सोशल मीडिया : एक विस्कटलेलं जग

मुलाखत : श्राबोंती बागची
——————————————————————————–
रामचंद्र गुहा यांची ’सोशल मीडिया’ या विषयाला धरून घेतलेली मे २०१६ मध्ये factordaily.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली मुलाखत सोशल मीडियाआणि विचारभिन्नता या विषयासंदर्भात महत्त्वाची आहे. मूळ इंग्रजीमधील मुलाखतीचा हा संपादित अनुवाद.
——————————————————————————–

प्रश्नइतिहासाचे विकृतीकरण करणे, ऐतिहासिक गोष्टींचा विपर्यास करणे आणि सोयीस्करपणे इतिहासाकडे बघणे या सध्या घडत असलेल्या गोष्टींसाठी सोशल मीडिया कारणीभूत आहे का?

उत्तर- सोशल मीडियावरील भारतीय तरुण इतिहासाकडे काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांचे राजकारण असल्यासारखे बघत आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर यासाठी सर्वप्रथम काँग्रेस दोषी आहे कारण राजीव-सोनिया-राहुल यांच्या काँग्रेसने आधुनिक भारतीय इतिहासाचे जे चित्र उभे केले आहे त्यातील महात्मा गांधी वगळता इतर सर्व महनीय व्यक्ती या एकाच कुटुंबातील आहेत. यामध्ये आधी नेहरू होते, नंतर इंदिरा आणि राजीव होते आणि आता सोनिया आहेत. २००४ ते २०१४ ही दहा वर्षे काँग्रेस सत्तेत होती आणि सोशल मीडिया  २०११ च्या आसपास सक्रिय होताना दिसतो. याच काळामध्ये काँग्रेसची नाचक्की होऊ लागली आणि भारतीय तरुण पर्यायी नायक शोधू लागले.

काँग्रेसने इतिहासाचा असा चुकीचा अर्थ लावल्याचा दुर्दैवी परिणाम म्हणजे नेहरूंसारख्या श्रेष्ठ नेत्याचे खलनायकीकरण झाले. नेहरूंची तुलना सोनिया आणि राहुलसोबत केलीच जाऊ शकत नाही. सोनियांच्या आधिपत्याखालील काँग्रेसमध्ये कधीही गांधी-नेहरू परिवारातील सोडून श्रेष्ठ  काँग्रेस नेत्यांबद्दल आणि त्यांच्या योगदानाबद्दल बोलले गेले नाही. सरदार पटेल, चक्रवर्ती राजगोपालाचारी, कामराज, सुभाषचंद्र बोस हे सर्व  काँग्रेसचेच श्रेष्ठ नेते होते. गोपालकृष्ण गांधीनी म्हटले आहे त्याप्रमाणे  काँग्रेसने पटेलांना सोडून दिले आणि त्यामुळे भाजपला पटेलांचा अपहार करणे शक्य झाले. पटेल हे काही भाजप किंवा संघाचे नेते नव्हते. ते आजीवन काँग्रेसी होते. त्यामुळे पहिला दोष  काँग्रेसला जातो पण नंतर सोशल मीडिया वरील विकृतीकरण ’नेहरूंशिवाय कोणीही चालेल” या भलत्याच दिशेला जाते. ’पटेल हे सर्वश्रेष्ठ नेते होते पण नेहरूंनी त्यांना बाजूला सारले; गांधींनी पटेलांना पंतप्रधान करायला हवे होते!’ अशा अनेक गोष्टी सोशल मीडियावर नंतर सुरू झाल्या. वस्तुस्थिती अशी आहे की पटेलांना पंतप्रधान व्हायचेच नव्हते! नेहरू आणि पटेल यांनी पंतप्रधान आणि उपपंतप्रधान असे सहकारी म्हणून अतिशय चांगले काम केले. सोशल मीडिया  मात्र ’पटेल पंतप्रधान असते तर आपण आज कितीतरी पुढे असतो’ या कल्पनेवर प्रेम करू लागला. अजून पुढे जाऊन ’नेहरूंनीच बोसांना मारल्याची शक्यता आहे’ अशासारख्या वस्तुस्थितीपासून कोसो दूर असलेल्या गोष्टी चर्चेमध्ये आल्या. हळूहळू आपण कटकारस्थाने, निसटते उल्लेख, अफवा, पॅरानॉईया आणि ठार वेडगळपणा यांनी भरलेल्या जगात प्रवेश केला; ज्यात अधिकाधिक वस्तुस्थितीचे विकृतीकरण होत गेले.

 प्रश्नहे होण्याचे कारण आपल्या राष्ट्राच्या इतिहासाचे अज्ञान हे आहे असे तुम्हाला वाटते का? जेव्हा आपल्याला इतिहास शिकवला जातो तेव्हा आपण तो विषय गांभीर्याने शिकत नाही किंवा अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमांमध्ये मानव्यविद्या (humanities) गंभीरपणे किंवा अजिबातच शिकवले जात नाहीत ही कारणे यामागे आहेत का? त्यामुळे आपण सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीकडे ओढले जातो का?

उत्तर- ते एक कारण आहे. दुसरे कारण म्हणजे  काँग्रेसने त्यांची  स्वत:ची अशी इतिहासाची आवृत्ती सादर केली. तिसरे कारण म्हणजे जे शिक्षित तंत्रयुगातील भारतीय तरुण आहेत; ज्यांना भारताला महासत्ता म्हणून पाहायची इच्छा आहे आणि भारताला मिळायला हवा तेवढा गौरव आणि आदर मिळालेला नाही म्हणून जे संतप्त आहेत; या तरुणांमधे एक विचित्र मानसिक गुणधर्म दिसतो. हा राग/असंतोष – भारताला पुरेसा आदर मिळत नाही याबद्दलचा– दोनपैकी एक रूप धारण करतो. एकतर तुम्ही असे म्हणू लागता की आम्ही भूतकाळात कसे श्रेष्ठ होतो, आम्ही शून्याचा शोध लावला, आम्ही प्लॅस्टिक सर्जरीचाही शोध लावला. किंवा तुम्ही असे म्हणू लागता की तो हरामखोर नेहरू नसता तर आम्हीही श्रेष्ठ असू शकलो असतो. आजच्या प्रश्नांसाठी तुम्ही खूप काळापूर्वी मरून गेलेल्या माणसाला जबाबदार धरता. सत्तर वर्षांपूर्वी जे घडले ते आज भारत श्रेष्ठ न होण्याला जबाबदार आहे (अशी त्यांची समजूत आहे).

खरे तर यामुळे असा प्रश्न साहजिकच पडतो की तुम्ही एवढी वर्षे काय करत होता? मी मघाशी विचित्र मानसिकतेचा उल्लेख केला ती ही मानसिकता आहे – त्यांना त्यांचा देश तत्काळ श्रेष्ठ बनून हवा आहे. सोशल मीडिया  तुम्हाला तुमचे वैफल्य बाहेर काढण्याचा आणि स्वत:ची जबाबदारी विसरण्याचा मार्ग दाखवते. तुम्ही तुमच्या भविष्याची, समाजाच्या भविष्याची, शहराच्या भविष्याची कसलीही जबाबदारी घेत नाही, तुम्ही दुसऱ्या कुणावर तरी दोषारोपण करून मोकळे होता. ही परिस्थिती फारशी आशादायक नाही.

प्रश्ननेहरू आणि गांधींना सोशल मीडियावर अत्यंत नकारात्मक पद्धतीने रंगवण्यात येते. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? त्यांच्या राष्ट्राच्या उभारणीतील भूमिकेकडे दुर्लक्ष करून आणि काही कृतींना वेगवेगळे पाहून त्यांच्या काही तथाकथित चुकांना वाढवून सांगण्यात येते किंवा त्यांचा उपहास करण्यात येतो. नेहरू आणि गांधी एवढ्या अप्रिय व्यक्ती का झाल्या आहेत?

उत्तर- हे अगदी खरे आहे. सध्याच्या गांधी कुटुंबामुळे नेहरूंबद्दलचा अनादर अथवा रोष समजता येण्यासारखा आहे. पण गांधी समजणे अवघड आहे. ते गुंतागुंतीचे आहे. अनेक जण त्यांचे चाहते आहेत तर अनेक जण त्यांचा दु:स्वास करतात. काही प्रमाणात गांधींबद्दलचा अनादर तरुणपणीच्या हे सगळे जग तत्काळ बदलून टाकण्याच्या ऊर्मीमुळे आहे. गांधींचा मार्ग एकावेळी एक पाऊल (अहिंसा, तडजोड इ.) असा आहे. तरुणांना वाटते की सशस्त्रक्रांतीमुळे आपण श्रेष्ठ, भव्यदिव्य राष्ट्र झालो असतो. सत्य असे आहे की ज्या राष्ट्रांना सशस्त्र क्रांतीमुळे स्वातंत्र्य मिळाले आहे त्या राष्ट्रांमध्ये जास्त प्रश्न निर्माण झाले. जास्त हिंसा, मग सूडाचारातून अजून हिंसा असे हिंसेचे चक्रच तिथे तयार झाले. गांधींची दृष्टी मुस्लिम, दलित, महिला सर्वांना सोबत घेऊन जाण्याची होती. मला वाटते की आपण हेसुद्धा विसरत चाललो आहोत की गांधी, आंबेडकर, पटेल, नेहरू, बोस यांच्या भूमिका वस्तुत: परस्परपूरक आहेत. त्यांच्यामध्ये मतभेद असणार, मित्रांमध्ये कुठल्यातरी एका गोष्टीला धरून मतभेद असणारच की! कुठलीही यशस्वी कंपनी घ्या, उदाहरणार्थ इन्फोसिस. मला खात्री आहे की नारायण मूर्ती, नंदन नीलकेणी, गोपालकृष्णन यांच्यामध्ये मतभेद होतेच पण ते सोबत काम करू शकले. आणि त्याचप्रमाणे मतभेदांसोबत काम करणे ही तेव्हाच्या  काँग्रेस पक्षाची खासियत आहे.

सुभाषचंद्र बोसांनी  काँग्रेस सोडल्यावर गांधींचाच जयजयकार केला. त्यांचा गांधीशी अहिंसेच्या मुद्द्यावर मतभेद होता. म्हणून त्यांनी  काँग्रेस सोडली, ते जपानला गेले आणि त्यांनी जपान्यांच्या साहाय्याने आझाद हिंद सेनेची स्थापना केली. पण त्यांनी आझाद हिंद सेनेच्या पलटणींची नावे काय ठेवली असतील? गांधी, नेहरू, मौलाना आझाद आणि स्वत:च्या नावावरून एक अशी नावे त्यांनी पलटणींना दिली. त्यांनी सावरकरांची किंवा गोळवलकरांची नावे दिली नाहीत. आझाद हिंद सेनेच्या भाषणातून गांधींना ’राष्ट्रपिता’ असे सर्वप्रथम त्यांनी संबोधले.

तसेच नेहरू आणि पटेलांचेही आहे. अजून एक विचित्र गोष्ट अशी आहे की नेहरूंचा अवमान करण्यासाठी ते काहीही करतात. त्यासाठी प्रथम त्यांनी पटेलांना वापरले आणि नंतर बोसांना वापरले. वस्तुत: पटेल आणि बोस यांच्यात मुळीच सख्य नव्हते. काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून बोसांना खाली खेचण्याला पटेलही कारणीभूत होते. त्यामुळे या भूमिका परस्परविसंगत आहेत. जे या भूमिका घेत आहेत त्यांना गतकाळातील गुंतागुंत माहिती नाही. गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर यांच्यासाठी एकसंध राष्ट्रनिर्मिती करणे, वेगवेगळ्या लोकांना एकत्र आणणे, ज्या राष्ट्राने कधीही लोकशाहीचा अनुभव घेतलेला नाही त्या राष्ट्रामध्ये लोकशाही रुजवणे, टोकाच्या पुरुषसत्ताक समाजामध्ये महिलांना समान हक्क देणे, जातिव्यवस्थेतील दमनाविरुद्ध लढणे या गोष्टी किती अवघड होत्या याची त्यांना जाण नाही. हे सर्व घडून येणे ही एक अभूतपूर्व अशी घटना आहे. तुम्ही भारताच्या शेजारी राष्ट्रांकडे पहा. नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तान यांच्या परिस्थितीकडे पाहिल्यावर नेहरू आणि पटेलांच्या राष्ट्राच्या निर्मितीतील भूमिकेची तुम्ही प्रशंसाच कराल.

प्रश्नतुम्ही गांधींच्या बाजूने असाल तर बोसविरोधी असायलाच हवे या प्रकारचा विचार कुठून येतो? हे फक्त भारतातच घडते असे म्हणता येईल का?

उत्तर- मला वाटते की हा अगदी अलीकडील बदल आहे आणि तो सोशल मीडियाने आणला आहे. सोशल मीडियामुळे हा जो काळा-आणि पांढरा असा दोन रंगांचा दृष्टिकोन आला आहे त्याने बारकावे निघून जातात. ज्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दल तुम्ही बोलता आहात त्याची खलनायकी सुरुवात भाजपच्या trolls नी केली आहे. २०१३ मध्ये मोदींनी पंतप्रधान बनायचे ठरवले तेव्हा ज्याप्रकारे सोशल मीडियाची फौज उतरवली गेली त्याने तो प्रचार खूपच विखारी झाला. या सायबर गुंडांचा दृष्टिकोन असा होता की तुम्ही मोदींना पाठिंबा देणार नसाल तर तुम्ही गांधी कुटुंबीयांचा ’चमचा’ आहात. तुम्ही मोदींना पाठिंबा देणार नाही पण तुम्ही  काँग्रेसचे टीकाकार आहात आणि मोदींच्याही काही गोष्टींचे तुम्ही कौतुक करता ही शक्यता असूच शकते. पण हे सर्व बारकावे नाहीसे झाले. जी सायबर फौज मोदींनी २०१३ मध्ये उतरवली ती विचार करून आखलेली गोष्ट होती. आणि त्याचा फायदा झालेला दिसतो. आतासुद्धा पंतप्रधान-कार्यालयातून यावर नजर ठेवण्यात येते असे म्हटले जाते.

ज्या लोकांनी मोदींना मत दिले त्यांतील खूप जणांनी मोदींच्या हिंदुत्वाला मत न देता त्यांना  काँग्रेसचा उबग आला होता म्हणून मत दिले होते. त्या लोकांना असे वाटले की मोदींची फुटीरतानीती मागे पडली आहे, गुजरातदंगेही मागे पडले आहेत. मोदी विकासपुरुष झाले आहेत. त्यांच्यासोबत संधी, विकास, नोकऱ्या इ. येतील. मोदी हे उद्धारक आहेत असेही भासवले जात होते आणि ज्या कुणा व्यक्तीला मोदींबद्दल हलकीशीदेखील शंका आहे – टीका आणि विरोध तर दूरच राहिले – तो स्वभावत:च काँग्रेसचा चमचा आहे. यामुळे सर्व चर्चाच खालच्या पातळीवर पोचली. याची सुरुवात २०१३ मध्ये झाली. नरेंद्र मोदींना कुठलेही विधेयक पारित करून घेण्यास एवढी अडचण का येते? कारण त्यांनी विरोधकांना प्रचारादरम्यान नाही नाही त्या प्रकारे हाकारले, आणि ट्विटर सैन्याने ते अतिशय दु:खदायक प्रकारे पुढे नेले. सर्व बारकावे आणि गुंतागुंत नाहीसे झाले.

प्रत्येक व्यकी ही चांगल्यावाईटाचे मिश्रण असते. प्रत्येक सामाजिक प्रक्रिया (उदाहरणार्थ स्मार्टफोनचा शिरकाव) काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी आणते. इतिहास या गुंतागुंतीबद्दल आणि बारकाव्यांबद्दल आहे, जिथे व्यकी क्वचितच पूर्णपणे काळ्या किंवा पांढऱ्या असतात. हिटलर हा नक्कीच पूर्ण अंशाने खलनायक होता, पण असे लोक किंवा घटना अगदीच तुरळक असतात. बहुतेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा या सर्व प्रकारच्या गोष्टींचे मिश्रण असतात. ते एका प्रसंगी धैर्यशाली असतात तर दुसऱ्या प्रसंगी कच खाताना दिसतात, एखाद्या प्रसंगी ते त्यांच्या धोरणांमध्ये दूरदर्शी असतात तर आणखी एखाद्या प्रसंगी ते संधीसाधू वागतात. हे सगळे बारकावे सोशल मीडियावर नाहीसे होतात. पण मी असेही म्हणेन की भारतीय तरुणांना इतिहासात रस आहे, त्यांना चिंतनशील लिखाण वाचायचे आहे पण सोशल मीडिया  मात्र आपल्या देशाची व्यामिश्रता समजण्यासाठी योग्य माध्यम नाही. (ट्विटरवरील) १४० अक्षरांमध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीचे सत्य ज्ञात होऊ शकत नाही. आपण आशा करूया की चर्चेचे हे दुभंगलेपण बाजूला पडेल आणि समतोल साधला जाईल.

प्रश्नबोस यांचा उजव्या विचारसरणीचा नेता म्हणून जो अपहार होत आहे त्याबद्दल काय म्हणाल?

उत्तर-बोस हे एक जादुई व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या निधनाबद्दल गूढ आहे. ते ब्रिटिश हेरखात्याला गुंगारा देऊन ज्या प्रकारे नाहीसे झाले ते रोमांचित करणारे आहे. ते एक थोर देशभक्त होते. सुरुवातीला ते बंगाल्यांचे नेते होते पण आता ते बंगालपुरते सीमित नाहीत. त्यांचे चाहते सर्वत्र आहेत. परंतु त्यांच्याही व्यक्तिमत्त्वात काही अप्रिय गोष्टी आहेत, उदाहरणार्थ ते हुकूमशाही विचारसरणीचे होते. भारताला २० वर्षे हुकूमशाहीची गरज आहे असे त्यांचे मत होते. पण त्यांचा हिंदू-मुस्लिम ऐक्यावरती आणि महिला सबलीकरणावरती विश्वास होता. या त्यांच्या दोन प्रमुख धारणा होत्या ज्या संघाच्या विचारधारेच्या अगदी विरुद्ध आहेत. संघाचा महिलांच्या समान अधिकारावरती विश्वास नाही. त्यांचे मत आहे की महिलांची खरी जागा कुटुंबाचे पालनपोषण करणारी स्त्री अशी आहे आणि संघाच्या विचारधारेनुसार मुस्लिम आणि ख्रिश्चनांना दुय्यम नागरिकत्व मिळाले पाहिजे.

संघाचे गोळवलकर म्हणून जे प्रमुख नेते होते – ज्यांचे पुस्तक आजही संघासाठी बायबल आहे – त्यांनी मुस्लिम, ख्रिश्चन आणि कम्युनिस्ट हे तीन भारतापुढील गंभीर धोके आहेत असे प्रतिपादन केले आहे. त्यामुळे त्यांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन खूपच सांप्रदायिक होता असे दिसते (जो बोस यांचा नव्हता).

 प्रश्नकाही महिन्यांपूर्वी अनेक भारतीय इतिहासकारांनी आणि प्राध्यापकांनी एक निवेदन सादर केले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की भारताच्या इतिहासलेखनावर डाव्याइतिहासकारांनी अवाजवी प्रभाव टाकला आहे आणि इतर विचारधारांचे दमन केले आहे. यावर तुमचे काय म्हणणे आहे?

उत्तर- मी त्यांच्य़ाशी काही प्रमाणात सहमत आहे. आपल्याकडे एक मार्क्सिस्ट गट होता ज्याचे विद्यापीठांवरती नियंत्रण होते. इंदिरा गांधीनी बहुमत वाचवण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मदत घेतली आणि त्याबदल्यात इंदिरा गांधींनी IHCR, NCERT वरती CPI च्या इतिहास-अभ्यासकांना ताबा घेऊ दिला. काही प्रमाणात हे खरे आहे आणि त्याबद्दल आवाज उठवला गेला पाहिजे. तिथे जास्त मोकळेपणा आला पाहिजे. निरोगी लोकशाहीवादी चर्चा आणि वादासाठी आपल्याला डावे, उदारमतवादी आणि परंपरावादी (conservative) असे सर्व विचारप्रवाह आवश्यक आहेत. भारतातील अडचण ही आहे की आपल्याकडे परंपरावादी बुद्धिजीवी (intellectual) जवळजवळ नाहीच आहेत आणि जोपर्यंत संघ उजवी विचारधारेची जागा व्यापून आहे तोपर्यंत ते नसणारच. कारण संघाची भूमिका मुळातूनच बुद्धिजीवी-विरोधी (anti-intellectual) आहे. इतर लोकशाही देशांमध्ये (ब्रिटन, अमेरिका, जर्मनी) परंपरावादी बुद्धिजीवी आहेत जे विचारपूर्वक आपली मते मांडतात, जे गहन अभ्यास करतात, जे पारंपारिक मूल्ये-कुटुंब-समाजव्यवस्था-सभ्यता-सौंदर्य यांचे महत्व मांडतात. अभिजात संगीत आणि अभिजात कला का महत्वाची आहे हे मांडतात. पण स्मृती इराणी जर शिक्षणमंत्री असतील आणि अनुपम खेर जर तुमचा सर्वात मोठा प्रवक्ता असेल तर तुम्हाला बुद्धिजीवी मिळणार नाहीत. तुम्हाला सोशल मीडिया वरील प्रक्षुब्ध लोकच मिळणार आहेत.

वरील आरोपाच्या संदर्भात डाव्यांनी वैचारिक वादांमध्ये केवळ उजव्यांचेच नाही तर उदारमतवाद्यांचेही दमन केले हे काही प्रमाणात खरे आहे. आता ते मोकळे होत आहे आणि ती चांगली गोष्ट आहे. पण बुद्धिजीवी काम हे मेहनतीचे काम आहे. ट्विटरवर मेसेज टाकणे, टीव्हीवरती दिसणे नाही किंवा अगदी वर्तमनापत्रात स्तंभलेखन करणे यापेक्षा ते अनेकपटींनी अवघड आहे. जर तुम्हाला बुद्धिजीवी म्हणून मोठी कामगिरी करायची असेल तर तुम्हाला अभ्यासपूर्वक लेख, निबंध लिहावे लागतील आणि कोणीही उजवा बुद्धीवादी, उजवा पत्रकार किंवा भाजपचा समर्थक हे करायला तयार नाही. भारतातील उजवे बुद्धीवादी एकतर आळशी आहेत किंवा ते असहिष्णू आहेत. बुद्धिजीवी काम हे मेहनतीचे काम आहे. त्यात विचार, विश्लेषण, संशोधन, मनन, स्वत:च्या चुका सुधारण्याची क्षमता, स्वत:चा दृष्टिकोन व्यापक करणे, इतरांचे ऐकणे इ. अनेक गोष्टी येतात. माझे प्रत्येक पुस्तक बनण्यासाठी पाच ते सहा वर्षे लागतात.

चक्रवर्ती राजगोपालाचारी हे भारतातील उजव्या बुद्धीजीवींसाठी आदर्श मानले जाऊ शकतील अशी व्यक्ती आहे. त्यांनी स्वतंत्रता पक्षाची स्थापना केली. राज्यव्यवस्थेचा हस्तक्षेप कमी असावा असे त्यांचे मत होते. कुटुंब, समाज, परंपरा यांचे महत्त्वाचे स्थान आहे असे त्यांचे मत होते आणि ते एक सखोल विचार करणारे विचारवंत होते. राजाजींकडून उजव्या बुद्धीजीवींना प्रेरणा मिळू शकते; गोडसे किंवा गोळवलकर यांच्याकडून नाही. मी स्वत: उदारमतवादी असल्यामुळे मी उजव्या बुद्धीजीवींचे स्वागतच करेन कारण त्यामुळे वैचारिक वादाची पातळी उंचावेल, वैचारिक वाद विविधांगी होईल. पण संघ जर विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, सांस्कृतिक संस्था, संग्रहालये, अकादमी यांच्यावर नियंत्रण ठेवून राहणार असेल तर तुम्हाला कमअस्सल गोष्टींवरती समाधान मानावे लागणार.

प्रश्नम्हणजे तुम्ही म्हणत आहात की रोमिला थापरांना प्रत्युत्तर देण्यास दीनानाथ बात्रा कमी पडतील?

उत्तर-अगदी बरोबर. आपल्याकडे जदुनाथ सरकारांसारखे चांगले उजवे इतिहासकार होते ज्यांनी मेहनत केलेली आहे, ज्यांचा परंपरेच्या सातत्यावर विश्वास होता आणि ते उच्च प्रतीचे विद्वान होते. पण जर दीनानाथ बात्रा रोमिला थापरांना टक्कर देऊ शकतील असे तुमचे मत असेल तर तुम्हाला विद्वान मिळणार नाहीत, तुम्हाला वैचारिक वादाचे स्वरूप अधिकाअधिक खालच्या पातळीवर पोचताना दिसेल.

(factordaily.com या संकेतस्थळावरून साभार)
(अनुवाद: धनंजय मुळी)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.