समूहाच्या मताच्या विरुद्ध जाऊन आपला आवाज व्यक्त करणे हे महत्त्वाचे आहेच. पण याबद्दलचे मानसशास्त्रीय अभ्यास काय सांगतात? सामाजिक मानसशास्त्रातील एका प्रसिद्ध प्रयोगाची तोंडओळख करून देणारा हा लेख
——————————————————————————–
ओळख
’dissent’ या इंग्रजी शब्दामध्ये फक्त वेगळे मत किंवा विचार एवढेच अपेक्षित नाही, तर ही मतभिन्नता सर्वसाधारण किंवा अधिकृत मतापेक्षा वेगळे मत असलेली आहे. हा ’वेगळा आवाज’ बहुमतापेक्षा वेगळा किंवा अल्पमतातील आवाज आहे. “To dissent is democracy” असे म्हटले जाते ते या संदर्भातच. बहुमतापेक्षा वेगळे मत असणे, ते मांडता येणे आणि ते मांडण्यासाठी जागा असणे म्हणजे लोकशाही जागृत असण्याचे लक्षण आहे. नागरिकांनी आपले वेगळे मत (असल्यास) मांडले पाहिजे हे जागृत नागरिकत्वात गृहीत आहे.
प्रत्यक्षात, एखाद्या गटात आपले बहुमतापेक्षा वेगळे (विरुद्धच असेल असे नाही) मत मांडणे कितपत सोपे अथवा अवघड आहे? गटात मत मांडणे किंवा व्यक्त होणे यांसदर्भात सामाजिक मानसशास्त्रातील एका महत्त्वाच्या प्रयोगाची ओळख करून देणे हा या लेखाचा हेतू आहे. (सामाजिक मानसशास्त्राची अगदी जुजबी ओळख ’विघातक आज्ञाधारकपणा’ या पूर्वप्रकाशित लेखात झालेली आहे). त्यामुळे या विषयाबद्दलचे सामाजिक मानसशास्त्रातील प्रयोग आणि निष्कर्ष चर्चेच्या परिघात येतील.
प्रयोग
सॉलोमन ऍश या सामाजिक मानसशास्त्रज्ञाने १९५६ साली गटाशी जुळवणूक (group conformity) या संदर्भात एक प्रयोग केला. एखाद्या गटातील बहुमताचा त्या गटातील अल्पमतातील व्यक्तींच्या मत मांडण्यावर काय परिणाम होतो हे तपासणे या प्रयोगाचे उद्दिष्ट होते. प्रयोगामध्ये एका खोलीत सात व्यक्तींच्या गटाला एकानंतर एक अश्या काही स्लाईड्स दाखवण्यात आल्या. सहभागी व्यक्तींना सांगण्यात आले होते की ’दृश्य आकलन’(visual perception) तपासण्यासाठी हा प्रयोग आहे. उदाहरण म्हणून खाली एक स्लाईड दाखवण्यात आली आहे.
प्रत्येक स्लाईडमध्ये डाव्या बाजूला एक रेषा आणि उजव्या बाजूला तीन रेषा होत्या. गटातील व्यक्तींना डाव्याकडील रेषेच्या उंचीएवढी उजवीकडील रेषा (तीन पर्यायी रेषांपैकी एक) सांगायची होती. आपले उत्तर सांगताना त्यांना एका वेळी एक असे क्रमाने उत्तर द्यायचे होते. वरील उदाहरणात C ही रेषा डावीकडील रेषेएवढी आहे. सहभागी व्यक्तींपैकी सहा जण confederates होते – म्हणजे त्यांना आधीच सांगून ठेवण्यात आले होते की त्यांना चुकीचे उत्तर द्यायचे आहे. केवळ सातवी व्यक्ती subject होती – म्हणजे जिचे वर्तन अभ्यासण्यात येणार होते.
निष्कर्ष
Confederate व्यक्ती ठरल्याप्रमाणे चुकीची उत्तरे देत गेल्या. Subject व्यक्तीची पाळी आल्यावर वेगवेगळ्या व्यक्तींनी परिस्थितीला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद दिला. (इथून पुढील निवेदनात व्यक्ती जर वेगळे उल्लेखले नसेल तर व्यक्ती म्हणजे subject व्यक्ती असा अर्थ घ्यावा.)
१. काही व्यक्तींनी पहिल्या काही फेरीदरम्यान इतरांच्या विरुद्ध जाऊन ठामपणे आणि आत्मविश्वासाने उत्तरे दिली. काही फेऱ्यानंतर त्यांनी गटाच्या दबावाला बळी पडून गटाशी जुळते घेऊन आपले उत्तर बदलले आणि चुकीची उत्तरे दिली.
२. काही व्यक्तींनी सुरुवातीच्या एक-दोन फेऱ्यांमध्येच बरोबर उत्तरे दिली आणि गटाचे उत्तर वेगळे येत आहे असे दिसताच त्यांनीही गटाशी जुळते घेऊन उत्तर बदलले.
३. काही व्यक्ती मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत योग्य तेच उत्तर देत राहिल्या.
ज्या व्यक्ती शेवटपर्यंत किंवा काही फेऱ्यापर्यंत तरी बरोबर उत्तरे देत होत्या त्यांच्या आत्मविश्वासाचा व उत्तराचा ठामपणा फेऱ्यांगणिक कमी होत गेला. ढळढळीत दिसत असतानाही गट आपल्यापेक्षा वेगळे उत्तर देतो आहे हे दिसून सर्वच व्यक्तींना तणावाचा अनुभव आला. या प्रयोगामध्ये पुढीलप्रमाणे निष्कर्ष समोर आले.
१. सर्व व्यक्तींच्या एकूण फेऱ्यांपैकी ३२% वेळेस चुकीची उत्तरे देण्यात आली.
२. ७५% व्यक्तींनी किमान एकदा चुकीचे उत्तर दिले.
३. ३३% व्यक्तींनी अर्ध्या वेळेस किंवा अर्ध्यापेक्षा जास्त वेळेस चुकीची उत्तरे दिली.
चुकीची उत्तरे गटाच्या किंवा बहुमताच्या दबावाला बळी पडून दिली गेली. वरील आकडे बघून आपल्याला काय वाटते? हे प्रमाण कमी आहे की जास्त आहे? (कारण ३२% चुकीची उत्तरे दिली गेली म्हणजे ६८% बरोबर उत्तरेही दिली गेली). या प्रयोगासंबंधी खालील गोष्टी विशेषत्वाने नमूद करण्याजोग्या आहेत.
१. प्रयोगात विचारण्यात आलेले प्रश्नाचे उत्तर ’ज्ञानेंद्रियावर आधारित ढळढळीत सत्य’ या प्रकारचे होते. रेषेची उंची हा खूपच वस्तुनिष्ठ (चूक/बरोबर) प्रकारचा प्रश्न आहे. प्रत्यक्ष जगातील प्रश्न एवढे वस्तुनिष्ठ नसतात. ’आर्थिक परिस्थितीबद्दलचे मत’, ’सरकारची कार्यक्षमता’ किंवा ’एखाद्या पुस्तकाबद्दलचे अथवा व्यक्तीबद्दलचे मत’ हे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत.
२. चुकीचे उत्तर दिल्यास कुठल्याही प्रकारची शिक्षा किंवा दंड नव्हता. (मिल्ग्रम यांच्या प्रयोगात चुकीच्या उत्तरास शिक्षा होती असे सांगण्यात आले होते.)
३. गटातील इतर (confederate) व्यक्तींशी सहभागी व्यक्ती आधीपासून संलग्न किंवा ओळखीची नव्हती.
वरील तीन गोष्टींचा विचार करता चुकीच्या उत्तरांचा ३२% हा आकडा जास्त वाटू लागतो. सॉलोमन ऍश यांचा प्रयोगातील काही बदल करूनही हे प्रयोग करण्यात आले. उदाहरणार्थ, confederate व्यक्तींची संख्या कमीजास्त करणे, subject व्यक्ती आणि confederate व्यक्ती यांच्या बसण्याचा क्रम बदलणे, रेषांची उंची कमी अधिक करणे. यातील एका बदल केलेल्या प्रयोगाचे निष्कर्ष नोंदवू आणि पुढे जाऊ. एकाऐवजी दोन subjects प्रयोगात असतील तर गटाशी जुळते घेणे (चुकीची उत्तरे देणे) कमी झालेले दिसले. तसेच बहुमत ’तोडले’ असता गटाशी जुळते घेणे कमी झालेले दिसले. उदाहरणार्थ तीन confederate आणि एक subject असताना गटाशी जुळते घेण्याचे प्रमाण हे सहा confedrate आणि दोन subject असताना गटाशी जुळते घेण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त होते.
प्रयोगातील निष्कर्षांची पुनर्तपासणी
सॉलोमन ऍश यांचा गट जुळवणूक प्रयोग आणि त्याच्या समकक्ष प्रयोग अनेक देशांमध्ये शेकड्यांपेक्षा जास्त संख्येने करून बघण्यात आले आहेत. १९९० च्या दशकामध्ये गट जुळवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या १३३ अभ्यासांचा आढावा घेणारा अभ्यास (meta-analysis) प्रकाशित करण्यात आला. या अभ्यासाचे निष्कर्षही नोंद करण्याजोगे आहेत.
१. स्त्रियांमधील गट जुळवणुकीचे प्रमाण पुरुषांमधील गट जुळवणुकीच्या प्रमाणापेक्षा जास्त आढळून आले.
२. १९५० ते १९९० चा विचार करता गट जुळवणुकीचे प्रमाण कमी होताना दिसते. म्हणजे बहुमतापेक्षा वेगळा आवाज असण्याचे प्रमाण वाढताना दिसते.
३. ज्यावेळी गट हा ओळखीचा किंवा संलग्न असतो त्यावेळी गट जुळवणुकीचे प्रमाण वाढते.
४. साधारणत: बहुमताची संख्या वाढली की गट जुळवणूक वाढली आहे असे दिसते.
५. वेगळे मत असण्यामांडण्याबद्दलच्या सांस्कृतिक धारणाही गट जुळवणुकीच्या प्रमाणाच्या महत्त्वाच्या आहेत.
शेवटच्या मुद्द्याची थोडीशी चर्चा करून प्रयोगाबद्दलचे विवेचन थांबवू. गटाशी जुळवून घेणे सर्वत्रच वाईट मानले जाते असे नाही. काही संस्कृती किंवा देशांमध्ये वेगळे मत न मांडणे, गटाशी जुळवून घेणे याला सहकार्य, सुसंवाद किंवा ’समरसता’ म्हणून बघितले जाते. ज्या देशांमध्ये किंवा संस्कृतीमध्ये अशी धारणा आहे तिथे गट जुळवणुकीचे प्रमाण जास्त आढळून आले. समुदायवादी किंवा व्यक्तिवादी संस्कृतींचाही प्रभाव गट जुळवणुकीच्या प्रमाणावर दिसून आला. उदाहरणार्थ अमेरिकेत (व्यक्तिवादी) गट जुळवणुकीचे प्रमाण जपान(समुदायवादी)पेक्षा कमी दिसले. संस्कृतींच्या प्रभावामुळे (विशेषत: सहकार्याच्या संबंधी भावनेमुळे) गट जुळवणुकीचे आकड्यांचे अर्थ लावताना काळजी घ्यायला हवी असेही हा अभ्यास नोंदतो. वरील मुद्द्यांपैकी पहिल्या मुद्द्याचेही – स्त्रियांमधील गट जुळवणुकीचे प्रमाण जास्त असणे – सांस्कृतिक धारणांद्वारे स्पष्टीकरण देता येईल.
समारोप
भारतामध्ये गट जुळवणूक परिणाम अभ्यासला गेला आहे की नाही माहिती नाही पण इंटरनेटवर थोडेसे शोधले असता असे काही प्रकाशन अथवा अभ्यास मिळाला नाही. भारतासारख्या देशांमध्ये ज्येष्ठ व्यक्तींच्या किंवा अधिकारी व्यक्तींच्या बाबतीत आदर बाळगणे (सर्व व्यक्तींच्या प्रती आदर बाळगावाच असे नाही) हे चांगले मूल्य मानले गेल्यामुळे आणि त्यांच्यापेक्षा वेगळे मत मांडणे हे त्यांना विरोध आणि त्यामुळे त्यांच्याप्रती अनादर असे मानले जात असल्यामुळे गट जुळवणूक जास्त प्रमाणात दिसून येईल असे वाटते. वेगळे मत मांडणे वाढीस लागावे यासाठी इतर गोष्टींसह गट जुळवणूक परिणामाच्याबद्दल सतर्कता वाढवणे हेही उपयोगी ठरु शकते.
संदर्भ :
१. Social psychology हा coursera.org या संकेतस्थळावरील कोर्स