परमेश्वरश्रद्धेचे मानसशास्त्र – योगेश बादाड

कोरोना नावाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म विषाणूनं जगातल्या बलाढ्य परमेश्वरांना सळो की पळो करून सोडलेलं आहे. या जागतिक महामारीत जगातले सगळे देव लॉकडाऊन झाले. मुसक्या बांधून मंदिरात बसले. परमेश्वराच्या या  नाकर्तेपणावर सडेतोड हल्ले झाले. होत आहेत. शिवसेनेचे खासदार तथा ‘सामना’चे संपादक मा.संजय राऊत यांचा ‘देव मैदान सोडून पळाले’ या शीर्षकाचा संपादकीय लेख नुकताच ‘सामना’मधून प्रकाशित झाला. तो बराच गाजला. त्या प्रखर बुद्धिवादी लेखानं प्रबोधनकार ठाकरेंच्या सडेतोड लेखनशैलीची आठवण महाराष्ट्राला करून दिलेली आहे. मा.संजय राऊतांनी सदर लेखात आजच्या जैविक महायुद्धाच्या आणि वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर परमेश्वराच्या कर्तृत्वशून्यतेवर घणाघाती प्रहार करून त्याचं अस्तित्वच पार खिळखिळं करून टाकलेलं आहे.

खरेतर परमेश्वर ही लौकिक विश्वातील अलौकिक कल्पना आहे. तिचा लौकिक जीवनाशी, त्यातील सुखदुःखांशी, प्रश्नांशी काहीही संबंध नाही. आजवर मानवजातीवर असंख्य संकटे आलीत. त्यातील अनेक संकटांचे अन्वयार्थ त्याला लावता आले नाही. कार्यकारणभावाविषयीचं मानवी प्रज्ञेचं अज्ञान आणि भिती या दोन गोष्टींवर परमेश्वराचं अस्तित्व आजतागायत तग धरून आहे. त्यामुळे परमेश्वर कधीतरी कर्ताकरविता होता हे असंभवच आहे. तो कधी कर्ताही नव्हता, कर्मही नव्हता आणि क्रियापद तर नव्हताच नव्हता. तो जीवनातील प्रश्नांच्या मैदानातच नव्हता. त्यामुळे मैदानातून पळून जाण्याचा प्रश्न तसा उद्भवत नाही.

परंतु परमेश्वर हा जीवनाच्या प्रश्नभूमीत नसला तरी तो लोकांच्या मनोभूमीत निश्चितच आहे. लोकांनी बांधून दिलेल्या मंदिर-मशिदीत आहे, चर्चमध्ये आहे. कोरोनाच्या सार्वत्रिक महामारीनं परमेश्वराचा नाकर्तेपणा जगजाहीर केल्यामुळे परमेश्वरश्रद्धेचं आसन आज कधी नव्हे इतकं डळमळीत झालं आहे. या अर्थानंच तो मैदान सोडून पळाला. खरंतर मानवी जीवन नावाच्या वैज्ञानिक संघर्षविधानात तो विरामचिह्नांच्याही भूमिकत कुठं दिसत नाही. तरीही तो जीवनाचा कर्ताकरविता आणि सर्वशक्तिमान मानला गेला. तारणहार, दयाळू, कृपाळू, संकटमोचक, विघ्नहर्ता अशी अनेक विशेषणं त्याला दिली गेली. परंतु कोरोना नावाच्या अतिसूक्ष्म विषाणूनं सर्वशक्तिमान परमेश्वराला अक्षरशः मृतप्राय करून सोडलेलं जगानं पाहिलं आहे. पाहतो आहे.

परमेश्वराचे अस्तित्व प्रश्नांकित करणारे वा त्याला पळता भुई थोडी करणारे अनेक प्रसंग मानवजातीवर ओढवले. देवदर्शनाला जाताना, देवदर्शनावरून परतताना कितीतरी अपघात झाले. त्यात असंख्य लोक ठार झाले. असंख्य जायबंदी झाले. महामारी, अवर्षण, अतिवर्षण, भूकंप, दुष्काळ, चक्रीवादळ, त्सुनामी अशा भीषण संकटात कोट्यवधी लोकांचे प्राण गेले. धार्मिक स्थळी, तीर्थक्षेत्रात, मंदिरात हजारो महिलांवर अत्याचार झाले. त्यांच्या अंगावरील दागिने चोरीला गेले. असंख्य लोक गंडवले गेले, तरी लोकमानसातील परमेश्वरश्रद्धेची बुरुजे उद्ध्वस्त झाली नाहीत.

परमेश्वरश्रद्धेचं मानसशास्त्र इतकं विचित्र आणि गुंतागुंतीचं असतं की, मानवी जीवनात काहीही घडलं तरी परमेश्वर हा मुख्य आरोपी किंवा गुन्हेगार कधी ठरत नसतो. तो चराचरात असतो. तो सर्वज्ञ असतो. तो नीतिमान आणि न्यायी असतो आणि सगळा त्याच्याच इच्छेचा भाग असतो; तरीही तो नामानिराळाच असतो, हे कसं शक्य आहे?

हे शक्य असतं. डोक्यातला विवेक मेला की डोकं नुसतंच हेअरस्टँड बनतं. त्याचं विवेकाशी असलेलं नातंच पार तुटून जातं.  म्हणून धर्मवादी, ईश्वरवादी वा आध्यात्मवादी लोक विवेक मारणारे कार्यक्रम सतत राबवत असतात. विवेक मेला की माणूस गुलामच होतो. तो परमआज्ञाधारीच होतो आणि आपल्या जगण्याचा रिमोट परमेश्वराच्या हाती तो देऊन बसतो. माणूस परतंत्र झाला की धर्म त्याचा डोळाही बनतो आणि मेंदूही बनतो. धर्म सांगेल तेवढंच त्याचं विश्व असतं आणि तेच त्याचं अंतिम सत्यही असतं. माणूस आणि शाश्वत सत्य यात धर्माचा अभेद्य पडदा असतो. परतंत्र माणूस तो भेदून पुढं जाऊ शकत नाही. म्हणून शाश्वत सत्याची पडताळणी तो करू शकत नाही. सभोवतीच्या समाजवास्तवाची चिकित्सा तो करू शकत नाही. कार्यकारणभाव वा प्रतीत्यसमुत्पाद नावाच्या वैज्ञानिक प्रक्रियेपासून माणूस एलिनेट (वियुक्त) झाला की तो स्वतःशीही एलिनेट होत जातो आणि तो नियतीच्या हातचा बाहुला बनतो. त्याच्या बौद्धिक आणि वैचारिक गुलामगिरीचा हा अत्युच्चबिंदू असतो. माणूस गुलामगिरीच्या या परमोच्च शिखरावर पोहोचला की मानवी जीवनात कितीही विनाशकारी घडलं तरी त्याच्या अंतर्मनातील परमेश्वरश्रद्धा ढासळत नाही, इतकं हे मानसशास्त्र चिवट असतं. देवाच्या नावानं मृत्युमुखी पडलेली माणसं मरत नसतात तर ती स्वर्गात जात असतात. ती पुण्यवान असतात म्हणून ती परमेश्वरप्रिय असतात, असं या मानसिकतेचं म्हणणं असतं. माणूस हा नाममात्रच असतो. त्याला किती जगवायचं, कोणत्या अवस्थेत जगवायचं हे पूर्णतः परमेश्वराच्या हातात असते, अशी या मानसशास्त्राची मान्यता असते. मानवी जीवनात अनाकलनीय संकटांचा गुंता वाढत गेला की शेवटी ‘त्या’ची इच्छा मानून आकाशाकडे बोट दाखवून मोकळी होणारी ही मानसिकता असते. त्यामुळे काही केल्या परमेश्वरश्रद्धेचा डोलारा डळमळत नाही. देव परीक्षा घेतो, देव अंत पाहतो, अखेर देवाची इच्छा, शेवटी कर्ताकरविता तोच आहे, असं मानणारी मानसिकता ही गुलाम मानसिकताच असते. ती कोणत्याही जीवघेण्या संकटात परमेश्वरश्रद्धेचे वाडे डगमगू देत नाही. उलट परमेश्वरच कसा योग्य आहे, तोच कसा न्यायी आहे, नीतिमान आहे हे पटवून देण्याची धडपड ती सातत्यानं करीत असते.

कोरोनामुळे शत्रूवरही येऊ नये अशी वेळ सगळ्या धर्मातल्या सगळ्या परमेश्वरांवर आज आलेली आहे. परमेश्वरश्रद्धांच्या भिंतींना त्यानं जबर हादरे दिले. त्यानं सार्वजनिक प्रार्थना बंद केल्या. नमाज बंद केले. विश्वाचे निर्माते आणि उद्धारकर्ते कुलूपबंद केले. तंत्र-मंत्र, पुजारी, पाद्री, बाबा-बुवा, भटजी, गंडे-दोरे, मौलाना-मौलवी, होमहवन सारे चिडीचूप केले तरी परमेश्वरश्रद्धेची इमारत जमीनदोस्त होऊ शकणार नाही.

परतंत्र माणसं ही रबरासारखीच असतात. ताणलं की ताणतात आणि सोडलं की पुन्हा मूळ अवस्थेत येतात. मंदिर-मशिदीची, चर्चची दारं उघडी झाल्याची शासकीय घोषणा होताच श्रद्धेचा आणि भक्तीचा अनुशेषच ही माणसं भरून काढतात; आणि “देवा, तुझ्यामुळेच आम्ही वाचलो. तू किती कष्ट उपसलेस रे! तू डॉक्टर बनून आमच्यावर उपचार केलेस. तू परिचारिका बनून आमची सेवा केली. तू पोलीस बनून आम्हांला पहारा दिला”, अशी करुणाही भाकतात. प्रत्यक्षात शासनानं काय केलं, माणसं वाचावीत म्हणून देशाचं किती नुकसान करून घेतलं, देश किती मागं गेला, कोणासाठी गेला याचं अजिबातच भान या लोकांना राहत नाही. ना त्यांना जीवाची बाजी लावून रात्रंदिवस बाधित आणि संशयीत रुग्णांची प्रत्यक्ष सेवा करणाऱ्या डॉक्टरांचं भान, ना नर्सेसचं भान, ना चोवीस तास पहारा देणाऱ्या पोलिसांचं भान. सगळं श्रेयच त्या निष्क्रीय दगडी मूर्तीला ते देऊन बसतात. माणूस हा विचारशील प्राणी आहे. विचारानंच त्याला इतर चतुष्पाद प्राण्यांहून वेगळं केलं. मूर्त सत्य नाकारणं आणि अमूर्त असत्य स्वीकारणं हा अविवेक त्याला कुठं घेऊन जाईल याचा विचार त्यानं केला पाहिजे. या महामारीच्या निमित्तानं माणसानं अंधश्रद्धेचं बोट धरायचं की विज्ञानाचं बोट धरायचं, तर्काधिष्ठित सत्य स्वीकारायचं की अतार्किक गोष्टींना कवटाळायचं याचा विचार त्यानं केला पाहिजे. “हा असा अंधश्रध्द समाज महामारीत मरण्याच्याच लायकीचा असतो” या वाक्याचा पुनर्विचार त्यानं केला पाहिजे.

संपर्क
9822345965
https://www.facebook.com/om.ahuja.7547

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.