पुस्तक परिचय : द सर्कल

कादंबरी, तंत्रज्ञानाचा सामाजिक परिणाम, मानवी स्वातंत्र्य
——————————————————————————–
1984 हे वर्ष उलटून गेले, पण जॉर्ज ऑर्वेलने दाखविलेला एकाधिकारशाहीचा धोका अजून टळला नाही. उलट तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे व सोयीसाठी आपले स्वातंत्र्य गहाण टाकण्याच्या वाढत्या मनोवृत्तीमुळे तो धोका अधिकच गडद होत आहे. तंत्रज्ञान व विकास हे परवलीचे शब्द मानणाऱ्या आपल्या आधुनिक समाजाला धोक्याचा लाल कंदील दाखविणाऱ्या एका आशयघन कादंबरीचा हा संक्षिप्त परिचय.
—————————————————————————–

‘द सर्कल’ या कंपनीची सुरुवात ‘टाय’ने (तिच्या तीन संचालकांपैकी एक) लावलेल्या ‘ट्रू यू’या सॉफ्टवेअरच्या शोधापासून होते. ह्या सॉफ्टवेअरमुळे ग्राहकांना फक्त एका अकाऊन्ट आणि पासवर्डमार्फत त्यांच्या संपूर्ण सामाजिक आणि खाजगी आयुष्याचे व्यवस्थापन करण्याची सोय उपलब्ध होते. याच अकाऊन्टमार्फत लोकांना स्वतःची स्वतंत्र तांत्रिक ओळख मिळणार असते. ‘ट्रू यू’ सॉफ्टवेअरद्वारे लोकांचे खाजगी आणि सामाजिक आयुष्य व्यापून टाकणाऱ्या आणि सोशल नेटवर्किंगच्या क्षेत्रात मक्तेदारी स्थापन केलेल्या ‘द सर्कल’ या कंपनीच्या आधुनिक तंत्रज्ञानाधारित विचार-प्रणालीची मांडणी प्रस्तुत कादंबरीमध्ये केलेली आहे.
मानवी समाजरचनेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाला पूरक असे महत्त्वाचे बदल घडविण्याच्या आणि आपल्या स्पर्धकांचा नायनाट करण्याच्या उद्देशाने ही कंपनी सातत्याने वेगवेगळे प्रकल्प राबवत असते. मग ते सहारा वाळवंटातील वाळूचे कण मोजण्याचा अचाट प्रयोग असो की मूल हरवू नये म्हणून लहानपणीच त्याच्या शरीरात ईलेक्ट्रॉनिक चिप बसविणे असो, किंवा शरीरात बसविलेल्या ईलेक्ट्रॉनिक चिपद्वारे त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा मध्ययुगापर्यंतचा इतिहास जाणून घेणे असो, की अगदी महत्त्वाकांक्षी म्हणजे खऱ्या अर्थाने सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी समाजाची निर्मिती करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या दैनंदिन घडामोडी लोकांना प्रत्यक्ष पाहण्याची सोय असो… या सर्व प्रकल्पांमार्फत कंपनी तिचे पूर्वनियोजित व घोषित उद्दिष्ट – “जगात जे जे काही घडले आहे आणि घडते आहे ते सर्व काही सर्वांना माहिती झालेच पाहिजे” – पूर्ण करण्याकडे वाटचाल करत असते.
आपल्यालाही एका टप्प्यावर असे वाटून जाते की, खरोखरीच ह्या सर्व प्रक्रियेतून आधुनिक तंत्रज्ञानाधारित आदर्श आणि परिपूर्ण समाजरचनेचा आकृतिबंध खरोखरच साकारला जात आहे की काय? परंतु जसजसे कंपनीचे अंतिम ध्येय नजरेच्या टप्प्यात येत जाते, तसे एक नवी समाजरचना जाणीवपूर्वक तयार करण्याचा प्रयत्न दिसून येतो – जिथे स्वातंत्र्य असेल पण ‘नाही’ म्हणण्याचे नाही, जिथे व्यवस्था तुमच्यासाठी योग्य-अयोग्यतेच्या गोष्टींची निवड करेल, जिथे गुपित असणे म्हणजे खोटारडेपणाचे आणि खाजगी आयुष्य (इतरांना माहिती नसलेले) असणे म्हणजे चोरटेपणाचे लक्षण समजले जाईल आणि लोकही likes, feeds आणि followers च्या नादात या मूल्यांचा आणि जीवनशैलीचा स्वीकार करतील. मग राजकीय व्यवस्थेलाही समाजाच्या या बदलत्या मूल्यांची आणि मागण्यांची दखल घेणे अनिवार्य होईल; पर्यायाने खऱ्या अर्थाने पारदर्शक समाज आणि राजकीय व्यवस्था स्थापन करण्याच्या नावाखाली मग संपूर्ण समाजाच्या सामाईक, सामूहिक आयुष्यावर कंपनीला कब्जा करता येईल – हेच कंपनीचे अंतिम ध्येय असते. सर्व प्रकल्पांमार्फत अमाप लोकप्रियता मिळवून माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मक्तेदारी स्थापन करायची आणि यातूनच पुढे लोकप्रियतेच्या दबावतंत्राचा वापर करून वेगवेगळ्या देशांतील लोकशाही शासनसंस्थांशी हातमिळवणी करून लोकशाही कार्यप्रणालीची सूत्रे अप्रत्यक्षरीत्या हाती घ्यायची आणि जगावर पडद्यामागून हुकूमत गाजवायची अशी त्यामागील व्यूहरचना असते.
कथेची नायिका “मेई’ – प्रथमपासूनच बुजरी; आयुष्यात परिस्थितीमुळे आपल्या वाट्याला आपल्या योग्यतेच्या गोष्टी न मिळाल्याचा तिचा समज आणि त्यातून आलेला गंड; स्वतःशीच संवाद करणारी, एकांतात नौकानयन करून स्वतःजवळच जाणारी; संवेदनशील, समंजस पण महत्त्वाकांक्षी – एका निम्न मध्यमवर्गीय पार्श्वभूमीतून येऊन नंतर ‘द सर्कल’ कंपनीच्या अत्युच्च सुखसोयींनी परिपूर्ण अशा जीवनशैलीत काम करू लागते. आपल्याला मिळालेल्या या संधीचे सोने करण्यासाठी आपल्या जिवाचा आटापिटा करते आणि याच प्रयत्नात ती कंपनीच्या लोकप्रियतेचा चेहरा बनते.
मेई आणि तिचा पूर्वायुष्यातील मित्र मर्सर यांच्यातील प्रत्येक संवाद खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यांमधील द्वंद्वाची प्रकर्षाने जाणीव करून देतो. या दोघांतील प्रत्येक संवाद वाचताना आपणही अंतर्मुख होतो आणि आपण इतके काही सोशल मीडियाच्या आहारी गेलो नसल्याचे दाखले स्वतःलाच नकळतपणे देऊ लागतो.
जेव्हा टाय (कंपनीचा संस्थापक-संचालक) मेईला तिच्या प्रेमात पडल्यानंतर कंपनीने उभ्या केलेल्या कृत्रिम संरचनेतला फोलपणा दाखवून द्यायचा स्वतःच प्रयत्न करतो तेव्हा आपल्या अस्वस्थतेचे टोक गाठले जाते. तो कबूल करतो की, ‘ट्रू यू’ सॉफ्टवेअरचा त्याने लावलेला शोध ही सहज, जाता जाता घडलेली घटना असून, त्याचा आळस ही त्यामागची प्रेरणा होती. या गोष्टीला इतके महत्त्व देऊन संपूर्ण समाजव्यवस्था या पोकळ कल्पनेवर उभी करणे धोक्याचे असल्याची जाण तिला करून देण्याचा तो शेवटपर्यंत प्रयत्न करतो. पण ती टायवर विश्वास ठेवून, स्वतःशी प्रामाणिक राहून कंपनीचा चेहरा म्हणून सर्वांना या सगळ्यातला फोलपणा दाखवून द्यायचा प्रयत्न करेल की याच व्यवस्थेला सामाजिक जीवनाच्या विकासाचा पुढचा टप्पा समजून टायच्या अज्ञानाची कीव करेल?…
डेव्ह एगर्सची ‘द सर्कल’ ही कादंबरी हा एक वैज्ञानिक कल्पनाविलास. पण ती वाचत असताना जॉर्ज ऑर्वेलच्या ‘1984′ ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. काही दशकांपूर्वी साम्यवाद हा हुकूमशाहीचे आधुनिक निरागस रूप आहे असे काही लोकशाहीप्रणेत्यांचे म्हणणे होते. पण जसजशी कादंबरीची पाने उलटत जातात, तसतशी तंत्रज्ञानाच्या अति आहारी गेलेली आधुनिक लोकशाहीसुद्धा एक फसवी व्यवस्था होऊन हुकूमशाहीचे प्रतीक होऊ शकते अशी भीती मनात घर करू लागते. हेच ह्या कादंबरीचे यश आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.