खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?(भाग १)

साधना साप्ताहिकाच्या २८ मे १९९४ च्या अंकामध्ये श्रीमती शांता बुद्धिसागर ह्यांचा ‘खरी स्त्रीमुक्ति कोठे आहे?’ हा लेख प्रकाशित झाला आहे. त्यांनी ‘चारचौघी‘ ह्या नाटकाची सविस्तर चर्चा करून शेवटी आपले मत व्यक्त केले आहे. त्यात त्या म्हणतात की, “काही मूल्ये—विचार हे शाश्वत स्वरूपाचे असतात. सध्या आपण अशा तर्‍हेची विचारधारा तरुणांच्या पुढे ठेवीत आहोत की स्त्रीपुरुष कोणत्याही जातिधर्माचे असोत, सुखी कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने एका वेळी एकाच स्त्री-पुरुषाचे सहजीवन होणे हीच आदर्श कुटुंबरचना असली पाहिजे. परंतु केवळ पुरुष जे जे करतो ते ते स्त्रीलाही करता आले पाहिजे ह्या एकाच विचाराच्या आहारी गेल्यामुळे येथे सर्वच प्रश्नांकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहिले गेले आहे व ते सुद्धा एकांगी आणि आत्मकेन्द्रित दृष्टिकोणातून. आपल्या प्रत्येक कृतीचा आपल्याप्रमाणेच सर्व संबंधितांच्या हिताच्या दृष्टीने विचार करणे अगत्याचे असते. पुरुष जे स्वातंत्र्य घेतो व स्त्रीवर अन्याय करतो तशा तर्‍हेचे स्वातंत्र्य घेऊन स्त्रीनेही पुरुषांची बरोबरी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्त्रीमुक्ति नव्हे. उलट केवळ बालिश रोमँटिक विचार समाजापुढे मांडल्यामुळे स्त्रीमुक्तीसंबंधी गैरसमज होतील.”

मला वाटते, स्त्रीमुक्तीसारख्या काही शाश्वत मूल्यांविषयी सैद्धान्तिक चर्चा करताना आपण काही पथ्ये पाळली पाहिजेत. शाश्वत मूल्यांविषयीचा विचार स्थलकालनिरपेक्ष असा असावयाला हवा. मी स्त्रीमुक्तीच्या प्रतिकूल किंवा क्वचित् तिच्या अनुकूल असे जे काय लिहिलेले वाचतो त्यामध्ये बहुधा मला हाच विचारदोष दिसतो. त्यामध्ये सद्यःस्थलकालाचा संदर्भ सोडावयाला कोणीही लेखक तयार नाहीत. आणखी असे लक्षात येते की पुरुष तर आपले वरिष्ठ स्थान, नव्हे वर्चस्व, गमावण्याच्या भीतीने घाबरे झाले आहेतच, पण स्त्रिया आता पुरुषांच्या लैंगिक शुद्धतेचा आग्रह धरूलागल्या आहेत आणि पुरुषांनी घरकामामध्ये हातभार लावला की त्यांचे समाधान होणार आहे. मध्यमवर्गीय नोकरदार स्त्रियांची रांधा वाढा आणि उष्टी काढा ह्यामधून सुटका कशी होईल ही काय शाश्वत मूल्यांविषयी चर्चा आहे?

श्रीमती शांता बुद्धिसागर ह्यांनी चारचौघी’ ह्या नाटकाचे निमित्त करून आपला मध्यमवर्गीय आर्यस्त्रीचा सनातन दृष्टिकोणच प्रकट केला आहे असे मला जाणवते. ह्या विषयाची जर खरोखरच स्थलकालनिरपेक्ष चर्चा करावयाची असेल तर वास्तव परिस्थितीला- इतिहासातल्या आणि वर्तमानातल्याही – आपणाला धीटपणे सामोरे जावयाला पाहिजे.

इतिहासामध्ये असा कोणता दीर्घ कालखंड होता की ज्यावेळी विवाहसंस्था ही अत्यन्त बलिष्ठ होती व सर्व स्त्रीपुरुष (अर्थात् जगभरातल्या सगळ्या जातीजमातींमधले) एकमेकांशी एकनिष्ठ होते व त्यांचे समाजामधील गुणोत्तर हे एकास एक असेच होते?किंवा भलत्याशीच लग्ने झाल्यामुळे स्त्रीपुरुष एकमेकांसाठी झुरत नव्हते किंवा देवानेच आपल्या गाठी घालून दिल्या आहेत आणि देव चूक करू शकत नाही त्याअर्थी एकमेकांच्या स्वभावाचा त्रास न मानता, आदळआपट न करता सगळी जोडपी सगळी ह्यात आनंदात कालक्रमणा करीत होती? असा आवादोआबाद काळ किंवा प्रदेश कधी व कोठे असलाच तर तेथे विवाहबंधन नसेल किंवा ते असलेच तर अत्यन्त शिथिल असेल. विवाहबंधन आणि सुख — त्यातल्या त्यात स्त्रियांचे सुख – ही एकत्र नांदलेली मला कोठे आढळली नाहीत. इतकेच नव्हे तर विवाहित स्त्रीपुरुषांमध्ये एकास एक असे प्रमाण असले तरच विवाह सुखद होतात असा पुरावा मला दिसला नाही.

विवाह हा दोनही पक्षी एकमेकांवर हक्क निर्माण करणारा संस्कार हिंदु धर्मात मानला जातो. त्या संस्कारामुळे पुष्कळदा ज्यांचे एकदुसर्‍यांशी पटत नाही, पटू शकत नाही, पटू शकणार नाही अशांची सांगड घातली जाते व त्यांचे सहजीवन सुखी होऊ शकत नाही. म्हणजे सुखी कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने एका वेळी एकाच स्त्रीपुरुषांचे सहजीवन हेच आदर्श आहे असा निष्कर्ष काढता येत नाही असे मला वाटते. ज्या कुटुंबांत कोठल्याही कारणामुळे का होईना बहुपतिकत्व वा बहुपत्नीकत्व आहे ती एकजात सगळी कुटुंबे अतिशय दुःखी असती तर हा निष्कर्ष काढता आला असता. तसे मला आढळत नाही. मुस्लिम देशांमध्ये, आफ्रिकेमध्ये, चीनमध्ये, किंवा आधुनिक ख्रिस्ती लोकांचा अपवाद सोडल्यास बाकी सर्वच प्रदेशांमध्ये – त्यात भारतीयसुद्धा आले- बहुपत्नीकत्वाचा निषेध नाही. अनादिकाळापासून नाही, ज्ञात इतिहासात कधीही नाही.

आफ्रिकेसारख्या खंडात बहुपत्नीकत्वाची चाल बर्‍याच जमातींमध्ये आहे. ती थोडी विस्ताराने येथे वर्णन करतो. तेथे जवळजवळ प्रत्येक पुरुषाला एकापेक्षा अधिक स्त्रिया असतात. पण म्हणून तेथे स्त्रियांची संख्या पुरुषांच्या दुप्पटतिप्पट नसते. (काही प्रदेशात ती सव्वापट आहे अशी अनधिकृत माहिती मला मिळाली आहे.) तेथे तरुण पुरुषांचे लग्न उशीरा होत असते. मुलींचे लवकर होत असते आणि ते बहुधा प्रौढ पुरुषाशी होते. एक प्रौढ पुरुष आणि त्याच्या निरनिराळ्या वयांच्या चारपाच स्त्रिया असे कुटुंब असते. प्रत्येकबायकोची झोपडी वेगळी असते व अशा चारपाच झोपड्यांचा समूह असतो. तो नवरा मेल्यानंतर त्या स्त्रिया त्या कुटुंबातील तरुणांकडे वारसाहक्काने जातात. हे तरुण पुरुष त्या स्त्रियांचे नात्याने दीर, पुतण्ये किंवा सावत्र मुलगे असतात. मुलांची लग्ने पुष्कळ उशीरा होत असली तरी तेथले अविवाहित तरुण पुरुष स्त्रीसहवासापासून वंचित नसतात. समजा एखाद्या तरुण स्त्रीचा विवाह वृद्धाशी झाला. (ही अगदी स्वाभाविक आणि नेहमी घडणारी गोष्ट आहे.) त्यावेळी तिला दोनतीन मोठ्या सवती असतात. त्यांची वयाने तिच्यापेक्षा मोठी किंवा तिच्या बरोबरीची मुले असतात. नवर्‍याच्या मृत्यूनंतर ती त्यांच्यापैकी कोणा एकाची बायको होणार असते. ती भविष्यात ज्याची बायको होऊ शकते त्याच्याशी, म्हणजे त्यांच्यापैकी कोणा एकाशीच नव्हे, तर प्रसंगवशात् कधी कोणाशी तर कधी आणखी कोणशी तिने तिचा पति हयात असतानाच समागम केला तर तिला व्यभिचारिणी ठरविले जात नाही. उलट तिचा अशा पुरुषांशी होणारा समागम ही सर्वसामान्य किंवा स्वाभाविक घटना मानली जाते. त्याचप्रमाणे त्या पुरुषांनाही बेबंद किंवा स्वैराचारी मानले जात नाही. पाहुणा म्हणून आपल्या झोपडीत रात्र घालविणार्‍या पुरुषाशी गृहिणीने एकशय्या करण्यामध्ये कोणालाच काही वावगे वाटत नाही. ना स्वतः त्या स्त्रीला, त्या पुरुषाला किंवा तिच्या नातेवाइकांना. युरोपीय प्रवाशांनी ह्या चालीला ‘अतिथिसत्कार’ वगैरे नावे दिली आहेत. पण मला स्वतःला त्यात सत्कारभावना आहे असे वाटत नाही. ब्रह्मचर्य आणि पातिव्रत्य ह्यांचे महत्त्व त्या समाजामध्ये नाही. तेथल्या स्त्रीपुरुषांच्या मनोविश्वात ह्या गुणांना स्थान नाही असा वरील चालीचा अर्थ मी करतो. बरे ही चाल नवीन नाही. हजारो वर्षांपासून चालत आली आहे. आता युरोपीय वा पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे म्हणजे मिशनच्यांच्या शिकवणुकीमुळे तेथल्या स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर बंधने पडत आहेत. पापपुण्याच्या कल्पना त्या शिकत आहेत. त्यांच्या ‘नीति’कल्पनांमध्ये फरक पडू पाहत आहेत. पाप-पुण्याच्या कल्पना नसलेल्या आफ्रिकेमधल्या स्त्रिया माझ्या मते खर्‍याच अर्थाने मुक्त आहेत. कारण तेथे त्यांच्याकडे कोणी बोटे दाखवीत नाहीत. त्यांच्या वाट्याला वैधव्य व तज्जन्य दुःखे नाहीत. त्याचे पाऊल कधी वाकडे पडत नाही. त्यांच्या चारित्र्यावर कोणी शिंतोडे उडवू शकत नाही. तेथे सर्व स्त्रियांचा दर्जा समान आहे. अनेकपत्नीकत्वामुळे त्या स्त्रिया दुःखी नाहीत. त्यांना त्यांच्या झोपडीत पूर्ण स्वातंत्र्य आहे. (हा एक विवाहप्रकार आहे. तो फक्त आफ्रिकेतच नव्हे तर आपल्या भारतातल्या काही प्रदेशातसुद्धा आहे.)

बहुपत्नीकत्वाचा दुसरा प्रकार : हा मुख्यतः अरब मुस्लिम समाजांमध्ये आढळतो. येथे पातिव्रत्याच्या कल्पना स्पष्ट आहेत. ह्या भागात बहुपत्नीकत्व ही समाजमान्य प्रथा असली तरी सर्व पुरुष बहुपत्नीक नाहीत. एकपत्नीक किंवा बहुपत्नीक विवाहामुळे पुरुषांच्या दर्जात फरक पडत नाही, तर जितक्या स्त्रिया विवाहयोग्य वयाच्या आहेत त्या सगळ्या विवाहित आहेत. कोणी बेवा (विधवा) किंवा तलाकशुदा (घटस्फोटिता) असेल तर इद्दतचा कालावधी संपल्यावर ती पुनर्विवाह करते. अशा स्त्रीचे कुटुंबातील किंवा समाजातील स्थान ती पहिली किंवा दुसरी पत्नी असल्यामुळे बदलत नाही. सर्वच स्त्रियांचे स्वातंत्र्य सीमित आहे. अशा समाजात काही अरब भारतात येऊन लग्ने करून येथल्यामुलींना तिकडे घेऊन जात आहेत. अशा स्त्रियांचे जिणे गुलामांसारखे असते ह्यात संशय नाही. पण ही गुलामगिरी त्यांच्या बहुपत्नीकत्वामुळे येत नसून वंशभिन्नत्वामुळे येथल्या मुलींच्या वाट्याला येते. अरबांच्या स्वतःच्या वंशामधील स्त्रियांच्या परिस्थितीत त्यांची कुटुंबे एकपत्नीक असोत की बहुपत्नीक, फारसा फरक पडत नसावा, विधवांना निराधार किंवा एकाकी जीवन घालवावे लागू नये. समाजामध्ये जितक्या स्त्रिया असतील तितक्यांना विवाहितेचे आयुष्य घालवावयाला मिळावे असा त्या समाजाचा प्रयत्न दिसतो. पण हा आदर्श, आदर्शाच्या ठिकाणी म्हणजे दूर कोठेतरी राहून तेथे उत्तानपाद राजाच्या गोष्टीसारखी एक आवडती व एक नावडती अशी गोष्ट घडत नसेल असे नाही. पण जेथे एकीपेक्षा अधिक स्त्रिया सुखासमाधानाने नांदतात अशी घरेही तेथे असणारच.
भारतामध्ये एक पतिपत्नीकत्वाचा कायदा झालेला असला तरी प्रत्यक्षात क्वचित् बहुपतिकत्व व बहुपत्नीकत्व प्रचलित आहेच. ह्या चाली कायद्याला मान्य नसल्या तरी काही प्रदेशात किंवा जातीजमातींत लोकमान्य आहेत, किंवा प्रकटपणे लग्नाचे एक जोडपे असले तरी त्यांच्याकडून कडक परस्परनिष्ठेची अपेक्षा केली जात नाही. वयात आलेल्या धाकट्या दिराचे लग्न होईपर्यंत त्याच्याशी त्याच्या भावजयीने एकशय्या करावी ही चाल कित्येक जमातींमध्ये आहे. अशा जमातींमध्ये वैधव्यानंतर भावजयीने दिराशी विवाह करावा अशी बहुधा अपेक्षा असते. त्यांपैकी कित्येक जमातींत अशा विवाहासाठी कोणत्याही विधीची गरज नसते. त्यामुळे दोघी जावा पुढेमागे सवती होणार हे गृहीतच धरलेले असते. जेथे त्यासाठी सगळ्यांचेच मन तयार झालेले आहे तेथे सवती अगदी गुण्यागोविंदाने बहिणीसारख्या राहतात; किंवा बहिणीला सवत करून घेणे त्यांना इष्ट वाटते. असाच प्रकार जेथे बहुपतिकत्व प्रचलित आहे तेथेसुद्धा आहे. बहुपतिकत्वाची चाल असलेल्या प्रदेशात सर्व स्त्रिया बहुपतिक नाहीत. पण बहुपतिकत्वामुळे त्यांच्या सामाजिक दर्जात फरक पडत नाही. तेथे पुरुषांकडून एकपत्नीव्रताची वा निष्ठेची अपेक्षा नाही. बायकांकडून तर नाहीच नाही. अशांची कुटुंबे दुःखी नसतात असे नाही. पण त्यांच्या दुःखाचे कारण परस्परांवरील निष्ठेचा अभाव हे नाही. थोडक्यात काय तर एकाच जोडप्याची परस्परांवरची अव्यभिचारी निष्ठा हे कौटुंबिक सुखाचे एकमेव गमक नाही येवढा एकच मुद्दा मला येथे मांडावयाचा आहे. मानवी सुखदुःखे ही खोटी नाहीत. पण ती मुख्यतः मानापमानामुळे व पापपुण्याच्या कल्पनांमुळे निर्माण होतात आणि मानापमानाच्या आणि त्याचप्रमाणे पापपुण्याच्या कल्पना ह्या शिक्षित किंवा अर्जित असतात. आणि साहजिकच त्या देशकालपरिस्थितीप्रमाणे बदलतात. त्यांच्या ठिकाणी ‘शाश्वत’ असे काही नाही. तर मग शाश्वत असे कायआहे?

माझ्या मताने शाश्वत अश्या दोन गोष्टी आहेत. पहिली आहे जिव्हाळा आणि दुसरी आहे कामप्रेरणा. ह्या दोनहीमध्ये निष्ठेची विनाकारण लुडबुड होत आहे.

जिव्हाळा दोन किंवा अधिक भावंडांमध्ये, आईबाप व मुलांमध्ये, दोन किंवा अधिक पुरुषांमध्ये, दोन किंवा जास्त स्त्रियांमध्ये असू शकतो किंवा असावा तसा तो फक्त एकाच जोडप्यामध्ये असावा असे मात्र मी मानत नाही. शाश्वत अशी जी गोष्ट आहे तिला इतके परिमित, सीमित किंवा मर्यादित करणे मला चूक वाटते. ह्या जगातले दुःख खरोखरकमी करावयाचे असेल आणि सुख वाढवावयाचे असेल तर आपपरभाव कमी करावाच लागेल. आणि एकापेक्षा अधिक किंवा अधिकाधिक लोकांवर आपणाला सारखे प्रेम करावयाला शिकावे लागेल. आपण आपल्याच मुलावर उत्कटतेने प्रेम करीत असतो व त्याचा वियोग झाल्यास त्या उत्कटतेच्या प्रमाणात दुःख भोगतो. अनेकांवर समान प्रेम करावयाला शिकल्याशिवाय असे दुःख कमी होऊ शकत नाही. दुःख कमी व्हावे म्हणून मनाची अलिप्तता हा उपाय सांगितला जातो. तो उपाय कसा आहे, कोणाविषयीच जिव्हाळा वाटू देऊ नका असे सांगण्यासारखा आहे. मला तो ब्रह्मचर्यपालनासारखाच कृत्रिम वाटतो. तो मानवाच्या शाश्वत धर्माच्या विरुद्ध वाटतो. प्रत्येकाच्या ठिकाणी कामप्रेरणा आहे ही गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे; व तिचे कृत्रिमपणे केलेले दमन अनिष्ट आहे असे अलीकडे काहींना पटू लागले आहे. तद्वत् कोणाविषयीच जिव्हाळा वाटू न देणे हेही कृत्रिम आहे असे मला वाटते. थोड्या प्रयत्नानंतर आपणाला एकापेक्षा अधिक व्यक्तींवर समान प्रेम करणे साधेल असा मला विश्वास वाटतो.

एकपतिपत्नीकत्व (monogamy) ही गोष्ट व त्यातून उद्भवणारी ‘जन्मोजन्मी हाच पती मिळावा’ ही शिकवण अत्यन्त कृत्रिम अशी गोष्ट आहे. तसेच ब्रह्मचर्य, पातिव्रत्य, म्हणजे थोडक्यात योनिशुचिता ही कृत्रिम असल्यामुळे मानवी दुःखाला जन्म देणारी आहे. परंतु ह्या गोष्टीमुळे काहींचे वर्णश्रेष्ठत्व सिद्ध होत असल्यामुळे, त्या श्रेष्ठत्वभावनेमुळे मनाचे एकप्रकारचे समाधान होत असल्यामुळे, ह्यांचा पापाशी संबंध जोडल्यामुळे आणि ब्राह्मणांनी आपले सुखःदुख किंवा पूर्ण जीवनच दैवाधीन आहे असा आपला समज करून दिल्यामुळे ही दुःखमूलक गोष्ट नागरित (civilized) समाजाने स्वीकारली आहे. पण त्याचबरोबर आपल्या वर्तनात अतिशय मोटा दंभ देखील आलेला आहे. ह्या दंभाला आणि दुःखाला आपण ‘सुसंस्कृतता’ म्हणत आहोत. अर्थात् हे माझे व्यक्तिगत मत आहे.
आता स्त्रीमुक्ती म्हणजे काय ते पाहू. स्त्रीमुक्ती म्हणजे दर्जातील समानता. केवळ स्त्रीपुरुषांच्या आपसातील दर्जातीलच नव्हे तर स्त्रियांच्या आपसांतील दर्जातील. स्त्रियांचा आपसातील दर्जा आज अनेक कारणांनी बदलतो. कुमारिका, सुवासिनी, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता ह्यांमध्ये तर फरक आहेच पण लेकुरवाळी, वन्ध्या, मुलांची आई, मुलींची आई, पहिला मुलगा असलेली असाही फरक आहे. त्याशिवाय कुमारी माता, व्यभिचारिणी सधवा व व्यभिचारिणी विधवा हाही फरक आहे. स्त्रीमुक्ती म्हणजे ह्या सर्वांच्या दर्जात समानता येणे. तसे केल्याशिवाय सर्व स्त्रिया मुक्त होणार नाहीत. फारच थोड्या होतील.

मला येथे हे स्पष्ट केले पाहिजे की स्त्रियांची स्वतःची तशी मागणी असो की नसो, स्त्रीमुक्तीबरोबर लैंगिक स्वातंत्र्य त्यांना स्वीकारावेच लागणार! स्त्रियांची मागणी म्हणून मी स्त्रीमुक्तीकडे पाहत नाही. न्यायी आणि विवेकी माणूस म्हणून मी ह्या समस्येकडे पाहतो. त्यामुळे मला तिचा साकल्याने (म्हणजे आपल्या जातीच्या, देशाच्या, काळाच्या पलीकडे जाऊन) विचार करावा लागतो. स्त्रिया जेव्हा स्त्रीमुक्तीविषयी बोलतात तेव्हा त्या बहुधा फक्त स्त्रीपुरुषांच्या परस्परसंबंधांचा विचार करतात. स्त्रियांचा एकमेकींचा दर्जा कायमठेवण्याचा त्यांचा कल असतो. मला मात्र असे वाटते की यच्चयावत् सर्व स्त्रीपुरुषांचा सामाजिक दर्जा समान ठेवल्याशिवाय खर्‍या अर्थाने कोणीच मुक्त होणार नाहीत; कारण स्वातंत्र्याची समानता आणि मुक्ती ही एकच गोष्ट आहे.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडतो. स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रियांचे स्वातंत्र्य! पूर्ण स्वातंत्र्य! कोणत्याही पुरुषाच्या मागणीला नाही म्हणण्याचे स्वातंत्र्य. कोणत्याही पुरुषाच्या मागणीला हो म्हणावे लागले तर ते स्वातंत्र्य नव्हे. ती गुलामीच झाली. कोणालाही नाही म्हणताना कसलेही दडपण त्यांच्या मनावर नको. त्यांच्या नाही म्हणण्याचाआम्ही सर्वांनी आदर केला पाहिजे.

स्त्रीमुक्ती झाली म्हणजे पुरुषांना चरावयाला रान मोकळे झाले असा कोणीही अर्थ करू नये. आणि स्त्रियांनी आपला हक्क बजावला पाहिजे. पुरुषांनी स्त्रियांचा तो हक्क मान्य केला पाहिजे. आम्हा सर्वांना ह्यासाठी मिळून प्रयत्न करावा लागेल. सर्वांनी परस्परांना आदराने वागवावे लागेल. ही मागणी नुसत्या स्त्रियांनी करून भागणार नाही, तर सर्व स्त्रीपुरुषांनी त्यासाठी अनुकूल परिस्थिती प्रयत्नपूर्वक निर्माण करावी लागेल. खरे लैंगिक शिक्षण हेच आहे. त्यांना लैंगिक स्वातंत्र्य देणे म्हणजे सर्वच्या सर्व स्त्रियांना ब्रह्मचारिणी राहण्याचे स्वातंत्र्य प्रदान करणे आहे. पण सध्या तरी स्त्रियांना ह्या स्वातंत्र्याची भीती वाटत आहे. जुन्या व्यवस्थेमध्ये त्यांना सुरक्षित वाटत असल्यामुळे त्या ही अन्यायकारक असलेली व्यवस्था बदलू पाहत नाहीत. स्वातंत्र्य ही लादण्यासारखी गोष्ट नाही. तो वदतोव्याघात होईल. पण पारतंत्र्याची सवय झालेल्यांना स्वातंत्र्याचे भय वाटत आहे.
स्त्रियांची आजची स्त्रीमुक्तीची कल्पना पाहिली तर ती फक्त पतिव्रतांनी केलेली पुरुषवर्चस्वातून सुटकेची किंवा त्या पातिव्रत्याच्या मोबदल्यात पूर्वपक्षा थोडे जास्त हक्क किंवा पातिव्रत्याच्या मोबदल्यात पुरुषांकडून केलेली एकनिष्ठतेची मागणी अशी काहीशी दिसते. स्त्रीपुरुषांमध्ये समता यावी, त्यांच्यामधला उच्चनीचभाव नष्ट व्हावा असे म्हणताना दोन स्त्रियांमधला उच्चनीचभाव, पवित्रापवित्रभाव त्यांना कायम टिकवावयाचा आहे काय? नाही. तो विचार त्यांनी आता सोडून देऊन सर्व स्त्रिया आणि पुरुष यांत समान दर्जा आणण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. म्हणजेच ज्या जातीजमातींमध्ये स्त्रीपुरुषसंबंधविषयक निर्बंध शिथिल आहेत त्यांना हीन जाती मानणे सोडून दिले पाहिजे. वर्ण किंवा वंशश्रेष्ठत्व कायम टिकविण्याचा विचार टाकून दिला पाहिजे.

कामप्रेरणा ही सर्व प्राण्यांमधली सहजप्रवृत्ती आहे. आज आमची संस्कृती जणू काय स्त्रियांच्या बाबतीत तिचे अस्तित्व मानायलाच तयार नाही. सुसंस्कृत स्त्री कोणती तर जिच्यामधली कामप्रेरणा नष्ट झाली आहे ती. ज्या आपल्या सहजप्रवृत्तीला प्रतिसाद देतात त्या सर्व स्त्रिया अनीतिमती म्हणून ‘सुसंस्कृत समाजातून बहिष्कृत होतात. समाजातील त्यांचा दर्जा एकदम खाली घसरतो. हे घडणे मला इष्ट वाटत नाही. आपल्या समाजामध्ये स्त्रीपुरुषांचे गुणोत्तर विषम आहे. काही अपंग आहेत, काही कुरूप आहेत; अशा वैगुण्ययुक्त स्त्रीपुरुषांची कामपूर्तिविषयक कुचंबणा होऊ नये. तसेच जे एकापेक्षा अधिक लोकांवर सारखे प्रेम करू शकतात त्यांची संख्या भराभर वाढणे हेही आवश्यक आहे. अशांची कुटुंबेसमाजाने स्वाभाविक कुटुंबे म्हणून आत्मसात् केली पाहिजेत. त्यासाठी आपणाला आवश्यक ते वातावरण निर्माण केले पाहिजे.

विवाहासारख्या संस्था कश्या पाहिजेत, समाजातल्या यच्चयावत् घटकांची सोय पाहणार्‍या पाहिजेत. म्हणून नवी कुटुंबे कधी एकपतिपत्नीक असतील, कधी बहुपत्नीक असतील, तर कधी बहुपतिपत्नीक असतील. अशा कुटुंबातल्या सगळ्या स्त्रिया सख्ख्यासावत्र मुलांमध्ये फरक करणार नाहीत. तसेच सगळे पुरुष आपल्या मुलांना समतेने वागवतील. अशा कुटुंबामध्ये बेजबाबदार कोणी नसेल. क्वचित् कोणी असल्यास बाकीचे लोक त्याचा कान धरतील. ह्याचा अर्थ असा नाही की सर्व स्त्रियांनी स्वैरिणी झाले पाहिजे. पण ‘चारचौघी’मधील विनीसारखा विचार व आचार करण्याची हिंमत दाखविणारीला कोणी हीन लेखू नये. ज्ञानदेवादि भावंडांना संन्याशाची मुले म्हणून किंवा गेल्या पिढीमध्ये पुनर्विवाहितांच्या मुलांना जो त्रास झाला किंवा आज अनौरस मुलांना होतो तो त्रास विनीच्या मुलांना आपण होऊ देऊ नये.

पुरुष जे जे करतात ते ते स्त्रियांनी करावे असा स्त्रीमुक्तीचा अर्थ नाही. तर पुरुष जे करीत नाहीत तेही स्त्रियांनी करावे; म्हणजे सगळ्यांवर सारखे प्रेम करून दाखवावे. दुसर्‍यांना अडचणीत पकडू नये, त्यांच्या अडचणींचा फायदा घेऊ नये, तर समस्त स्त्रीपुरुषांच्या गरजा जाणून घ्याव्या आणि आपल्या हृदयातल्या करुणेचा प्रत्यय येऊ द्यावा.
उच्चवर्णीय विधवांना पुनर्विवाहाची परवानगी मिळाली म्हणून सगळ्या विधवा स्त्रिया पुनर्विवाह करीत नाहीत, घटस्फोटाचा कायदा झाल्यामुळे सगळ्या विवाहितांनी घटस्फोट घेतले नाहीत. म्हणून माझ्या कल्पनेमधली स्त्रीमुक्ती झाल्यावरही आपल्या समाजात पूर्वीसारखेच विवाह होत राहतील. विवाहाच्या वेळचे साक्षीदार किंवा त्यांची नोंदणी ह्यांची गरज कमी होईल. घटस्फोट होत राहतील, पण घटस्फोट कोर्टातून मिळण्यापूर्वीच जर कोणी मुलगी दुसर्‍या नवर्‍याबरोबर राहावयाला गेली तर तिची छीथू होणार नाही. पोटगीचे कायदे शिथिल होतील. संशयी नवर्‍यांना बायका धुडकावून लावू शकतील. परित्यक्तांचे प्रश्न सुटतील. त्यांची निवारागृहे व अनाथालये बंद पडतील. व्यभिचारासाठी कोणावरही खटला भरता येणार नाही. बलात्काराबद्दल आजच्यापेक्षा जास्त कठोर शिक्षा होतील.

ब्रह्मचारी स्त्रीपुरुष आपल्या खर्‍याखोट्या ब्रह्मचर्याचा टेंभा मिरवणार नाहीत. पतिव्रता त्यांच्या पातिव्रत्याचा दिमाख दाखविणार नाहीत. त्यावरून कोणी कोणाचा अपमान करू शकणार नाहीत. आईबहिणीवरून कोणाला शिव्या देता येणार नाहीत. कोणत्याही स्त्रीला blackmail करता येणार नाही. मी जबालेचा मुलगा सत्यकाम आहे असेसांगण्याचा कोणा मुलाला संकोच होणार नाही. बापाचे नाव सांगितलेच पाहिजे अशी कोणावर सक्ती होणार नाही. वारशाचे कायदे थोडे बदलावे लागतील. त्यांविषयी अधिक विचार करावा लागेल. आपोआपच समान नागरी कायदा अमलात येईल. पुरुषांना हुंडा मागता येणार नाही. त्यासाठी जळिताची प्रकरणे किंवा हुंडाबळींची प्रकरणे होणार नाहीत.

आपली बहुतेक सारी कुटुंबे पूर्वीसारखीच राहतील. क्वचित् काही कुटुंबांमध्ये एका जोडप्यापेक्षा अधिक स्त्रीपुरुष राहिले तर ते आजच्या पुनर्विवाहित जोडप्यांसारखे कोठल्याही लांछनाशिवाय, आजच्यापेक्षा जास्त उजागरीने, उजळमाथ्याने राहतील. आणि मुख्य म्हणजे आज जे जळगावला घडले आहे तसे भविष्यात कधीही घडणार नाही. भयग्रस्त स्त्रिया नेहमीसाठी भयमुक्त होतील.

उद्याचा असा समाज आपल्याला हवा असेल, हे सर्व मान्य असेल तर ते कसे घडवून आणावयाचे त्याचा विचार आता सुरू करू. आपणही त्यासाठी उपाय सुचवावे ही विनन्ती.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.