चौफुलीवर उभे राष्ट्र

हिंदुत्ववादी विचारसरणी आणि हिंदूराष्ट्रवाद या कायम चर्चेत राहिलेल्या विषयावर हा नव्याने टाकलेला प्रकाशझोत.
——————————————————————————–
‘हिंदू सांप्रदायिकता ही इतरांपेक्षा अधिक हानिकारक आहे कारण हिंदू सांप्रदायिकता सोयीस्करपणे भारतीय राष्ट्रवादाचे सोंग आणून सर्व विरोधकांना राष्ट्रद्रोही ठरवून त्यांचा धिक्कार करू शकते.’(जयप्रकाश नारायण –अध्यक्षीय भापण, दुसरी सांप्रदायिकताविरोधी राष्ट्रीय परिषद, डिसेंबर 1968)

वैचारिक अभिसरण हे कोणत्याही समाज किवा राष्ट्रासाठी प्राणवायूसारखे असते. आजबर्‍याच वर्षांनंतर राष्ट्राच्या मूलतत्त्वांसंदर्भात वैचारिक अभिसरण होताना दिसते. पहिल्यांदा काँग्रेसपेक्षा भिन्न विचारसरणीचा पक्ष स्वबळावर संपूर्ण बहूमतासह केंद्रात सत्तेवर आहे. आज चौदा राज्यांमध्येभाजप स्वबळावर किंवा मित्रपक्षांच्या साहाय्याने सत्तेत आहे. भारतीय राष्ट्रवादाची पुनर्व्याख्या करण्याचा प्रयत्न होत आहे. हा देश कुणाचा? राष्ट्रवादी कोण आणि राष्ट्रद्रोही कोण यांची नवीन मानके प्रस्थापित केली जात आहेत. आपल्या राष्ट्राच्याआणि संविधानाच्यानिर्मात्यांनी राष्ट्राची जी इमारत उभी केली आहे, त्याचे गुणगानकरत भूतकाळाकडे बघत गाफील राहणे आणि वर्तमानकाळातील आह्वानांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरूशकते. आज आपले राष्ट्र एका चौफुलीवर उभे आहे. यापुढील त्याचे मार्गक्रमण कोणत्या दिशेला होईल हे आज राष्ट्रवादाभोवती केंद्रित असलेल्या चर्चेच्या फलितातून स्पष्ट होईल.

राष्ट्र आणि राष्ट्रवाद:
मानवी इतिहासात ‘राष्ट्रवाद’ या संकल्पनेचा उदय तसे पाहता अलीकडचाच. 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांतीतून राष्ट्रवाद संकल्पनेचा उदय होताना दिसतो. औद्योगिक क्रांती आणि वसाहतवादी स्पर्धेमुळे राष्ट्रवादाला चालना मिळाली. 19 वे शतक तर राष्ट्रवादाने भारावलेले होते. इटली व जर्मनी या राष्ट्रांची निर्मिती याच शतकातली. ब्रिटिशांमुळे राष्ट्रवादाची ओळख भारतीयांना झाली. ब्रिटिशशासनाच्या स्थापनेपूर्वी भारत कधीही आसेतुहिमालय एका राजकीय सत्तेच्या अधीन नव्हता. त्यापूर्वी तो नेहमीच अनेक राज्यांमध्ये विभागलेला होता. भारतीय राष्ट्रवादाचा उदय ही ब्रिटिश राष्ट्रवादाला दिलेली प्रतिक्रिया होती.
बेनेडिक्ट अँडरसनने आपल्या सुप्रसिद्धImagined Communities या ग्रंथात राष्ट्राची व्याख्या पुढील शब्दांत केली आहे – ‘राष्ट्र म्हणजे मर्यादित, सार्वभैाम आणि राजकीय असा एक काल्पनिक समूह’. भारतीय राष्ट्रवादाचे कल्पनाविश्व हे जसे आक्रमक ब्रिटिश राष्ट्रवादाला प्रतिक्रिया म्हणून उभे राहिले त्याचप्रमाणे प्रत्येक राष्ट्राच्या राष्ट्रवादाचे कल्पनाविश्व हे त्या राष्ट्राच्या ऐतिहासिक अनुभवातून निर्माण होते आणि ते इतरांपेक्षा भिन्न असते. त्यामुळेच आपल्याला राष्ट्रवादाचे विविध आविष्कार पाहायला मिळतात, उदा. गांधींचा सत्याग्रहरूपी सकारात्मक राष्ट्रवाद किंवा फॅसिझमच्या रूपातील अत्यंत नकारात्मक राष्ट्रवाद .
भारतीय राष्ट्रनिर्मात्यांनी स्वातंत्र्यलढ्यादरम्यान धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या उदारमतवादी मूल्यांवर आधारित राष्ट्रवादाचे कल्पनाविश्व निर्माण केले. त्याचे प्रतिबिंब आपणास आपल्या संविधानात दिसून येते. स्वातंत्र्यलढ्याच्या पहिल्या पिढीतील एक ज्येप्ठ नेते सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी त्यांच्या आत्मचरित्राला Nation in the Making असे नाव दिले. राष्ट्रनिर्मितीची ही प्रक्रिया आज स्वातंत्र्यानंतरदेखील 68 वर्षे अखंड चालू आहे आणि भविष्यातदेखील सुरू राहील. प्रत्येक राष्ट्राच्या बाबतीत हे तत्त्व लागू पडते. या प्रक्रियेची परिपक्व अवस्था आपणास अमेरिका आणि पश्चिम युरोपात दिसून येते. आपण अजूनही प्राथमिक अवस्थेतच आहोत.
इटली या राष्ट्राच्या निर्मितीचे एक साक्षीदार Massimo d’ Azeglio यांचे इटलीच्या निर्मितीनंतरचे एक विधान महत्त्वपूर्ण आहे. ते म्हणाले होते, ‘आज आपण इटलीची निर्मिती केली आहे. आता आपल्याला इटालियन्सची निर्मिती करावी लागेल.’’ या विधानाच्या आधारे भारताच्या संदर्भात नि:संकोचपणे म्हणता येईल की, 1947 साली भारताची निर्मिती झाली परंतु भारतीय निर्माण करण्याची प्रक्रिया अजून अपूर्णावस्थेत आहे.

हर्टझ् यांच्यामते ‘राष्ट्रभाना’शिवाय (National Consciousness) राष्ट्रनिर्माण होत नाही. केवळ प्रादेशिक एकीकरणामुळे राष्ट्राची निर्मिती होत नसते. त्यासाठी आवश्यक असते ते भावनिक ऐक्य. परस्परबंधुभाव हा राष्ट्राचा आत्मा असतो. वंश, भाषा, धर्म आणि संस्कृती हे घटक राष्ट्रनिर्मितीला पूरक ठरू शकतात, परंतु निर्णायक असू शकत नाहीत. उदा., वंश, भाषा आणि संस्कृती एक असूनदेखील 1947 साली पंजाब व बंगाल प्रांतांचे विभाजन झाले. द्विराष्ट्रसिद्धांतानुसार जर धर्म हा राष्ट्रनिर्मितीसाठी निर्णायक असता, तर पाकिस्तानपासून बांगलादेश विभक्त झाला नसता किंवा संपूर्ण युरोपचे एक राष्ट्र निर्माण झाले असते किंवा मध्यपूर्वेत मुस्लिम समाज अनेक राष्ट्रांमध्येविभागला गेला नसता. परंतु जेव्हा जातीय, सांप्रदायिक द्वेषातून किंवा आरक्षणासाठी हिंसाचाराचा मार्ग अवलंबून इतर भारतीयांच्या जीविताला किंवा सार्वजनिक मालमत्तेला हानी पोहोचवली जाते, तेव्हा ही बंधुभावाची जाणीव भारतीयांच्या मनात प्रखर आहे किवा नाही याविषयी रास्त प्रश्नचिह्न निर्माण होते. प्रांतवाद, जातीयता, सांप्रदायिकता या व इतर अडथळयांना ओलांडूनच एका भारताची निर्मिती होऊ शकते. आपल्याला अजून बरेच अंतर कापायचे आहे. त्यादिशेने सध्या राष्ट्रवादावर सुरू असलेली चर्चा म्हणजे एक मैलाचा दगड आहे, असे आपण समजू या.

वैश्विकीकरणामुळे होत असलेल्या स्थलांतरांमुळे प्रत्येक राष्ट्रात आज अनेक राष्ट्रसमूह नांदताना दिसतात. त्यामुळे समकालीन जगाच्या विशिष्ट परीस्थितीतील देशांतर्गत किवा आंतरराष्ट्रीय आव्हाने आपणास संमिश्र राष्ट्राच्या चौकटीतच सोडवाव्या लागतील. (ब्रह्मानंद यांची Nation Building in India या जयप्रकाश नारायणांच्या पुस्तकातील प्रस्तावना). एरिक हॅाब्सबॅान यांनी म्हटल्याप्रमाणे कोणत्याही मनुष्याला केवळ राष्ट्रीयता हीच एक ओळख नसते. भारताच्या संदर्भात म्हणायचे तर एका भारतीयाला जात, धर्म, पंथ आणि वर्ग अशा विविध बांधिलकी असतात. त्यामुळे भारतीय राष्ट्रवादाचा विकास मानवतेच्या पायावर एक दर्शन म्हणून अशा पद्धतीने करावा लागेल की जेणेकरून आपल्या इतर बांधिलकींशी रास्त इमान राखून देखील एका भारतीयाला भारतीय राष्ट्रवादाला प्राधान्य द्यावेसे वाटेल.

टागोर आणि राष्ट्रवादाची काळोखी बाजू:
राष्ट्र हा एक मर्यादित (Exclusive) समुदाय असल्यामुळे राष्ट्रवाद ही एक संकुचित संकल्पना ठरते. औद्योगिक क्रांती, वसाहतवाद आणि आधुनिकीकरणातून जन्मास आलेल्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेवर रवींद्रनाथ टागोरांनी सतत टीका केली. त्यासंदर्भात त्यांचा Nationalism हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांना राष्ट्रवाद ही संकल्पना भारतीय संस्कृती व तत्त्वज्ञानाच्या विरोधी वाटली. भारत जे कधीही एक राष्ट्र नव्हते, ते पाश्चिमात्त्यांच्या राष्ट्रवादाच्या प्रभावाखाली राजकीय व वाणिज्यिक मूल्यांना महत्त्व देऊन आपली नैतिक मूल्ये व स्वत्व गमावून बसेल की काय अशी त्यांना काळजी वाटत होती. राष्ट्रवादाच्या नावाखाली युरोपीय राष्ट्रांमध्ये वाढत जाणारी तेढ आणि आशिया व अफ्रिकेतील लोकांचे होणारे शोषण त्यांना दिसत होते. भारताने अशा राष्ट्रवादापासून दूर राहावे असे त्यांना वाटे. राष्ट्रवादाला त्यांनी एका ‘क्रूर ,पापी संसर्गरोगाची’ (A cruel epidemic of evil) आणि ‘राक्षसी संघटनेची’ उपाधी दिली. टागोरांच्या मते, राष्ट्राच्या रुपाने मनुष्याने एका अत्यंत शक्तिशाली अशा भूल देणार्‍या रसायनाची निर्मिती केली आहेआणित्याच्या अंमलाखाली मनुष्य अनैतिक आणि मानवतेविरुद्ध कृत्ये करतो. टागोरांचे हे विधान राष्ट्रवादाच्या नावाने लढल्या गेलेल्या दोन विनाशकारी महायुद्धांच्या आणि अमेरिकेने जपानमधील नागरी समुदायावर टाकलेल्या अणुबॉम्बच्या संदर्भात समजून घेतले पाहिजे. दुसर्‍या महायुद्धानंतरदेखील राष्ट्रवादाच्या नावाखाली आंतरराष्ट्रीय कलह सुरू असल्याचे दिसते.

गांधींच्या आगमनापूर्वी भारतीय राष्ट्रवादाची व्याख्या करण्याचा मक्ता जणू शिक्षित उच्चभ्रू व मध्यमवर्गीय भारतीयांनीच घेतला होता. गांधींनी सर्वसामान्य भारतीयांच्या दृष्टिकोनातून भारतीय राष्ट्रवादाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भारतीय राष्ट्रवादाला सकारात्मक व सर्वसमावेशक स्वरूप दिले. गांधी लिहितात, ‘‘राष्ट्रवाद कधीही संकुचित किवा आंतरराष्ट्रीयवादाशी विसंगत असू नये. स्वार्थ आणि इतर राष्ट्रांच्या शोषणावर आधारित राष्ट्रवाद हे पाप आहे. सुदृढ आणि सकारात्मक राष्ट्रीय प्रेरणेशिवाय आंतरराष्ट्रीयवादाची कल्पना केली जाऊ शकत नाही.’’ (समग्र गांधी वाड्.मय, Vol.35, p.92 Vol.35, p.92)

हिंदुत्व, राष्ट्रीयत्व आणि अल्पसंख्याक:
ब्रिटिशशासनाच्या स्थापनेनंतर भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात सोशल मोबिलायझेशनमधून विविध सामाजिक गटांमध्ये स्पर्धा निर्माण झाली, जी अजूनही सुरू आहे. त्यातूनच पुढे सांप्रदायिकतेचा जन्म झाला व त्याचे रूपांतर संधीसाधूपणात झाले. (ब्रह्मानंद, प्रस्तावना). आधुनिकता आणि सांप्रदायिकता यांचा जवळचा संबंध आहे. समाजातील नवशिक्षित घटकाने सत्ता, निर्णयप्रक्रिया आणि नोकरीयांत आपला वाटा निश्‍चित करण्यासाठी सांप्रदायिकतेचा आधार घेतला. हिंदू व मुसलमान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत आणि ती एकत्र नांदूशकत नाही हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत दोन्ही समाजांमधील शिक्षित मध्यमवर्गीयांच्या मेंदूतूनच प्रसवला. शतकानुशतके एकत्र राहत असलेल्या सर्वसामान्य निरक्षर हिंदू व मुसलमानांना याची कधी कल्पनादेखील नव्हती. सांप्रदायिकतेचा धर्माशी केवळ नावाचा संबंध असतो. सांप्रदायिकतेमागे खरे पाहता राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रेरणा असतात. मागासलेपणा, संकुचितपणा, असुरक्षितता आणि दुरावलेपणामुळे सांप्रदायिकतेला सुपीक जमीन प्राप्त होते. गांधींनी हिंदू मुस्लीम समस्येचे विश्लेषण अत्यंत समर्पक शब्दांत केले होते. ते लिहितात, ‘‘सध्याचा असंतोष हा दोन्ही पक्षांच्या स्वत:मधील दुर्बलतेच्या जाणिवेतून निर्माण झाला आहे. हिंदू स्वत:ला शारीरिक शक्तीच्या व सहनशीलतेच्यादृष्टीने दुर्बल समजतात, तर मुसलमान स्वत:ला शैक्षणिक व भैातिक संपत्तीच्यादृष्टीने दुर्बल समजतात.’’
स्वार्थी राजकारणी याचा फायदा घेतात आणि धार्मिक विद्वेष पसरवतात. सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरतात, हिंसक होतात, जखमी होतात आणि मारले जातात. घरे सर्वसामान्यांचीच जाळली जातात. राजकारण्यांचा उद्देश पूर्ण होतो. गरीबांची मात्र दैना होते.
धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाला सर्वांत मोठा धक्का 1947 च्या फाळणीमुळे बसला. त्यातून भारतीय, विशेषत: हिंदू अजूनही पूर्णत: सावरू शकलेले नाहीत. जयप्रकाश नारायणांनी म्हटल्याप्रमाणे फाळणीनंतर हिंदू समाज Psychosis ने (एक मनोविकार ज्यामध्येमनुष्य वास्तवाचे भान हरवून बसतो) ग्रस्त झाला आहे. फाळणीनंतर हिंदूंच्या मनामध्ये मुसलमानांप्रती निर्माण झालेला संशय अजूनही दूर झालेला नाही. तो दूर होण्यासाठी दोन्ही समाजांमध्ये संवाद निर्माण होणे फार आवश्यक आहे. सर्वसामान्य हिंदूंच्या मनातील सर्वात मोठा गैरसमज जो खाजगीत बोलून दाखविला जातो, तो हा आहे की पाकिस्तानच्या निर्मितीनंतर सर्व मुसलमानांनी तेथेच जायला हवे होते. त्यांना भारतात राहू दिले जाते, हा त्यांच्यावर मोठाच उपकार आहे. यावेळी एका महत्त्वाच्या तथ्याकडे दुर्लक्ष केले जाते की, भारताने फाळणी ही द्विराष्ट्रसिद्धांतामुळे कधीही स्वीकारली नाही. सांप्रदायिक दंगलींमुळे होणारा रक्तपात थांबवण्यासाठी फाळणीचा स्वीकार केला गेला. जयप्रकाश नारायणम्हणतात की, हिंदू समाज हा बहुसंख्य असूनदेखील अल्पसंख्याकांच्या मानसिकतेने (Minority Complex) ग्रस्त आहे. डॅा. आंबेडकरांच्या मते जातीपातींच्या भिंतींमुळे हिंदू समाज एकसंध नाही. त्यामुळे तो मुसलमानांसमोर स्वत:ला दुर्बळ समजतो व भयगंडाने ग्रस्त असतो.
स्वातंत्र्यानंतरदेखील दोन्ही समाजांत योग्य संवाद निर्माण होऊ शकला नाही, यात सर्वाधिक काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसपक्षाचे अपयश आहे. तसेच, हिंदुत्ववादी पक्ष व संघटना आणि AIMIM सारख्या पक्षांनी परिस्थिती आणखी वाईट करून ठेवली आहे. हिंदुत्ववाद्यांकडून आजकाल केली जाणारी राष्ट्रवादाची व्याख्या ही खरेतर हिंदू सांप्रदायिकताच आहे. त्याचप्रमाणे, AIMIM स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणत असला तरीदेखील त्यांच्या नेत्यांच्या उक्ती व कृतींमधून व्यक्त होणारी मुस्लिम सांप्रदायिकता लपू शकत नाही. धर्माच्या किंवा जातीच्या नावावर भावना भडकवून मते मिळवणे फार सोपे असते. परंतु धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर लोकांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करून मते मिळवणे अवघड असंते. त्यामुळे हा लढा राष्ट्रवाद विरुद्ध राष्ट्रद्रोह असा नसून खरेतर धर्मनिरपेक्षता विरुद्ध सांप्रदायिकता असा आहे.
बहुसंख्य असलेल्या हिंदूंनी आपल्या अधिकारांपेक्षा त्यांच्या खांद्यांवर असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. जे मुसंलमान फाळणीनंतर भारतात राहिले, त्यांनी या राष्ट्राच्या धर्मनिरपेक्षतेवर विश्‍वास ठेवला. येथे त्यांना न्यायाने वागवले जाईल या भावनेने ते भारतात राहिले. याबदल त्यांच्या मनात कोणतीही शंका निर्माण होऊ नये, याची जबाबदारी हिंदूंची आहे. हे राष्ट्र केवळ हिंदूंचे नाही. सर्व धार्मिक अल्पसंख्याक हे या देशाचे समान नागरिक आहेत, हे सत्य हिंदूंनी कधीही डोळयाआड करू नये. एकाच कुटुंबातील सख्ख्या भावांमध्येजेथे वादविवाद होतात तेथे भारतासारख्या वैविध्यपूर्ण राष्ट्रात विविध समुदायांमधे वादविवाद होणे स्वाभविक आहे. प्रश्नहा आहे की, वाद सांमजस्याने सोडवायचा की हिंसेने. यातच भारतीय राष्ट्रवादाची कसोटी आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी पक्ष व संघटना ज्या आक्रमक राष्ट्रवादाचा अजेंडा राबवत आहेत, तो राष्ट्राच्या ऐक्यासाठी फार घातक आहे.

सावरकर आणि गोळवलकर
हिंदुत्वाचे आद्यजनक स्वातंत्र्यावीर सावरकर आणि आरएसएसचे दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या विचारांमध्ये एक समान धागा हा आहे की, दोघांनीही हिंदूंच्या मनात मुसलमानांचे राक्षसीकरण करण्याचा प्रयत्न केला. सावरकर लिहितात की, एका हिंदूचे बाटणे, मुसलमान होणे म्हणजे एका माणसाचे राक्षस होणे किंवा एका देवाचे दैत्य होणे. (वि. दा. सावरकर, भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने, रिया पब्लिकेशन, कोल्हापूर, 2012, पृ. 156). दोघांनीही मुसलमानांची परकीय आक्रमक म्हणून सतत हेटाळणी केली. वैदिक धर्माचा जयघोष करून आर्यांना राष्ट्राचे जनकत्व दिले. मुसलमान व ख्रिश्चन समाजाच्या जीवनपद्धतीला हीन लेखले. त्यांनी प्राचीन इतिहासाचा गौरव केला, परंतु मध्ययुगीन इतिहास आणि अकबरसारख्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या योगदानयांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्यातूनच आज भारतीय इतिहासाऐवजी भारतीय मिथकांना जागा दिली जात आहे. त्या मिथकांना राष्ट्रवादाशी जोडले जात आहे. तसेच, भारताचा समन्वयात्मक इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. वर्तमानकाळाच्या कसोटीवर प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाचे विश्लेषण करण्याचा घोळ घातला जात आहे. आपल्या संकुचित दृष्टिकोनातून प्राचीन व आधुनिक काळाला जोडणारा मध्ययुगीन इतिहासाचा पूल तोडण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी पक्ष व संघटना करीत आहेत. त्यातूनच शहरांची, रस्त्यांची मुस्लिम नावे बदलून हिंदू नावे देणे, यासारख्या कृती होताना दिसतात.
सावरकर आणि गोळवलकर यांनी हे राष्ट्र म्हणजेएक हिंदू राष्ट्रच आहे आणि मुसलमानांकडे सतत संशयी नजरेनेच बघितले पहिजे, असा प्रचार करून दोन्ही धर्मीयांमध्येदरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सावरकर लिहितात, ‘‘…आम्हा हिंदूंना एकतर आदर पूज्यभाव राणा प्रतापशी दाखविता येईल किंवा त्याचा शत्रू अकबर याच्याशी दाखविता येईल. आम्हाला त्या दोघांचे सारखेच ममत्व कसे मानता येईल? देवाची आणि दैत्याचीही पूजा एकत्रच कशी बांधतां येईल?…..’’(वि.दा.सावरकर, सहा सोनेरी पाने पृ. 366). अकबर आणि राणा प्रताप हे याच मातीतून जन्मले. शिवाजी, संभाजी जसे या मातीतले तसेच अफजलखान किंवा औरंगजेबही इथलेच, या वास्तवाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. या हिंदुत्ववादी पक्षांना, संघटनांना सर्वच अहिंदू धर्माचे वावडे असते. सावरकर आणि गोळवलकर यांच्या टीकेतून बैाद्धधर्मदेखील सुटला नाही. दोघांनीही वैदिक धर्मीयांना राष्ट्रभक्त आणि बैाद्धांना राष्ट्रद्रोही ठरविण्याचा सतत प्रयत्न केला (सहा सोनेरी पाने, पृ. 100, 130 आणि गोळवलकर, Bunch of Thoughts, Third Edition 1973, पृ. 72). सावरकरांनी सूडाचे तत्त्वज्ञान मांडले. मुस्लिमरूपी राक्षसांचे निर्दालन करण्यासाठी हिंदूंनीदेखील प्रतिराक्षस बनावे, हे सावरकरांचे तत्त्वज्ञान (सहा सोनेरी पाने, पृ. 159). दोघांनीही धर्मांतर म्हणजे राष्ट्रद्रोह हा गैरसमज पसरवला आणि हिंदू आणि गैरहिंदू, विशेषत: मुसलमान यांच्यात सामंजस्य निर्माण करण्याचा एकच उपाय सुचवला, तो म्हणजे गैरहिंदूनी स्वत:ची ओळख विसरून हिंदू धर्माचा स्वीकार करावा. पाकिस्तानला संपवून अखंड हिंदुस्थान निर्माण करण्याची घोषणाही त्यांचीच. स्वातंत्र्यानंतर भारतीय राष्ट्रवादाची मांडणी हिंदुत्ववाद्यांकडून पाकिस्तानला नकारात्मक प्रतिक्रिया म्हणून केली जाते. या प्रतिक्रियात्मक राष्ट्रवादाचा त्याग करून गांधींच्या विचाराप्रमाणे आपल्याला सुदृढ, सकारात्मक, सर्वसमावेशक राष्ट्रवादाची मांडणी करावी लागेल.

मुसलमानांची सर्वांगीण प्रगती होणे राष्ट्राच्या ऐक्यासाठी आवश्यक आहे. मुसलमानांच्या विकासातून राष्ट्राचाच विकास होणार आहे. नाहीतर त्यातून मुसलमान सांप्रदायिक पक्षांना, संघटनांना बळ मिळेल. यातूनच पुढे विभक्ततावादी चळवळींना संधी मिळते. मराठा, जाट किंवा पटेल समाजासाठी आरक्षणाची मागणी राष्ट्रद्रोही ठरत नाहीत, परंतुशैक्षणिक व आर्थिकदृष्टया मागास मुसलमान समाजाला सुविधा देण्याचा प्रश्न आला की सर्वांच्या भुवया उंचावतात.अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचा अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा काढून घेतला जातो.

गरज आत्मनिरीक्षणाची:
मुसलमानांचा प्रश्नबाजूला ठेवून ह्याहिंदुत्ववादी पक्ष संघटनांचा हिंदू समाजांतर्गत विषमतेसंदर्भात दृष्टिकोन तपासला तर, त्यातील बेगडीपण स्पष्ट होते. सावरकरांनी त्यांच्या रत्नागिरीतील स्थानबद्धतेच्या काळात अस्पृश्यतेविरुद्ध सक्रिय चळवळ चालवली. परंतुहिंदू महासभेचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी ह्याप्रश्नाकडे दुर्लक्ष केले. गोळवलकरांना तर वर्णजातिव्यवस्थेत काही वाईट आहे असे वाटलेच नाही. भारतीय संस्कृतीच्या नावाने वर्णआणिजातींचे त्यांनी छुपे समर्थन केल्याचे दिसते (Bunch of Thoughts,पृ. 99). ते अस्पृश्यतेच्या प्रथेवर टीका करतात, परंतुज्या वर्णजातिप्रथेतून अस्पृश्यतेचा जन्म होतो, त्यावर ते टीका करत नाहीत. दलितांवर वाढत चाललेल्या अत्याचारांविरुद्ध सक्रिय चळवळ चालवताना आरएसएसदिसत नाही. उलट वैदिक धर्माचे गुणगानकरत दलितांमधील जागृत होत असलेली स्वतंत्र अस्मिता दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जातो. आपले वैचारिक स्वातंत्र्य अभिव्यक्त करणार्‍या IIT मद्रासमधील आंबेडकर पेरियार स्टडी सर्कलवर बंदी घालण्यात येते. हैदराबाद विद्यापीठातील आंबेडकर स्टुडन्टस् असोसिएशनला (ASA) राष्ट्रद्रोही ठरविण्यात येते. रोहित वेमुलासारख्या तरुणांचा आत्मविश्वास मोडून टाकून त्यांना आत्महत्येच्या मार्गाला लावले जाते. इंद्रधनुष्यासारख्या विविध रंगच्छटांनी नटलेल्या या राष्ट्राला फक्त एकाच रंगात रंगवून टाकण्याचा प्रयत्न करणार्‍या हिंदुत्ववाद्यांनी प्रथम हिंदू समाजात खरेखुरे ऐक्य निर्माण करून दाखवावे.

उपसंहार:
राष्ट्रवादी कोण? हे ठरविण्याचा अधिकार कोणत्याही एका पक्षालाकिंवा संघटनेला नाही. हे राष्ट्र म्हणजे काय, याची व्याख्या घटनेच्या चौकटीत करण्याचा अधिकार सर्व धार्मिक गटांना, दलितांना, आदिवासींना आणि महिलांनादेखील आहे. भारतीय राष्ट्रवादाच्या अवकाशात वर उल्लेख केलेल्या सर्व घटकांना समान स्थान मिळाले पाहिजे. ही आपणा सर्वांचीजबाबदारी आहे. तसेच, सत्ताधारी पक्षाची जबाबदारी मोठी आहे. जयप्रकाशांनी म्हटल्याप्रमाणे जर राजकीय संस्थांमध्ये संस्थात्मक प्रामाणिकपणा नसेल आणि त्या एकाच धर्माच्या हिताचा विचार करताना दिसत असतील तरज्या धार्मिक गटांना सत्तास्थानापासून डावलले जाते ते या संस्थात्मक व्यवस्थेच्या न्यायीपणाबदल प्रश्नउपस्थित करतात. अजूनही दलितस्थान, खलिस्थान या घेाषणा आपल्या स्मृतिपटलावर ताज्या आहेत. उत्तरपूर्वीय राज्यांमधील वणवा अजून शमलेला नाही. काश्मीरमधे तो सतत धुमसतो आहे. त्यामुळे परस्परसन्मान, सामंजस्य व सहनशीलता या गुणांचा आपल्याला अंगीकार करावा लागेल. शेवटी राष्ट्रवाद हा भावनेचा प्रश्न आहे. तो बाहेरून लादून नव्हे तर मनुष्याच्या अंतर्मनात निर्माण होत असतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.