पत्रसंवाद

‘आजचा सुधारक’च्या जुलै 2016च्या अंकामध्ये डॉ. रवीन्द्रनाथ टोणगावकर यांच्या आध्यात्मिक साधनेमधील वैज्ञानिक सत्य सांगणाऱ्या लेखाचा उत्तरार्ध आलेला आहे. या लेखात विपश्यना साधनेविषयी जी विधाने केलेली आहेत ती वस्तुस्थितीनुसार दिसत नाहीत. वास्तविक डॉ. टोणगावकर यांनी स्वतःच इगतपुरी येथील दहा दिवसांचे शिबिर पूर्ण केलेले असल्यामुळे त्यांच्या लेखात अशी विधाने यावीत याचे सखेद आश्चर्य वाटते. मी स्वतः इगतपुरी येथे दहा दिवसांची विपश्यना शिबिरे अनेकदा केलेली आहेत. विपश्यनेचा अभ्यास सुरू करतानाच श्री. गोएंका गुरुजी हे स्पष्ट करत असत की त्या साधनेमध्ये स्वतःच्या नैसर्गिक श्वासोच्छ्वासावर लक्ष ठेवावयाचे आहे, ‘कोणत्याही प्रकारचा प्राणायाम करावयाचा नाही’. त्यामुळे विपश्यनेमध्ये ‘जलद व दीर्घ श्वसन’ या बाबींचा समावेश होत नाही. इतर ज्या साधनापद्धती डॉ. टोणगावकर यांनी उल्लेखिल्या आहेत त्यांविषयी मला अनुभव नसल्यामुळे मी त्याबद्दल काहीही लिहू शकत नाही. माझ्याप्रमाणेच माझ्या पत्नीनेही विपश्यनेची शिबिरे तीन/चार वेळा पूर्ण केलेली आहेत. तसेच प्रशासनामध्ये उच्चपदावर असलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी वारंवार विपश्यना शिबिरे केलेली आहेत. माझ्या या मर्यादित अनुभवामध्येतर विपश्यनेनंतर कोणी वेडे झाल्याचे मला माहीत नाही. डॉ. टोणगावकर यांना स्वतःला विपश्यनेच्या शिबिरात जो अनुभव आला त्याविषयी मी काही भाष्य करू इच्छित नाही. कारण तो त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. आपल्या नियतकालिकाला एक विशिष्ट प्रतिष्ठा असल्यामुळे त्यामध्ये आलेल्या लेखावरून अनेकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे म्हणून हे पत्र पाठविण्याचा प्रपंच केला आहे. कळावे.

भा.प्र.से. (निवृत्त))
४१४, शलाका संघ को.ऑप. हौसिंग सोसायटी लि.,
महर्षि कर्वे रोड, मुंबई 400 020
दूरध्वनी: 22883507, 22028598

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.