रा.स्व.संघात हिंदूंना प्रवेश मिळेल का?

रा स्व संघ, हिंदुधर्म, धर्मविचारभेद,
—————————————————————————–

जुन्या धर्मामधून त्यातील एखादा पंथ फुटून बाहेर पडतो तेव्हा तो कालांतराने व काही निकष पूर्ण केल्यावर स्वतंत्र ‘धर्म’ झाला आहे. परंतु सहिष्णुता आणि समावेशकत्व ह्या हिंदुधर्मातील दोन मोठ्या दोन गुणांची तेथे काय स्थिती आहे?
—————————————————————————–

हिंदुधर्म सहिष्णु असल्याचे वारंवार सांगितले जाते. हे पूर्ण सत्य नसले, तरी हिंदू धर्मामध्ये जी काही थोडीबहुत सहिष्णुता होती, तीही रा.स्व.संघ इ. संघटनांमध्ये आता उरलेली नाही. आमच्या विचारसरणीशी सहमत नसलेल्या हिंदूंचीही टवाळी व हेटाळणी करून त्यांना तुच्छ लेखण्याची वृत्ती या संघटनांमधून मोठ्या प्रमाणात आढळते. म्हणूनच मी अनेकदा प्रश्न विचारतो, की रा.स्व.संघात हिंदूना प्रवेश मिळेल का? हा प्रश्न गमतीने विचारलेला नाही हे स्पष्ट व्हावे, म्हणून त्याची थोडी चिकित्सा करू या.

‘रा.स्व.संघात हिंदूंना प्रवेश मिळेल काय?’ हा प्रश्न कोणाला चमत्कारिक तर कोणाला आक्षेपार्ह, कोणाला हास्यास्पद तर कोणाला अज्ञानमूलक वाटेल. कारण, हिंदूंना संघटित करणे, हेच तर संघाचे ब्रीद असल्याचे सांगितले जाते. ‘अखंड भारत’ हे हिंदुराष्ट्र असावे, असे काही भव्य स्वप्न संघाच्या डोळ्यापुढे असल्याचेही मानले जाते. म्हणूनच हिंदू नसलेल्या मुसलमान, ख्रिश्चन इ. लोकांना संघामध्ये प्रवेश मिळेल काय, असा प्रश्न कोणी विचारला तर तो सुसंगत ठरेल आणि संघाचे अनुयायी या प्रश्नावर त्यांना ‘होय’ किंवा ‘नाही’ असे जे काही उत्तर द्यावयाचे असेल ते देतील; परंतु संघात हिंदूंना प्रवेश मिळेल काय, हा प्रश्न मात्र निर्माणच होत नाही, असे अनेकांना वाटेल. ‘अगा जे जाहलेचि नाही। तयाची वार्ता पुसशी काइ?’, असे ते मला विचारतील. संघाचे अनुयायी तर असे म्हणतील, की हे स्वतःच्या घरात स्वतःला प्रवेश मिळेल काय, असे विचारण्यासारखे झाले.

संघधर्म हिंदू धर्मापेक्षा वेगळा परंतु परिस्थिती इतकी साधी-सरळ नाही. माझ्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा हिंदू धर्मातूनच उदयास आलेला, परंतु आता हिंदू धर्मातून वेगळा झालेला असा एक स्वतंत्र धर्म आहे. हिंदू धर्माच्याच अनेक अनुयायांनी हा नवा धर्म पत्करलेला आहे आणि हिंदू धर्मामध्ये असलेल्या अनेक गोष्टी या नव्या धर्मातही आहेत, हे खरे आहे. परंतु एवढ्यावरून त्या दोघांचे ऐक्य सिद्ध होत नाही. जेव्हा एखादा नवा धर्म निर्माण होतो, तेव्हा तो ज्या परंपरेपासून फुटून निघतो, त्या परंपरेतील अनेक लोक या नव्या धर्माचा स्वीकार करीतच असतात. उदा. यहुदी धर्मातून ख्रिस्ती धर्म स्वीकारला. तसेच हिंदू धर्मातून बौद्ध धर्म उदयास आला. तेव्हा अनेक हिंदूंनी नवा बौद्ध धर्म स्वीकारला. शीख धर्माच्या बाबतीतही असेच झालेले दिसते. म्हणूनच हिंदू धर्मातून संघधर्म फुटून निघाल्यानंतर अनेक हिंदूंनी हा नवा धर्म स्वीकारला, हे ऐतिहासिक प्रक्रियेच्या दृष्टीने सुसंगतच आहे. नवा धर्म जुन्या परंपरेतील अनेक गोष्टी घेतच असतो. हेही आपण ध्यानात ठेवले पाहिजे. या दृष्टीने हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यात अनेक साम्य आढळेल. उदा. यहुदी धर्मातील आदम व ईव्ह यांची मूलगामी अशी पुराणकथा ख्रिस्ती धर्माने घेतलेली दिसते. इस्लाम धर्म आणि इस्लामपूर्व अरब संस्कृती यांच्यामध्येही साम्य आढळेल. उदा. काबाविषयीचा पूज्यभाव, सुंता करण्याची पद्धत इ. अनेक गोष्टी इस्लाममध्ये इस्लामपूर्व संस्कृतीमधून आल्या आहेत. पंरतु अशा रीतीने एकमेकांशी समान असलेल्या या धर्मांमध्ये काही महत्त्वाच्या बाबतीत इतके वैषम्य असते, की त्यामुळे त्यांच्यात भेद मानावाच लागतो. अपत्य आणि आईवडील यांच्यात साम्य असले तरी त्यांचे अस्तित्व भिन्न असल्याचे मानावे लागते. तसेच काहीसे या धर्मांच्या बाबतीतही मानावे लागते.

संघधर्माची वैशिष्ट्ये

जेव्हा एखादा नवीन धर्म निर्माण होतो, तेव्हा त्या धर्माच्या अनुयायांना आपण ‘निवडक लोक’ (Chosen people) आहोत, असे वाटत असते. यहुदी, ख्रिस्ती इ. लोकांना असेच वाटत आले आहे. संघाच्या अनुयायांनाही नेमके असेच वाटत असते. आपल्या मूळ धर्मातील जे लोक नव्या धर्मात आलेले नसतात, ते पदभ्रष्ट व पतित असून त्यांना आपल्या धर्मात आणून त्यांचा उद्धार करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, असेही नव्या धर्माच्या अनुयायांना वाटत असते. संघस्वयंसेवकांची संघाबाहेरील हिंदूंविषयी हीच भावना आहे. कोणताही नवा धर्म आपल्या धर्माच्या प्रचारासाठी आपले प्रचारक पाठवत असतो. संघही असेच प्रचारक पाठवतो. हे प्रचारक स्वतःला हिंदू धर्माचे प्रचारक म्हणवून घेत नाहीत, तर ते स्वतःला संघाचे  प्रचारक म्हणवून घेतात, हे मुद्दाम ध्यानात घेतले पाहिजे. धर्माचे कार्य हे ईश्वरी कार्य आहे, अशी त्याच्या अनुयायांची श्रद्धा असते. संघाच्या अनुयायांत संघकार्य हे ईश्वरी कार्य आहे, अशी धारणा असते. पाखंडी विचार मांडणाऱ्या लोकांवर बहिष्कार घालावयाचा, हे कोणत्याही धर्माचे तंत्र असते. स्वतःला हिंदू म्हणविणाऱ्या परंतु संघातून बाहेर पडणाऱ्या वा संघावर टीका करणाऱ्या लोकांवर संघस्वयंसेवक असाच बहिष्कार घालतात, त्यांचे घर वर्ज्य करतात. त्यांच्याशी बोलावयाचेही टाळतात. आपला धर्म हा इतर सर्वांहून श्रेष्ठ आहे, असे विशिष्ट धर्माच्या अनुयायांना वाटत असते. नव्या धर्माचे जसे एक कर्मकांड निर्माण होते, तसेच संघाचेही नवे कर्मकांड अस्तित्वात आलेले आहे.

नव्या धर्माच्या अनुयायांमध्ये एक प्रकारचा कट्टरपणा, कडवेपणा व धर्मांधता येते, तीच संघाच्या अनुयायांमध्ये आढळते. नव्या धर्माची नवी तीर्थक्षेत्रे असतात, उत्सव असतात, प्रवक्ते असतात. संघही याला अपवाद नाही. नव्या धर्माच्या अनुयायांना भेटलेला एखादा मनुष्य जर आपल्याच धर्माचा आहे असे कळले, तर त्यांना त्याच्याविषयी विलक्षण आपुलकी व जवळीक वाटते. संघस्वयंसेवकांच्या बाबतीतही हेच घडत असते.

ख्रिश्चन, बौद्ध, शीख इ. धर्म आपल्या मूळ परंपरेपासून फुटून निघाले, तेव्हा अगदी प्रारंभापासून ते स्वतंत्र धर्म म्हणून प्रस्थापित झाले नव्हते, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. नव्या धर्माचे वेगळेपण व स्वतंत्र अस्तित्व कालांतराने प्रस्थापित होत असते. रा.स्व.संघ ही संघटनादेखील प्रारंभीच्या काळात जरी स्वतंत्र धर्म बनलेली नसली, तरी अर्धशतकाच्या वाटचालीनंतर आता तिला हिंदू धर्माहून स्वतंत्र असे अस्तित्व प्राप्त झालेले आहे, हे मान्य करणे उचित ठरेल. नव्या धर्माचे अनुयायी जेव्हा आपल्या धर्माचा प्रचार करतात, तेव्हा प्रचारासाठी आपल्या खऱ्या-खुऱ्या तत्त्वांचा आधार घेण्याऐवजी असंबद्ध गोष्टींचे आधार घेतात.

संघातही तरुण वयातील मुलांना कबड्डी खेळावयास चला म्हणून नेले जाते आणि त्यांना संघाची दीक्षा दिली जाते. राष्ट्रप्रेम, त्याग, समर्पण इ. संकल्पनांचेच नव्हे, तर या शब्दांचेही आकर्षण वाटावे, असे माणसाचे वय असते. या वयातील तरुणांपुढे या तत्त्वांचे गोजिरवाणे रूप उभे करून त्याला संघधर्माची दीक्षा दिली जाते. संघधर्माचे खास तत्त्वज्ञान यापेक्षा वेगळे असून ज्याला नव्याने संघात आणावयाचे आहे, त्याला प्रारंभी कधीही ते तत्त्वज्ञान सांगितले जात नाही. शिवाय, आईवडिलांचा धर्मच सामान्यतः मुलांना प्राप्त होत असतो. संघधर्माच्या बाबतीतही कटाक्षाने ही परंपरा पाळली जाते. हे सर्व विवेचन पहिले असता आता संघाला एका स्वतंत्र धर्माचा दर्जा प्राप्त झाला आहे, असे मला वाटते.

हिंदू धर्माचे वेगळेपण

संघधर्म आणि हिंदू धर्म यांच्यामध्ये एक महत्त्वाचा भेद आहे, तोही येथे स्पष्ट केला पाहिजे. हिंदूधर्मामध्ये विविध, एवढेच नव्हे, तर परस्परविरोधी प्रवाहांनाही सामावून घेण्याची आदर्श नसली तरी मर्यादित का होईना जी एक सर्वसमावेशकता आहे, तिचा निर्देश मला येथे करावयाचा आहे. येथे यज्ञयाग करणाऱ्या याज्ञिकांवर टीका करणारे कृष्ण व ज्ञानेश्वरही यज्ञांच्या कट्टर पुरस्कर्त्यांप्रमाणेच हिंदू असू शकतात. तीर्थयात्रा, मूर्तिपूजा इत्यादींना मानणारे व न मानणारेही हिंदू असू शकतात. एवढेच नव्हे तर हिंदूधर्मातील दोषांवर कठोर प्रहार करणारे राजा राममोहन रॉय इ. समाजसुधारकही हिंदू असू शकतात. म्हणूनच डॉ. रा.ना.दांडेकर म्हणतात, “वेदप्रामाण्याचा स्वीकार न करणाऱ्या शाक्त तंत्रपंथीयांना किंवा लोकायतिकांना अहिंदू मानण्याचा प्रघात नाही.’‘ (हिंदुधर्म : इतिहास आणि आशय; उपोद्घात, पृ.4). कट्टर हिंदुत्ववादी त्यांना अहिंदू मानतील, ही गोष्ट अलाहिदा.

या बाबतीत संघधर्माची हिंदू धर्माशी तुलनाच करता येत नाही, कारण, एखादा मनुष्य वेद, चातुर्वर्ण्य इ. वर टीका करूनही हिंदू असू शकतो. परंतु तो संघस्वयंसेवक मात्र असू शकत नाही. म्हणूनच तर हिंदूंना संघात प्रवेश मिळेल काय, असे मी विचारले आहे. आपली प्रतिमा उज्ज्वल दाखविण्यासाठी संघाचे अनुयायी कदाचित माझ्या या प्रश्नावर ‘होय’ असे उत्तर देतीलही. परंतु हे काही खरे नाही. वैदिक परंपरेवर टीका करणाऱ्या हिंदूंला आपले विचार घेऊन, आपले विचारस्वातंत्र्य टिकवून संघात प्रवेश मिळू शकेल काय? संघशाखेवर जाऊन तो वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था इ. बाबींवर विचारमंथन घडवून आणू शकेल काय? संघात जाऊन म. फुले, डॉ. आंबेडकर, राजा राममोहन रॉय इत्यादींच्या कार्याचे त्याला खरेखुरे विवेचन करता येईल काय? या सर्व प्रश्नांचे उत्तर ‘नाही’ असेच आहे.

ज्याला संघात प्रवेश हवा असेल त्याने आपले विचार सोडून संघाच्या इतर स्वयंसेवकांसारखेच विचार बाळगावेत, असा याचा अर्थ होतो. एखादा शिकारी सशाला मारून खातो, तेव्हा त्या सशाला शिकाऱ्याच्या अंगात प्रवेश मिळतो. आणि त्या सशाचे व शिकाऱ्याचे ऐक्यही प्रस्थापित होते. संघामध्ये जाणाऱ्या हिंदूंनी या सशाप्रमाणे वैचारिक स्वत्व गमावल्यानंतरच त्यांना संघात प्रवेश मिळू शकेल. या सर्व विवेचनाचा अर्थ असा, की एखादा मनुष्य वैचारिक स्वत्व न गमावताही हिंदू असू शकतो. पंरतु त्याला हे स्वत्व गमावल्याखेरीज संघस्वयंसेवक मात्र होता येत नाही. संघधर्म व हिंदू धर्म हे दोन भिन्न धर्म असल्यामुळेच असे घडते.

रा.स्व.संघ जर हिंदूंची संघटना असती, तर सर्व प्रकारची विचारसरणी बाळगणाऱ्या हिंदूंना त्यामध्ये प्रवेश मिळावयास हवा होता. हा प्रवेश मिळत असतानाच आपले स्वतंत्र आचारविचार सन्मानपूर्वक टिकवले जातील, याची त्यांना हमी मिळावयास हवी होती. परंतु असे होत नाही. विशिष्ट विचारांच्या हिंदूंनाच संघात प्रवेश मिळतो. याचा अर्थच असा, की हे हिंदू एक नवा धर्मच स्वीकारतात. विशिष्ट विचारांच्या यहुदी लोकांना ख्रिश्चन म्हटले जाऊ लागले, विशिष्ट विचारांच्या हिंदूंना बौद्ध म्हटले जाऊ लागले, तसेच विशिष्ट विचारांच्या हिंदूंना संघाचे अनुयायी म्हटले जात आहे. आणि म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते की, संघात मुसलमान व ख्रिश्चन यांना प्रवेश मिळेल काय हे विचारण्यापूर्वी संघात हिंदूंना प्रवेश मिळेत काय, या प्रश्नांचे काही समाधानकारक उत्तर मिळते का, ते पाहावे.

अज्ञानातून नाही

संघाविषयीचे माझे हे विचार संघाबद्दलच्या अज्ञानातून मांडले आहेत, असा आक्षेप कुणी घेण्याची शक्यता आहे. परंतु ही वस्तुस्थिती नाही. मी विद्यार्थी असताना एक-एक महिन्याचे दोन संघशिक्षावर्ग (ओ.टी.सी.कँप) पुणे येथे केले आहेत. त्यावेळी संघाच्या आकर्षणाने माझे मन बरेच झपाटलेले होते. त्यामुळे पहिल्या वर्गाला जाण्यासाठी घरातून परवानगी न मिळाल्यामुळे मी कंबरेचा चांदीचा कडदोरा विकून त्या वर्गाला गेलो होतो. नंतरही अनेक छोट्या-मोठ्या शिबिरांना उपस्थित होतो. संघाविषयीची शेकडो बौद्धिके तल्लीनतेने व आत्मीयतेने ऐकली आहेत. गोळवलकर गुरुजींच्या अनेक बैठकींना हजर राहिलो आहे. संघशाखांचा शिक्षक म्हणून काम केले आहे. नव्या शाखा सुरू केल्या आहेत. आणि एकेकाळच्या माझ्या नेमक्या मनःस्थितीचे वर्णन करावयाचे, तर मी जागेपणी आणि झोपेतही संघाच्या विस्ताराची स्वप्ने पाहिलेली आहेत.

ही सगळी वैयक्तिक माहिती एवढ्यासाठीच दिली आहे, की संघाच्या उद्दिष्टांची व कार्यपद्धतीची माहिती नसताना दुष्टाव्याने वा ऐकीव माहितीच्या आधारे मी संघाविषयी काही लिहीत आहे, असे कोणाला वाटू नये. खरे तर हिंदुत्वाचे व हिंदूंच्या ऐक्याची भाषा करणाऱ्या संघटनांचे ‘खरे स्वरूप’ समजण्यास संघाची मला मदत झाली म्हणून मी संघाचा ‘ऋणी’च आहे.

इ-मेल:amrutsalunkhe9@gmail.com
पूर्वप्रसिद्धी : लोकमुद्रा
येथे ‘फॅसिस्ट’ प्रवृत्तींच्या काही विशेषांची चर्चा करण्याचा मला मोह होतो. ‘फॅसिस्ट’ प्रवृत्तीची व्यक्ती स्वतःवर नेहमी खूश असते. आणि आजूबाजूला खूशमस्करे ठेवण्याची खबरदारी ती घेत असते. ज्या इंग्रजीमध्ये ‘सॅडो-मॅसोचस्टिक’ व्यक्तिमत्त्व म्हटले जाते. अशा व्यक्तिमत्त्वाचा ‘फॅसिस्ट’ हा सदैव अधिकाराच्या शोधात असतो. अधिकार आणि सत्ताधीश यांच्याशी संबंध जुळविणे आणि जुळवून घेणे हे ‘फॅसिस्ट’ व्यक्तीचे वैशिष्ट्य. किंबहुना एरिक फ्रॉम यांनी म्हटल्याप्रमाणे‘He admires authority and tends to submit to it, but at the same time wants to be an authority himself and have others to submit to him.’ (अधिकाराचे त्याला आकर्षण असते आणि सत्तेपुढे नमणे हा त्याचा स्वभाव असतो. पण त्याचबरोबर स्वतःसाठी सत्ताप्राप्ती करून इतरांनी आपल्यापुढे नमावे ही त्याची इच्छा असते.)
– अरुण टिकेकर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.