पत्रोत्तर – हीलर्सचा डॉक्टरांवरील दोषारोप

अंबुजा साळगावकर व परीक्षित शेवडे या लेखकद्वयांचा ‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मार्गानेच जाऊ या ’ हा प्रतिसादवजा लेख वाचत असताना डॉ. शंतनू अभ्यंकरांच्या लेखातील मुद्द्यांचा त्यांनी केलेला प्रतिवाद हा आताच्या प्रचलित राजकारणातील वितंडवादासारखा आहे की काय असे वाटू लागते. काँग्रेसने केलेल्या चुका आम्हीही (पुनःपुन्हा) केल्या तर बिघडले कुठे? याच तालावर ॲलोपॅथीतही  दोष असताना (पर्यायी) देशी औषधोपचार पद्धतीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे का करतात हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे व त्यासाठी संविधानातील वाक्यांचा आधार ते घेत आहेत.  

या संदर्भात काही वर्षापूर्वी मी हीलर्सचा डॉक्टरावरील दोषारोप हा  लेख लिहिला होता. (सुधारकमध्ये तो छापला होता की नाही हे मला आता आठवत नाही.) सोबत तो लेख मी जोडत आहे. कदाचित या विशेषांकाच्या अनुषंगाने हा लेख वाचकांना आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती v/s पारंपरिक पूरक व पर्यायी उपचार पद्धती याबद्दल (पुन्हा एकदा)  विचार करण्यास प्रवृत्त करू शकेल.

(ह्या लेखात आधुनिक वैद्यकशास्त्राच्या (MBBS, MD) पदवीधरांना ‘डॉक्टर्स’ आणि मुख्य प्रवाहातील वैद्यकीय उपचारांऐवजी ॲक्युपंक्चर, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, हर्बल मेडिसिन इ.सारख्या तथाकथित पूरक व पर्यायी उपचारपद्धतींचा (पउप) अवलंब करणाऱ्यांना ‘हीलर्स’ असे संबोधण्यात आले आहे.)

हीलर्सचा डॉक्टरांवरील दोषारोप

आधुनिक वैद्यकशास्त्रातील उपचारपद्धत (आवैउप) पूर्णपणे विज्ञानावर आधारित आहे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. तरीसुद्धा पउपची भलावण करत असताना हीलर्स डॉक्टर-जमातीवर तुटून पडतात व आपलीच पद्धत कशी हितकारक आहे याचे वर्णन करत असतात. या मंडळींच्या मुद्रित व/वा इलेक्ट्रॉनिक माध्यमातील आक्रमक जाहिरातीकडे लक्ष दिल्यास शासनाने सर्व हॉस्पिटल्सना टाळे ठोकून देशाची आरोग्यव्यवस्था यांच्या हाती सुपूर्द करायला हवी असे वाटू लागते. या हीलर्सच्या मल्टीस्पेश्यालिटी उपचारपद्धतीत सर्व प्रकारच्या म्हणजे सर्दी, पडसे, अंग-डोके-गुडघेदुखीसारख्या किरकोळ आजारापासून क्षयरोग, दमा, मूत्रकोषविकार, हृदयरोग, कर्करोग, इत्यादींसारख्या जीवघेण्या आजारापर्यंत सर्व रोगांवर अक्सीर इलाज असून आधुनिक वैद्यकशास्त्राला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या सर्व गोष्टींचे ज्ञानभांडार त्यांच्याजवळ आहे असा त्यांचा दावा आहे. शिवाय त्यांच्या उपचारपद्धतीला शेकडो वर्षांची परंपरा असून त्याचे सर्व दाखले ग्रंथबद्ध आहेत याबद्दल हीलर्सच्या मनात अजिबात शंका नाही. त्याचप्रमाणे हीलर्सची प्रत्येक पिढी तीच तीच औषधे देत असते आणि तेच तेच आरोप करून आधुनिक वैद्यकशास्त्राला नामोहरम करत असते. खरे पाहता या आरोपात काही तथ्य नाही. आणि असले आरोप सहजरित्या खोडता येतात. डॉक्टर्सवर होत असलेल्या आरोपांची व टीकेची यादी व त्याचे मुद्देसूद खंडन करणारा हा लेख निश्चितच उपयोगाचा आहे.

मुळात या पउपच्या हीलर्सना डॉक्टर्सच्या विरोधात वैज्ञानिकरित्या वा तार्किकरित्या सामना करणे कठीण जात असते. म्हणूनच आधुनिक वैद्यकशास्त्रातील अपूर्णतेवर बोट ठेवण्याच्या प्रयत्नांत ते असतात. आवैउपची अपूर्णता म्हणजेच पउपची श्रेष्ठता हा त्यांचा दावा असतो. थोडक्यात उत्क्रांतीतील काही दुवे कच्चे आहेत असे वैज्ञानिकांनी कितीही ओरडून सांगितले तरी तेवढ्यावरून ही सृष्टी ईश्वरनिर्मित आहे असे परमेश्वरावर श्रद्धा असलेल्यांनी म्हटल्यासारखे हे असते. टीका करणारे पउपचे पुरस्कर्ते शब्दांचा मारा, तर्काचा विपर्यास, वस्तुस्थितीची चुकीची मांडणी, विज्ञानाचा अपप्रचार, यांवर भर देत असतात. वैयक्तिक अनुभवांच्या शिदोरीवर त्यांचा पुरेपूर भरवसा असतो. महत्त्वाचे म्हणजे रुग्णाला न दुखावता त्याच्या कलाकलाने जायचे, त्याच्या पसंतीस उतरलेल्या गोष्टींचीच शिफारस करायचे हे तत्व पाळत असल्यामुळे त्यांच्याकडे भरपूर पैसा व प्रसिद्धी ह्यांची कमतरता नाही.

खरे पाहता या हीलर्सबरोबर वाद घालण्यात काही अर्थ नाही. कारण ते बनचुके असतात व कुठलेही तार्किक प्रतिवाद पउपवरील त्याच्या अगाध (अंध)श्रद्धेला धक्का पोचवू शकत नाहीत. तरीसुद्धा जे अजूनही आवैउप की पऊप याच्या काठावर आहेत त्यांना यातील मुद्दे नक्की पटतील.

विज्ञानाला सगळ्या गोष्टी माहीत नसतात.
आपल्याला सर्व गोष्टी माहीत आहेत असा दावा विज्ञान कधीच करत नाही. तसे म्हणत असल्यास विज्ञानाला यानंतर काहीही करायची गरज भासणार नाही. विज्ञानाची ही अपूर्णताच वैज्ञानिकांना आपल्या ज्ञानात नवनवीन गोष्टींची भर घालण्यास सतत प्रेरणा देत असते. परंतु याचा अर्थ विज्ञानाच्या रिकाम्या जागा तुम्हाला आवडतील त्या परीकथांनी, चमत्कारसदृश गोष्टींनी, निसर्गनियमांना पायदळी तुडवणाऱ्या सिद्धांतानी भरून काढल्या पाहिजेत असा होत नाही.

माहिती मिळवण्यासाठी अजून कित्येक मार्ग आहेत.
अगदी बरोबर. अंतःस्फूर्ती, उत्स्फूर्तता, स्वप्नरंजन, कल्पनाविलास, रूढी/परंपरांचे खरे-खोटे दाखले, वैयक्तिक अनुभव, कलुषित निरीक्षण, अंदाजपंचे केलेली विधाने, आपलेच म्हणणे बरोबर आहे याचा अट्टाहास, stone thinking, इत्यादी अनेक ‘मार्ग’ माहिती मिळवण्यासाठी नक्कीच आहेत. परंतु या सर्व गोष्टी चमत्कारसदृश आभासी विज्ञानाकडे नेणार्‍या आहेत, एवढेच नव्हे तर आपल्या बुद्धीमत्तेला कुंठीत करणार्‍या आहेत; अंधश्रद्धेकडे घेऊन जाणार्‍या आहेत. या प्रकारे गोळा केलेल्या माहितीची चाचणी घेतल्यास वा त्यांना तार्किकतेची कसोटी लावल्यास त्या वास्तवापासून फार लांब आहेत हे लक्षात येईल. विज्ञानाच्या कसोटीला उतरलेले ज्ञानच खरे ज्ञान असते. आणि याच ज्ञानाने माणसाला चंद्रावर पाऊल ठेवण्यास मदत केली. हेच ज्ञान मानव समाजाला हजारो जीवघेण्या आजारापासून मुक्त करत आहे; त्याचे आयुष्य वाढवत आहे; व समाधानी आयुष्य जगण्यासाठी मदत करत आहे.

विज्ञानावरील निष्ठासुद्धा एकप्रकारची श्रद्धाच असते, व विज्ञानही धर्माप्रमाणे कट्टर होत आहे.
विज्ञानाचा मूळ आधार भौतिकता आहे. आणि या भौतिक जगात घडत असलेल्या यच्चावत घटनांमागील सुसंगत कार्यकारणभाव विज्ञानाद्वारे शोधता येतो. घटनेमागील कारण शोधताना अतींद्रिय शक्ती वा सुपरनॅच्युरल वा आध्यात्मिक अश्या कुठल्याही गोष्टींची गरज भासत नाही. विज्ञान कशावरही सहजासहजी ‘विश्वास’ ठेवत नाही. घटनेच्या संदर्भात प्रश्न विचारून वा निरीक्षण–चाचणी इत्यादींच्या आधारे तर्कसंगत उत्तर शोधले जाते व घटनांचा उलगडा केला जातो. वैज्ञानिक दृष्टिकोन खरोखरच काम करते हे अनेक उदाहरणांवरून लक्षात येऊ शकते. वैज्ञानिक धर्माच्या उपासकांप्रमाणे दुराग्रही नाहीत. चूक असेल तर कबूल करून पर्यायी उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात ते राहतात.

विज्ञान सतत बदलत असते.
होय, हे बदलणे चांगले लक्षण आहे. वैज्ञानिक निष्कर्ष हे नेहमीच हंगामी स्वरूपाचे असतात. हे निष्कर्ष दगडावरील न पुसणाऱ्या रेषा नाहीत. विज्ञानाला पुरावे लागतात. जसजसे नवीन पुरावे सापडतात तसतसे निष्कर्षांचा आढावा घेत दुरुस्ती केले जाते वा पूर्णपणे बाद ठरवले जाते. मात्र ठसठशीत पुरावे देऊनसुद्धा पउपच्या पद्धतीत बदल होत नाही. उलट रुग्णांच्या खाण्यापिण्यावर वा पथ्य पाळण्यात झालेल्या हलगर्जीपणाचा आरोप करत स्वतःचे वा पउपचे अपयश झाकले जाते. आवैउपमध्ये जर औषध परिणामकारक नसल्यास औषधाला केराची टोपली दाखवली जाते; उपचार बाद ठरवल्या जातात. वैद्यकीय इतिहासात हजारो औषधं वा औषधामागील सिद्धांत निरुपयोगी ठरल्यामुळे बाद केलेली शेकडो उदाहरणं सापडतील. पउपत असे बाद ठरलेले उपचार क्वचितच सापडतील. मुळात पउप चाचणीच्या भानगडीत पडत नाही. किंवा औषधाच्या परिणामकारकतेच्या संबंधात श्रेणी देत नाही. हीलर्सचे हातगुणच उपचाराच्या परिणामकारकतेचा निकष असतो. रुग्ण बरा झाल्यास यश हीलर्सचे वा उपचारपद्धतीचे. बरा न झाल्यास अपयशाचा धनी रुग्ण किंवा त्याचे नशीब, अशी तऱ्हा पउपत असते.

विज्ञान आग्रही असते.
गंमत म्हणजे एकीकडे विज्ञानाला दुराग्रही म्हणून हिणवायचे व दुसरीकडे विज्ञान बदलत असते असेही म्हणायचे. यात कुठेही तर्क-सुसंगती दिसत नाही. विज्ञानातील लवचिकतेमुळे पारदर्शकतेला भरपूर वाव असतो. नवीन गोष्टींची भर पडते. चुका दुरुस्त होतात. व योग्य प्रकारचे रोगोपचार मिळण्याची शक्यता वाढते. पउपचे हीलर्स मात्र आपलेच खरे व इतरांचे खोटे ठरवण्याच्या पावित्र्यात असतात. त्यामुळे ते जास्त दुराग्रही आहेत, डॉक्टर्स नाहीत.

मुख्य प्रवाहातील वैद्यकशास्त्राची तुम्ही उगीचच भलावण करत आहात.
एखादा तज्ज्ञगट संशोधन करून, चाचण्या घेऊन, पुरावे गोळा करून, त्यांची छाननी करून, व विश्लेषण करून निष्कर्ष मांडत असतो तेव्हा तो गट नेमके काय सांगत आहे ते समजून घेणे इष्ट ठरेल. आणि तो तसे का म्हणत आहे याचा विचार करणे आपले कर्तव्य ठरेल. पुराव्यावर आधारित केलेली विधानं ढोबळमानाने यानंतर काय करावे हे सूचित करत असतात. त्या सूचनेवरून प्रसंगानुरूप, रुग्णाच्या स्थितीनुसार डोज कमी-जास्त करणे, उपचाराची दिशा बदलणे याचे स्वातंत्र्य डॉक्टर्सना असते. पाककृतीसारखे थोडे कमी-जास्त झाल्यास सगळे काही बिघडून जाते, अशी धास्ती त्यात नसते. फक्त कुणीतरी अधिकारवाणीने सांगत आहेत वा शिफारस केली म्हणून त्यांचे म्हणणे मान्य करायलाच हवे अशी मानसिकता डॉक्टर्समध्ये नसते. तज्ज्ञांचा गट काय म्हणतो व या रुग्णाच्या बाबतीत ते कितपत लागू होईल याची शहानिशा करून डॉक्टर्स निर्णय घेत असतात. तुमची गाडी नीटशी काम देत नसताना सगळे गॅरेज मेकॅनिक्स गाडीतील कार्ब्युरेटर खराब झाला आहे असे सांगत असल्यास कार्ब्युरेटर बदलणे शहाणपणाचे ठरेल. त्याऐवजी कार्ब्युरेटरवर मंतरलेले पाणी शिंपडण्याचा सल्ला एखादा मांत्रिक देत असल्यास त्याचे न ऐकलेले बरे. पउपचे हीलर्स अशाच प्रकारचे ग्रंथप्रामाण्य वा व्यक्तीप्रामाण्याची उदाहरणे देऊन दिशाभूल करत असतात. हीलर्सना आपण काय विधान करत आहोत, कशाच्या आधारे ते विधान केले जाते याचीच मुळात कल्पना नसते.

जर डॉक्टर्स पउप उपचार करत असल्यास त्यांचा प्रॅक्टीस करण्याचा परवाना रद्द होईल अशी त्यांना भीती असते.
हा दावा तर अगदीच पोरकट वाटतो. कुठल्याही डॉक्टराचा या कारणास्तव परवाना रद्द केलेले ऐकिवात नाही. उलट रुग्णाच्या समाधानासाठी वा त्यांच्या आग्रहास्तव कित्येक डॉक्टर्स अशा प्रकारचे अविवेकी उपचार बिनदिक्कतपणे करत असले तरी त्यांचे काहीही नुकसान झाले नाही.

तुमच्यासारखे चिकित्सक उगीचच पउपला बदनाम करत असतात.
चिकित्सक नेहमीच विवेकाच्या बाजूचे असतात. त्यामुळे पुरावे नसलेले वा चाचणीस सामोरे न जाणारे वा विज्ञानाच्या कसोटीस न उतरलेल्या कुठल्याही गोष्टीबद्दल चिकित्सेचा आग्रह धरला जात असतो व त्यात गैर काही नाही. रुग्णाचे खरे हित कशात आहे व योग्य निर्णय घेण्यापूर्वी वस्तुस्थिती काय आहे याची कल्पना चिकित्सक नेहमीच देत असतात. पउपला फक्त ते ‘पर्यायी’ आहे म्हणून विरोध करत नाहीत, हे लक्षात ठेवायला हवे. उपचारपद्धत उपयुक्त, सुरक्षित व गुणकारक आहे किंवा नाही यावर चिकित्सकांची नजर असते. उपचारातील सर्व दाव्यांची वैज्ञानिकरित्या चाचणी घेतली की नाही याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. जर वैज्ञानिकरित्या केलेल्या चाचणीत पउप यशस्वी झाले तर चिकित्सक नक्कीच आपले मत बदलतील.

मोठमोठ्या विदेशी फार्मास्युटिकल कंपन्या पउपच्या विरोधात प्रचार करण्यासाठी डॉक्टर्सना व चिकित्सकांना पैसे चारत असतात.
या आरोपात काही तथ्य नाही. कारण संशोधन व चाचणी यात सकारात्मक निष्कर्ष मिळाल्यानंतरच प्रिस्क्रिप्शनवर देत असलेली औषधं बाजारात येतात. काही तुरळक अपवाद वगळता आवैउपची औषधं बिनधोक असतात. बाजारात येणाऱ्या वा आलेल्या औषधांबद्दल थोडीशी जरी शंका व्यक्त केली तरी त्याची दखल घेतली जाते व त्या औषधांवर बंदी घातली जाते. अशी औषधे बाजारात टिकत नाहीत. या उलट औषध या सदरात न मोडणारे फुड सप्लिमेंट्स, टॉनिक्स, यांचा खप वाढवण्यासाठी उत्पादक कंपन्या एकमेकींशी स्पर्धा करत असतात; खर्चिक जाहिराती देतात; वा डॉक्टर्सना लालूच दाखवून शिफारस देण्यास भाग पाडतात व खप वाढवतात. परंतु या रॅकेटमध्ये डॉक्टर्सप्रमाणे हीलर्सची संख्या कमी नाही. विरोधी कंपन्या चिकित्सकांना पैसे चारून अनुकूल अभिप्राय देण्यासाठी आमिष दाखवतात. वाढत्या बाजारीकरणामुळे या गोष्टींना थांबवणे अशक्य होत आहे. परंतु याचा अर्थ आवैउप टाकाऊ आहे असा होत नाही.

डॉक्टर्सना स्पर्धेची भीती वाटते.
हा अगदी भलतासलता आरोप वाटतो. कारण निष्णात डॉक्टर्सकडे रुग्णांची रांग लागलेली असते. त्यामुळे डॉक्टर्सना आपापसात स्पर्धा करण्याचे काही कारण नाही. डॉक्टर्सना रुग्णाची काळजी वाटत असते आणि काहीतरी भलतेसलते सांगून किंवा उपचार करून रुग्णांची दिशाभूल करण्यात त्यांना रस नसतो. या उलट पउपमध्ये नको त्या गोष्टी रुग्णांच्या माथी मारले जातात. व त्यांचे आरोग्य धोक्यात घातले जाते. या पउप हीलर्सच्या ‘प्रयोग’काळात रुग्णांचे पैसे, श्रम व बहुमूल्य वेळ वाया जातो. प्रत्येक हीलर्सला मात्र आपल्याकडेच (सर्व) ज्ञानाची मक्तेदारी असून ते ज्ञान (आपले वारसदार सोडून) इतरांना देण्यात धोका आहे अशी मनोमन खात्री असते. म्हणूनच त्यांची औषधे फक्त अंकातून ओळखल्या जातात किंवा संस्कृतप्रचुर (किंवा असंबद्ध – खोगो, गो वेदना, श्वास कुठार… ) नावाने खपवल्या जातात.

डॉक्टर्स फक्त लक्षणावर उपचार करतात; रोगाच्या मुळापर्यंत जात नाहीत.
यात काही तथ्य नाही! डॉक्टर्स रुग्णाच्या आरोग्यविषयक तक्रारीचे निदान करून रोगलक्षणामागील कारणांचा शोध घेत उपचार ठरवतात. (यापूर्वी (२०-३० वर्षांपूर्वी) अशाच लक्षणाचा रोगी आला होता व त्याला ५३४ नंबरमुळे बरे वाटत होते म्हणून तो डोज देत रहावा असा प्रकार आवैउपमध्ये नाही). एखादा रुग्ण न्युमोनियाने आजारी असल्यास फक्त ताप, वेदना किंवा खोकला यांवर उपचार न करता या उपचाराबरोबरच न्युमोनियाला कारणीभूत ठरणाऱ्या मायक्रोबचा शोध घेत त्यावरील प्रतिजैविके डॉक्टर्स देत असतात. एखाद्याचे हाड मोडले तर फक्त वेदनाशामक औषध देऊन त्याची बोळवण केली जात नाही. हेअरलाइन फ्रॅक्चर असल्यास नुसते पट्टी बांधून वा जास्त प्रमाण असल्यास अवयव प्लास्टर मध्ये ठेवून, पिन घालून फ्रॅक्चरची वाढ थांबवण्याचे प्रयत्न करतात, उपाय परिणामकारक व्हावे याची काळजी घेतात. एखाद्याचे पोट दुखत असल्यास फक्त वेदनाशामक गोळ्या देऊन घरी न पाठवता पोटातील विकारांचा शोध घेत यकृतला सूज वा appendicitis किंवा liver cirrhosis वा आणखी काही तरी दोष असण्याच्या शक्यता तपासून औषधोपचार वा शस्त्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी रुग्णाच्या (व त्याच्या नातेवाइकांच्या) मनाची तयारी करतात. आणि कालांतराने शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्ण ठणठणीत बरा होतो.

डॉक्टर्स मूळ कारण शोधत नाहीत असा आरोप करणारे हीलर्सच सगळ्या रोगांना एकच रामबाण उपाय म्हणून subluxations किंवा qi ला धक्का अथवा खाण्यात बदल असली कारणं देत उपचार ठरवतात. हातात हातोडा असला की सगळीकडे तुम्हाला खिळेच खिळे दिसू लागतात.

अभिप्राय 1

  • श्री प्रभाकर नानावटी यांचा हा उत्तम लेख पूर्वीही वाचला होता. हा लेख पुन्हा प्रकाशित केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.