विनोबा विचार

मिलिंद बोकील ह्यांनी २००३ साली ‘ज्ञान ते सांगतो पुन्हा’ या पुस्तकासाठी लिहिलेली प्रस्तावना.

डॉ. जयंतराव पाटील यांनी विनोबांच्या या लेखसंग्रहाचे संकलन करून प्रस्तावना लिहिण्याचे काम मला जेव्हा सांगितले तेव्हा आयुष्यात पूर्वी कधीही नाही इतका प्रचंड संकोच वाटला. मन अतिशय दडपल्यासारखे झाले. संकलन करण्याचे काम अवघड नव्हते, पण प्रस्तावना लिहिणे? त्या कामाला आपण पात्र नाही एवढे आत्मज्ञान मला जरूर होते. अलंकारिक भाषेत बोलायचे झाले तर विनोबांसारख्या महात्म्याच्या लेखांची ओळख माझ्यासारख्याने करून देणे म्हणजे सूर्याला काजव्याने ओवाळण्यासारखे होय. पण डॉ. पाटील यांनी सांगितले की सध्याच्या पिढीतील एका माणसाला विनोबांबद्दल काय वाटते ते कळण्यासाठी हे काम तू करायला हवेस. तेव्हा केवळ तेवढ्याच भावनेने आणि त्यांची आज्ञा प्रमाण मानून मी ते करायला घेतले आहे.

माझ्यासारखे जे लोक जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीशी संबंधित होते त्यांचा विनोबांच्या विचारांशी संबंध येणे अटळच होते. जयप्रकाश स्वत:ला विनोबांचे शिष्य मानत आणि भूदान चळवळीसाठी त्यांनी १९५४ मध्ये स्वत:चे जीवन दान केले होते. नंतर जयप्रकाशांच्या प्रेरणेने विद्यार्थी-युवकांची जी देशव्यापी संघटना स्थापन झाली होती-छात्र युवा संघर्ष वाहिनी-त्यामध्ये विनोबा-प्रेरित ‘तरुण शांती सेने’चे युवकही सामील झाले होते. परंतु त्या काळात म्हणजे १९७४-८० या वर्षांत जयप्रकाश आणि विनोबा यांचे मार्ग एकमेकांपासून भिन्न आहेत असा एक समज तयार झाला होता. जे कार्यकर्ते इंदिरा गांधींची भ्रष्ट आणि हुकूमशाही राजवट उलथून टाकण्याच्या राजकीय आंदोलनात होते, त्यांना विनोबांचे या आंदोलनापासून तटस्थ राहणे आणि मूकपणाने सर्व घडामोडींकडे बघणे पसंत नव्हते. सरकारपक्षाने तर विनोबांनी ‘अनुशासनपर्व’ म्हणून आणीबाणीला पाठिंबाच दिला आहे असा प्रचार सुरू केला होता. त्यामुळे गांधीविचाराने काम करणाऱ्या सर्वोदयी मंडळीत दोन तट पडल्यासारखे झाले होतेच; पण सर्वसामान्य माणसांमध्येही विनोबांविषयी एक प्रकारचा संभ्रम तयार झाला होता. आणीबाणी संपल्यानंतरच्या काळात महाराष्ट्रातले पत्रकार-संपादक विनोबांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसत. विनोबा हे नुसते एक ‘बाबा’ किंवा ‘सरकारी संत’ आहेत अशा प्रकारची हवा त्या काळात तयार झालेली होती. खरे तर भूदान आंदोलन संपल्यानंतर विनोबांनी एक प्रकारचा सामाजिक अज्ञातवास स्वीकारला होता आणि लोकांच्या स्मृतीपासून ते दूर गेले होते. समोर आणले गेले ते अशाप्रकारे.

म्हणून त्या काळात आमच्यासारख्या तरुण लोकांना विनोबांचे योग्य आकलन झालेले नव्हते. विनोबा जयप्रकाशांच्या चळवळीला पाठिंबा देत नाहीत आणि त्यामागे आपले सामर्थ्य उभे करत नाहीत म्हणून आम्हांला विनोबांचा राग यायचा. तसे त्यांनी केले असते तर त्या चळवळीला वेगळीच ताकद प्राप्त झाली असती असे आम्हांला वाटत होते. पण तसे न झाल्याने विनोबांकडे आम्ही गंभीरपणे पाहिलेच नाही.

त्यानंतर जसजसे वय वाढत गेले व थोडासा अभ्यासही वाढत गेला तसतसे विनोबांचे साहित्य वाचनात येऊ लागले आणि त्यांचा मोठेपणा समजत गेला. शिक्षण, धर्म, स्वराज्य, सर्वोदय इत्यादी विषयांवरचे त्यांचे लेख वाचून तर त्यांच्या विचारातली अभिनवता लक्षात आलीच; पण त्यांचे अध्यात्मावरचे लेख वाचून चित्तात सुरेख, किरमिजी उजेड पडल्यासारखे झाले. विनोबांचे साहित्य वाचताना लक्षात येत गेले की हा थोर पुरुष अफाट ज्ञानी तर आहेच, पण सर्व भूतमात्रांविषयीच्या जिव्हाळ्याने काठोकाठ भरलेला आहे; हा योगी तर आहेच पण मानवी संसाराचे आणि जीवनव्यवहारांचे त्याला अचूक ज्ञान आहे. मुख्य म्हणजे सगळ्या सृष्टीमध्ये काय तत्त्व भरून राहिले आहे याची त्याला यथार्थ जाणीव आहे. आणि त्या जाणिवेने त्याच्या सर्व लिखाणाला एक वेगळीच उंची आणि खोली प्राप्त झाली आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे आपले ज्ञान अत्यंत सोप्या, रसाळ आणि नेमक्या भाषेत कसे सांगायचे याचे वरदान त्याला लाभलेले आहे. एकाच वेळी साक्षात्कारी संत, जीवनमुक्त योगी, विद्वान आचार्य, सेवामयी कार्यकर्ता आणि प्रज्ञावंत कवी या सर्वांचा संगम त्यांच्यामध्ये झालेला आहे.

जीवन जगत असताना आपल्यासमोर निरनिराळे प्रश्न असतात. काही वैयक्तिक, बरेचसे कौटुंबिक, अनेक सामाजिकसुद्धा. त्या प्रश्नांनी आपला नेहमी गोंधळ उडालेला असतो. आपण नोकरी-धंद्याची कोणती लाईन पकडायची? शिक्षण मराठीतून घेणं चांगलं की इंग्रजीतून? हे सायन्सवाले लोक सांगतात ते खरं की अध्यात्मवाले सांगतात ते? मुळात सायन्स म्हणजे काय आणि अध्यात्म म्हणजे काय? गांधीजींचा उपदेश बरोबर की चूक? अहिंसा म्हणजे काय? दुसऱ्याशी कायम प्रेमानं वागणं शक्य आहे का? आजच्या जमान्यात स्वदेशी-स्वराज्य याला काही अर्थ आहे का? असे प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात वेळोवेळी घुमत असतात. जगात देव आहे का, हा प्रश्न तर कायमचा आहेच.

या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी समाजात जे साधू, संत, सत्पुरुष असतात त्यांच्याकडे आपण अपेक्षेने बघतो. बऱ्याच वेळा ते त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा ती आपल्याला पटतात, काही वेळा पटत नाहीत. बऱ्याच वेळा आपला गोंधळ अधिकच वाढतो. मुख्य म्हणजे कुणीही सत्पुरुष एकाच वेळी वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, राजकीय अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो असे नाही. किंबहुना खरा सत्पुरुष ‘नेति नेति’ म्हणजे मला समजत नाही, मी शोध करतोय, असेच म्हणतो.

ही मानवी जीवनातली अपूर्णता आहे आणि ती मान्य करूनच आपल्याला चालायला पाहिजे. पण आपल्या सर्व प्रश्नांची जरी उत्तरे देऊ शकला नाही तरी त्या प्रश्नांची सोडवणूक करू शकणाऱ्या एखाद्या मार्गाचे वा सूत्राचे दिग्दर्शन सत्पुरुषाने करावे असे आपल्याला जरूर वाटत असते. विनोबा हे अशा प्रकारचे सत्पुरुष आहेत. साक्षात्कारी संत धार्मिक वा आध्यात्मिक बाबींपुरतेच मार्गदर्शन करतात, समाजसुधारक सामाजिक प्रश्नांवरच उपाय सुचवतात, राष्ट्रनेत्यांचे योगदान राजकीय गोष्टींपुरते मर्यादित असते. विनोबा मात्र असे एक पुरुष आहेत की जे सर्व प्रश्नांना सारख्याच तरलतेने स्पर्श करू शकतात. त्यांच्या जवळ सर्व प्रश्नांना कवेत घेणारे एक भव्य तत्त्वज्ञान तर आहेच. पण त्या प्रश्नांची सोडवणूक करू शकणारे सूक्ष्म, नेमके असे सूत्रही आहे. या पुस्तकातील लेखांमधून त्याची प्रचीती येईल.

ज्या तरुण वाचकांना विनोबांच्या जीवनाची काही माहिती नाही त्यांच्यासाठी पुस्तकाच्या सुरुवातीलाच विनोबांच्या शब्दांतली त्यांची जीवनगाथा दिली आहे. तीमध्ये अर्थातच सर्व तपशील आलेला नाही, पण विनोबांच्या जीवनातले निर्णायक टप्पे कोणते याची माहिती होईल. अधिक तपशिलासाठी विनोबांचे बंधू शिवाजीराव भावे यांनी लिहिलेले त्यांचे चरित्र वा अन्य लेखकांनी लिहिलेली पुस्तके पाहता येतील. विनोबांचा मुख्य लौकिक आहे तो तीन कारणांसाठी. एक गांधीजींच्या शिकवणुकीचा विस्तार करणारे गांधीजींचे उत्तराधिकारी म्हणून, दुसरे भूदान आंदोलनाचे जनक म्हणून व तिसरे गीताई लिहिणारे गीतेचे भाष्यकार म्हणून. या तीन गोष्टी समजल्या की विनोबा समजले असे म्हणता येईल.

या पुस्तकात विनोबांच्या निरनिराळ्या लेखांचे संकलन आहे. मुळात हे लेख श्री. कांतीभाई शहा ह्या ज्येष्ठ गांधीवादी संपादकांनी बडोद्याहून प्रसिद्ध होणाऱ्या आपल्या ‘भूमिपुत्र’ या पाक्षिकात छापलेले आहेत. डॉ. जयंतराव पाटील व सौ. मीनाताई पाटील यांनी त्यांचा मराठी अनुवाद केला आहे. ‘भूमिपुत्र’ पाक्षिकाचे वैशिष्ट्य असे आहे की ते उघडताच त्यात पहिला लेख विनोबांचा असतो. ते लेख श्री. कांतीभाईंनी विनोबांच्या निरनिराळ्या ठिकाणी, निरनिराळ्या भाषेतल्या व निरनिराळ्या काळी केलेल्या लिखाणातून घेतलेले असतात. विनोबांचे समग्र साहित्य हे परंधाम प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहेच. त्यामुळे इथे संगृहीत केलेले लेख हे पूर्वी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वा भाषेत प्रसिद्ध झालेलेच असतील.

हे संकलन मात्र एक दृष्टी ठेवून केलेले आहे. विनोबांच्या सर्व विचारांचे सार एका ठिकाणी उपलब्ध व्हावे असा त्यामागचा उद्देश आहे. विनोबांची विचार करण्याची आणि ते सादर करण्याची पद्धत इतरांसारखी नाही. इतर लेखक लहान लहान तपशील आधी मांडतात आणि मग त्यातील सत्रशोधन काढण्याचा प्रयत्न करतात. हा काहीसा पाश्चात्त्य पद्धतीने विचार करण्याचा परिणाम आहे. याउलट विनोबांची पद्धत खास भारतीय आहे. ते सर्वात प्रथम स्थूल, व्यापक, संपूर्ण दर्शन घडवतात. आणि मग आवश्यक तसा त्याचा तपशीलवार विस्तार करतात. इतर विचारवंत लौकिकाकडून अलौकिकाकडे जातात; तर विनोबा अलौकिकाकडून लौकिकाकडे येतात. ह्या पुस्तकात तीच पद्धत कायम ठेवण्यात आली आहे.

म्हणून या पुस्तकातला पहिलाच लेख विज्ञान ब्रह्मविद्येला सिद्ध करून दाखवील हा आहे. तेच त्याचे शीर्षक आहे. विनोबा चर्चेची फोलपटं पाखडत बसत नाहीत तर शुद्ध सत्त्वच चटदिशी आपल्या हातावर काढून ठेवतात. ते असं सांगतात की ज्याला आधुनिक विज्ञान म्हणतात त्याचे आणि ज्याला ‘ब्रह्मविद्या’ म्हणजे अध्यात्म म्हणतात त्याचे उद्दिष्ट एकच आहे; ते म्हणजे जगाचे आकलन करून घेणे.

आकलन करून घेण्याच्या पद्धती भिन्न भिन्न आहेत; कारण मुळात त्यांचा ‘जग काय आहे’ या समजुतीत फरक आहे. विज्ञान हे सृष्टीला ‘जड’ मानते तर अध्यात्मविद्या सृष्टीला ‘चेतन’ मानते. त्यामुळे जडाचे म्हणजे भौतिक पदार्थांचे नियम व त्यामागील तत्त्व शोधून काढण्यात विज्ञानाला रस असतो व त्याला अनुरूप अशी त्याची पद्धती असते. या उलट मनाच्या म्हणजे चेतनद्रव्याच्या आतमध्ये वाकून चेतनशक्तीचा शोध व आकलन करून घेण्याचा मार्ग अध्यात्मविद्येने स्वीकारलेला असतो.

लोक असे समजतात की या दोन पद्धती भिन्न आहेत म्हणून विज्ञान व अध्यात्म यांचा परस्परसंबंध नाही. पण विनोबा असं सांगतात की ही दोन टोकं आहेत. विज्ञान एका टोकाकडून येतंय आणि अध्यात्मविद्या दुसऱ्या टोकाकडून. ते शेवटी येणार आहेत एकाच ठिकाणी. त्यांचा संगम होणार आहे तो मध्यभागीच. त्यांनी दोन वेगवेगळ्या टोकांकडून प्रवास सुरू केला म्हणून आपल्याला वाटतंय की दोन्ही भिन्न आहेत. पण प्रत्यक्षात तसं नाही.

विनोबांच्या ह्या सांगण्याचा प्रत्यय आज आपल्याला येऊ लागला आहे. विज्ञान ज्या तर्‍हेचे शोध लावतंय त्याद्वारे या जगाचं अधिकाधिक आकलन आपल्याला होऊ लागलं आहे. हे जग कोणत्या नियमांद्वारे चालतं हे तर आपल्याला समजत आहेच, पण त्याही पलीकडे आपली सूर्यमाला, आकाशगंगा व त्या पलीकडचं सर्व ब्रह्मांड कशा रीतीनं चालतंय त्याचेही ज्ञान आपल्याला होतंय. स्टीफन हॉकिंगसारख्या शास्त्रज्ञांनी सोप्या भाषेत जी पुस्तकं लिहिली आहेत त्या माध्यमातून हे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत येतंय.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सृष्टी जड आहे ही विज्ञानाची पारंपरिक संकल्पनाही बदलते आहे. अणूच्या अंतर्भागाबद्दल जे संशोधन होतंय त्यावरून असं लक्षात येतंय की अणूच्या अंतर्भागातील द्रव्य हे सूक्ष्म जड ‘कण’ (पार्टिकल) म्हणून तर भासतातच पण चैतन्यमय लहरी (वेव्ह) म्हणूनही भासतात. ज्याला ‘क्वांटम मेकॅनिक्स’ म्हणून ओळखले जाते त्या भौतिकशास्त्राच्या ज्ञानशाखेतील अद्ययावत संशोधनातून सृष्टी ही चैतन्यरूप आहे या भावनेला पुष्टी मिळते आहे. फ्रिट्झॉफ काप्रासारख्या लेखकांच्या साहित्यातून याची प्रचीती येते.

मात्र विनोबा एवढेच सांगून थांबत नाहीत. पुढं जाऊन ते असं सांगतात की भविष्यकाळात विज्ञान आपल्या ज्ञानाने व पद्धतीने ब्रह्मविद्येला सिद्ध करेल. आजच विज्ञानाला सृष्टीतील जिवंतपणाचे व चैतन्यमयतेचे भान आले आहे. उद्या त्याला आत्म्याचेही भान येत जाईल आणि तसे जेव्हा येईल तेव्हा अध्यात्माने किंवा ब्रह्मविद्येने जी काही तत्त्वे सांगितलेली आहेत त्याची सत्यता कळेल. अध्यात्मविद्या आज जे सांगते ते आपल्याला पटत नाही; कारण वैज्ञानिक, गणिती पद्धतीने ते सिद्ध झालेले नाही. पण वैज्ञानिक ज्ञान आणि पद्धती जसजशी प्रगत होईल तसतशी त्याची सिद्धता होईल. तशी ती करणे हेच विज्ञानाचे अंतिम उद्दिष्ट-मिशन आहे.

विज्ञानाच्या स्वरूपाचे हे यथार्थ आकलन आणि विज्ञानाच्याद्वारे ब्रह्मविद्या सिद्ध होईल हे प्रतिपादन, हे विनोबांचे सर्वश्रेष्ठ योगदान आहे असे मला वाटते. त्यांच्या सर्व तात्त्विक विचारांचा हा कळस किंवा मानबिंदू आहे. याबाबतीत विनोबा गांधीजींच्या पुढे गेलेले आहेत. गांधीजींचा आधुनिक, विशेषत: पाश्चात्त्य विज्ञानावर विश्वास नव्हता. ते त्याची जवळजवळ घृणा करीत. आधुनिक पाश्चात्त्य विज्ञानाचे व तंत्रज्ञानाचे आणि त्यातून येणाऱ्या समाजव्यवस्थेचे ते आयुष्यभर कठोर टीकाकार राहिले. पण विनोबांचे तसे नाही. स्वत: मुळात गणिती असल्याने विज्ञान नक्की काय करतंय याचं त्यांना अचूक ज्ञान होतं. प्राचीन काळापासून आजपर्यंत विज्ञानाचा सतत विकास होत आला आहे. तो पुढेही होणार असून तसा तो होणे आवश्यक आहे, त्यामुळे मानवी जीवन सुंदर बनेल अशी त्यांची धारणा आहे. मुख्य म्हणजे विज्ञान प्रयोग करून ह्या अणु-परमाणूची लीला आपल्यासमोर प्रत्यक्ष प्रकट करीत आहे. आज ह्या गोष्टी केवळ श्रद्धा ठेवून ‘मानाव्या’ लागतात. पण उद्या विज्ञान प्रत्यक्ष प्रयोगाने आणि अनुभवाने, सृष्टीत सर्वत्र ब्रह्मतत्त्व भरलेले आहे हे सिद्ध करेल असे त्यांनी सांगितले आहे. विनोबांची ही दृष्टी (इनसाइट) केवळ असाधारण अशी आहे.

हे म्हणत असताना विनोबांचा सूर परंपरावादी नाही. भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे आणि पाश्चात्त्य शास्त्रज्ञ आज जे शोध लावत आहेत ते सगळे आमच्या ऋषी-मुनींनी पूर्वीच लावून ठेवले आहेत असे आपल्याकडच्या काही मंडळींना वाटत असते. विनोबा त्यांपैकी नाहीत. त्यांना आपल्या प्राचीन विचारांचा मोठेपणा माहीत आहे. पण ते विचार कुठे येऊन थांबले आहेत हेही माहीत आहे. त्यांनी म्हटले आहे की आज विज्ञानामुळे ब्रह्मविद्येचे जेवढे स्पष्ट दर्शन आपणास होऊ शकते तेवढे स्पष्ट दर्शन प्राचीन काळातील लोकांना होत नव्हते. शिवाय भारतात अध्यात्मविद्येचा उठाव जरी झाला तरी काही काळाने ही प्रगती थांबली. नंतर अध्यात्मविद्येची वाढ झाली नाही. तशी ती व्हायला पाहिजे. विज्ञान जसे एका बाजूने पावले टाकत पुढे येत आहे तसेच अध्यात्मविद्येनेही करायला पाहिजे; म्हणजे दोहोंचा संगम लवकर होईल. विनोबा हे अशा रीतीने पावले टाकणाऱ्या आणि अध्यात्मविद्येचा विस्तार करणाऱ्या थोर पुरुषांपैकी आहेत.

विनोबांनी विज्ञानाविषयी जे लिहिले आहे ते अनुपम सुंदर आहे. भारतीय परंपरेत ‘विज्ञान’ या शब्दाचा विशिष्ट अर्थ आहे. पूर्वी मुख्यत: ‘पारलौकिक ज्ञान’ या अर्थाने तो वापरला जायचा. पण विनोबा त्याचा विशाल अर्थ लावतात, त्याची कक्षा रुंदावतात, प्राचीन व आधुनिक अशा दोन्ही अर्थांचा संगम करतात. विशेष म्हणजे मुक्त चिंतन हा जो आजच्या विज्ञानाचा गाभा आहे तीच भारतीय परंपराही आहे हे ते सांगतात. विज्ञानाबरोबर संघर्ष करण्याची भारतीय परंपरा नाही हे त्यांनी मुद्दाम सांगितले आहे. युरोपात जसा धर्म आणि विज्ञान यांच्यात संघर्ष झाला व वैज्ञानिकांचा छळ करण्यात आला, तसा भारतात झाला नाही.

शंकराचार्यांचा दाखला देऊन विनोबांनी सांगितले आहे की ज्ञान हे मनुष्याच्या इच्छेवर अवलंबून नसून वस्तूच्या स्वरूपावर निर्भर असते. आणि वस्तूच्या स्वरूपावर कुणाचीही आज्ञा चालत नाही याची जाणीव भारतीयांना होती. (‘ज्ञानं न पुरुषतंत्रम्‌, किन्तु वस्तुतंत्रम्’) आपल्याकडे वेदप्रामाण्याचा फार बोलबाला होता, पण विनोबा म्हणतात की खुद्द शंकराचार्यांनीच सांगितले आहे की अग्नी थंड आहे असे वेदांनी सांगितले तरी ते मानण्याचे कारण नाही. अर्थात वेद विज्ञानविरोधी असे काही सांगत नाहीत ही गोष्ट वेगळी. मुद्दा असा की प्राचीन विचार व विज्ञान यामध्ये विरोध नाही आणि दिवसेंदिवस वैज्ञानिक भौतिकवाद हा अद्वैतसिद्धांताच्या अगदी निकट येतो आहे. हे विलक्षण सुंदर दर्शन विनोबांनी घडवलं आहे.

मात्र विज्ञान त्याच्या क्षेत्रात काय करतंय एवढंच सांगून विनोबा थांबत नाहीत, तर विज्ञानाचा सामाजिक संदेश काय आहे हेही त्यांनी सांगितले आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे आजच्या विज्ञानाचा आग्रह ‘मनाच्या वर उठा’ हा आहे असे ते सांगतात. आणि हे त्यांनी उपनिषदांचा दाखला देऊन आपल्या विशेष शैलीत सांगितले आहे. उपनिषदात म्हटले आहे की प्रथम अन्न ब्रह्म होते, मग प्राण ब्रह्म होता, नंतर मन ब्रह्म होते आणि त्यानंतर विज्ञान ब्रह्म असेल. आजचे युग हे विज्ञानयुग आहे असे आपण सर्वजण बोलतो पण या युगात विज्ञान हेच ब्रह्म असेल हे सांगणे ही विनोबांची खासीयत आहे. इथल्या ‘ब्रह्म’ या शब्दाने दचकून जाण्याचे कारण नाही. याचा अर्थ असा की, मनुष्याच्या उत्क्रांतीमध्ये आदिम अवस्थेत केवळ जगण्याला म्हणजे अन्न मिळवण्याला महत्त्व होते. तेव्हा अन्न ब्रह्म होते. म्हणजे सर्वस्व होते. नंतर प्राणाला म्हणजे उपजत प्रेरणांना (इन्स्टिक्टना) महत्त्व आले. त्यानंतर मनाला महत्त्व येऊन माणसाच्या मनात उत्पन्न होणाऱ्या विकार-विचारांवर आधारित समाजरचना झाली, जी आज चालू आहे. मनुष्यसमाजात जात, लिंग, भाषा, धर्म, पंथ यांचे जे भेद निर्माण झाले आणि ज्यामुळे अन्याय, हिंसा, शोषण आणि दुःख निर्माण झाले; ते सर्व मानवी मनाच्या खेळामुळे. हे भेद कृत्रिम आहेत. मानवी मनाने निर्माण केले आहेत. आता विज्ञानयुगात त्या भेदांच्या पार जावे लागेल. कारण आता तुमच्या मनात काय आहे याला महत्त्व नाही तर वस्तुनिष्ठ सत्य काय आहे त्याला महत्त्व आहे. विनोबांनी सुंदर शब्द वापरला आहे, की आता ‘अपार्थिव विज्ञानयुग’ आहे. म्हणजे आता जडाची पातळी सोडून त्याच्या वर उठावे लागेल. क्षुद्र भेद टाकून देऊन हिंसा, शोषण व अन्यायरहित समाजरचना करावी लागेल. असे झाले तरच आपण खऱ्या अर्थाने विज्ञानयुगात राहायला पात्र होऊ आणि विज्ञानब्रह्माची प्राप्ती आपल्याला होईल.

विज्ञानाबाबतचा एक नेहमीचा प्रश्न किंवा संदेह असा आहे की ते ‘मूल्यरहित’ (व्हॅल्यू फ्री) आहे की नाही? त्याला काही नीती, तत्त्व ज्ञान, मूल्ये आहेत की नाहीत, की ते पूर्णपणे स्वतंत्र, स्वत:ला हवे ते करण्यास मोकळे आहे? वरवर पाहता, विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ पद्धतीमुळे ते मानवी नीतिमूल्यांच्या पार आहे, असावे असे वाटते. पण मग त्यातून क्लोनिंगसारखा प्रश्न निर्माण होतो. शास्त्रज्ञांना क्लोनिंग करून माणसे बनवू द्यायची की नाही? सध्या हा ज्वलंत प्रश्न आहे. त्यासोबतच विज्ञानाच्या योगाने जे तंत्रज्ञान निर्माण झाले व ज्यामुळे मानवी व्यवहारात हिंसा, शोषण व प्रदूषण निर्माण झाले त्यामुळे विज्ञानाला काही दिशा किंवा दृष्टी असायला हवी की नको? आणि असल्यास कोणती हे प्रश्नही आपल्यासमोर उभे राहिलेले आहेत.

या प्रश्नांचा उलगडा करताना विनोबांनी म्हटले आहे की सर्वोदयाचा मार्ग स्वीकारूनच विज्ञान उपकारक होऊ शकेल. सर्वोदय म्हणजे काय? सोप्या भाषेत, सर्वांचे भले करण्याची दृष्टी म्हणजे सर्वोदय. ज्या व्यवस्थेत कोणा ठरावीक लोकांचाच फायदा न होता सर्व मानवजातीचे भले होते, अन्याय व विषमता राहात नाही त्याला सर्वोदय म्हणता येईल. प्रथमदर्शनी सर्वोदयाचा अर्थ ‘सर्वांचा उदय’ असा वाटतो, पण त्याचा खरा अर्थ ‘प्रत्येकाचा उदय’ असा आहे. विनोबा म्हणतात त्याप्रमाणे विज्ञानामागचे सध्याचे जे पाश्चात्त्य तत्त्वज्ञान आहे ते ‘जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त भले’ असे मानणारे आहे. यामध्ये कमजोर, निराधार, गरीब लोकांचा विचार नाही. जे स्पर्धेत टिकू शकत नाहीत त्यांना जगण्याचा हक्क नाही, असे हे तत्त्वज्ञान मानते. शिवाय भौतिक सुखे पदरात पडूनही मनुष्यजीवनाला स्वास्थ्य व समाधान मिळत नाही. जगात सर्वत्र भीती आणि असंतोष पसरत राहतो. यावर उपाय म्हणजे सर्वांचेच भले झाले पाहिजे ही दृष्टी. ज्याला सर्वोदय म्हणतात. विज्ञानाला या दृष्टीची जोड दिली तर ते कल्याणकारी होईल.

या सोबतचीच दुसरी गोष्ट म्हणजे विज्ञानाने अहिंसाही स्वीकारली पाहिजे. आज वैज्ञानिक चर्चेत अहिंसेचा विचार नाही. ‘युद्ध नको, शांतता हवी’ असे तोंडाने म्हणत असताना राज्यकर्ते आणि तंत्रज्ञ मात्र विज्ञानाचा उपयोग अधिकाधिक संहारक शस्त्रे बनवण्याकरताच करत राहतात. विज्ञानाचा हिंसक वापर करूनच राज्यकर्ते सत्ता गाजवीत असतात. धर्मही विज्ञानाचा वापर करून हिंसक बनतो. अशा रीतीने विज्ञानाची आणि हिंसेची जोडी जमते. त्याऐवजी विज्ञानाचा हात अहिंसेच्या हातात दिला पाहिजे; म्हणजे मनुष्यजीवन संपन्न आणि शांतिमय होईल. विज्ञान अणूचा अभ्यास करते. अणूंची जोडणी केली तर त्यातून सृष्टी निर्माण होते; पण त्यांचे विघटन केले तर विनाश होतो. विनोबांना याचे नेमके भान आहे.

विनोबांच्या ह्या प्रतिपादनाला दुसरेही एक अंग आहे; ज्यामुळे त्यांच्या विचाराला पूर्णता येते. सर्वोदय व अहिंसा या कल्पनांचा विज्ञानाने स्वीकार केला पाहिजेच, पण या कल्पनासुद्धा विज्ञानयुगातच साकार होणाऱ्या आहेत. सर्वोदयाला आणि अहिंसेला विज्ञानयुग पोषक आहे. कारण सर्वांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करून मानवी जीवनातील दैन्य, विषमता आणि असंतोष काढून टाकण्याचे सामर्थ्य विज्ञानात आहे. तसेच विज्ञान सगळ्या जगाला जवळ आणून परस्पर स्नेहभावनेचीही वाढ करू शकते. विज्ञानामुळे सर्व जगाचे एक कुटुंब होऊ शकते आणि त्यामुळे क्षुद्र भेदभावांचा निचरा होऊ शकतो. सर्व विश्व एक आहे अशी समत्वाची भावना विज्ञानच निर्माण करू शकते. म्हणून सर्वोदय व अहिंसा हे विचार विज्ञानयुगातच सिद्ध होऊ शकतील. विज्ञानाचे हे सामर्थ्य ओळखणे हेही विनोबांच्या प्रज्ञेचे खास वैशिष्ट्य आहे.

विनोबांच्या या विचारात थोडी भर घालायचे ठरवले तर असे म्हणता येईल की, पारंपरिकरीत्या विज्ञानाने सृष्टीला जड मानले तर अध्यात्माने चैतन्यमय. आता विज्ञानाला चैतन्यमयतेचे भान येऊ लागले आहे तसेच जडतेचे म्हणजे व्यावहारिक प्रश्नांचे भान अध्यात्माला यायला हवे. आजपर्यंत अध्यात्म म्हणजे तथाकथित पारलौकिक जीवनाचा विचार असे मानले जाई. पण मानवी अस्तित्वाचे आणि त्यातील समस्यांचे प्रश्नही अध्यात्माने सोडवले पाहिजेत. संसार हा असार आहे, हे विश्व म्हणजे माया आहे किंवा देह हा खरा नव्हेच, अशा प्रकारची प्रतिपादने ही अध्यात्मविद्येला संकुचित करणारी आहेत. या उलट देह हा भौतिक व अभौतिक अशा दोन्ही गोष्टींनी बनलेला आहे, जड आणि चैतन्याचे त्याच्यामध्ये एकरूपत्व आहे आणि म्हणून जड व चेतनरूप अशा दोन्ही आकांक्षांची पूर्ति व्हायला पाहिजे असा अर्थ घ्यायला हवा. आत्म्याची भूक जशी भागायला पाहिजे तशी पोटाचीही भागायला पाहिजे. कारण ती दोन्ही एकच आहेत. पोट आणि आत्मा ह्या वेगवेगळ्या गोष्टी नव्हेत. पोटातच आत्मा आहे आणि आत्मा हेच पोट आहे. आधी पोटोबा मग विठोबा असे नव्हे किंवा आधी विठोबा मग पोटोबा असेही नव्हे. जडामध्ये जसे चैतन्य आहे तसेच चैतन्यालाही जड रूप आहे. म्हणून व्यावहारिक समस्यांचे निराकरण करणे हेही आध्यात्मिक उद्दिष्ट आहे.

विज्ञान आणि अध्यात्म यावर लिहीत असताना विज्ञानाचे कार्य काय हे जसे विनोबांनी सांगितले आहे तसेच अध्यात्म म्हणजे काय हेही वेळोवेळी सांगितले आहे. ब्रह्म, माया, पिंड, ब्रह्मांड यांची वावदूक, अगम्य व रिकामटेकडी चर्चा म्हणजे अध्यात्म असे आपल्याकडे मानले जाते; त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यामध्ये रस वाटत नाही. शिवाय अध्यात्म म्हणजे काय हे थोडेबहुत समजले तरी ते प्रत्यक्षात आचरणात कसे आणायचे हा प्रश्न राहतोच. विनोबांनी ठिकठिकाणी आणि परत परत सांगितले आहे की अध्यात्म म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मन शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. आपल्या मनात येणारे क्षुद्र, हिणकस आणि संकुचित विचार बाजूला करून ते शांत, समाधानी आणि प्रेमळ करणे म्हणजेच अध्यात्माची उपासना करणे होय. हे काम कुणाही माणसाला करता येईल. त्यासाठी मोठ्या अवजड तत्त्वज्ञानाची गरज नाही; संन्यास घेण्याची तर अजिबात आवश्यकता नाही.

विज्ञानयुग येण्याचा आणखी एक परिणाम विनोबा सांगतात. तो म्हणजे परंपरागत राजकारणाचे आणि धर्मसंप्रदायांचे दिवस संपण्याचा. राजकारण आणि पंथसंप्रदायांनी पूर्वी काही उपकारक काम केले; पण सध्या मात्र ते माणसांना तोडण्याचे काम करीत आहेत. तेव्हा त्यांना जावे लागेल हे समजावण्यासाठी विनोबांनी सुंदर दृष्टान्त दिला आहे. रोपटे लहान असते तेव्हा कुंपण त्याचे रक्षण करते; पण ते मोठे होते तेव्हा त्या कुंपणाचा अडथळा होऊ लागतो. झाडाच्या वाढीसाठी त्या कुंपणाला तोडावे लागते. राजकारण व पंथसंप्रदायाऐवजी आता विज्ञान व अध्यात्म यांची स्थापना करावी लागेल. मात्र हे सांगताना धर्म, अध्यात्म आणि पंथ-संप्रदाय यांमधील फरक विनोबांनी केला आहे. ज्याला आपण धार्मिक उपासना मानतो ती प्रत्यक्षात पंथाची व संप्रदायाची उपासना असते. धर्माचे खरे स्वरूप आपण जाणतच नाही. ते सर्व धर्मांचे एकच आहे. ते आध्यात्मिक आहे. भेद हे पंथ व संप्रदायांमध्ये असतात. कारण संप्रदाय बाह्य गोष्टींवर अधिक भर देतो तर अध्यात्म हे आंतरिक विकासावर, म्हणजे मन शुद्ध करण्यावर भर देते. एकदा मन शुद्ध झाले, लौकिक पातळीवरून वर उठले की सांप्रदायिक अवडंबराची, पूजापाठाची काहीच गरज राहात नाही.

विनोबांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की बुद्धीच्या प्रयोगामुळे एखादा धर्म तुटत असेल तर खुशाल तुटू द्यावा. जो बुद्धीची कसोटी सहन करू शकतो तोच खरा धर्म. सर्व धर्मांत अनेक प्रकारची अंधश्रद्धा आणि मिथ्याभिमान आले आहेत. बुद्धीच्या आणि विवेकाच्या वापराने ते जर खंडित होत असतील तर होऊ दिले पाहिजेत. सर्वच परंपरागत श्रद्धा व मानलेली नीती यांची वारंवार चिकित्सा झाली पाहिजे. अशा चिकित्सेतून तो धर्म शुद्ध व सिद्ध होईल. म्हणजेच त्याचे रूपांतर अध्यात्मात होईल. विज्ञान व अध्यात्म यांची एकरूपता असल्याने अशा अध्यात्मालाच विज्ञानयुगात स्थान राहील, संप्रदायांना नव्हे.

याच संदर्भात विनोबांनी ‘हिंदू’ म्हणजे कोण यावरचे आपले अप्रतिम भाष्य केलेले आहे. विनोबांचा हा लेख फार प्रसिद्ध आहे. हिंदू शब्दाचा उगम किंवा व्युत्पत्ती शोधण्याच्या भानगडीत न पडता त्यांनी हिंदू शब्दाची फोड करून सांगितली आहे. (अशा प्रकारची शब्दाची फोड करणे, ज्याला अवघड भाषेत “निरुक्ती’ म्हणतात. हे विनोबांचे खास वैशिष्ट्य आहे. दुसऱ्या एका ठिकाणी त्यांनी ‘मोक्ष’ या शब्दाची ‘मोहाचा क्षय’ अशी विलक्षण सुंदर आणि अचूक फोड केली आहे.) ‘हिंसेने दुःखी’ होतो तो हिंदू अशी ती साधी सोपी फोड आहे परंतु त्यामध्ये शेकडो वर्षांच्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे सार आलेले आहे.

विनोबांनी म्हटले आहे की हिंदू धर्म हा मुळातच मानवधर्म आहे. म्हणून त्याचा कोणताही एक ग्रंथ नाही, पंथ नाही, संस्थापक नाही. आपल्या खास शैलीत त्यांनी म्हटले आहे की हिंदू धर्माचे गाठोडे जसे कोणत्याही विशिष्ट ग्रंथाच्या रुमालात बांधलेले नाही तसे ते कोणा विशिष्ट व्यक्तीच्या खुंटीवरही टांगलेले नाही. हिंदू धर्म ईश्वराबरोबर किंवा प्रेषिताबरोबर जोडलेला नाही. अमुक केले किंवा तमुक केले तरच तो हिंदू असे त्याचे स्वरूप नाही. सहजस्फूर्त माणुसकी हे त्याचे मूळ स्वरूप आहे आणि त्याचीच आपण आठवण केली पाहिजे. अशी माणुसकी ही अहिंसेच्या पायावर उभी असते. म्हणून हिंदू माणूस हिंसा करू शकणार नाही. हिंसेने जो दु:खी होतो तोच हिंदू.

विनोबांच्या म्हणण्याचा अर्थ फार खोल आहे. आजच्या काळात तर तो फार महत्त्वाचा आहे. हिंदू शब्दाचा अर्थ लावताना विनोबा फक्त शब्दाचा खेळ करताहेत असे नाही. हिंदू मन सहजगत्या हिंसा करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. याची साक्ष शेकडो वर्षांच्या इतिहासात तर सापडेलच, पण आपल्या प्रत्येकाच्या मनात डोकावून पाहिले तरी मिळेल. याचा अर्थ भारतातील लोकांत युद्धे झाली नाहीत असा नाही किंवा इथे लोक मांसाहार करीत नव्हते असाही नाही. याचा अर्थ असा की हिंसा हा हिंदू मनुष्याचा स्थायीभाव नाही. हिंदू धर्माने तर आपल्या प्रसाराकरिता हिंसेचा वापर कधीही केलेला नाही. हिंसा घडते ती एक प्रकारच्या अनिच्छेने; नाइलाज म्हणून. गीतेची शिकवण ही अशीच आहे की आता नाइलाज आहे; हे दुष्ट भाऊबंद आता शस्त्रे घेऊन समोर उभेच ठाकले आहेत आणि यांना मारण्यावाचून गत्यंतर नाही म्हणून धनुष्य उचल.

सध्या हिंदू धर्माचे संघटन करण्याचा विचार बळावतो आहे. या संघटनाला हिंसेचे वावडे नाही. एक सामर्थ्यशाली, विजिगीषु एकसंध हिंदू समाज निर्माण झाला तरच त्याचे अस्तित्व टिकेल असे मानले जाते. या विचाराला अर्थातच इतिहासाचा काही संदर्भ आहे. गेल्या सुमारे हजार वर्षांत हिंदू समाज विस्कळीत, असंघटित असल्याने त्यावर आक्रमणे झाली, त्याचा सदोदित पराभव होत राहिला, परकी यांची गुलामगिरी सहन करावी लागली म्हणून आता तरी संघटित झाले पाहिजे असा हा तर्कवाद आहे. त्याचा मुख्य रोख इस्लामकडे आहे हे उघड आहे.

कुठल्याही समाजाने स्वत:चे अस्तित्व प्राणपणाने राखले पाहिजे आणि त्यासाठी परकीय आक्रमणाचा मुकाबला केलाच पाहिजे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. त्यात कोणताही संदेह नाही. आक्रमण वेगवेगळ्या पद्धतीचे असते म्हणून त्याचा मुकाबला वेगवेगळ्या तर्‍हांनी करावा लागतो. परकीय सैन्य चालून आले तर त्याचा मुकाबला सेनेने करावा लागेल, व्यापारी आक्रमण व्यापारी पद्धतीने परतवावे लागेल तर भाषिक आक्रमण भाषा समर्थ करून थोपवावे लागेल. खरा प्रश्न हिंसेचा आहे. आपण हिंसा करू नये हे सर्वसामान्य माणसाला पटते; पण दुसरा माणूस जेव्हा आपल्यावर चाल करून येतो तेव्हा काय? विनोबांनी एका ठिकाणी याचे उत्तर दिले आहे. ते आधी प्रश्न विचारतात की तलवारीचा मुकाबला कशाने होतो? सर्वसामान्य माणूस म्हणेल की तलवारीने! हे उत्तर काही प्रमाणात खरे आहे, पण पूर्णपणे नाही. कारण तलवारीच्या लढाईत दोघेही जखमी होण्याची किंवा मरून पडण्याची शक्यता आहे. दुसरा कोणी म्हणेल की प्रेमाने मुकाबला करावा. तलवारीसमोर हात जोडून उभे राहावे. पण हे उत्तरही खरे नाही; कारण स्वत:चा जीव घालवणे अपेक्षित नाही. विनोबा म्हणतात की तलवारीचा मुकाबला ढालीने होतो. ढाल इतकी मजबूत असते की त्यावर तलवार आपटल्यास तलवार बोथट होऊन जाते, तिचे तुकडे होतात. ढाल पुढे करण्यात वीरवृत्ती आहे, पण दुसऱ्याबद्दल शत्रुत्व नाही. स्वत:चे रक्षण करण्याची इच्छा नक्कीच आहे, पण दुसऱ्याचा संहार करण्याची नाही. ढाल पुढे केल्यावर कोणाचीच हिंसा होत नाही उलट हिंसकवृत्तीचाच पाडाव होतो. या उदाहरणातील अलंकारिक भाग सोडून दिला तर सारांश असा की आत्मरक्षण तर केलेच पाहिजे एवढेच नाही तर दुसऱ्याच्या हातातील तलवार काढून घेऊन त्याला दंडही दिला पाहिजे. पण हिंसेचे उत्तर प्रतिहिंसा असू शकत नाही.

इथे विनोबा गांधीजींच्या शिकवणुकीचा पुढे विस्तार करतात. विनोबा गांधीजींचे केवळ शिष्य नाहीत तर त्यांच्या शिकवणुकीत भर घालून ती वाढवणारे उत्तराधिकारी आहेत. बहुतेक लोकांचा गांधीजींविषयी असा समज आहे की आपल्या एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करावा असे गांधीजी सांगतात. खरे तर गांधीजींनी असे काही लिहिलेले नाही. हा त्यांच्या शिकवणुकीचा विपर्यास आहे. माणसाला प्रेमाने जिंकले पाहिजे असे त्यांनी जरूर सांगितले आहे. या उदाहरणात विनोबा असे सांगतील की दुसऱ्याने गालावर मारण्याच्या आधीच त्याचा हात वरच्यावर घट्ट पकडावा, वेळप्रसंगी पिरगाळावा पण नंतर राग न धरता क्षमा करावी. हे करण्याचे सामर्थ्य अंगात बाणवावे. यालाच अहिंसा म्हणतात. वेदान्त हे चिंतन, तर अहिंसा हे आचरण. विनोबा इथे भगवद्गीतेच्या पुढे एक पाऊल जातात.

दुसरा मुद्दा हिंदूंच्या संघटनेचा आहे. सध्या असे सांगितले जाते की हिंदू संघटित झाला तर त्याचे अस्तित्व टिकेल. आता जातिभेद, विषमता. अंधश्रद्धा इत्यादींचा नाश करून समाज एकसंध करणे असा त्याचा अर्थ असेल तर तो योग्य आहे. पण तसे न करता केवळ एक कठोर, हिंसक आणि मठाधीशांची सत्ता मानणारे संघटन असा त्याचा अर्थ असेल तर तो हिंदूंना मारक ठरेल. मुख्य म्हणजे ते इतिहासाशी विसंगत ठरेल.

इतिहासाचा दाखला असा आहे की आक्रमण पचवण्याची हिंदू समाजाची पद्धत निराळी आहे. शक, कुषाण, मोंगल, ग्रीक, रोमन यांनी संघटित आक्रमणाला संघटित राजसत्तेच्या साहाय्याने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. काही काळ ते त्यात यशस्वी झाले; त्यांची निरनिराळ्या काळात निरनिराळी साम्राज्ये बनली. पण साम्राज्ये बनली तशीच तुटूनही गेली. एक समाज म्हणून त्यांचे सातत्य राहिले नाही.

ह्या उलट हिंदू समाजाचे होते. राजकीयदृष्ट्या हा समाज संघटित झाला नाही. किंबहुना सर्वसाधारण समाज व राजशक्ती हे एकरूप नसत. समाजाची बांधणी राजकीय तत्त्वांवर न होता सांस्कृतिक तत्त्वांवर झाली. त्याचा सर्वात मोठा फायदा असा झाला की राजे नष्ट झाले तरी समाज नष्ट होत नसे. समाज आपल्या पद्धतीने चालत राही. ती चालू राहण्याची पद्धत पूर्णपणे निर्दोष होती असे नाही. माणसामाणसांत भेदभाव करून, प्रत्येकाला एकेक दर्जा बहाल करून, अलग अलग ठेवण्याची ही पद्धत होती. त्याला जातिभेदाचा कलंक कायमचा लागला गेला. पण समाज टिकून राहिला.

इथून पुढे इतिहासाचा हा दाखला लक्षात घेऊन, सर्व भेदाभेद गाडून टाकून, हिंदू समाजाची जी सर्वसमावेशक, विविधतापूर्ण, असंघटित अशी जीवनपद्धती आहे तिचाच पुरस्कार करावा लागेल. कठोर, एकछत्रानुवर्ती संघटन हे त्याचे उत्तर नाही. तसे करावे असे जर कोणी म्हणत असेल तर त्यांना इतिहास कळलेलाच नाही असे म्हणावे लागेल.

गांधी काय किंवा विनोबा काय, आपण हिंदू असण्याचा त्यांनी कधीही इन्कार केला नाही. प्राचीन हिंदू दर्शनावरच त्यांचे जीवन आधारलेले होते. मात्र त्यांची हिंदुत्वाची कल्पना ‘हिंसेने दुःखी होतो तो हिंदू’ अशी होती. आणि म्हणून अहिंसा आणि सर्वोदय या मार्गाचा त्यांनी पुरस्कार केला. त्यांनी परंपरेचा धागा तोडला नाही पण आपला धर्म व समाजाचे ते कठोर टीकाकार होते. त्यांचा उपदेश इतिहासाशी तर सुसंगत आहेच, पण विज्ञानयुगातही उपकारक आहे.

विनोबांचा संघटनेला विरोध नाही. ‘संघटन हीच अहिंसेची कसोटी आहे’ असं गांधीजींचे वाक्य त्यांनी सांगितले आहे. अहिंसेच्या संघटनेचे स्वरूप कसे असले पाहिजे याबद्दल त्यांनी सविस्तर लिहिले आहे. त्याचे सार असे की माणसामाणसांतील बंधुभाव आणि चैतन्य हाच कोणत्याही संघटनेचा प्राण असतो. माणसे परस्परांशी प्रेमाने वागतात तेव्हा त्यांची कल्याणकारक शक्ती वाढते. अभिमानी संघटन हे हिंसक संघटन होते. व्यूहरचना, रणनीती, संख्याबळ यांना शक्तीचे साधन मानण्याऐवजी मनाची शुद्धी हे शक्तीचे साधन आहे. विनोबांची सर्वच वाक्ये सुभाषितासारखी आहेत, पण एक तर कोरून ठेवण्यासारखे आहे: ‘आंदोलन विचाराला मूर्तरूप देते; तर संस्था मर्तिरूप देते’ म्हणन वैचारिक आंदोलन चालवावे पण जड संस्था करू नये.

सामाजिक विषयांवर बोलत असतानाही विनोबा आपले जे मुख्य सूत्र आहे-आत्मशुद्धी, ते कधीही सोडत नाहीत किंवा आध्यात्मिक विषयावर बोलताना सामाजिक संदर्भ विसरत नाहीत; किंबहुना सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक अशी त्रिवेणी ते कायमच गुंफत असतात. माणसाने अहंकार सोडला पाहिजे असं आपण नेहमी बोलत असतो. पण ते व्यवहारात कसे आणायचे? विनोबा सांगतात की, निरंहकारितेचा खरा अर्थ सतत काम करीत राहणे हा आहे. त्यांनी परखडपणे सांगितले आहे, की भारतातले लोक शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने निराशावादात बुडून गेले आहेत आणि निराशावादाला निरहंकार समजू लागले आहेत. कर्मशून्य व आळशी बनले आहेत. विनोबांचा आळसाला विरोध आहे. फळ ईश्वराला समर्पण केले पाहिजे. त्या फळाबद्दल अहंकार नको, पण बी हे पेरलेच पाहिजे. एक बी पेराल तर सृष्टी शतपटीने देईल पण शून्य पेरले तर शून्यच मिळेल. अध्यात्मज्ञान हे कर्मशून्यतेकडे नेते अशी ज्यांची समजूत आहे त्यांच्या डोळ्यात विनोबांचा हा लेख चांगले अंजन घालेल.

ईश्वराविषयीचे चिंतन हा तर विनोबांसारख्या संताच्या विचाराचा गाभाच असतो. संगीताच्या मैफिलीत पाठीमागे जसा तानपुरा सतत वाजत राहतो तसा हा झंकार त्यांच्या सर्व लिखाणातून ऐकू येत असतो. विनोबांची ईश्वराची जाणीव ही अर्थातच देव, मूर्ती, पूजा-अर्चा, नैवेद्य-प्रसाद अशा स्वरूपाची नाही. चराचर सृष्टीमध्ये भरून असणाऱ्या ब्रह्मतत्त्वाला ते ईश्वर समजतात. माणसाने ते परमतत्त्व ओळखावे आणि त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा हाच वेदान्त त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितला आहे आणि त्याला अनुरूप असे व्यावहारिक ज्ञानही दिले आहे. जीवनगाथा या प्रकरणाच्या शेवटी त्यांनी म्हटले आहे की ईश्वराचे तीन साक्षात्कार असतात : एक सामान्य जनतेच्या म्हणजे जनताजनार्दनाच्या रूपात, दुसरा विशाल प्रकृतीच्या रूपात आणि तिसरा अंतर्यामीच्या रूपात. तिन्ही मिळूनच परमात्म-साक्षात्कार पूर्ण होतो.

विनोबांची ही दृष्टी असामान्य आहे. ढगांच्या आड, हिशेबाच्या वह्या उघडून कोणीतरी शंख-चक्र-गदा-पद्मधारी ईश्वर बसलेला आहे अशा प्रकारची ही कल्पना नाही. तर ईश्वर ही जाणण्याची गोष्ट आहे, त्याचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे अशी ही शिकवण आहे. एका ठिकाणी त्यांनी म्हटले आहे की हिंदू धर्माची त्रिमूर्ती म्हणजे काय, तर माझ्यात सर्व जीव अधिक परमेश्वर ही पहिली मूर्ती. सर्व जीवांत मी आणि परमेश्वर ही दुसरी मूर्ती आणि परमेश्वरात मी आणि सर्व जीव ही तिसरी मूर्ती. अशा रीतीने त्रिमूर्ती सिद्ध होते. विनोबांची ही दृष्टी केवळ अद्भुत अशी आहे.

ईश्वराने मनुष्याचे जीवन दुःखी बनवलेले नाही तर आपणच ते दुःखी केलेले आहे असे ते सांगतात. एवढेच नाहीतर आपण ते दुःखी कसे केले आहे त्याचेही वर्णन करतात. सुखाची इच्छा धरण्यात चूक नाही तर वैयक्तिक स्वार्थ किंवा वैयक्तिक सुखाची इच्छा हे आपल्या दुःखाचे मूळ कारण आहे. वैयक्तिक सुखाऐवजी सगळ्यांच्या सुखाची आपण इच्छा धरली तर दु:ख राहणार नाही. याची प्रचीती आपल्याला दैनंदिन आयुष्यातही येईल. आपल्याला दुःख का होते याचे कारण दुसरा कोणीतरी आपल्या हिताचा विचार करत नाही हे आहे आणि आपल्या हातूनही तसेच होते. आपण आपल्या स्वार्थाचा विचार करत असताना दुसऱ्याच्या हिताचा विचार करत नाही. अशा रीतीने प्रत्येकजण स्वत:चा विचार करत असल्याने समाजात दुःख निर्माण होते. म्हणून सामूहिक सुख, सामूहिक कर्तव्य व सामूहिक साधना याचा पुरस्कार विनोबा करतात. यालाच त्यांनी सर्वोदय असे म्हटले आहे.

सामूहिक साधनेला दिलेले महत्त्व हेही विनोबांच्या विचाराचे एक वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यामुळे इतर साक्षात्कारी पुरुषांपेक्षा विनोबा वेगळे आहेत. पारंपरिक आध्यात्मिक साधना ही वैयक्तिक पातळीवर केली जाते. त्यामुळे वैयक्तिक जीवनाचे सार्थक होते; पण संपूर्ण समाजाचा उद्धार होत नाही. विनोबांनी ही त्रुटी नेमकी ओळखली आहे. भारतासारख्या देशाने आता सामूहिक साधना केली पाहिजे असे त्यांनी आग्रहाने सांगितले आहे.

अशा व्यावहारिक प्रश्नांचा उलगडा आणि त्यावरचे मार्गदर्शन विनोबा अनेक ठिकाणी करतात. त्यांनी लिहिले आहे की बुद्धी आणि भावना या गोष्टी परस्परविरोधी नाहीत. आपण असे समजतो (आणि बऱ्याचदा असे दिसतेही) की बुद्धिवान मनुष्य भावनाहीन असतो, तर भावनाशील मनुष्य बुद्धीच्या आधाराने चालत नाही. पण प्रत्यक्षात तसे असण्याची आवश्यकता नाही. बुद्धीची परिपक्वता म्हणजेच भावना. त्यामुळे जिथे बुद्धी आहे तिथे भावना असलीच पाहिजे आणि मुळात भावना असणे हेच बुद्धीचे लक्षण आहे. बुद्धी व भावना एक रूपच आहेत. प्रकाश व उष्णता यांचे जे नाते तेच बुद्धीचे आणि भावनेचे.

आपले मन शुद्ध करत जायचे म्हणजे आध्यात्मिक साधना असे विनोबांनी म्हटलेच आहे. ते करण्याचा व्यावहारिक मार्ग कोणता? तर गुणदर्शन, गुणग्रहण आणि गुणस्तवन. आपले आणि दुसऱ्यांचे केवळ गुणच बघायचे, त्यांचेच वर्णन करायचे, केवळ तेच अंगात बाणवायचे. दुसऱ्याचे गुण बघा हा संदेश सर्वच साधुसंतांनी दिला; पण आपण आपलेसुद्धा गुण बघितले पाहिजेत, त्यांचे कौतुक केले पाहिजे, ते वाढवले पाहिजेत असे विनोबा सांगतात. त्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर दृष्टान्त दिला आहे. ते म्हणतात, गुण हा घराचा दरवाजा आहे तर दोष ह्या भिंती आहेत. एखाद्याच्या घरात शिरायचे असेल तर भिंतीतून शिरून चालेल का? दरवाजातूनच शिरायला पाहिजे. म्हणजे एखाद्या माणसाच्या हृदयात प्रवेश करायचा असेल तर त्याच्या गुणांद्वारेच करता येईल, त्याचे दोष दाखवून नव्हे! आपल्या आध्यात्मिक चिंतनाचे सार ‘गुणग्रहण’ आहे असे विनोबा म्हणतात. कारण या दुनियेत परमात्मा गुणरूपाने प्रकट झाला आहे. प्रत्येकात काही ना काही गुण आहे. त्या गुणाचा विकास करत परमोत्कर्ष गाठणे म्हणजे परमात्म्याला स्पर्श करणे. हे किती सुंदर आहे! सगळ्या जीवनाचे सत्त्वच विनोबांनी प्रसादासारखे हातावर ठेवले आहे.

याच व्यावहारिक संदर्भात त्यांनी सांगितले आहे की सुख जे आहे ते समत्वात आहे. जास्त सुखही नाही आणि जास्त दु:खही नाही अशा अवस्थेत चित्त प्रसन्न राहते. हे स्पष्ट करण्याकरता त्यांनी रस्त्याने चाललेल्या बैलगाडीचा दृष्टान्त दिला आहे. रस्ता जर सरळ, सम पातळीवर असेल तर बैल सहजतेने गाडी ओढतात. रस्ता उताराचा असेल तर बैल वेगाने धावू लागून कपाळमोक्ष होण्याचा धोका असतो. चढण चढताना तर कष्ट होतातच. तसेच माणसाच्या मनाचे आणि समाजाचे आहे. जेथे समान रस्ता आहे, समत्व बुद्धी आहे आणि समस्थिती आहे; तेथे समाज सुरक्षित आहे आणि माणसाचे मनही सुरक्षित आहे. या विचारालाच विनोबांनी साम्ययोग असे म्हटले आहे. सगळ्या साधुसंतांनी हाच विचार वेगवेगळ्या रीतीने सांगितला आहे, पण ‘साम्ययोग’ असे संबोधून विनोबांनी त्याला वेगळ्याच उंचीवर नेले आहे.

अहिंसा आणि सर्वोदय ही गांधी आणि विनोबांच्या विचाराची मूलतत्त्वे आहेत. अलंकारिक भाषेत बोलायचे तर अहिंसा हा त्या विचाराचा प्राण आहे आणि सर्वोदय त्याचे शरीर. त्यामुळे ह्या दोन्ही विषयांवर विनोबांनी भरभरून लिहिले आहे. सर्वसामान्य माणसाला अहिंसा समजायला अडचण पडत नाही कारण ती एकंदर भारतीय जीवनाचाच भाग आहे. पारंपरिक धर्म आणि अध्यात्म अहिंसेची शिकवण देतच असतात. सर्वोदयाचा विचार मात्र नवीन आहे. तो गांधीजींपासून सुरू झाला. त्याला सामाजिक अंग आहे. त्यामुळे कदाचित तो समजायला कठीण जातो.

विनोबांनी अनेक ठिकाणी सर्वोदय म्हणजे काय हे सोप्या शब्दांत समजावून सांगितले आहे. सर्वोदयाचा शब्दश: अर्थ सर्वांचा उदय असा आहे हे अगोदर म्हटलेलेच आहे. यातील ‘सर्वांचा’ या शब्दावरच विनोबांचा जोर आहे. सर्वोदय म्हणजे कुणा एकाचा उदय आणि कुणा एकाचा अस्त असे नाही. सध्याची विकासाची प्रक्रिया ही काही लोकांची भरभराट आणि त्यामुळे बाकीच्यांची पिछेहाट या तत्त्वावर आधारलेली आहे. काहींना भरती, काहींना ओहोटी. या ऐवजी ‘सर्वभूतहिते रता:’ ही कल्पना गांधींना आणि विनोबांना अभिप्रेत आहे. ही भावना प्रत्यक्षात कशी आणायची? सर्वोदय म्हणजे सर्वांना कपडे वा भांडी वाटायची सरकारी योजना नव्हे. तर विनोबा म्हणतात त्याप्रमाणे ‘मी सर्वांमध्ये आहे आणि माझ्यात सर्व आहेत’ ही भावना. ही भावना हृदयात स्थिर होण्यासाठी ‘माझे माझे’ करायच्या ऐवजी ‘आपले आपले’ म्हणायला पाहिजे. तसे झाले की मग दुसऱ्याविषयी द्वेष वा असूया राहात नाही. मग स्वत:बरोबर सगळ्यांचेच हित चिंतण्याची भावना होते. ‘माझे माझे’ या विचाराने मन क्षुद्र होते, तर ‘आपले आपले’ म्हटल्याने विशाल होते. ह्या विशाल भावनेतूनच सर्वोदय अस्तित्वात येतो.

विनोबा हे केवळ साक्षात्कारी संत नसल्यामुळे, माणसाच्या मनात काय बदल व्हायला पाहिजे हे सांगतानाच सामाजिक पातळीवर कोणत्या योजना करायला पाहिजे हेही ते सांगत असतात. या संदर्भात स्वदेशी आणि स्वराज्य या संकल्पनांचा त्यांनी वारंवार उच्चार केला आहे. सर्वोदयाची कल्पना समजायला कठीण वाटली तरी पटायला अवघड नाही. समाजात सर्वांचेच हित पाहिले पाहिजे हे कुणालाही मान्य होईल. मात्र सध्याच्या युगात स्वदेशीसारखी कल्पना चटकन पचनी पडणारी नाही. आपल्या मनात त्याविषयी शंका उभ्या राहतात. आपल्याला असं वाटतं की इंग्रजी राजवटीत परकीय मालावर बहिष्कार घालणे योग्य होते; पण आता देश स्वतंत्र झाला आणि सर्व जगात व्यापारी देवाणघेवाण चालू असते, तेव्हा स्वदेशीचा अट्टहास कशाला?

विनोबांचे निधन १९८२ साली झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तीस-पस्तीस वर्षांचा काळ त्यांनी स्वत: पाहिलेला होता. त्यामुळे सध्याच्या काळात स्वदेशीचा वा स्वराज्याचा अर्थ काय हे सांगण्याचा अवकाश त्यांना लाभलेला होता. आत्ताच्या इतकी नसली तरी जागतिकीकरणाची प्रक्रियाही त्यांनी पाहिली होती. त्यामुळे सध्याच्या काळाचा संदर्भ त्यांना चांगला माहीत होता. मुख्य म्हणजे सध्या स्वावलंबन, स्वदेशी, स्वराज्य या गोष्टी लोकांच्या उपहासाच्या व चेष्टेच्या विषय झालेल्या आहेत हेही त्यांना माहीत होते. आजच्या परिस्थितीत स्वदेशीचा अर्थ काय हेच सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

विनोबांनी अत्यंत स्वच्छ शब्दांत लिहिले आहे की सर्वोदयाचा सिद्धांत स्वावलंबनाचा नसून परस्परावलंबनाचा आहे. जेथे गहू चांगले होत नाहीत तेथे गव्हाची लागवड करण्याचा आग्रह आपण धरणार नाही पण त्याचबरोबर रोज गहू खाण्याचा अट्टहासही करता कामा नये. तेथे भात वा ज्वारी होत असेल तर तीच जास्त खाल्ली पाहिजे. गहू खावेसे वाटले तर त्यात काही पाप नाही. बाहेरून थोडे खरेदी करून आणू, पण तिथले जीवन कायम गव्हावर अवलंबून ठेवणे धोक्याचे होईल. ज्या चीजवस्तू त्या त्या भागात व त्या त्या हवामानात पिकतात त्यावरच तिथले जीवन प्राधान्याने अवलंबून असायला हवे. ह्याचेच नाव स्वदेशी आहे. स्वदेशात याचा अर्थ भारत देशात असा नव्हे तर आपल्या स्थानिक प्रदेशात. स्वदेशीत बाहेरच्या लोकांबरोबर व्यापार-व्यवहार जरूर चालतील पण ते बरोबरीच्या तत्त्वावर चालतील आणि अत्यावश्यक असतील तेव्हाच. कापूस गावात पिकतो. तो कापूस शेकडो मैल दूर मुंबई-अहमदाबादला पाठवून त्याचे कापड बनवून ते परत गावात विकण्यात काय हशील आहे? ही व्यवस्था विचित्र तर आहेच, पण कायमस्वरूपी टिकणारी नाही. याचे प्रत्यंतर आपणाला सध्या आलेच आहे. मुंबई व अहमदाबादमधील कापड गिरण्या बंद पडलेल्या आहेत आणि विकेंद्रित पद्धतीने सर्वत्र पॉवरलूमद्वारे कापडनिर्मिती होते आहे. ज्या भागात कापूस पिकतो तिथेच प्राधान्याने वस्त्रनिर्मिती होणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य तर आहेच, पण प्रादेशिक विकासाच्या दृष्टीनेही सुसंगत आहे. आणि गावात कापड बनवणे याचा अर्थ चरखा चालवणे नव्हे, तर पॉवरलूमसारखे सुयोग्य तंत्र वापरणे होय.

सध्या जगात परस्परावलंबनाचा जयघोष चालू असला तरी प्रत्यक्षात त्यामध्ये अवजड, एककेंद्री आणि मूठभर लोकांची मक्तेदारी असलेल्या व्यवस्थाच तयार होत आहेत. एकाच अजस्र कारखान्यात प्रचंड प्रमाणावर वस्तू बनवून त्या सर्व जगभर वितरित करायच्या अशी ही व्यवस्था आहे. त्यामुळे तो उत्पादक बलदंड होतो आणि बाकी लोक त्या कौशल्यात पांगळे होतात. उदाहरणार्थ, सध्या मुलांची खेळणी जवळजवळ सर्व चीनमध्ये तयार होतात आणि तिथून सर्व जगभर जातात. असे असण्याची काय आवश्यकता आहे? प्रत्येक गावात मुलांसाठी वेगवेगळ्या तर्‍हेची खेळणी बनू शकतात. हीच गोष्ट औषधांबाबत, कपड्यांबाबत, खाद्यपदार्थांबाबत आहे. एकाच ठिकाणी आइस्क्रीम बनवून सर्व देशभर वितरित करायच्या ऐवजी गल्लीगल्लीत आइस्क्रीम बनले तर ते विविध चवींचे आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर तर होईलच, पण हजारो लोकांसाठी रोजगारही तयार होईल.

विज्ञानाची प्रगती जसजशी होईल तसतसे आपल्या लक्षात येईल की आज अस्तित्वात असलेली अवजड, केंद्रीभूत औद्योगिक व्यवस्था व्यवहार्य न राहता छोट्या स्वरूपाची, विकेंद्रित व्यवस्थाच व्यवहार्य होईल. त्याची चिन्हे दिसू लागली आहेत. स्वदेशीचा अर्थ हाच आहे. स्वदेशीचा संकुचित अर्थ आपण घेता कामा नये. विनोबासारख्यांनी तो फार विशाल करून पण नेमक्या भाषेत सांगितला आहे. ‘स्वावलंबी लोकांचे परस्परावलंबन’ असा त्याचा अर्थ आहे.

मिठापासून मोटारीपर्यंत प्रत्येक गोष्ट एकाच खेड्यात बनली पाहिजे असा त्याचा अर्थ नाही. तर जेवढ्या मीठाची व जितक्या मोटारींची समाजात आवश्यकता आहे तेवढ्याचीच पूर्ती केली जावी. बहुतेक ठिकाणी मीठ व मोटर बाहेरूनच आणावी लागेल, पण जेवढ्या मर्यादेपर्यंत शक्य आहे तेवढ्या मर्यादेपर्यंत त्या वस्तीने, भूभागाने, समाजाने स्वयंपूर्ण असायला हवे.

गांधी आणि विनोबांच्या विचारात दारिद्र्यपूजा अजिबात नाही. समाजातील दैन्य नाहीसे होऊन तो संपन्न व्हायला हवा अशीच इच्छा आहे. मात्र संपन्नतेचा अर्थ भोगविलास, उधळपट्टी किंवा शोषण असा नाही. आपल्याकडच्या दारिद्र्यात विषमताही सामावली आहे. दारिद्र्य गेले पाहिजे तसेच विषमताही. संपन्नता हवी, पण सगळ्यांसाठी; असा त्याचा अर्थ आहे.

अशीच गोष्ट स्वराज्याबाबत आहे. महात्मा गांधींना ब्रिटिश पद्धतीची संसदीय लोकशाही कधीच पसंत नव्हती. विनोबांची भूमिका तुलनेने सौम्य असली तरी दोघांचाही भर गावपातळीवरच्या लोकशाहीवर, गावोगावच्या स्वराज्यावर आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा ही भूमिका इतरांना विचित्र वाटली तरी लोकशाहीचे आजचे स्वरूप पाहता या दोघांचा दृष्टिकोन किती अचूक होता याची खात्री पटते.

विनोबा म्हणतात की इंग्रजांच्या काळात देश पराधीन होता आणि गावेही पराधीन होती. आज देश स्वतंत्र आहे पण गावे पराधीनच आहेत. स्वराज्याचे पार्सल लंडनहून दिल्लीला आले आणि मुंबई-पुण्याला, फार फार तर जिल्ह्याच्या गावाला पोहचले, पण गावोगावांत पोहचलेच नाही. विनोबांनी फार सुंदर दृष्टान्त दिला आहे. दिल्लीत सूर्योदय झाला आणि गावात तार आली की, उठा, सूर्योदय झाला आहे; तर गावकऱ्यांनी ते मानायचे काय? गावात सूर्य दिसेल तेव्हाच गावकरी मानतील की सूर्योदय झाला आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रगती, विकास, उत्कर्ष हा गावात झाला पाहिजे; तरच देशाची प्रगती झाली असे मानता येईल. गाव हे देशातील मानवी वस्तीचे मूलभूत ‘युनिट’ असल्याने गाव मजबूत झाले तरच देश मजबूत होईल. विनोबांनी स्पष्ट सांगितले आहे की दिल्ली मजबूत होत राहिली व गावे कमजोर होत राहिली तर देशाला तो मोठा धोका आहे. आज नेमके हेच होत आहे. दिल्ली-मुंबई संपन्न आणि बलदंड आहेत, गावे मात्र दरिद्री आणि दुबळी.

दुसरी गोष्ट अशी की, संसदीय लोकशाही म्हणजे सर्वश्रेष्ठ व्यवस्था, मानवी संस्कृतीचा कळस अशी काहीतरी विचित्र समजूत आपण करून घेतली आहे. संसद म्हणजे पवित्र, सर्वोच्च; तिच्या पलीकडे काहीही नाही असे मानायला आपल्याला शिकवले जाते. हा खरं तर सत्ताकांक्षी राजकीय पक्षांचा कावेबाजपणा आहे आणि आपले विचारवंत त्याला बळी पडत असतात.

गांधी आणि विनोबांचा संसदीय लोकशाहीवरचा आक्षेप दोन कारणांमुळे होता. पहिला आक्षेप म्हणजे ही पाश्चात्त्य व्यवस्था आपण जशीच्या तशी उचलली आहे. आपल्या परंपरेशी जोडून तिचे भारतीयीकरण केलेले नाही. विनोबा म्हणतात की केवळ दोनचारशे वर्षांच्या पाश्चात्त्य जीवनातून जी व्यवस्था उभी राहिली, तिची आपण आंधळी नक्कल करत आहोत. आपला हजारो वर्षांचा इतिहास कुचकामी आहे असे आपण मानू लागलो आहोत आणि ही फार मोठी चूक आहे. पाश्चात्यांची लोकशाही रचना ही ‘ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर’ म्हणजे जास्तीतजास्त लोकांचे जास्तीतजास्त हित अशी आहे. त्यांच्यात ‘हितविरोधाची’ कल्पना आहे आणि बहुमतापोटी अल्पमताचे बलिदान करण्यात चुकीचे मानले जात नाही. या उलट भारतीय परंपरेत ‘सर्वभूतहित’ ही कल्पना आहे आणि तोच लोकशाहीचा पाया असायला पाहिजे. परस्परांच्या हितामधला विरोध दूर करून सर्वानुमताने-बहुमताने नव्हे-निर्णय घेणे याला खरी लोकशाही म्हणता येईल.

दुसरा आक्षेप या लोकशाहीच्या केंद्रीकरणाला आहे. केंद्रीभूत व्यवस्था ही हिंसक असते. विनोबांनी स्पष्ट सांगितले आहे की आजच्या लोकशाहीचा अंतिम आधार लष्कर हाच आहे. हिंसेच्या आधारावर उभी असणारी लोकशाही कधीच लोकांचे कल्याण करू शकत नाही. म्हणून संसद सर्वोच्च मानण्याऐवजी लोक सर्वोच्च मानून, अहिंसक विकेंद्रित लोकसमूहांकडे स्थानिक सत्ता सोपवली पाहिजे. पश्चिमेची लोकशाही आपण स्वीकारली हे ठीक आहे; पण आता तिला पारंपरिक लोकपंचायतीची जोड द्यायला पाहिजे. विनोबांनी या संदर्भात ‘स्वराज्यशक्ती’चा उल्लेख केला आहे. लोकांमध्ये स्वराज्यशक्तीचा गुण विकसित झाला तरच खरे स्वातंत्र्य मिळाले असे मानता येईल. नाहीतर १५ ऑगस्ट हा दिवस पराधीनतेची आठवण म्हणून साजरा करावा लागेल.

यासोबत विनोबांनी हेही सांगितले आहे की संसदीय लोकशाहीमध्ये आर्थिक स्वातंत्र्याचा विचार मुळातच नसतो आणि आर्थिक स्वातंत्र्याशिवाय राजकीय स्वातंत्र्याला अर्थ उरत नाही. जो समाज अन्यायाने, विषमतेने आणि शोषणाने त्रस्त झालेला असतो त्यामध्ये लोकशाही कशी येणार?

गांधी आणि विनोबा यांनी आयुष्यभर ग्रामस्वराज्याचा पुरस्कार केला. गांधीजींची ‘हिंदस्वराज’ ही पुस्तिका आणि विनोबांची ‘स्वराज्यशास्त्र’ यांमधून त्या विचाराची माहिती कळते. आजच्या संदर्भात ग्रामस्वराज्याचा अर्थ काय? कारण दिवसेंदिवस समाजाचे शहरीकरण होत चालले आहे. पूर्वीसारखी गावे अस्तित्वात राहणार नाहीत. मुख्य म्हणजे गावांचे अस्तित्व हे आता पूर्वीसारखे स्वयंपूर्ण वेगळे न राहता एका व्यापक, वेगवान, जागतिक व्यवस्थेचा भाग बनत चालले आहे. अशा वेळी ग्रामस्वराज्याचा आग्रह धरणे योग्य आहे काय?

ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ‘ग्राम’ या शब्दाचा पारंपरिक अर्थ न घेता ‘लोकसमूह’ वा माणसांची वस्ती असा घेतला पाहिजे. ती गावात असेल वा शहरात. अशा वस्तीचे युनीट काहीही असेल : वाडी, पाडा, खेडे, गाव, मोहल्ला, गल्ली, कॉलनी, वॉर्ड, उपनगर. त्या त्या ठिकाणच्या माणसांनी स्थानिक शासन हे आपल्या हातात घेतले पाहिजे. मग त्याचे रूप ग्रामपंचायत असो वा वॉर्ड कमिटी. ‘आमच्या गावात (वस्तीत) आम्हीच सरकार’ अशी त्यांची घोषणा असली पाहिजे. ७३ आणि ७४ व्या घटनादुरुस्तीचा उद्देश तोच आहे. अर्थात हे फक्त ग्रामपंचायत चालवण्यापुरतेच मर्यादित नाही तर गावातील शिक्षण, आरोग्य, शेती, पिण्याचे पाणी, स्थानिक बाजार, साधनसंपत्ती इत्यादी सर्व बाबीही त्या समूहानेच ठरवणे याला ग्रामस्वराज्य म्हणता येईल. शहरात ह्याला मर्यादा राहील पण मध्यम आकाराच्या हाऊसिंग सोसायट्यांच्या माध्यमातूनही काही प्रमाणात असा कारभार शक्य होईल.

गांधीजींना पाश्चात्त्य व्यवस्थेविषयी तिटकारा होता; पण खरे तर युरोप-अमेरिकेतील लहान लहान गावांमधूनच आज ग्रामस्वराज्याची संकल्पना साकार होताना दिसते. आर्थिकदृष्ट्या ही गावे जागतिक व्यवस्थेचा भाग आहेत, पण स्वत:चा कारभार स्वत:च हाकतात. शाळा, दवाखाना, लायब्ररी, पोलीस, ज्युरी, फायर ब्रिगेड अशा गोष्टी गावसमूहच चालवतो. लोकशाही, इहवादी, समान नागरी पद्धतीने स्थानिक शासन चालते. या कारभारात केंद्रीय सरकारही ढवळाढवळ करत नाही. याचा अर्थ ग्रामस्वराज्याची कल्पना कालबाह्य नाही. जो समाज आज प्रगत मानला जातो आणि ज्याचे अनुकरण करण्यात आपण धन्यता मानतो त्याच समाजाने ही कल्पना अंमलात आणलेली आहे. अक्राळविक्राळ आणि बकाल महानगरे हे भारतासारख्या देशांचेच वैशिष्ट्य आहे. सुविद्य, संपन्न, लहानसे गाव हेच मानवी वस्तीचे आदर्श एकक आहे.

गावसमूह हाच विचाराचा केंद्रबिंदू असल्याने त्या समाजाबद्दल आणि त्यात करायच्या समाजकार्याबद्दल विनोबांनी वेळोवेळी लिहिले आहे. मात्र विनोबांचे ग्रामीण समाजाबद्दलचे आकलन भावुक नाही. त्या समाजातील दोषांची आणि मर्यादांची त्यांना अचूक जाणीव आहे. गावातली श्रमशक्ती आणि ज्ञानशक्ती गाव सोडून चालली आहे व त्यामुळे गाव क्षीण होते आहे याची त्यांना कल्पना आहे. मुख्य म्हणजे गाववासियांना एकमेकांविषयी प्रेम वाटत नाही आणि त्यामुळे परस्पर सुखदुःखात सामील होण्याचे थांबते आहे हे ते स्पष्टपणे सांगतात. प्रेम आणि सहयोग याच्या आधारावरच गावसमाज एखाद्या कुटुंबासारखा राहू शकेल हे त्यांनी आग्रहाने सांगितले आहे.

ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी तर विनोबांनी केलेले चिंतन असाधारण स्वरूपाचे आहे. सेवा कुणाची करायची आणि भक्ती कुणाची करायची असा कार्यकर्त्यांपुढे प्रश्न असतो. विनोबांनी सांगितले आहे की सेवा व्यक्तीची करायची तर भक्ती समाजाची करायची. व्यक्ती ही दृश्य, प्रत्यक्ष खरी गोष्ट आहे, तिची भक्ती करायला गेलो तर आसक्ती वाढते. म्हणून जे अदृश्य, अव्यक्त आहे (समाज) त्याची भक्ती करायची. सेवा मात्र अव्यक्ताची होऊ शकत नाही म्हणून ती प्रत्यक्ष, दुःखी, पीडित व्यक्तीची करायची.

दुसरीही एक फार महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. शहरी मध्यमवर्गीय कार्यकर्ता जेव्हा खेड्यात जातो तेव्हा त्याचे राहणीमान गावकऱ्यांपेक्षा उजवे असते. या फरकामुळे गावकऱ्यांशी समरस होता येत नाही. विनोबा म्हणतात की कार्यकर्त्याने आपल्या गरजा कमी कमी करत जाव्यात तर लोकांच्या गरजा व उत्पन्न वाढवीत जावे; म्हणजे गावकरी संपन्न होतील व दोघांमधला फरक मिटून जाईल. लोकांना संपन्न केले पाहिजे ही यातली शिकवण फार महत्त्वाची आहे. गांधीविचार म्हणजे दारिद्र्यपूजा अशी ज्यांनी गैरसमजूत करून घेतली आहे त्यांनी विनोबांचे हे मत लक्षात घेण्यासारखे आहे.

विनोबांचे आपल्या समाजाविषयीचे चिंतन किती सूक्ष्म आहे याचा प्रत्यय त्यांनी समाजातील त्रिदोषांचे जे वर्णन केले आहे त्यावरून येतो. कुपोषण, स्वैराचार आणि वातावरणाचे प्रदूषण असे तीन दोष त्यांनी सांगितले आहेत. यातील कुपोषण; आणि स्वैराचार म्हणजे बेशिस्त बकालपणा, असंयम हे दोष त्यांच्या नजरेत भरावेत हे साहजिक आहे. पण पर्यावरणाचे भान ठेवून त्यांनी हवा-पाण्याच्या प्रदूषणावरही बोट ठेवावे हे विशेष आहे.

सामाजिक कार्य सुरू करणे सोपे असते पण ते सदैव जिवंत, गतिमान, रसरशीत कसे ठेवायचे हा मोठा प्रश्न असतो. विनोबांनी त्या संदर्भात सुरेख मार्गदर्शन केले आहे. ते सांगतात की, कामातला जीवनरस कायम ठेवण्यासाठी व्यक्तिगत साधना आणि सामाजिक कार्य यांतील भेद मिटवून टाकावा लागेल. आपण या दोन भिन्न गोष्टी समजतो. त्यामळे आपले व्यक्तिगत जीवन आणि सामाजिक कार्य यांमध्ये ओढाताण होत असते. व्यक्तिगत आध्यात्मिक चिंतन आणि सामाजिक कर्मयोग हे दोन्ही एकच मानले पाहिजेत. म्हणजे आपली कार्ये सदैव प्राणवान राहतील. त्यांच्यात निरुत्साह, हताशा येणार नाही. याचाच दुसरा अर्थ चिंतन आणि सेवा बरोबरच चालली पाहिजेत. चिंतन हीसुद्धा सेवा आहे आणि सेवेमध्ये चिंतन केले पाहिजे.

आणखी एक गोष्ट त्यांनी सांगितली आहे की रचनात्मक कार्याची कसोटी ते व्यापक आत्मदर्शनाचे अल्प प्रयत्न बनून राहते की नाही यामध्ये आहे. रचनात्मक कामाचा नुसता बडिवार उपयोगाचा नाही. त्यातून आत्मदर्शन साधले पाहिजे.

ज्ञान आणि कर्म यांचा संबंध काय हे स्पष्ट करण्यासाठी विनोबांनी एके ठिकाणी फार सुंदर दृष्टान्त दिला आहे. मातीचा घडा आहे. आता मातीपासून घडा वेगळा आहे का? की दोन्ही एकच आहेत? विनोबा म्हणतात की दोन्ही एक आहेत असेही सांगता येणार नाही आणि दोन्ही वेगवेगळे आहेत असेही सांगता येणार नाही. त्या दोहोंमध्ये एक प्रकारचा संबंध (समवाय) मात्र आहे. असाच संबंध ज्ञान आणि कर्म यामध्ये आहे.

आध्यात्मिक आणि राजकीय विषयांवर लिहीत असतानाच भाषा, शिक्षण आणि साहित्य या विषयांवरही विनोबांनी विपुल चिंतन केलेले आहे. प्रज्ञावंत माणसाचे ते एक लक्षण असतेच. माणसामाणसांत बोलली जाणारी भाषा आणि अपत्यांना दिले जाणारे शिक्षण हे मानवी समाजधारणेचे मूलभूत घटक आहेत. म्हणूनच की काय भाषा आणि शिक्षण हे विनोबांच्या खास आवडीचे विषय होते. ते स्वत: भाषापंडित होतेच. भारतातील चौदा-पंधरा भाषा ते सहजतेने बोलू-वाचू शकतच, पण अनेक परदेशी भाषाही त्यांना येत. त्यांना प्रतिभेची अशी देणगी होती की कोणतीही भाषा त्यांना लीलया अवगत होई. अर्थात असे असले तरी मातृभाषा मराठी हेच त्यांच्या भाषिक आविष्काराचे पहिले साधन होते. आपली सर्वोत्कृष्ट साहित्यनिर्मिती ‘गीताई’ त्यांनी मराठीतच सिद्ध केली. गीताईवरून लक्षात येतेच की त्यांच्यामध्ये एक कवीसुद्धा दडलेला होता. आपल्या जीवनगाथेत त्यांनी म्हटलेच आहे, की लहानपणी त्यांना कविता करण्याची आवड होती आणि तरुणपणी काशीला गंगेच्या किनाऱ्यावरही ते कविता करत असत. पण कविता तयार झाली की गंगेला समर्पण करून मोकळे होत.

विनोबांचे भाषा, शिक्षण आणि साहित्य यासंबंधीचे विचार वेगवेगळे नाहीत. त्यांच्या इतर विचारांप्रमाणेच त्यामध्येही सुसंगती आहे. गांधी काय किंवा विनोबा काय, शिक्षणाचा उद्देश पदवी मिळवणे आणि नोकरी शोधणे हा आहे असे ते मानत नाहीत. विनोबांनी म्हटले आहे की माणसाला स्वतंत्र, स्वावलंबी बनवते तेच खरे शिक्षण. अर्थात स्वावलंबनाचा अर्थ स्वत:ची रोजीरोटी कमावणे इतकाच नाही.

शरीरश्रम करून काही ना काही उद्योग करायला प्रत्येकाने शिकलेच पाहिजे. पण त्यासोबत बुद्धीही स्वतंत्र, स्वयंभू असायला हवी आणि आपल्या मनावर आणि इंद्रियांवर संयम ठेवायलाही शिकले पाहिजे. शिक्षणाने मनुष्य स्वाधीन व्हायला हवा. कुठल्याही प्रकारची पराधीनता नको; ना पोटाची, ना इंद्रियांची ना बुद्धीची. शरीर, मन आणि बुद्धी या तिन्हींच्या पराधीनतेतून शिक्षणाने मनुष्याला मुक्त केले पाहिजे.

पण व्यावहारिक पातळीवर हे शिक्षण कसे द्यायचे? विनोबा म्हणतात की बालकांना प्रथम तारकांचे दर्शन करू द्या. आधी त्यांना आभाळ, सूर्य, चंद्र, नक्षत्रे, ढग, वारे यांचे दर्शन घडू द्या. मग पृथ्वी, आपला देश, आपले राज्य, जिल्हा, गाव, वस्ती, कुटुंब असे ज्ञान द्या. यामुळे काय होईल? तर त्यांना सृष्टीच्या आणि जीवनाच्या विशालतेची कल्पना येईल. आजचे शिक्षण याच्या उलट जाते. मी, माझे कुटुंब, माझी जात, माझे गाव, माझी भाषा, माझे राज्य, माझा देश अशी सुरुवात होते. विश्वाचा परिचय सर्वांत शेवटी होतो. त्यामुळे इतिहास, भूगोल, भाषा इत्यादी शिकताना माणसाची दृष्टी प्रथमपासूनच संकुचित राहते. त्याचे क्षुद्र अभिमान जागृत होतात. तसे न करता त्याचे मन मोठे होईल असेच शिक्षण सुरुवातीपासून दिले गेले पाहिजे.

शिक्षणाबाबतच्या हा दृष्टिकोन, विनोबांची विचार करण्याची जी खास स्वतंत्र शैली आहे (जिचा उल्लेख लेखाच्या सुरुवातीस केला) तिच्याशी सुसंगत आहे. विनोबांची दृष्टी हीच आहे की माणसाचे मन क्षुद्र अभिमानातून, इतिहासाच्या जोखडातून, अंधश्रद्धांतून पूर्णपणे मुक्त व्हायला पाहिजे आणि त्यासाठी त्याने आपल्याभोवती जे अफाट भव्य, विश्व पसरले आहे त्याचा आधी वेध घ्यायला हवा. शिक्षणाने ही ताकद त्याच्यामध्ये आणायला पाहिजे. मुख्य म्हणजे शिक्षण हे शरीरश्रमातून मुक्ती मिळवण्याचे साधन मानता कामा नये. आज शिक्षणाचा मुख्य उद्देश शरीरश्रमापासून सुटका मिळवणे हा दिसतो. त्यामुळे उत्पादक औद्योगिक क्षेत्राची पिछेहाट तर होतेच, पण उच्चनीचतेची भावनासुद्धा वाढत जाते. या विषमतेमुळेच भारतासारख्या देशाची प्रगती थांबली. ती जर परत सुरू करायची असेल तर माणसाला स्वावलंबी करणारे शिक्षण मिळायला हवे.

असे शिक्षण हे मातृभाषेतूनच मिळू शकते हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. विनोबांचे याबाबतीतले लिखाण अप्रतिम सुंदर आहे. त्यांनी अगदी सोप्या शब्दांत सांगितले आहे की मनुष्याचे हृदय ग्रहण करू शकेल अशी भाषा फक्त मातृभाषाच असते. मातृभाषेऐवजी परक्या भाषेतून शिक्षण दिले तर मुले निर्बोध बनतील. यासाठी त्यांनी एक सुंदर उदाहरण दिले आहे. ते म्हणतात की, इंग्लंडमधील मुलांना जर कन्नड किंवा तेलगू भाषेतून शिक्षण दिले तर त्या मुलांचे काय होईल? तसेच आपल्याकडच्या मुलांचे होत आहे. त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाची गोष्ट करणे हे शंभर टक्के मूर्खपणाचे आहे!

याचा अर्थ विनोबांचा इंग्रजी भाषेला विरोध आहे असे नाही. माणसाने जितक्या भाषा शिकता येतील तितक्या शिकाव्यात असाच त्यांचा संदेश आहे. मात्र इंग्रजांनी स्वत:च्या सोयीसाठी इंग्रजी भाषा भारतात लादली आणि त्यामुळे आपण गुलाम मनोवृत्तीने तिच्याकडे पाहतो आहोत असे ते सांगतात. जीवनातील सर्व व्यवहारांत इंग्रजी भाषेचा उपयोग करण्याच्या अट्टहासामुळे भारतातील विषमता वाढली आणि ह्यामुळे सर्वसामान्य लोकांचे नुकसान झाले. मुख्य म्हणजे विज्ञान हे इंग्रजी भाषेतच राहिल्याने त्याचा सर्वसामान्यांपर्यंत प्रसार झाला नाही. मातृभाषेतून शिक्षणाचा पाया पक्का करून मग आवश्यक त्या तंत्रकौशल्यासाठी इंग्रजीचा उपयोग केला पाहिजे असा त्यांच्या सांगण्याचा अर्थ आहे.

बऱ्याच लोकांचा असा समज आहे की आजच्या काळातील गुंतागुंतीचा व्यवहार पार पाडण्यासाठी आपल्या भाषा समर्थ नाहीत. विनोबा म्हणतात की, हा एक भ्रम आहे आणि तो आपण मनातून काढून टाकला पाहिजे. आपल्याकडे शेकडो वर्षांपासून विविध प्रकारचे सामाजिक ज्ञान विकसित होत आले आहे आणि त्यामुळे विविध प्रकारचे, विविध अर्थाचे शब्द व संज्ञा प्रचलित आहेत. त्यांचा वापर आपण व्यवहारात करायला पाहिजे. शिवाय इतर भाषांतून शब्द स्वीकारून आपल्या भाषा मजबूत केल्या पाहिजेत. यासाठी भाषिक पुरुषार्थ हवा. आमच्या भाषेचे काय होणार म्हणून रडत बसण्याऐवजी मेहनत घेऊन, अभ्यास करून, ईर्षेने आपल्या भाषा संपन्न बनवायला हव्यात. विशेष म्हणजे, भारतीय भाषांमध्ये संबंध वाढवायला हवा; म्हणजे विविधतेत एकता हे जे भारतीय जीवनाचे उद्दिष्ट आहे ते साध्य होईल.

विनोबांसारखे संतपुरुष हे साहित्य-कला यांच्यापासून फटकून राहिले असतील असे कोणालाही वाटेल. पण तसे अजिबात नाही. शब्दांमध्ये अपार शक्ती आहे याचे त्यांना भान होते आणि म्हणून साहित्यकारांचे समाजात आगळे स्थान आहे असे त्यांनी म्हटले आहे. आपण पूर्वी कविता करत असू; पण कविता चांगली झाली की लहानपणी अग्नीला आणि तरुणपणी गंगेला समर्पित करत असू असे ते म्हणतात. हे करण्यामागे नुसतीच निरिच्छता नव्हती तर आपली साहित्यिक शक्ती भाराभर शब्द लिहिण्यात खर्च न करता मनातल्या मनात रिचवून, वाढवत नेण्याचीही दृष्टी होती. विनोबा म्हणतात की असे करण्यात आपण काही गमावत नाही तर त्यातून आपली आत्मनिष्ठा वाढत जाते. (कवी मर्ढेकरांनीही ‘आत्मनिष्ठा’ हाच शब्दप्रयोग अशा संदर्भात केला आहे.)

अपार चिंतन व मनन करून मग साहित्य बाहेर यायला हवे. साहित्य त्यालाच म्हणायचे की जे आत्म्यासहित आत्म्याबरोबर चालते. सहित, सोबत चालणारा साथी. मनाच्या एका खोल गुहेतून साहित्य वरती येते आणि सगळ्यांना पावन करते. समाजातली नैतिक सत्ता ही साहित्यकार निर्माण करत असतात. आपल्या या शक्तीचे त्यांना भान हवे. समाज आपली पर्वा करो न करो; त्यांनी आंतरिक निष्ठेने साहित्यनिर्मिती केली पाहिजे. विनोबांचे हे सांगणे सगळ्या साहित्यकारांनी कायम ध्यानात ठेवण्यासारखे आहे.

विनोबा गांधीजींचे उत्तराधिकारी होते असा उल्लेख आधी आलाच आहे. उत्तराधिकारी म्हणजे शिष्य किंवा अनुयायी नव्हे. शिष्य हे गुरूने सांगितलेल्या वाटेवरून निमूटपणे चालत राहतात. उत्तराधिकारी मात्र गुरूच्या वारशाचा विस्तार करतो. त्यात स्वत:ची भर घालतो. विनोबांनी अनेक प्रकारांनी ते केले. पण दोन प्रकार महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे सर्वोदयाचा विचार भूदानाच्या कल्पनेतून प्रत्यक्षात कसा आणता येईल हे त्यांनी दाखवले आणि दुसरे म्हणजे गांधीजींच्या सत्याग्रह कल्पनेला प्रेमाची जोड दिली.

भूदानाची संकल्पना ही भारताच्या सामाजिक जीवनाला विनोबांनी दिलेली खास देणगी आहे. आपल्या जीवनगाथेत विनोबांनी म्हटले आहे त्याप्रमाणे १९५१ साली आंध्रप्रदेशात शिवरामपल्ली येथे सर्वोदय संमेलन भरणार होते. तेथे जाण्यासाठी विनोबा वर्ध्याहून पायी निघाले. संमेलन संपल्यावर तेलंगणात, जिथे जमिनीच्या प्रश्नावरून असंतोष होता, अशा भागात फिरताना ते पोचमपल्ली नावाच्या खेड्यात आले. तिथे अनेक दलित भूमिहीन कुटुंबे होती. तिथल्या सभेत त्यांनी विनोबांना सांगितले की आम्हांला थोडी जमीन मिळाल्यास आम्ही मेहनत करून पोट भरू. त्यांची हृदयद्रावक कहाणी ऐकून गावातल्या एका मोठ्या शेतकऱ्याने तिथल्या तिथे शंभर एकर जमीन दान दिली. ते पाहिल्यावर विनोबांना एक निराळेच सूत्र सापडल्याचा साक्षात्कार झाला.

भारतातला गरिबीचा प्रश्न हा जमिनीच्या असमान मालकीचा आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महाराष्ट्रासारखे काही भाग सोडले तर भारतात सर्वत्र जमीनदारी पद्धत होती. ब्रिटिशांनी आपल्या सोयीसाठी ती अधिकच बळकट करून ठेवली होती. बहुतेक सर्व ठिकाणी सर्वसामान्य शेतकरी हा जमीनदाराकडे कूळ म्हणून वा मजूर म्हणून राबत होता. जमीनदारांकडची लाखो एकर जमीन काढून ती शेतकऱ्यांना कशी द्यायची हा मोठा प्रश्न होता. त्यासाठी कूळकायदा केला गेला, पण त्याला मर्यादित यश येत होते. त्यामुळे ग्रामीण भागात संघर्षही पेटत होता. विनोबांच्या असे लक्षात आले की कायद्याने, सक्तीने वा झगडे करून जमीन मिळवण्याऐवजी मोठ्या शेतकऱ्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला आवाहन करून जर जमीन मिळवली तर हा प्रश्न मुळातच सुटेल आणि त्यासाठी रक्त सांडायची गरज पडणार नाही.

म्हणून मग १९५१ सालापासून विनोबांनी भारतात सर्वत्र पायी फिरून भूदान मागण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यासाठी पुढची तेरा वर्षे भारतभर पदयात्रा केली. आज विश्वास बसणार नाही पण जवळ जवळ ४२ लाख एकर जमीन त्यांना ‘भूदान’ म्हणून मिळाली. तिचे वाटप करण्याकरता सरकारने विशेष कायदा केला. भूदानाच्या कल्पनेतूनच ग्रामदानाची कल्पना निघाली. भूदानामध्ये काही लोकांनी केलेले जमिनीचे वैयक्तिक दान अभिप्रेत होते; पण केवळ तेवढ्याने सर्वोदयाला अभिप्रेत अशी समाजाची पुनर्रचना होत नव्हती. ग्रामदानामध्ये गावातल्या सर्व लोकांनी आपल्या जमिनीचे दान करायचे, वैयक्तिक मालकी विसर्जित करायची आणि मग प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे, पण मालकी हक्क न ठेवता, तिचा उपयोग करायचा अशी कल्पना होती. सध्या ही कल्पना अनेकांना विचित्र वाटेल; पण भारतात प्रत्येक राज्यात ग्रामदानी गावे आहेत आणि त्या गावांच्या व्यवस्थापनासाठी सरकारने विशेष ग्रामदान कायदाही केला आहे.

विनोबांनी १९६४ पर्यंत भूदान यात्रा चालवली. नंतरही काही काळ ते त्यामध्ये सक्रिय होते, पण मग हळूहळू ते त्या कामापासून निवृत्त झाले. एवढेच नाही तर नंतर त्यांनी त्या विषयाचा पाठपुरावा केला नाही. भूदानयज्ञाचा झंझावात हळूहळू विझत गेला. सुमारे बारा लाख एकर जमिनीचे प्रत्यक्षात वाटप झाले. पण नंतर हे काम थंडावले. आज अनेक गावात कागदोपत्री भूदानाच्या जमिनी आहेत, पण त्यांचे वाटप भूमिहीनांमध्ये झालेले नाही. ग्रामदानाचेही तसेच आहे. कायद्याची चौकट उपलब्ध आहे, पण प्रत्यक्षात त्याप्रमाणे व्यवस्थापन होत नाही.

विनोबांनी भूदानाचा पाठपुरावा का केला नाही हे सर्वच लोकांना पडलेले कोडे आहे. कारण तसा पाठपुरावा न झाल्यानेच भूदान चळवळ आपले ध्येय गाठू शकली नाही. विनोबांनी पाठपुरावा न करण्याचे मुख्य कारण असे असावे की सुमारे बारा-तेरा वर्षे भूदान यात्रा झाल्यावर आता हे काम पुष्कळ झाले असे त्यांना वाटले असणार. आपण आपल्या पद्धतीने जे करायचे ते केले. आता त्यात अधिक मन व शरीर गुंतवणे योग्य नव्हे. आता हा भार इतरांनी वाहावा अशी त्यांच्या मनाची धारणा झाली असावी. त्यांच्या एकूण विरागी वृत्तीशी ते सुसंगतच होते. १९६४ साली पवनारला आल्यानंतर मग ते लौकिक पद्धतीच्या सामाजिक कामातून निवृत्त होत गेले. त्यांचे मन अधिकाधिकरीत्या आध्यात्मिक साधनेतच रंगून गेले. एखादा साधक जेव्हा अशा ‘परमध्येया’च्या उपासनेला लागतो तेव्हा मग भौतिक किंवा सामाजिक उद्दिष्टे त्याला मोह पाडू शकत नाहीत.

विनोबांच्या सर्व आध्यात्मिक चिंतनाचा सारांश म्हणजे त्यांना ‘प्रेमाचा’ झालेला साक्षात्कार. गांधीजींनी सत्य आणि अहिंसा या कल्पनांचा पुरस्कार केला. त्यांना प्रेमाचे महत्त्व माहीत नव्हते असे नाही, पण विनोबांनी त्या कल्पनेचा अधिक विस्तार केला. केवळ सत्य आणि अहिंसेच्या पुरस्कारात एक प्रकारची कठोरता येते. सत्याच्या आग्रहामध्ये तर ती जाणवतेच. विनोबांची दृष्टी प्रेमाची आहे आणि तोच त्यांचा मुख्य संदेश आहे.

माणसाने एक दुसऱ्याशी प्रेमाने वागले पाहिजे असा उपदेश साधू, संत, महात्मे गेली शेकडो वर्षे देत आहेत. पण तरीही माणसातला दुष्टपणा कमी होत नाही. याचे कारण हा उपदेश नुसता कानावरून जातो. नदीतला गोटा प्रवाहातून बाहेर काढला की कोरडा, खडखडीत होतो तसा. प्रेमाची भावना ही हृदयात स्थिर व्हायला हवी, हे विनोबांनी मूलत: सांगितले. तिचा हृदयात वास झाला की मग सभोवतालच्या जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी एकदम बदलते. मनातली कटुता नष्ट होते. आपले आचरण आणि व्यवहार बदलून जातात. आपला आपल्यालाच एक वेगळा आनंद होत जातो. भलेमोठे तत्त्वज्ञान समजले नाही तरी चालेल, पण दुसऱ्याबद्दल राग, द्वेष, मत्सर न बाळगता प्रेमाने वागावे एवढे समजले तरी पुरे आहे. विनोबा सांगतात की, प्रेम हेच ब्रह्मविद्येचा आधार आहे. संसाराचे सार आहे. जीवनातले अमृत आहे.

या बाबतीत विनोबांची नाळ गांधीजींपेक्षा ज्ञानेश्वरांशी जुळते. विनोबांचे साहित्य वाचत असताना सदैव जाणवत राहते की हा मराठीचा दुसरा ज्ञानेश्वर आहे. तीच अफाट प्रज्ञा, तसेच नैष्ठिक ब्रह्मचर्य, तेच आभाळासारखे विचार, तेच आपल्या भाषेवरचे प्रेम आणि सर्व भूतमात्रांविषयीचा तोच आंतरिक कळवळा. ज्ञानेश्वरीसारखीच विनोबांनीही गीताई लिहिली हा निव्वळ योगायोग नाही. ती एक अत्यंत विचारपूर्वक केलेली भाषिक कृती आहे. विनोबांचा वेदाचा, उपनिषदाचा आणि षट्दर्शनांचा गाढा अभ्यास होता. प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान त्यांना चांगले अवगत होते आणि ज्ञानेश्वराप्रमाणेच त्या सगळ्या तत्त्वज्ञानाचे सार भगवद्गीतेमध्ये एकवटले आहे याचेही ज्ञान होते. ते ज्ञान त्यांच्या हृदयात स्थिर झाले होते यात काही शंका नाही. पण जे आपल्याला समजले ते आपल्याजवळच न ठेवता इतरांनाही सांगितले पाहिजे ही त्यांची प्रेरणा समान होती. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते आपल्या भाषेत सांगितले पाहिजे ही श्रद्धा महत्त्वाची होती. ज्ञानेश्वराने जर त्याच्या काळात उर्दू किंवा पर्शियन या ज्या प्रतिष्ठित राजभाषा होत्या त्यात आपले ज्ञान सांगितले असते तर तो आज जागतिक कीर्तीचा तत्त्वज्ञानी म्हणून ओळखला गेला असता. विनोबांना तर तसे करणे सहज शक्य होते. त्यांनी जर इंग्रजीचे माध्यम आपल्या आविष्कारासाठी वापरले असते तर विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ विचारवंत म्हणून जगाने त्यांना डोक्यावर घेतले असते. पण त्यांनी तसे केले नाही. ही त्यांची कमजोरी नाही. मोठेपणा आहे. ज्ञानेश्वराने विठ्ठलभक्तीची परंपरा सुरू केली. विनोबा म्हणतात की, विठ्ठल हाच परम विकसित देव आहे. कारण तो अहिंसक आहे. इतर सर्व देवांच्या हातात शस्त्रे असतात. पण विठ्ठल मात्र कमरेवर हात ठेवून उभा आहे. तो सांगतो की घाबरू नका, भवसागराचे पाणी फक्त कमरेइतके आहे. प्रेम आणि भक्ती यांच्या साहाय्याने तो पार करता येईल.

विनोबांच्या सगळ्या विचारांचे सूत्र काय? या प्रश्नाचे उत्तर अवघड नाही. विनोबांनीच ते निरनिराळ्या ठिकाणी देऊन ठेवले आहे. ते म्हणजे ‘आत्मज्ञान हेच आयुष्याचे प्रयोजन.’ जीवन जगताना निरनिराळी कार्ये आपल्या हातून होतात. काही परिस्थितीमुळे होतात. काही आपण हेतूपूर्वक घडवतो. काही जणांचे आयुष्य सुतासारखे सरळ निघून जाते. काहींच्या हातून मोठमोठे पराक्रम घडतात. ज्यांच्या हातून पराक्रम घडले त्यांचे आयुष्य सार्थक आणि जे सरळ, साधेपणाने जगले त्यांचे निरर्थक असे मानायचे का? विनोबा याचे उत्तर ‘नाही’ असे देतात. पराक्रम घडणे, त्यातही मानवी संस्कृतीला उपकारक असे पराक्रम घडणे चांगलेच. त्याचे महत्त्व वादातीत आहे. पण पंतप्रधान बनणे, अब्जाधीश होणे किंवा नोबेल प्राइज मिळवणे असे काही आयुष्याचे प्रयोजन ठेवता येत नाही. ह्या गोष्टी होतात, झालेल्या चांगल्या, त्याबद्दल दुःख तर अजिबात नको; पण तसे घडवायचेच हे काही मानवी आयुष्याचे प्रयोजन नव्हे. आयुष्याचे प्रयोजन, हे आपल्या भोवतालचे विश्व कसे आहे, ते कसे चालते, त्यात आपले स्थान काय, कर्तव्य कोणते आणि ते कसे पार पाडायचे हे समजून घेण्याचे आहे. ह्यालाच आत्मज्ञान म्हणतात.

आधुनिक विज्ञानातील एक सिद्धांत असा आहे की पृथ्वीवर बुद्धिमान जीवन अस्तित्वात यावे आणि निरंतर वाढावे यासाठीच हे विश्व निर्माण झाले आहे. त्यामुळे बुद्धिमान जीवनाचे परम-लक्ष्य विश्वाचे आकलन करून घेणे हेच असू शकते. वेगळ्या भाषेत असं म्हणता येईल की, स्वत: आणि सृष्टी यांच्यामधील संबंधाला समजून घेणे म्हणजे आत्मज्ञान. तसे ते समजून घेणे हे मानवी जीवनाचे उद्दिष्ट आहे. ते ज्याला समजते त्याचे आयुष्य सार्थ होते. असा माणूस शांत, समाधानी असतो आणि प्रसन्नतेने जीवन जगतो. सुखदुःखात त्याचे मन स्थिर असते. चिंता, काळज्या त्याला पोखरत नाहीत. राग-लोभापासून तो मुक्त असतो. मुख्य म्हणजे या ज्ञानातून एक वेगळा आनंद त्याला सदैव प्राप्त होत असतो. त्या आनंदात मग्न राहणे हे आयुष्याचे उद्दिष्ट आहे.

विनोबांचे लिखाण वाचताना या आनंदाचा अनुभव आपल्याला कायम येत राहतो. संपूर्ण विश्वामध्ये जे गूढ रहस्य भरलेले आहे त्याचे ज्ञान या माणसाला झालेले आहे हे सदैव जाणवत राहते. ते ज्ञान आपल्याला पुनःपुन्हा सांगण्यात त्याने आयुष्यभर धन्यता मानली. हे ज्ञान सर्वश्रेष्ठ प्रकारचे आहे. ते सामाजिक गोष्टींबद्दलचे जसे आहे तसेच राजकीयसुद्धा. पण त्याहीपेक्षा ते आत्म्याचे समाधान करणारे आहे. असे ज्ञान की जे मिळवून शेकडो वर्षे इथले ऋषी-मुनी पावन होत गेले. मध्यंतरीच्या काळात ते ज्ञान पाखंडाच्या गाठोड्यात अडकून पडले होते. विनोबांनी पुन्हा एकदा ते आपल्या सगळ्यांकरता मोकळे केले आहे. तसे करताना ते स्वत:तर कृतकृत्य होऊन गेलेच, पण आपल्यालाही तो मार्ग त्यांनी दाखवून दिला आहे. स्वत:च स्वत:चा दिवा होऊन वाटचाल करण्यासाठी.

अभिप्राय 2

  • माझ्या आठवणीप्रमाणे बोकिलांच्या पुस्तकावर दिवाकर मोहोनींनी आक्षेप घेणारे भाषण माग्रस या संस्थेमध्ये केले होते. बरेच विनोबा विचार आशा व्यक्त करणारे आहेत, तर्कातून निष्पादित नाहीत, असा श्री. मोहोनींचा सूर असल्याचे आठवते. जर श्री. मोहोनींची या लेखावर प्रतिक्रिया देता आली तर बरे होईल.

  • खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.