लॉन्सचा छोटासा इतिहास

ज्ञानाचा विरोधाभास

—————————————————————————–

         काही व्यवस्था किंवा रचना गुंतागुंतीच्या असतात. त्या व्यवस्थांच्या भविष्यातील स्थितीबद्दल आपण काही अंदाज (predictions) बांधतो. काही व्यवस्थांवरती आपण करत असलेल्या अंदाजांचा किंवा भाकितांचा अजिबात परिणाम होत नाही. उदाहरणार्थ, हवामान ही व्यवस्था. उद्याच्या हवामानाचे भाकीत केल्याने हवामान बदलते असे होत नाही. मानवी व्यवस्था मात्र गुंतागुंतीच्या असतात आणि त्या व्यवस्थेसंबंधी केलेल्या भाकितांचा त्या व्यवस्थेवरती परिणाम होतो. जेवढी भाकिते जास्त चांगली, तेवढी ती व्यवस्था भाकितांना जास्त प्रतिसाद देते. त्यामुळे मानवी व्यवस्था समजून घेण्यासाठी आपण जसजशी जास्त माहिती गोळा करत आहोत, ती माहिती ‘प्रोसेस’ करण्यासाठी आपली संगणन-क्षमता वाढवत आहोत, तसतशा व्यवस्थेतील घटना अधिकाधिक अकल्पनीय आणि अनाकलनीय होत जात आहेत असा विरोधाभास दिसतो. जेवढी आपल्याला जास्त माहिती होते आहे, तेवढी आपली अचूक भाकिते करण्याची क्षमता कमी होत जात आहे. कल्पना करा, उदाहरणार्थ, भविष्यात एके दिवशी आपल्याला अर्थव्यवस्थांचे मूलभूत नियम माहीत झाले आहेत. हे घडताच बँका, शासन, गुंतवणूकदार आणि ग्राहक हे सारे नवीन ज्ञान वापरून नवे मार्ग शोधून काढतील आणि त्यांच्या स्पर्धकांपेक्षा पुढे राहण्याचा प्रयत्न करतील. ज्ञान वापरून नवीन मार्ग सुचले किंवा शोधले नाहीत तर ज्ञानाचा उपयोगच काय? आणि एकदा का लोकांनी आपले वर्तन बदलले की त्या अर्थव्यवस्थाही बदलतील. अर्थव्यवस्थाच बदलल्यामुळे आपले अर्थशास्त्रीय आकलनही कालबाह्य होईल. अर्थव्यवस्था भूतकाळात कशी काम करत होती हे कदाचित आपल्याला समजू शकेल पण अर्थव्यवस्थांचा वर्तमानकाळ आता आपल्याला समजू शकत नाही आणि भविष्यकाळ तर नाहीच नाही.

         हे काही काल्पनिक उदाहरण नाही. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावरती कार्ल मार्क्सने अतिशय हुशारीने काही अर्थशास्त्रीय सिद्धान्त शोधून काढले. या सिद्धान्तावर आधारित कष्टकरी वर्ग (proletariat) आणि भांडवलदार यांच्यातील संघर्ष वाढत जाऊन आणि हिंसक होत होऊन कष्टकरी वर्गाचा विजय होईल आणि भांडवलशाही व्यवस्था मोडून पडेल असे भाकीत त्याने केले. मार्क्सला खात्री होती की औद्योगिक क्रांतीच्या अग्रभागी असलेल्या ब्रिटन, फ्रान्स, आणि अमेरिका यांसारख्या देशांत क्रांतीची सुरुवात होईल आणि ती जगभर पसरत जाईल.

         भांडवलदारही आपले पुस्तक वाचू शकतात याचा मार्क्सला बहुधा विसर पडला. सुरुवातीला अगदी मूठभर लोकांनी मार्क्स काय म्हणतो आहे याकडे लक्ष दिले. या उगवत्या समाजवादी नेतृत्वाला अनुयायित्व आणि सामर्थ्य मिळते आहे असे दिसताच भांडवलदार जागे झाले. त्यांनीही मार्क्सच्या ‘दास कॅपिटल’चा अभ्यास केला आणि मार्क्सवादी सिद्धान्त आणि साधने आत्मसात केली. विसाव्या शतकात रस्त्यावरील माणसापासून (street urchin) ते राष्ट्राध्यक्षापर्यंत सर्वांनी अर्थशास्त्र आणि इतिहास यांना मार्क्सिस्ट दृष्टिकोनाने बघायला सुरुवात केली. कडव्या भांडवलदारांनी मार्क्सच्या भाकितांना टोकाचा विरोध केला पण मार्क्सच्या विश्लेषणाचा मात्र अंगीकार आणि वापर केला. सी. आय. ए. ने जेव्हा १९६८ मध्ये व्हिएतनाम आणि चिले येथील परिस्थितीचा अभ्यास केला तेव्हा त्यांनी तेथील समाजाला वर्गपद्धतींमध्येच पहिले. जेव्हा निक्सन आणि थॅचर जग समजून घेत होते तेव्हा त्यांनी हाच प्रश्न विचारला की अत्यंत महत्वाची अशी उत्पादनाची साधने कुणाच्या मालकीची आहेत. १९८९ ते १९९१ मध्ये जॉर्ज बुश यांनी कम्युनिस्ट ‘सैतानी सत्तेचा’ पाडाव होताना पहिला आणि १९९२ मध्ये बिल क्लिंटन यांच्याकडून पराभव पत्करला. क्लिंटन यांची जिंकणारी व्यूहरचना (winning strategy) एका वाक्यामध्ये सांगता येते – ‘It’s the economy, stupid!’. खुद्द मार्क्सलाही हे यापेक्षा चांगले सांगता आले नसते.

         जसे लोकांनी मार्क्सिस्ट विश्लेषणाचा आधार घेतला तसे त्यांनी स्वतःचे वर्तन बदलले. ब्रिटन आणि फ्रान्स येथील भांडवलदारांनी कामगारांच्या किमान चांगल्या भवितव्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले, त्यांच्या राष्ट्रीय जाणिवेला सशक्त केले आणि राजकीय व्यवस्थेत त्यांना सामावून घेतले. याचा परिणाम म्हणून जेव्हा मजूर निवडणुकांत मतदान करू लागले आणि मजूर पक्षांना एकामागून एक देशांमध्ये सत्ता मिळाली, तेव्हा भांडवलदार अजूनही ‘चैन की नींद’ घेऊ शकत होते. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून मार्क्सची भाकिते पूर्णपणे चुकीची ठरली. ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेत कधीही कम्युनिस्ट क्रांती झाली नाही आणि कष्टकऱ्यांची सत्ता केराच्या टोपलीत गेली.

         ऐतिहासिक ज्ञानाचा हा विरोधाभास आहे. ज्या ज्ञानामुळे वर्तनात काहीच फरक पडत नाही ते काही कामाचे नाही. पण ज्या ज्ञानामुळे वर्तनात फरक पडतो ते ज्ञान लवकरच कालबाह्य होते. जेवढी आपल्याकडे जास्त माहिती असेल तेवढा आपल्याला इतिहास जास्त चांगला समजू शकतो, तेवढे भविष्यात घडणाऱ्या घटना आपण इतिहासाच्या आकलनामुळे बदलू शकतो आणि तेवढेच आपले ज्ञान कालबाह्य होत जाते.

         काही शतकांपूर्वीपर्यंत मानवी ज्ञान हळूहळू वाढत होते. त्यामुळे राजकारण आणि अर्थशास्त्रही हळूहळू बदलत होते. आज आपले ज्ञान प्रचंड वेगाने वाढते आहे आणि त्यामुळे खरेतर आपल्याला जग अधिकाअधिक समजायला हवे. परंतु याच्या अगदी उलटे घडते आहे. आपल्याला मिळालेल्या नवीन ज्ञानामुळे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक बदल वेगाने घडत आहेत. घडणाऱ्या बदलांचा अर्थ लावण्यासाठी आपण ज्ञाननिर्मिती अधिक वेगाने करत आहोत आणि त्यामुळे अधिक गोंधळाची स्थिती निर्माण होते आहे. याचा परिणाम म्हणून आपली वर्तमानातील घटनांचा अर्थ लावण्याची आणि भविष्यातील घटनांचा अंदाज लावण्याची क्षमता कमी होत चालली आहे. इ.स. 1016 मध्ये 1050 मध्ये युरोप कसा असेल याचे भाकीत करणे तुलनेने सोपे होते. अर्थातच, अंदाजापेक्षा काही साम्राज्ये नष्ट झाली असली असती, काही अज्ञात टोळ्यांनी आक्रमण केले असते आणि काही नैसर्गिक आपत्ती आल्या असतील, तरीही 1016 प्रमाणेच 1050 मधील युरोपवर राजे आणि धर्मगुरू यांचेच राज्य असेल, तो कृषिप्रधान समाज असेल, बहुतांश प्रजा शेतकरी असेल आणि जनता दुष्काळ, प्लेग आणि युद्धामुळे दु:खी जीवन कंठत असेल. या तुलनेत 2016 मध्ये आपल्याला 2050 मध्ये युरोप कसा असेल याचा फारसा अंदाज बांधता येत नाही. 2050 ची राजकीय व्यवस्था कशी असेल, बहुतांशी लोक कुठल्या प्रकारच्या नोकरी/ व्यवसाय करत असतील किंवा तेव्हाच्या लोकांची शरीरे आजच्यापेक्षा किती वेगळी असतील याबद्दल आपल्याला फारसा तर्क करता येत नाही.

लॉन्सचा छोटासा इतिहास

         असे साधारणतः दिसते की वैज्ञानिक दृष्टिकोनातून केलेल्या व्यवस्थांच्या (किंवा रचनांच्या) अभ्यासाचा उद्देश भविष्याविषयी अंदाज वर्तवणे हा असतो – हवामानशास्त्रज्ञांना पाऊस पडणार की नाही हे सांगता येणे, अर्थतज्ज्ञांना चलन अवमूल्यनाचे आर्थिक महासंकट टाळता येईल की नाही हे सांगता येणे, डॉक्टरांना कॅन्सर कुठल्या उपचारपद्धतीने लवकर बरा होऊ शकेल हे सांगता येणे इ. हा नियम आपण इतिहासाला लावला तर काय दिसते? भविष्याचा अंदाज वर्तवू शकतील असे इतिहासाचे ठराविक सिद्धान्त किंवा नियम नसतील, तर इतिहासाचा अभ्यास का करायचा? इतिहासतज्ज्ञांनी आपल्या पूर्वजांच्या कृत्यांचा आणि घटनांचा अभ्यास करणे अपेक्षित असते, जेणेकरून आपण पूर्वजांचे चांगले निर्णय ‘कॉपी’ करू शकू आणि त्यांनी घेतलेले चुकीचे निर्णय टाळू शकू. पण असे कधीच घडताना दिसत नाही कारण वर्तमान भूतकाळापेक्षा वेगळा आहे. त्यामुळे हॅनिबलच्या दुसऱ्या प्युनिक युद्धातील डावपेच शिकणे तिसऱ्या महायुद्धासाठी उपयोगी पडणार नाहीत. घोडदळाच्या युद्धात ज्या तंत्रांनी विजय मिळवून दिला त्याचा सायबरयुद्धात उपयोग होत नाही.

         अर्थात व्यवस्थांचा अभ्यास फक्त भविष्याबद्दल अंदाज बांधते असे नाही. विविध विषयांमधील तज्ज्ञ आपले ज्ञानाचे क्षितिज विस्तारतात, ज्याद्वारे ते आपल्याला नवीन किंवा माहीत नसलेले भविष्यातील मार्ग दाखवतात. इतिहासाबद्दल तर हे थोडे जास्तच खरे आहे. जरी इतिहासतज्ज्ञ कधीकधी भविष्यवाणी करतात (आणि त्यात त्यांना मर्यादितच यश लाभते) तरी सहजपणाने आपल्याला लक्षात येणार नाही अशा शक्यतांबद्दल आपल्याला जाणीव करून देणे हे इतिहासाच्या अभ्यासाचे प्रमुख ध्येय आहे. इतिहासतज्ज्ञ इतिहासाचा अभ्यास करतात तो इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी (किंवा टाळण्यासाठी) नव्हे, तर इतिहासापासून मुक्त होण्यासाठी.

         आपल्यापैकी प्रत्येकजणाचा जन्म हा एका ऐतिहासिक परिस्थितीत झालेला आहे ज्याला विशिष्ट नियम आणि विशिष्ट मूल्ये लागू होतात आणि जी परिस्थिती एका अद्वितीय अश्या आर्थिक आणि राजकीय परिस्थितीने घडलेली आहे. आपण ही परिस्थिती गृहीतच धरून चालतो, जणू काही ती परिस्थिती नैसर्गिक, अपरिहार्य आणि अपरिवर्तनीय आहे. आपण हे विसरून जातो की आपले जग हे अपघाती घटनांच्या माळेने घडलेले आहे आणि इतिहासाने आपले केवळ तंत्रज्ञान, राजकारण आणि समाज यांनाच आकार दिलेला नाही तर आपले विचार, भीती आणि स्वप्नेही इतिहासानेच घडलेले आहेत. आपल्या भूतकाळाचा थंडगार पंजा आपली मान पकडतो आणि आपल्याला अपरिहार्य अशा एकाच भविष्यकाळाकडे बघायला लावतो. आपण ही पकड जन्मापासून अनुभवलेली असते. त्यामुळे आपण गृहीत धरून चालतो की ती परिस्थिती आपल्या असण्याचा नैसर्गिक आणि अविभाज्य भाग आहे. त्यामुळे आपण क्वचितच स्वत:ला मुक्त करतो आणि शक्य असलेल्या दुसऱ्या भविष्यकाळाची स्वप्ने क्वचितच पाहतो.

         भूतकाळाच्या पंजाची पकड सैल करणे हे इतिहासाच्या अभ्यासाचे उद्दिष्ट आहे. आपले डोके डावी-उजवीकडे वळवून आपण अशा शक्यता ध्यानी घेऊ लागतो ज्या आपल्या पूर्वजांच्या कल्पनेपलीकडे होत्या किंवा त्या आपल्या कल्पनेपलीकडे असाव्यात अशी पूर्वजांची इच्छा होती. आपल्या सद्य-परिस्थितीला कारणीभूत असणाऱ्या ऐतिहासिक अपघातांची मालिका बघताना आपल्याला आपले विचार आणि स्वप्ने कशी घडली याची जाणीव होते आणि आपण वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो आणि वेगळी स्वप्ने बघू शकतो. इतिहासाचा अभ्यास आपल्याला या शक्यतांपैकी काय निवडावे हे सांगू शकणार नाही पण किमान काही पर्याय दाखवू शकतो.

         जग बदलून टाकण्याची इच्छा बाळगणाऱ्या चळवळी नेहमी इतिहास-पुनर्लेखनापासून सुरुवात करतात ज्याने लोक भविष्याकडे नव्याने बघण्यास तयार होतील. तुम्हाला कामगारांनी संपावर जाणे हवे असेल किंवा स्त्रियांनी त्यांच्या शरीरावर स्वतः:चा हक्क गाजवणे हवे असेल किंवा पिचलेल्या अल्पसंख्याकांनी राजकीय हक्कांची मागणी करून हवे असेल – त्यांचा इतिहास त्यांना पुन्हा सांगणे ही त्याची पहिली पायरी आहे. नवीन इतिहास सांगेन की – ‘आपली सद्यःस्थिती ही नैसर्गिकही नाही आणि कायमस्वरूपी टिकणारीही नाही. गोष्टी पूर्वी वेगळ्या होत्या, शक्य असलेल्या घटनांची केवळ एक मालिका सध्याच्या अन्यायकारक जगास कारणीभूत आहे. आपण जरा विचारपूर्वक निर्णय घेतले तर आपण नक्कीच यापेक्षा कितीतरी चांगले जग घडवू शकू.’ या कारणामुळे मार्क्सिस्ट लोक भांडवलशाहीच्या इतिहासाची हकीकत सांगतात, स्त्रीवादी लोक पितृसत्ताक समाजांच्या घडणीचा अभ्यास करतात आणि आफ्रो-अमेरिकन हक्कांच्या चळवळीतील लोक गुलामांच्या व्यापाराचे स्मरण जागृत ठेवतात. त्यांचे उद्दिष्ट इतिहासाप्रमाणेच भविष्य चालावे असे नसते तर त्यापासून मुक्त होणे हे असते.

         जे भव्य अशा सामाजिक क्रांत्यांबद्दल खरे आहे तेच अगदी रोजच्या जगण्यातील छोट्या गोष्टींबद्दलही तेवढेच खरे आहे. स्वतःचे घर बांधणारे एखादे तरुण जोडपे आर्किटेक्ट्ला सहज सांगून जाते – ‘आम्हाला बंगल्याच्या पुढच्या भागात चांगले छान असे लॉन (हिरवळ) हवे आहे!’. हिरवळच का बरे असे विचारल्यावर ते सहजपणे सांगतील ‘बंगल्यासमोर हिरवळ छान दिसते!’ पण त्यांना असे का वाटते त्यामागेही इतिहास आहे.

         अश्मयुगातील शिकारी-वेचक (hunter-gatherer) लोकांनी कधी त्यांच्या गुहेपुढे हिरवळ वाढवली नाही, अथेनियन अक्रोपोलिसमध्ये किंवा रोमन कॅपिटॉलमध्ये किंवा जेरुसलेममधील ज्यू मंदिरात प्रवेश करणाऱ्या कुणाचेही स्वागत लॉनने केले नाही. खाजगी निवास किंवा सार्वजनिक इमारतींपुढे लॉन वाढवावे या कल्पनेचा उदय उत्तर-मध्ययुगात ब्रिटिश आणि फ्रेंच अमीर-उमरावांच्या प्रासादात झाला. पूर्व-आधुनिक युगात या सवयीने चांगलेच मूळ धरले आणि ते उमदेपणाचे प्रतीक बनले.

         चांगली देखभाल केलेल्या लॉन्सला जमीन लागते आणि त्यासाठी खूपसे काम करावे लागते. विशेषतः:गवत-कापणी यंत्रांच्या आणि तुषार-सिंचनाची सोय नसलेल्या काळाच्या संदर्भात तर हे फारच खरे आहे. या कष्टाच्या आणि जागेच्या बदल्यात लॉन्सकडून कामाचे काहीही मिळत नाही. त्याच्यावरती प्राण्यांना चरायलाही सोडता येत नाही कारण त्याने ते गवत खराब होते. गरीब कष्टकऱ्यांना लॉन्सवरती जागा आणि वेळ खर्च करणे अजिबातच शक्य नव्हते. मोठ्या वाड्याच्या सुरुवातीलाच असलेले नीटनेटके गवत हे ‘स्टेटस सिम्बॉल’ बनले. ते जणू काही येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे – ‘मी एवढा श्रीमंत आणि शक्तिशाली आहे आणि माझ्याकडे एवढी जमीन आहे की हा हिरवा दिमाख मला परवडू शकतो.’ लॉन जेवढे मोठे आणि जेवढे व्यवस्थित, तेवढे सामर्थ्य अधिक! तुम्ही जर एखाद्या सरदाराला भेटण्यास गेलात आणि त्याचे लॉन जर व्यवस्थित नसेल तर नक्कीच त्याचे दिवस वाईट चालले आहेत असे समजण्यास हरकत नव्हती. महत्त्वाचे समारंभ आणि कार्यक्रम हे या लॉनवरती होत आणि इतर वेळी त्यावर जायला मज्जाव असे. आजही अनेक राजवाडे, सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक जागांवरती शिस्तशीर सूचना असतेच – ‘कृपया लॉनवर जाऊ नये’. मी जिथे शिकलो त्या ऑक्सफर्ड कॉलेजमध्येही एक मोठ्या चौकोनी भागावरती आकर्षक लॉन होते ज्यावर आम्हाला चालण्यास किंवा बसल्यास वर्षातून केवळ एक दिवस परवानगी होती, इतर कुठल्याही दिवशी त्यावर चालणाऱ्या किंवा बसणाऱ्या विद्यार्थ्यांची खैर नसे.

         भव्य राजवाडे आणि सरदारांचे वाडे यांनी लॉन्सना अधिकाराचे प्रतीक म्हणून वापरले. जेव्हा उत्तर-आधुनिक काळात राजांची सत्ता गेली किंवा उमरावांना गिलोटीनवरती बळी दिले गेले, तेव्हा त्यांची जागा घेतलेल्या राष्ट्राध्यक्षांनी आणि पंतप्रधांनांनीही लॉन्सची परंपरा मात्र चालू ठेवली. संसद, सर्वोच्च न्यायालये, राष्ट्राध्यक्षांची निवासस्थाने आणि इतर सार्वजनिक इमारतींनी त्या गवताच्या पात्यांवरती आपला अधिकार प्रस्थापित केला. त्याचवेळी, लॉन्सनी क्रीडा-जगतावरही आपले वर्चस्व प्रस्थापित केले. गेली हजारो वर्षे माणसे सर्व प्रकारच्या (बर्फापासून ते वाळवंटी प्रदेशापर्यंत) मैदानांवरती खेळ खेळत आणि तरीही गेल्या दोन शतकांमध्ये फुटबॉल आणि टेनिससारखे महत्त्वाचे खेळ लॉन्सवरतीच खेळले जातात. अर्थात तुमच्याकडे पैसे असतील तर! रिओ दे जानेरोच्या झोपडपट्ट्यांमध्ये ब्राझिलियन फुटबॉलची पुढची पिढी धुळीत आणि वाळूमध्ये फुटबॉल खेळते आहे. परंतु श्रीमंत उपनगरांमध्ये धनिकांची मुले काळजीपूर्वक वाढवलेल्या लॉनवरती खेळण्याचा आनंद घेत आहेत.

         अशा तऱ्हेने माणसे लॉन्सचा संबंध राजकीय ताकद, सामाजिक स्थान किंवा आर्थिक संपदेशी जोडतात. एकोणिसाव्या शतकात नव-प्रस्थापितांनी उत्साहाने लॉन्सचा स्वीकार केला. सुरुवातीला फक्त बँकर्स, वकील किंवा उद्योगपतींनाच त्यांच्या निवासासमोर लॉन्स परवडत असत. औद्योगिक क्रांतीमुळे जेव्हा मध्यमवर्गाची वाढ झाली आणि गवत-कापणीयन्त्रे (lawn-mowers) आणि तुषार-सिंचन (sprinklers) विकत घेणे सामान्यांच्या आवाक्यात आले तेव्हा मात्र लाखो कुटुंबांना अचानक लॉन असणे परवडू लागले. अमेरिकेतील उपनगरांमध्ये छोटेसे वैयक्तिक लॉन हे श्रीमंतांची हौस न राहता मध्यमवर्गीयांची गरज बनली.

         रविवारी सकाळी चर्चला जाऊन आल्यानंतर अनेक लोक भक्तिभावे आणि समर्पितपणे त्यांच्या हिरवळीची कापणी करत असत. जणू काही हाही रविवारच्या प्रार्थनेप्रमाणे एक संस्कार ठरला. सध्या तर मका आणि गव्हानंतर लॉनचे गवत हे अमेरिकेतील सर्वात जास्त पसरलेले ‘पीक’ आहे आणि खत, बियाणे, गवत-कापणी यंत्रे, तुषार सिंचक आणि माळी यांनी मिळून बनलेली ‘लॉन इंडस्ट्री’ अनेक अब्ज डॉलर्सचा आकडा पार करते आहे.

         लॉन्स केवळ अमेरिकन किंवा युरोपियन लोकांचेच ‘फॅड’ बनून राहिलेले नाही. जगभरातील लोक टीव्हीवरून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना व्हाईट हाऊसच्या लॉनवरून भाषण देताना ऐकतात, फुटबॉलचे सामने खेळले जाताना पाहतात. जगभरातील लोक लॉन्सचा संबंध सामर्थ्य, पैसे आणि प्रतिष्ठेशी लावतात. अगदी मुस्लिमजगतातील मध्यवर्ती ठिकाणही लॉन्सनी जिंकले आहे. कतारमध्ये नवीनच बांधलेल्या इस्लामीकलेच्या संग्रहालयासमोर देखणे लॉन आहे, ज्याची जवळीक हारून-अल-रशीदच्या बगदादपेक्षा सोळाव्या लुईच्या व्हर्सायशी जास्त आहे. जर पांढरे झगे आणि काळे हिजाब नसतील तर दोहा-दुबईच्या उपनगरांत फिरताना असे वाटू शकते की तुम्ही मध्यपूर्वेत नाही तर मध्यपश्चिमेत आहात.

         लॉन्सचा हा छोटासा इतिहास वाचल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नातील घराचा विचार कराल तेव्हा कदाचित तुम्ही तुमच्या घराच्या समोर लॉन असण्याबद्दल दोनदा विचार कराल. तुम्ही अर्थातच घरासमोर लॉन करून घेण्यासाठी मोकळे आहात आणि युरोपीय सरदार, भांडवलदार उद्योगपती यांच्याकडून आलेले सांस्कृतिक जोखड फेकून देऊन तुमच्या घरापुढे कदाचित जपानी रॉक-गार्डन किंवा अगदीच नवीन काही करण्यासाठीही तुम्ही मोकळे आहात. इतिहास शिकण्याचे हे सगळ्यात उत्तम कारण आहे – भविष्याचा अंदाज बांधण्यासाठी नाही तर भूतकाळापासून मुक्त होऊन पर्यायी शक्यतांचा विचार करण्यासाठी. अर्थातच ही काही पूर्ण मुक्ती नाही. आपण भूतकाळामुळे झालेली आपली घडण पूर्णपणे टाळू शकत नाही, पण काही मुक्तता ही पूर्ण बंधनापेक्षा नक्कीच बरी!

(युवल नोह हरारी (Yuval Noah Harari) यांच्या होमो ड्यूस (Homo Deus) या पुस्तकातील दोन उप-प्रकरणांचा हा अनुवाद.)

अनुवादक : धनंजय मुळी
ईमेल: dhananjaymuli@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.