प्रतिसाद

१ आजचा सुधारकच्या विचारभिन्नता विशेषांक वाचला. अंकातील लेख चांगले असले आणि गूगलवर शोधून इंग्रजीत मिळणाऱ्या माहितीचे मराठीतून केलेले संकलन म्हणून महत्वाचेही असले तरी समकालीन भारतीय परिप्रेक्ष्यात मुळातून नवा (किंवा स्वतंत्र – स्वतःचा) विचार त्यात कशातच आला नाहीये (शिवाय भविष्याचा वेध घेणारं लेखनही अंकात नाही) त्यामुळे खरं सांगायचं तर किंचित निराशा (नि अपेक्षाभंग) झाला. मी जेव्हा म्हणतो की समकालीन भारतीय परिप्रेक्ष्यात मुळातून नवा (किंवा स्वतंत्र – स्वतःचा) विचार त्यात कशातच आला नाहीये, तेव्हा मला बरंच काही म्हणायचंय. आधी एक स्पष्ट करतो की यातील बहुतांश लेख ‘महत्त्वाचे’ आहेत. म्हणजे विषय आणि कंटेन्ट दोन्ही महत्त्वाचे आहेत. तेव्हा ते अंकात का वगैरे प्रश्न अजिबातच नाहीत. पण यातील बहुतांश लेख बघितले तर अ) ऐतिहासिक तपशील, व्यक्ती, मते यांवर तरी बेतलेले आहेत किंवा ब) अ-भारतीय घटना, मते, पुस्तके, मासिके यांतील माहितीवर आधारलेले आहेत. आता हिंदू राष्ट्रवादाचा श्याम पाखरेंचा लेख वानगीदाखल घेऊया. हा लेख इतिहातील बरीच तथ्ये मांडतो आणि हिंदू राष्ट्रवादाचा व कट्टर हिंदुत्त्ववादी विचारसरणीचा अन्योन्य संबंध दाखवू पाहतो. हे महत्त्वाचे व छान आहेच. पण तो त्याच्या पुढे जात नाही. वैश्विकीकरणाशी येऊन आंतरजालावरील अनेक लेखांप्रमाणे हाही लेख थांबतो. सगळी मांडणी गोळवलकर, सावरकर, आंबेडकर यांच्याच पायावर उभी केलेली.

डवाणी, के. सुदर्शन, सद्य शंकराचार्य, श्रीश्री रविशंकर, रामदेवबाबा इत्यादी समकालीन घटकांचा आताच्या हिंदू राष्ट्रवादावर काय प्रभाव आहे याचा कि़ंवा विविध कॉन्स्पिरसी थियरीज आधीही होत्या, मात्र सोशल मीडियाच्या काळात त्या वार्‍यासारख्या फैलावतात त्याचा हिंदू राष्ट्रवादावर काय परिणाम होतो याचाही लेखात विचार नाही. अर्थात हा एकच नाही तर इतरही लेख पाहिले तर ते इतिहासावर बेतलेले आहेत किंवा आंतरजालावर गार्डियन, न्यू यॉर्कर छाप नियतकालिकांत जे लेखन इंग्रजीत येते त्यातील महत्त्वाच्या व चांगल्या माहितीचे मराठीत संकलन करणारे आहेत. हे लेख ‘माहितीपूर्ण’ किंव ‘महत्त्वाचे’ म्हणता येतील पण जो मराठी वाचक आता इंटरनेटमुळे जगभरातील असे लेख सहज प्राप्त करून वाचू शकतो त्याला हे लेख काय वेगळं देतात? दुसरं म्हणजे यातील कोणते लेखक स्वतःचं अनुभवजन्य असं काही म्हणू पाहताहेत?

आणि इथेच ‘भारतीय’ आणि ‘समकालीन’ हे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. या अंकातील लेख अनेक तत्त्वप्रणाल्या, विचारप्रणाल्यांचा इतिहास व प्रवास दाखवतात पण त्या विचारांना ते समकालीन भारतीय समाजाच्या वर्तनाशी नीटसे जोडू शकलेले नाहीत. जसे विभक्त कुटुंबपद्धतीवर अजूनही कितीही चांगला लेख आला तरी तो जुनाट ठरतो (मला वाटतो) कारण माझ्या जन्माच्याही दशकभर आधी ही प्रक्रिया सुरू होऊन मी जन्माला आलो तोवर ती व्यवस्थित रुळली होती.

माझा दुसरा दुय्यम आक्षेप असा आहे की बहुतांश लेख ‘अ‍ॅकेडेमिक’ स्वरूपाचे आहेत. उत्पलचा लेख सोडल्यास लालित्य किंवा स्वानुभव असं काही (अब्रह्मण्यम!) ) लेखात आलं तर शिक्षा होईल की काय अशा भीतीने ते लिहिलेत की काय असा समज व्हावा इतके ते कोरडे आणि ‘विकीपिडीय’ आहेत.

दोन लेखांच्या बाबतीत मात्र मला खूप आशा होती. एक धनंजयचा लेख. खूपच छान. वेगळा विषय. चांगला खुलतो. पण पुन्हा भारताशी संबंधित तसा विदा (डेटा) मिळाला नाही ही मर्यादा तो स्वतःच मान्य करतो. (बैठक छान सजावी, तक्क्याला टेकून बसावं आणि कार्यक्रम संपला अशी घोषणा व्हावी तसं माझं झालं!) दुसरा लेख संहिताचा. तो विषय समकालीन आणि भारतीय नक्कीच आहे पण लेखातील कंटेन्ट बर्‍याच अ-भारतीय (त्याही सहज गूगल करून मिळेल अशा) माहितीने भरलेला तर आहेच शिवाय मूळ विषयासंबंधी तो अगदीच थोडं बोलतो. या एका लेखात मला लेखकापेक्षा संपादकांचा आळस अधिक दिसतो.

करंबळेकरांचा लेख मात्र या सगळ्याच आक्षेपांना सणसणीत उत्तर आहे. या एका लेखापायी मी हा अंक अजून कित्येकाना धाडला आहे. उत्पलचा लेख आवडला कारण त्याची भाषा, त्याचा प्रवाह, लालित्य, त्याचा सध्याच्या खर्‍या हाडामांसाच्या समाजाशी जोडत जोडत पुढे जाण्याचा प्रवास सगळंच छान आहे.

– ऋषिकेश दाभोळकर, पुणे

२ आ.सु.चा विचारभिन्नता विशेषांक वाचला. वैचारिक खाद्य देणारी ग्रंथमाला अशी याबद्दलची भावना अनुभवातून निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर उत्पल व.बा. व त्यांच्या सहकार्‍यांनी या अंकासाठी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक जरूर करावे लागेल. पूर्वाश्रमींच्या लौकीकास साजेलसे काम करणे विशेष जबाबदारीचे असते याचे भान अंकाचे संपादन करताना ठेवल्याचे दिसते. अंकासाठी निवडलेल्या विषयातूनच ते प्रतीत होते.संपादकीय वाचल्यावर व त्यात उल्लेख केलेल्या, अंकाचे प्रयोजन स्पष्ट करणार्या प्रश्नांच्या आधारे अंकातील लेख वाचल्यानंतर मात्र काही प्रश्नांची उत्तरे देण्यात अंक कमी पडत आहेसे जाणवले. त्याविषयीचे मत मांडण्याचा हा प्रपंच. उद्देश पूर्णतः सकारात्मक असून येणार्‍या अंकातून अधिक परिणामकारकपणे अंकाच्या उद्देशाला, विचारभिन्नतेला भिडणारे सुसूत्रपणे बांधलेले लेख वाचावयास मिळावे ही अपेक्षा आहे.

अंकातील लेख संपादकीयात उपस्थित केलेल्या प्रश्नांची सखोल मीमांसा करण्यात कमी पडत असल्याचे का वाटते याची काही कारणे मांडतो. अर्थात ती गुणात्मक क्रमवारीनुसार नाहीत.

एक कारण स्पष्टपणे अंकाच्या विषयाच्या आवाक्यातच आहे. विचारभिन्नता आणि त्याविषयाचे अनेक पदर, कंगोरे, स्थलकालसापेक्ष असे अनुभव व ते ही अनेकानेक जीवनअंगांमधील असं एका अंकात सामावणे खचितच शक्य नाही. परंतू या अंकात काय वाचायला मिळेल याची संपादकीयात केलेली मांडणी आणि अंकातील विविध लेख यांची सांगड घालता विचारभिन्नतेचा पूर्णपणे परिचय करून देण्यात अंक कमी पडत आहे असे वाटते.याच अनुषंगाने दुसरे कारण समोर येते ते हे की अंकातील लेख हे अंकाच्या विषयानुरूप सन्माननीय लेखकांकडून लिहून घेतलेले नसून ते संकलित केले आहेत. त्यामुळेही नेमकेपणा राहीला नसावा. याठिकाणी हे जरूर नमुद करायला हवे की सर्व सन्माननीय लेखकांचे लेख हे दर्जा व लेखाचा विषय या दृष्टीने गुणवात्तापूर्ण आहेत. परंतू आ.सु. मधील लेख हे या दर्जाचे असणारच हे अध्याहृत आहे.तर या सर्व आदरणीय लेखकांना अंकाचा विषय विचारभिन्नता वा आपापले लेख यांचा संबंध स्पष्ट करणारे काही विवेचन देण्यास सांगता आले असते काय याचा विचार व्हावा. असे विवेचन एक पार्श्वभूमी तयार करायला व लेखाच्या मर्यादाही काही स्पष्ट करण्यात उपयुक्त ठरेल. ते कदाचित शक्य झाले नसेल असे समजतो. लेखाची माहीती देणारे प्रस्तावनापर लिखाण संपादकांचे असावे असे दिसते. त्यात संपादकांनी विचारभिन्नतेच्या कोणत्या अंगांविषयी लेख भाष्य करत आहे व त्यातून काय घेता येईल विचारभिन्नतेच्या अनुषंगाने, हे अधिक स्पष्टपणे लिहावयास हवे होते असे वाटते.

तिसरे कारण असे जाणवले की अंकातील लेख मुख्यतः राष्ट्र, राष्ट्रवाद, राजकारण या अंगाने जाणारे आहेत. तसे संपादकीयात म्हटलेही आहे तरी त्यात समाजजीवनातील इतर अंगे, कला, साहित्य, समाजकारण, धर्म व संस्कृती, विज्ञान यातील विचारभिन्नता याचा समावेश आवशयक वाटतो.

एकूणच अंकाच्या विषयाशी संबंधित सर्वंकश व विषयाला घट्ट धरून त्याच्यात काळानुरूप झालेल्या बदलांची नोंद घेतली गेली नसल्याने अपूर्णतेची जाणीव आहे.निरनिराळ्या विषयातील विचारभीन्नतेच्या प्रवासाविषयी समाजाने वेगवेगळ्या काळात घेतलेली भूमिका व त्याची कारण मीमांसा स्पष्ट करणारे लिखाण वाचायला मिळाले तर चांगले होईल.

याठिकाणी प्रत्येक लेखाविषयी स्वतंत्रपणे काही सांगता येईल परंतू विस्तारभयाने अगदी थोडक्यात उल्लेख.

गुहांच्या लेखात विचारभिन्नतेपेक्षाही समाजमाध्यमे व त्यातून निर्माण केले जाणारे भ्रम वा विचार नियंत्रण याविषयी लिहीले गेले आहे असे वाटते. ती एक मुलाखत आहे व तिचा आवाका आंकाच्या विषयापेक्षाही मोठा आहे.

संहिता जोशी यांचा, विचार भिन्नतेविषयी काय भाष्य करतो हे समजले नाही.विचारभिन्नता व सहिष्णुता संकल्पनातील परस्परसंबंध काय व कसे राहिलेत?! आणि जर ते व्यस्तच राहिले असतील तर लेखातून ज्ञानसंवर्धन काय दृष्टीने होतेय?

अवधूत डोंगरे यांचा लेख त्याना असलेल्या अपराधी भावनेवर व नैतिकतेवर आधारीत वाटतो. त्यात विचारभिन्नतेविषयी नेमके काय म्हणायचेय ते हरवून गेले आहे असे वाटते.

वादविवादाविषयी हेमाडे यांनी उत्तम माहितीपूर्ण लेख लिहूनही तो तांत्रिक अंगे विषद करतो असे जाणवते. या विषयी वेगवेगळ्या काळात काय काय पद्धती होत्या वा सद्यकालात काय स्वरूप आहे याचे अगदी दूरचित्रवाणीवरील चर्चांसकट हे मांडता आले असते.

धनंजय मुळी यांचाही लेख तांत्रिक बाजू(च) फक्त मांडणारा आहे, जरी तो आकर्षक असला माहितीच्या दृष्टीने तरी.

तर अशा काही गोष्टी जाणवल्या व संपादकांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे सांगाव्याशा वाटल्या. संपादक याची नोंद घेतील ही खात्री आहे.

शेवट करताना आणखी एक कारण जरूरच सांगावेसे वाटते आणि ते म्हणजे अंकाचा वाचक म्हणून या विषयीचे ज्ञान व वैचारिक पात्रतेचा अभाव असल्यानेही वरील अनुभव आलेला असू शकतो.
आभार!

महेश देशपांडे
<mldeshpande@gmail.com></mldeshpande@gmail.com>

३ या महिन्याचा ‘आजचा सुधारक’च्या अंकात ‘धर्म : परंपरा आणि परिवर्तन’ या लेखमालिकेत आपण रोमन कॅथॉलिक पंथाचे पोप फ्रान्सिस यांच्यावर जो लेख लिहिला आहे तो मनापासून आवडला. पोप फ्रान्सिस यांची विविध प्रश्नांविषयीची प्रागतिक मते यापूर्वी वाचली होती. परंतु आपण दिलेली त्यांची उद्धरणे एकत्रित वाचून त्यांनी रोमन कॅथॉलिक पंथामध्ये किती आमूलाग्र परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न केला आहे हे लक्षात आले.

या अंकातील श्री. अरविंद गुप्ता यांचाही लेख फार उद्बोधक आहे. तसेच ‘हाजी अली सर्वांसाठी : एक अनावृत्त पत्र’ हेही अतिशय परखड व विचारप्रवर्तक आहे. कळावे.

श.गं.काळे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.