पाळत 

संगणक, संगणकाची सर्वव्यापकता 

आपल्या सर्व हालचाली व व्यवहार ह्यांच्यावर पाळत ठेवली जात आहे व ती माहिती परस्पर कंपन्या किंवा सरकारला पुरवली जात आहे. कोणत्या जहागिरदाराची पळत सहन करायची, एव्हढेच आपण ठरवू शकतो. ह्या वास्तवाचे आपल्याला भान करून देणारा ब्रूस श्रीयरच्या ‘डेटा अँड गोलायथ’ (प्रकाशक नॉर्टन बुक्स) या पुस्तकाची ओळख करून देणारा हा लेख, 

गेल्या वर्षी माझा फ्रिज बिघडला तेव्हा दुरुस्ती करणाऱ्याने त्याचा संगणक बदलला. मला वाटत होते तसा फ्रिज संगणकाने चालवला जात नव्हता, तर संगणकच यंत्राद्वारे अन्न थंड ठेवत होता. मग इतरही जाणवायला लागले. कार हा चारचाकी एंजिनधारक संगणक होता. ओव्हन हा अन्न शिजवणारा संगणक होता, वगैरे. आजकाल तर आपल्या पाळीव प्राण्यांमध्ये चिप्स बसवतात. म्हणजे माझी मांजर हीसुद्धा ऊब शोधून तिथे झोपणारी संगणक असते. 

आणि आजकाल अनके संगणकधारी यंत्रे इंटरनेटशी जोडलेली असतात. तापमान नियंत्रित करणारे थर्मोस्टॅट्स इंटरनेटशी जोडून ऊर्जा वाचवतात. असे थर्मोस्टॅट्स बनवणारी ‘नेस्ट’ ही कंपनी गेल्या वर्षी गूगलने तीन अब्ज डॉलर्सना विकत घेतली. ‘फिटिबट्’ आणि ‘जॉबोन’ या यंत्रणा चोवीस तास तुमचे व्यायाम, हालचाली, झोपणे जागणे तपासून इंटरनेटच्या मदतीने तुमच्या आरोग्यावर नजर ठेवतात. आज वैद्यकीय यंत्रे तुमचा रक्तदाब, रक्तातली साखर, श्वसन वगैरेंची माहिती इंटरनेटवर पाठवून त्यांचे विश्लेषण करून देतात. लवकरच मनःस्थिती आणि मेंदूची क्रियाशीलता सातत्याने मोजत राहणारी यंत्रेही येतील; म्हणजे आलीही असतील, एखादवेळी. 

असल्या यंत्रणांबद्दल दोन आश्चर्यकारक बातम्या आल्या. सॅमसंगचे काही टीव्ही म्हणे पुढ्यातल्यांचं बोलणं ऐकून ते इंटरनेटने इतरत्र पाठवू शकत असत, म्हणजे चॅनेल का बदलावे हे कळते, आणि आपल्या बाळांचे प्रश्न ऐकून ते इतरांना पाठवणाऱ्या बार्बी बाहुल्या घडवल्या गेल्या, ज्यातून बाळांची मनोवृत्ती कळते. 

ही असली यंत्रे काय करत आहेत याची माहिती नोंदतात, जी अखेर तुमच्यामाझ्यावर पाळत ठरते. तुमचा फोन कुठे आहे, त्यावर कोणाशी काय बोलले जात आहे, त्यावरून तुम्ही काय शोधताहात, लिहिताहात याची माहिती इतरांना कळवली जाते. अगदी तुमच्या हृदयाच्या ठोक्यांची लयही कोणीतरी नोंदून तपासू शकते. कॉर्पोरेशन्स ही माहिती आपल्या नकळत साठवतात आणि तपासतात. आपली परवानगीही घेतली जात नाही. या तपासातून ते आपल्याबद्दल जे निष्कर्ष काढतात ते आपल्याला पटोत, न पटोत, आपल्या जीवनावर गंभीर परिणाम मात्र करू शकतात. आपण पाळतीखाली आहोत, जरी आपल्याला हे कबूल करवत नाही आहे. 

इंटरनेट पाळत यंत्रणा आज अत्यंत व्यापक आणि सज्जड झाली आहे; कोणाला तरी ती फायदेशीरही आहे. अनेक कंपन्या, अनेक माहितीच्या खरेदीविक्रीत दलाली करणारे आपल्यावर सतत लक्ष ठेवत आहेत; एकेका वेबसाईटवर दहाबारा जण. तुम्ही फेसबुकावर असा की नसा, जिथे कुठे फेसबुक लाईक बटने आहेत तिथे तुम्ही पाळतीखाली आहात. गूगल प्लसवरची g+ बटनं, गूगल अॅनॅलिटक्स वापरल्या जाणाऱ्या साईट्स (ज्या वेब-वाहतुकीवर लक्ष ठेवतात) या सगळ्या तुमच्यावर पाळत ठेवताहेत. 

तुम्हाला या कंपन्यांची नावेही माहीत नाहीत; रूबिकॉन प्रकल्प, अॅड्- सोनार, कांटकास्ट, अंडरटोन, ट्रैफिक बाजारपेठ. तुमच्यावर कोण पाळत ठेवते आहे ते पाहायचे असेल तर कुकीजवर नजर ठेवणाऱ्या ब्राऊझर्सवर प्लग-इन करा. तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. एका वार्ताहराला छत्तीस तासांच्या इंटरनेट वापरात त्याच्यावर नजर ठेवण्यात एकशे पाच वेगवेगळ्या कंपन्या भेटल्या. 2010 साली डिक्शनरी -डॉट कॉम या साध्याभोळ्या वाटणाऱ्या साईटवर तुम्ही किती वेळा जाता हे पाहणाऱ्या दोनशे कुकीज बसवल्या गेल्या. [कोण रे तो, चारचारदा totalitarian हा शब्द तपासतो आहे? – खरे] 

तुमच्या स्मार्टफोनवरही हेच घडत असते. त्यावरील अॅप्स तुमच्या सर्व हालचाली नोंदत असतात. तुमचे अॅड्रेस बुक, कॅलेंडर, बुकमार्क्स, तुम्ही काय काय शोधता याचा तपशील, सारे काही ती अॅप्स उतरवून घेत असतात. 2013 साली सॅमसंगने जे झी (Jay Z) या अॅप आयकॉनसोबत एक अॅप घडवले. त्याने तुम्हाला प्रकाशनाआधीच जे झीची गाणी ऐकता येत. पण हे अॅपसाठी तुमच्या फोनचे व्यवहार, भौगोलिक स्थाने आणि कोणाकोणाशी बोलता ते, हे सॅमसंगला तपासायची परवानगी द्यावी लागे. अँग्री बर्ड्स या खेळाचे अॅप तुमचे भौगोलिक स्थान त्याच्या बोलवित्या धन्याला कळवत राहते, तुम्ही खेळत नसतानाही. ‘नाइन्टीन एटीफोर’ या कादंबरीतली संदर्भ वापरून पाळत ठेवणाऱ्या यंत्रणांसाठी बिग ब्रदर असा शब्दप्रयोग केला जातो. सध्या इंटरनेटवर घडते ते शेकडो चहाडखोर लिट्ल ब्रदर्समार्फत घडते. 

मुळात इंटरनेटवरील माहिती निनावी असते. पण आजकाल कंपन्या वेगवेगळ्या जागी मिळणाऱ्या माहितीच्या एकत्रीकरणातून नावेही शोधू शकतात. आपण अनेक इंटरनेट सेवा मिळवताना यूजनरनेम (वापर नाव) देतो. पण तशी सांकेतिक नावे व्यक्तींच्या खऱ्या नावांशी जोडून घेता येतात. गूगलने आधी वापर नावासोबत खरे नाव नोंदण्यावर आग्रह धरण्याचे धोरण ठेवले होते पण ते 2014 मध्ये मागे घेतले. फेसबुकही खरी नावे मागते. तुमचा क्रेडिट कार्ड वापर, ब्राऊनिंग वगैरे आपसूकच तुमचे नाव, फोन मालक म्हणूनची ओळख वगैरेंशी जोडणाऱ्या कुकीज असतात, ज्या त्या व्यवहारांत भाग घेणाऱ्या कंपन्यांना खरी नावे कळवतात. 

हे पाळत ठेवणारे ‘बिझनेस मॉडेल’ इंटरनेटवर येऊन रुजले, कारण लोकांना फुकट आणि सोयीस्कर वस्तु, सेवा वगैरे आवडतात. आणि खरे सांगायचे तर ग्राहकांना निवडीचे स्वातंत्र्यच नाही. पाळत ठेवली जात आहे हे सहजपणे दिसतही नाही. ह्या धंद्यांच्या पद्धतींमधले बदलही इतके वेगवान आहेत की सध्याच्या कायद्यांना त्यांच्याबरोबर राहणे अशक्य आहे. [सर्व कायदे तत्त्वतः संविधानातल्या तरतुदींवरच आधारित असतात. एखादी धंद्याची पद्धत संविधानाच्या विरोधात आहे की नाही हेच जर कळत नसेल, तर त्यावर इलाज ठरतील असे कायदे होणारच कसे! खरे 

आणि साधारणपणे आपल्या खाजगीपणाला लोक फारसे महत्त्वही देत नाहीत. ते खाजगीपण भेदले जाणे, त्याचे दुष्परिणाम दिसणे, यानंतरच लोक जागे होतात. “मला काही लपवायचं नसतं” या नमुन्याचे युक्तिवाद सर्रास वापरले जातात, पण ते खरे मात्र नसतात. सतत पाळतीखाली राहणाऱ्यांना जाणवते की प्रश्न लपवण्याचा नसतो. तो असतो व्यक्ती म्हणून ओळखीचा आणि व्यक्ती म्हणून स्वायत्ततेचा. मी कोणापुढे कसे स्वतःला पेश करायचे, कोणत्या नियमांनी पेश करायचे, हे मलाच ठरवता यायला हवे. सारखे कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवते आहे, मते बनवते आहे, हे माणसांना नकोसे होते. 

तुम्हाला खाजगीपण महत्त्वाचे वाटत नाही, कारण ते भेदले जाणे ठसबले जात नसते. तुम्ही फेसबुकवर जाता ते मित्रांशी गप्पा मारायला कोण्या कंपनीला माहिती द्यायला नव्हे. तुम्ही झोपेतून उठता आणि फोन खिशात ठेवता; आपल्या दिवसाभराच्या हालचाली कोण्या कंपनीला कळू द्यायची तुमची इच्छा नसते. त्या गोष्टी सहजपणे घडतात. 

आणि पाळत ठेवणाऱ्या कंपन्या मान्य करण्यातून आपण सबळांनाच जास्त जास्त सबळ करत जातो. आज माहिती शोधण्याच्या क्षेत्रातला दोन- तृतीयांश भाग गूगलच्या नियंत्रणाखाली आहे. इंटरनेट वापरणाऱ्यांपैकी पाऊण लोक फेसबुकवर आहेत. ॲमेझॉन पुस्तक व्यवहारांपैकी तीस टक्के आणि ई-बुक व्यवहारांपैकी सत्तर टक्के धरून आहे. ब्रॉडबैंड बाजाराचा पाव भाग कॉमकास्टकडे आहे. यामुळे या कंपन्यांकडे प्रचंड आर्थिक सत्ता एकवटली आहे. 

या कंपन्यांशी असणारे आपले संबंध पारंपरिक पुरवठादार ग्राहक नमुन्याचे नाहीत. कारण आपण या कंपन्यांची गिन्हाईके नाही आहोत, आपण त्यांच्या खऱ्या ग्राहकांना विकली जाणारी उत्पादने आहोत. ह्या कंपन्या सामंती जहागिरदारांशी समरूप आहेत, आणि आपण त्यांची प्रजा किंवा रयत आहोत. काही वाईट संदर्भात तर आपण त्यांनी वेठीला धरलेले बिगारी आहोत. आपण या जहागिरदारांच्या जमिनींची मशागत करतो; पीक आहे माहिती है, डेटा है, जे त्या कंपन्या नफा कमावून दलालांना विकतात. काही जणांनी आपली निष्ठा गूगलला वाहिली आहे. ते जी-मेल वापरतात, गूगल कॅलेंडर आणि गूगल डॉक्स वापरतात. त्यांच्यापाशी अँड्रॉईड फोन्स असतात. इतर काही अॅपलचे निष्ठावंत असतात. ते आय मॅक्स, आय-फोन्स, आयपॅड्स वापरतात आणि त्यांना हवी असलेली माहिती आय-क्लाऊड सांभाळून आपोआप कालसुसंगतीही देतो. इतर काही मायक्रोसॉफ्टवर भरवसा ठेवतात. आपल्यापैकी काही जण ई-मेल्स करतच नाहीत. त्याऐवजी ते फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रॅम वापतात. आपण एकच मालक निवडू शकतो, किंवा अनेकांवर निष्ठा वितरित करू शकतो, किंवा नावडत्यांना टाळूही शकतो. पण प्रत्येक क्षेत्रात कोणाला ना कोणाला निष्ठा बाहावीच लागते. 

त्याबदल्यात आपल्याला मिळतेही बरेच काही. कोणीतरी आपल्यातर्फे माहिती सांभाळते. कोणीतरी सर्व यंत्रे नीटस वापरते. हे सारे आपल्याला सोपे जाते आणि हवेच असते. कोणत्याही यंत्रावरून ई-मेल्स करता आणि वाचता येतात. फेसबुकवर जाता येते. कॅलेंडरे कामांची आठवण करून देतात. क्लाऊड स्टोअरेज आपले फोटोज सांभाळते. अॅपलने त्यांच्या अॅप-साठ्यातून व्हायरसेस- मॅल्वेअर बाद केले आहे. एकूणच या कंपन्या आपले डिजिटल सामान आपण ठेवू शकतो त्यापेक्षा जास्त सुरक्षित ठेवतात. आपला स्मार्टफोन हरवून आपण नवा घेतला रे घेतला, की जुन्यावरची सर्व माहिती आपोआप नव्या फोनमध्ये येते, फक्त एक बटन दाबून. 

या नव्या संगणक विश्वात आपला संगणक परिसर सांभाळायची जबाबदारी आपली राहिलेली नाही. ते काम आपले जहागिरदार करतात, आणि आपल्याला सुरक्षित ठेवतात. हे घडण्यामागे दोन तंत्रवैज्ञानिक वृत्ती आहेत. 

एक म्हणजे क्लाऊड कंप्यूटिंग (मेघ- संगणन?). आपण वापरत असलेली माहिती आता आपल्या संगणकात साठवायची गरजच नाही. ते काम अनेक कंपन्यांचे अनेक सर्व्हर्स करतात. ह्याचा एक परिणाम म्हणजे आपले आता आपल्यावर माहितीवर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. या कंपन्या आपला डेटा आणि मेटा डेटा फायदेशीर ठरेल अशा प्रकारे वापरतात. कोणत्या प्रकारचा डेटा आपण त्यांच्या यंत्रणांमध्ये साठवायचा याचे नियम त्या कंपन्यांनी काळजीपूर्वक घडवले आहेत. जर आपण ते नियम मोडतो आहोत असे वाटले तर ते सारी खातेवही डिलीट नष्ट करू शकतात. किंवा आपली अनुमती न घेताच सारी माहिती शासकीय कायदापालन यंत्रणांना देऊन टाकू शकतात. आणि हे एखादवेळी आपल्याला कळवलेही जाणार नाही. आणखीनही भीषण शक्यता आहे, की आपली सारी वापरातली माहिती अशा देशातल्या संगणकांत ठेवली जाईल जिथले माहिती संरक्षण कायदे दुबळे आहेत. 

दुसरी बाब म्हणजे आपण वापरत असेलल्या सर्व यंत्राचे व्यवस्थापन ती यंत्रे घडवणाऱ्या कंपन्या बारकाईने करत असतात. आय-फोन्स, आय- पॅड्स, अँड्रॉईड फोन्स, किंडल क्रोम बुक्स, साऱ्यांचे व्यवस्थापन आपल्या हातून ती यंत्रे बनवणाऱ्यांकडे गेले आहे. आपला सर्व संगणन परिसर, आपण काय पाहू शकतो, काय करू शकतो, काय वापरू शकतो; हे आपल्या नियंत्रणात उरलेले नाही. अॅपल त्यांच्या आयओएस यंत्रांमध्ये कोणती सॉफ्टवेअर्स वापरता येतील याचे नियम ठरवून देत आहे. तुम्ही तुमच्या किंडलवर काही दस्तऐवज चढवू शकता; पण अॅमेझॉन तुम्हाला विकलेली ई-पुस्तके एकतर्फी डिलीट करू शकते. 2009 साली अॅमेझॉनने जॉर्ज ऑर्वेलच्या नाइन्टीन एटीफोर या पुस्तकाच्या काही आवृत्त्या कॉपीराईटची कारणे सांगत वाचकांच्या किंड्ल्सवरून उडवून टाकल्या, आणि हे मी जास्त उपरोधिकपणे लिहू शकत नाही आहे. [नाइन्टीन एटी फोरचा नायक ‘गैरसोईच्या बातम्या’ उडवून त्यांऐवजी पाणचट पण सोयीस्कर बातम्या घालत इतिहास बदलत राहणाऱ्या मंत्रालयात काम करतो. मंत्रालयाचे नाव आहे ‘सत्य मंत्रालय’ – खरे] 

प्रश्न नुसत्या हार्डवेअर यंत्राचा नाही. त्या यंत्रावर तुम्ही आज कोणतीही सॉफ्टवेअर्स चढवू शकायला मोकळे नाही आहात. ते स्वातंत्र्य सीमित झाले आहे. अनेक कंपन्या आज सॉफ्टवेअर्स विकत नाहीत, तर त्यांच्या वापरासाठी लागणाऱ्या वर्गण्या घेतात, ज्या थोड्याथोड्या काळानंतर [अर्थातच पैसे भरून. – खरे] नूतनीकृत कराव्या लागतात. अॅडोबीने 2013 साली क्रीएटिव्ह क्लाऊड सॉप्टवेअर्स अशी वर्गणीबद्ध केली. मायक्रोसाफ्ट आजही सॉफ्टवेअर्स विकते, पण तेही वर्गणी नमुना जास्तजास्त आकर्षक करत आहेत. [माजी प्रधानमंत्री पी. व्ही. नरसिंहराव त्यांच्या ‘द इन्सायडर’ या पुस्तकात चहा कंपन्यांनी फुकट चहा वाटत लोकांना चहाचे व्यसन कसे लावले व नंतर चहा ‘वर्गणीदार’ कसा केला याची कहाणी सांगतात. खरे] आज आपली कागदपत्रे मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 मध्ये साठवण्याचा पर्याय असाच आकर्षक केला गेला आहे. कंपन्या आपल्याला हे पर्याय देत जास्तजास्त ‘दुभते करत आहेत. 

आजचे फायदे पाहता आपण केवळ कंपन्यांवर भरवसाच ठेवू शकतो. त्यासाठीच्या नियमांत ना सुसंगती आहे, ना सातत्य. कंपन्यांच्या कृतींवर आपले काहीही नियंत्रण नाही. याहू माझे फ्लिकरवर साठवलेले फोटो केव्हाही पाहू शकते, कोणालाही दाखवू शकते. मी माझ्या प्रेझीवरील प्रेझेंटेशन्सबद्दल, ट्रेलोवरील कामांच्या स्मरणयाद्यांबद्दल कोणत्याही प्रकारे जादा सुरक्षितता मागू शकत नाही. त्यांनी माझी वापर माहिती कोणाकडे आऊटसोर्स करून साठवली आहे ते मला माहीत नाही. त्या कंपन्यांनी माझा डेटा डिलिट केला तर तो परत मागायचा अधिकार मला नाही त्यांनी तो सरकारला दिला तर आक्षेप घ्यायचा अधिकार मला नाही. मी त्यांना सोडायचं ठरवलं तर ते माझा डेटा मला परत देतील याची खात्री नाही. 

हेन्री फॅरेन हा राज्यशास्त्री म्हणतो, “आपले बहुतांश आयुष्य ऑनलाईन जगले जाते, म्हणजेच ते मोठाल्या खाजगी कंपन्यांच्या नियमांप्रमाणे चालते. त्यांच्यावर न कोणाचे नियंत्रण आहे ना बाजारपेठेत त्यांना फारशी स्पर्धा आहे. 

यावर साधारणपणे दिला जाणारा बचाव म्हणजे, “अहो हा धंदा आहे. त्यात असेच चालते” बरं, तुमच्यावर सक्ती कोणतीच नाही, ना फेसबुकवर जाण्याची, ना गूगल शोध घेण्याची, ना आय-फोन वापरण्याची. त्या क्रिया करण्यात काही मोठाले फायदे आहेत. म्हणूनच ग्राहक तिकडे जातात. नसेल आवडत तर नका जाऊ. 

हा सल्ला व्यवहार्य नाही. तुम्हाला तुमचा डेटा इतरांना उपलब्ध करणे चालणार नसेल तर तुम्ही ई-मेल्स, फेसबुक, आय-फोन वापरू नका, हे जमण्यातले नाही. आज विद्यार्थी इंटरनेट शोध वा विकिपीडियाशिवाय शाळांचे अभ्यासक्रम पूर्ण करू शकत नाहीत. तसे केले तर नंतरच्या काळात नोकऱ्याही मिळणार नाहीत. या सान्या गोष्टी आधुनिक आयुष्यांचा, सामाजिक व्यवहारांचा भाग आहेत. आपल्यापैकी बहुतेकांना, बहुतेकवेळी त्यांच्याशिवाय सध्याच्या जगात वावरता येणारच नाही. 

आज आपल्यापुढे पाळत सहन करायची की नाही असा पर्यायच नाही. केवळ कोणत्या जहागिरदाराची पाळत सहन करायची, तेच आपण ठरवू शकतो. आपण आणि आपला डेटा सुरक्षित ठेवणारे कायदे घडत नाहीत तोवर आपण ह्याच व्यवस्थेत जगायला निबद्ध आहोत. डेटा बळ देतो, आणि आपला डेटा ज्यांच्याकडे आहे ते आपल्यावर बलप्रयोग [बलात्कार खरे] करणार. सरकारनेच काही समतोल साधणारी क्रिया केली तरच यातून सुटका आहे. 

[श्रीयर हा रीझीलियंट सिस्टिम्स इंकॉर्पोरेटेड या कंपनीचा प्रमुख तांत्रिक अधिकारी आहे. पुस्तकाचे नाव बायबलमधील लहानखुरा डेव्हिड आणि महाकाय गोलायथ यांच्यातील द्वंद्वाच्या कथेवरून घेतलेले आहे.] 

पत्ता: टुलिप, मञ्जुवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर-10 

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.