच्या औषधपाण्याची सोय होते… असं कित्येक वर्षं अविरत, अविश्रांत करत राहिलीस तू कुणाकुणासाठी तरी. आपला शेवट जवळ आलाय कळलं की माणूस अधिक निर्धास्त होतो की उरलंसुरलं आयुष्य तेजःपुंज जगू पाहतो.कुणास ठाऊक…मध्येमध्ये तुझा सायनच्या गर्दीतला, लगबगीत असलेला तो चेहरा दिसायचा अन् खोल तुझी आठवण यायची…आता तर तू त्यापल्याड निघून गेलीस.
मोकळ्या, निर्धास्त मनाने तुला घट्ट मिठीत घ्यायचंय ग !

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.