वारीचे अवडंबर

सध्या आषाढीची वारी सुरू आहे, पालख्या पंढरपुरात लवकरच दाखल होतील. पालखीचे किंबहुना वारकरी धर्माचे आजचे स्वरूप काय आणि मूळ वारकरी धर्म काय याचा ऊहापोह अगदी म.फुले यांच्या काळापासून होत आला आहे. आजही होत आहे.

आज काही पुरोगामी संघटनांची मंडळी वारीमध्ये उत्साहाने सामील होऊन आम्हीही तुमचेच सगेसोयरे असे सांगत वारकर्‍यांना खरा वारकरी धर्म समजून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. उपक्रम अनाठायी नाही पण उपक्रमामागील भावना आम्हीही “देवभक्त हिंदू” अशी कांग्रेस पक्षासारखी उसनी आहे. आणि राजकारणात धर्म आणण्याच्या भाजपच्या कारस्थानाला बळी पडण्यासारखी आहे. भारताच्या धर्मनिरपेक्ष राजकारणाला गालबोट लावणारी आहे.

ब्राह्मण्यवादी उजव्या शक्तींनी पुरोगामी लोकांना धर्मविरोधी ठरवून युगे लोटली आहेत. हा सनातन संघर्ष आहे. तो आपल्या देशाच्या इतिहासात ठळकपणे नजरेत भरतो. चार्वाक, बुद्ध, महावीर, कबीर, चक्रधर, बसवेश्वर आणि नामदेव, तुकारामांचा वारकरी धर्म यांनी या ब्राह्मण्यवादी शक्तींना वेळोवळी माती खायला लावली आहे. या शक्तींना तत्त्वज्ञानाच्या आणि नैतिकतेच्या पातळीवर कधीच पुरोगामी शक्तींचा पराभव करता आला नाही. आजही नाही. कपटाचा आणि हिंसेचा वापर करूनच त्यांनी विजय मिळवले. त्यासाठी त्यांना जातिव्यवस्थेच्या श्रमविभागणीचा फायदा झाला. शोषक आणि शोषित जातींतील वर्ग विभागणीला पर्याय देणे अवैदिकांना शक्य झाले नाही. किंबहुना ही आर्थिक बाजू त्यांच्या लक्षात येणे त्या काळाच्या मर्यादेत शक्य नव्हते. मार्क्सने हा मुद्दा ठोसपणे पुढे आणेपर्यंत विचारांच्या, तत्त्वज्ञानाच्या पातळीवर अर्थरचनेचे महत्त्व समजले नव्हते. म.फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी अस्मितेच्या लढ्याला आर्थिक विकासाची जोड देऊन अर्थरचनेला महत्त्व दिले. “आर्थिक समानतेशिवाय इतर कुठल्याही समतेला अर्थ नाही” हे बाबासाहेबांनी म्हणून ठेवले आहे. आज सत्तेवर असलेले सावरकरांच्या आणि गोळवळकरगुरुजींच्या विचारपरंपरेचे पाईक आहेत. आणि त्यांनी ते दडवून ठेवलेले नाही. सावरकरांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथात मांडलेला इतिहास त्यांचा इतिहास आहे. ज्यामध्ये अवैदिक संस्कृतीला बदनाम केले आहे. भारतीय संस्कृतीत नवव्या अवतारात राजकीय हेतूने समाविष्ट करण्यात आलेला बुद्ध सोनेरी पान नाही तर लाखो बौद्धधर्मीयांच्या कत्तली करणारा पुष्यमित्र शुंग सोनेरी पान आहे. स्वराज्याची स्थापना करणारे छ.शिवाजी महाराज सोनेरी पान नाही तर अटकेपार झेंडा रोवणारे राघोबादादा सोनेरी पान आहेत की ज्यांनी सत्तेसाठी आपल्या पुतण्याला हत्तीच्या पायाखाली दिले. आणि त्यासाठी आनंदीबाईंना जबाबदार धरून आपला स्त्रीविरोधी दृष्टिकोन उघड केला. तर आज या विचारांचे वारस सत्तेवर आले आहेत, आणि यामुळे आमचे पुरोगामी गडबडले आहेत. कांग्रेसवाल्यांनी मुस्लिम शब्दच वर्ज केला आहे आणि “आम्हीही हिंदू”चा गजर सुरू केला आहे. तर महाराष्ट्रात काही पुरोगाम्यांनी वारीचा रस्ता धरला आहे. आज जर काँग्रेस सत्तेवर असती तर वरील अतार्किक गोष्टी पुढे आल्या असत्या काय? वारकऱ्यांना ज्ञान देण्याच्या हेतूने कोणी वारीत फिरकले असते काय? “सत्य असत्याशीं मन केलें ग्वाही मानियलें नाहीं बहूमता” हा तुकारामांचा वारसा मग कुठे गेला?

त्यांचे बहुमत झाले म्हणून आपण कमरेचे डोक्याला गुंडाळणे हे हतबल झाल्याचे लक्षण आहे. आपण देवा-धर्माच्या विरोधी नाही हे वारंवार स्पष्ट केले आहे. पण आपण धर्मचिकित्सेच्या बाजूने आहोत, हा आपला दृष्टिकोन कदापि सोडता कामा नये. या धर्मचिकित्सेच्या दृष्टीनेच आज आपण वारीकडे पाहिले पाहिजे. अवैदिक परंपरेचा जागर करत राहणे, तिच्याशी जोडून घेणे आणि तिला आजच्या आधुनिक विचारांची जोड देऊन पुढे घेऊन जाणे हेच आजचे धम्मकर्तव्य आहे. परंतु दलितांनी बौद्धधर्म स्वीकारल्यामुळे आजही हिंदू पुरोगाम्यांना बुद्धाचे नाव घेण्याची लाज वाटते. वारीमध्ये नाचत-नाचत विठोबाचे दर्शन घ्यायला हिंदू नेणिवेच्या पातळीवर आध्यात्मिक आनंद मिळतो की काय?

आज वारकरी परंपरेवर सनातन्यांनी पकड मिळवली आहे. ही अवस्था आपण फार बदलू शकत नाही. याउलट शेतकरी संकटात आहे, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याबद्दल आपण काय केले आहे? दुष्काळाच्या प्रश्नावर आपण काय केले? ते न करता नुसते वारीत नाचून उपयोग नाही. जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणे यापलीकडे आता काहीच पर्याय नाही.

सनातन वैदिकांनी चक्रधर, बसवेश्वर, तुकाराम यांच्या हत्या करूनच विजय प्राप्त केलेले आहेत. हीच परंपरा त्यांनी दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या संदर्भात पण पाळली आहे. ज्यांनी ज्यांनी या धर्मांचा मूळ आशय पुढे आणला त्यांना हिंदुविरोधी ठरवण्यात आले. हे केवळ तात्त्विक पातळीवर घडत नाही, तर वर म्हटल्याप्रमाणे त्याला त्या त्या वेळच्या अर्थकारणाची जोड असते. शेवटी तत्त्वज्ञाने अस्तित्वात येतात ते आर्थिक हितसंबंधांच्या रक्षणासाठीच. नामदेवाने सुरू केलेल्या वारकरीधर्मात विठ्ठलाच्या दर्शनातच सर्व तीर्थे सामावली आहेत. त्यामुळे तीर्थाटनाला विरोध हा वारकरीपंथाचा मूळ गाभा राहिला. तुकारामांनी हाच वारसा चालवत “तिथें धोंडा पाणी देव रोकडा सज्जनीं” असे म्हणून ठेवले आहे. आज सज्जनांचे खून पडत असताना, झुंडशाही मुस्लिमांचे, दलितांचे बळी घेत असताना त्याविरोधी लढा उभारण्याची गरज आहे.

वारीची प्रथा वारकरीधर्माच्या प्रसारासाठी जन्माला आली. आज तिचे स्वरूप कर्मकांडी आणि भांडवली प्रभावामुळे इव्हेंट साजरा करणारे झाले आहे. नामदेवांचे, तुकारामांचे तत्त्वज्ञान व्यवहारातून गायब झाले आहे. ते जागवण्याची गरज आहे. आज ज्ञानेश्वरांचे पसायदान वारकरीधर्माचे तत्त्वज्ञान बनले आहे. ते वारकरीधर्माच्या मूळ गाभ्यालाच नख लावते. धर्मचिकित्सेच्या दृष्टीने या सर्व परिस्थितीची नीट मांडणी करून भिडले पाहिजे. तरच आपण विठ्ठलाच्या तत्त्वज्ञानाचे, जे समतेवर, जातिव्यवस्था विरोधावर उभे आहे आणि म्हणूनच ज्याला अठ्ठावीस युगे विटेवर उभे करून ठेवले आहे त्याची सुटका करू शकतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.