आत्मा हवा का?

वासांसि जीर्णानि यथा विहाय…….

हे खूप लहानपणी कानावर आले. माणसाला आत्मा असतो. तो अमर असतो. शरीर मेले तरी तो मरत नाही. पहिली वस्त्रे काढून नवी घालावीत तसे आत्मा नवीन शरीर धारण करतो. या जन्मी केलेल्या कर्मांप्रमाणे पुढचा जन्म कुणाचा येणार ते ठरते. असे ऐकले अगदी पहिल्यापासून.

या सगळ्या कल्पना, खऱ्या असोत वा नसोत, त्यांचे मूळ काय असेल? माणसाला आत्मा असतो असे प्रथम कुणाला तरी का वाटले असेल? मूळ शोधणे तसे जवळपास अशक्यच आहे. पण या ना त्या स्वरूपात माणसाला आत्मा असतो असे जगातले सर्व समाज मानत आले आहेत. मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते याच्या कल्पना वेगवेगळ्या असतील. शरीरात आत्मा कसा शिरतो याचे तर्क वेगवेगळे असतील. जगात सर्वत्र केव्हा ना केव्हातरी आत्मा न मानणारी तत्त्वज्ञाने निर्माणही झाली. पण तरीही जगभर बहुजनसमाज आजही आत्म्याचे अस्तित्व मानणाराच राहिला आहे.

साठ हजार वर्षांपूर्वीच्या मानवाने केलेली दफने आजच्या इराणमध्ये सापडली आहेत. या दफनांमध्ये सांगाड्यालगतच्या मातीत फुलांचे परागकण फार मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. म्हणजे तेव्हाही माणूस फुलेबिले वाहून विधिपूर्वक अंत्यसंस्कार करीत असणार. कदाचित मृत्यूनंतर आत्म्याला उपयोगी पडण्यासाठी, किंवा मृतात्म्यांनी त्रास देऊ नये म्हणून त्याला खूष ठेवण्यासाठी हे संस्कार असावेत. आत्म्याचे मूळ किमान साठ हजार वर्षे तरी मागे जात असावे असे वाटते.

माणसाला आत्मा असतो तसा इतर, अगदी छोट्यात छोट्या प्राण्यांनाही असतो का? याबाबतीत मात्र दुमत आहे. हिंदू तत्त्वज्ञानाप्रमाणे असतो. चौऱ्यांशी लक्ष योनीत तो कुठेही जन्म घेऊ शकतो. पण जगातील पाश्चात्त्य आणि इतर अनेक समाज मात्र असे मानत नाहीत. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा विशेष विचार करण्याचे कारण असे की याच तत्त्वज्ञानाच्या पार्श्वभूमीवर विज्ञानाचा जन्म झाला, विशेषतः जीवशास्त्राचा. आणि माणसाखेरीज इतर जीवांना केवळ यंत्रवत मानण्याने जीवशास्त्राची जेवढी प्रगती झाली तेवढी आत्मा मानण्याने कदाचित झाली नसती. सजीवांच्या सगळ्या जीवन-प्रक्रियांचे नियंत्रण करण्यासाठी भौतिकी आणि रसायनशास्त्राच्या नियमात न बसणाऱ्या एखाद्या वेगळ्याच शक्तीची गरज आहे का? दुसऱ्या शब्दांत; पूर्णतः भौतिक आणि रासायनिक नियमांवर आधारित, आणि त्यापेक्षा वेगळी कुठलीही गोष्ट न आणता एवढ्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया चालू शकतात हे सिद्ध करता येईल का?

विषाणूंचा एक अपवाद सोडला तर सगळे सजीव पेशींनी घडलेले असतात. त्यातले कित्येक एकपेशीय असतात. बाकीच्यांची शरीरे अनेक पेशींनी बनलेली असतात. माणसाच्या शरीरात 1014 म्हणजे एकावर 14 शून्ये एवढ्या पेशी असतात. ज्या पेशींनी शरीर घडते ती प्रत्येक पेशी ‘जिवंत’ असते. हल्ली प्रयोगशाळेत माणसाच्या अथवा प्राण्यांच्या एखाद्या अवयावातल्या पेशी घेऊन त्या प्रयोगशाळेत वाढवता येतात. तेव्हा प्रत्येक पेशी स्वतंत्रपणे जगू शकते, वाढू शकते, विभागू शकते. एवढेच नाही तर एका पेशी पासून असंख्य सजीव निर्माण करता येतात. म्हणजे मुळात ‘जिवंतपणा’ म्हणजे काय याचा अभ्यास करायचा झाला तर पेशी हे एकक (unit) धरून चालता येईल.

पेशीच्या रचना आणि कार्याचा अभ्यास हा आजच्या जीवशास्त्रीय संशोधनाचा फार मोठा भाग आहे. या अभ्यासाच्या खोलात शिरणे या लेखात शक्य नाही. या अभ्यासातून स्पष्ट होत जाणारी एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे. ती म्हणजे या सर्व प्रक्रिया भौतिकी व रसायनशास्त्रांच्या नियमांनुसारच चालतात. आणि या प्रक्रिया घडवून आणण्यासाठी या ज्ञात नियमांखेरीज दुसऱ्या कोणत्याही शक्तीची गरज भासत नाही. याच्या अनेक पुराव्यांपैकी एक स्पष्ट पुरावा म्हणजे पेशींमध्ये चालणाऱ्या प्रक्रियांपैकी कोणतीही प्रक्रिया किंवा प्रक्रियांची साखळी प्रयोगशाळेत टेस्ट ट्यूब मध्ये जिवंत पेशी नसतानाही करून दाखवता येते.

एखादी प्रक्रिया किंवा एखादी साखळी टेस्ट ट्यूबमध्ये करून दाखवणे हे ठीक आहे. पण जिवंत पेशी म्हणजे काय एवढेच आहे का? एखाद्या पेशीमध्ये एकाच वेळी सतराशे साठ प्रक्रिया चाललेल्या असतात. त्या सर्वांचा एकमेकांशी संबंध असतो, आणि अत्यंत सुसूत्र काम चाललेले असते. या सगळ्यांचे नियंत्रण होते तरी कसे? भौतिकी व रसायनशास्त्राचे नियम त्याला पुरेसे आहेत का? जर आपण निर्जीव घटकांपासून सुरुवात करून एखादी जिवंत पेशी तयार करू शकलो, तर मग आणखी वेगळा पुरावा शोधत बसण्याची गरज नाही. प्रत्यक्षात अशी जिवंत पेशी तयार करणे अद्याप साधलेले नाही. पण जिवंत पेशी तयार करणे तत्त्वतः तरी शक्य आहे का?

माणसाच्या शरीराचे तापमान 35-37 oC इतके  असते. समजा हे शून्य अंश सेंटिग्रेड इतके खाली नेले तर काय होईल? माणूस नक्कीच गारठून मरेल. सगळ्या सजीवांना जगण्यासाठी काही विशिष्ट तापमान लागते. समजा नेहमी 30oC ला जगणाऱ्या पेशीचे तापमान आपण 300 अंशांनी कमी म्हणजे उणे 270oC केले, तर काय होईल? ती पेशी नक्कीच मरेल असे आपल्याला वाटते. हा केवळ कल्पनेचा खेळ नाही. हे प्रयोग करता येणे शक्य आहे आणि तसे ते केले गेलेही आहेत. तत्त्वतः उणे 273 oC हे सर्वात कमी तापमान असू शकते. याच्या खाली तापमान नेणे तत्त्वतःच शक्य नाही. म्हणून याला शून्य अंश निव्वळ तापमान म्हणतात. प्रत्यक्षात हे तापमान मिळवता येत नाही. पण द्रवरूप हैड्रोजन अथवा द्रवरूप हेलिअमच्या साहाय्याने याच्या अगदी जवळ म्हणजे दोन अंश निव्वळ तापमानापर्यंत एखादी वस्तू गार करणे शक्य असते. आणि या तापमानाला पेशी गोठवण्याचे प्रयोग झालेले आहेत.

तापमान म्हणजे तरी काय असते? एखाद्या पदार्थातील अणूंच्या हालचाली, कंपने इत्यादि किती वेगाने होतात त्याची एक प्रकारे सरासरी. या हालचाली वाढल्या तर तापमान वाढले असे आपण म्हणतो. या उलट वस्तू थंड करणे म्हणजे अणूंच्या हालचाली मंदावणे. शून्य अंश निव्वळ तापमानाला या हालचाली पूर्णपणे थांबलेल्या असतात. दोन ते चार अंश निव्वळ तापमानालाही त्या जवळजवळ नसतातच म्हटले तरी चालेल.

एखादी पेशी या तापमानाला नेली तर ती काही या नियमाला अपवाद ठरत नाही. या पेशीतल्या समस्त हालचाली आणि क्रिया थांबलेल्या आहेत, अगदी एकही अणू इकडचा तिकडे होत नाही असे क्षण मिळतील. मग या क्षणाला ती पेशी ‘जिवंत’ आहे असे म्हणता येईल का? मुळात आपण जिवंतपणा काही लक्षणांनी ओळखतो. आणि ही सगळी लक्षणे क्रियात्मक असतात. जिथे क्रियाच नाहीत तिथे जिवंतपणा असेल कसा? पण हा प्रश्न गौण आहे. तो भाषेचा प्रश्न आहे. मुख्य मुद्दा असा की या तापमानाला गोठवलेल्या पेशीमध्ये कोणत्याही प्रक्रिया चालू नसतात. प्रक्रियाच चालू नसल्यामुळे त्या नियंत्रित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

मग उरते काय? तर शुद्ध रचना.

रचना आणि कार्य (structure & function) ही कुठल्याही यंत्राची आणि सजीवांचीही दोन अविभाज्य अंगे असतात. रचना आणि कार्य ही एकमेकांपासून वेगळी करता येतात का? आपण आत्ताच पाहिले की कोणतेही कार्य चालू नाही अशी शुद्ध रचना असू शकते. पण याच्या उलट उदाहरण मात्र सापडणार नाही. रचनेशिवाय कार्य मात्र असू शकत नाही. या (शून्य अंशनिव्वळ) तापमानाला कार्य नाही पण रचना आहे अशी अवस्था मिळू शकते.

कार्ये शून्य झालेली, शून्य अंश निव्वळ तापमानाजवळ केवळ रचनात्मक अंग शिल्लक असलेली ही पेशी जर आपण पुन्हा नेहमीच्या तापमानाला आणली तर काय होईल असे तुम्हाला वाटते?

प्रत्यक्षात जे आढळले ते हे की ती पेशी पुन्हा पूर्ववत जिवंत पेशीसारखी वागू लागली. पूर्वीप्रमाणेच जिवंतपणाची सगळी लक्षणे दाखवीत जगू लागली, जणू मध्ये काही झालेच नव्हते. पुनश्च त्याच प्रक्रिया, तितक्याच गुंतागुंतीच्या पण तितक्याच सुनियंत्रित. थिजलेल्या पेशीमध्ये रचना होती, पण ऊर्जा, कार्यशक्ती जवळजवळ शून्य होती. आपण पेशीला परत ऊब दिली म्हणजे बाहेरून ऊर्जा दिली. पण ही ऊर्जा कशा तऱ्हेनी वापरायची यासंबंधी काही सूचना वगैरे दिल्या नाहीत. तरीसुद्धा पेशीच्या यच्चयावत क्रिया सुरू झाल्या. तितक्याच योजनाबद्ध, तितक्याच नियंत्रित. म्हणजे नियंत्रण करणारी काही वेगळीच शक्ती असेल का?

थांबा. एवढ्यात या निष्कर्षावर उडी मारायची घाई करू नका. कारण अशी कुठली शक्ती न मानताही या सगळ्याचा सुसंगत अर्थ लावता येतो. एखादा संगणक असतो. किंवा एखादे स्वयंचलित यंत्र असते. आपण बटण दाबल्याबरोबर ते आपले ठरलेले काम करू लागते. आपण बटण दाबतो म्हणजे त्यातून वीजप्रवाह सोडतो. ऊर्जा देतो. ऊर्जा कशी वापरायची या संबंधीच्या सूचना देत नाही. जेव्हा वीजप्रवाह बंद असतो तेव्हा या यंत्राची रचना तेवढी असते. कार्य नसते. ऊर्जा दिली की कार्य सुरू होते. दिलेली ऊर्जा, तो वीजप्रवाह, वाटेल तसा धावत नाही. योग्य प्रकारेच धावतो आणि योग्य ते कामच करतो. इथे दिलेली ऊर्जा कशी वापरायची ते कोण ठरवते? वीजप्रवाहाने कुठून कसे वाहावे हे कोण ठरवते? त्या यंत्राची रचनाच ठरवते.

हा तर्क जसाच्या तसा या शून्य अंशाजवळ गोठवलेल्या पेशीलाही वापरता येईल. दिलेली ऊर्जा कशी वापरायची याची संपूर्ण माहिती त्या पेशीच्या रचनेतच लिहून ठेवलेली असते. रचनाच क्रियांचे नियंत्रण करते. रचनाच योजनाबद्धतेचा प्राण आहे. एखाद्या अणूंच्या विस्कळित समुदायाला ऊर्जा दिली की ते सगळे अणू असंबद्धपणे इतस्ततः संचार करू लागतात. मात्र आपण त्या अणूंच्या स्वातंत्र्यावर बंधन घातले तर त्यांच्या हालचाली ठराविक पद्धतीनेच होऊ लागतील आणि ठराविक क्रियाच घडून येतील. दोन सुट्या अणूंपेक्षा रासायनिक धाग्यांनी जोडलेल्या अणूंचे स्वातंत्र्य कमी असते. हेच अणू दुहेरी धाग्यांनी जोडले तर एकमेकांभोवती फिरण्याच्या त्यांच्या स्वातंत्र्याला आणखी मर्यादा पडतात. मोठ्या रेणूंमध्ये त्यांचे घटक असणाऱ्या अणूंच्या स्वातंत्र्यावर खूपच मर्यादा असतात. पेशींमध्ये याहून मोठ्या प्रमाणावर हेच होत असते. पेशीची रचना इतकी गुंतागुंतीची आणि तरीही इतकी अचूक आहे की प्रत्येक अणूच्या हालचालीला ठराविक मर्यादा पडतातच. यामुळे प्रत्येक हालचाल काही विशिष्ट क्रियाच घडवून आणायला कारणीभूत ठरते. म्हणजेच बाहेरून घेतलेली ऊर्जा कशी वापरावी आणि तिच्या योगाने कोणत्या क्रिया घडाव्यात यासंबंधीची माहिती पेशीच्या एकूण रचनेतच लिहून ठेवलेली असते. नियंत्रण करणाऱ्या एखाद्या वेगळ्या शक्तीची त्यासाठी गरज नाही.

शून्य अंशाजवळच्या या प्रयोगांवरून आपण आणखी एका वेगळ्या प्रकारे निष्कर्ष काढू शकतो. सुटेसुटे अणू घेऊन ते दोन अंश निव्वळ तापमानाला नेले. तिथे एखाद्या पेशीमध्ये जशी रचना असते तशाच तऱ्हेने हे अणू रचून आणि सांधून ठेवले. थोडक्यात जिवंत पेशीच्या रचनेचे एक हुबेहूब प्रतिमान बनवून ठेवले. हे मॉडेल पूर्णतः निर्जीव घटकांपासून तयार केलेले आहे. आता हे मॉडेल पुन्हा शरीराच्या तापमानाला आणल्यावर काय होईल?

ते जिवंत पेशीसारखेच वागेल असे म्हणायला प्रत्यवाय नाही. त्याची रचना हुबेहूब पेशीप्रमाणेच असल्यामुळे त्यातल्या क्रियाही तशाच असतील. म्हणजे अतिशीत वातावरणात पेशीचे बांधकाम करणे जर आपल्याला साधले तर त्यात जिवंतपणा आणण्यासाठी एखादा ‘आत्मा’ घालण्याची गरज नाही. केवळ बाहेरून ऊर्जा दिल्याबरोबर त्यात लागलीच जिवंतपणा येईल. अशा रीतीने पूर्णपणे निर्जीव पदार्थांपासून प्रयोगशाळेमध्ये एक सजीव तयार करता येईल.

प्रत्यक्षात असे करणे अद्याप साधलेले नाही. पण हा प्रश्न फक्त तंत्रज्ञानाचा आहे. तत्त्वतः हे करणे शक्य असले तरी त्यासाठी लागेल असे तंत्रज्ञान आपल्याजवळ नाही. आणि पेशीच्या रचनेचे सर्व बारीकसारीक तपशीलही पूर्णपणे माहीत नाहीत. पण पेशींमध्ये महत्त्वाची कामे बजावणाऱ्या लहानमोठ्या रेणूंची बांधणी करणे आज शक्य कोटीत आले आहे. डीएने किंवा प्रथिने बनवण्याचे तंत्रज्ञान आज वेगाने पुढे चालले आहे. तेव्हा आज नाही तर पुढल्या एक, फारतर दोन शतकांत माणूस जिवंत पेशी तयार करू शकेल याची मला तरी खात्री वाटते. जेव्हा ही गोष्ट साधेल तेव्हा या वादावर कायमचा पडदा पडेलच. पण आजही अनेक प्रयोगांमधून आपल्याला सजीव पेशींचे नियंत्रण रचनाच करते या मताला बळकटी देता येते.

पेशीची रचनाच पेशीचे गुणधर्म ठरवत असेल तर रचनेत बदल केल्याबरोबर गुणधर्मात बदल व्हायला पाहिजेत. आणि तसे ते होतातही. डीएनेच्या रचनेत होणारे बदल प्राण्यांच्या गुणधर्मांत बदल घडवून आणतात. डीएनेत होणाऱ्या बदलांना गुणघात (mutations) म्हणतात. निसर्गतः डीएनेमध्ये अपघाताने काही बदल होत असतात. त्यातले बहुसंख्य बदल घातक असतात. काही बदलांचा म्हणावा असा काहीच परिणाम दिसत नाही. क्वचित काही गुणघात त्या सजीवाला अनुकूल असे बदल घडवून आणतात आणि त्याला जगायला अधिक लायक बनवतात. उत्क्रांतीची प्रक्रिया या गुणघातांमुळेच शक्य असते. निसर्गतः होणाऱ्या या अपघाती बदलांखेरीज प्रयोगशाळेत मुद्दाम गुणघात घडवून आणता येतात. आज तर आपल्याला हव्या त्या ठिकाणी गुणघात घडवून आणून हवे ते बदल पेशीत आणणारे तंत्रज्ञान विकसित होत आहे. एखाद्या सजीवाचा एखादा गुणधर्म दुसऱ्या सजीवाला द्यायचा ही गोष्टही आज प्रत्यक्षात आली आहे. उदाहरणार्थ माणसाच्या शरीरात ‘इन्शुलिन’ निसर्गतः तयार होते. जीवाणू काही इन्शुलिन तयार करत नाहीत. पण माणसाच्या पेशींमधील इन्शुलिन तयार करणारे जीन काढून ते एखाद्या जीवाणूच्या डीएनेमध्ये बसवले तरतो जीवाणू इन्शुलिन तयार करू लागतो. वैद्यकशास्त्राला अशा तऱ्हेचे तंत्रज्ञान आज वरदान ठरत आहे. आज विज्ञानाला अशी कित्येक उदाहरणे माहिती आहेत की पेशीमध्ये एखादा रचनात्मक बदल घडवून आणला तर पेशीचे गुणधर्म बदलतात. बदल फक्त डीएनेच्या रचनेतच असावा लागतो असे नाही. डीएनेच्या रचनेचा शोध लागल्यापासून गेली जवळजवळ चार दशके सजीवांचे गुणधर्म ठरवणारा आणि आनुवंशिकतेचा आधार म्हणून फक्त डीएनेच (काही विषाणूंमध्ये आरेने) जबाबदार धरला गेला. या विषयातले सर्व संशोधन डीएनेभोवतीच केंद्रित झाले आहे. पण दरम्यानच्या काळात शास्त्रज्ञांच्या एका छोट्या गटाने इतर काही गोष्टी डोळ्यांसमोर आणल्या. अशी काही उदाहरणे आहेत की ज्यामध्ये डीएनेत काही बदल न होता पेशीचे गुणधर्म बदलता येतात आणि हा बदल आनुवंशिकही असतो.

जीवाणूंचे पेशीकवच काही रासायनिक प्रक्रियांनी काढता येते. हे पूर्णपणे काढणे जर जमले तर पुढच्या कित्येक पिढ्यांपर्यंत ते पुन्हा तयार होतच नाही. कवचाशिवायच पेशी वाढतात. असे का होते? वास्तविक पेशीकवच तयार करण्यासाठी लागणारे जीन डीएनेमध्ये जसेच्या तसे असतात. मुळात पेशीकवच तयार होण्याची, वाढण्याची प्रक्रिया अशी असते की पेशीकवचाच्या बांधकामासाठी लागणारे रेणू डीएने आणि त्यातून माहिती घेऊन बनलेल्या विकरांच्या योगाने बनवले जातात. मग हे रेणू पेशीकवचांवर योग्य जागी येऊन चिकटतात. हे चिकटणे विशिष्ट रासायनिक ओढींवर अवलंबून असते. पण या ‘योग्य जागा’च नसतील तर? तर तयार झालेले हे रेणू वाया जातात. आपण पेशीकवच पूर्णपणे काढून टाकले तर हे नवीन रेणू येऊन चिकटण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबते. कारण त्यासाठी योग्य जागाच नसते. म्हणजे इथे पेशीकवच तयार करण्यासाठी डीएनेमध्ये लिहिलेली माहिती जशीच्या तशीच आहे. पण तरी पेशीकवच तयार होऊ शकत नाही. अशी आणखीही अनेक उदाहरणे आहेत. त्यावरून काही शास्त्रज्ञ आज आनुवंशिकतेसाठी फक्त डीएनेलाच आधारभूत न मानता संपूर्ण पेशी-रचनेलाच मानू लागले आहेत.  थोडक्यात पेशीची रचनाच पेशीला सजीव बनवते आणि त्यासाठी ज्ञात भौतिक-रासायनिक घटकांखेरीज दुसऱ्या कुठल्याही शक्तीची गरज नाही ही भूमिका जीवशास्त्राने आज अगदी ठामपणाने घेतली आहे.

एखाद्या गोष्टीची गरज नाही म्हणजे ती अस्तित्वातच नाही असे सिद्ध होत नाही.

पण भौतिक नियमांत बसू शकत नाही असा काही आत्मा किंवा जीवशक्ती असणे शक्यच नाही असे दाखवून देता येऊ शकते. यामागचे तर्कशास्त्र समजायला अवघड नाही. सजीव यंत्रणेत ज्या क्रिया चालतात त्या भौतिक आहेत याविषयी वाद नाहीत. वाद आहे तो या क्रिया नियंत्रण करणारी काही अतिभौतिक शक्ति आहे की नाही याविषयी. भौतिक क्रियेचे नियंत्रण करायचे म्हणजे काय करायचे, तर ती सुरू करायची, बंद करायची अथवा तिला दिशा द्यायची. या तीन्ही गोष्टी करण्यासाठी काही जोर लावावा लागेल. जोर लावणे ही क्रिया भौतिकच आहे. त्यामुळे नियंत्रण करणे ही क्रियाही भौतिकच असणे भाग आहे. जी चीज स्वतःच भौतिकत्व नसलेली आहे तिला भौतिक जोर कसा लावता येणार? आणि तसा लावता आला नाही तर ती नियंत्रण कसे करणार?

डॅनियल डेनेट नावाच्या शास्त्रज्ञाने ही गोष्ट एका गमतीशीर उदाहरणातून सांगितली आहे. तो म्हणतो की भुताच्या गोष्टीमध्ये अशासारखा एखादा प्रसंग हमखास असतो की एखादे भूत भिंतीतून आरपार येते आणि टेबलावरचा खंजीर उचलून….. आता ही गोष्ट किती अतार्किक आहे ते पाहा. भिंतीतून आरपार जाण्याचा गुणधर्म जर त्या भुतात असेल तर त्याची बोटेही खंजिरामधून आरपार जातील. त्याला तो खंजीर कसा उचलता येईल? भिंतीतून आरपार जाणे आणि खंजीर उचलणे या दोन्ही गोष्टी एकाच entity ला करणे शक्य नाही. आपली आत्म्याची कल्पना या भुताच्या गोष्टी इतकीच तर्कदुष्ट आहे. जर हा आत्मा भौतिक नसेल तर त्याला भौतिक गोष्टींचे नियंत्रण करता येणार नाही. आणि जर तो भौतिक गोष्टीचे नियंत्रण करत असेल तर त्याला भौतिक शक्ती वापरावीच लागेल. तसे असेल तर ती शक्ती भौतिक प्रयोगांनी दाखवणे आणि मोजणे शक्य होईल. आणि जी वस्तू भौतिक प्रयोगांनी दाखवता येते ती भौतिकच  असली पाहिजे.

आपण आधी असे म्हणत होतो की सजीवांचे कार्य चालण्यासाठी एखाद्या अतिभौतिक शक्तीची गरज नाही. पण यापुढे जाऊन आता आपण असे म्हणतो  आहोत की अशी काही शक्ती असणे आणि तिने सर्व क्रियांचे नियंत्रण करणे तत्त्वतःच अशक्य आहे.

ही भूमिका एवढ्या विस्तृतपणे मांडण्याचे कारण माझ्या डोळ्यांसमोर भारतीय वाचक आहे. पाश्चात्त्य मनाला हे पटवून देण्याची गरज नाही कारण माणसाखेरीज इतर जीवसृष्टीला पूर्णपणे यंत्रवत मानण्याची परंपरा त्यांच्याकडे आज काही शतके तरी आहे. भारतीय मन मात्र प्रत्येक जीवाला आत्मा असतो असे मानते. अगदी साध्यांत साध्या आणि सूक्ष्मांत सूक्ष्म सजीवांनाही. आणि त्या आत्म्याच्या क्वालिटीतही काही फरक नसतो. कारण चौऱ्यांशी लक्ष योनींमध्ये तोच आत्मा फिरत असतो.

या गोष्टी मानणारा माझ्यासारखा एखादा विद्यार्थी जेव्हा आधुनिक जीवशास्त्राचा बारकाईने अभ्यास करू लागतो तेव्हा काय होते? जेव्हा सजीवांच्या विविधतेविषयी शिकत असतो. तेव्हा मन आश्चर्याने थक्क होते. पण कुठलीही तात्त्विक समस्या उभी राहत नाही. जीवाणू आणि प्राणूंसारखा एकपेशीय प्राण्यांविषयी शिकत असताना ते आपल्यासारखेच पण साधे सजीव आहेत ही भावना मनात असते. तेव्हा आपल्यासारखाच त्यांनाही आत्मा असणार.

आत्मा असलाच तर तो राहतो कुठे? माणसाच्या शरीरात हे गूढतेचे वलय हृदय आणि मेंदू यांभोवती कोंदाटलेले असते. एकपेशीय प्राण्यांचा विचार करताना हे गूढतेचे वलय पेशीबीभोवती केंद्रित होते. पेशीबी अथवा पेशीकेंद्र सगळ्या क्रियांचे नियंत्रण करते असे बहुधा पाठ्यपुस्तकांमधून लिहिलेले असते किंवा तसे शिकवले जाते. पेशीबीमध्ये काय असते हे कळल्यावर डीएनेच्या रेणूंकडे पेशीमधला सर्वसत्ताधीश, योजक, नियंत्रक म्हणून पाहिले जाऊ लागते. मग पुढे डीएनेची रचना आणि कार्यपद्धती  कळते आणि सगळाच फुगा फुटतो. कारण डीएनेमध्ये फक्त माहिती लिहिलेली असते आणि त्या माहितीच्या प्रती निघू शकतात इतकेच. डीएने नियंत्रण करत नाही. उलट त्याचेच नियंत्रण करणाऱ्या जनुक नियंत्रणाच्या (gene regulation) अनेक यंत्रणा पेशीमध्ये असतात. त्यांच्या कामाचा खोलवर अभ्यास झालेला आहे. केवळ भौतिक तत्त्वांवरच हे नियंत्रण चालते. संपूर्ण नियंत्रण अमुक एकामुळे होते असे कशाकडे बोट दाखवून सांगता येत नाही. जसे जसे खोलात जावे तसेतसे एकूण रचनेमुळेच नियंत्रण  होत असावे हे पटू लागते.

चौऱ्यांशी लक्ष योनींत फिरणारा आणि वस्त्रे बदलावीत तसे जन्म बदलणारा आत्मा निकालात निघण्याची आणखी काही कारणे आहेत. क्षणभर प्रत्येक सजीवामध्ये, अगदी एकपेशीय सजीवांमध्येही आत्मा, जीव अथवा तत्सम काही असते असे मानू. असे असेल तर एका पेशीच्या दोन होताना त्यात दुसरा आत्मा कुठून येतो? का एकाचे दोन होतात? एखादा आत्मा या योनीत प्रवेश करतो म्हणजे पेशीविभाजनात नक्की कधी? वनस्पतीमध्ये तर एका झाडापासून एकाच वेळी अनेक बिया तयार होतात. प्रत्येक बीपासून झाड. इतकेच नव्हे, हल्ली वनस्पतींमधला कुठलाही भाग घेऊन त्यातल्या प्रत्येक पेशीपासून नवीन झाड तयार करणे शक्य झाले आहे. त्या प्रत्येकात आत्मा अथवा जीवशक्ती कशी, कधी, कुठून प्रवेश करते? या किंवा तत्सम अनेक प्रश्नांना काही तर्कशुद्ध उत्तरे देता येत नाहीत. त्यामुळे कुठल्याही योनीत जन्म घेणारा, वस्त्र बदलणारा आत्मा असा काही असणे शक्य नाही.

आपण एकपेशीय सजीवांच्या बाबतीत जे प्रयोग पाहिले आणि त्यातून जी विधाने केली ती अनेकपेशीय सजीवांच्या बाबतीतही तपशिलातला फरक वगळता लागू आहेत. शून्य निव्वळ तापमानाजवळचे प्रयोग बाकी साध्या अनेकपेशीय सजीवांवरही यशस्वी झाले आहेत. एक गोष्ट खरी की अख्खा माणूस या तापमानाला गोठवून जिवंत परत आणणे काही साधलेले नाही. पण याची कारणे तांत्रिक आहेत. माणसाच्या शरीरातल्या पेशी किंवा छोटे पेशीसमूह कमी तापमानाला जिवंत ठेवता येतात. पण एखादा मोठा प्राणी अख्खा गोठवणे तांत्रिक दृष्ट्या शक्य नाही. कारण तापमान कमी करताना ते विशिष्ट वेगाने आणि सगळ्या बाजूंनी सारख्या प्रमाणात झाले नाही तर बर्फाचे मोठे स्फटिक बनतात आणि पेशी फाटू शकतात.

एकपेशीय प्राण्यांपेक्षा बहुपेशीय प्राण्यांची रचना अधिक गुंतागुंतीची असते. पण हे प्राणी आणि माणूससुद्धा मुळात एकपेशीय प्राण्यांपासूनच उत्क्रांत झाला  आहे. आणि पेशींनीच बनला आहे. त्यामुळे पेशींमधला जिवंतपणा जर केवळ भौतिक  रासायनिक घटकांनी सिद्ध होतो तर बहुपेशीय प्राण्यांनाही तोच नियम लागू होणे तर्काला धरून आहे.

आज विज्ञानाला सर्वच प्रक्रियांचे सर्व अर्थ लावता आले आहेत, सर्व तपशील   समजले आहेत, असे नाही. कित्येक बारकावे अजून अज्ञात आहेत. अनेक कोडी सुटायची आहेत. पण ती सुटण्याची वैज्ञानिकांना उमेद आहे. एखाद्या कधीही सिद्ध करता न येणाऱ्या वस्तूचे अस्तित्व मानल्याने अनेकदा कोडी सुटल्यासारखी वाटतात. गेल्या शतकात प्रकाशाच्या लहरींचा सिद्धान्त मांडताना आलेल्या अडचणी सोडवण्यासाठी शास्त्रज्ञांनी ‘ईथर’ नावाच्या पदार्थाचे अस्तित्व ‘मानले’. प्रत्यक्षात ईथरचे अस्तित्व कुणालाही दाखवून देता आले नाही. पुढे आइनस्टाइननी या ईथरची भंबेरी उडवली. प्रत्येक जीवाला एक ‘आत्मा’ असतो. असे मानले तर जीवनप्रक्रियांच्या नियंत्रणाविषयीची सर्व कोडी सुटल्या-सारखी होतात. सगळी कोडी सुटली असे वाटले तर ज्ञानाची प्रगतीच थांबते. त्यामुळे जे प्रश्न आज अनुत्तरित आहेत ते प्रश्न एखाद्या काल्पनिक आत्म्याच्या खड्ड्यात गाडून न टाकता जिवंत ठेवण्याला महत्त्व आहे. आज ना उद्या त्यांची उत्तरे मिळतील.

सारांश, आजचे जीवशास्त्र सर्वज्ञतेच्या खूपच अलीकडे असले तरी सजीव पूर्णतः भौतिक-रासायनिक नियमांवरच चालतात ही गोष्ट ठामपणे मांडते. सजीवांमध्ये ‘जिवंतपणा’ आणणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे रचना आणि रचना ‘जड’ असते. त्यामुळे सजीव आणि निर्जीव यातला फरक ‘चेतना’ हा नसून ‘जडता’ हाच आहे. सजीवांमध्ये निर्जीवांपेक्षा अधिक व्यामिश्र रचनेची जडता असते म्हणून ते सजीव असतात. चेतना म्हणजे energy ही प्रत्येक निर्जीव वस्तूतसुद्धा आहे. पण चेतनेने काय काम करायचे हे जडतेची रचना ठरवते. म्हणून जडताच सजीवांचा प्राण आहे.

10 प्रणव सोसायटी, फाटक बाग, 1000/6 क, नवी पेठ, पुणे — 411 030
(‘आजचा सुधारक’, जाने./फेब्रु. 2004.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.