मनोगत

लोकशाही पद्धतीत निवडणुका ह्या निधर्मी आणि निःस्वार्थी पद्धतीने होणे तसेच त्या विषमतेपासून अस्पर्श असणे व त्यात स्पर्धा असली, तरी ती निखळ असणे अपेक्षित असते. तसे ते याखेपेस झालेले नाही. उलट, यावेळेच्या निवडणुकांत विविध पक्षाच्या शीर्ष व इतर नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान एकमेकांवरील गरळ ओकण्याचा नीचांक गाठल्याचे उघड-उघड दिसते. तसेही प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा स्तर हा आधीच्या निवडणुकीतील प्रचाराच्या तुलनेत खालावत चालला असल्याचे जाणवते.

नुकत्याच संपलेल्या ह्या निवडणुकांत भारतीय जनतेने म्हणजे आपणच ‘भारतीय जनता पक्षा’ला बहुमताने निवडून आणले आहे. मत कोणत्याही पक्षाला दिले असले तरी निव्वळ मतदान करून आपली जवाबदारी संपत नाही. निवडून आलेल्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा काय याचा एक वेगळा जाहीरनामा बनवून सरकारने त्यानुसार कृती करावी यासाठी सरकारवर दबाव आणणे तितकेच गरजेचे आहे.

या विषयावर आपले विचार उत्स्फुर्तपणे आणि आपुलकीने पाठवणार्‍या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. ‘सुधारक’च्या वेबपोर्टलवरील लेख हे विचार करायला प्रवृत्त करणारे असावेत असा जो आग्रह पूर्वीच्या ‘आजचा सुधारक’च्या संपादनमंडळाचा व स्नेह्यांचा होता, तो कायम ठेवण्यासाठी तसेच ‘सुधारक’ हे वेबपोर्टल अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याची जवाबदारी उचलण्यात आपणा सर्वांचे सहकार्य मिळावे ही विनंतीवजा अपेक्षा.

प्रा. प्र.ब.कुळकर्णी यांचे निधन

‘आजचा सुधारक’चे संस्थापक संपादक दि.य.देशपांडे ह्यांचे सहकारी, प्रा.प्र.ब.कुळकर्णी ह्यांचे मागच्या महिन्यात (१३ जून २०१९ रोजी), वयाच्या शह्यांशियाव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रा. कुळकर्णींनी ते अमेरिकेत असताना केलेल्या प्रयत्नांमुळे ‘आजचा सुधारक’ला अनेक लेखक व वर्गणीदार मिळाले. ‘आजचा सुधारक’च्या सुरुवातीपासून ते संपादक मंडळात होते तसेच त्यांनी काही काळ संपादकपदाची धुराही वाहिली. त्यांच्या शैलीदार लेखनासाठी ते वाचकांच्या कायम स्मरणात राहतील.

प्रा. प्र.ब.कुळकर्णी ह्यांना ‘सुधारक’च्या परिवाराकडून नम्र आदरांजली.

ह्या अंकातील लेखांवरील आपल्या प्रतिक्रिया, टीका-टिप्पणी खालील ई-मेल वर पाठवाव्यात. ‘सुधारक डॉट इन’वर त्या वेळोवेळी प्रकाशित केल्या जातील.

आभार.

समन्वयक
प्राजक्ता अतुल

aajacha.sudharak@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.