दिसायला लोकशाही – प्रत्यक्षात हुकुमशाही!

सध्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. पाच वर्षांपूर्वी अश्याच परिस्थितीत नरेंद्र मोदी ह्यांना आम्ही निवडून दिले. त्यावेळी आम्ही जरी आमच्या निर्वाचन-क्षेत्रातील उमेदवाराला मत दिले असले तरी आमचे मत नरेंद्र मोदींना दिले जाईल, अशा बेताने दिले होते. ते मत पक्षाला किंवा त्या पक्षाच्या जाहीरनाम्याला नव्हते तर ते एका व्यक्तीला दिलेले होते; कारण त्या पक्षाचा जाहीरनामा निवडणुकीच्या दोनच दिवस आधी प्रकाशित झाला होता. प्रधानमंत्री होण्यासाठी ती व्यक्ती कशी लायक आहे, हे आम्हाला परोपरीने पटवून देण्यात आले होते. त्या राजकीय पक्षाचे बाकीचे उमेदवार प्रधानमंत्र्याचे ‘होयबा’ असतील अशी खबरदारी घेण्यात आली होती. ते ‘होयबा’ कसे निवडले होते तर ते त्यांच्या धनशक्ती किंवा बाहुशक्तीसाठी! निवडून आल्यावर त्यांना देशहित साधायचे होते की स्वहित साधायचे होते, ह्याबद्दल शंका घ्यावी अशी परिस्थिती होती.

निवडणुकीच्या आधी भरमसाठ आश्वासने देण्यात आली आणि मतदारांनी त्या आश्वासनांना भुलावे असा प्रचार करण्यात आला होता. प्रधानमंत्री होणारी व्यक्ती कशी सर्वगुणसंपन्न आहे, ह्याची चित्रे रंगविण्यात आली होती. त्या व्यक्तीचा प्रचार करण्यासाठी, तिचे नाव दुमदुमत रहावे म्हणून, किती पैसा खर्च झाला आणि कोणकोणत्या माध्यमांचा वापर करण्यात आला, त्याची गणती करणे कठीण झाले. ह्या सगळ्याबरोबर निरनिराळ्या धर्मानुयायांमधील दुही कशी वाढेल, ह्याकडे ही लक्ष पुरविण्यात आले होते. ह्या साऱ्याचा एकत्रित परिणाम होऊन पक्ष सत्ताधीश झाला. त्याला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाले.

मला असे सांगावयाचे आहे की, कोणता पक्ष यशस्वी झाला हे महत्त्वाचे नाही तर एक व्यक्ती यशस्वी झाली हे महत्त्वाचे आहे. ती व्यक्ती सर्वोच्च स्थानावर पोहोचल्यावर तिच्या ठिकाणी सर्व सत्ता एकवटली, ह्याचे मुख्य कारण प्रतिपक्ष दुबळा होता ह्यापेक्षा, त्या व्यक्तीच्या पाठीशी ‘होयबां’ची प्रचंड मोठी संख्या होती. ती फक्त संसदेतच नव्हती तर सामान्य जनताही तिच्या समर्थनासाठी कंबर कसून उभी होती.

त्या व्यक्तीने सत्तारूढ झाल्यानंतर काय केले? तिने विरोधकांचे तोंड बंद केले. त्या व्यक्तीचा विरोध म्हणजे ‘देशद्रोह’ असा समज जनतेत पसरवला. पुष्कळशा लेखकांना आपल्या अभिव्यक्ति स्वातंत्रावर बंधने येत आहेत, असे वाटू लागले. कारण त्या व्यक्तीच्या समर्थकांनी तसे वातावरणच निर्माण केले. कोणत्याही एका व्यक्तीच्याच ठिकाणी सत्ता केंद्रित झाली तर असेच होत असते. एक वाक्य येथे आठवले  “power corrupts and abosolute power corrupts absolutely” ही टीका मी नरेंद्र मोदी ह्या व्यक्तीवर करीत नसून, कोणत्याही व्यक्तीच्या ठिकाणी सर्व अधिकार एकवटले तर हेच घडणार असे मला सांगावयाचे आहे. व्यक्तीला निवडून दिल्यामुळे ‘लोकशाहीची हुकुमशाही होते’ हा मुद्दा मला मांडावयाचा आहे.

ही हुकुमशाही कशी होते, ह्याची जगात अनंत उदाहरणे आहेत. त्यांची उजळणी मी येथे करीत नाही. ‘युवाल नोआ हरारी’ हा एक इतिहासकार आहे. त्याने त्याच्या पुस्तकात एका ठिकाणी असे म्हटले आहे की, “कोणालाही सत्ता प्राप्त करण्यासाठी आणि ती टिकवून धरण्यासाठी खोटे बोलावेच लागते. स्टॅलिन खोटे बोलतो आणि चर्चिलही खोटे बोलतो. पण मला जर त्या दोघांमध्ये निवड करावयाची असेल, तर मी चर्चिलची निवड करीन.” ह्याचा अर्थ असा की माफक खोटे बोललेले, अल्प काळासाठी देशाला फायदेशीर ठरू शकते. पण त्याचे प्रमाण वाढल्यास ते देशालाच नव्हे तर सर्वांनाच नुकसानकारक होते. अशा परिस्थितीत आपण काय करावे? एका व्यक्तीविरुद्ध  दुसरी व्यक्ती अशी लढाई लावू नये. उदाहरणार्थ – मोदी विरुद्ध राहुल! आपल्या देशात सध्या प्रसारमाध्यमे मोदी विरुद्ध राहुल अशी जी मांडणी करीत आहेत ती त्यांनी थांबवावी! उद्या राहुल सर्व सत्ताधारी झाल्यास त्याच्यातही हे दोष येण्याची शक्यता आहे. म्हणून कोणाच्याही हाती निरंकुश सत्ता येऊ नये ह्यासाठी आम्ही सज्जनशक्ती वाढवली पाहिजे. आम्ही ‘होयबां’ना निवडून देणे अत्यंत चुकीचे होईल. मतदारांनी मत देताना ही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही मतदान करताना पंतप्रधानाला निवडून देत नसतो तर आम्ही संसदेचे सभासद निवडून देत असतो. तर प्रत्येकाने डोळसपणे मतदान करताना आपल्या प्रभागांतील सुयोग्य उमेदवाराची निवड करावी.  पंतप्रधान कोण होईल ह्याची चिंता करू नये.

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.