फिरून एकदा स्त्रीमुक्ती

फिरून एकदा स्त्रीमुक्ती … 

गेली कमीतकमी १० वर्षे स्त्रीमुक्तीची चळवळ आपल्या देशात चालू आहे. पण स्त्रीमुक्तीविषयी, किंवा असे म्हणूया की त्या विषयाच्या व्याप्तीविषयी, आपणा बहुतेकांच्या मनांत संदिग्धता आहे. आपल्या स्त्रीमुक्तीविषयीच्या कल्पना अद्याप धूसर किंवा अस्पष्ट आहेत. 

बहुतेक सर्वांच्याच कल्पनेची धाव स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांनी स्त्रियांना घरकामात मदत करून त्यांची ढोरमेहनत कमी करावी आणि त्यांना आजच्यापेक्षा जास्त मानाने वागवावे ह्यापलीकडे जात नाही. ( वरच्या समजाला मदत म्हणून काही ज्येष्ठ समंजस स्त्रिया स्त्रीपुरुषसंबंधांमध्ये पुरुष बेजवाबदारीने वागतात, पण त्यांची बरोबरी करायची म्हणून स्त्रियांनी पुरुषांसारखे बेजवाबदारीने वागू नये; आपले शील संभाळावेअसे सांगतात.) पण एवढ्याने खरोखर स्त्री मुक्त होईल? 

स्त्रियांची मुक्तता म्हणजे त्यांची कौटुंबिक किंवा वैवाहिक बंधनातून मुक्तता नव्हे, तर त्यांना मिळणाऱ्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीपासून मुक्तता. 

स्त्रियांची मुक्तता म्हणजे त्यांची घरकामापासून मुक्तता नव्हे, तर पुरुषांच्या , पुरुषजातीच्या अंकित राहण्यापासून मुक्तता. 

स्त्रियांची मुक्तता म्हणजे त्यांची जी घुसमट होते, त्यांचा जो मनांतल्या मनांत इतरांशी मूक संवाद चालतो त्यापासून मुक्तता. 

आणि, स्त्रियांची मुक्तता म्हणजे त्यांची भयापासून मुक्तता. 

भय पुरुषांच्या बलात्काराचे; भय बापाला आपल्या लग्नात त्याच्या ऐपतीबाहेर मोठा हुंडा द्यावा लागेल ह्याचे; भय सासरची मंडळी आपला छळ करतील याचे; त्यांच्या छळाची मजल आपल्याला जाळून मारून टाकण्याइतपत जाईल ह्याचे; भय उपासमारीचे; भय नवरा टाकून देईल ह्याचे; भय नवरा आपल्या चारित्र्यावर संशय घेईल, त्याच्यावर केव्हाही शिंतोडे उडवील त्याचे, आपल्यावर खोटेच आळ घेऊन कोणी तिऱ्हाईत कुटिलपुरुष आपल्याला आयुष्यातून उठवील ह्याचे; भय नवरा आपला पदोपदी आपला अपमान करील ह्याचे; तो आपल्या उरावर सवत आणील ह्याचे; भय नोकरीमध्ये बॉस नको त्या मागण्या करील ह्याचे; आणि सगळ्यात मोठे भय आपल्या अत्यंत स्वाभाविक अश्या भावना आणि नैसर्गिक अशा प्रेरणा, ज्यांना सहजप्रेरणा म्हणतात, ज्या सर्व प्राण्यांच्या ठिकाणी असतात असे सांगतात, त्या कधी चुकून, आपल्या नकळत प्रकट होतील ह्याचे. 

ह्या शेवटच्या भीतीपोटी सुसंस्कृत स्त्रीला सतत सावधानता बाळगावी लागते. त्या भीतीमुळे ती अकाली प्रौढ होऊन जाते. हसतमुख स्त्री फार क्वचित आढळते. सभासंमेलनात अशी स्त्री जेव्हा हसते तेव्हा ते हास्य बहुधा कृत्रिम असते, कृतक असते, अभिनीत असते. मानवप्राण्याचे व्यवच्छेदक लक्षण असलेले जे हास्य, तेच ती गमावून बसली आहे. ह्या अनेकविध भयांतून भारतातल्या कोणत्याही धर्माच्या सुसंस्कृत स्त्रीची सुटका झालेली नाही. 

स्त्रियांच्या ठिकाणी फक्त एकच सहजप्रेरणा असावी अशी आमच्या समाजधुरीणांची अपेक्षा आहे. ती आहे भीतीची. आदर्श स्त्री कशी असावी? — आधी ती भीरु असावी. ती नम्र असावी, तिच्या ठिकाणी अमर्याद तितिक्षा असावी, म्हणजे तिने आपल्या शरीरधारणेसाठी आवश्यक असलेल्या क्षुधातृषेसारख्या सहजप्रेरणादेखील मारून टाकलेल्या असाव्या अशी जेथे अपेक्षा आहे तेथे कामप्रेरणेचा तर तिला वाराही लागू नये असे आमच्या समाजधुरीणांना वाटत असणे अगदी स्वाभाविक आहे. 

स्त्रीच्या ठिकाणी, त्यातून पतिव्रता आर्य स्त्रीच्या ठिकाणी, भारतीय कुलीन कुमारिकेच्या ठिकाणी कामप्रेरणा ! अब्रह्मण्यम् ! असे ‘विषय’ उच्चकुलीन स्त्रीपुरुषांच्या अधःपाताला कारणीभूत होतात हे काय मोहोनीला माहीत नाही? एकान्तात, त्या वैध आणि पूर्णपणे आश्वस्त अशा वातावरणातल्या एकांतातसुद्धा, सुसंस्कृत म्हणजे घरंदाज, खानदानी  स्त्रीने आपला विनय न गमावणे, आपल्या सहजप्रेरणा दाबून टाकणे आणि ‘आलीया भोगासी असावे सादर’ अशी निरिच्छ आणि उदासीन वृत्ती धारण करून आपला देह पुरुषाच्या अधीन करणे हेच तिचे परम कर्तव्य आहे हे दिवाकर मोहोनीला माहीत नाही काय?

“मुळात स्त्रीच्या ठिकाणी बुद्धीच कमी, किंवा आहे ती प्रलयंकरा. त्यामुळे तिने एकांतात वागावे तसेच ती सर्व लोकांसमक्ष वागली तर केवढी आपत्ती ओढवेल! कोणत्याही स्त्रीला काळवेळाचे भान राहणे शक्य नाही. त्याकरिता तिने उदासीन, सर्वतोपरी विरक्त अशी वृत्ती सदासर्वकाळ धारण करावी हे बरे.” थोडक्यात तिने सजीव यंत्रासारखी, एखाद्या बोलक्या बाहुलीसारखी आपली वागणूक ठेवली पाहिजे. किंवा तहानभूक नसलेल्या निर्जीव यंत्रमानवासारखे सतत कार्यतत्पर असले पाहिजे. नवऱ्याने कितीही छळ केला तरी तो सोसला पाहिजे. ही त्यांनी निमूटपणे सोसण्याची अपेक्षा नवीन नाही. कविकुलगुरू कालीदासांच्या शाकुन्तलात जो उपदेशपर श्लोक आहे —’शुश्रूषस्व गुरून् कुरु प्रियसखीवृत्ति सपत्नीजने’ व त्यापुढे ‘भर्तुर्विप्रकृतापि  रोषणतया मा स्म प्रतीपं गमः’ वगैरे, त्यामधून त्या अपेक्षेचे प्रतिबिंब उमटले आहे. आणि तत्कालीन समाजमधले उच्चवर्णीय स्त्रियांचे स्थान त्यांच्या आजच्या स्थानाहून वेगळे नव्हते हे स्पष्ट आहे. 

स्त्रिया  ह्या आदर्शापासून स्वतःहून जोपर्यंत विचलित होत नाहीत — ढळत नाहीत– तोपर्यंत त्या स्वतः आपल्याकडे पुरुषांची उपभोग्य वस्तू म्हणून पाहतात असे म्हणणे भाग आहे. आणि म्हणून पुरुषांनी त्यांच्याकडे केवळ उपभोग्य वस्तू म्हणून पाहू नये असे म्हणणें म्हणजे आम्ही स्वतः पुरुषांच्या उपभोगासाठीच आहोत, पण पुरुषांनी मात्र आम्हाला तसे वागवू नये असे म्हटल्यासारखे आहे व त्यामुळे व्यर्थ आहे. 

स्त्रीपुरुषांनी  एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याच्या आणाभाका जोपर्यंत घेतलेल्या नाहीत तोपर्यंत त्यांना कोणी जाब विचारू नये हे स्वाभाविक नाही काय ? पण सध्या काय परिस्थिती आहे? एखाद्या मुलीला पसंत करणारा पुरुष जर आयुष्यभर भेटला नाही तर तिला आपल्या इच्छा कायमच्या मारून टाकाव्या लागतात. कोणत्या तरी अनाम पुरुषाच्या नावाने आपले शील सांभाळण्यासाठी जन्मभर झुरावे लागते. ही त्यांची स्थिती त्यांचा आपल्या समाजातला दर्जा दाखवते. त्या जणू ज्यांच्यावर ‘ do not use if seal is broken’ असे लिहिलेले आहे अशा दुकानात मांडलेल्या मोहोरबंद बाटल्या आहेत ! हे त्यांचे बाटलीपण आमच्या भारतीय समाजाला सन्मानास्पद आहे की अपमानास्पद आहे?  पण आमचा पुरुषप्रधान संवेदनशून्य परंपराभिमानी समाज आपल्या श्रेष्ठ संस्कृतीच्या अभिमानापोटी त्यांचे तसेच असणे योग्य आहे असे समर्थन करतो. आणि आमच्या मूढ व त्याचबरोबर अनन्यगतिक असलेल्या स्त्रिया त्यांच्या अशा स्थितीला आपला ललाटलेख मानून चालतात ! ह्या विसाव्या शतकाच्या शेवटी सुशिक्षित स्त्रियांचे असे करणे कितपत योग्य आहे हे त्यांनीच ठरवावे. मागच्या शतकामध्ये उच्चवर्णीय विधवांची घोर विटंबना होत असे. त्यावेळी त्या त्यांच्या पूर्वजन्मीच्या पातकामुळे हे असे घडत आहे असे मानून स्वतःला भगवत्कोपभाजन आणि दैवहत समजत होत्या. आज दुरून, तटस्थपणे त्या घटनांकडे पाहून आपल्याला, आणि मुख्यतः तरुण स्त्रियांना हे समजावयाला हवे की त्या विधवांवर दैवाचा कोप झालेला नव्हता, तर त्या काळाच्या समाजधुरीणांच्या स्त्रियांच्या पावित्र्याविषयी ज्या कल्पना होत्या — मानवी समजुती होत्या — त्यांच्या त्या बळी होत्या. 

एकपतिपत्नीकत्व (monogamy) ही  गोष्ट व त्यातून उद्भवणारी ‘ जन्मोजन्मी हाच पती मिळावा ‘ ही शिकवण अत्यंत कृत्रिम अशी गोष्ट आहे. तसेच ब्रह्मचर्य , पातिव्रत्य म्हणजे थोडक्यात  योनिशुचिता ही कृत्रिम असल्यामुळे मानवी दुःखाला जन्म देणारी आहे. परंतु ह्या गोष्टींमुळे काहींचे वर्णश्रेष्ठत्व सिद्ध होत असल्यामुळे, त्या श्रेष्ठत्वभावनेमुळे मनाचे एकप्रकारचे समाधान होत असल्यामुळे, ह्यांचा पापाशी संबंध जोडल्यामुळे आणि आपले सुखदुःख किंवा पूर्ण जीवनच दैवाधीन आहे असा आपला समज तथाकथित धर्ममार्तंडांनी करून दिल्यामुळे ही दुःखमूलक गोष्ट नागरित  ( civilized ) समाजाने स्वीकारली आहे. पण त्याचबरोबर आपल्या वर्तनात अतिशय मोठा दंभ देखील आलेला आहे. ह्या दंभाला आणि दुःखाला आपण ‘सुसंस्कृतता’ म्हणत आहोत. अर्थात हे माझे व्यक्तिगत मत आहे. 

मुळात आदर्श भारतीय स्त्री ही मानवप्राणी नाहीच. तो अतिमानुष योनीतला प्राणी आहे. अशा अतिमानुष व्यक्तींना स्वतःच्या इच्छा नसतात. त्या फक्त पुरुषांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ह्या भूतलावर अवतरलेल्या असतात. तेवढ्या साठीच स्त्रियांची देहधारणा असते. त्यामुळे अशी स्त्री स्वतःमधल्या मानवी मर्यादांचा आढळ इतरांना सहसा होऊ देत नाही. तिच्यामध्ये मानवी सद्गुणांचा कसा अतिरेक आहे हे तिला सतत दाखवावे लागते. ते तिने नेहेमीच दाखवत राहावे ह्यासाठी आमच्या भारतीय संस्कृतीला तिच्यामधल्या माया, ममता, निरलसता, सहिष्णुता, निष्ठा, अहिंसा, त्याग अशा गुणांचा  सतत उदोउदो करावा लागतो. 

स्त्रियांचा एकीकडे देवी म्हणून गौरव करावयाचा, त्यांतल्या काहींना ब्रम्हवादिनी म्हणून आत्मगौरवाची अफू पाजावयाची, तर दुसरीकडे पुरुषांच्या मानाने त्यांचे स्थान नीच कसे आहे ते त्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी त्यांच्या आर्तवकाळी त्यांना अस्पृश्य मानावयाचे, असा दुटप्पीपणा आमच्या परंपरांच्या नावाखाली चालतो. सोवळ्यात असलेल्यांना त्यांच्या शब्दाचा देखील विटाळ होतो. आजसुद्धा काही धर्मनिष्ठ, संस्कृत्यभिमानी समाजधुरीणांच्या घरी हा प्रघात टिकून असेल.

एकपतिपत्नीकत्व  हा पतिपत्नींचा एकमेकांवरचा विशेषाधिकार  (privilege) तर योनिशुचिता हा सर्व पुरुषांचा सर्व स्त्रियांवरचा स्वत्वाधिकार किंवा एकाधिकार  (monopoly) आहे. त्यांचा आम्ही आमच्या पूर्ण बळानिशी प्रतिकार केला पाहिजे. कारण हे अधिकार स्वामित्व देणारे अधिकार आहेत व स्वामीसेवक संबंध हा समतेला मारक आहे. 

योनीची व पावित्र्याची जी सांगड आमच्या मनामध्ये कायमची घातली गेली आहे ती मोडून काढण्याची, त्यांची फारकत करण्याची गरज मला वाटते, कारण मी पूर्ण समतेचा चाहता आहे. माझ्या मते समता आणि पावित्र्य ह्या दोन्ही एकत्र, एका ठिकाणी नांदू शकत नाहीत. एका वस्तूला कायमची पवित्र म्हटले की दुसरी कोणतीतरी नेहमीसाठी अपवित्र ठरते. म्हणजेच एक श्रेष्ठ व दुसरी कनिष्ठ ठरते. आणि समतेच्या तत्वाला बाधा येते. समतेच्या तत्वाला बाधा आणणारे कोणतेही वर्तन त्याज्य आहे ह्या मतावर मी ठाम आहे. 

हे जे योनीचे पावित्र्य आहे ते गंगेसारखे किंवा अग्नीसारखे पावित्र्य नाही. गंगा किंवा अग्नी स्वतः विटाळत नाहीत, उलट आपल्या स्पर्शाने अशुद्ध वस्तूला शुद्ध करतात. स्त्रीयोनी हे स्त्रीचे शक्तीस्थान नसून मर्मस्थान आहे. अत्यंत नाजूक असे मर्मस्थान आहे. ते शक्तीस्थान व्हावे असे वाटत असेल तर त्याला इतर अवयवांसारखे लेखले पाहिजे. त्याचे पावित्र्य नष्ट झाले की  ते मर्मस्थान राहणार नाही. 

योनिशुचिता किंवा योनीपावित्र्य ह्या विषयाने आमच्या भाषेवरसुद्धा खोल ठसा उमटवून ठेवला आहे. तो फक्त शिव्या म्हणून वापरल्या जाणाऱ्या शब्दांतूनच व्यक्त होत नाही. कोणत्याही स्त्रीचा उल्लेख करताना तिच्या नावामागे सुश्री, कुमारी, सौभाग्यकांक्षिणी, सौभाग्यवती, गंगाभागीरथी अशी उपपदे लावताना तिच्या योनीची स्थिती व त्या स्त्रीचे पुरुषसापेक्ष स्थानच आम्ही स्पष्ट शब्दात एकमेकांना सांगत असतो. हा आमचा प्रघात तिला स्वतःला कोणत्याही आकांक्षा कश्या नाहीत हे आणि ती पुरुषांच्या नजरेला कशी दिसते तेच प्रकटपणे सांगतो. एखादी स्त्री कुमारी म्हणजे अक्षतयोनी आहे की नाही ह्याची उठाठेव पुरुषांनी का करावी? स्त्रियांनी आणि मुलींनी आपण स्वतःचा उल्लेख तसा  करणे म्हणजे आपण स्वतः पुरुषांच्या उपभोग्य वस्तू आहोत असा कबुलीजबाब देण्यासारखे आहे हे ज्या दिवशी त्यांना उमजेल तो सुदिन .

आपल्या स्त्रियांचे नखसुद्धा परपुरुषाच्या दृष्टीस पडू नये म्हणून मुसलमान लोक त्यांना कापडी बुरखा पांघरायला लावतात. आणि सुसंस्कृत हिंदु — ते आपल्या स्त्रियांना कापडी बुरख्यात गुंडाळत नाहीत. ते त्यांना लपवीत नाहीत. ते आपल्या मुलींची इच्छा असो व नसो, त्यांना विरक्तीचा बुरखा पांघरण्याची सक्ती करतात. हा वैराग्याचा अदृश्य बुरखा अतिशय तंग असतो व तो काढून ठेवण्याची सोय नसते. त्यामुळे तो आमच्या स्त्रियांच्या शरीराशी एकजीव होतो. त्यांच्या रोमरोमांत तो भिनून जातो. ह्या जुलमाच्या  वैराग्यामुळे त्यांच्या ठिकाणची इच्छाशक्ती खच्ची करणें, त्यांच्या निरुपद्रवी, सालस गाई बनविणे किंवा त्यांचे work horses बनविणे, त्यांना गुलाम बनविणे अगदी सोपे होते. तसे करता यावे ह्यासाठी काही धर्मांनी त्यांना पापाची खाण मानले तर काहींनी विकारांची जननी !

स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य फक्त तत्वतः मान्य झाले — सर्वांकडून मान्य झाले — तर हुंडाबळीच नव्हे तर सगळी अनाथालये व निवारागृहे बंद पडतील. परित्यक्तांचे प्रश्न सुटतील. कारण मुलींना विवाहवाचून राहण्याचे स्वातंत्र्य राहील. त्यांचे विवाहबाह्य यौन वर्तन लांछनास्पद मानले जाणार नाही. तरुण मुलींनाच नव्हे तर प्रौढ स्त्रियांनाही नमविण्याचा–त्यांना नामोहरम करण्याचा–हमखास मार्ग आज जर कोणता असेल तर तो त्यांच्या ‘शीला’विषयी, ‘चारित्र्या’विषयी अफवा उठविण्याचा. प्रत्यक्ष बलातसंभोगामधील क्रौर्यापेक्षाही जर स्त्रिया कशाला घाबरत असतील तर त्या आपल्या दुष्कीर्तीला घाबरतात; इतकेच नव्हे तर त्या लोकापवादाच्या भयाने क्वचित खरोखरच्या बलातसंभोगाला एकदा नव्हे तर पुनःपुन्हा बळी पडतात. (हे जळगाव प्रकरणाने आपल्या नजरेला नुकतेच आणून दिले आहे.) म्हणून सर्व स्त्रिया भयमुक्त व्हाव्या असे जर आपल्याला खरोखर वाटत असेल तर त्यांच्या ‘चारित्र्या’ची चर्चा ताबडतोब बंद करावयाला हवी. स्वतः तश्या चर्चेत भाग न घेता दुसऱ्यांनी केलेल्या चर्चेकडे दुर्लक्ष करावयाला हवे. आणि मुख्यतः स्त्रियांनी आपल्या शुद्ध चारित्र्याची शेखी मिरवावयाची नाही. 

तर स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रियांची विविध भयांतून मुक्तता. त्यांची खोट्या गौरवातून त्याचप्रमाणे जुलमाच्या  वैराग्यातून मुक्तता. ह्याचा अर्थ असा नव्हे की त्यांना बेजबाबदार स्वैराचारी व्हावयाचे आहे. नव्हे. त्यांना सगळ्या जबाबदाऱ्या पेलावयाच्या आहेत, पण त्या जबाबदाऱ्या उभय स्त्रीपुरुषांच्या राहणार आहेत; त्या सामूहिक असणार आहेत. सगळ्या क्रीडा करावयाच्या आहेत आणि त्या क्रीडाही उभय स्त्रीपुरुषांच्या राहणार आहेत. स्त्रिया पुरुषांच्या हातातले खेळणे राहणार नाहीत. एका खेळण्याचा कंटाळा आला की ते टाकून द्यावयाचे व दुसरे घ्यावयाचे असे यापुढे पुरुषांना करता यावयाचे नाही. कोणाच्याही गरज तुच्छ न लेखता स्त्रीपुरुषांनी  परस्परांच्या गरजा समजून घ्यावयाच्या आहेत. पुरुषांना विधुरत्वचा डाग लागत नाही. स्त्रियांना वैधव्याचा लागतो. तो डाग पुसावयाचा आहे. 

हे काम एका रात्रीतून होण्यासारखे नाही. म्हणून ते सावकाश, नेटाने, धीर न सोडता आणि समाजप्रबोधनाच्या अहिंसक आणि रचनात्मक मार्गाने करावे लागणार आहे. ह्या बाबतीतली उतावीळ अंगाशी येईल हे जाणून ते अत्यंत सावधपणे करावे लागणार आहे. आणि हे सर्व करीत असताना कुटुंबाचा पाय मजबूत ठेवावयाचा आहे. त्यासाठी स्त्रीपुरुषांनी  आपल्या प्रेमाच्या कक्षा रुंद करावयाच्या आहेत. (आणि मुख्यतः पुरुषांनी आपली सहिष्णुता वाढवावयाची आहे. ) कारण प्रेमाचा संकोच व असहिष्णुता ही दुसऱ्या पक्षाला बहुधा अन्यायकारक व सर्वांना दुःखकारक होत असतात. 

एक मुद्दा मांडावयाचा राहिला. त्यांचा नकाराधिकार पुरुषांनी मान्य करावा असे स्त्रियांना वाटत असेल तर स्त्रियांना आपली इच्छा व्यक्त करावीच लागेल. कारण त्यांना स्वतःच्या इच्छा आहेत हे अजून पुरुषांना माहीतच नाही. आजवर त्या क्वचित –काही समंजस पुरुषांजवळ आपली अनिच्छा व्यक्त करू शकत होत्या. पण इच्छा व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य उच्चवर्णीय स्त्रियांनी अनेकानेक पिढ्यांपासून उपभोगलेलेच नाही. त्यामुळे पुरुषांसमोर त्यांची प्रतिमा एखाद्या बाहुल्यासारखी किंवा खेळण्यासारखी आहे. त्याकरिता आता समस्त पुरुषजातीला स्त्रियांना इच्छा आहेत आणि वैराग्य आणि अनिच्छा ह्यांत फरक आहे हे जाणवून द्यावे लागेल. हे कार्य अतिशय कुशलतेने करावे लागेल. आम्हा स्त्रीमुक्तीवाद्यांची खरी कसोटी येथेच लागणार आहे.

पूर्वप्रसिद्धी: आजचा सुधारक / जून १९९७

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.