संधिकाल 

स्वातंत्र्यलढा, सत्याग्रह, टिळक, गांधी 

लोकमान्य ते महात्मा ह्या दोन युगांमधील स्थित्यंतराचा हा मागोवा. ह्या दोन्ही लोकोत्तर नेत्यांमधील साम्य-भेद व त्यांचे परस्परांविषयीचे मूल्यांकन टिपणारा. 

इ.स. 1914 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण होते. मंडालेमधील सहा वर्षांचा कारावास भोगून 16 जून 1914 रोजी लोकमान्य टिळक मायदेशी परतले. याच वर्षी साउथ अफ्रिकेतील सत्याग्रहाची यशस्वी सांगता होऊन गांधीदेखील भारताला परतण्यासाठी निघाले. परंतु वाटेत इंग्लंडला पोहोचता पोहोचता पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि गांधीचे स्वगृही परतणे जानेवारी 1915 पर्यंत लांबले. इ.स. 1914 ते 1920 हा कालखंड स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील संधिकाल होता. टिळकांच्या कारकिर्दीचे हे शेवटचे पर्व होते तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा नेता म्हणून गांधींच्या उद्याचा हा काळ होता. 

मंडालेचा कारावास भोगून स्वगृही परतलेले टिळक एका वयोवृद्ध सेनापतीप्रमाणे शरीराने थकले होते. गतायुष्यातील राजकारणाच्या अनेक अनुभवांमुळे आता ते अधिक सावध झाले हाते. परंतु स्वराज्यासाठी लढण्याची ऊर्मी त्यांच्या अंत:करणात अजूनही जिवंत होती. स्वगृही परतल्यानंतर केलेल्या पहिल्या जाहीर भाषणात ते सूचकपणे म्हणाले “… मी आता माझ्या पुढच्या पावलांसंबंधी विचार करीत आहे. परंतु तत्पूर्वी मला माझ्या मार्गाचे शुद्धीकरण करावे लागेल.” त्यासाठी त्यांनी घोषणा केली की, आयलंडप्रमाणे ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य हेच भविष्यात त्यांचे उद्दिष्ट राहील. यावेळी टिळकांनी स्पष्ट शब्दांत हिंसात्मक मार्गाचा निषेध केला. तसे पाहता टिळकांची भूमिका जहाल वाटत असली तरी सनदशीर मार्गानेच जाणारी होती. जहाल व मवाळांमधला भेद हा फक्त त्यांनी उपयोजिलेल्या मार्गांसंबंधी होता. दोघांचेही उद्दिष्ट एकच होते. जहाल नेते संवैधानिक मार्गाने शासनाला विरोध करत होते, तर मवाळ नेते शासनाशी सहकार्य करुन त्याच उद्दिष्टांची पूर्ती करू पाहत होते. 

जुन 1915 मध्ये गोपाळकृष्ण गोखल्यांचे आणि नोव्हेंबर 1915 मध्ये फिरोजशाह मेहतांचे निधन झाले. टिळक मंडालेच्या तुरुंगांत असतानाच अरविंद घोष संन्यास घेऊन पुडुच्चेरीला गेले, तर लाला लाजपतराय देश सोडून अमेरिकेला निघून गेले. तसेच, बिपिनचंद्र पालांनी राजकारणातून संन्यास घेतला होता. या घडामोडींमुळे भारतीय राजकारणात एक पोफळी निर्माण झाली होती. टिळक आता एकाकी पडले हाते. त्यांना त्यांच्या खाद्यांवरील प्रचंड जबाबदारीची जाणीव होती. या पार्श्वभूमीवर गांधींचेही भारतात आगमन झाले. 

टिळकांनी आपल्या स्वभावानुसार हिंमतीने विखुरलेल्या अनुयायांना एकत्र जमवले. प्राप्त परिस्थितीत जहाल व मवाळ आणि हिंदू व मुसलमानांनी एकत्र यावे आणि महायुद्धामुळे निर्माण झालेल्या संधीचा फायदा घ्यावा असे त्यांना वाटत होते. त्या दृष्टीने टिळकांनी अत्यंत समजूतदारपणे तडजोडींची तयारी दाखवत या ऐक्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. सर्वसामान्य जनतेत व कार्यकत्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी अॅनी बेझंटसोबत त्यांनी होमरूलची चळवळ सुरु केली. इ.स. 1916 च्या लखनौ कॉंग्रेसमध्ये जहाल व मवाळ आणि हिंदु व मुस्लीम ऐक्य साधण्यात टिळकांना यश मिळाले. टिळक भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे सर्वोच्च नेते म्हणून मान्यता पावले. या ऐक्याची व होमरुल चळवळींची फलश्रुती म्हणजे इ.स. 1917 साली भारतमंत्री माँटेग्यू यांनी केलेली घोषणा. या घोषणेद्वारे भारतमंत्र्यांनी स्पष्ट केले की भविष्यात भारतीयांना जबाबदार शासन देणे हे ब्रिटिश शासनाचे धोरण राहील. 

1917 हे वर्ष टिळकांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू होता. ज्या स्वराज्यासाठी त्यांनी अखंड चळवळ चालवली व कारावास सहन केला, त्या स्वराज्याच्या मागणीला भारतमंत्र्यांनी वरील घोषणेद्वारे तत्वतः मान्यता दिली. 1917 हे वर्ष म्हणजे टिळकांच्या राजकारणाची यशस्वी परिपूर्ती होती. तसे पाहता, त्यानंतर टिळकांना त्यांच्या मार्गाने अधिक काही मिळवता येण्यासारखे काही उरले नव्हते. भारतमंत्र्यांनी ज्या जबाबदार शासनाची हमी दिली होती, त्याची अंमलबजावणी करून घेणे इतकेच कार्य आता त्यांना करावे लागणार होते. त्यामुळे 1917 नंतर टिळकांची कारकीर्द मावळतीकडे झुकू लागली. 

1917 याच वर्षी गांधींचा भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर एक नेता म्हणून उदय झाला. यावर्षी चंपारण येथे त्यांनी पहिल्यांदा आपल्या सत्याग्रहाच्या तंत्राची भारतीयांना चुणूक दाखविली. पुढल्याच वर्षी अहमदाबाद व खेडा सत्याग्रहाद्वारे यश मिळवून आपले नेतृत्व त्यांनी सिद्ध केले. तरी देखील हे स्थानिक यश होते. गांधीना अखिल भारतीय राजकारणाची व ब्रिटिश शासनाच्या खऱ्या स्वरूपाची अजून पूर्णत: जाणीव झाली नव्हती. 

24 एप्रिल 1915 रोजी मद्रासमध्ये एका स्वागत समारंभात केलेल्या भाषणात गांधी म्हणाले, “एक निष्क्रिय प्रतिकारक म्हणून ब्रिटिशसाम्राज्यात मला जे स्वातंत्र्य मिळाले, ते इतरत्र कोठेही मिळाले नसते. त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याप्रती माझी निष्ठा आहे.” या निष्ठेपायी गांधीनी पहिल्या महायुद्धात ब्रिटिशसाम्राज्याला सहाय्य करण्यासाठी तरुणांची सैन्यात भरती करण्यासाठी गुजराथमध्ये दौरा काढला. 1916 साली मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन यांनी युद्धप्रयत्नांत सर्व भारतीयांचे सहकार्य मिळावे, यासाठी सर्वपक्षीय सभा बोलावली. या सभेसाठी टिळकांना व गांधींनाही निमंत्रण पाठविण्यात आले होते. याप्रसंगी टिळकांनी साम्राज्यांतर्गत स्वराज्याची मागणी करण्याचे ठरविले होते. परंतु गांधींना असे वाटत होते की सर्व भारतीयांनी विनाअट ब्रिटिशांना सहकार्य करावे. त्यामुळे टिळकांचे मतपरिवर्तन करण्यासाठी गांधी मुंबईचे एक तरुण नेते जमनादास द्वारकादास यांना बरोबर घेऊन टिळकांना भेटण्यासाठी सरदारगृहात आले. यावेळी टिळकांसोबत त्यांचे एक अनुयायी, बेळगावचे नेते गंगाधरराव देशपांडेदेखील उपस्थित होते. जमनादास व गंगाधररावांच्या आत्मचरित्रांमधून या संस्मरणीय भेटीचा तपशील उपलब्ध होतो. 

या भेटीत गांधी टिळकांना म्हणाले की, इंग्लंड हे न्यायप्रिय राष्ट्र आहे आणि त्यांना भारतीयांच्या साम्राज्याप्रती निष्ठेची खात्री पटली तर आणि भारतीयांनी त्यांना युद्धकाळात पूर्ण सहकार्य केले तर युद्धसमाप्तीनंतर ते भारतीयांच्या मागण्या पूर्ण करतील. गांधींनी टिळकांना प्रश्न विचारला की त्यांची सर्वकाळ ब्रिटिश साम्राज्याप्रती एकनिष्ठ राहण्याची प्रतिज्ञा घेण्याची तयारी आहे काय? यावर टिळकांनी उत्तर दिले, 

“वर्तमानकाळात ब्रिटिश साम्राज्यांतर्गत स्वराज्य हेच माझे उद्दिष्ट आहे. परंतु भविष्यात जन्माला येणाऱ्या पिढ्यांना या प्रतिज्ञेने बांधून टाकणारा मी कोण?…. मनूचा कायदादेखील सर्वकाळ बंधनकारक असू शकत नाही. बदलणाऱ्या काळाबरोबर सर्व कायदे बदलावेच लागतात,” यावेळी टिळकांनी एक मार्मिक टिप्पणी केली. ते म्हणाले, “हे बघा गांधी, आपल्या दोघांमध्ये हाच एक मतभेद आहे. मी वर्तमानकाळाकडे बघतो. माझ्या कालच्या वाईट अनुभवांवरून मी वर्तमानकाळात स्वतःमध्ये बदल करतो. याउलट तुम्हाला उद्याची व भविष्यकाळाची अधिक काळजी वाटते. राजकारणामध्ये हे योग्य नव्हे म्हणनूच तुम्ही ‘राजकारणी नाहीत असे माझे मत आहे” जेव्हा गांधींनी ते राजकारणी नसल्याचे टिळकांचे मत मान्य केले, तेव्हा टिळक पुढे म्हणाले, ”तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल मला शंका नाही. याही पुढे जाऊन मी म्हणेन की, “तुम्ही एक साधू आहात. मी तुमचा आदर करतो. परंतु राजकारणामध्ये साधुसंतांना स्थान नाही. मी तुम्हाला सल्ला देतो की तुम्ही तुमच्या आश्रमात बसावे आणि अधूनमधून माझ्यासारख्या सामान्य माणसांना तुमच्या दर्शनाचा व प्रवचनाचा लाभ द्यावा. तसेच, तुमच्याकडून ऐकलेल्या सद्वचनांचे शक्य असेल तितके आचरण आम्हाला करू देण्याची मोकळीक द्यावी.” 

शेवटी गांधींनी टिळकांना प्रश्न विचारला की उद्दिष्टप्राप्तीसाठी अहिंसा हा सर्वात योग्य मार्ग असल्याचा त्यांना विश्वास वाटतो काय? यावर टिळकांनी उत्तर दिले, “मला स्वराज्य हवे आहे. मला माझ्या देशासाठी स्वातंत्र्य हवे आहे. त्यासाठी लागणाऱ्या साधनांबद्दल मला चिंता वाटत नाही. जर हिंसेमुळे माझे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते, याची मला खात्री वाटली तर हिंसादेखील मला वर्ज्य नाही. परंतु हे एक गृहीतक आहे. या क्षणी हिंसक मार्गाचा उपयोग करणे हा एक मूर्खपणा ठरेल. आज ते व्यवहार्य नाही. राजकारणात सदासर्वकाळ लागू होईल असे एक मूल्य असू शकत नाही… 

ही भेट संपल्यानंतर गांधींना निरोप देण्यासाठी टिळक उठून उभे राहिले व त्यांच्या पाठीवर हात फिरवून म्हणाले, “तुम्हाला अद्याप या सरकारचा पुरा अनुभव आला नाही. माझ्या आयुष्याची चाळीस वर्षे यांच्याशी झगडण्यात गेली आहेत. माझ्याप्रमाणेच तुम्हालाही लवकरच अनुभव येईल, त्यावेळी माझी खात्री आहे की, तुम्ही माझ्या पुढे धाव घ्याल”. 1916 साली टिळकांनी केलेली ही भविष्यवाणी पुढे 1920 साली खरी ठरली. 

इ.स. 1919 साली गांधींनी रॉलेट बिलाविरुद्ध पहिला देशव्यापी सत्याग्रह सुरू केला. तरीदेखील इंग्रज शासनाबद्दल त्यांची निष्ठा कायम होती. परंतु त्यानंतर घडलले जालियांवाला बाग हत्याकांड आणि अमृतसरमध्ये ब्रिटिश शासनाने केलेल्या अत्याचारांमुळे गांधींची साम्राज्यावरील निष्ठा उडाली. यामुळे त्यांच्या विचारसरणीवरील व कर्तृत्वावरील बंधने तुटून पडली. इ.स. 1919 च्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या विशेष अधिवेशनात गांधींनी ब्रिटिश शासनाविरोधात असहकाराचा प्रस्ताव मांडला. 

इ.स. 1919 साली गांधींचे राष्ट्रीय नेता म्हणून स्थान सिद्ध झाले. टिळकांना अभिप्रेत असलेल्या स्वराज्याची व्याप्ती राजकीय क्षेत्रापुरती मर्यादित होती. परंतु गांधींची स्वराज्याची व्याख्या व्यापक होती. त्यामध्ये राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांतील स्वराज्य अभिप्रेत होते. टिळकांनी आपल्या कारकिर्दीत त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘कृष्णनीतीचा’ वापर केला. त्यांना खरे तर मनापासून पूर्ण स्वातंत्र्य हवे हाते. परंतु परिस्थितीच्या बंधनांमुळे त्यांनी साम्राज्यांतर्गत स्वराज्य मागितले. गांधी सरळमार्गाने जाणारे होते. गांधींच्या बाबतीत जे पोटात, तेच ओठांवर आणि तेच कृतीत असे. दोघांच्या तत्वज्ञानाचा पाया खूपच वेगळा होता. तरीही टिळकांनी विकसित केलेल्या तंत्राचाच पुढे गांधीनी अधिक विस्तृत व सखोलपणे अवलंब केला. 1919 साली टिळकांच्या हातातील स्वातंत्र्यलढ्याच्या नेतृत्वाची धुरा निसटून गांधींच्या हातात आली. 

गांधींच्या व्यक्तिमत्त्वामधील संत व राजकारणी पुरुषांच्या गुणांच्या संगमामुळे, त्यांच्या नेतृत्वाचा विलक्षण प्रभाव शिक्षित तरुण पिढी व सर्वसामान्य जनतेवर पडत चालला होता. टिळकांना गांधींच्या असहकाराच्या तंत्राबद्दल शंका वाटत होती. सत्याग्रहाचा ब्रिटिश शासनावर जास्त परिणाम होणार नाही, असे त्यांना वाटत होते. लढ्याचे नेतृत्व आपल्या हातातून निसटत चालल्याचे वैषम्य देखील त्यांना वाटले असेल. तरीही बदलत्या काळाची जाणीव त्यांना होती. गांधींच्या असहकार चळवळीला त्यांनी आशीर्वाद दिले. तसेच, जनमत त्यास अनुकूल असल्यास चळवळीला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसे केल्यास गांधीच्या आधी आपल्यालाच तुरुंगात पाठवले जाईल. याचीही त्यांना कल्पना होती. आपल्या एका सहकाऱ्याला टिळक म्हणाले, “गांधी नव्या जोमाने पुढे येत आहेत. त्यांच्या बरोबरच मला काम करावे लागणार.” मग इंग्रजीतून त्यांनी एक वाक्य म्हटले, ” But I shall have to play a second fiddle to him and I shall do it.” 

1 ऑगस्ट 1920 रोजी रात्री 12 वाजून 40 मिनिटांनी टिळकांचे निधन झाले. सरदारगृहात गांधींनी टिळकांचे अंत्यदर्शन घेतले. इतिहास हा अनेक नाट्यपूर्ण घटनांनी भरलेला आहे. आधीच जाहीर केल्याप्रमाणे गांधींच्या नेतृत्वाखाली याच दिवशी असहकार आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी गांधींना सरदारगृहात त्यांच्या पाठीवर हात ठेवून टिळकांनी उद्गारलेल्या त्या वाक्यांची नक्कीच आठवण झाली असेल. 

ईमेल: shyam.pakhare111@gmail.com 

******************************

मनुष्य रोज खातो-पितो, भोग भोगतो, हे सगळे तो करत असतो. पण एक दिवस एकादशीचा उपवास करतो आणि त्याच्या चित्ताचे समाधान होते. मुसलमान लोक रमजानच्या दिवसांत उपवास करतात. एकादशीच्या किंवा रमजानच्या नावाने खाणे सोडणारा मनुष्य हाच एक प्राणी आहे. याचा अर्थ असा की मनुष्याला केवळ खाण्या-पिण्यात किंवा भोग भोगण्यात जीवनाचीं सार्थकता वाटत नाही. तो जेव्हा आपल्या इंद्रियांवर अंकुश ठेवतो, देवाचे नांव घेतो तेव्हा त्याला बरे वाटते. म्हणून तो एकादशीच्या दिवशीं देवाच्या नांवाने उपवास करतो. तसे पाहिलें तर एकादशीच्या उपवासानेही त्याला पूर्ण समाधान मिळत नसते. त्याचे खरेखरे समाधान तो जेव्हा एखाद्या उपाशी माणसाला जेवू घालतो तेव्हा होते. ईश्वराने मनुष्याला एका निराळ्याच साच्यात घालून बनविले आहे. त्याने माणसाच्या हृदयात सद्भावना ठेवली आहे. अनुकंपा ठेवली आहे. पशूंमध्ये ती नाही. म्हणून मनुष्य कोणाचे दुःख पाहू शकत नाही. एखादा प्राणी दुःखाने तळमळत पडला असेल तर जोपर्यंत त्याचे दुःखनिवारण करण्यासाठी तो काही करत नाही, तोपर्यंत त्याला समाधान मिळत नाही. जेव्हा तो आपल्या भोगाचा थोडा त्याग करतो, दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यात मदत करतो तेव्हा त्याच्या चित्ताला शांति मिळते, समाधान मिळते. 

विनोबा (धर्मामृत मधून साभार) 

**********************************

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.