जगण्याचे वियाग्रीकरण : जगाची नवी ओळख

“प्रिय आईबाबा आणि माझ्या बंधूंनो,

इथे फार कठीण दिवस आले आहेत, आणि मी जवळपास दर आठवड्याला तुम्हांला पत्र का लिहितोय, हे तुम्हांला समजत असेलच. आज मी तुम्हांला लिहीत आहे ते मुख्यतः आणखी काही पेर्वीटीन गोळ्यांसाठी…..”

तुमचा आवडता
हेन

तो दिवस होता ९ नोव्हेंबर १९३९. नाझीव्याप्त पोलंडमध्ये २२ वर्षांचा एक तरुण जर्मन सैनिक आपल्या आईवडिलांना पत्र लिहीत होता. २० मे १९४०ला त्याने पुन्हा आईवडिलांना लिहीले:

“रसद म्हणून तुम्ही आणखी काही पेर्वीटीन गोळ्या पाठवाल, अशी आशा वाटते.”

त्यानंतर १९ जुलै १९४० रोजी त्याने आणखी एक पत्र लिहिले,

“जर शक्य असेल तर आणखी काही पेर्वीटीनपाठवा, प्लीज.”

हा पत्रलेखक महायुद्धानंतर जागतिक दर्जाचा लेखक झाला. तो हाईनरिक ब्योईल होता (जन्म: २१ डिसेंबर १९१७, मृत्यू: १६ जुलै १९८५, वय ६७). १९७२ साली साहित्याचे नोबेल मिळवणारा ब्योईल महायुद्धोत्तरकालीन पहिला जर्मन साहित्यिक ठरला. ब्योईल कुटुंब हिटलरविरोधक होतेच, पण त्याला जबरदस्तीने जर्मन लष्करात भरती व्हावे लागले. तो जर्मनीसाठी पोलंड, फ्रान्स, रोमानिया, हंगेरी आणि शेवटी रशियात होता. तो पोलंडमधून ही पत्रे लिहीत होता.

ही कथा अँड्रियज उलरिच (मार्च १९६० – विद्यमान) हा जर्मन पत्रकार आणि समुपदेशक त्याच्या “The Nazi Death Machine Hitler’s Drugged Soldiers” ह्या वृत्तांकनात लिहितो. ब्योईलविषयीची, नाझी सैनिकांच्या ह्या गोळीच्या व्यसनांची आणि तिच्या भयानक परिणामांची माहिती ‘दी अटलांटिक’ या अमेरिकन मासिकाची पत्रकार मेगन गार्बर तिच्या ‘Pilot’s Salt: The Third Reich Kept Its Soldiers Alert With Meth’ह्या लेखात लिहीते.

पेर्वीटीन-मेथांफेटामाईन

पेर्वीटीन (Pervitin) ही शक्तिवर्धक उत्तेजक गोळी आहे. ती आधी शक्तिवर्धक गोळी म्हणून ओळखली जात होती. नंतर ती आक्रमक, हिंसाभाव बधिर करणारी, क्रोध वाढवणारी गोळी झाली. नंतर महायुद्धकाळात speed today म्हणून ती ओळखली जात होती. ज्याला आज मेथांफेटामाईन म्हटले जाते त्याचे पेर्वीटीन हे रूप आहे. पेर्वीटीनची निर्मिती तत्कालीन जर्मनीतील टेमलर वर्क कंपनीने केली होती. गोळीचा प्रभाव लक्षात घेऊन जर्मन लष्करचा डॉक्टर ओट्टो रँकने तिचे लष्करी मूल्य ओळखले आणि ती गोळी ‘आदर्श युद्ध गोळी’ म्हणून जाहीर केली. पायदळातील आघाडीवर ती “tank chocolate”, वैमानिकात “pilot’s chocolate” किंवा “pilot’s salt” म्हणून प्रसिद्ध झाली.

मेथांफेटामाईनचा शोध १८९३ साली लागला. तणावमुक्तीचे औषध म्हणून ते वापरले गेले. त्यावेळी एका तरल अवस्थेत प्रेमभावना, विशेषतः कामभावना उद्दीपित करणारे औषधीद्रव्य हे त्याचे प्राथमिक स्वरूप होते. द्रवरूपातील मेथांफेटामाईन बरेच बोकाळले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ‘मेंथा’ला गोळीचे स्वरूप मिळाले, तीच पेर्वीटीन. ही पेर्वीटीन नाझी सैनिकांत ‘हर्मन गोअरिंग गोळी’ म्हणूनही प्रसिद्ध झाली. हिटलरचा सेनानी हर्मन गोअरिंग स्वतःच ह्या गोळ्यांचा इतका व्यसनी होता की ती त्याच्या नावाने नाझी सैनिकात ओळखली गेली. केवळ गोअरिंग आणि सैनिकच नव्हे तर खुद्द हिटलरसुद्धा ही गोळी घेत असे. पण साऱ्या जगाला धडकी भरवणारा हिटलर औषधरूपातल्या गोळीला घाबरत होता. त्यामुळे त्याचा खासगी डॉक्टर डॉ. थिओडोर मोरेल हिटलरला एक वेगळे इंजेक्शन रोज देत होता. बार्बीट्युरेट्स हे उत्तेजक द्रव्य, वृषणात तयार होणारे, लैंगिक भावना उद्दीपित करणारे संप्रेरक, अफू, तरुण बैलाचे वीर्य आणि पेर्वीटीन यांचे मिश्रण असलेले ते इंजेक्शन होते.

डॉ. मोरेलने हे अद्भुत रासायनिक इंजेक्शन तयार करण्यात मोठी जोखीम घेतली होती. हिटलरला ते पसंत पडले, नाही तर ते खरेच जीवघेणे ठरले असते. पण त्याचा प्रयोग यशस्वी ठरला. त्या पहिल्या इंजेक्शनच्या प्रभावाखाली बेफाम उत्तेजित होऊन हिटलर सलग आठ तास बोलत राहिला. ते ऐकणारा मुसोलिनी खरेच सर्द होऊन गेला होता. त्याने घाम पुसण्याचे रुमाल अनेकदा बदलले. ही १९४३ची घटना आहे. त्या वर्षभरात मोरेलने हिटलरला आठशे इंजेक्शन दिली. या युद्धकाळात हिटलर ८२ प्रकारची उत्तेजके घेत होता, असा दावा ‘Was Hitler ILL?: A Final Diagnosis’ ह्या पुस्तकाचे लेखक हेनरिक इबेर्ल आणि हान्स जोआकिम न्यूमन ह्यांनी केला आहे.हिटलरला पेर्वीटीन इव्हा ब्राऊनसाठी हवी होती. हिटलर ५५चा; इव्हा ३५ची होती. लैंगिक ताठरपणाहा मुख्य हेतू असलेली गोळी नंतर संवेदनाहीन आक्रमक स्वभाव निर्माण करणारी ठरली.

मेथांफेटामाईनच्या आधी अँम्फेटामाईन (Amphetamine) या संयुगाचा शोध १८८७ला लाझार इडेलेनु (Lazăr Edeleanu) या रोमानियन रसायनशास्त्रज्ञाने जर्मनीत लावला. लाझारने अँम्फेटामाईनला फेनीली सोप्रोपीलामाईन (phenyli sopropylamine) असे नाव दिले. अँम्फेटामाईनच्या संयुगात पुन्हा १८९३ला बदल झाले, त्यानंतर १९१९ला मेथांफेटामाईन हायड्रोक्लोराईड (methamphetamine hydrochloride) असे संयुग तयार करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धात मेथांफेटामाईन बाजारात पेर्वीटीन (Pervitin) या ब्रँड नावाने आली. जर्मनीतील टेमलर कंपनीने तिचे उत्पादन केले होते.

हा सारा इतिहास वियाग्राच्या मागे आहे. कारण मेथांफेटामाईन हे बेकायदेशीर उत्तेजक संप्रेरक आहे तर पेर्वीटीन कायदेशीर उत्तेजक संप्रेरक आहे. वियाग्रा हे पेर्वीटीनचे आधुनिक स्वरूप आहे.

नॉर्मन ओह्लर (१९७० – विद्यमान) हा न्यूयॉर्क टाईम्सचा लेखक, कादंबरीकार आणि पटकथाकार नाझींच्या ह्या ड्रगच्या व्यसनावर आणि त्या नशेत त्यांनी केलेल्या हिंसाचारावर कादंबरी लिहिणार होता. त्यासाठी त्याने डॉ. थिओडोर मोरेलचे सारे रेकॉर्ड सखोल अभ्यासले. पण कल्पनेपेक्षा वास्तव किती भयंकर आहे, हे लक्षात येताच त्याने कल्पित कादंबरीपेक्षा “Der Totale Rausch” (The Total Rush) हे सत्याधारित पुस्तक लिहिले. त्यात तो ह्या मेथांफेटामाईनचे (methamphetamine) आणि तिच्या जर्मन सैन्यातील – थर्ड राईशमधील बेफाम वापराचे, व्यसनाचे वर्णन करतो. या पुस्तकाचे ऑक्टोबर २०१६ साली इंग्लिश भाषांतर ‘Blitzed: Drugs in Nazi Germany’ पेंग्विनतर्फे प्रकाशित झाले.

वियाग्राचे तत्त्वज्ञान

विसाव्या शतकातील अतिशय महत्त्वाचे, सर्वाधिक खपाचे लैंगिक उत्तेजक संप्रेरक म्हणजे वियाग्रा. त्याची तात्त्विक चिकित्सा जागतिक चर्चापीठावर एका पुस्तकाने केली आहे. त्या पुस्तकाची माहिती घेणे उपयोगी राहील.

The Philosophy of Viagra: Bioethical Responses to the Viagrification of the Modern World” edited by Thorsten Botz-Bornstein. New York, NY: Rodopi, 2011, 227 pages हे वियाग्राचे तत्त्वज्ञान स्पष्ट करणारे पुस्तक वियाग्राच्या अनेक तात्त्विक बाजूंची गंभीर चर्चा करते.

सर्व प्रकारच्या भौतिक उपभोगांसाठी अतिशय उत्तम दर्जाचे जागतिक पर्यटनस्थळ म्हणून जगात भयंकर प्रसिद्ध असलेल्या अरबी जगतातील कुवेत येथील ‘कुवेत गल्फ युनिव्हर्सिटी फॉर सायन्स अँड टेक्नोलॉजी’ या विद्यापीठात ‘The Philosophy of Viagra’ हा विषय शिकवला जातो. तेथील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक थॉर्स्टन बोत्झ बोर्नस्टीन ह्यांनी ह्या पुस्तकाचे संपादन केले आहे. या ग्रंथातील वेगवेगळ्या लेखकांनी वियाग्राची चिकित्सा गेल्या दोन हजार वर्षांहून अधिक काळातील तत्त्वज्ञानात्मक युक्तिवादांमधून निष्पन्न झालेल्या कल्पनांच्या आधारे केली आहे.

रोडोपी ह्या डच प्रकाशनसंस्थेनेच प्रथम वियाग्रावरील तत्त्वज्ञानात्मक निबंधांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा जागतिक मान पटकावला आहे आणि धाडस दाखवले आहे. पंधरा शोधनिबंधाचा हा संग्रह वियाग्राकरणाची आणि वियाग्राकरणात गुंतलेल्या तत्त्वज्ञानात्मक पैलूंचा शोध व गंभीर तात्त्विक चिकित्सा करतो आणि पौरुषाचे जैविकदृष्ट्या यांत्रिकीकरण करण्याला पूर्ण विरोध करतो.

या पुस्तकाच्या रूपाने या प्रकाशनसंस्थेने पाश्चात्य-युरोप चर्चाविश्वातील “तत्त्वज्ञान आणि लोकप्रिय संस्कृति” (Philosophy and Popular Culture) छाप मालिकेत एक भर टाकलेली नाही. या प्रकाशनसंस्थेची “कामभावनेचे तत्त्वज्ञान आणि प्रेम” (Philosophy of Sex and Love) ही गंभीर विषयाला वाहिलेली मालिका असून त्यातील “मूल्य चिकित्सा ग्रंथमालिका” या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून सदर पुस्तक प्रकाशित केले आहे.

संपादक बोर्नस्टीनच्या मते, “वियाग्रा हे आधुनिकतेचे प्रतीक आणि लक्षण होत आहे, जो एक प्रकारचा कवेत आलेला युटोपिया वाटतो. असा युटोपिया की जिथे आपल्या जीवनातून काही बाह्य गुंतागुंती काढून टाकण्यात आपण यशस्वी ठरलो तर सारे काही शक्य आहे.” बोर्नस्टीन पुढे म्हणतो, “वियाग्रा हे आता भांडवलशाही समाजाचे औषधीरूपातील मादकद्रव्य आहे. ते अशा स्वरूपाचे क्षमतापूर्ण औषधीरूपातील मादकद्रव्य आहे की ते नेहमीच आनंदाच्या उच्चतर स्तराचे आणि विकासाचे प्रतीक राहील, ह्याची खुद्द सरकारचीच संपूर्ण खात्री पटलेली आहे!”

वियाग्रा मानवी लैंगिक इच्छांना जास्त उद्दीपित करते की त्या नव्याने निर्माण करते? कामजीवनात ‘नैसर्गिक’ काय असते? एकदा पुरुषाचा पुनर्निर्मितीचा शारीरिक क्षमतेच्या धडधाकटपणाचा काळ संपून गेला, पुरुषामधील (एकूण माणसामधील) लैंगिक शक्ती जर निसर्गच कमी करत असेल तर वियाग्रासारख्या उत्तेजक व मादक पदार्थाच्या जोरावर ‘ज्येष्ठ नागरिकां’चा नैसर्गिक जीवनक्रम बदलणे हे अनैसर्गिक नव्हे काय? असे प्रश्न या पुस्तकाच्या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. वियाग्राबरोबरच लेविट्रा (Levitra) आणि सियालीस (Cialis) या मादक उत्तेजक द्रव्यांचीही चर्चा यात आहे.

‘कुवेत गल्फ युनिव्हर्सिटी फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी’सारख्या जवळपास कर्मठ विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागात असा विषय शिकवला जाणे, तेथील तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकाने पुस्तक लिहिणे आणि डच प्रकाशकाने ते प्रसिद्ध करणे, हे सारेच अतिशय धाडसाचे काम आहे.

संपादक बोर्नस्टीनच्या मते, लैंगिक क्षमताऱ्हासावर वियाग्रा हे इतिहासातील सर्वाधिक वेगवान विक्री-खपाचे औषधीद्रव्य असल्याचे सिद्ध झाले आहे. वियाग्रा हे आता केवळ एक वैद्यकीय घटित उरलेले नाही तर ते एक सांस्कृतिक प्रतिष्ठेचे चिह्न, प्रतीक बनले आहे. वियाग्रा आता आधुनिक जीवनशैलीचे प्रतीक बनले असून ते आता भांडवलशाही समाजाची संपूर्ण खात्री पटलेले मादकद्रव्य म्हणून सामोरे येते. त्याचे सामाजिक आणि सांस्कृतिक परिणाम फक्त लैंगिकतेशी जोडलेले नाहीत तर आपल्या व्यापक सांस्कृतिक समाजपटलाशी निगडित झाले आहेत. वियाग्रा ही कामोत्तेजक मादक गोळी एकूण जगण्यात एक उच्च दर्जा बळकावून बसलेली, विनाकारण प्रतिष्ठित होऊन बसलेली आढळते.

वियाग्रा हे पीफायझर कंपनीचे उत्पादन आहे. गोळीला मिळालेली प्रतिष्ठा मिथ्या आहे, असे कंपनीलाही मान्य असले तरी तिची प्रतिष्ठा उच्चभ्रू वर्तुळात अबाधित आहेच. कारण, ते लोण हळूहळू समाजात झिरपत आहे, अशी मांडणी हे पुस्तक करते.

पीफायझर कंपनीच्या दाव्यानुसार सिल्डेनाफील (sildenafil) हे संयुग कंपनीच्या संशोधकानी उच्चरक्तदाब आणि अंजायनाची लक्षणे यावर शोधले आहे. ह्रदयावर चाचण्या घेत असताना त्यांच्या लक्षात आले की हे ड्रग अंजायनापेक्षा लिंगताठरतेवर जास्त उपयोगी आहे. त्यानंतर ह्या गोळीचे उत्पादन लैंगिक उत्तेजना आणि ताठरता यावर औषध म्हणूनच केले गेले. न्यूयॉर्क स्टेटच्या कोलगेट युनिव्हर्सिटीच्या मिका लोई ह्या कार्यकर्ती व समाजशास्त्र आणि स्त्रीअभ्यास विषयाच्या प्राध्यापिकेने २००६ साली ‘The Rise of Viagra: How the Little Blue Pill Changed Sex in America’ हे पुस्तक लिहिले.

टीका व चिकित्सा…

पीफायझरने पुरुषत्वाची परिभाषा बदलली. पूर्वी ज्याला ‘नपुंसकता’ म्हटले जात होते त्यालाच आता ‘ताठरतेची अकार्यक्षमता’ (Erectile Dysfunction = ED) असे गोंडस नाव दिले. आजाराचे किंवा मानसिकतेचे नावच बदलले गेल्याने उपाय, उपचारही बदलले गेले. वैद्यकीय क्षेत्राने उत्तेजक वियाग्राच्या व तत्सम वस्तूच्या विक्रीसाठी आणि त्यांच्या नफेखोरीसाठी वैद्यकीय क्षेत्राची सारी परिभाषाच बदलून तिला जुळवून घेतले.

जैव-वैद्यकीय क्षमतांच्या निकषांच्या आधारे वियाग्रा खात्रीशीर इलाज असल्याचे भासवण्यात वियाग्राची निर्माती कंपनी पीफायझर यशस्वी झाली. पण कंपनीने कामभावनेच्या मानसशास्त्रीय, सामाजिक, भावनिक आणि लैंगिक कार्यक्षमतेत गुंतलेल्या इतर घटकांची नोंद न घेता केवळ नफेखोरी केल्याची ‘लिबरल आर्ट्स’वाल्यांच्या गोटातून आणि स्त्रीवादी गोटातून प्रचंड टीका झाली. कंपनीने “कामभावनेला अन्नाच्या भुकेप्रमाणे केवळ एका वैद्यकीय कृतीत अवनत” केले. पुरुषत्व ही निखळ यांत्रिकीची, रासायनिक अभियांत्रिकीची, नळ-दुरुस्ती कारागिरीची किंवा एखादी हायड्रॉलिकी समस्या असावी, तशी पुरुषत्वाची समस्या यंत्रवत मानली. पुरुषत्वाच्या प्रतिमेला “तंत्र-घट्ट” साच्यात बसवले आणि वियाग्रा हा उपाय सुचवला. पण माणसाला लैंगिक यंत्र बनवण्यात माणसाचे मूलभूत मूल्य मारले, अशी काटेकोर टीका कंपनीवर झाली.

वियाग्राचा प्रभाव

मेथ आणि वियाग्रा वापरणाऱ्यांचा जो काही अभ्यास झाला त्यानुसार या दोन्हींमुळे अनेक लैंगिक गुप्तरोगांचा उगम त्यांच्यात आहे. त्याचप्रमाणे ही दोन्ही ड्रग्ज स्त्री-पुरुष समलिंगी सेक्ससाठी वापरले जातात. त्यामुळे हृदयविकार, उच्चरक्तदाब, आक्रमकता, हिंसकता, सहनशीलतेचा अभाव, क्रोध इत्यादींनी ग्रस्त होतात.वियाग्रा वापराचा एक दुष्परिणाम म्हणजे सततचे आणि वेदनादायक लिंग उत्थापन (priapism). हे किमान चार तास ते चोवीस तास किंवा अधिक काळापर्यंत असू शकते. पुरुषाची लिंग उत्थापनावस्था गेली नाही तर त्याला कायमची उत्थापन अकार्यक्षमताग्रस्तता येऊ शकते.

वियाग्रामुळे अमेरिकेत व युरोपात ‘पार्टी अँड प्ले’ (Party and Play) ही लैंगिक मजावादी संस्कृती फोफावली (तशी ती मानवजातीत नेहमीच होती) पण आज तिला केवळ उच्चभ्रू, श्रीमंत व अतिश्रीमंत वर्गातच प्रतिष्ठा मिळाली आहे असे नाही तर भारतासारख्या विकसनशील (म्हणजे थोडासा श्रीमंत आणि बराचसा गरीब + दरिद्री) देशात सामान्य नागरिकांमध्येही प्रतिष्ठित होत आहे.

वियाग्राचा भारतीय बाजार

संपादक बोर्नस्टीन म्हणतो तसे लैंगिक क्षमताऱ्हासावर वियाग्रा हे इतिहासातील सर्वाधिक वेगवान विक्री-खपाचे औषधीद्रव्य असल्याचे सिद्ध झाले आहे, हे विधान आता भारताबाबतही खरे आहे. भारत ही जागतिक महासत्ता बनते आहे ते मुख्यतः ग्राहक या नात्याने. वियाग्राला येथे प्रचंड मोठी बाजारपेठ मिळाली आहे. पूर्वी ही गोळी किंवा अशी लैंगिक उत्तेजके त्यांच्या महाग किंमतीमुळे केवळ राजेरजवाडे, संस्थानिक, धनिक यांना उपलब्ध होती; ती आता सामान्य माणसाच्या आवाक्यात आली आहेत.

भारतातही ही गोळी आता सांस्कृतिक प्रतिष्ठेचे, आधुनिक जीवनशैलीचे प्रतीक बनली असून वियाग्राने भारतीय बाजार ताब्यात घेतला आहे, हे वास्तव आहे. भारतात ह्या आधुनिक पाश्चात्त्य वियाग्राचे आगमन ह्या शतकाच्या सुरुवातीस कायदेशीर करण्यात आले. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने रणबक्षी, झायडस-कॅडीला हेल्थकेअर आणि टॉरंट फार्मास्युटिकल्स ह्या मुख्य कंपन्यांना परवानगी दिली आहेच. झायडस-कॅडीलाने पेनेग्रा तर रणबक्षीने कॅव्हेर्ता (Caverta) चे उत्पादन सुरू केले. डाबरसारख्या आयुर्वेदिक कंपन्याही या उद्योगात अग्रेसर आहेत. आणखी जवळपास ३० कंपन्यांना परवानगी मिळेल, असा अंदाज आहे.भारतीय ग्रामीण आणि शहरी दोन्ही ठिकाणी वाढती मागणी आहे. किमान पाचशे ते आठशे कोटींचा हा धंदा आहे. पीफायझरच्या अस्सल वियाग्रा गोळीची भारतीय किंमत दोन हजार ते पाच हजार रुपये दरम्यान मिळते. तर भारतीय वियाग्रा अतिशय स्वस्त आहे.

जगात सर्वत्रच पसरलेले आजार म्हणजे मधुमेह, उच्चरक्तदाब, मज्जातंतूचे आजार, डिप्रेशन, नैराश्य इत्यादी. लैंगिक उत्तेजना न होणे हे वियाग्रा लोकप्रिय होण्यामागील प्रमुख्य कारण आहे. ह्या कारणामागे नवभांडवलीकरणामुळे जीवनाला आलेले भयानक धावपळीचे स्वरूप हे मुख्य कारण आहे.

वियाग्राचे प्रकार

वियाग्राच्या अनेक प्रकारच्या गोळ्या भारतीय बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. जेनेग्रा (Genegra), कामाग्रा (Kamagra), विगोरा (Vigora) ह्या साऱ्यात Sildenafil Citrateहे समान द्रव्य आहे. तसेचअव्हेनाफील (Stendra), सिल्डेनाफील (Viagra), तडलाफील (Cialis), वर्डेनाफील (Levitra, Staxyn).

पीफायझरने ग्राहकांच्या सुरक्षित खरेदीसाठी स्वतःचे संकेतस्थळ (www.viagra.com) सुरू केले आहे. अर्थात सर्व प्रकारची शास्त्रीय माहिती आणि अनेक धोक्याचे इशारे व डॉक्टरांचे सल्ले घेण्याचे उपदेशही त्यावर आहेत. व्यवसाय व धंदा यांच्या नीतिशास्त्रानुसार पीफायझरची भूमिका योग्य आहे.

वियाग्रीकरणाकडे वाटचाल

ह्या पुस्तकाच्या निमित्ताने वियाग्राबाजाराचा धोका आणि त्यातून उद्भवणारे जगण्याची वियाग्रीकरणाकडे होत असलेली वाटचाल हा मुद्दा मी अधोरेखित करू इच्छित आहे. वियाग्राचे अनेक पैलू ह्या पुस्तकात आहेत, पण भारतीय संदर्भात त्यांची मांडणी करता येणे शक्य आहे. ह्या गोळ्या अगदी खेडोपाडी उपलब्ध झाल्या, प्रौढ-वयोवृद्धांप्रमाणे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थीवर्गही त्यांचा ग्राहक बनला आणि बाजार विस्तारला, व्यापारधंदा वाढला. पण सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात अशा उत्तेजक गोळ्या काही नैतिक समस्या निर्माण करतात. त्याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे, असे मला वाटते. अश्या गोळ्यांनी युरोप-अमेरिकेत जशी ‘पार्टी अँड प्ले’ ही छुपी लैंगिक मजावादी संस्कृती निर्माण झाली तशी भारतातही निर्माण झाली आहे. कामसंबंधाच्या नीतिशास्त्राचे स्वरूप लक्षात घेऊन वियाग्रीकरणाची चर्चा करता येईल, असे मला आढळते.

कामसंबंधाचे नीतिशास्त्र

कामानंद व कामसमाधान या दोन्ही हेतूंमधून कामसंबंधाचे नीतिशास्त्र निष्पन्न होते. मानवी लैंगिक वर्तनाचा समावेश असलेल्या मानवी लैंगिकतेच्या सर्व पैलूंचे परीक्षण नैतिक दृष्टिकोनातून करणे हे कामसंबंधाच्या नीतिशास्त्राचे (Sexual Ethics, Sex Ethics, Sexual Morality) सर्वसाधारण स्वरूप म्हणता येईल. विवाहपूर्व, विवाहोत्तर, विवाहित स्थितीतील लैंगिक संबंधातून लिंगभेद आणि सत्तास्पर्धा कशी व्यक्त होते, त्याचा वेध घेणे हा हेतू कामनीतिशास्त्र साध्य करते. व्यक्तिगत आणि व्यापक सामाजिक आरोग्यावरही लिंगभेद आणि सत्तास्पर्धा कशी परिणाम करते, याचाही शोध ते घेते.

मानवी जीवन गुणवान, शुभ पातळीला नेण्यात मानवी लैंगिकता कोणते योगदान देते? कामकृती करताना कोणती नैतिक बंधने पाळणे आवश्यक आहेत आणि कोणती अनिवार्य आहेत? आपली कामकृती व आपले कामसमाधान साधताना समाजातील इतरांशी संवाद कसा साधावा? त्याकरिता कोणती नैतिक जबाबदारी पार पाडावी? याची मांडणी कशी करावी? यांचा समग्र व साकल्याने विचार करणे हा लैंगिकतेचा आदर्शवादी शोध आहे.

भारतीय कामनीतिशास्त्र

भारतात कामनीतिचा एकात्म, बांधेसूद विचार आहे पण तो वर्ण-आश्रम आणि पुरुषार्थ अशा तीन व्यवस्थांच्या आणि कठोर पुरुषप्रधान चौकटीत बंदिस्त केलेला आढळतो. बंदिस्त असल्यामुळेच व्यापक सर्व समाजाला, जातीजमातींत लागू पडेल, अशी नैतिकतेची खुली परिस्थिती, मुक्त अवकाश तेव्हाही नव्हता आणि आजही खूपसा उपलब्ध नाहीच नाही.

धर्म, अर्थ, काम व मोक्ष या पुरुषार्थ व्यवस्थेत ‘काम’ एका बाजूला विश्वाचे आदिबीज (उदाहरणार्थ नारदीयसूक्त: ऋग्वेद १०.१२९) आणि माणसाचा व्यक्तिगत पुरुषार्थ बनला तर दुसरीकडे षड्रिपूंमध्ये ‘काम’ हा मुख्य शत्रू आहे. ही कामाची अतिशय उन्नत आणि अतिशय अधोगत अशी दोन टोके आढळतात. ह्या ‘काम’चे स्वरूप वात्स्यायनाचे ‘कामसूत्र’, इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांचा ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ आणि कॉ.शरद पाटील यांची ‘दासशूद्राची गुलामगिरी’ व इतर ग्रंथ अशा तीन मराठीतील ग्रंथांत दिसून येतात. अन्यही बरीच इंग्लिश पुस्तके आहेत, पण ती सारी आणि राजवाडे व शरद पाटील यांची विवेचने आणि मते विस्तारभयास्तव वगळणे भाग पडत आहे.

‘कामसूत्रे’ या वात्स्यायनमुनींच्या प्राचीन ग्रंथातील कामनीति पाहू. हा ग्रंथ इ.स.पू.दोनशेच्या दरम्यान लिहिला गेला. भारतीय साहित्यविश्वात कामविषयक (आणि एकूण) सर्व ज्ञानाचे साहित्य अतिशय अवघड रचनेत, किचकट रीतिने, (लोकभाषा प्राकृतऐवजी) संस्कृतात लिहिले गेल्यामुळे पुरुषार्थ म्हणून ‘काम’चे स्वरूप स्पष्ट करणारा ‘कामसूत्रे’ हा ग्रंथ जनलोकांसाठी जणू काही गुप्तच झाला. परिणामी त्यात नवीन सुधारणा, नवा तपास, संशोधन, प्रगती काहीच करणे शक्य झाले नाही, प्रागतिकता शून्य झाली. विस्तारभयास्तव या ग्रंथाची अधिक माहिती देणे शक्य नाही, पण थोडक्यात मुख्य प्रस्तुत संदर्भातील काही वैशिष्ट्ये सांगतो.

पहिले वैशिष्ट्य लेखकाचे म्हणजे वात्स्यायनाचे. वात्स्यायन हे मुनी होते, ऋषी नव्हते. ऋषी व मुनी ह्या दोन संकल्पना व त्यांची भिन्न असलेली जीवनशैली ह्यात भारतीय तत्त्ववेत्त्यांनी फरक केलेला आहे. ऋषी म्हणजे गृहस्थाश्रमी विवाहित गुरु आणि मुनी म्हणजे जन्मसिद्ध ब्रह्मचारी गुरु. वात्स्यायन हे मुनी होते, पण त्यांनी उत्तम गृहस्थाश्रमी जीवनाची रचना सिद्ध केली! हा उत्तम विरोधाभास म्हणावा .. !

दुसरे वैशिष्ट्य असे की, वात्स्यायन मुनींची ‘कामसूत्रे’ लैंगिकतेकडे पुरुषार्थ आणि रिपु दोन्ही अर्थाने पाहून चिकित्सा करतात. वात्स्यायन यांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे चार वर्ण, धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरुषार्थ, ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम हे चार आश्रम आणि शंभर वर्षाचे जीवन हा आराखडा यांना मान्यता दिली. पण परिभाषा बदलली….! म्हणजे काय केले ? तर —

वात्स्यायनाची त्रिसूत्री

वात्स्यायन मुनींच्या मते धर्म, अर्थ, काम हे त्रिवर्ग आहेत; बाल्यावस्था, युवावस्था आणि वृद्धावस्था अशा तीन जीवनावस्था आहेत आणि त्यांचेच पालन करण्याचे माणसाचे कर्तव्य स्पष्ट आहे. ‘अर्थ-काम’ वर ‘धर्मा’चे नियंत्रण असावे, ही कामनीति आहे. मोक्ष ऐच्छिक आहे. आयुष्य १०० वर्षांचे आहे. ०१ ते १६ ही बाल्यावस्था (धर्मसाधना : ब्रह्मचर्याश्रम), १७ ते ७० ही युवावस्था (कामसाधना : गृहस्थाश्रम) आणि ७०+ = वृद्धावस्था (धर्म व मोक्ष यांचे अनुष्ठान : संन्यासाश्रम). कामसाधनेत अर्थसाधना गृहीत धरली आहे.

इथे १७ ते ७० ही युवावस्था ५४ वर्षांची आहे. म्हणजे ७०पर्यंत युवावस्था मानली आहे. इतर ग्रंथांतील संकेतांनुसार २५पर्यंत ब्रह्मचर्याश्रम, ५०पर्यंत गृहस्थाश्रम, नंतर ५१-७५ वानप्रस्थ, ७६+ हा संन्यासाश्रम समजला जातो. या हिशेबानुसार २६ ते ५० ही २५ वर्षे गृहस्थाश्रमाची मानली जातात, तर वात्स्यायन ह्यांच्या मते गृहस्थाश्रम हा ५४ वर्षांचा आहे! आणि ही वर्षे उपभोगासाठी आहेत…!!

काम’ची व्याख्या

कान, त्वचा, डोळे, जिव्हा, नाक या पाच इंद्रियांच्या इच्छांनुसार शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या विषयांच्या उपभोगाची प्रवृत्ती म्हणजे ‘काम’ होय (१.२.११). ही तात्त्विक व्याख्या आहे, इतरही काही व्याख्या आहेत पण त्या व्यावहारिक म्हणजे लिंगभेद पक्षपाती – स्त्रीउपभोगकेन्द्री व पुरुषप्रधानवर्चस्वतावादी आहेत.

समकालीन नैतिक प्रश्न

आता जर १६ ते ७० वर्षांपर्यंत कामोपभोग घ्यायचा असेल तर वियाग्राची गरज भासेल? की ‘नव्या लैंगिकतेच्या नीतिची’ किंवा ‘नव्या कामसंबंधाच्या नीतिशास्त्रा’ची गरज भासेल? की ‘ज्येष्ठ नागरिकां’च्या जीवनाच्या पुनर्रचनेची गरज आहे? वियाग्रा मानवी कामेच्छांना जास्त उद्दीपित करते की नव्याने निर्माण करते? कामजीवनात ‘नैसर्गिक’ काय असते? एकदा पुरुषाच्या पुनर्निर्मितीचा, शारीरिक क्षमतेच्या धडधाकटपणाचा काळ संपून गेला; माणसामधील लैंगिक शक्ती जर निसर्गच कमी करत असेल तर वियाग्रासारख्या उत्तेजक व मादक पदार्थाच्या जोरावर ‘ज्येष्ठ नागरिकां’चा नैसर्गिक जीवनक्रम बदलणे हे अनैसर्गिक नव्हे काय? हे सारे प्रश्न इथे लागू होतात.

प्लेटोच्या “रिपब्लिक” मध्ये सेफालस हा वृद्ध धनिक सॉक्रेटीसचा मित्र आहे. चर्चा चालू असताना तो सोफोक्लीसच्या “प्रेम वयाशी कसे अनुरूप असते?” या प्रश्नाचा संदर्भ देतो. त्या प्रश्नाचे उत्तर देताना सेफालस सॉक्रेटीसकडे जाहीर कबुली देतो की “वृद्धत्वात एक प्रगाढ शांती आणि स्वातंत्र्य यांची खोल जाण असते. वासना ताबा सोडून मुक्त होतात तेव्हा मानव केवळ एकाच स्वामीच्या जोखडातून सुटत नाही तर अनेक वेड्या मालकांच्या गुलामीतूनच स्वतंत्र होतो.” सेफालस पुस्ती जोडतो की आता त्याची कामेच्छा संपली आहे आणि तत्त्वज्ञानाच्या चिंतनासाठी तो उच्च पातळीवर पोहोचला आहे!

कामेच्छा संथगतीने शांत होत कमी होण्याच्या प्रक्रियेची रोमन तत्त्ववेत्ता आणि इतिहासकार सेनेका स्तुति करतो. तो म्हणतो, “त्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत आणि त्या क्षुधाशांतीतून थकून आपण निवृत्त झालो आहोत ही उमज किती आरामदायी असते!”

आता, केवळ कामोपभोगातच माणूस दंग राहिला तर चिंतनाचे मूल्य कसे जपले जाईल ?

संदर्भ :

  1. Andreas Ulrich, The Nazi Death Machine Hitler’s Drugged Soldiers, https://www.spiegel.de/international/the-nazi-death-machine-hitler-s-drugged-soldiers-a-354606.html Philosophy of Viagra Internet encyclopedia of Philosophy – http://www.iep.utm.edu/sexualit/ December 15, 2014.
  2. MEGAN GARBER, ‘Pilot’s Salt’: The Third Reich Kept Its Soldiers Alert With Methhttps://www.theatlantic.com/technology/archive/2013/05/pilots-salt-the-third-reich-kept-its-soldiers-alert-with-meth/276429/
  3. Norman Ohler, Inside the Drug Use That Fueled Nazi Germany https://www.history.com/news/inside-the-drug-use-that-fueled-nazi-germany
  4. https://www.theatlantic.com/technology/archive/2013/05/pilots-salt-the-third-reich-kept-its-soldiers-alert-with-meth/276429/
  5. https://en.wikipedia.org/wiki/Methamphetamine
  6. How Drugs Like Pervitin And Cocaine Fueled The Nazis’ Rise And Fall,
  7. Adolf Hitler took ‘primitive Viagra’ to have sex with Eva Braun, claims new book, https://www.telegraph.co.uk/news/worldnews/europe/germany/7170290/Adolf-Hitler-took-primitive-Viagra-to-have-sex-with-Eva-Braun-claims-new-book.html
  8. Fisher, D. G., Reynolds, G. L., & Napper, L. E. (2010). Use of crystal methamphetamine, Viagra, and sexual behavior. Current opinion in infectious diseases23(1), 53–56. doi:10.1097/QCO.0b013e328334de0b : https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC2872165/
  9. Ray Moynihan, journalist, The Rise of Viagra: How the Little Blue Pill Changed Sex in America, https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC549128/
  10. https://www.indiatoday.in/magazine/living/story/20010122-cheap-and-effective-desi-version-of-viagra-finally-in-india-775915-2001-01-22
  11. Cadila develops Penegra, India’s answer to Viagra https://www.rediff.com/business/2000/apr/13viagra.htm
  12. https://itashopo.com/search.html?key=viagra&t=nov94_16k
  13. https://www.pharmacist.com/pfizer-launches-website-purchasing-viagra-safely
  14. GOLDMAN, ALAN H. “Sexual Ethics.”A Companion to Applied Ethics. FREY, R. G. and CHRISTOPHER HEATH WELLMAN (eds). Blackwell Publishing, 2005: Black Well Reference on line – http://www.blackwellreference.com/subscriber/uid=/tocnode?id=g9781405133456_chunk_g978140513345616 December 15, 2014.
  15. Jowett, B. (ed.) Plato’s The Republic, The Modern Library Edition 1982, New York, 1941, pp. 06
  16. श्रीदेवदत्त शास्त्री, “कामसूत्रम्” (‘जयमङला’ टीका सहित),चौखम्बा संस्कृत संस्थान, वाराणसी, रीप्रिंट २०१२, मूल्य रु. ४२५/-, ISBN 8186937528.
  17. श्रीनिवास हेमाडे, लैंगिकता: तात्त्विक आणि नैतिक दृष्टिकोनातून,काम’ स्वातंत्र्यपर्व, “उद्याचा मराठवाडा” दिवाळी २०१९, अतिथी संपादक : उत्पल व. बा., संपादक व प्रकाशक : राम शेवडीकर, नांदेड, पाने १४ ते २१.
  18. श्रीनिवास हेमाडे, कामसंबंधाचे नीतिशास्त्र, तत्त्वभान, लोकसत्ता, १९ डिसेंबर २०१४.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.