बंडखोरीची पाश्चिमात्त्य परंपरा

परंपरा आणि नवता हा संघर्ष तीव्र होतानाच्या युरोपमधील विविध घडामोडींचा, तिथल्या `बंडखोरांच्या कारवायांचा’ हा अभ्यासपूर्ण आलेख.
—————————————————————————-
‘परंपरा’ या शब्दाला आपल्याकडे खूप वजनदार संदर्भ असतात. ‘महान’, ‘समृद्ध’ अशी जी विशेषणं अनेकदा त्याला जोडून येतात,त्यांच्यामुळे हे वजन वाढत जातं आणि अखेर परंपरेचं जोखड बनतंय की काय,असं वाटू लागतं. अनेकविध परंपरांच्या सरमिसळीतून घडलेल्या आपल्या संस्कृतीच्या इतिहासात ज्या परंपरांचं असं ओझं होणार नाही अशा काही खोडकर परंपरा कदाचित असतीलही;पण त्यांची आठवण करून दिली तर ‘त्या फार महत्त्वाच्या नव्हत्या’ ,किंबहुना ‘त्या नव्हत्याच’ असं म्हणून त्यांना नाकारण्याची प्रवृत्ती (किंवा परंपरा) आपल्याकडच्या परंपरांचे पाईक म्हणवणाऱ्यांमध्ये दिसून येईल. आपल्याहून काहीशा अंतरावर असणाऱ्या पाश्चिमात्य संस्कृतीतल्या जरा गमतीदार परंपरा शोधल्या,तर ‘ते’ लोक कसे तऱ्हेवाईक वगैरे असतात,असं म्हणून त्यांना मोडीत काढता येईल.मग अर्थात अशा विक्षिप्तपणाच्या तुलनेत ‘आपल्या’ परंपरांची महानताही आपोआप सिद्ध होईल. त्यामुळे आपल्या परंपरांच्या पाइकांना त्या पाश्चिमात्य परंपरांचं अस्तित्व नाकारण्याचे कष्टही घ्यावे लागणार नाहीत, अशा आशेनं अशा काही परंपरांचा आढावा घेण्याचा एक प्रयत्न या लेखात केलेला आहे.

ढुढ्ढाचार्यांना गैरसोयीची ठरेल अशी पाश्चिमात्य परंपरा शोधायची झाली, तर प्लेटोचा समकालीन असलेल्या डायोजिनिसचं नाव पटकन आठवतं. ख्रिस्तपूर्व तीन-चारशे वर्षांच्या काळात होऊन गेलेला हा माणूस विक्षिप्तपणासाठी प्रसिद्ध होता. सॉक्रेटिसच्या विचारांचा प्लेटोनं लावलेला अर्थ कसा चुकीचा आहे,याविषयी तो प्लेटोशी वाद घालत असे आणि त्याची व्याख्यानं उधळून लावत असे. ‘मनुष्य म्हणजे पिसं नसलेला द्विपाद’अशी व्याख्या सॉक्रेटिसनं केलेली असल्याचं प्लेटो सांगत असे, म्हणून यानं एकदा एक पिसं काढलेली कोंबडी आणली आणि ‘हा पहा मनुष्य’असं म्हणत सर्वांना दाखवली. एकदा त्याचा गुलाम त्याला सोडून गेला. ‘जर गुलाम माझ्याशिवाय जगू शकतो,तर मी त्याच्याशिवाय का जगू शकणार नाही?’असा सवाल त्यानं उपस्थित केला. इतरांच्या मदतीवर सदैव विसंबून राहणाऱ्या आणि तरीही स्वत:ला श्रेष्ठ समजणाऱ्या अभिजनवर्गाला अंतर्मुख करणारा असा हा प्रश्न होता. समाजाच्या भ्रष्ट वर्तनावर टीका करता यावी यासाठी कोणतीही मालमत्ता न करण्याचा मार्ग डायोजिनिसने निवडला. पोट भरण्यासाठी तो भीक मागत असे; अथेन्सच्या रस्त्यांवर एका पिपात तो राही. ‘मी सचोटीनं वागणारा माणूस शोधतो आहे’,असं सांगत भर दिवसा तो हातात दिवा घेऊन भटकत असे. समाजातले दांभिक आणि बिनबुडाचे संकेत तो उधळून लावी. बाजारात खाणं त्या काळी अशिष्ट मानलं जात असे,पण बाजारात असताना जर भूक खवळत असेलतर तिथं खाणं हे अयोग्य नाही, असं तो मानत असे. एकदा सम्राट अलेक्झांडर त्याला भेटायला आला. ‘मी तुझ्यासाठी काय करू शकतो?’ असं त्यानं डायोजिनिसला विचारलं. त्यावर डायोजिनिसनं जगज्जेत्या अलेक्झांडरकडून फक्त एकच गोष्ट मागितली: ‘तू आलास तेव्हा मी ऊन्ह खात बसलो होतो. तू जरा बाजूला सरशील का? मग मला पुन्हा उन्हात बसता येईल.’यावर अलेक्झांडर म्हणाला,‘आज जर मी अलेक्झांडर नसतो, तर मला डायोजिनिस असायला आवडलं असतं.’

ज्या काळात नागरिकत्वाची संकल्पना नगरापुरती मर्यादित होती,त्या काळात डायोजिनिस स्वत:ला ‘कॉस्मॉपॉलिटन’(शब्दश: अर्थ : जगाचा नागरिक) म्हणवून घेत असे. माणसानं आपल्या आयुष्यातला कृत्रिम आणि दांभिक भाग सोडून देण्यासाठी कुत्र्याचा आदर्श बाळगावा, असं तो सांगत असे. मलमूत्रविसर्जनासारख्या नैसर्गिक क्रिया कुत्रा सहजभावानं,कसलीही लज्जा न बाळगता करतो;भविष्याची काळजी न करता आणि उगाच तत्त्वचिंतन न करता तो आनंदात जगतो. असा सहजभाव आणि निखळ आनंदी जगणं मानवी संस्कृतीतून हरवलं आहे, असा डायोजिनिसच्या टीकेचा रोख होता. त्याच्या तात्त्विक भूमिकेला पुढे ‘सिनिसिझम’असं नाव पडलं . संपत्ती,सत्ता किंवाप्रसिद्धी अशा वरवरच्या गोष्टींच्या मागे न लागता माणूस जगला तर तो आनंदी होईल;जगताना कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यावं हे न कळणं आणि त्यामुळे रूढ झालेल्या चुकीच्या संकेतांनुसार जगणं, हे मनुष्याच्या दु:खाचं मूळ आहे;समाजातल्या कोणत्याही वर्गाचा जगावर विशेषाधिकार नाही,अशी या ‘सिनिक’परंपरेच्या विचारांची बैठक होती. ग्रीक-रोमन संस्कृतीत किंवा नंतर आलेल्या ख्रिस्ती धर्मविचारांमध्ये या विचारांना नगण्य स्थान होतं; तरीही ते आपली जागा राखून होते. उदा: फ्रान्सिस्कन पंथअसं मानत असे, की ख्रिस्ताचा खाजगी मालमत्तेला विरोध होता, आणि म्हणून धर्मप्रसारकांनी गरिबीत राहायला हवं. प्रत्यक्षात रोमन कॅथॉलिक चर्च आणि पोप हेच एक धनाढ्य आणि पुंड सत्ताकेंद्र बनल्यामुळे फ्रान्सिस्कनांचे त्याच्याशी वैचारिक मतभेद आणि संघर्ष झाले. पुढे ही सिनिकपरंपरा खंडित झाली, तरीही तिचे पडसाद अलीकडेपर्यंत उमटत असलेले दिसत राहतात. गांधीजींना सविनय कायदेभंगाची प्रेरणा ज्याच्याकडून मिळाली, त्या हेन्री डेव्हिड थोरोवरदेखील (१८१७-१८६२) या सिनिक विचारांचा प्रभाव जाणवतो.

ग्रीक-रोमन काळानंतर युरोपमध्ये वैचारिक ऱ्हासाचं एक दीर्घ पर्व सुरू झालं. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांत संघर्ष झाले;ज्यू-इस्लाम-ख्रिस्ती धर्मांत,तसंच एकाच धर्मातल्या विविध पंथांत संघर्ष झाले;आणि अर्थात वेगवेगळ्या साम्राज्यांमध्येही युद्धं होत राहिली. १२१५मध्ये इंग्लंडमध्ये घडलेल्या एका वेगळ्या घटनेचे पडसाद मात्र पुढे कित्येक शतकं उमटत राहिले. राजाला राज्य करण्याचा हक्क दैवी कृपेनं मिळतो आणि त्यामुळे तो आपली सत्ता अनिर्बंध गाजवू शकतो,अशी धारणा तेव्हा रूढ होती. इंग्लंडच्या काही उमरावांनी राजाला काही बंधनं स्वीकारायला भाग पाडलं. ‘मॅग्ना कार्टा’या नावानं या बंधनांचा मसुदा प्रसिद्ध झाला. राजाविरुद्ध बंड होण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती,पण कुणा दुसऱ्या राजाच्या झेंड्याखाली बंडखोरांनी एकत्र येण्याचा त्याआधीचा पायंडा या उमरावांनी मोडला आणि राजाच्या जुलमी सत्तेला विरोध करत प्रजेच्या हक्कांसाठी बंड केलं. त्याची एक प्रमुख फलश्रुती म्हणजे स्वत:च्या मर्जीनुसार न्यायनिवाडा करून शिक्षा सुनावण्याचा राजाचा अधिकार ‘मॅग्ना कार्टा’नं मर्यादित केला आणि त्याला कायद्याची बंधनं घातली. अर्थात, युरोपातली अंदाधुंदी त्यामुळे थांबली नाही;पण प्रजेला कोणते हक्क आणि स्वातंत्र्यं असावीत तेकायद्यानुसार निश्चित होतं आणि त्याप्रमाणे लोकांना न्याय मिळू शकतो, अशी परंपरा त्यामुळे निर्माण झाली. या मसुद्यातली काही कलमं नंतर अनेकदा उद्धृत केली गेली. उदा: कायदा कसा असावा ते राजासह काही लोक एकत्र येऊन ठरवतील.इंग्लंडमधल्या संसदीय लोकशाहीचा पाया ‘मॅग्ना कार्टा’नं घातला. अमेरिकेत वसाहती करायला गेलेल्या ब्रिटिशांनी या नव्या जगाच्या नागरिकांना हक्क आणि स्वातंत्र्यं बहाल करताना याच संकल्पनेचा आधार घेतला. १७८७मध्ये जेव्हा अमेरिकन राज्यघटना घडवली गेली,तेव्हा तिच्यावर या मूल्यांचा प्रभाव होता. ऑस्ट्रेलिया,कॅनडा आणि इतर ब्रिटिश वसाहतींच्या राज्यघटनांवरही त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव आहे.

इंग्रजांनी राजाच्या सत्तेवर निर्बंध घातले,पण फ्रेंचांनी एक पाऊल पुढे जाऊन राजसत्ताच उलथून टाकली. १७८९मध्ये झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीनं जनतेच्या हातात सत्ता दिली. तोपर्यंत चालत आलेली सामाजिक वर्गांची उतरंड आणि त्या उतरंडीत वरच्या स्थानावर असणाऱ्यांकडे अधिक सत्ता आणि अधिकार असण्याची परंपराच या क्रांतीने मोडून काढली. ज्या वर्गापाशी सत्ता असण्याची परंपरा नाही असा वर्ग संघर्षाद्वारे स्वत:कडे सत्ता खेचून घेऊ शकतो, हा विचार वर्गसंकल्पनेच्या मुळावरच घाव घालणारा होता. मूलभूत मानवी हक्कांचा जो जाहीरनामा या क्रांतीने निर्माण केला, त्यात आधुनिक उदारमतवादी मानवी समाजांतली अनेक मूल्यं अंतर्भूत होती. अभिव्यक्तिचं स्वातंत्र्य,स्त्रियांना राजकीय हक्क अशा गोष्टी त्यातून पुढे आल्या. याशिवाय, स्त्रिया लिहित्या झाल्या.शिक्षणाचा अभाव हा स्त्रिया पुरुषांहून मागे पडण्याचं एक कारण आहे असा विचार त्या मांडू लागल्या. या क्रांतीतून सत्तेवर आलेलं लोकांचं सरकार फार काळ टिकू शकलं नाही;जनतेला तेव्हा मिळालेले हक्क नंतर पुन्हा हिरावले गेले हे खरं;पण ज्यांनी ते काही काळापुरते उपभोगले, त्या हजारो सामान्यजनांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालं आणि ते नंतरच्या पिढ्यांतही टिकून राहिलं. लोकांचं वागणं,बोलणं,विचार करणं यांत मूलभूत बदल झाले. वरच्या वर्गातले लोक केवळ वरच्या वर्गातले आहेत म्हणून त्यांना मान देण्याच्या जुन्या परंपरेला धक्का बसला;तर अगदी सामान्य माणसाला समाजात काहीएक स्थान असावं आणि हक्क असावेत अशी अपेक्षा आणि या अपेक्षेची एक नवी परंपरा निर्माण झाली. सामान्यजनांची अस्मिता त्यातून घडली आणि आधुनिक लोकशाहीचा तो पाया बनला. याशिवाय निधर्मी शासनाची मुळंही त्यात होती. राजाचा राज्य करण्याचा देवदत्त अधिकार जसा क्रांतीनं काढून घेतला तसेच चर्चचे विशेषाधिकारही काढून घेतले. केवळ आपल्या धर्माशी एकनिष्ठ असण्याऐवजी राज्यघटनेशी (आणि त्यामुळे मूलभूत मानवी हक्कांशी) एकनिष्ठ राहण्याला धर्मगुरूंना भाग पाडलं गेलं. शिक्षणपद्धतीत धर्माला तोवर असणारं स्थान शिल्लक राहिलं नाही. धार्मिक विचारांचा प्रसार करणारा भाग शिक्षणात असू नये;उलट शिक्षणातून विचारस्वातंत्र्य यावं हा क्रांतिकारक विचार तेव्हा फ्रेंच शिक्षणपद्धतीत अस्तित्वात आला. याशिवाय ज्यांचा धर्माशी संबंध नाही असे सार्वजनिक सण राज्याकरवी साजरे केले जाऊ लागले (उदा: गणराज्य दिन, बालदिनवगैरे). थोडक्यात,आज आपण ज्याला आधुनिक समाज-राज्यव्यवस्थेची अंगभूत लक्षणं मानतो त्यांतली अनेक फ्रेंच राज्यक्रांतीनं घडवलेल्या परंपरांतून विकसित झाली.

फ्रेंच राज्यक्रांती घडण्यामागे अनेक कारणं होती. आधी होऊन गेलेल्या काही विचारवंतांचे विचार क्रांतीला पोषक ठरले. अशांपैकी व्होल्तेअर (१६९४-१७७८) हा अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचं चरित्र आणि त्याचे विचार या दोन्हींमध्ये क्रांतीची मुळं दिसतात. सामाजिक सुधारणांचा आणि स्वातंत्र्याचा तो खंदा पुरस्कर्ता होता. आपल्या तिखट विनोदबुद्धीचा वापर करत त्यानं असहिष्णुता,धर्मांधता आणि समाजाला अहितकारक ठरणाऱ्या धर्मसंस्था, राज्यसंस्था अशा अनेक संस्थात्मक चौकटींतला पोकळपणा आणि दांभिकपणा यांना झोडपलं. राज्यसंस्था आणि धर्मसंस्था या संस्थांवर टीकाटिप्पणी केल्यामुळे तरुणपणीच त्याला अनेकदा तुरुंगवास आणि हद्दपारीसारख्या शिक्षा भोगाव्या लागल्या. हद्दपारीत एकदा तो काही काळ इंग्लंडला राहिला. तिथल्या राजावर राज्यघटनेद्वारे जे निर्बंध घातले होते ते पाहून आणि तिथल्या जनतेला फ्रान्सच्या तुलनेनं अधिक अभिव्यक्तिस्वातंत्र्य असलेलं पाहून व्होल्तेअर प्रभावित झाला. शेक्सपिअर आणि न्यूटन यांच्याकडूनही फ्रेंच जनतेला पुष्कळ काही शिकण्यासारखं आहे, असं त्याला वाटू लागलं. तीन वर्षांनी फ्रान्समध्ये परत आल्यानंतर त्यानं इंग्लंडमधल्या परिस्थितीविषयी एक पुस्तक लिहिलं (त्यात ‘मॅग्ना कार्टा’विषयीही विवेचन होतं).पुस्तकावर अर्थात बंदी घातली गेली आणि व्होल्तेअरला पुन्हा हद्दपार व्हावं लागलं. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्याशी संघर्ष करत करत, समाजावर होणारा अन्याय आणि समाजातला दांभिकपणा यांवर आपल्या खुसखुशीत शैलीत कोरडे ओढत व्होल्तेअर जगला आणि लिहीत राहिला.

व्होल्तेअरनं आपल्या ‘कँडिड’ (१७५९) या कादंबरीमध्ये ‘देव करतो ते भल्यासाठीच’ या जीवनदृष्टीचा खरपूस समाचार घेतला. कादंबरीचा नायक कँडिड हा भोळसट आहे. तिरकस शैलीत लिहीत व्होल्तेअर आपल्या या नायकाच्या भोळसटपणाचा समाजावरच्या टीकेसाठी पुरेपूर वापर करून घेतो. ‘सगळं घडतं ते भल्यासाठी’ या आपल्या गुरूच्या शिकवणीचा कँडिडवर प्रभाव असतो. एका नोकराणीबरोबर शारीरिक संबंध आल्यामुळे या गुरूला गरमीचा (सिफिलीस – एक गुप्तरोग) विकार जडतो. त्यावर उपचार करताना त्याला आपला एक डोळा आणि कान गमवावा लागतो. (आता या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘सगळं घडतं ते भल्यासाठी’ हा नियम बघितला तर व्होल्तेअरचा मिश्कीलपणा लक्षात यावा.) अपघात, भूकंप अशा अनेक गोष्टी पुढे घडत जातात. अविश्वसनीय घटनांचं अगदी बारकाव्यानिशी असं काही वर्णन करायचं, की खून, बलात्कार यांसारख्या गोष्टी जणू नित्य दिनक्रमातल्याच वाटाव्यात अशी व्होल्तेअरची शैली होती. त्याच त्याच गोष्टी त्याच माणसांच्या आयुष्यात इतक्या वेळा घडत जातात, की हे सर्व खरं नाही हे उघड होतं आणि वाचणाऱ्याला त्यात गंमत दिसू लागते. रोचकपणे गोष्ट सांगतानाच त्यातला गंभीर आशयही जाणवावा अशी तो कथेची रचना करतो. अशा शैलीतून युरोपियन राष्ट्रांची युद्धखोरी, वसाहतवाद, धर्माच्या नावाखाली लोकांचा होत असलेला छळ, गुलामगिरीची प्रथा अशा अनेक अनिष्ट गोष्टींबद्दल बोलत त्या काळातल्या ढुढ्ढाचार्यांना झोंबावी अशी त्यांची खिल्ली व्होल्तेअरनं उडवली. साहजिकच पुस्तकावर अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आली. (आपल्या गैरसोयीच्या गोष्टी अनैतिक आहेत असं भासवून जनतेच्या तथाकथित हितासाठी त्यांवर बंदी घालणं, ही सत्ताधाऱ्यांची अगदी सनातन प्रवृत्ती म्हणता येईल.) जनतेनं मात्र बंदीला अजिबात न जुमानता पुस्तकाला भरभरून प्रतिसाद दिला. त्याच्या लाखो प्रती हातोहात खपल्या.

व्होल्तेअरचं लिखाण अतिशय लोकप्रिय झालं खरं,पण आपल्या हयातीत क्रांती झाल्याचं पाहणं त्याच्या भाग्यात नव्हतं. मृत्युशय्येवर असताना त्याला एका धर्मगुरूनं सल्ला दिला: ‘अरे, किमान आता तरी तुझी ही सैतानाशी असलेली हातमिळवणी सोडून दे (आणि धार्मिक हो).’त्यावर व्होल्तेअर आपल्या शैलीत तात्काळ उत्तरला: ‘छे छे! उगाच मरताना कुणाशी वैर का करा?’मृत्यूनंतर त्याच्या दफनासाठी जागा देण्यालाही चर्च तयार झालं नाही. व्होल्तेअरचं समाजावर असलेलं ऋण फ्रेंच राज्यक्रांतीनंतर अखेर अधिकृतरीत्या मान्य करण्यात आलं.इतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे अवशेष जिथे ठेवले होते, त्या पॅरिसमधल्या पँथेऑन या ठिकाणी त्याचे अवशेष सन्मानपूर्वक नेण्यात आले. लाखो लोक त्या मिरवणुकीला उपस्थित होते.

इतर क्षेत्रांतदेखील अशी बंडखोरी तेव्हा होत होती. व्होल्तेअरसारखी लोकप्रियता मिळवणारा मोलिएर (१६२२-१६७३) हा फ्रेंच नाटककारसुद्धा या परंपरेत महत्त्वाचा आहे. सेन्सॉरशिपचे नियम अत्यंत कठोर असताना मोलिएरनं आपल्या नाटकांतून समाजावर परखड टीका केली. ‘तारत्युफ’ हे मोलिएरचं नाटक बुवाबाजीची थट्टा करतं . चर्चनं अर्थातच ते धिक्कारलं. ‘डॉम जुआन’ या नाटकात त्यानं जगात कोणतीही गोष्ट पवित्र नाही असं मानणारा स्त्रीलंपट नायक दाखवला होता. धर्म आणि राजा यांचा अपमान केला म्हणून या नाटकावर बंदी घालण्यात आली. ‘बूर्ज्वा जंटलमन’ या नाटकात नवश्रीमंत लोकांच्या असंस्कृत वागण्यावर टीका होती. भोंदू वैद्य तर अनेक नाटकांत त्याच्या उपहासाचे बळी ठरले.

इतर अनेक कलांप्रमाणे चित्रकला ही बराच काळ राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या पाठबळावर जगत असे. फ्रान्सिस्को गोया (१७४६-१८२८) हा चित्रकार स्पेनच्या दरबारात चाकरीला होता. राजघराण्यातल्या व्यक्तींची चित्रं काढणं यावर त्याची उपजीविका चाले. सर्वसाधारणपणे यात भाटगिरी करणं अपेक्षित असे. म्हणजे राजघराण्यातल्या व्यक्तींना सुंदर आणि रुबाबदार दाखवणं हे अशा चित्रकाराचं काम असे. गोयानं मात्र आपली व्यक्तिचित्रं अधिकाधिक वास्तवदर्शी करताना राजघराण्यातल्या वजनदार व्यक्तींना त्यांच्या कुरूपतेसह चित्रित केलं. ‘स्पेनचा राजा चौथा चार्ल्स आणि त्याचं कुटुंब’ हे चित्र याचा उत्तम नमुना आहे. राजघराण्यात तेव्हा अनेक भ्रष्ट व्यवहार चालू होते. सिंहासनावर राजा होता, तरी खरी सत्ता तेव्हा राणीच्या हातात होती. म्हणून गोयानं तिला चित्राच्या केंद्रस्थानी ठेवलं. पार्श्वभूमीवर एका चित्रात ‘लॉट आणि त्याच्या मुली’ ही कथा त्यानं रंगवली. बायबलमधली ही कथा भ्रष्ट वर्तन असलेल्या आणि ऱ्हास पावणाऱ्या समाजाचं चित्रीकरण करते. यातली प्रतीकात्मता अर्थात राजाच्या राजवटीवर टीका करते.

पोट भरण्यासाठी काढलेल्या या चित्रांव्यतिरिक्त खाजगीमध्ये गोयानं इतर अनेक विषयांवर चित्रं काढली. Inquisition या नावानं ओळखला जाणारा हा काळ स्पेनच्या आणि युरोपच्या इतिहासातला अत्यंत काळा कालखंड होता. एखादा माणूस किंचित जरी धर्मविरोधी किंवा पाखंडी असल्याची शंका आली, तर त्याचा अनन्वित छळ केला जात असे. माणसाच्या शरीरावर आणि मनावर अत्याचार करण्याचे वेगवेगळे आणि एकाहून एक जालीम प्रकार त्या काळी शोधले गेले. या काळाचं प्रतिबिंब गोयाच्या या खाजगी चित्रांत आढळतं. एखादं गडद आणि भेसूर भयस्वप्न वाटावं अशी ही चित्रं आहेत. मनोरुग्ण माणसांना वाळीत टाकलं गेल्यामुळे त्यांना येणारं एकटेपण आणि त्यांना ग्रासणारी भीती, गुन्हेगारांना दिली जाणारी वाईट वागणूक अशा गोष्टींना त्यानं चित्रविषय बनवलं.

समाजाला जे लोक भयप्रद किंवा धोकादायक वाटतात अशांकडे (उदा: गुन्हेगार) कणवपूर्ण नजरेने पाहणं ही आधुनिक दृष्टी आहे असं मानलं जातं (गुन्हेगारांना तुरुंगवासात मिळणारी वागणूक मानवतावादी असावी की कठोर असावी याबद्दल बोलताना आजही आपल्याकडे अनेकांच्या शिरा ताणल्या जातात.) गोयाच्या चित्रांत हा आधुनिक दृष्टिकोन दिसतो. याशिवाय समाजातल्या अनेक भीषण गोष्टींवर टिप्पणी करणारी चित्रं त्यानं काढली. त्या काळात सतत युद्धं होत होती. उदारमतवादी विचारांच्या मवाळ राज्यकर्त्यांना किंवा सहिष्णू राज्यपद्धतींना कडवे धर्मांध आणि सत्तापिपासू लोक सातत्याने हरवत होते. युद्धात होणारी हिंसा, सर्वसामान्यांचे होणारे हाल या गोष्टींचंही गोयानं चित्रण केलं. ‘माणूस असणं म्हणजे काय हे सर्व बाजूंनी समजून घ्यायचं असेल तर गोयाची चित्रं पाहावीत’, असं आज म्हटलं जातं. गोयामुळे युरोपियन चित्रकलेची दिशाच बदलली. सर्वसामान्यांचं दैनंदिन आयुष्य चित्रांत येऊ लागलं. हे एक प्रकारचं लोकशाहीकरण होतं.

Inquisitionच्या छळाला कंटाळून किंवा इतर कारणांमुळे युरोपात हळूहळू धर्माचा पगडा कमी होत गेला. व्यवस्थेला हलवणाऱ्या अनेक गोष्टी या काळाच्या आसपास झाल्या. वैज्ञानिक दृष्टिकोन असं आज ज्याला मानलं जातं, तो सतराव्या शतकात युरोपात विकसित झाला. धर्मग्रंथात मांडलेली गोष्ट अंतिम सत्य न मानता भौतिक जगाचं निरीक्षण करून आणि त्यावर तर्कशुद्ध निष्कर्ष काढून मगच ते सत्य मानायचे, ही संकल्पना (वैज्ञानिक दृष्टिकोन) सोळाव्या-सतराव्या शतकात रूढ झाली. देव, देश अन् धर्मासाठी प्राण हातात घेऊन असंख्य लोकांचं शिरकाण करण्याची अहमहमिका जेव्हा जगभर होती, त्या काळात रने देकार्तचं (१५९६-१६५०) “आय थिंक, देअरफोर आय अ‍ॅम” हे सुप्रसिद्ध वाक्य, किंवा फ्रान्सिस बेकननं (१५६१-१६२६) मांडलेले तर्कशुद्ध संशोधनाविषयीचे विचार हे क्रांतिकारकच होते.

वैज्ञानिक प्रगती, औद्योगिकीकरण आणि वसाहतवाद यांसारख्या गोष्टींचा आलेख या काळात चढता होता. त्याचं शिखर एकोणिसाव्या शतकात गाठलं गेलं. सजीवांच्या निर्मितीबद्दलची ख्रिस्ती धर्माची शेकडो वर्षांपासून चालत आलेली शिकवण डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने (१८५९) खोटी ठरवली. ज्ञानाच्या अशा नवनव्या वाटा सापडत असताना सर्वसामान्य समाज मात्र एका विचित्र परिस्थितीत अडकलेला होता. ब्रिटनमध्ये (आणि जगाच्या एका मोठ्या भागावर) तेव्हा व्हिक्टोरिया राणीचं राज्य होतं. ब्रिटिश साम्राज्य आपल्या (गोऱ्या) नागरिकांना समृद्धीच्या अभूतपूर्व संधी देत होतं. त्यातून व्हिक्टोरियन मध्यमवर्ग उदयाला आला. या समाजानं आर्थिक प्रगती जरी केली असली, तरीही त्यांच्यात एक दांभिक नैतिकता होती. कोणत्या गोष्टींचा उल्लेख चारचौघांत करता येईल याविषयी कडक संकेत होते. उदाहरणार्थ, स्त्री-पुरुषांनी आपले उघडे पाय दाखवणं अशिष्ट मानलं जाई. असं म्हणतात, की त्यामुळे टेबल-खुर्च्यांचे पायदेखील दिसणं अशिष्ट मानलं जाई. पण सभ्यासभ्यतेचे आणि नैतिकतेचे असे टोकाचे संकेत हे केवळ वरवरचे आणि म्हणून दांभिक होते. चार वर्षांच्या मुलांना कारखान्यांत राबवताना ही सभ्यता आणि नैतिकता कुठे आड येत नव्हती. वेश्याव्यवसाय वाईट म्हणून वेश्यांना सुधारगृहांत टाकलं जाई आणि सभ्य समाजात पुन्हा आणण्याच्या मिषानं त्यांना कष्टाच्या कामांसाठी आणि नोकऱ्यांसाठी वापरलं जाई. १८६१पर्यंत समलिंगी वर्तनाला मृत्युदंड होई. १८९५मध्ये ऑस्कर वाईल्डसारख्या प्रतिभावान लेखकाला समलिंगी असल्यामुळे तुरुंगात खितपत पडावं लागलं.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला इंग्लंडमध्ये काही कलाकार-विचारवंत या काळातल्या दांभिकतेला प्रतिक्रिया म्हणून काही वेगळा आचार-विचार करू लागले. ‘ब्लूम्सबरी ग्रूप’ या नावानं ते ओळखले जातात. जगण्याचे व्हिक्टोरियन संकेत त्यांनी बूर्झ्वा म्हणून नाकारले. सुख (विशेषत: इंद्रियसुख) मिळवणं म्हणजे काहीतरी पाप आहे, हे त्यांनी अमान्य केलं. विवाहसंस्थेत मूलभूत मानला जाणारा पति-पत्नीच्या लैंगिक एकनिष्ठतेचा संकेत त्यांनी झुगारला. आणि तरीही त्यांची सुखाची कल्पना ही रुचिहीन नव्हती आणि निव्वळ सैद्धांतिकसुद्धा नव्हती, तर सुसंस्कृत, तलम अशी होती असं व्हर्जिनिया वूल्फ (१८८२-१९४१) ही या गटातली सुप्रसिद्ध लेखिका मानत असे. मानवी नातेसंबंध या (लैंगिक एकनिष्ठतेसारख्या) वरवरच्या संकेतांवर ठरत नाहीत, तर ते प्रत्यक्षात तुम्ही तुमच्या जोडीदारांशी किंवा मित्रांशी किती स्नेहार्द्रतेनं वागता यावरून ठरतात, असं ते मानत आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत. मैत्रीला किंवा प्रेमाला अनुकूल असलेल्या माणसांचे समाजाचं दांभिक वर्तन आणि अनिष्ट सामाजिक संकेत यांमुळे कसे हाल होतात, हे इ.एम.फॉर्स्टर (१८७९-१९७०) या लेखकानं आपल्या कथा-कादंबऱ्यांत चित्रित केलं. ‘देशद्रोह आणि मित्रद्रोह यांच्यात जर मला निवड करावी लागली, तर माझ्या देशाशी द्रोह करण्याचं धैर्य माझ्यापाशी असेल अशी मला आशा आहे’, हे त्याचं गाजलेलं उद्धृत आहे. देश, धर्म, वंश, वर्ण अशा कृत्रिम अस्मितांपेक्षा मानवी नातेसंबंध जास्त पवित्र मानण्याला ब्लूम्सबरी गटानं प्रतिष्ठा मिळवून दिली. व्हर्जिनिया वूल्फनं स्त्रियांचं मनोविश्व आपल्या लिखाणात तळमळीनं साकारलं. लिटन स्ट्रेची (१८८०-१९३२) यानं आपल्या ‘एमिनंट व्हिक्टोरियन्स’ या पुस्तकात खुसखुशीत आणि उपहासगर्भ शैलीत व्हिक्टोरियन काळातली काही चरित्रं रेखाटली. ‘व्हिक्टोरियन काळाचा चांगला इतिहास लिहिणं अशक्य आहे, कारण आपल्याला त्या काळाबद्दल खूप माहिती आहे आणि अज्ञान हा इतिहासकाराचा एक आवश्यक गुण असतो’, असं स्ट्रेची आपल्या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच म्हणतो. अशा गंमतीदार कोपरखळ्या काढत त्यानं व्हिक्टोरियन समाजावर टीका केली. उदाहरणार्थ, कार्डिनल मॅनिंग हा इंग्लंडमधल्या कॅथॉलिक पंथाचा धर्मप्रमुख होता. देवाधर्माची सेवा करण्यापेक्षा आपल्या महत्त्वाकांक्षांच्या पूर्तीसाठी तो किती भ्रष्ट व्यवहार करत होता, हे स्ट्रेचीनं दाखवून दिलं. फ्लॉरेन्स नाइटिंगेल ही सुप्रसिद्ध नर्स रुग्णांच्या सेवेसाठी अविरत झटली; पण एखाद्या पिशाच्चानं झपाटल्यागत काम करण्याच्या तिच्या वृत्तीमुळे तिचं व्यक्तिमत्त्व इतरांसाठी त्रासदायक होतं, असं स्ट्रेचीनं तिच्या चरित्रात दाखवलं. कर्तृत्ववान माणसांची निव्वळ विभूतिपूजा करणारी चरित्रं लिहिण्याची तोवरची पद्धत स्ट्रेचीच्या पुस्तकामुळे मोडून निघाली. मोठ्या माणसांचे मातीचे पाय दाखवणं हे चांगल्या चरित्रकाराचं एक कर्तव्य आहे, हे तत्त्व यामुळे रूढ झालं. मूर्तिभंजन सकारात्मक पद्धतीनं वापरता येतं आणि त्यामुळे हे एक अंगीकारण्यासारखं मूल्य आहे, हे ब्लूम्सबरी गटानं दाखवून नेलं. समाजाच्या दांभिकतेवर टीका करताना जगण्यातला सहजभाव आणि निखळ आनंद टिकवून धरण्याची त्यांची प्रवृत्ती ही डायोजिनिसपासूनच्या परंपरेचा धागा पुढे नेते.

Figure 1कोलेत
समाजाच्या दांभिक नैतिकतेला स्वत:च्या वागण्यातून आणि निर्मितीतून धक्के देणं हे फक्त इंग्लंडमध्येच घडलं असं नाही. साधारण याच काळात फ्रान्समध्ये कोलेत नावाची एक लेखिका होऊन गेली (१८७३-१९५४). ‘क्लोदिन’ या वयात येणाऱ्या मुलीच्या आत्मकथनाच्या स्वरूपात असणारी तिची कादंबरीमालिका त्यातल्या शृंगारिक वर्णनांमुळे प्रचंड गाजली. कोलेतचं व्यक्तिगत आयुष्यही त्या काळात चवीचवीनं गॉसिप म्हणून सांगितलं जाईल असंच होतं. तिचे अनेक स्त्री-पुरुषांशी संबंध होते. पॅरिसच्या म्युझिक हॉल्स मध्ये कोलेत काही काळ आपल्या एका स्त्री-प्रेमपात्राबरोबर काम करत असे. त्यांच्या कार्यक्रमात त्या दोघींनी एकमेकींना चुंबन देण्याचा एक प्रकार प्रचंड लोकप्रिय झाला. एकदा लोक इतके चेकाळले की पोलीस बोलवावे लागले. अखेर तो कार्यक्रम बंद करावा लागला. पण वरवर पाहता उच्छृंखल वाटणाऱ्या या चरित्रामागे एक उन्मुक्त व्यक्तिमत्त्व होतं. इतकी शतकं जे स्वातंत्र्य पुरुषांनी उपभोगलं होतं, तेच स्वत:साठी मागणारी ही स्त्री पुरुषप्रधान जगात स्त्रियांना हक्काची जागा मिळवून देण्यासाठी झटत होती. वेश्या किंवा लग्नाशिवाय पुरुषांसोबत राहणाऱ्या समाजाच्या निम्न स्तरातल्या स्त्रिया तिच्या कादंबऱ्यांतून प्रमुख व्यक्तिरेखा म्हणून समाजासमोर आल्या. पुरुषप्रधान व्यवस्थेत टिकण्यासाठी अशा स्त्रियांकडे जी अंगभूत ताकद असावी लागते, तिचं चित्रण कोलेतनं केलं. वाचकाला निव्वळ हळहळ वाटायला लावणारं किंवा अश्रुपात करणारं हे हळवं लिखाण नव्हतं. मध्यमवर्गीय स्त्रियांच्या मानानं कमी दर्जाच्या मानल्या जाणाऱ्या या स्त्रिया खरंतर अधिक स्वतंत्र होत्या. त्यामुळे त्यांना मिळणारा जगण्यातला आनंददेखील कोलेतनं आपल्या लिखाणात रंगवला. त्याशिवाय पहिल्या महायुद्धात स्वत:चं घर तिनं जखमींसाठी इस्पितळ म्हणून उपलब्ध करून दिलं; तर दुसऱ्या महायुद्धात तिनं आपल्या परिचयातल्या अनेक ज्यूंना नाझींपासून वाचवलं. Académie Goncourt या फ्रान्सच्या सर्वोच्च साहित्यिक संस्थेची ती पहिली महिला सदस्य म्हणून स्वीकारली गेली; नंतर त्या संस्थेचं प्रमुखपद भूषवणारी पहिली स्त्री हा मानदेखील कोलेतनं मिळवला. तिच्या मृत्यूनंतर फ्रान्समध्ये सरकारी इतमामानं तिचे अंत्यसंस्कार झाले. हा मान मिळालेली ती पहिली स्त्री होती.

साम्राज्यवाद, वसाहतवाद, लिंगभेद, वर्णभेद, वर्गसंघर्ष अशा अनेक गोष्टींचे धोके आणि दुष्परिणाम या काळातल्या अशा द्रष्ट्या लोकांना जाणवले. जगावर साम्राज्य करणाऱ्या युरोपसमोर ते आणून समाजाला आपल्या दंभामधून जमिनीवर आणण्याचं महत्त्वाचं काम अशा लोकांनी केलं. थोडक्यात, येणाऱ्या काळात कोणती मूल्यं अंगीकारावी लागतील याची पूर्वसूचनाच त्यांच्या व्यापक पण ऊबदार मानवतावादाला अनुसरणाऱ्या निर्मितीतून आणि जगण्यातून मिळते. विसाव्या शतकाचे ते बिनीचे शिलेदार मानले जातात.

ज्यांना तत्कालीन ढुढ्ढाचार्यांचा रोष पत्करावा लागला असे सर्वच लोक हेतुपुरस्सर बंडखोरी किंवा खोडकरपणा करत नव्हते.कधीकधी त्यांची निर्मिती ही खोडसाळपणातून आलेली आहे असा इतरांचा समज होई. याचं कारण म्हणजे तेव्हा धर्मसत्ताधारी किंवा राजसत्ताधारी फारच हळवे झाले होते. उदाहरणार्थ, काराव्हाजिओ (१५७१-१६१०) हा इटालियन चित्रकार अशा हळव्या सत्ताधाऱ्यांच्या रोषाचा धनी ठरला. धार्मिक विषयांवरची चित्रं काढताना तो विषयानुरूप व्यक्तिचित्रण करता येईल अशी मॉडेल्स निवडायचा. चित्रविषय अधिक परिणामकारक कसा होईल याचाच तो इतका ध्यास घेत असे, की इतर अनेक गोष्टी त्याला दिसत नसत आणि त्यातून गोंधळ उडे. ख्रिस्ताची आई मेरी ही ख्रिस्ताला जन्म देऊनही अनाघ्रात होती, असं ख्रिस्ती धर्म मानतो. तिचं चित्र काढण्यासाठी काराव्हाजिओनं मॉडेल म्हणून एका वेश्येला घेतलं. चित्र खूप उत्तम झालं; पण अनाघ्रात मेरी म्हणून चित्रात दिसणारी स्त्री प्रत्यक्षात एक वेश्या होती हे कळताच धर्मगुरू चिडले. संत पॉलच्या चरित्रातल्या एका प्रसंगावर आधारित एका चित्रात संतापेक्षा त्या प्रसंगातला घोडाच लक्ष वेधून घेणारा ठरला. संत मॅथ्यूच्या चित्रात एक देवदूत अत्यंत कमी कपड्यात होता आणि मॅथ्यूचे पाय अस्वच्छ होते म्हणून धर्मगुरुंनी ते नाकारलं, तर कधी माता मेरीचे उघडे पाय दाखवले म्हणून चित्र नाकारलं गेलं. असं असूनही काराव्हाजिओच्या चित्रांना कायम मागणी राहिली. युरोपियन चित्रकलेत एक नवी परंपरा त्यांनी निर्माण केली, कारण रस्त्यावरचे भिकारी, गुन्हेगार, वेश्या अशा लोकांना मॉडेल म्हणून घेऊन काराव्हाजिओनं काढलेली चित्रं अतिशय नाट्यमय आणि प्रभावशाली होती. त्याच्या वास्तवदर्शी चित्रणशैलीत अशा माणसांची मातीभरली नखंसुद्धा चित्रित व्हायची. येशू, माता मेरी आणि इतर ख्रिस्ती संत निर्दोष आणि थोर आदर्श वाटावेत अशा प्रकारे, म्हणजे अतिशय गुळगुळीत आणि गोंडस पद्धतीनं चित्रित करण्याची पद्धत तेव्हा रूढ होती. त्या तुलनेत काराव्हाजिओची चित्रं क्रांतिकारी ठरली. धर्माला सर्वसामान्य माणसांच्या जवळ नेऊन ठेवण्याची किमया काराव्हाजिओला साधली होती. त्याचं महत्त्व ओळखून अनेक चित्रकारांनी त्याची शैली आत्मसात केली आणि त्याच्या पश्चात जिवंत ठेवली. काराव्हाजिओ नंतरची काही शतकं विस्मृतीत गेला; पण या परंपरेचा परिणाम टिकून राहिला आणि हळूहळू ख्रिस्ती धर्माला अशा गोष्टींची सवय झाली.

Figure १कारंजं – मार्सेल द्युशाँ (१९१७)

Figure २अँडी वॉरहॉल: मेरिलिन मन्रो आणि सुपाचा कॅन

विसाव्या शतकात पाश्चिमात्य जगात खोडकरपणा हे एक मूल्यच बनलं. त्यात मोनालिसाला मिश्या काढणारा आणि मुतारीला ‘कारंजं’ म्हणून कलाप्रदर्शनात ठेवणारा मार्सेल द्यूशाँ होता; सुपाचे कॅन, कोका कोलाच्या बाटल्या, मेरिलिन मन्रो आणि माओ यांच्या फोटोंच्या एकसारख्या प्रतिकृती बनवून त्यांना एकाच पातळीवर सादर करणारा अँडी वॉरहॉल होता; आणि सिनेमा या नव्या माध्यमातून खोडकरपणाचे नवनवे प्रकार शोधणारे आणि त्यांद्वारे सामाजिक टीका करण्याची परंपरा पुढे नेणारे जाँ-ल्यूक गोदार, लुई ब्युन्युएल किंवा वूडी अ‍ॅलन यांसारखे दिग्दर्शकही होते. आज पाश्चिमात्य जगात प्रेषित मुहम्मदाची चित्रं काढणं किंवा भारतीय देवीदेवतांच्या प्रतिमा बुटांवर वापरणं यांसारखे जे प्रकार केले जातात, त्यांचं मूल्यमापन करण्याआधी हे लक्षात घेतलं पाहिजे, की पाश्चिमात्य जगात एकेकाळी पवित्र मानल्या जाणाऱ्या सर्व गोष्टींची चेष्टा करण्याची एक दीर्घ परंपरा त्यामागे आहे. ही परंपरा निव्वळ खोडसाळपणापुरती मर्यादित नाही, तर हे एक वेगळ्या प्रकारचं आणि व्यापक अर्थाचं स्वातंत्र्य आहे. अनेक ऐतिहासिक युगप्रवर्तक, महात्मे आणि शतकानुशतकं पवित्र मानल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींविषयी मूलगामी प्रश्न विचारणारं संशोधन करणं आणि त्यांतून मानवाला उपलब्ध असणारं ज्ञान आणि ज्ञानशाखा यांचा सतत विस्तार करणारं फार मोठं काम पाश्चिमात्य जगात होत राहिलेलं आहे; ते याच स्वातंत्र्याच्या मदतीनं शक्य झालं आहे.

या पार्श्वभूमीवर आपल्याकडचं चित्र पाहिलं तर काय दिसतं? महाराष्ट्राला विक्षिप्तपणाची परंपरा आहे असं आपण म्हणतो खरं; पण समाजाला अप्रिय अशा सत्यांची जाणीव करून देणारी जी काही थोडीफार माणसं त्या परंपरेत आपल्याकडे झाली, त्यांची परंपरा कशी बनणार नाही, याचीच काळजी आपण घेतो असं वाटतं. रोखठोकपणे देवाला सवाल करण्याच्या तुकारामाच्या वृत्तीला शिरोधार्य मानण्याऐवजी आपण त्याला संतत्व बहाल करून त्याची विभूतिपूजा करण्यात धन्यता मानतो; त्याच्या अभंगांतला आपल्याला आज अशिष्ट वाटणारा भाग सेन्सॉर करून आपण ते वाचतो; आणि एवढ्यातेवढ्याशानं त्याचा अपमान झाला म्हणून आकाशपाताळ एक करतो. आपल्या लोकनेत्यांच्या चारित्र्याविषयी थोडी जरी शंका कुणा चरित्रकारानं घेतली, तर आपण लगेच त्यावर खटले, बंदी अशी शस्त्रं चालवतो. चारशे वर्षांपूर्वी काराव्हाजिओच्या किंवा व्होल्तेअरच्या नशिबी जे आलं, तेच आपण आज एकविसाव्या शतकात आपल्या कलाकारांवर लादतो. सारखं भावुक होत आणि भावना भडकावून घेत आपण आपल्या समृद्ध आणि महान परंपरेला जितके कवटाळून बसू, तितकी आपल्या ज्ञानविस्ताराची शक्यता आपण धुडकावून लावतो आहोत, हे केव्हातरी लक्षात घेतलं पाहिजे. आर्थिक महासत्ता बनण्याचे हमखास उपाय शोधता शोधता पाश्चिमात्य परंपरेतले असे काही धडे जर आपल्याला गिरवता आले, तर कदाचित त्यांच्या इतिहासापासून आपण काही शिकलो असं म्हणता येईल.

(पूर्वप्रसिद्धी : ’लोकनवनिर्माण’ २०१२नववर्षविशेषांक)
ईमेल :rabhijeet@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.