मनोगत

जगातील आजची परिस्थिती अभूतपूर्व म्हणावी लागेल. ह्याचा अर्थ असा नव्हे की आजवर साथीचे रोग आलेच नाहीत. आले, परंतु त्यावरील उपाय म्हणून जागतिक संचारबंदी लादावी लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. अश्या संचारबंदीचे परिणाम काय होत आहेत आणि काय होणार आहेत, ह्यांचा विचार सर्वप्रथम करणे क्रमप्राप्त आहे.

अगदी अलीकडेपर्यंत सुरू असलेले जातीय, धार्मिक, राजकीय ध्रुवीकरणाचे प्रयत्न ह्या एकाच समस्येमुळे तूर्तास कालबाह्य झाले आहेत. सरकार पूर्ण शक्तीनिशी ह्या समस्येशी झुंजण्यात लागले आहे. हा विषाणू चीनमधून भारतात संक्रमित होण्याचे मुख्य कारण म्हणजे जगभरात प्रवास करणारे उच्चवर्गीय आणि उच्चमध्यमवर्गीय प्रवासी. करोनाचा चीनमध्ये उद्रेक झाल्यानंतरदेखील अनेक महिने ह्यांचा प्रवास अनिर्बंधपणे आणि कोणत्याही परीक्षणांना सामोरे नं जावे लागता सुरू होता. (ह्याचे एक कारण परीक्षण करण्याची उपकरणेच उपलब्ध नव्हती व तोवर परिस्थितीचे गांभीर्यही समजले नव्हते). ह्या प्रवाशांचे वेळीच विलगीकरण न केले गेल्यामुळे आज पूर्ण जगभरातील नागरिकांना विलगीकरण करावे लागण्याची पाळी आली.

असे सक्तीचे विलगीकरण केल्यामुळे रोजंदारी करणाऱ्यांची आणि स्थलांतरित कामगारांची आज काय परिस्थिती झालेली आहे ती आपण बघतोच आहोत. स्वतःला असे विलग करून घेणे किंवा सोशल डिस्टन्स पाळता येणे हे केवळ उच्चवर्गीयांना किंवा उच्चमध्यमवर्गीयांनाच परवडणे शक्य आहे. कारण ह्यांच्याच मोठ्या घरांमध्ये तितकी जागा आहे. हे लोक वारंवार हात धुऊ शकतात कारण ह्यांच्याकडील नळांना २४ तास पाणी आहे. सॅनिटायझरचा वापरही हेच लोक करू शकतात कारण ते विकत घेणे ह्यांनाच परवडू शकते. टाळेबंदीच्या २१ दिवसात काहीही काम न करता घरात बसून राहणेही फक्त अश्यांनाच शक्य होणार आहे कारण त्यांचे हातावर पोट नाही.

एकूण ह्या विषाणूपासून बचाव करण्याची साधने केवळ धनवानांनाच उपलब्ध आहेत. परिणामस्वरूप ह्या विषाणूचा फटका, ज्या उच्चवर्गीय किंवा उच्चमध्यमवर्गीयांमुळे तो पसरला, त्यांना बसणार नसून निरपराध गरीब आणि मध्यमवर्गीयांना बसणार आहे.

तरीदेखील इतर देशांपेक्षा भारतात करोना कमी वेगाने पसरण्याची काही कारणे यातच दडली आहेत.

१. आर्थिक दरी : भारतासारख्या देशात ही दरी प्रचंड मोठी आहे. यावेळेस पहिल्यांदाच अशा कुठला संसर्गजन्य रोगाची सुरुवात उच्चवर्गीय प्रतिष्ठितांपासून झाली आहे. मुळातच ह्या वर्गाचे आर्थिकदृष्ट्या खालच्या पातळीवर असणार्‍यांशी साथसोवळीकरण (social distancing) असते. त्यामुळे साथीच्या रोगांना आवश्यक ती जनघनता ज्या वर्गात अधिक आहे तेथे हा रोग अद्याप तितकासा बळावलेला नाही. दुसरे, उच्चवर्गीय लोकांची ओळख पटणे व त्यांच्यापर्यंत पोहोचणेदेखील तसे सोपे असते. त्यांच्या विमानप्रवासांचा इतिहास काढणे, त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकांपर्यंत पोहोचणे तुलनेत सोपे असते. सध्याच्या वर्तमानपत्रांतून येणार्‍या करोनाग्रस्तांचे तपशील बघता हे स्पष्टपणे लक्षात येते. ह्या साथीची सुरुवात सर्वसाधारण लोकांपासून झाली असती, तर हा रोग अतिशय वेगाने फोफावला असता.

२. प्रतिकारशक्ती : भारत देशाचे भौगोलिक स्थान बघता तसेच इतिहासातील रोगांविषयी माहिती बघता असे लक्षात येते की सर्वसाधारण आशियातील लोकांच्या शरीरामध्ये रोगांचा सामना करणारी यंत्रणा अधिक सबळ आहे. ही प्रतिकारशक्ती आपल्याला करोनाच्या संसर्गापासून दूर ठेवण्याच्या कामी येते आहे. याची अनेक उदाहरणे गेल्या महिन्याभरांतील परिस्थिती बघता देता येतील.

जयपूर येथे पोहोचलेल्या इटलीच्या २१ पर्यटकांपैकी प्रत्येक जण करोनाग्रस्त झाला. सुरुवात काही लोकांपासून झाली असली, तरी तो त्वरेने सगळ्यांपर्यंत पोहोचला. हे २१ पर्यटक ज्यावेळी जयपूरात होते, तेव्हा भारतसरकारने वा राज्यसरकारने कठोर पावले उचलली नव्हती. संचारबंदी नव्हती, टाळेबंदी नव्हती. तेव्हा हे पर्यटक ज्या हॉटेलमध्ये उतरले होते, ज्या दुकानांमध्ये गेले होते, ज्या पर्यटनस्थळांवर फिरले होते, तेथे त्यावेळी हजर असणार्‍या भारतीयांची संख्या हजारांमध्ये तर नक्कीच असणार. तेव्हा त्या इटालियन पर्यटकांच्या संपर्कात आलेल्या भारतीयांवरदेखील त्याचा परिणाम होणे अटळ होते. प्रत्यक्षात मात्र ही संख्या तितकीशी वाढलेली दिसत नाही.

लोकप्रिय गायिका कनिका कपूर करोनाग्रस्त असताना उच्चवर्गीय वर्तुळात झालेला तिचा वावर अनेक अंगांनी वादग्रस्त ठरला आहे. तो मुद्दा वेगळा. परंतु त्यानंतर तेथे उपस्थित चार-पाचशे लोकांपैकी काही नावे तरी करोनाग्रस्तांच्या यादीत वाढायला हवी होती. असेही झालेले दिसले नाही.

पाकिस्तानसारख्या देशात संचारबंदी वा टाळेबंदी लागू केली नसूनही अद्याप करोनाग्रस्तांची संख्या म्हणावे तितकी वाढलेली नाही.

तेव्हा आपली प्रतिकारशक्ती आपल्या कामी येत असावी हे गृहीतक निराधार नक्कीच नाही.

अर्थात याचा अर्थ असा नव्हे की आपण सुरक्षित आहोत आणि आता संचारबंदी, टाळेबंदी हटवायला हरकत नाही. उलट वेळीच योग्य ती काळजी घेऊन करोनाचा प्रसार वाढू न देता परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देणेच शहाणपणाचे ठरेल. गेल्या काही दिवसांपासून परदेशातून आलेल्यांशी संपर्क नसणार्‍या वा प्रवासाचा इतिहास नसणार्‍या काहींमध्ये करोनाची लागण आढळायला सुरुवात झाली आहे. तेव्हा आपण काळजी घेणे, साथसोवळे पाळणे, सरकार उचलत असलेल्या पावलांत आपला अधिकाधिक सहभाग देणे तसेच जेथे जेथे गरज आहे तेथे मदतीचा हात पुढे करणे ही आजची गरज आहे.

मात्र ह्या संकटाचा एक चांगला म्हणावा असाही परिणाम झाला आहे. सरकारला आणि नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव ह्या संकटामुळे झाली आहे. सरकारने जाहीर केलेली १ लाख ७० हजार कोटी रुपयांची तजवीज ही ह्या जबाबदारीच्या जाणिवेची परिणती आहे. सरकार आता गरीब नागरिकांना ‘काम न करता घरी बसण्यासाठी’ अन्न आणि पैसा देणार आहे.
खरेतर अशी आपदा असो अथवा नसो, देशातील प्रत्येकास रोजगार मिळेल हे बघण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची एकेकट्याची नसून संपूर्ण देशाची सामायिक जबाबदारी आहे. आणि देशातील प्रत्येक नागरिकास असा रोजगार देणे जर शक्य नसेल तर ज्या नागरिकांना रोजगार मिळू शकलेला नाही अश्यांना स्वाभिमानाने जगता येण्याजोगा बेरोजगारी भत्ता किंवा UBI देण्याची जबाबदारी त्या देशाची किंवा पर्यायाने सरकारची आहे. ह्या संकटकाळी जसे आपण ही मदत घेणाऱ्यांना ‘फुकटे’ म्हणत नाही तसेच असे संकट नसतांना ज्यांना अशी मदत घ्यावी लागेल त्यांनाही फुकटे म्हणून हिणवण्याचे कारण नाही. (खरेतर एका देशात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाचा त्या देशाच्या सकल उत्पन्नाच्या एका समभागावर जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि तो त्या त्या देशाला आज ना उद्या मान्य करणे भाग पडणार आहे.)

करोनाचा आणखीन एक परिणाम म्हणजे, चर्च, मस्जिद, मंदिरांचे बंद झालेले दरवाजे. मग ते व्हॅटिकन असो मक्का मदिना असो की तिरुपती बालाजी किंवा साईबाबा. देवधर्माची दुकाने चालवणाऱ्यांना ईश्वर, अल्ला किंवा देव संकटाच्या वेळी धावून येत नसतो हे चांगले माहीत असते. ह्या निमित्ताने ते सर्वसामान्य भक्तांच्या, भाविकांच्याही लक्षात येऊ लागले आहे. वास्तविकपणे ह्या ब्रह्मांडामध्ये जे काही अस्तित्वात आहे ते सर्व निसर्गाचाच भाग आहे. आपल्याला ज्या काही ऊर्जा/शक्ती माहीत झाल्या आहेत त्या सर्वच निसर्गनियमाप्रमाणेच चालतात. उद्या जाऊन जर इतर कोणत्या ऊर्जा/शक्ती सापडल्या तर त्या ही निसर्गनियमांप्रमाणेच चालणार आहेत. त्या शक्तींची उपासना केल्यामुळे, त्या त्यांचे नियम मोडून, इतरांना डावलून, केवळ भक्तांना मदत करतील अशी शक्यता नाही. आपल्याला सगळ्यांना ह्या संकटाच्या वेळी देव मदत करणार नसून केवळ परस्परांशी सहकार्यच आपल्याला तारून नेऊ शकेल.

करोनाच्या संसर्गभयाने करण्यात आलेल्या संचारबंदी व टाळेबंदीमुळे घरी बसलेल्या सगळ्यांनाच आणखीन एक प्रश्न सध्या सतावतो आहे. तो असा की, मी ही इतकी धावपळ नेमकी कशासाठी करत असतो? मला जीवनात काय मिळवायचे आहे? पैसा की आनंद?

ह्या संकटाच्या निमित्ताने आपल्याला आपली गाडी राष्ट्रीय सकल उत्पादनाकडून (Gross Domestic Product) सकल राष्ट्रीय आनंदाकडे (Gross Happiness Index) वळवता येईल का?

  • सुधारकमधील लेखांवर आपल्या प्रतिक्रिया, पत्रव्यवहार वेळोवेळी प्रकाशित केल्या जाईल. सुधारक मतमतांतरांचे स्वागत करतो.
    सुधारकमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांतील मतांशी सुधारकची टीम सहमत असेलच असे नाही.
    सुधारकमधील लेख पूर्वप्रकाशित असू शकतात. परंतु सदर लेखकाच्या परवानगीनेच ते येथे देण्यात आले आहेत.

अभिप्राय 1

  • आपली प्रतिकारशक्ती कामी येते आहे हे खरे आहे आणि त्यातही मजूर वर्गातील लोकांची प्रतिकारशक्ती उच्च वर्गातील लोकांपेक्षा जास्त आहे असेदेखील म्हणावेसे वाटते. ते लोक जास्त काटक असतात.
    या संकटाच्या निमित्याने सरकारने जो बेरोजगारी भत्ता देऊ केलाय ते खरोखरच UBI च्या दिशेने टाकलेले पाऊल म्हणावे लागेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.