सिनेमाकडे पाहण्याची निर्मम दृष्टी देणारा ‘सिनेमा पाहणारा माणूस’

अशोक राणे हे नाव चित्रपटशौकिनांच्या चांगल्या परिचयाचं आहे. गेली चार दशके ते सातत्याने लेखन करीत आले आहेत. विविध दैनिकांतून त्यांनी चित्रपटसमीक्षा लिहिली आहे. याच काळात त्यांनी चित्रपट माध्यम केंद्रस्थानी ठेवून ग्रंथलेखनही केले आहे. त्यांच्या ग्रंथांना राष्ट्रपती पुरस्कारही लाभले आहेत.

चित्रपटजगतातला त्यांचा संचार हा केवळ लेखनापुरता मर्यादित नाही. फिल्म सोसायटी चळवळीत एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणून त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यातून त्यांची कारकीर्द वेगळ्या दिशेने घडत गेली. विविध देशांतील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षक (ज्युरी) म्हणून जाण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक व्यापक आणि विशाल असे परिमाण प्राप्त झाले. अनेक दूरचित्रवाणी मालिकांचे पटकथा – संवाद लेखक म्हणून तर त्यांनी नाव मिळविलेच परंतु दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही त्यांनी मुलुखगिरी केली. त्यांच्या नावावर ‘मस्तीभरा है समा’, ‘माय नेम इज अॅन्थनी गोन्साल्विस’ असे जवळपास सात-आठ माहितीपट आणि ‘कथा तिच्या लग्नाची’सारखा चाकोरीबाहेरचा चित्रपटही जमा आहे.

अशोक राणेंचा हा प्रवास घडला कसा? एका अतिसामान्य मालवणी कुटुंबात जन्मलेला परंतु तल्लख बुद्धी असलेला अशोक राणे हा जन्मजात संघर्ष करणारा आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’त उपजिविकेसाठी नोकरी करता करता त्यांनी चित्रपट माध्यमाविषयीची आपली आवड पोटतिडिकेने सांभाळली, जपली आणि उत्तरोत्तर वाढवत नेली. चित्रपटमाध्यमाविषयी एकप्रकारचे ग्लॅमरयुक्त आकर्षण असते, तसेच पांढरपेशा आणि अतीव नैतिक अहंकारापोटी घालूनपाडून बोलण्याची आणि दुसरीकडे आंबटशौकिन कुतूहल बाळगण्याची वृत्तीही असते. चित्रपटाच्या दुनियेत वावरणारा किंवा त्याच्या नादी लागलेला म्हणजे ‘वाया गेलेला’ असे समीकरण बनले आणि ते वाढत्या वयाच्या तरुण-तरुणींच्या माथी मारले गेले. हे समीकरण कसे चुकीचे आणि पोकळ आहे ते अशोक राणे यांचे ‘सिनेमा पाहणारा माणूस’ नावाचे आत्मकथन वाचून लख्खपणे लक्षात येते.

चित्रपटमाध्यम हे विसाव्या शतकाला व्यापून राहिले आणि एकविसाव्या शतकातही समाजमाध्यमावर त्याचा पगडा राहिला आहे. १९९०च्या आसपास आपल्याकडे चित्रपटांची पिछेहाट होत आहे की काय अशी शंका येऊ लागली होती. परंतु या माध्यमाचे स्वतःचे असे आंतरिक बळ असल्यामुळेच त्याने पुन्हा उसळी घेतली. अशोक राणे यांनी प्रथमपासूनच चित्रपटांचा मनसोक्त आस्वाद घेण्याची भूमिका ठेवली आहे.

१९५०च्या दशकात चित्रपट सुरू होण्यापूर्वी ‘फिल्म प्रभाग’ निर्मित माहितीपट प्रत्येक चित्रगृहातून दाखविणे सक्तीचे असे. खऱ्या चित्रपटशौकिनाला या माहितीपटापासून चित्रपट पहायचा असे. राणे म्हणतात त्याप्रमाणे पालम विमानतळावर उतरणारे किंवा तिथून आकाशात झेपावणारे विमान त्या माहितीपटातून दिसे. प्रसन्न व्यक्तिमत्वाचे जवाहरलाल नेहरू दिसत आणि अगदी काही क्षण का होईना पण क्रिकेट कसोटीसामन्याची क्षणचित्रे दिसत. राणेंनी आपले पुस्तक आंद्रे बाझां, फ्रान्स्वा त्रूफो आणि पॅरिसचे ‘सिनेमाथेक फ्रॉन्से’ हे पहिले चित्रपट-संग्रहालय जिद्दीने स्थापन करणारे आणि त्याचे प्राणपणाने जतन करणारे ऑनरी लाँगलुवा यांना अर्पण केले आहे. ही नावे सामान्य चित्रपटशौकिनांच्या परिचयाची नसतील. एकीकडे जागतिक चित्रपटातील अशा महानुभवांविषयी लिहिताना राज कपूर, दिलीपकुमार, देव आनंद, अमिताभ बच्चन, हृषिकेश मुखर्जी आणि राजेश खन्ना यांच्यासंबंधीही लिहिताना त्यांना न्यूनगंड वाटत नाही. चित्रपट पहात पहात क्रमाक्रमाने या माध्यमाविषयी आणि एकूणच साहित्य, समाज आणि संस्कृती यांविषयी प्रगल्भ आणि परिपक्व समज आणि जाण कशी घडत जाते ते अशोक राणे यांच्या उदाहरणावरून आणि लेखनावरून दिसून येते.

लाँगलुवांनी आपले संग्रहालय कसे उभे केले याविषयीची कहाणी राणेंनी पुस्तकात लिहिली आहे. हिटलरच्या काळात पोलंडमधल्या एका ज्यू इसमापाशी काही दुर्मिळ चित्रपट असल्याचा सुगावा लाँगलुवांना लागला. त्या संग्रहाकडे गेस्टापोंचे लक्ष जाण्याआधी तो हस्तगत करणे महत्वाचे होते. लाँगलुवाने आपल्या धाकट्या भावाकडे हे काम सोपवले. तो अर्थातच घाबरला. “हे पिस्तुल जवळ ठेव आणि तशीच वेळ आली तर स्वतःवर गोळी झाडून घे.” असे सांगत त्याने भावाच्या हाती पिस्तुल ठेवले. भावाने कामगिरी पार पाडली आणि लाखमोलाचा ऐवज घेऊन तो पॅरिसला परतला.

गुरुदत्त यांचे सिनेमॅटोग्राफर व्ही.के.मूर्ती यांच्याबरोबरचा राणेंचा संवाद ‘कागझ के फूल’ मधील ‘वक्त ने किया क्या हंसी सितम’ या गाण्याच्या चित्रीकरणाची, त्यातील छायाप्रकाशाच्या लपंडावाची उद्बोधक गोष्ट सांगून जातो. ‘साहिब बिबी और गुलाम’मध्ये मीनाकुमारीचे पडद्यावरचे पहिले दर्शन अत्यंत विलक्षण आहे. ते पाहून खुद्द मीनाकुमारी म्हणते की मी दिसायला इतकी सुंदर आहे? ही तर व्ही.के.मूर्तींची कमाल आहे.

तरुण हृषिकेश मुखर्जी मृणाल सेन यांच्या घरी जातात. मृणाल सेन घरी नसतात. त्यांचे वडिल हृषिदांवर प्रश्नांचा भडीमार करतात आणि प्रत्येक उत्तरावर ‘मूर्ख’, ‘नालायक’ अशी शेलकी विशेषणं हृषिदांच्या अंगावर भिरकावतात. नंतर हृषिदांच्या लक्षात येतं की आपण नोकरी करतो, पगार आईच्या हातावर ठेवतो हे ऐकल्यावर मृणाल सेन यांच्या वडिलांच्या तोंडून येणारे ते अपशब्द हे त्यांना नसून मृणालदांना उद्देशून आहेत.

ऋत्विक घटक हा प्रतिभावान दिग्दर्शक दारूच्या विळख्यात सापडला होता. माधवी मुखर्जी ही त्यांच्या ‘सुवर्णरेखा’ या गाजलेल्या चित्रपटाची नायिका होती. एकदा ऋत्विकदा तिच्याकडे पैसे मागायला गेले. दारूसाठी पैसे द्यायला तिने नकार दिला. ऋत्विकदा आल्यापावली परतले. नंतर माधवीला अपराधी वाटू लागले. ती त्यांच्या घरी गेली आणि तिने ऋत्विकदांच्या पत्नीकडे पैसे दिले. अशोक राणे यांना यावरून कलंदरपणे जगणारा कवी मनोहर ओक यांची आठवण होते. राणेंची जी कारकीर्द आहे ती माझ्यासारख्यांसमोर घडलेली आहे. आम्ही त्यांचे समकालीन आहोत. त्यामुळे त्यांच्या अनुभवांचे आणि संवेदनांचे आम्ही केवळ साक्षीदारच आहोत अशातला भाग नाही, आम्ही त्यात सहभागीही आहोत. त्यामुळे साहजिकच त्यात अधिक रस वाटतो आणि त्यांच्याविषयी अधिक जवळीकही वाटते.

आजकाल जवाहरलाल नेहरूंना लाखोली वाहणाऱ्यांची आणि त्यांचे चारित्र्यहनन करणाऱ्यांची चलती आहे. परंतु राणेंच्या कथनात नेहरूंचे जे चित्र आले आहे त्यातून नेहरू हे किती विशाल दृष्टीचे, प्रागतिक विचारांचे होते हे लक्षात येते. पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमधले प्रा.सतीश बहादूर अतिशय विद्वान आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. ते मूळचे अलाहाबाद विद्यापीठातले. तिथे ते १९६०च्या दरम्यान फिल्म सोसायटी चालवत. मारिया सितोन ही परदेशी विदुषी त्यांचं काम आणि ज्ञान पाहून प्रभावित झाली. तिने बहादूर यांची नेहरूंकडे प्रशंसा केली. नेहरूंनी नव्याने सुरू झालेल्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये ताबडतोब त्यांची नेमणूक केली. यावरून नेहरूंची पारख किती योग्य होती हे लक्षात येते.

अशोक राणे यांचं ‘सिनेमा पाहणारा माणूस’ हे पुस्तक म्हणजे चित्रपटजगतातील अशा असंख्य आणि विलक्षण गोष्टींचा खजिना आहे. तो लुटताना चित्रपटमाध्यमाचं अवघं अंतरंग उलगडतं आणि समृद्ध व्हायला होतं आणि जाता जाता असंही म्हणायला हरकत नाही की सिनेमाकडे पाहण्याची एक निर्मम दृष्टी हे पुस्तक देऊन जातं.

लेखक ग्वाल्हेर घराण्याचे गायक/ पत्रकार आहेत.
संपर्क : +919821504623

अभिप्राय 2

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.