‘द नेकेड ॲण्ड द न्यूड’

[बघण्याच्या पद्धती  (Ways of Seeing) हे पुस्तक जॉन बर्गर ह्यांच्या बी.बी.सी. टेलिव्हिजन सीरीजवर आधारलेले आहे. 1972 मध्ये प्रसिद्ध झालेल्या ह्या पुस्तकाने पाश्चात्त्य कलाकृतींकडे बघण्याची नवी दृष्टी दिली. पाच लेखकांनी मिळून हे पुस्तक ‘घडवले’ आहे. ‘बघणे बोलण्याच्या आधी येते. बोलायच्या आधी मूल बघायला आणि ओळखायला शिकते’ ह्या वाक्यापासून सुरुवात झालेले हे पुस्तक आपले बघणे हे आपल्या श्रद्धा, ज्ञान आणि परंपरा ह्यांनी कसे संस्कारित झालेले असते हे युरोपिअन तैलचित्रांच्या माध्यमातून तपासते. पुस्तकातील सात निबंधांमधून लेखक वाचकाच्या मनात प्रश्न जागे करू इच्छितात. काही निबंध शब्द आणि प्रतिमा ह्यांचा वापर करतात तर काही निबंध फक्त प्रतिमांच्या माध्यमातून आपले म्हणणे मांडतात. ह्यातील एका निबंधाच्या लिखित भागाचा हा सारांश आहे. लेखात वापरलेल्या सर्व प्रतिमा पुनर्मुद्रित वा भाषांतरित करता न आल्याने लेखाचे भाषांतर त्रोटक वाटेल पण ह्यात व्यक्त केलेले विचार आपल्या समाजालाही लागू पडतात हे आपले सिनेमे, जाहिराती, वर्तमानपत्रातील बातम्या ह्यांवरून सहज लक्षात येईल. ]

समाजातील रीतिरिवाज आणि पद्धती ह्यांमुळे स्त्रीचे समाजातील असणे, दिसणे —तिचे रूप (presence) ह्याची जातकुळी पुरुषापेक्षा वेगळी असते. पुरुषाचे रूप हे त्याच्या व्यक्तिमत्त्वातून प्रगट होणाऱ्या सामर्थ्यावर अवलंबून असते. हे सामर्थ्य नैतिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, लैंगिक – कोणत्याही प्रकारचे असेल, पण त्याचा प्रभाव नेहेमी इतरांच्या संदर्भात जोखला जातो. एखादा पुरुष तुमच्याकरता काय करू शकतो किंवा तुमचे काय करू शकतो ह्यावर त्याचे समाजातील रूप ठरते. इतरांवर परिणाम करण्याची त्याची क्षमता त्याची लायकी ठरवते.

ह्याउलट स्त्रीचे रूप हे तिच्या स्वतःकडे बघण्याच्या वृत्तीवर ठरते. तिच्याशी कसे वागायचे किंवा वागायचे नाही हे ह्या वृत्तीवर ठरते. तिच्या हालचाली, आवाज, भावमुद्रा, कपडे, अभिरुचि, मते ह्या सर्वांमधून तिचे रूप प्रकट होते. स्त्रीचे रूप हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा इतका अंगभूत भाग आहे की पुरुषांना ते तिचे शारीरिक लक्षण वाटते—, शरीराचा गंध किंवा उष्णता ह्यासारखे.

आजपर्यंत स्त्री म्हणून जन्माला येणे म्हणजे पुरुषांच्या ताब्यात असलेल्या अवकाशाच्या एका मर्यादित, बंदिस्त तुकड्यामध्ये जगणे !  पुरुषाच्या राखणदारीतील ह्या मर्यादित अवकाशात जगण्याकरता जी कौशल्ये स्त्रीने आत्मसात केली त्यांनी तिचे समाजातील रूप घडत गेले. पण त्यामुळे तिचे स्वत्व जणू दुभंगून गेले. स्त्रीला सतत स्वतःवर पहारा ठेवावा लागतो. स्वतःची जी प्रतिमा तिने घडवली आहे ती सतत जवळ बाळगून तिच्यावर नजर ठेवावी लागते. खोलीतून इकडून तिकडे जाताना किंवा मरण पावलेल्या वडिलांपाशी बसून रडताना सुद्धा ती सावधपणे स्वतःला न्याहाळत असते. अगदी लहानपणापासून हे तिला शिकवले गेले आहे.

अशा तऱ्हेने स्त्री म्हणून तिची ओळख दोन वेगवेगळ्या पण मूलभूत घटकांमध्ये विभागली गेल्याची जाणीव तिला सुरुवातीपासून असते—. बघणारी (surveyor) आणि जिच्याकडे बघितले जाते (surveyed) अशी.

ती काय आहे, काय करते, कशी दिसते—, पुरुषांना कशी दिसते ह्यावर सतत लक्ष ठेवणे हे तिच्या आयुष्यातील तथाकथित यशाकरता महत्त्वाचे आहे. तिच्या स्वत्वापेक्षा हे इतरांनी केलेले कौतुक महत्त्वाचे ठरते. पुरुषाची स्त्रीबरोबरची वागणूक ही ती त्याला कशी दिसते ह्यावर अवलंबून असते. आपल्याला कसे वागवले जावे ह्या प्रक्रियेवर थोडा ताबा मिळविण्यासाठी स्त्रीला बघणाऱ्याची मानसिकता लक्षात घ्यावी लागते, आणि त्याप्रमाणे आपले वागणे घडवावे लागते. तिच्यात असलेला ‘बघणारा’ घटक तिच्यात असलेल्या ‘बघितल्या जाणाऱ्या’ घटकाला ज्या तऱ्हेने वागवतो त्या तऱ्हेने इतरांनी तिच्याशी वागावे अशी तिची अपेक्षा असते. तिची प्रत्येक कृती तिला कसे वागवून हवे आहे ह्याची खूण असते. तिचे रूप (presence) ह्या वागण्या/वागवण्यात सामावलेले आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर पुरुष कृती करतात (act) आणि स्त्रिया दिसतात (appear). पुरुष स्त्रियांकडे बघतात, स्त्रिया हे बघितले जाणे बघतात. ह्यामुळे केवळ स्त्री-पुरुषांचेच नाते निश्चित होते असे नाही तर स्त्रीचे स्वतःशीच असलेले नातेही निश्चित होते. स्त्रीमधला तिला पाहणारा निरीक्षक हा पुरुष असतो आणि जी पहिली जाते ती स्त्री असते. अशा तऱ्हेने ती स्वतःचे रूपांतर एका वस्तूत करते— अशी वस्तू जी न्याहाळली जाते, जी एक दृश्य (sight) आहे.

युरोपिअन तैलचित्रांच्या एका प्रकारात स्त्री पुन्हा पुन्हा रंगवली गेली आहे. त्या प्रकाराला म्हणतात न्यूड. (न्यूड (nude) म्हणजे नग्नव्यक्ती— पण ह्या चित्रप्रकारात न्यूड म्हणजे प्रामुख्याने नग्न स्त्री) स्त्रीकडे प्रेक्षणीय दृश्य म्हणून बघण्याचे काही निकष आणि परंपरा ह्या युरोपिअन चित्रप्रकारात पहायला मिळतात.

सुरुवातीच्या रंगचित्रांमधल्या न्यूड व्यक्ती अॅडम आणि ईव्ह होत्या. बायबलमधल्या ज्ञानवृक्षाचे फळ चाखण्याच्या घटनेवर आधारलेली ही चित्रे होती. फळ चाखल्यामुळे स्वतःच्या विवस्त्रतेची (nakedness) जाणीव झालेली ती दोघे देवासमोर यायला लाजतात. देवाची आज्ञा मोडल्यामुळे देव त्या दोघांची स्वर्गातून हकालपट्टी करतो पण ह्या आज्ञाभंगाची विशेष जबाबदारी ईव्हवर टाकून देव तिला अॅडमच्या आधिपत्याखाली राहण्याची शिक्षा देतो. अशा तऱ्हेने स्त्रीच्या संबंधात पुरुष देवाचा प्रतिनिधी (agent) बनतो.

सुरुवातीच्या काळातील रंगचित्रांमध्ये विवस्त्रतेची वाटणारी लाज चित्रातील आकृतींच्या उभे राहण्यातून, भावमुद्रांमधून व्यक्त होत असे. आपली विवस्त्रता पाहणारा तिसरा कुणीतरी आहे ह्या जाणीवेतून ही लज्जा निर्माण होत असे.

एकेकाळची लज्जास्पद विवस्त्रता नंतरच्या काळात हळूहळू कमी होत गेली. आधुनिक काळात तर विवस्त्रता ही प्रदर्शनाची वस्तू बनली आहे हे अंतर्वस्त्रांच्या जाहिरातींवरून लक्षात येते.

हळूहळू हा धार्मिक विषय मागे पडून न्यूड रंगवण्यासाठी इतर विषय हाताळले जाऊ लागले. पण नंतरच्या ह्या चित्रांमध्ये एक गोष्ट अध्याहृत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. चित्रविषय असलेल्या स्त्रीला आपण पाहणाऱ्याच्या नजरेचा विषय आहोत ह्याची पूर्ण जाणीव आहे. ती नुसतीच विवस्त्र नाही — तिची विवस्त्रता बघणाऱ्याच्या नजरेत आहे.

अनेक चित्रांचा खरा विषय हाच आहे. 16व्या शतकातील टिन्टोरेटो ह्या प्रसिद्ध चित्रकाराने काढलेली ‘सुझाना अॅण्ड द एल्डर्स’ ह्याच शीर्षकाची दोन वेगळी चित्रे ह्याची साक्ष देतील. स्नान करून बाहेर आलेल्या सुझानाकडे चोरून पाहणारे (Voyeurists) पुरुष हा ह्या चित्रांचा विषय आहे. एका चित्रात ती वळून आपल्याकडे (पाहणाऱ्यांकडे) पाहते आहे आणि दुसऱ्या चित्रात ती आरशात स्वतःकडे पाहते आहे, तिच्याकडे पाहत असलेल्या पुरुषांच्या नजरेने स्वतःला न्याहाळत आहे.

आरसा हे खूपदा स्त्रीच्या दिखाऊपणाचे (Vanity) प्रतीक समजले गेले आहे, पण ह्या (आणि इतर) चित्रांमध्ये आरसा हा तिचा कामातला मदतनीस आहे, आणि काम आहे स्वतःला पाहण्याची वस्तू (sight) बनवण्यात पुरुषांना सामील होणे.

अनेक प्रसिद्ध चित्रकारांनी प्रबोधनकाळात पॅरिसचा निवाडा (Judgement of Paris) ह्या घटनेवर रंगविलेली चित्रे हाच विषय पुढे नेतात. व्हीनस, मिनर्व्हा, आणि ज्युनो ह्या तीन देवतांमध्ये सर्वांत सुंदर कोण ह्याची परीक्षा करणारा पॅरिस हा स्त्रीसौंदर्याची पारख करणारा तज्ज्ञ आहे. सौंदर्य आता स्पर्धेचा विषय झाले आहे. सध्याच्या सौंदर्यस्पर्धांचे मूळ तिथे आहे. सर्वांत सुंदर स्त्रीला बक्षीस मिळते.

हे ‘बक्षीस’ बऱ्याचदा परीक्षकाच्या मालकीचे असते किंवा त्याला उपलब्ध होऊ शकते. 17व्या शतकातला इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स ह्याने नेल ग्विन ह्या आपल्या प्रेयसीचे चित्र लेली ह्या चित्रकाराकडून काढून घेतले. ‘व्हीनस आणि क्युपिड’ ह्या नावाच्या चित्रातील नेल ग्विन आपल्या विवस्त्र शरीराकडे पाहाणाऱ्या प्रेक्षकांकडे निर्वि-कारपणे (passively) बघते आहे. तिची विवस्त्रता ही तिच्या इच्छेची अभिव्यक्ती नाही, तिच्या मालकाच्या मागणीचा आणि इच्छेचा तिने निमूटपणे केलेला स्वीकार आहे. (चित्र क्र.1 – मागील पानावर)

पण विवस्त्रतेचा असा आविष्कार इतर परंपरांमधल्या कलाकृतींमध्ये दिसत नाही हे लक्षात घेणे जरुरीचे आहे. भारतीय, पर्शियन, आफ्रिकन कलापरंपरांमध्ये विवस्त्रता अशा सुस्त निर्विकारपणे व्यक्त होत नाही. लैंगिक आकर्षणाची अभिव्यक्ति करणाऱ्या कलाकृतींमध्ये स्त्री ही पुरुषाइतकीच उत्सुक आणि कृतिशील दाखविली आहे. (भारतातील खजुराहो मधील शिल्पे ह्याची साक्ष देतील)

युरोपिअन परंपरेत नग्नता (nudity) आणि विवस्त्रता (nakedness) ह्यांत फरक केला गेला. केनेथ क्लार्क आपल्या द न्यूड (The Nude) ह्या पुस्तकात म्हणतात, ‘विवस्त्र असणे म्हणजे फक्त वस्त्रविहीन असणे पण न्यूड हा एक कलाप्रकार आहे.’ त्यांच्या मते न्यूड हे ह्या कलाप्रकाराचे वैशिष्ट्य नाही तर ज्या पद्धतीने त्या चित्राकडे पाहायला प्रेक्षकाला उद्युक्त केले जाते ते त्या चित्रप्रकाराचे वैशिष्ट्य आहे. खरे तर ‘न्यूड’ कडे बघण्याची ही दृष्टी सर्वत्र आढळते, पण कलेच्या क्षेत्रात न्यूड सादर करण्याचे काही संकेत ठरले आहेत आणि ते कलेच्या काही परपरांच्या आधारावर उभे आहेत. तरीही केवळ कलाप्रकाराचा आविष्कार म्हणून न्यूडचा विचार करणे पुरेसे होणार नाही कारण न्यूड लैंगिकतेच्या अनुभवाशीही जोडला गेलेला कलाप्रकार आहे.

विवस्त्र असणे ही व्यक्तीच्या स्वत्वाची निखळ अभिव्यक्ति आहे.

न्यूड असणे म्हणजे विवस्त्र शरीराचे इतरांसाठी प्रदर्शन करणे पण व्यक्ती म्हणून कोणतीही ओळख नसणे. विवस्त्र व्यक्तीचा विचार वस्तू (object) म्हणून केल्यावर ती न्यूड होते. वस्तू म्हणून न्यूड कडे पाहणे वस्तू म्हणून तिचा वापर करायला उद्युक्त करते. विवस्त्रता प्रगट होते, नग्नता (nudity) प्रदर्शनासाठी मांडलेली असते. विवस्त्रता म्हणजे कुठलाही आडपडदा नसावा म्हणून केलेला आविष्कार असतो पण न्यूडमध्ये नग्नताच वस्त्रासारखी पांघरलेली असते (ज्यात न्यूडचे व्यक्तिविशेष पूर्णपणे झाकलेले असतात.)

सर्वसाधारण युरोपिअन तैलचित्रांमध्ये नायक रंगवलेला नसतो. खरा नायक म्हणजे चित्राबाहेर उभे राहून चित्राचा आस्वाद घेणारा प्रेक्षक असतो. तो पुरुष असतो आणि ते चित्र त्याच्याकरता काढलेले असते. चित्रातील न्यूडची नग्नता त्या अनोळखी प्रेक्षकाच्या लैंगिकतेला आवाहन करण्यासाठी चित्रित केलेली असते—. तिच्या लैंगिक भावनांना महत्त्व नाही.

पण युरोपिअन परंपरेतील काही न्यूड्सची चित्रे ह्याला अपवाद आहेत. विवस्त्र प्रेयसींची ती चित्रे आहेत, न्यूड्सची नाहीत. त्या स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा चित्रकारावरचा प्रभाव एवढा मोठा आहे की परक्या प्रेक्षकाला तिथे प्रवेश नाही. तिची विवस्त्रता ही त्या अनोळखी प्रेक्षकासाठी नाही. तिचा चेहेरा, शरीर, एकंदर अविर्भाव (stance) तिच्या इच्छा, हेतू झाकू शकत नाहीत. रेम्ब्रॉने रंगवलेली ‘दानी'(Danae) किंवा रूबेन्सने रंगवलेले त्याच्या दुसऱ्या पत्नीचे चित्र ह्यामध्ये आदर्श स्त्रीशरीराचे सर्व संकेत मोडलेले दिसतात —जे पारंपारिक न्यूडमध्ये होणार नाही. ही चित्रे प्रियकराने रंगवलेली आहेत, न्यूडकडे भोग्यवस्तू म्हणून पाहणाऱ्या चित्रकाराने काढलेली नाहीत.

‘युरोपिअन न्यूड’ ह्या कलाप्रकारात चित्रकार आणि चित्रांचे मालक-प्रेक्षक हे नेहमीच पुरुष होते, आणि चित्रविषय असलेल्या आणि वस्तू म्हणून वापरल्या गेलेल्या व्यक्ति स्त्रिया होत्या. हा विषम नातेसंबंध युरोपिअन संस्कृतीमध्ये इतका भिनला आहे की अजूनही बऱ्याच स्त्रियांच्या विचारांवर, वागण्यावर त्याचा पगडा आहे. पुरुषांच्या बरोबरीने स्वतःच्या स्त्रीत्वाचे त्या निरीक्षण करत असतात.

आधुनिक कलेच्या क्षेत्रात ‘न्यूड’ ह्या कलाप्रकाराचे महत्त्व ओसरले आहे. माने (Manet) सारख्या कलावंतांना त्यातली विषमता जाणवली. त्याने रंगवलेल्या ‘ऑलिम्पिया’ मधली न्यूड पारंपारिक ‘पोज’ मध्ये पहुडलेली आहे, पण तिच्या चेहेऱ्यावरचे भाव परंपरेला आव्हान देणारे आहेत.

ज्या वृत्तींनी आणि मूल्यांनी ही परंपरा बळकट केली त्यांचे कलेच्या क्षेत्रातील महत्त्व कमी झाले असले तरी जाहिरात, पत्रकारिता, टेलिव्हिजन ह्या क्षेत्रांमध्ये ती फोफावत आहे.

मूळ लेखक : जॉन बर्गर

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.