काश्मीरचे वर्तमान (भाग २)

काश्मीर, हिंसा, काश्मिरी पंडित, मुस्लिमप्रश्न
—————————————————————————–
भारत-पाक फाळणीला आता 70 वर्षे होतील. पण काश्मीरमधील पेचप्रसंगानेही जखम अजूनही भळभळतीठेवली आहे. गेले सहा महिने तर तेथे कर्फ्यूच लागलेला होता. लष्करी बळावर आपण काश्मीर भारतात भौगोलिक दृष्ट्या राखू शकू. पण त्यातून उद्भवणारे राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक प्रश्न आपली पाठ सोडणार नाहीत. थेट काश्मीरला जाऊन तेथील विविध जनसमुहांशी थेट संवाद करून तेथील परिस्थितीचा एका पुरोगामी कार्यकर्त्याच्या दृष्टीने धांडोळा घेणाऱ्या रिपोर्ताजचा हा उत्तरार्ध.
—————————————————————————–
4 ऑक्टोबर, श्रीनगर
तीन तारखेसच याकूबकडून कळले की, एस.एन.सुब्बारावजी 1 ऑक्टोबरपासून श्रीनगरला आलेले असून ते 4 ऑक्टोबरला परतणार पण त्याआधी ते मला भेटायला लग्नघरी येणार. हे ऐकल्यावर मी म्हणालो, ते माझ्या वडिलांच्या वयाचे. सर्वार्थाने वरिष्ठ. त्यांनी मला भेटायला येण्याची मला लाज वाटत असून आपण त्यांना भेटायला गेले पाहिजे. त्यांचे यजमान महंमद शफी कुरेशी नावाचे, स्प्रिंग बर्डस एज्युकेशन ट्रस्ट चालवणारे ओपुरा (रेल्वेस्टेशन) ह्या अत्यंत संवेदनशील एरियात राहतात. सर्व भिंतीवर ‘गो इंडिया गो’, बुरहानवाणी चौक व पाकिस्तानचे झेंडे भिंतीवर चितारलेले पाहतच आर्मी, सी.आर.पी.एफ., आर.आर.एस.एफ. इ. च्या गराड्यामधून आम्ही कुरेशींच्या घरी पोहोचलो. सुब्बारावजी भेटलेच. आंतरभारतीचे प्रा. सदाविजय आर्यही भेटले. सुब्बारावांना विमानतळावर निघायची घाई असल्यामुळे आमचे जास्त काही बोलणे झाले नाही. फक्त जाणे-येणे व त्यामुळे झालेले श्रीनगरच्या संवेदनशीलतेचा परिणाम हीच काय त्या भेटीची उपलब्धी. मी येताना पॅलेस्टाईन प्रवासातील माझे एक ७६ वर्षे वयाचे मित्र महमूद यासिन किरमानी यांच्या घरी हैदरपुरा, पिरबागला उतरलो. किरमानी शेख अब्दुलांच्या निष्ठावान साथींमधील एक होते.घरात घुसल्या घुसल्या त्यांना आलिंगन देतानाच मी त्यांना विचारले, “अब किधर?”, तर सरळ त्यांनी घरासमोरच्या गल्लीकडे बोट करून म्हटले, “गिलानीसाहब!” म्हटलं त्यांचं घर तर समोर आहे. तर ते म्हणाले, “बिलकुल सामनेही है. पर पता नही आपको मिलने भी देंगे या नही. क्योंकि वे वह हाऊस अरेस्ट में है.”मी म्हटलं, “इतक्या जवळ आलो आहे, तर मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करीन. भेट नाही झाली तरी माझेकडील कार्ड त्यांच्याकडे पोचविण्याचा प्रयत्न करीन.”किरमानींनी काश्मिरी सभ्यतेला धरून आमचे आगत स्वागत केले. आम्हाला चहा आणणारी 20-22 वर्षाची अत्यंत बोलकी मुलगी काश्मिरच्या वर्तमान स्थितीवर अत्यंत तडफदारपणे आपली मते मांडत होती. किरमानी तिला आपल्या परीने उत्तरे देत होते पण ती मुलगी अजिबात जुमानत नव्हती. मला तर ती काश्मिरी युवा गटाची प्रतिनिधीच वाटत होती. तेथून जवळच असलेल्या गिलानींच्या घरी गेलो तर गल्लीच्या तोंडावरच चिलखती गाड्या उभ्या. आर्मी, सी.आर.पी.एफ.ने तर जाऊ दिले. जम्मू-काश्मिर पोलिसचे क्षेत्र आले, तेव्हा माझी चौकशी करून त्यांनी सांगितले की आम्ही त्यांच्या मुलांनाही सोडत नाही, आतले आत आणि बाहेरचे बाहेर. आम्ही तुम्हालाही सोडू शकत नाही. मी त्यांना माझे कार्ड दिले व म्हटले, “कम से कम मेरा कार्ड तो उन तक पहुँचाओगे ना?”त्यावर त्यांनी ‘हो’म्हटले व आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो. हैदरपुरा हा श्रीनगरचा व्ही.आय.पी. परिसर मानला जातो. सुरक्षारक्षकांचा वावर नेहमीपेक्षा जास्तच होता; पण आम्हांस कुठेही अडवणे वा हटकणे झालेले मी तरी अनुभवले नाही.

गिलानींची भेट न झाल्यामुळे मी त्यांचे प्रतिनिधी श्रीनगर बार कौन्सिलच्या अध्यक्षांना जाऊन भेटलो. त्यांनी काश्मिरच्या मूळ इतिहासापासून आत्ताच्या परिस्थितीवर खूपच प्रवाही भाषण दिले. ते सारखे युनोचे ठराव आणि जनमतसंग्रहाची भाषा बोलत होते व भारत याबद्दल टाळाटाळ करतो असा आरोप करीत होते. मी म्हणालो, “1 नोव्हेंबर 1947 ला लॉर्ड माऊंटबॅटननी बॅ.मोहम्मद अली जिनांना जनमतसंग्रह करून हा वाद संपवा असे म्हटल्यावर जिनांनी त्याला नकार दिला, हे खरे आहे काय?” यावर ते चूप तर राहिलेच, उलट भारत आता जनमत संग्रहाबद्दल टाळाटाळ करतोय म्हणत राहिले. काश्मिरच्या प्रश्नावरचे इतके गुंतागुंतीचे मुद्देही ते निष्णात वकील कोर्टात जशी आपली केस प्रभावीपणे मांडतो तसे तासभर मांडत होते. माझ्या सोबतचे याकूब व परवेझ दोघेही मात्र त्यांच्यामुळे प्रभावी झालेले दिसले; कारण ते इतर सामान्य काश्मिरींप्रमाणे आपल्या पोटापाण्याच्या कामात दंग असल्यामुळे त्यांना एवढा तपशील माहीत असण्याचे काहीच कारण नाही व बहुसंख्य आंदोलनात असतात तसे हौसे, नवसे, गवसे इथेही दिसत आहेत. हे दोघे त्याचेच प्रतिनिधी होते. वकीलसाहेब मला एकच गोष्ट पुन्हा पुन्हा म्हणत होते कीतुम्ही भारताला हे समजावून सांगा. जणु मी मोदी आणि भागवतांना येथून गेल्यावर हात धरून बसवून हे सगळं सांगू शकेनअसा त्यांचा समज दिसला. मी म्हटले, “ वो तो दूर दिल्ली में. मुझे उनका चपरासी भी नहीं जानता. मै कुछ भी कहने, करनेवाला नहीं हूँ.”

5 ऑक्टोबर, श्रीनगर
सकाळीच नाश्ता करून मी, याकुब, परवेजसह सकाळी 10 च्या सुमारास बडगाम जिल्ह्यातील नागाम येथे जायला निघालो. ह्या ठिकाणी 16 ऑगस्टला चार लोक मारले गेले होते. ‘मागामा’या शियाबहुल इलाक्यातून जात असताना मोहरमचे टिपीकल मोठमोठे काळे कपडे रस्ताभर टांगलेले व अयातुल्लाह खोमेनीची मोठमोठी चित्रे मोक्याच्या जागांवर लावलेली दिसत होती. तोच काही अंतरावर मुख्य सडकेवरच 10-15 युवकांचा घोळका पत्थरबाजी करताना मला दिसला. मी याकुबला दूरच गाडी उभी करायला सांगितली व गाडीतून उतरून मी एकटा मुलांच्या दिशेने जायला लागलो. ते माझ्याकडे निरखून पाहत उभेच होते! मी लगबगीने जवळ पोहोचून एका 15-16 वर्षाच्या, दगड धरून उभा असलेल्या मुलाचा हात धरला. माझे लक्ष नव्हते. मागून सिक्युरिटीवाले आलेले पाहून तो माझा हात झटकून गल्लीत नाहीसा झाला. मला खूपच हळहळ वाटली, कारण मला त्याला विचारायचे होते की ‘एवढ्या सकाळी रस्त्यावर येऊन कुणाला दगड मारतोयस? यात बरेच आजारी व कुठल्या इमर्जन्सीमुळे घराबाहेर पडलेले स्थानिक लोकच तर आहेत. त्यांना किंवा त्यांच्या गाड्यांना दगड मारून तुझे काय साध्य होणार? तुझा जीवही जाऊ शकतो. शरीरावर कुठेही जखम होऊ शकते. डोळ्यास लागले तर कायमचा आंधळा होशील. हे तुला दिसत असूनही तू हे साहस का बरे करतोस?’पण दुर्दैवाने मागून आलेल्या आर्मीवाल्यामुळे मला चालून आलेली संधी हुकली. अर्थात त्यात मला दगड लागण्याची अथवा आणखी काही होण्याची शक्यता असूनही मी हे कृत्य केले. याचे मजजवळ एकच उत्तर आहे. मी जर तेथील परिस्थितीचा अभ्यास करायला गेलो आहे तर या सर्व गोष्टींची तयारी ठेवूनच गेलेले बरे.

थोड्याच वेळात आम्ही नागामला पोहोचलो. नागाम हे बडगाम जिल्ह्यातील 25-30 घरांचे छोटे खेडे आहे. तेथे 16 ऑगस्ट 2016 रोजी झालेल्या गोळीबारात 1) गुलाम अहमद-वय 37, 2) जावेद अहमद शेख-वय 22, 3) मंजूर अहमद शेख-वय 29, 4) मुहम्मद अहमद बोनी-वय 35 हे चार गावकरी गावातील एकाच ठिकाणी मारले गेले. सकाळी 7.55 ला सी.आर.पी.एफ. 43 बटालियन च्या गाड्यांतून बंदुकधारी जवान उतरले आणि त्यांनी अंदाधुंद फायरिंग केली, ज्यात ह्या चौघांचा मृत्यू झाला. 15 ऑगष्ट हा भारताचा स्वातंत्र्यदिन. गाववाले सांगू लागले की ह्यातील कोणी पेपर घ्यायला जात होता तर कोणी कामावर. मी म्हणालो, “हो सकता है ये लोग 15 अगस्त के खिलाफ ‘काला दिन’या पाकिस्तान का झंडा लगाने का भी काम कर रहे होंगे और बिलकुल गॉंव से लगे हुए पहाड पर सी.आर.पी.एफ. 43 का पडाव है. वहॉं से चारों तरफ नजर दौडाने से सबकुछ दिखता होगा. त्यांनी तेथून काहीतरी आक्षेपार्ह पाहिले असेल व गोळीबाराची अॅक्शन केली असेल.” गावातील एकहीजण खरे काय ते सांगत नव्हता; पण चारहीजण हातावर पोट असलेले व आपल्या घरातील कमावते होते. आता त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबातील अवलंबून असलेल्या लोकांचे काय? उदा. जावेद अहमद शेख, 22 वर्षांचा. सुतारकाम करून आपले व लहान बहीण-भावांचे संगोपन करीत होता. गेल्या ईदच्या वेळी त्याचे व लहान बहिणीचे एकाचवेळी लग्न ठरले होते. त्याला आई-बाप नसून आता तो गेल्यावर तीन लहान बहिणी व सगळ्यात लहान भाऊ 10-12 वर्षांचा असावा. यांचे कसे होईल? शेजारची वयस्कर स्त्री येऊन बसली होती व सारखी रडत होती. तिन्ही मुलांना आंजारत-गोंजारत होती. गाववाले म्हणाले “आता हीच त्यांची आई.” मंजूर अहमद शेख शादीशुदा होता. बायको रुखसाना, एक मुलगा, 8 वर्षाची एक मुलगी मागे सोडून गेला. तो शेतातून येत होता. त्या बाहेर ओट्यावरच बसल्या होत्या आणि त्यांच्या समोरच रस्त्यावर गोळीबारात मंजूर जखमी झाला. त्याला बिखा हॉस्पिटलमध्ये नेले. तेथून श्रीनगरच्या गव्हनर्मेंट मेडीकल कॉलेजला नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. तिसरा जावेद अहमद शेख. त्याचे गावाच्या चौकातच हेअर ड्रेसिंगचे दुकान होते. पेपर घ्यायला गेला अन् जागेवरच गोळी लागून गेला. यातील जखमीना दवाखान्यात नेत असताना पोलिसांनी अडवले. हे ऐकल्यावर मी स्थानिक पोलीस स्टेशनलाही गेलो. तेथे एस.एच.ओ. नव्हते. इतर पदाधिकारी ‘माहीत नाही, माहीत नाही’चा मंत्र जपत होते म्हणून मी तिथून निघून आलो. चारही मृतकांच्या प्रेतांना रस्त्याच्या कडेने एका उंचावरील जागेत पुरले असून त्यांच्या समाध्यांवर व त्यांच्या घरावर काळ्या कपड्यावर शहीदाचं नाव, वय, केव्हा, कसा मारला गेला हे लिहिलेले चित्र टांगलेले दिसले. त्यांच्या दफनविधीसाठी हुरियतचे गिलानी, मिरवाईजपासून बरेच नेते आले होते व एक लाखाच्याही वर लोक जमले होते. 9 जुलैपासून आतापर्यंत तीन महिन्यांत 100 लोक मारले गेले. पंधरा हजार तुरुंगात आहेत. साडेतीन हजार पेलेटगनने जखमी झालेले असून निम्म्या लोकांचे डोळे गेले आहेत. मुंबईहून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रेटिनातज्ज्ञ डॉ. नटराजन त्यासाठी स्वतःहून आले असून त्यांच्या म्हणण्यानुसार यातील 2 टक्केही लोकांचे डोळे परत येणे शक्य नाही. यात 5 वर्षांपासून 80 वर्षापर्यंतच्या व्यक्तींचा समावेश आहे. आज ज्या 5 वर्षांच्या मुलाची पेलेटगनने दृष्टी गेली, तो पुढील 60-70 वर्षाचे संपूर्ण आयुष्य अंधारातच काढणार. ही माणसे काश्मिरच्या चळवळीची चालती-बोलती प्रतीके म्हणून जगणार… मी तर विचार करून करून हैराण झालो आहे. भारत सरकारचा काश्मिरचा प्रश्न हाताळताना हा जो क्रूरपणा होत आहे, ज्या पेलेटगनला जगात कुठेही परवानगी नाही (इस्राईल सोडून), जी गन पॅलेस्टिनांना सबक शिकवायला खास करून बनवली असून त्याला नॉन लेथल वेपनचा दर्जा आहे, तिचा काश्मीरमध्ये सरसकट वापर होतो आहे. हे अत्यंत अमानुष, क्रूर असून त्या गनचा वापर भारतात तत्काळ बंद करायला हवा.पेलेटगनने जखमी झालेले रुग्ण मी स्वतः गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, श्रीनगरच्या वॉर्ड नं.8 मध्ये पाहिले आहेत. तिथे जाण्यासाठी कारने निघालो तर अनंतनाग-बारामुल्ला रेल्वेच्या पुलावर पत्थरबाजी सुरू होती. ती पाहून परत गेलो व मोटरसायकल, हेल्मेट घेऊन निघालो. कारण 12 ऑक्टोबर म्हणजे निघण्याचा दिवस. म्हटले आज शेवटचा दिवस आहे. पेलेटगनच्या जखमींना न भेटता श्रीनगर सोडणे म्हणजे आपली काश्मिर सफर अपुरीच राहील म्हणून गेलो. खूपच जुने मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आहे. महाराजा हरिसिंगांनीच बनवलेले असून अत्यंत टापटीप व स्वच्छ वाटले. कदाचित पॅलेटगनचे व इतर जखमींमुळे व्ही.आय.पी. इत्यादींची वर्दळ असावी म्हणूनही काळजी घेत असावेत. पण अस्वच्छता व हॉस्पिटलचा टिपीकल वास कुठेच जाणवले नाहीत हे विशेष. बऱ्याच पायपिटीनंतर मी वॉर्ड नं. 8 मध्ये प्रवेश करता झालो. तेथील बहुसंख्य लोक माझ्याकडे अत्यंत रागाने, संशयाने व तुच्छतेने पाहताहेत असे म्हटले तरी वावगे होणार नाही. गेले 10-12 दिवस मी हे सतत अनुभवत होतो, त्यामुळे मला विशेष काही वाटले नाही. मी घुसल्याबरोबर पहिल्या बेडवर होता 16 वर्षांचा आठवीत शिकणारा जावेद अली ठाकूर. म्हणाला, “दुपारी 2 वाजता मोठ्या भावाच्या मागे स्कूटीवर मासे पकडायला निघालो असता शेजारुन जाणाऱ्या ट्रकच्या खिडकीमधून पॅलेटची फायरिंग झाली व माझ्या डाव्या डोळ्यातून गेली.” मी पोहोचायच्या चार-पाच तास आधीची ही ताजी केस होती. आणि भारताचे गृहमंत्री म्हणतात ही की पेलेट गनचा वापर आता बंद आहे!

ओबेदच्या समोरच्याच बेडवरचा मुलगा विलक्षण रागाने म्हणाला, “5 ऑक्टोबरला मी क्रिकेट खेळून परतताना रस्त्याने जाणाऱ्या ट्रकच्या खिडकीतून गोळी चालली आणि मला लागली. मी 18 वर्षांचा असून मॅट्रिकमध्ये आहे.” आधीतर सगळ्या वॉर्डनेच मला मीडियावाला समजून माझी झाडाझडती घेतली. मीडियाबद्दल, मुख्यतः झी, आजतक, इंडिया टि.व्ही. इ. बद्दल लोक खूपच रागाने बोलत होते. मीमीडियावाला नसून तुमची हालत जाणून घ्यायला आलेला एक सामान्य कार्यकर्ता आहे हे त्यांना सांगण्यात काही वेळाने मला यश आल्यावर त्यांनी आपली कर्मकहाणी, तसेच देश, सरकार, व मीडियाबद्दल आपली प्रतिक्रिया ऐकवली, जी आपल्याला अंतर्मुख करायला लावणारी आहे. भारतावरचा विश्वास उडाल्याचे हे द्योतक अत्यंत काळजी करण्यासारखे आहे. त्या घाटीमधील एकूणएक माणूस जर एवढा भारतविरोधी झाला असेल तर तुम्ही त्यांचा विश्वास संपादन करण्याऐवजी आर्मी, सी.आर.पी.एफ., बी.एस.एफ. व अन्य सुरक्षादलांच्या मदतीने जर काश्मिरी लोकांना ताब्यात ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर काश्मिरच्या शवपेटीवर एकेक खिळा मारण्याचाच कार्यक्रम चाललाय असे तेथील एकूण वातावरण पाहून माझ्या मनात आले. आर्मीसारख्या संवेदनशील दलाचा सिव्हिल सोसायटीमध्ये इतका प्रदीर्घ वापर करून आपण आर्मीचाही अपमान करत आहोत. कारण आर्मी ही फक्त शत्रू प्रदेशांच्या विरुद्ध वापरायची सेवा असून सिव्हिल भागात पूर, भूकंप, त्सुनामीसारख्या आपत्तीच्या काळासाठी तिला बोलावले जाते. काश्मिरसारख्या राज्यात मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य जनतेला कंट्रोल करण्यासाठी चाळीस वर्षांपासून तिचा वापर होत आहे. काश्मिर, तसेच नागालँड, मणिपूर, आसाम, मेघालय, अरुणाचल, मिझोराम, त्रिपुरासारखी ईशान्येकडील राज्ये व तथाकथित रेड कॉरिडॉर (ज्यात झारखंड, छत्तीसगढ, आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, बिहार येथील आदिवासी भाग येतो) तेथे, म्हणजे अर्ध्याच्या आसपासचा भारत मार्शल लॉसदृश स्थितीत असणे हे जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाचे अपयश म्हणावे लागेल. आर्मी, पॅरामिलिट्रीने दलित, आदिवासी, अल्पसंख्य, मुली, महिलांवर केलेल्या अत्याचारांचे आकडे फार चिंताजनक आहेत. काश्मिर हे त्यातील सर्वांत जास्त संवेदनशील! कारण ते सीमेवर आहे. तेथील परिस्थिती आधीही चिंताजनक होती; पण 9 जुलै पासून बंद आहे म्हणजे आता 110 दिवस होत आले. हा भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठा बंद असून जगातील दोन नंबरचा आहे. ह्या काळात संपूर्ण घाटी, शाळा, कॉलेजेस, बँका, कार्यालये, वाहतूक ठप्प झाली असून संपूर्ण जनजीवन विलक्षण विस्कळीत झालेले आहे.

अश्रफ सहराई हे गिलानीजीनंतरच्या नेत्यांपैकी एक. त्यांनाही भेटलो. त्यांनी स्पष्ट सांगितले, “ मैं अभी- अभी (जेल से) बाहर आया हूँ. हम अभी 70 साल के हैं. हमें भारत के लोगों से कोई शिकवा नहीं. आमच्या येथील सगळ्या निवडणुका हा नुसता फार्स असून 1977 मध्ये मुरारजीभाई देसाई पंतप्रधान असताना जी निवडणूक झाली ती पहिली आणि आतापर्यंतची एकमेव ‘फ्री अॅन्ड फेअर’निवडणूक होती. ह्या तमाशामुळे आमचा निवडणुकींवर विश्वास राहिला नाही. जगमोहन नावाचा गव्हर्नर आमच्यामधून फक्त पंडितांना निवडून काढून घेऊन गेला. बाकी आमच्यावर बॉम्बवर्षाव करुन आमची लोकसंख्या कमी करण्याचे मनसुबे घेऊन तो आला होता. पण व्ही.पी.सिंगांच्या हे लक्षात येताच त्यांनी त्याची उचलबांगडी केली. वास्तविक आम्ही व काश्मिरी पंडित एकच आहोत. तुमच्या जातिव्यवस्थेच्या जाचाला कंटाळून आम्ही काही वर्षांपूर्वी मुसलमान झालो. बघाना, आमच्या गावामध्ये ऋषिभट, शहा ही नावे शिल्लक आहेत का? काश्मिरी पंडित आमचे भाऊबंदच आहेत. काश्मिरीयतचे ते अभिन्न भाग आहेत. पण एका षड्यंत्रामध्ये तेही हकनाक अडकले व आता देशोधडीला लागले. याचे आम्हाला वैषम्य आहे. अजूनही ते आले तर आम्ही त्यांच्या जानमाल, सुरक्षेची काळजी घेऊ. पी.ओ.के., अक्साईचीन, लडाख, कारगिल, द्राससह सार्वमत घेऊन जम्मूसह जो काही निर्णय येवो तो आम्ही मानू . पाकिस्तान, भारत वा स्वतंत्र अशी तीन शर्तींवर सार्वमत व्हावे व त्याचा निर्णय सर्वांनी पाळावा.”

मी बंदीपोरा, जि.बडगाममध्ये असताना कळले की, चरार-ए-शरीफ तेथून फक्त 30 कि.मी. वर आहे, म्हणून गेलो. 13व्या शतकात एक अवलिया येथे वारले तर त्यांची मजार व त्यांच्या काही शिष्यांचे त्याच्या आजूबाजूच्या जागेतच दफन केले, त्या सर्व जागेला चरार-ए-शरीफ म्हणतात. हा दर्गा हिंदू, मुसलमान दोघांनाही सारखाच श्रद्धेचा असून 1995 मध्ये पाकिस्तानी आतंकवादी मस्तगुल येथे बरेच दिवस बंदुकीच्या धाकावर लोकांकडे खाऊन-पिऊन असायचा. त्याचा खात्मा करण्यासाठी या दर्ग्यावर (1984 स्वर्णमंदिर, अमृतसरच्या धर्तीवर) 1995-96 मध्ये आर्मीने हल्ला केला. हे संपूर्ण लाकडी बांधकाम होते. ते जळून खाक झाले. मस्तगुलच्या केसालाही धक्का न लागता तो आपल्या सहकाऱ्यांसह तेथून सुरक्षितपणे पाकिस्तानात पोहोचला. तो आजही जिवंत आहे. चरार-ए-शरीफहून भारत-पाकिस्तानची सीमा कुठूनही गेले तरी 100 कि.मी.वर आहे. चरार-ए-शरीफच्या चारी बाजूंना आर्मी, सी.आर.पी.एफ., बी.एस.एफ.च्या सुरक्षा-रक्षकांच्या छावण्यांची रेलचेल असताना एक मोस्ट वॉंटेड माणूस सीमा ओलांडून 100 कि.मी. आत येतो काय, काही दिवस तेथे दडून बसतो कायव तुमच्या ऑपरेशनमधून सहीसलामत बाहेर जातो काय? सगळेच संशयास्पद आहे. जसे बुरहानवाणी वयाच्या 19व्या वर्षी घराबाहेर पडतो, 23 वर्षापर्यंत फेसबुक बॉय म्हणून मुलामुलींच्या हृदयावर राज्य करतो. फेसबुक चावडी आहे. जी कुणीही पाहू शकतो. या मुलाला चार वर्षे फेसबुकवर इतके अॅक्टिव्ह का राहू दिले? असे अनेक प्रश्न मनात घेऊन मी परत आलो. •
(अपूर्ण)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.