ती बाई होती म्हणुनी….

इंग्लंडमधल्या विपश्यनाकेंद्रात एका जर्मन साधक-गुरूची गाठ पडली. त्यांच्याशी बोलताना ते असं म्हणाले, “कोणताही आध्यात्मिक विषय शाळांमध्ये आणताना आम्हांला खूप परवानग्यांना सामोरं जावं लागतं. कारण पुन्हा आम्हांला मूलतत्त्ववादाकडे जायचं नाही…कारण तुम्हांला माहीतच आहे…!” असं म्हणून ते खजील होऊन हसले. मला उगीचच अपराधी वाटलं… त्यांच्या अकारण अपराधी वाटण्याबद्दल…! खरं तर त्यांचा जन्मच हिटलरच्या अंतानंतर झालेला. कुठल्याही प्रकारे ते त्या अत्याचारी कालखंडाचे समर्थक असण्याची शक्यताच नव्हती. पण तरीही त्यांचा चेहरा अपराधी झाला. जणु काही ‘हिटलरच्या देशातला म्हणून माझी मान आता कायमच शरमेने खाली राहणार,’ असं त्यांना म्हणायचं होतं. एक पुरुष म्हणून माझी मान अनेकदा अशीच खाली जात राहते!

आपण स्त्री म्हणून जन्माला येणं अगर पुरुष म्हणून, ही आपल्या हातातली गोष्ट नाही. पण विशेषतः आपल्या देशात अनेक स्त्रिया आपल्या जन्माला कोसत बसलेल्या दिसतात पण एकही पुरुष आपल्या पुरुषजन्माला दोष देत बसलेला मलातरी अजून आढळलेला नाही. ‘आपण बिच्चारे पुरुष’ असे बावळट विनोद मी इथं गृहीत धरत नाही…! मनापासून आम्हां पुरुषांना ‘बरं’ वाटत असतं, पुरुष असल्याबद्दल. चोर-उचक्के, दरोडेखोर आपल्याला लुबाडतील ही भीती वगळता एरवी आम्ही पुरुष निवांत असतो. कारण बाईला पकडून लुबाडली जाईल अशी गोष्ट आमच्याकडे नसते. ‘अब्रू…इज्जत…’…! पण म्हणजे पुरुषाला अब्रू नसतेच? जवळजवळ नसते. खानदान, जातपात, धर्म, राष्ट्र असे काही पुरुषाच्या सन्मानाला धक्का लावणारे घटक असतात. पण त्याच्या पुरुषत्त्वाला हिरावून घेतलं जाण्याच्या भीतीने तो कधीच ग्रासलेला नसतो. याउलट सर्व वयाच्या ‘स्त्री’ला या भीतीपासून मुक्त राहायचं असेल तर एक वेगळं शौर्य अंगी बाणवावं लागतं. आणि त्याचं कारण तिच्या भोवतालचे पुरुष. आणि हीच गोष्ट पुरुष म्हणून शरम वाटायला लावणारी आहे.

‘स्त्री-पुरुष समानता समाजात येऊन खूप वर्ष झाली…आता असमानतेची तक्रार करणाऱ्या स्त्रिया या कांगावखोर आहेत’ असं काही विचारवंत म्हणवणारे पुरुष आजकाल म्हणत असतात. धीटपणाचा आव आणत काही स्त्रियाही अशा विचाराला पाठिंबा व्यक्त करत असतात. जणु काही आजही स्त्रीला असुरक्षित मानणं हे त्या त्या स्त्रीच्या कमीपणाचं द्योतक आहे. मला वाटतं, हे खरं नाही. बंडखोर, स्वतंत्र स्त्रीला देखील एका अमूर्त दहशतीखाली आणलं जाईल असं वातावरण निर्माण करण्यात आम्ही भारतीय पुरुष यशस्वी झालो आहोत.

स्त्रीवादी विचारवंतांनी स्त्री-पुरुषांच्या आदिम प्रेरणांचा अभ्यास करत करत सृष्टि-चक्र चालवण्याच्या आणि समाजव्यवस्था चालू ठेवण्याच्या रहाटगाडग्याच्या प्रक्रियेतलं पुरुषांचं निमित्तमात्र असं दुय्यम स्थान अधोरेखित केलं आहे. बाईच्या गर्भात बीज सोडणं वगळता संगोपनादी बाकी सर्व गोष्टी करणारी स्त्री, ही आपल्यापेक्षा कमी प्रतीची ठरवण्यासाठी पुरुषांना किती शतकं खर्च करावी लागली आहेत. मालकीहक्काच्या दावणीला बाईला बांधलं नाही तर जन्मलेल्या पोरा-बाळांवर आणि तयार होत जाणाऱ्या कुटुंब नावाच्या नातेसंबंधावर आपल्याला काही अधिकारच सांगता येणार नाही, हे पुरुषांच्या टोळीला कधी काळी लक्षात आलं असेल आणि त्यातूनच पुरुषाच्या स्वामित्त्व भावनेला सुरुवात झाली असेल, असं मानलं जातं.

म्हणजे पुरुष हा प्राणी मूलतःच दुष्ट, हिंसक, स्वार्थी, राजकीय खेळी करणारा आहे का? आणि स्त्रीच्या समाजातल्या दुय्यम स्थानाला पुरुषांचं इतकं नियोजित राजकारण कारणीभूत आहे का? पुरुषांना हे ऐकायला खूप त्रास होतो. आपली काळी प्रतिमा रंगवली जाते आहे, याचा राग येतो. क्षणभर त्यांचा विचार करून ही आरोपात्मक दिशा बाजूला ठेवू. कारण मालक-मजूर, गोरे-काळे, दलित-सवर्ण यांच्यापेक्षा स्त्री-पुरुष संघर्ष नक्कीच वेगळा मानावा लागेल. कारण इथे तथाकथित ‘शत्रू’ अनेक नात्यांनी स्त्रीच्या आयुष्यात असतो. कधी प्रेमळ पिता तर कधी खंबीर भाऊ. पण या प्रेमळ नात्यांमध्ये वावरणारे पुरुष त्यांच्या त्यांच्या आयुष्यातल्या जोडीदाराशी कसे वागतात, हे पाहिलं की पुन्हा पुरुषाच्या मनोवृत्तीबद्दल संभ्रम निर्माण होतो. फार कशाला, याच प्रेमळ नात्यांना थोडं खरवडून बघितलं तर दुर्दैवानं त्याच पुरुषसत्ताक पद्धतीचं प्रतिनिधित्व करणारे नमुने सापडू लागतात. मुलगी, बहीण या नात्यातली बाई आपल्याला हवं तसं वागत नसली, आपल्या घराण्याच्या इभ्रतीला साजेसं तिचं वर्तन नसेल तर तिला बळजबरी करून हवं तसं वाकवायला किंवा ती बधत नसेल तर तिला हिंसक शिक्षा द्यायला हे बाप-भाऊ मागे पुढे पहात नाहीत. ऑनर किलिंगला आपल्या समाजात असणारी मूक संमती किंवा सहानुभूती ही हाच नियम सिद्ध करत असते. स्त्री ही तिच्या स्वतःच्या मनाप्रमाणे निर्णय घ्यायला मुखत्यार आहे, हे साधारणपणे कुटुंबसंस्थेला मान्य असलेलं जवळजवळ कधीच आढळत नाही. ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. आपले लोकप्रिय चित्रपट नायक पहिले तरी अनेकदा स्वतः नायिकेबरोबर उडाणटप्पूपणा करणारा नायक, आपल्या बहिणीच्या हातून जर काही ‘चूक’ झाली, (बऱ्याचदा लग्नाआधी दिवस जाणे, मूर्ख माणसाच्या प्रेमात पडणे वगैरे) तर स्वतः तिला खडे बोल सुनावतो, प्रसंगी मुस्काडीत भडकावतो, अशी दृश्यं आपण प्रेमाने पहात आलो आहोत. थोडक्यात बाईला वठणीवर आणण्यासाठी थोडीफार मारामारी आपण कुटुंबव्यवस्थेत मान्य करून टाकली आहे.

हीच वृत्ती थोडी अधिक ताणली तर लक्षात येईल की पुरुष मोठा होत असतानाच त्याला बाई ही बरोबरीची जोडीदार न वाटता, त्याच्यावर अवलंबून असणारी, जिचे निर्णय आपणच घ्यायला हवेत अशी, जिच्या वागण्याचे नीतिनियम आपण ठरवायला हवेत अशी, आणि जर ती ‘बहकली’ तर जिला ‘सरळ’ करण्याची जबाबदारी आपलीच आहे अशी, आणि पुढे जाऊन साध्या शब्दांत आपल्या मालकीची वस्तू अशी वाटायला लागते. त्यामुळे स्वतःला भला माणूस समजणारे, हिंसक किंवा वाईट न मानले गेलेले पुरुषही मनातून या भावनेतूनच त्यांच्या त्यांच्या आयुष्यातल्या स्त्रीकडे पहात असतात. जसं आपल्या देशाला लोकशाही पचलेली नाही तसं कौटुंबिक पातळीवरदेखील आपल्याला प्रत्येक माणसाचं स्वातंत्र्य उमगलेलंच नाही. एक कुटुंबप्रमुख – म्हणजे पुरुष – आणि त्याच्या पंखाखाली इतर सर्व, हे मॉडेल आपण मनातून मान्य करून असतो. मग त्यातला मोठा होत गेलेला मुलगा कुटुंबप्रमुख बनण्याच्या दिशेने वाटचाल करू लागतो. पण बाई मात्र मुलगी म्हणून, आई म्हणून, बहीण म्हणून, बायको म्हणून त्या त्या पुरुषांच्या – किंवा त्या सर्व पुरुषांच्या मर्जीवर अवलंबून असणारं आयुष्याच जगत राहते. या सगळ्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंसेला कुटुंबव्यवस्थेने मान्यता देऊन टाकलेली असते. बायकोला मारणारा नवरा, हा त्याची तक्रार बायकोने पोलीसस्टेशनवर नेल्यावर, पुरुषपोलिसांनाच काय महिलापोलिसांनाही ‘नॉर्मल’च वाटत असतो. उलट घरातली गोष्ट चव्हाट्यावर आणणारी बाई हीच ‘चुकीची’ वाटत असते. ही जगरहाटी आपण तयार केली आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पहायला लागलं तर बलात्कार ही गोष्ट फारच सहज वाटायला लागते. तो करणारे पुरुष आणि इतर पुरुष यांच्यात एक प्रकारचं समर्थनाचं वातावरण आपल्याला जाणवतं. एकाऐवजी अनेक स्त्रिया उपभोगणारा पुरुष हा ‘मर्दानी, मर्दुमकी गाजवणारा’ वाटतो. याउलट एकापेक्षा अधिक पुरुषांवर मनातल्या मनातदेखील प्रेम करणारी स्त्री ‘चवचाल’, ‘उठवळ’ मानली जाते. स्त्रीला उपभोग्य वस्तू मानणं हा वाक्प्रयोग आपण वापरून वापरून इतका गुळगुळीत केला आहे की त्याचा अर्थही आता हरवून गेला आहे. आपल्या आयुष्यातल्या स्त्रीला आपल्या हक्काची वस्तू मानणं ही कुटुंबातल्या पुरुषांच्या दृष्टीनं सहज गोष्ट आहे. पण शहरीकरण वाढता वाढता, जाहिरातींनी आपलं आयुष्य व्यापून टाकता टाकता, जगभरातल्या माध्यमांचा स्फोट होता होता, पोर्नोग्राफीचे अनेक नमुने सहज उपलब्ध असताना, पुरुषांना आकर्षित करणाऱ्या हजारो स्त्री-प्रतिमा त्यांच्या डोळ्यांवर आघात करायला लागल्या आहेत. अशा या कालखंडात शिक्षणातून येणारी प्रगल्भता, समानता, प्रेम, नाजुक शृंगार यांच्याशी तोंडओळखही न झालेल्या आपल्या समाजातल्या पुरुषांना, भोवताली दिसणारी प्रत्येक स्त्री आपल्याला खरं तर हवी तेंव्हा हवी तशी भोगता आली पाहिजे, असं वाटलं नाही तरच नवल!

AIDS या विषयावर लघुपट करण्यासाठी आम्ही काही राजस्थानी खेड्यांमधल्या तरुणांशी बोलत होतो. तेंव्हा लक्षात आलं, की प्रेम आणि शारीरिक उपभोग यातला फरक त्यांना कोणी कधी समजावून सांगितलाच नाही. शारीरिक जवळीक करण्याचे काही धाडसी प्रयोग म्हणजेच प्रेम अशी त्यांची निरागस समजूत होती. आणि मग या समजुतीला बळी पडलेल्या तरुणीदेखील घरच्या जाचक बंधनांना झुगारून देऊन अशा लैंगिक धाडसांना तयारच नव्हे तर उत्सुकही असायच्या. आणि मग अनेकदा नंतर त्या त्या तरुणांनी घाबरून पळ काढल्यावर पुन्हा कुटुंबाच्या कोषात गपचूप गुडूप व्हायच्या किंवा हे प्रकरण उघडकीला आलं तर त्यातून तयार झालेल्या भयानक हिंसक शिक्षांना सामोरं जायच्या. तरीही या गोंधळामध्ये एकमेकांची संमती हा त्यातल्या त्यात सुसह्य भाग होता. इथे खऱ्या अर्थाने निसरडा भाग सुरू होतो. परस्परसंमती सहजगत्या झाली तर काही काळ तरी नकळत नात्याचा गोडवा त्या दोघांना अनुभवता तरी आला असेल. पण जर मुलीची संमती नसेल तर ती पचवण्याची कुठलीच रीत या तरुण मुलांना कोणीच शिकवलेली नसल्यामुळे संताप आणि उद्रेक हेच त्याचं उत्तर असणार होतं.

आज भारताची प्रतिमा मलिन करणारा बलात्काराचा उसळलेला डोंब आपल्याला अचंबित करतो आहे, तो या सगळ्या प्रक्रीयेतून गेलेल्या पुरुषांसाठी अगदीच ‘साहजिक’ आहे. हे भयानक वास्तव आहे. या सगळ्याला जात, वर्ग, आर्थिक स्तर, जीवनशैलीतला फरक या सगळ्या घटकांनी गुणल्यावर तर या ‘सहजतेचं’ रूपांतर एका लाटेत झाल्यासारखं होतं. घरात डांबून ठेवलेल्या, चार भिंतीत राहणाऱ्या बायका या घरातल्या पुरुषांना हक्काच्या वाटत राहतात. तर कामानिमित्त, शिक्षणानिमित्त बाहेर पडणाऱ्या, स्वतःला टापटीप, व्यवस्थित राखून असणाऱ्या, आत्मविश्वासाने समाजात वावरणाऱ्या, प्रवास करणाऱ्या, वाहने वापरणाऱ्या स्त्रिया या मुळातच पुरुषांच्या संकुचित अहंकाराला आव्हान देत असतात. त्यांनी एवढं ‘स्वातंत्र्य’ घेतलंय याचाच अर्थ त्या लैंगिक ‘व्यभिचारा’ला तयारच काय पण उत्सुकही असणार असा अजब तर्क बुरसटलेल्या पुरुषांच्या मनात सुरू होतो. आणि माध्यमांच्या दंग्यातून त्यांना अनुमोदन मिळत असतं. त्यामुळे मित्राबरोबर चित्रपट पाहून परतणारी दिल्लीतली तरुणी, एका बसमधून दंगा करत, हुल्लडबाजी करणाऱ्या सहा जणांना मुळात शिक्षा देण्याजोगीच वाटली. उशिरापर्यंत मित्राबरोबर बाहेर राहिलेली मुलगी ही कोणत्याही पुरुषाने उपभोग घ्यावा, अशी वाईट चालीची असणार यावर ‘त्या’ सहा जणांचं तर एकमत झालंच असणार, पण देशभारतल्या हजारो पुरुषांच्या मनातही हीच भावना असणार. (इथे मी पुरुषांच्या मनात म्हणतोय, पण त्यांच्या आयुष्यात दुय्यमपणे समाधानाने जगणाऱ्या अनेक बायकांचीही या विचाराला छुपी संमती असणार!) आणि अश्या परिस्थितीत जर त्या मुलीनं धीटपणा करून विरोध केला तर तो या पुरुषांच्या अहंकाराला डिवचणारा फार मोठा गुन्हा ठरतो. दिल्लीतल्या तरुणीला बलात्काराच्याही पुढे जाणारी शरीराच्या चिंध्या करणारी विटंबना सोसावी लागली त्याचं कारण या सगळ्यामध्ये सापडतं.

कंपनीच्या गाडीतून एकटी प्रवास करणारी स्त्री असेल, निर्जन रस्त्यावर चालणारी असेल, अंधाऱ्या ठिकाणी मित्राला-मैत्रिणीला भेटायला आलेली असेल, एकाकी मिलमध्ये फोटो काढायला आली असेल किंवा अगदी घरात एकटी असेल – ती आपल्याला उपभोगासाठी उपलब्ध हवी यावर आजच्या खूप मोठ्या पुरुष लोकसंख्येचं एकमत आहे हे नक्की. कुणी संधीची वाट पहात आहे तर कुणी घाबरून ती संधी वापरायला कचरत आहे…!! पण मनातल्या मनात बलात्काराला सुरुवात खूप मोठ्या संख्येने पुरुषांच्या मनात झाली आहे. नजरेचे, मनात चालणारे बलात्कार क्षणोक्षणी घडत आहेत. याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे स्त्रीबद्दल वाटणारी दुय्यमतेची भावना वाढत जाऊन ती ‘use & throw’ पातळीवर जाऊन पोचली आहे. हुंडाबळीच्या घटनांमध्ये आपल्याला ती भावना दिसलीच होती.

घरात येणारी सून ही स्वतः व्यक्ती नसून घरातल्या तरुण पुरुषाला लैंगिक भोग मिळावा म्हणून आणलेली वस्तू आहे यावर त्या मुलीच्या आई-बापांपासून सर्वांचं एकमत असतं. एका सुखाने चालणाऱ्या घरात नाइलाजाने ही वस्तू मागवली गेल्यामुळे ती वस्तू विकत न घेतली जाता उलट वस्तू देणाऱ्यांनी आयुष्यभर त्या वस्तूचा ‘मेंटेनन्स’ दिला पहिले, असा ‘रास्त’ आग्रह मुलाकडच्यांचा असतो. त्या वस्तूचा आणखी एक उपयोग आहे- वंशाचा दिवा निर्माण करणे! मुलगा जन्माला घातल्यावर नापीक जमिनीप्रमाणे त्या वस्तूची विल्हेवाट लावायला त्या कुटुंबाची हरकत नसते. ‘मेंटेनन्स’ पुरेसा मिळत नसेल तर ती वस्तू आम्ही का बाळगत बसायची? मग ती जाळायला हरकत नाही, अशी ही विचारसरणी आहे. याच वातावरणात जगणाऱ्या तरुणांना त्याक्षणी लालसेपोटी आकर्षक वाटणारी स्त्री ही उपभोग संपताच तुटक्या बाहुलीसारखी फेकून द्यावीशी वाटली नाही तरच नवल!

न्याय मागायला गेल्यावर पोलिसांनीच बलात्कार केल्याच्या घटना ऐकून किंवा न्यायव्यवस्थेमधला नुसता कोडगेपणा आणि उशीर नव्हे तर पीडित स्त्रीच्या अब्रूचे धिंडवडे काढण्याचा पुरुषवकिलांच्या विकृत उत्साहाबद्दल वाचून कोण बलात्कारित स्त्री तक्रार करायला धजावेल? पण गेल्या काही वर्षांत तक्रारींच्या संख्येत लक्षणीय वाढ होते आहे. कारण या सगळ्या निराश वातावरणातसुद्धा, अक्षरशः कुठून कोण जाणे पण बळ आणून, भारतातल्या अनेक तरुणी सक्षम होतच आहेत. शिक्षण, स्वतःच्या कर्तृत्त्वातून आलेला आत्मविश्वास आणि कुटुंबात असणारा थोडासा संवाद यामुळे त्या बोलायला तयार होत आहेत. आणि त्यामुळेच ‘use & throw’ gangचा संताप अनावर झाला आहे. आम्ही वापरून फेकून दिलेली वस्तू जर आमच्यावर boomrang सारखी उलटणार असेल, तर मग ती नष्ट करण्यावाचून आम्हांला पर्याय नाही, असा हा भयानक विचार आहे.

या सगळ्यावर ‘पुरुषांची मनं बदलणं’, हा एकमात्र उपाय आहे. पण या पुरुषी, हिंसक जगात उपाय म्हणून भलभलत्या गोष्टी सुचवल्या जात आहेत. एक सगळ्यात लोकप्रिय उपाय म्हणजे बायकांनी फारसं बाहेर न पडणं, वेळेत घरी येणं आणि हो, पुरुषांना आकर्षित करतील असे पोषाख न घालणं! ‘सर्वांसमोर फाशीची शिक्षा’, ‘चौकात सर्वांसमोर दगडाने ठेचून मारा’ हे काही मार्ग आपण समाज म्हणून मध्यमयुगीन मानसिकतेकडे प्रवास करत असल्याचं द्योतक आहेत. फाशीच्या शिक्षेच्या भीतीने बलात्कार करून सोडून देण्याऐवजी मारून टाकण्याचाच मार्ग अवलंबण्यासाठी गुन्हेगार जास्त प्रवृत्त होतील, हे साध्या माणसांच्या ध्यानात येणं कठीण आहे. (बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्यावर, एरवी फाशीच्या शिक्षेचं समर्थन न करणाऱ्या माझ्यासारख्यालासुद्धा ‘या बाबतीत मात्र ती शिक्षा हवी’ असं वाटल्यावाचून राहवत नाही…) वकिलांनी न्याय मिळवून देणं आणि सत्य-शोधन हे त्याचं काम न मानता आपल्या अशिलाला कोणत्याही प्रकारे न्यायव्यवस्थेच्या चोरवाटांचा वापर करून सोडवणं हे आपलं ध्येय बनवल्यापासून सामान्य माणसांचा त्या प्रक्रियेवरचा विश्वास उडणं साहजिक आहे. पण हैद्राबादमध्ये न्यायप्रक्रिया सुरू होण्याच्या आधीच कायदा हातात घेऊन ‘fake-encounter’ करणाऱ्या पोलिसांना राखी बांधायला निघणाऱ्या महिलांना आपण पुन्हा एका हिंसक पुरुषी संस्कृतीचीच पाठराखण करतोय हे ध्यानात येत नाही…! मुळात या सगळ्यामध्ये खरे बलात्कारी मोकाट राहून (किंवा कदाचित काळजीपूर्वक सुरक्षित ठेवले जाऊन) भलत्याच गोर-गरिबांना गोळ्या घालून पीडित स्त्रीला वेळीच मिळणारी मदत नाकारल्यातून बिघडलेली प्रतिमा सुधारण्याचा डाव पोलीस खेळू शकतील, ही शक्यता उरतेच! प्रत्येक वेळी बलात्काराचा गुन्हा घडला की असे खोटे गुन्हेगार धरून आणणं भ्रष्ट पोलिसांना फार अवघड नाहीये…! असा ‘fake’ झटपट न्याय आपल्याला हवाय का? उन्नावमध्ये सत्ताधारी पक्षाचा एक आमदार बलात्कार करून मोकाट रहातो, पीडित तरुणीच्या वडिलांना चौकशीसाठी पोलीस बोलावून कोठडीत त्यांचाच अंत घडवतात, पीडित तरुणी आणि तिची वकील यांचा ‘अपघात’ होतो आणि वकील महिला मारली जाते… या सगळ्याबद्दल देश शांत राहतो आणि तो गुन्हेगारही ताठ मानेने हिंडत राहतो, या पार्श्वभूमीवर हैद्राबादच्या पोलिसांना बांधलेल्या राख्या या स्त्रियांच्या असहाय वैचारिक गोंधळाच्या प्रतीक ठरतात किंवा राजकीय सोयीस्कर डावपेचाचं चिह्न ठरतात.

पुरुषसत्ताक समाजव्यवस्था आणि हिंसा यांचं अतूट नातं आहे. जिथे जिथे पुरुषांच्या हातात अमर्याद सत्ता आली आहे तिथे तिथे त्यांनी बलात्कार हा त्या सत्तेच्या आविष्काराचा भाग बनवला आहे. दरोडा घालण्यासाठी गेलेल्या टोळीने संपत्ती लुटण्यावर समाधान न मानता घराच्या तरुण, म्हाताऱ्या सर्व बायांवर बलात्कार केल्याची घटना ताजी आहे…! जेत्यांनी पराजित प्रजेतील स्त्रियांचा उपभोग घ्यावा, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणे ही शत्रुपक्षातल्या पुरुषांना नामोहरम करण्याची एक खेळी आहे, युद्धात जिंकलेल्या स्त्रियांना गुलाम बनवून त्यांची विक्री करायलाही हरकत नाही… ही सगळी मध्ययुगीन, जुनाट, बुरसटलेली, दूर फेकून द्यावी अशी वृत्ती आहे. पण आजही मध्य-पूर्वेतल्या मुस्लीम दहशतवादी संघटना हे करताना दिसत आहेत. पण व्हिएतनाममधले अमेरिकन सैनिक असोत किंवा पूर्वेकडे तैनात केलेलं भारतीय दल असो – यांनी असे अत्याचार केलेच नाहीत, हे सिद्ध झालेलं नाही. मणिपूरच्या आया-बहिणी सर्व वस्त्र फेडून ‘Indian army, rape us’ असं म्हणत उभ्या असल्याचा फोटो पाहून आपण आपल्या सेनेच्याही खोट्या पौरुषावर प्रश्न उठवायला हवेत. राष्ट्रप्रेमाने आंधळे होऊन त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण मध्ययुगातल्या अंधकारातसुद्धा शत्रूच्या महिलांचा सन्मान करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याच देशात जन्माला आले होते!

खोट्या पौरुषाला फक्त सत्ता आणि मर्दुमकी समजते. आपल्या स्त्रियांचं रक्षण करणं, हे त्या मर्दुमकीमध्ये जरूर असतं, पण त्यातही स्त्रीला दुय्यम लेखण्यापासून मुक्ती नाही. स्त्री आणि पुरुष दोन स्वयंभू, स्वतंत्र, स्वतःच्या विचारांनी चालणारी व्यक्तिमत्व आहेत… त्यांच्यात शारीरिक भेद आहेत पण सांस्कृतिक फरक आपण करत आलेले आहोत. एका मानवी पातळीवर ते समानच आहेत आणि त्यांच्यात तयार होणारे नाजुक भाव-बंध त्या दोघांनाही अत्यंत आनंद देणारे असतात. प्रेमाचा एक अविष्कार म्हणजे शारीरिकता. आणि शारीरिक संबंधांचा मूलभूत पाया म्हणजे उभयपक्षी मनःपूर्वक संमती. नुसती संमतीच नव्हे तर उत्कटता. यातलं काही नसेल तर स्त्री ही पुरुषासाठी एक मांसाचा तुकडाच ठरणार. मग भले त्या स्त्री-पुरुषांचा विवाह झालेला असला तरी…!

पुरुषाचं लिंग आणि स्त्रीची योनी या एकमेकांमध्ये गुंतलेल्या दोन अवयवांना एक श्रेष्ठ आणि एक कनिष्ठ असं कुणी ठरवलं? वायरिंगचं काम करताना किंवा वेगवेगळ्या plugs आणि sockets बद्दल बोलताना ‘male-female’ असा सर्रास उल्लेख होतो. त्या दोन्हींच्या वापरातून विद्युत-प्रवाह किंवा जो signal जायला हवा तो जात असतो. तिथे कधीच श्रेष्ठ-कनिष्ठ हा मुद्दा मनात येत नाही. मग लिंग हे पुरुषाचं हत्यार कसं बनलं? ते हत्यार तो स्त्रीच्या योनीवर अत्याचार करण्यासाठी वापरतो, या भावनेतूनच बलात्कार या संकल्पनेचा जन्म झाला आहे. नाहीतर पुरुषांवर स्त्रियांनी बलात्कार केल्याचे प्रसंग सहज दिसून आले असते. (आज पुरुषांनी पुरुषांवर बलात्कार केल्याचे प्रसंग मात्र घडू लागले आहेत!) पुरुषाचं लिंग हा त्याला मिळालेला एक पंचेन्द्रियांपैकी त्वचा या इंद्रियाचा एक छोटा भाग आहे, योनीवर सत्ता गाजवण्यासाठी दिलेलं हत्यार नाही हे पुरुषांना उमजायला हवं. देवळात शिवलिंगासमोर नतमस्तक होणाऱ्या पुरुषांना हे कोण समजावणार की योनी आणि लिंग यांच्या समागमाची, पुरुष आणि प्रकृती यांच्या एकत्र येण्याची तो पूजा करतो आहे. ही आणि अशी अनेक चिह्न पुरुष बावळटपणे नजरेआड करत राहतो, खोट्या पौरुषाच्या कल्पना कुरवाळत राहतो आणि खऱ्या समानतेतून मिळणाऱ्या समाधानाला मुकत राहतो.

आणि बाई? समानतेचा आनंद वाट्याला न आल्याच्या दुःखात पिचत तरी राहते नाहीतर बंडखोरी करून ते आयुष्य बदलण्याचा प्रयत्न तरी करत राहते. पण हे सर्व एका अदृश्य दहशतीखाली… बलात्काराच्या, acid attack च्या, मृत्यूच्या….हे सावट तिच्यावर का? का नाही तिनं स्वच्छंद जगायचं? केवळ.. ती बाई आहे म्हणून?

सुनील सुकथनकर
sunilsukthankar@gmail.com

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.